औमूआमूआ - विज्ञानकथा

Submitted by मिलिंद महांगडे on 6 April, 2019 - 03:42

औमूआमूआ - विज्ञानकथा

हवाई बेटावरच्या पॅन स्टार ऑब्झअरवेटरीमध्ये रॉजर नेहमीप्रमाणे रात्री आपल्या टेलिस्कोप समोर बसला होता . रॉजरला त्याचं काम आवडत असे . तो तासंतास त्याच्या दूरदर्शीतुन आकाशाचा वेध घेत असे . अंतराळात वेगाने जाणाऱ्या किंवा हलणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टवर नजर ठेवण्याचे काम त्या ऑब्झअरवेटरीचे होते. रॉजर नेहमीप्रमाणे अवकाशाचं निरीक्षण करीत असताना कॉम्पुटरच्या स्क्रीनवरच्या एका वेगळ्याच आकाराच्या वस्तूने त्याचं लक्ष वेधलं . आधी त्याला वाटलं की स्क्रीनमध्ये काहीतरी बिघाड झाला असेल पण थोडं झूम करून पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की हा स्क्रीनमधला बिघाड नाही . स्क्रीनवर तो जे काही पहात होता ते सतत आपली जागा बदलत एका सरळ दिशेत आपल्या सुर्यमालेच्या दिशेने येत असलेलं त्याला दिसलं .
" काय आहे हे ? " त्याने स्वतःलाच प्रश्न केला . बारीक दांडीच्या आकाराचं असं काहीतरी दिसत होतं . त्याने लगेच समोरच्या फोनची बटणे दाबली .
" हॅलो , सॅव्ही मला चीफशी बोलायचंय .... ताबडतोब .
" आता खूप रात्र झाली आहे रॉजर .... इज दॅट सो इम्पॉरटंट ...? तू गंमत करत नाहीस ना ? "
" वेडी आहेस का ? रात्रीचे दोन वाजलेत .... ही काय गम्मत करायची वेळ आहे का ? प्लिज चीफला कनेक्ट करून दे "
थोड्या वेळात चीफ फोन वर आला . " येस रॉजर "
" चीफ , इतक्या रात्री तुला त्रास दिल्याबद्दल सॉरी . पण प्रकरणच तसं विचित्र आहे .
" बोल . "
" माझ्या टेलिस्कोपने एक विचित्र गोष्ट ओबझर्व केली आहे "
" बोलत रहा . ऐकतोय "
" मला सांगता येणार नाही . तुला इमेजेस पाठवतो . "
"ओके "
रॉजरने चीफला ती इमेजेस पाठवली आणि थोड्याच वेळात त्याचा पुन्हा कॉल आला
" काहीतरी वेगळंच आहे हे .... सध्या तरी आपल्याला त्याच्यावर नजर ठेवावी लागेल . त्याचे सगळे अस्पेक्ट्स तपासावे लागतील . हे काय आहे , कुठून आलं आहे , कसल्या प्रकारचं आहे , स्पीड काय आहे वगैरे वगैरे .... गुड जॉब रॉजर .... त्याच्यावर नजर ठेव . "
अशी एक विचित्र आणि नवीन गोष्ट आपल्या सुर्यमालेच्या दिशेने येत असल्याबाबत बातमी सर्व न्यूज चॅनल्स आणि वर्तमानपत्राद्वारे लगेचच सर्वत्र पसरली . सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाली . जगभरातल्या सर्वच खगोल शास्त्रज्ञांनी त्यावर नजर ठेवली होती . तब्बल ३४ दिवस ती विचित्र खगोलीय गोष्ट आपल्या सुर्यमालेजवळ येऊन बुध ग्रहाच्या जवळून पुढे निघून गेली होती . ३४ दिवसांनंतर ह्या अंतराळातल्या विचित्र खगोलीय गोष्टीवर नजर ठेवल्यावर जगभरातल्या शास्त्रज्ञांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली , त्यामध्ये ह्या दुर्मिळ अशा खगोलीय घटनेसंबंधी चर्चा करण्यात आली .
( व्हिडीओ कॉन्फरन्स )
रॉजर - वेलकम फ्रेंड्स, चीफ मी गेले चार आठवडे त्या वेगळ्या आकाराच्या खगोलीय वस्तुचं निरीक्षण करतोय . आणि माझ्यासोबत चायना , इंडियामधले माझे मित्र चँग ली आणि रामकृष्णन हे दोघेही त्या ऑब्जेक्टवर नजर ठेवून होते . आज त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स आहे .
चीफ - गुड , वेलकम अँड गुड मॉर्निंग चँग ली आणि रामकृष्णन.
दोघांनीही चीफला गुड मॉर्निंग केले .
रॉजर - तर आता आपण आपल्या सूर्यमालेत नव्यानेच आलेल्या त्या ऑब्जेक्टबद्दल चर्चा करू.
चीफ - त्या ऑब्जेक्टबद्दल मी काही प्राथमिक माहिती देतो . आपण त्याला 1I / 2017 U1 असे शास्त्रीय नाव दिले आहे . हा आपण ऑब्झर्व केलेला पहिला इंटरस्टेलर ऑब्जेक्ट आहे . आणि रॉजरने त्याला एक हवाई नाव ही दिले आहे .
रॉजर - येस .... मी त्यांचं नाव औमूआमूआ असं ठेवलंय ...
चँग ली - म्हणजे काय ?
रॉजर - ते एक हवाईयन नाव आहे .... त्याचा अर्थ खूप दुरून आलेला पहिला मेसेंजर ....
रामकृष्णन - वा .... नाव तर छानच आहे . आम्हीही ह्या ऑब्जेक्टवर नजर ठेवली होती . आधी तो आपल्याला एक धूमकेतू आहे असं वाटतं होतं पण आपण त्यावर अभ्यास केला व निरीक्षणे नोंदवली आहेत त्यावरून तर तो धूमकेतू वाटत नाही .
चँग ली - बरोबर आहे . धुमकेतूसारखी शेपटी त्याला नाही . त्याला काय कारण असू शकेल राम ?
रामकृष्णन - धूमकेतूची शेपटी ही त्याच्यातल्या गॅसेसच्या बाहेर पडण्यामुळे किंवा त्यावर असलेल्या बर्फाच्या वितळण्यामुळे होत असते . त्यातील धूलिकण मागे पसरत जातात व सूर्याच्या प्रकाशामुळे ते प्रकाशित होऊन आपल्याला दिसतात त्यामुळे ती शेपटी असल्यासारखे दिसते . आणि आपला औमूआमूआचा पृष्ठभाग कठीण असल्यामुळे कदाचित त्यातून धूलिकण बाहेर पडत नसावेत .
रॉजर - बरोबर , आम्ही त्याचे काही अस्पेक्ट्स स्टडी केले आहेत . त्यावरून त्याची लांबी खूप जास्त असून तो एखाद्या सिगारच्या आकाराचा आहे . आणि तो एखाद्या कठीण पदार्थापासून किंवा धातूपासून तयार झाला असावा .
चँग ली - त्याचा वेग खूपच जास्त होता .... आणि तो ज्या वेगात आपल्या सूर्यमालेत दाखल झाला त्यापेक्षा जास्त वेगात आपल्या सुर्यमालेच्या बाहेर जात आहे ....
रॉजर - ह्याचं काय कारण असू शकेल ?
चीफ - आता तरी ह्याचं उत्तर आपल्याकडे नाही .... आपल्याला काही हायपोथॅसिस मांडावे लागतील आणि त्या दिशेने संशोधन करावं लागेल . तुला काय वाटतं रामकृष्णन ?
रामकृष्णन - मला असं वाटतं , की औमूआमूआ हे कदाचित परग्रहावरच्या एखाद्या अतिप्रगत मानवजातीने पाठवलेले एखादे यान किंवा टेहळणीसाठी पाठवलेला एखादा प्रोबही असू शकतो ...
रामकृष्णनच्या बोलण्यावर सर्वजण हसले .
रॉजर - तुम्ही इंडियन लोक नेहमी अशा काहीतरी विचित्र कल्पना लढवत असता . ह्याला काय पुरवा आहे ?
रामकृष्णन - ज्या अर्थी सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा त्याच्या वेगावर परिणाम झाला नाही किंवा त्याचा वेग कमी होण्याऐवजी आणखीनच वाढला त्यावरून मला असं वाटतं . कदाचित ते एखादं यान असू शकतं ....
चँग ली - नाही मला तसं वाटत नाही . रामकृष्णन तुझ्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही .
चीफ - बरोबर आहे .... हायपोथॅसिस मांडला तरी त्याला काहीतरी पक्का बेस असावा . तसं तुझ्याकडे काही आहे का ?
रामकृष्णन - सध्या तरी तसं काही माझ्याजवळ नाही . पण मला असं सारखं वाटत आहे .
रॉजर - रामकृष्णन , विज्ञानात आपल्या वाटण्याला काही किंमत नसते . एखादी घटना का घडली त्यामागची शास्त्रीय कारणे देता येणे गरजेचे आहे ....
रामकृष्णन - ठीक आहे . तुम्ही तुमची चर्चा पुढे चालू ठेवा .
रामकृष्णन असं म्हणाला आणि चर्चा पुढे चालू राहिली . परंतु त्याचे लक्ष त्या चर्चेत नव्हते .
पृथ्वीवर खगोल शास्त्रज्ञांची अशी चर्चा चालू असतानाच त्याच वेळी आपल्या सुर्यमालेपासून अनेक प्रकाशवर्षे दूर असलेल्या अँड्रॉमिडा गलेक्सीतल्या ओबँका ग्रहावरच्या मुख्य संगणकावर एक कोड रिसिव्ह झाला .
¶◆●★¶ ◆◆★◆■
ज्याचा अर्थ होता -
दुसरी पृथ्वी सापडली . आपलं नवीन घर !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान
याचा पुढचा भाग पण येनार ना.

Mast

मस्त कथा, औमूआमूआ आपल्या आकाशगंगेत खरोखर आला होता,विटी दांडू मधल्या विटीसारखा याचा साधारण आकार होता. सुरवातीला असं वाटलं कि ते एक यान असावं परंतु त्याचा वेग प्रति सेकंद २६ किमी एव्हडा कमी होता त्यामुळे ती शक्यता फेटाळली गेली.

छान आहे. पण शेकडो प्रकाशवर्षे दूर...ही गोष्ट खटकली. एक प्रकाशवर्ष म्हणजे किती किमी अंतर हे आपण जाणताच. मग एवढेसे अंतर कापण्यासाठी ३४ दिवस लागतात. माझ्या माहितीप्रमाणे सूर्याचा प्रकाश पृथ्वीतलावर पोहोचायला नऊ मिनिटे लागतात.
कदाचित मी चुकत असेन.

छान लिहिलंय.
या बद्दल अजिबात माहित नव्हतं, ही विज्ञान कथा वाचल्यानंतर मग गूगल केल्यावर अजून रोचक माहिती मिळाली.. धन्यवाद.

मस्त कथा.
जयंत नारळीकरांच्या कथांची आठवण झाली.

Chan