आपण सर्वजण इथे वाचन आणि लेखन करण्यासाठी जमतो. अनेक विषयांवर चर्चा होतात, रंगतात, वादविवाद अन काथ्याकूटही होतो. या माध्यमाव्यतिरिक्तही आपण इतर वाचन करतो. रोजचे वृत्तपत्र वाचन हा आपल्या दिनक्रमाचा एक भाग असतो. त्यावरून एक नजर फिरवल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आज जरी इ-माध्यम प्रस्थापित झालेले असले तरी आपल्यातील बऱ्याच जणांना एखादे तरी छापील वृत्तपत्र वाचायला आवडते. जेव्हा आपण ते चाळू लागतो तेव्हा त्याच्या पानांमध्ये आपल्याला विविध विषयांची विभागणी केलेली दिसते. मग आपल्या आवडीनुसार आपण हव्या त्या पानावर रेंगाळतो.
संपादकीय पान हा वृत्तपत्राचा आत्मा असतो. त्याचा एक कोपरा हा खास वाचकांच्या पत्रांसाठी राखीव असतो. त्यामध्ये अनेक वाचक अल्प शब्दांमध्ये आपापली मते, विचार, तक्रारी वा सूचना मांडत असतात. अशा सदरातून सातत्याने पत्रलेखन करणे हे एक जागरूक नागरिक असल्याचे लक्षण असते. एक प्रकारे ते समाजातील ‘जागल्या’ची भूमिका करतात ! मला खात्री आहे की आपल्यातील अनेकांनी असे पत्रलेखन केले असेल आणि अधूनमधून करतही असाल. अशा लोकांपैकी मीही एक. या धाग्याचा हेतू सांगण्याआधी थोडे माझ्याबद्दल लिहितो.
माझ्या पत्रलेखनाची सुरवात झाली वयाच्या २१व्या वर्षी. ते माझे पदवीचे अखेरचे वर्ष. अभ्यासाच्या पुस्तकांच्या गराड्यात बसून प्रचंड वाचन, मनन, पाठांतर आणि मग चर्चा असा तो व्यस्त दिनक्रम असे. पण या सगळ्यातून थोडी तरी फुरसत काढून काहीतरी अभ्यासबाह्य करावे असे मनातून वाटे. आपल्या आजूबाजूस असंख्य घटना घडत असतात त्यातील काही मनाला भिडतात. त्यावर आपण कुठेतरी व्यक्त झाले पाहिजे असे अगदी आतून वाटे. तशा आपण मित्रांबरोबर चर्चा करतोच. पण त्या विस्कळीत स्वरूपाच्या असतात. पुन्हा त्या ठराविक वर्तुळात सीमित राहतात. जर मला काही विचार मुद्देसूद मांडायचे असतील आणि ते समाजात व्यापक स्वरूपात प्रसारित व्हावे असे वाटले तर ते लिहून काढणे क्रमप्राप्त होते. त्यातूनच लेखनाची ठिणगी मनात पडली आणि वाचकपत्र ही त्यासाठीची पहिली पायरी झाली.
तो जमाना हा फक्त छापील माध्यमाचा होता. रोज सकाळी घरी पेपर येऊन पडल्यानंतर तो प्रथम पटकावण्यासाठी घरच्या लोकांमध्ये स्पर्धा असायची ! वृत्तपत्रे ही बऱ्यापैकी गांभीर्याने वाचली जात. त्यांत लोक पत्रलेखन बऱ्यापैकी आवडीने करत. नामांकित वृत्तपत्रात आपले पत्र प्रसिद्ध होणे हे तितकेसे सोपे नव्हते आणि ते मानाचे समजले जाई. काही दैनिकांत या सदराबद्दलचे विशेष उपक्रमही राबवले जात. एका दैनिकात या सदरातील दरमहा १ पत्र हे बक्षीसपात्र ठरवले जाई. मग त्या पत्रलेखकाचा फोटो, परिचय इ. . प्रसिद्ध होई. काही पेपरांत एखाद्या मार्मिक पत्राला अनुरूप असे चित्र काढून ते विशेष चौकटीत प्रसिद्ध होई. तर एका दैनिकात त्यातले रोजचे मुख्य पत्र हे ठळक मथळ्यात असे. त्या पत्राच्या लेखकाला अंकाची एक प्रत वृत्तपत्राकडून भेट पाठवली जाई !
त्याकाळी पत्रलेखकाला आपले पेपरात छापून आलेले नाव पाहण्याचा आनंद काही औरच असे. त्यामुळे मलाही हे सर्व खुणावत होते. अशाच एका उर्मीतून मी पहिलेवहिले पत्र लिहीले. ते क्रिकेटवर होते. आता लिहून तर झाले पण छापून येण्याची काय शाश्वती? आपल्या शहरातील सर्वाधिक खपाच्या पेपरात तर ते छापून येणारच नाही असे मनोमन वाटू लागले. मग एक युक्ती केली. त्या पत्राच्या तीन हस्तलिखित प्रती सुवाच्य अक्षरात लिहिल्या आणि त्या तीन वृत्तपत्रांना पाठवल्या.
आता ते पत्र प्रसिद्ध होणार की नाही याची जाम उत्सुकता लागलेली. रोज सकाळी पेपर आल्यावर त्यावर झडप घालून ‘ते’ पान उघडायचे आणि त्यावर अधाशासारखी नजर फिरवायची. ८-१० दिवस गेले आणि एके दिवशी तो सुखद धक्का बसला ! पत्र छापले गेले होते. यथावकाश ते पत्र अन्य दोन पेपरांतही प्रसिद्ध झाले.
मग या प्रकाराची गोडी लागली. विविध विषयांवर पत्रलेखन हा माझा छंद झाला.
.....
आता ह्या धाग्याचा हेतू सांगतो. आपल्यापैकी काहीजण असेच पत्रलेखक असू शकतील. आपण पूर्वी लिहिलेल्या पत्रांची कात्रणेही जपून ठेवली असतील. तर अशा जुन्या पत्रांचे या धाग्यात पुन्हा प्रकाशन करावे अशी कल्पना आहे. एक पथ्य आपण पाळू. ते पत्र इथे लिहिल्यावर त्याखाली संबंधित वृत्तपत्र वा नियतकालिकाचे नाव, तेव्हाचा प्रकाशन दिनांक आणि ‘साभार’ अशी टीप यांचा उल्लेख करावा. म्हणजे ‘प्रताधिकार’ वगैरे समस्या येत नसावी ( येत असल्यास जाणकारांनी मत द्यावे). आपण स्वतःचेच पत्र इथे पुन्हा प्रकाशित करत आहोत. आपल्यातील तरुण पिढीतील लेखकांनी त्यांची पत्रे छापील ऐवजी फक्त इ-अंकास पाठवलेली असू शकतील. त्यांचेही स्वागत. एखाद्या विषयाचा पाठपुरावा पत्रांतून करून जर त्यावर काही शासकीय अंमलबजावणी झाली असेल, तर तेही जरूर लिहा. इतरांसाठी ते स्फूर्तीदायक ठरते. सध्या छापील वृत्तपत्रांतील वाचकपत्रे हे सदर आक्रसले आहे. पण त्याचबरोबर इ- अंकातील वाचक प्रतिसाद बरेच वाढलेले आहेत.
आपल्या गत लेखनाची पुनर्भेट अशी या धाग्यामागची कल्पना आहे. पत्र जेवढे अधिक जुने तेवढी अधिक मजा आता वाचताना येईल.
अजून एक.
आपल्यातील काही जण स्वतः पत्रलेखक नसले तरी ते सदर आवडीने वाचणारे असू शकतात. त्यांनीसुद्धा एखाद्या चांगल्या अथवा संस्मरणीय पत्राची आठवण लिहायला हरकत नाही.
तर मग मित्रांनो, काढा आपली जुनी कात्रणवही (किंवा इ-नोंद) आणि घडवूयात आपल्या पत्रांची पुनर्भेट !
धन्यवाद.
*********************************************
सुरवातीलाच आपले आभार मानतो या
सुरवातीलाच आपले आभार मानतो या धाग्याबद्दल. धाग्यातल्या भावना अगदी पटल्या. मला सुद्धा माझे पहिले पत्र मराठी चित्रपटांविषयी पाठवले होते व सकाळ मध्ये ते छापून आले होते ते या निमित्ताने अनेक वर्षांनी आठवले. त्यानंतर अजून काही पत्रे प्रसिद्ध झाली. हि सारी पत्रे असलेले अंक आहेत कुठेतरी अजून. जसे सापडतील तसे नक्की इथे पोस्त करतो.
आता आहे ती एक खूप कटू पत्राची आठवण. तसे हे पत्र नाही म्हणता येणार. बातमीखाली कॉमेंट लिहिली होती. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्ली येथे घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाने पूर्ण देश हादरला होता. काही दिवसांनी या मुलीचे सिंगापोर येथे उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. तेंव्हा जी कॉमेंट मी बातमीखाली लिहिली होती ती मला ध्यानीमनी नसताना सकाळ ने दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध केली. आपण म्हणते ते बरोबर आहे कि: पत्रलेखकाला आपले पेपरात छापून आलेले नाव पाहण्याचा आनंद काही औरच असे. पण हा एकच प्रसंग असा असेल कि कधी नव्हे ते वृत्तपत्रात पहिल्या पानावर माझे नाव आले होते पण मला त्याचा जराही आनंद नव्हता. तो पूर्ण दिवस आत्यंतिक औदासीन्यात गेला होता....
अजूनही हे आठवले कि गहिवरून येते.

अतुल ,
अतुल ,
अनेक धन्यवाद !
तुमची आठवण हृदयस्पर्शी आहे.
अजून काही जरूर लिहा.
मला हे सदर वाचायची खूप सवय
मला हे सदर वाचायची खूप सवय लागली होती. काही पत्रलेखक रोजच काही ना काही विषयांवर लिहायचे. त्यांची नावे पाठ झाली होती. काही महाभाग दुसऱ्या लोकांच्या नावाने पत्रे पाठवित. एकदा माझ्या वर्गातल्या भाऊसाहेब मंडलिक याचे नाव पत्रलेखक म्हणून आले होते. लेखक दुसराच होता पण मी तो पेपर भाऊसाहेबला दाखवला तर तो खूप घाबरला व मी नाही मी नाही असे विनवायला लागला. आजही ते आठवले की खूप हसू येते.
आजही ते आठवले की खूप हसू येते
आजही ते आठवले की खूप हसू येते.>>>> ☺️
मस्त अनुभव !
कधी काळी या सदरातून लोक
कधी काळी या सदरातून लोक आपपल्या भागातल्या समस्या मांडत. त्यावर त्या त्या विभागाकडून त्वरेने कारवाई होई. अर्थात काही पत्रे उत्तम माहिती देणारी असत. काही नावे तेव्हां पाठ झालेली असत. असे लोक अनेक पत्रातून पत्रे लिहीत. त्यांना बहुधा वाचकांची पत्रेकार म्हणत असावेत.
मग त्याचे स्वरूप आताच्या फेसबुक पोस्टींप्रमाणे बनले. आपल्या विचारधारेसाठी वाचकांनावेठीस धरले जाऊ लागले.
फेसबुक म्हणजे न छापली गेलेली वाचकांची पत्रेच आहेत असे वाटते.
** फेसबुक म्हणजे न छापली
** फेसबुक म्हणजे न छापली गेलेली वाचकांची पत्रेच आहेत असे वाटते.>>>
चांगला मुद्दा, सहमत.
धाग्याची कल्पना आवडली. बरेच
धाग्याची कल्पना आवडली. बरेच वर्षांपूर्वी एक छोटे पत्र वाचले होते त्याची ही आठवण.
पत्रलेखकाने त्याचा आरटीओ चा कटू अनुभव लिहिला होता. त्याने कार चालवायचे शिक्षण एका खाजगी ड्रायव्हर कडून घेतले होते. व्यक्तिगत शिकल्यामुळे त्याला कार चालवणे छान जमले होते. आता वेळ आली लायसेन्ससाठी परीक्षा द्यायची. तो मोठ्या आत्मविश्वासाने त्याला सामोरा गेला. कार व्यवस्थित चालवली. पण त्याला नापास केले गेले. पुढे असेच 3 वेळा झाले. आता त्याची चिडचिड वाढली. शेवटी तिथल्या एजंटने स्पष्ट सांगितले की या परीक्षेसाठी ड्रायव्हिंग स्कूल कडूनच या, तरच पास व्हाल !
अडला नारायण, करतो काय ? नाईलाजाने स्कूलचे पैसे भरून तिथे गेला. त्या परीक्षेत 5 मिनिटात त्याला पास केले गेले.
सदर पत्रात त्याने सर्वांना कळकळीने लिहिले होते की अजिबात खाजगीरित्या जाऊ नका, स्कूलमार्फत ‘हप्ता’ पोचविल्या शिवाय ते लोक पास करीत नाहीत.
साद जी मला वेगळा अनुभव आला.
साद जी मला वेगळा अनुभव आला. मी २००० साली मोसाचे कच्चे लायसन्स काढलं. बरोबर एक महिन्याने पक्क्या लायसन्स ची परीक्षा दिली, तेव्हा साहेबाबरोबर एजंट कागदपत्रे घेऊन उभा होता. माझी मोसा नवीन होती तरीही प्रदुषण चाचणी सर्टिफिकेट लागेल म्हणून अडवले, मी दहाच मिनिटात सर्टिफिकेट आणले. माझा नंबर आला, मी व्यवस्थित आठचा आकडा हाताने योग्य ते इशारे देऊन पुर्ण केला. एजंट मारक्या म्हशीसारखा माझ्याकडे बघत होता, नंतर आरटीओने अनेक वाहतूक चिन्हं दाखवून प्रश्न विचारले. माझा बरोबर उत्तरे देण्याचा कॉन्फिडन्स बघून कोरड्या चेहऱ्याने पासचा शिक्का मारला.
२००० मध्ये कारचे लायसन्स काढलं तेव्हा आरटिओने गाडी रिव्हर्स घ्यायला लावली. व छान गाडी चालवता असे कॉंप्लीमेंट दिली. लायसन्स ही मिळाले.
या उलट पंचाण्णव साली पुण्यात मोसाचे लायसन्स काढायला स्वत: गेलो होतो तर आरटिओने काय करतो असे विचारले . मी म्हटलं सुशिक्षित बेकार आहे. मग उर्मटपणे म्हणाला तुला पोसतं कोण. मी म्हटलं तुला काय पंचायत पडली आहे माझा बाप मला पोसतोय. तो म्हणाला निघ. मी कागदपत्रे तिथेच फाडून त्याला आईवरून शिव्या दिल्या. पण त्याची काही करायची हिंमत झाली नाही.
बरेचदा आरटीओ भ्रष्ट आहे कि सज्जन यावर काम होणं अवलंबून असते. कित्येकदा पंच्याण्णव लोकांकडून पैसे खाल्ले की पाच लोकांचे फुकट काम करतात. कारण पापाची बोचणी लागलेली असते.
साद व शशिराम, धन्यवाद.
साद व शशिराम, धन्यवाद.
*** कित्येकदा पंच्याण्णव लोकांकडून पैसे खाल्ले की पाच लोकांचे फुकट काम करतात.>>>
ते पाच लोक खरेच भाग्यवान हो !
आणि कुमार सर पंचाण्णव लोक
आणि कुमार सर पंचाण्णव लोक दुर्भागी. हेच लोक एकत्र आले तर चित्र एकदम बदलेल. एखादा माणूस पत्रं लिहून आवाज उठवतो. भारतात कुठेही कार्यालयात गेले तरी सत्तर टक्के लोक आपले काम होणारच नाही अशा विचाराने घाबरलेले असतात व एजंट गाठतात किंवा लाच देतात.
हेच लोक एकत्र आले तर चित्र
हेच लोक एकत्र आले तर चित्र एकदम बदलेल.>>>> + 111
* शशिराम, सहमत.
* शशिराम, सहमत.
* अतुल यांच्या आणखी एका पत्राची प्रतीक्षा आहे !
** वृत्तपत्रांतील या सदराची अनेक नावे आहेत. त्यातले मटाचे नाव मला सर्वात जास्त आवडते : बहुतांची अंतरे.
माझ्या लहानपणी १ गृहस्थ नेहमी
माझ्या लहानपणी १ गृहस्थ नेहमी टाईम्स ऑफ इंडियाच्या संपादकांना पत्रे लिहायचे आणि ती बऱ्याचदा छापून येत असत, असे आठवले. नाव नक्की आठवत नाही पण बहूदा P. Warrier होते.
सातत्याने पत्रलेखन करणाऱ्या
सातत्याने पत्रलेखन करणाऱ्या लोकांची संघटना आहे आणि त्यांची संमेलनेही होतात.