नोबेल संशोधन (१०) : लेखमाला समारोप

Submitted by कुमार१ on 4 April, 2019 - 21:52

वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन : भाग १०

(भाग ९: https://www.maayboli.com/node/69454)
*******

नमस्कार,
दि. १३/२/२०१९ रोजी सुरु केलेली ही लेखमाला आज समाप्त करीत आहे.

‘नोबेल’ हा जागतिक पातळीवरील मानाचा पुरस्कार समजला जातो. विज्ञानशाखांमध्ये तो मूलभूत संशोधनासाठी दिला जातो. यंदाच्या माबोच्या ‘मराठी भाषा दिन’ उपक्रमात ‘विज्ञानभाषा मराठी’ हा विभाग होता. त्याला अनुसरून ही लेखमाला सुरु केली. याचा उद्देश वैद्यकशाखेतील आजपर्यंतच्या महत्वाच्या पुरस्कारांबद्दल सामान्यांसाठी काही लिहावे हा होता.

हे पुरस्कार गेली ११८ वर्षे दिले जात आहेत. त्यापैकी सुमारे २० संशोधने ही ‘अभूतपूर्व’ आणि ‘क्रांतिकारी’ स्वरूपाची म्हणता येतील. या लेखमालेसाठी १९०१ ते २००८ या विस्तृत कालावधीतील काही मोजकी संशोधने निवडली. ही निवडताना वाचकाला रंजक वाटतील असे १२ विषय घेतले. संबंधित संशोधक, त्यांच्या मूलभूत संशोधनाची थोडक्यात माहिती आणि त्याचा समाजाला झालेला उपयोग अशा दृष्टीकोनातून हे लेखन केले. लेखमालेला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचा आनंद वाटतो. येथील सुजाण वाचकांनी प्रतिसादांतून काही छान शंका विचारल्या. त्यातून त्यांचे आरोग्यविषयक कुतूहल आणि जागरूकता दिसून आली.

१२ विषयांपैकी चौथ्या भागातील ‘रक्तगटांचा शोध’ हा लोकप्रिय विषय ठरला आणि ते अपेक्षित होते. सुशिक्षित वर्गाला या विषयाबद्दल विशेष ममत्व असते. हल्ली बऱ्याच संस्थांमध्ये आपली वैयक्तिक माहिती साठविताना आपल्या रक्तगटाची नोंद आवर्जून केली जाते. आपल्यातले अनेक जण स्वयंसेवी रक्तदान नियमित करतात. अशा सर्व दृष्टीने हा विषय महत्वाचा ठरतो. त्यामुळे ही चर्चा खूप रंगतदार झाली. पाचव्या भागातील ‘पेनिसिलिन’ वरची चर्चा वाचकांच्या स्वानुभव कथनामुळे रंगली. आठव्या भागातील MRI तंत्रावरील विषयाला मिळालेला अनपेक्षित मोठा प्रतिसाद हा एक सुखद धक्का होता. नउव्या भागातील ‘एड्स’ वरील चर्चाही अर्थपूर्ण झाली. त्या विषयावर वाचकांकडून विक्रमी संख्येने प्रश्न विचारले गेले, ही सुखावणारी बाब आहे. त्यामुळे एड्सवरील लेख हा खऱ्या अर्थाने लेखमालेतील चर्चेचा कळसाध्याय ठरला. लेखमालेत वेळोवेळी काही वाचकांनी प्रतिसादांतून पूरक माहितीची भर घातल्याने मलाही फायदा झाला.

या समारोपानिमित्ताने वैद्यकशाखेत आजपर्यंत दिल्या गेलेल्या पुरस्कारांबद्दल काही रोचक माहिती नोंदवत आहे:
१. एकूण ११८ वर्षे (१९०१- २०१८) हे पुरस्कार दिले गेले आहेत. त्यापैकी ९ वर्षी ते देण्यात आले नाहीत.
२. पुरस्कार न दिलेला कालावधी साधारण दोन्ही जागतिक महायुद्धा दरम्यानचा आहे.

३. १०९ पुरस्कारांसाठी एकूण २१६ संशोधकांची निवड झाली; त्यापैकी १२ महिला आहेत. ३९ जणांना हा पुरस्कार एकट्यासाठीच (न विभागता) मिळाला.

४. एकूण पुरस्कारांमध्ये क्रमवारीने पहिले तीन देश (पुरस्कार संख्येसह) असे आहेत:
* अमेरिका ९३
* यु. के. २९
* जर्मनी १६

५. वैद्यकातील विजेत्यांमध्ये एकही भारतीय नागरिक नाही. मात्र जन्माने भारतीय असलेले हरगोबिंद खोराना हे एकमेव संशोधक आहेत. त्यांना १९६८चे नोबेल अन्य दोघांबरोबर विभागून मिळाले. पुरस्कार मिळताना खोराना अमेरिकेचे नागरिक होते. त्यांच्या संशोधनाचा विषय “जनुकीय सांकेतिक लिपी आणि प्रथिन निर्मितीचा अभ्यास” हा होता.

६. एकापेक्षा अधिक वेळेस पुरस्कार कोणालाही मिळालेले नाहीत (नोबेलसाठीच्या अन्य शाखांत अशी मोजकी उदा. आहेत).

७. १९२३चे विजेते Frederick G. Banting हे आजपर्यंतचे सर्वात तरुण (वय ३२) संशोधक होते. त्यांचा पुरस्कार इन्सुलिनच्या शोधाचा आहे.

८. १९४७ व २०१४चे पुरस्कार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ते नवरा-बायको अशा जोड्यांना विभागून मिळाले आहेत.
* १९४७: Cori दाम्पत्य (ग्लायकोजेनचा अभ्यास)
* २०१४: Moser दाम्पत्य (विशिष्ट मेंदूपेशींचा अभ्यास)

९. १९३९चे विजेते G. Domagk यांना सत्ताधीश हिटलरच्या हुकुमाने तो पुरस्कार नाकारावा लागला.

. . .
वैद्यकाच्या अनेकविध शाखांमध्ये मूलभूत शोध लावून या सर्व संशोधकांनी मानवजातीवर अनंत उपकार केले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळालेले आहे. आजपर्यंतच्या सर्व विजेत्यांना विनम्र अभिवादन.

येथील सर्व वाचक, प्रतिसादक आणि प्रशासकांचे मनापासून आभार !
************************************************
परिशिष्ट:

या लेखमालेचे एकूण १० भाग असून भागवार विषय सूची अशी आहे:

भाग १ : प्रास्ताविक
२ : अ) घटसर्प (Diphtheria) या रोगावर प्रतिविषाचे उपचार (serum therapy)
आ) पचनसंस्थेचा मूलभूत अभ्यास

३. : अ) थायरॉइड ग्रंथीचे कार्य, रोगमीमांसा व शल्यचिकित्सा यांचा सखोल अभ्यास
आ) इन्सुलिनचा शोध
इ) इ.सी.जी. चा शोध व अभ्यास

४. : मानवी रक्तगटांचा शोध
५ : पेनिसिलिनचा शोध व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापर

६. : अ) क्ष-किरणांमुळे होणाऱ्या जनुकीय बदलांचा शोध
आ) डीएनए या रेणूच्या रचनेचा शोध
७. इंद्रिय व पेशींच्या प्रत्यारोपणाचे उपचार

८. MRI या प्रतिमातंत्रासंबंधी संशोधन
९. HIV चा शोध
१०. समारोप
*********************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वागत नव्या पुस्तकाचे !

नोबेल विजेत्या महिला

ले : आशाराणी व्होरा
अनुवाद : डॉ. विजया देशपांडे

साकेत प्रकाशन

२०२२चे वैद्यकीय नोबेल Svante Pääbo या स्वीडिश वैज्ञानिकांना उत्क्रांती संदर्भातील संशोधनाबद्दल मिळालेले आहे.

त्यांनी Neanderthals या मानवी पूर्वजांच्या जनुकांचा सखोल अभ्यास केलेला आहे. उत्क्रांती दरम्यान झालेले जनुकीय बदल आणि आजच्या मानवाची संसर्गरोगांच्या विरुद्धची प्रतिकारशक्ती यांचा संबंध यांच्या संशोधनामुळे जोडता येईल.

अभिनंदन !

सहा वर्षांच्या खंडानंतर वैद्यकीय नोबेल केवळ एका व्यक्तीला मिळालेले आहे.
मधली लागोपाठ सहा वर्षे ते विभागून मिळाले होते

आजच्या लोकसत्तामधील बातमीत Svante Pääbo यांच्या शोधकार्यात त्यांना असे आढळले की मानवी पुर्वजांच्या दोन प्रजाती एकत्र रहायच्या अणि त्यांना एकमेकांपासून मुले ही झाली.

दोन प्रजातींमध्ये गुणसूत्रांची संख्या भिन्न असते ना? मग मुले कशी होऊ शकतील?

माधव,
ते अधिकृत संशोधन इथे वाचता येईल : https://www.nobelprize.org/prizes/medicine/2022/press-release/

होमो सेपिएन्स चा उगम आफ्रिकेत आहे तर Neanderthals चा उगम युरेशियात असा मूलभूत भेद आहे. पुढे असे दिलेले आहे :

DNA sequences from Neanderthals were more similar to sequences from contemporary humans originating from Europe or Asia than to contemporary humans originating from Africa. This means that Neanderthals and Homo sapiens interbred during their millennia of coexistence. In modern day humans with European or Asian descent, approximately 1-4% of the genome originates from the Neanderthals.

Interbreeding साठी अजून जरा खोलात जाऊन वाचावे लागेल

वैद्यकातील नोबेल-२०२३
* Katalin Karikó ( हंगेरी ) and Drew Weissman (अमेरिका) या वैज्ञानिकांना जाहीर.
* त्यांनी पेशींमधील आरएनए संदर्भातील मूलभूत संशोधन केल्यामुळे एम-आरएनए प्रकारच्या लशीची निर्मिती शक्य झाली.
* या प्रकारची लस कोविड-19 प्रतिबंधासाठी गेली दोन वर्षे वापरली जात आहे.

Weissman सध्या खालील संशोधन प्रकल्पांवर काम करीत आहेत :
१. करोनाविरोधी नवीन लस, फ्लूसाठी सर्वसमावेशक लस आणि हार्पिस प्रतिबंधक लस.
२. एम- आर एन ए तंत्राचा कर्करोग उपचारांसाठी वापर

वैद्यकातील नोबेल-२०२३ >>>
लस निर्मितीमधील आतापर्यंतचे संशोधन बघता लस निर्मिती संशोधकांना मिळालेले हे पहिलेच नोबेल पारितोषिक का !!
--------------------------------------
अभ्यासपूर्ण लेखासाठी मनःपूर्वक धन्यवाद...
_____/\____

In 1951, Max Theiler of the Rockefeller Foundation received the Nobel Prize in Physiology or Medicine for his discovery of an effective vaccine against yellow fever—a discovery first reported in the JEM 70 years ago. This was the first, and so far the only, Nobel Prize given for the development of a virus vaccine.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2118520/

यावरून डॉक्टरांना लेखनासाठी एक विषय सुचवतो - ज्या आजारांवर लसीकरणाने आपण ( मानवाने ) संपूर्ण मात केली आहे असे आजार - मला देवी आठवला.

धन्यवाद. हेच लिहीत होतो..
लस निर्मिती संशोधकांना मिळालेले हे पहिलेच नोबेल ? >>> नाही.

१९५१ : Max Theiler : पिवळ्या तापाची लस

(हे विषाणू लसीसाठीचे पहिले नोबेल होते).

जिवाणू लस ?? शोधावे लागेल.

ज्या आजारांवर लसीकरणाने आपण ( मानवाने ) संपूर्ण मात केली आहे असे आजार - मला देवी आठवला.
>>>
हा मानवी एकमेव आजार

दुसरा आजार : rinderpest disease of cattle ( गुरांचा )
हे दोनच.

Pages