परिसस्पर्श

Submitted by jayshree deshku... on 5 April, 2019 - 04:33

:- परिसस्पर्श -:
राजूचा मला फोन आला, ‘आईला हॉस्पिटलमध्ये admit केले आहे. तिची शुगर खुप वाढली आहे.’ मी म्हणल, “एक दोन दिवसात घरातल मार्गी लावून चक्कर टाकते बाबा, माझाही संसार आहे. मुलींच्या वार्षिक परीक्षा सुरु आहेत, काय करणार?”
“ तायडे पण तुलाही माहित आहे,तुझ्या भेटीशिवाय आईची शुगर काही खाली उतरायची नाही.”
“ हो रे ते सगळ खर आहे. पण माझीही अडचण समजून घेत चला ना! नानांना म्हणाव, ‘तिची जरा आस्थेने चौकशी करत रहा आणि हॉस्पिटलमध्ये चक्कर मारून या. बायको आहे ती तुमची .’” एवढ बोलून इकडची तिकडची चौकशी करून मी फोन बंद केला. दोघी लेकी माझ फोनवरच संभाषण कान टवकारून ऐकतच होत्या. मोठी म्हणाली, “ बर नाही का ग आजीला? मग कधी ब्याग भरणार तू?” मी चिडून म्हणल,
“गधडे उद्या पेपर आहे ना तुझा? अभ्यास सोडून माझ्या बोलण्याकडे कशाला लक्ष देत होतीस?” तेवढ्यात धाकटी म्हणाली, “ अग आई तुझा नेहमीप्रमाणे स्पीकर वरती फोन होता ना! मग आम्ही काय करणार? मला शरमल्यासारखे झाले. मी लगेच म्हणल, “ सॉरी हं बेटा, या पुढे लक्षात ठेवीन. जा अभ्यास करा. परवा तुमची परीक्षा संपल्यावर रात्रीच्या गाडीने आपण सगळेच जाऊ आजीला भेटायला.” मुली आनंदाने हो म्हणल्या आणि अभ्यासासाठी त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या.
रात्री सगळ आवरून अंथरुणाला पाठ टेकली. पण मुळीच झोप येईना. मनात सारखे आईचेच विचार येत होते. तसं वय ७०-७१ च पण खूप लवकर थकली. आधीच हळवा स्वभाव, वयपरत्वे अजूनच तो हळवा बनला आहे. कोणाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं की हिच्या डोळ्यात लगेच पाणी येत. सगळ्यांची नको इतकी काळजी करत राहणार, आणि त्यात पुन्हा मधुमेही. म्हणजे शुगर शूट व्हायला निमंत्रणच .त्या विरुद्ध नाना. घराकडे संसाराकडे कुठे लक्षच नाही. सदोदित आपली हातात जपाची माळ , नाहीतर पोथ्या, पुराणात डोक.उरला वेळ पेपर मधल्या बातम्या पाहण. चेहरा नेहमी आनंदी पण स्वत: मध्ये रममाण असायचे. टेलिफोन मधल्या २२ -२३ वर्षाच्या नोकरी नंतर स्वेच्छा निवृत्ती घेऊन मोकळे झाले. नोकरीत मन रमत नाही म्हणायचे. नंतर काय तर देवळातून मठातून पुजाऱ्याच काम सुरु केल. नानांच्या लहानपणी आजोबांची भिक्षुकी होती, त्यांनी नानांना पूजा-पाठ वेदाध्यायन शिकवलं होत. सकाळी पाच वाजता उठायचे अंघोळ घरच्या देवांची पूजा उरकून देवळात गेले की तिकडेच चार-पाच तास रमायचे. घरात पैसे देण्यापलीकडे त्यांनी कधी कोणत्या गोष्टीत लक्ष घातलच नाही. संसार जसा काही एकट्या आईचा होता. घरातलं सामान आणण नेण, पुरवण –उरवण, पै-पाहुणा सारे आईच पहायची आमचं शिक्षण-शाळा, कॉलेज आभ्यास सार आईने पाहिलं. कधी आई काही बोलली तर नानांचं ठरलेलं उत्तर, “ मला त्यातल काही समजत नाही तू बघ”. कधी पैशाची चणचण भासली आणि आई त्याबाबत काही बोलली की, नाना म्हणायचे. “सगळा पगार तर तुझ्या हातात आणून देतो. कधी काही विचारतो का?” आई रडकुंडीला यायची म्हणायची, “अहो विचाराना मग, लक्ष घाला संसारात. स्वत:च्या कपड्याकडे पण लक्ष नसत. तेही मी आणून देईन तसे घालता. डब्यात जी भाजी देईन ती निमुटपणे खाता. जरा स्वत:ची आवड-निवड, मत मांडत जा काय हव-नको ते स्पष्ट सांगत जा काही बोलल नाही तर माणसाने काय समजाव ?.” त्यावर हसत हसत नाना म्हणायचे,
“त्यात काय परमेश्वर कृपेने सगळ तर व्यवस्थित चालले आहे, बायका नवऱ्याच्या जाचाला कंटाळतात, मी तर सगळच तुझ्या स्वाधीन केल आहे.”
आईला नानांच्या पुढे काय बोलाव ते सुचत नसे. ती मनातून झुरत रहायची. प्रपंच हा नवरा-बायकोच्या संगनमताने चालला पाहिजे. त्यामध्ये दोघांचीपण मत-विचार असले पाहिजेत. मुलांच्या बाबतीतले निर्णय दोघांनी मिळून घेतले पाहिजेत. सार काही मीच ठरवायचं तर संसारात मजा कसली? कधी हॉटेलात जायचं नाव नाही की सिनेमाला जायचं नाही. मीच कधीतरी तिकीट काढून आणायची तेव्हा बळेबळेच हे येणार. मुलांचा अभ्यास घ्या म्हणल की म्हणणार, “ परमेश्वरी इच्छ्ने जे घडायचं ते घडणार, उगीच अभ्यासासाठी मुलांच्या कशाला मागे लागायचं, हसत खेळत त्यांच्या मनाप्रमाणे अभ्यास करू दे त्यांना. शुभंकरोती आणि रामरक्षा रोज संध्याकाळी म्हणतात का इकडे लक्ष दे.” आम्ही कोणत्या वर्गात शिकत आहोत हेही नानांना माहित नसायचे. कोणी त्यांना त्याबद्दल विचारले तर, हसून आम्हालाच उलट प्रश्न करायचे,काय रे राजू, ऋचा तुम्ही कोणत्या वर्गात आहात रे?” आई कपाळाला हात लावायची आणि म्हणायची, “ ह्यांना मुलांची नावे आठवतात हेच नशीब माझ! देवा पांडुरंगा तूच माझा संसार चालव आता, कारण हे लागलेत तुझ्या नादी, दुसरे तुकाराम अवतरले आहेत.”
राजूच आणि माझ शिक्षण सुरु झाल तेव्हा पैशाची चणचण भासू लागली तेव्हा आईने टेलरिंगच काम सुरु केल. तिचा fashion designing कोर्स झाला होता. ३-४ वर्षात चांगला जम बसला. खुप काम मिळू लागली. हाताखाली २-३ बायका ठेवल्या. आई फक्त कपडा बेतण्याचे काम करायची. स्टीचिग बायका करायच्या. माझी दहावी झाल्यानंतर आईने स्वत:चे बुटीक सुरु केले.तिथेही दोन वर्षात तिचा बिझनेस चांगला चालायला लागला. आईचा बिझनेस मध्ये जम बसलेला पाहून नानांनी लगेच स्वेच्छा निवृत्ती घेतली. मग तर काय नानांना रान मोकळे मिळाले, असं आई म्हणायची. कपड्यांचं सुंदर डिझाईन मी तयार करत गेले. पण संसारच डिझाईन मला साधलच नाही ग! असं आई मी कळती झाले तेव्हा नेहमी मला म्हणायची. ती मला मैत्रिणी सारखं वागवायची, माझ्यापाशी मन मोकळ करायची. तुमच्या दोघांच्या जन्मानंतर काही वर्षातच आमचे शाररिक संबधपण संपुष्टात आले ग! कधी जवळ सुद्धा बसत नाहीत माझ्या तुमचे वडील! विटाळ होत असल्याप्रमाणे चार हात दूर राहतात. तू म्हणतेस ना, ‘ आई हल्ली गबाळ्या सारखी का राहतेस?’ पण ह्यांच्या अशा वागण्याने साऱ्या भावना करपून गेल्यासारख्या वाटतात. कशाला हवेत नखरे ? कशाला हवय नटण-मुरडण? कधीतरी नवऱ्याने छान दिसतेस म्हणाव म्हणूनच ना! पण हे माझ्याशी हल्ली तिऱ्हाईत स्त्री प्रमाणे वागतात, मान वर करून सुद्धा पहात नाहीत. जवळून गेले तर न पाहताच ‘श्रीराम जयराम जय जय राम’ बरळत राहतात. जेवण मुक्याने करायचं. पानात एकदा वाढलेलं जेवायचं पुन्हा काही मागायचं नाही. काही विचारलं तर म्हणाले, ‘मी व्रत सुरु केल आहे तसं’ तेव्हा मीच आईला म्हणल,” अशी नको रहात जाऊस. नानासाठी सोड पण आमच्या साठी आमची आई म्हणून नीट-नेटक रहात जा. तू पण नानांसारख वागायला सुरुवात केली तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? नानांचं चुकलच त्यांनी लग्नच करायला नको होत.” त्यावर आईला लगेच नानांचा पुळका आला, मला म्हणाली, “गप्प बस हं, जास्त बोलू नकोस.वडील आहेत ते तुमचे मान ठेवावा त्यांचा” आई म्हणजे अशी सोशिक पतिव्रता नवऱ्याच्या विरोधात कुणी काही बोललेलं तिला आवडायचं नाही.
मी बारावीनंतर सी ए करायला सुरुवात केली होती. वयाची पंचविशी उलटली तरी सी ए कंप्लीट झाल नाही. आणि सी ए पूर्ण झाल्याशिवाय मला लग्न करायचं नव्हत. आईची चिडचिड सुरु झाली होती. एक एक जबाबदाऱ्या मधून मोकळ व्हाव म्हणते. पण तुम्ही मुल पण मला त्रास देत रहा. तू सी ए व्हायचं म्हणतीस आणि तो दिवटा बारावीनंतर जास्त शिकायला नको म्हणतो. तेव्हा मीच आईला म्हणल होत, “ जाऊ दे ना आई, राजू शिकायचं नाही म्हणाला तरी तुझ्या बिझनेस मध्ये लक्ष घालतो आहे ना! तुझ्या वाढत्या व्यापात त्याची तुला मदतच होत आहे ना! तो चांगला बिझनेसमन म्हणून पुढ येईल.” आईला माझ म्हणण पटल का नाही ते कळल नाही. पण त्यावर ती जास्त काही बोलली नाही. आईच्या हाताखाली जरी मुली कामाला होत्या तरी त्यांच्यावर लक्ष ठेवण, मालाच्या ऑर्डर चेक करण या सगळ्या गोष्टीत राजू आवडीने लक्ष घालायला लागला होता. आईची सारखी बारीक सारीक दुखणी चालू झाली होती. तेव्हा राजूच बिझनेस मध्ये लक्ष घालण आईच्या फायद्याचं झाल. नाना तर काय मठी सारखे घरात रहायचे. घरातल्या देवांची साग्रसंगीत पूजा करण्या पलीकडे त्यांचा काही उपयोग नव्हता.
घराचं रुटीन व्यवस्थित चालू होत, त्यात राजू मुळे घरात एक नवीन वादळ आल त्याचं बुटिक मधल्या पल्लवीशी अफेअर चालू होत. त्यात त्याच्याकडून नको ती चूक घडून गेली. मग आईने तिच्या जातीचा, आर्थिक परिस्थितीचा कशाचा विचार न करता, राजूच तिच्याबरोबर लग्न लावून दिल. त्यावरही नाना गप्पच. त्यांना ही गोष्ट कळल्यावर, शिव शिव एवढच बोलले. नशीब म्हणजे लग्नात आईबरोबर पुण्याहवचनासाठी जोडीने बसले. घरात नवी सून आल्यावर तर नानांनी स्वयंपाकघर वर्ज्यच केले. पाणी हव असल तरी मला मागायचे. घरात माझ्याशीच थोडफार बोलायचे. देवळातच जास्त मुक्काम ठेवायचे.
मी अखेर एकोणतीसाव्या वर्षी सी ए झाले. बँकेत ऑफिसरची पोस्ट मिळाली. हा मुलगा नको ,तो नको करण्यात दोन वर्ष उलटली मग माझे लग्न जुळले. त्या गोष्टीचा पण आईला खुप मनस्ताप झाला. मी शांत असायची पण तिची चरफड सुरु असायची. सगळ वेळच्यावेळी व्हायला नको का म्हणायची. माझं लग्न ठरेपर्यंत घरात दोन नातवंड खेळायला लागली होती. राजूला पाठोपाठ दोन वर्षाच्या अंतराने मुलगा आणि मुलगी झाली होती. घरातल्या साऱ्या अडचणी सहन करता करता आता आईची भीड चेपली होती.आई कधी तरी नानांच्या जवळ न बोलता नातवंडाना आणून ठेवायची मग मात्र नाना त्यांना खेळवायचे.
माझ लग्न, त्यानंतर माझी दोन बाळंतपण, राजूची मुल, त्यांचे बालहट्ट, बिझनेसचा व्याप ह्यात आईला एकटेपणा जाणवला नाही आणि कधी जाणवला तरी त्यावर विचार करायला तिच्याजवळ वेळच कुठे होता. तिचा संसाराचा एकखांबी तंबू तिने सहज पेलवला होता, फारशी कुरकुर आदळ-आपट न करता.
राजूने आणि पल्लवीने बुटिकची सारी सूत्रे हळू हळू ताब्यात घेतली होती. त्यामुळे भिडस्त स्वभावाच्या आईला हल्ली तिथे जाऊन बसणे नको वाटायला लागले होते. राजूची मुले शाळा, क्लासेस यामध्ये व्यस्त झाली होती. आणि मी इथे परगावी माझ्या संसारात व्यस्त. आईला पोकळी जाणवायला लागली होती. नाना हल्ली घरात फारच कमी वेळ रहायचे. असतील तेव्हा स्वत:ला कोंडून घेऊन ध्यानस्त बसायचे. एकटीने संसाराचा गाडा ओढताना आईला कुणाशी गप्पा गोष्टी करायला फारसा वेळ मिळायचा नाही. त्यात बायकांचे नको ते हजार प्रश्न. ‘तुझ्या नवऱ्याने नोकरी का सोडली?’ प्रपंचात लक्ष घालायचं नव्हत तर लग्नच का केल? त्याची बाहेर काही भानगड नाही ना? इत्यादी, हे सगळ टाळण्यासाठी सुद्धा मैत्रिणी, भिशी ग्रुप ह्या पासून आई दूर राहिली. आईला बदल म्हणून पल्लवीने चारी धाम यात्रेसाठी आई आणि नानांना बळेच तयार केल. दोघे यात्रेला जाऊन आले. पण तिथेही नाना आईच्या बरोबर कधी रहायचे नाही. तरातर पुढे चालत रहायचे. एकदा त्यांना गाठताना आई ठेचकाळून पडली तरी त्यांचे लक्ष नव्हते. बरोबरच्या बायकांनी तिला हात देऊन उठविले. ही गोष्ट मला सांगताना आईच्या डोळ्यात पाणी आले, म्हणाली, “मला हात देण्यासाठी सुद्धा ह्यांनी मला स्पर्श केला नाही ग, फक्त काळजी म्हणून नंतर माझ्या बरोबरीने चालत राहिले. ट्रीप वरून आल्यानंतर मी फ्लूने आजारी पडले. तेव्हा मला राजूच दवाखान्यात घेऊन गेला. ह्यांनी माझ्या कपाळवर हात ठेवून किती ताप आहे, बर वाटत का? एवढी चौकशी सुद्धा केली नाही. ह्यांच्या साध्या माणुसकीच्या , प्रेमाच्या स्पर्शासाठी मी आसुसले आहे. आता ह्या वयात जास्त काही अपेक्षा नाही ग, वाटत कधीतरी हात हातात घेऊन म्हणाव, खुप केलस तू संसारासाठी, खूप झिजलीस, आता आराम करत जा. नको कुणाची काळजी करू. तो दिवस आयुष्यात कधी उगवणारच नाही का ग माझ्या.” प्रेमाच्या स्पर्शासाठी आपली आई आसुसलेली आहे. हे मी जाणून असल्याने मी माहेरी गेले की आईला घट्ट मिठी मारते. दोघी एकमेकींच्या स्पर्शातून अतुट प्रेमाची, मायेची भावना अनुभवत राहतो. प्रेम “व्यक्त करण्यासाठी नवरा बायको एकमेकाला वासनारहित मिठी मारू शकत नाहीत का ग?” आईच्या या प्रश्नावर मला काय बोलावे तेच मला समजल नाही.
रात्रभर आई नानांच्या संसाराचा सारा इतिहास आठवत मी कुशी बदलत राहिले. माझा नवरा संजयने मला रात्री दोनदा मायने थोपटले. झोप म्हणत राहिला, पण आख्खी रात्र मी जागीच होते. ठरवलं, मनात पक्क आईला बघायला गेलं की ह्यावेळी नानांना जाब विचारायचा.
मी रेल्वे स्टेशन वरून थेट हॉस्पिटलमध्ये गेले.आई माझ्याकडे बघून क्षीण हसली हाताला सलाईन लावले होते त्यामुळे तिला उठता येत नव्हत. मी तशाही अवस्थेत तिला मिठी मारली. तिच्या डोळ्यात पाणी भरून आल, मी तिचे ते आसू हळुवार पुसले. डॉक्टर राऊडला आले होते. त्यांनी मला जवळ बोलावून सांगितल, तुमच्या आईला वाढलेल्या शुगरमुळे ह्र्दय विकाराचा झटका येऊन गेला आहे.
आईची angiography झाली दोन blockage निघाले मग प्लास्टि झाली. मी आईच्या सोबतीला हॉस्पिटलमध्ये होतेच.
नाना ध्यानाहून उठल्यानंतर मी नानांना नमस्कार केला,नानांनी पाठीवर हात ठेवत आशिर्वाद दिला, आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव! नानांचा पाठीवरती आशिर्वादाचा हात फिरला बर वाटलं.मग मी त्यांना विचारलं, “ नाना एखाद्या सिद्धहस्त पुरुषाच्या बाबतीत साधा स्त्रीस्पर्श वासनारहित असू शकतो की नाही?” त्यांना माझ्या प्रश्नाचा रोख कळला, नानांनी विषय बदलत विचारलं, “जावईबापू , मुली ठीक आहेत ना?” त्यावर मी म्हणल, “नाना प्रेमाचा स्पर्श लाभला की सगळ ठीकच असत. मुक्या प्राण्याला सुद्धा तो हवा असतो. तर माणसाला का नाही? आध्यात्म तरी काय सांगत, सर्व प्राणीमात्रावर प्रेम करा हेच ना! लहान तोंडी मोठा घास घ्यायला नको पण नाना तुम्ही आईशी जे वाळीत टाकल्या सारखं वागता ते सोडून द्या. तिला तुमच्या प्रेमाची गरज आहे.” नानांनी हो म्हणत मान हलवली. दुपारी नाना माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी आईचा हात हातात घेऊन दाबला, आणि म्हणाले, “लवकर बरी हो, नातवंडांची लग्न बघायची आहेत ना?” मी चार दिवसांनी घरी परत आले.
महिनाभराने मला राजूचा फोन होता, “आईला डॉक्टरांकडे नेऊन आणलं त्यांच्या मते तिची तब्येत अपेक्षेपेक्षा चांगली सुधारली आहे. नाना रोज सकाळी तिच्याबरोबर फिरायला जातात. आल्यावर पूजा-पाठ करतात. आईचा चेहराही हल्ली प्रसन्न असतो.” मी हसत हसत म्हणल, “अरे परिसस्पर्श लाभला आहे आता तिला.”

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तायडे... च्या पुढे वाचताना पाणीच आलं डोळ्यात.. अगदी अशीच मलाही हाक मारली जाते माहेरी.
छान लिहिलंय