शेअर मार्केटशी मैत्री ....

Submitted by विलास गोरे on 30 March, 2019 - 14:19

शेअर मार्केटशी मैत्री.........
शेअर मार्केट हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्यांनी त्यातून पैसा मिळवलाय व यशस्वी पणे त्या मार्केट मध्ये रमताहेत ते त्तर अनेकांच्या कौतुकास पात्र होतात. त्याच प्रमाणे शेअर मार्केट मधून कोणी कसा पैसा मिळवला कोण श्रीमंत झाले तसाच पैसा आपण मिळवावा असे अनेक लोकांना वाटत असते.कोणीतरी शेअर मार्केट मधून पैसा मिळवून घर घेतलं, गाडी घेतली, असे कानावर येते त्याचबरोबर शेअर मार्केट मध्ये बुडालेले कंगाल झालेले सर्व गमावून बसलेले लोकं पण दिसतात. शेअर मार्केट मधील झालेल्या तोट्यामुळे घरदार विकाव लागल असं पण ऐकू येत. या जगात पैसा सहज मिळत नसतो. त्या साठी कष्ट, मेहनत, परिश्रम घ्यावेच लागतात शेअर मार्केट हा काही जुगार नव्हे तर तो एक अभ्यासाचा विषय आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. आर्थिक गुंतवणूक ही एक कला आहे व ती आत्मसात करण्यासाठी सखोल अभ्यास व अनुभव लागेल. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक का करावी याच उत्तर आहे की महागाई ज्या प्रमाणात वाढतेय म्हणजेच म्हणजेच इन्फ्लेशन वाढतंय त्यामुळे बँका, कर्जरोखे, पोस्टल diposit यामधून मिळणारा परतवा हा चलनवाढीचा मुकाबला करू शकत नाही. इन्फ्लेशन वाढीचा मुकाबला करण्यासाठी शेअर गुंतवणुकीतून मिळणारा फायदा हाच एकमेव पर्याय आहे, गेल्या अनेक दशकांपासून शेअरबाजारातील गुंतवणूक ही सर्वात वेगाने वाढ देणारी गुंतवणूक आहे, मात्र शेअर गुंतवणुकीत धोके पण तेवढेच आहेत. त्यासाठी अभ्यासाची जरूर आहे नाहीतर आपण नफा कमावणे सोडाच आपले भांडवल देखील गमावून बसू. पण मी गेली २५ वर्षे नियमित पणे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगतो की व्यवस्थित अभ्यास करून काळजी पूर्वक शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केली, योग्य संयम पाळला, व आपल्या लोभावर नियंत्रण ठेवले तर अगदी सामान्य माणूस बँक किंवा पोस्टल ठेवीवर मिलणारया व्याजापेक्षा निश्चित ज्यास्त पैसे शेअर मार्केट मधून मिळवू शकतो.आपला मराठी माणूस शक्यतो शेअर मार्केट मध्ये रमत नाही. ते गुजराथी मारवाडी लोकांचे काम असे मानतो, पण आज गुंतवणुकीला खूप अनुकूल वातावरण आहे. अनेक टीव्ही चैनल आहेत, मार्गदर्शक आहेत त्यामुळे न घाबरता ज्यास्तीत ज्यास्त मराठी माणसांनी यात पाडाव अस माझ मत आहे.शेअर मार्केट लोकांना आता नवीन नाही या बाबतीत माहिती इन्टरनेट, या विषयावरील पुस्तके यातून पण मिळू शकते.त्याच प्रमाणे सुरवातीला निवडक “Mutual Fund” मध्ये पैसा गुंतवून शेअर मार्केटचा लाभ मिळू शकतो. या साठी पण स्वतः थोडा अभ्यास करावा किंवा तज्ञांचे मार्गदर्शन/सल्ला घ्यावा. दीर्घ कालीन “Mutual Fund” SIP चांगला लाभ मिळवून देतात.
पण मी स्वतः गेली २५ वर्षे शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करीत आहे. मी काही तज्ञ नव्हे तर माझ्या अनुभवातून काही गोष्टी शिकलो त्यामुळेच हा विषय सोप्या मराठी भाषेत मांडण्याचा हा माझा एक प्रयत्न करतोय........
शेअर समभाग म्हणजे काय
प्रथम आपण शेअर म्हणजे काय ते समजून घेऊ. मराठीत आपण शेअरला समभाग म्हणतो. समभाग म्हणजे समान भाग, कुठलाही व्यवसाय सुरु करताना भांडवल लागतेच, साधारण पणे मोठे उद्योग उभारताना मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असते, भांडवलाची समान भागात विभागणी म्हणजेच समभाग. प्रत्येक समभागाची किंमत समान असते म्हणजेच इक्वल त्यामुळे इंग्रजीत इक्विटी शेअर असा शब्द प्रचलित आहे.
समभागाचे दर्शनी मूल्य:- आपण यापूर्वी पाहिले की भांडवलाची समान भागात विभागणी म्हणजेच समभाग.म्हणजे उदारणार्थ भांडवल १ कोटी रुपये भांडवलाचे आपण १० लाख समान भाग केले तर एका भागाची किंमत १० रुपये येईल. म्हणजे शेअरचे दर्शनी मूल्य १० रुपये. याप्रमाणे प्रत्येक कंपनी आपल्या समभागांचे दर्शनी मूल्य ठरवत असते. आपल्याला समभागावर मिळणारा लाभांश हा दर्शनी मूल्यावर मिळत असतो. आज शेअरचे दर्शनी मूल्य साधारणपणे १० रुपये ५ रुपये २ रुपये व १ रुपया अशी आहेत. आज रिलायन्स च्या समभागाचे दर्शनी मूल्य १० रुपये आहे. तर इम्फोसीस, ल्युपिन यांच्या समभागाचे दर्शनी मूल्य ५ रुपये आहे. एल एंड टी चे दर्शनी मूल्य २ रुपये तर टी सी एस चे १ रुपया. मात्र या समभागांची बाजारातील किमत दर्शनी मूल्या पेक्षा कितीतरी पट अधिक आहे. शेअर खरेदी करताना त्याचे दर्शनी मूल्य माहित असणे जरुरी आहे, आजकाल शेअरचे विभाजन करण्याची प्रथा अनेक कंपन्या करतात. उदारणार्थ युनायटेड ब्रुवरिस या कंपनीने १० रुपयाच्या शेअरचे दर्शनी मूल्य आता २ रुपये केले आहे. त्यामुळे जर एखाद्याकडे युनायटेड ब्रुवरिस चे १० रुपयाचे ५० शेअर असतील तर कंपनीने आता दर्शनी मूल्य २ रुपये केल्याने त्याच्याकडे आता युनायटेड ब्रुवरिस चे २ रुपये मूल्याचे २५० शेअर्स होतील. शेअरची संख्या वाढेल पण मूल्य रुपये ५०० एवढीच राहील. शेअरचे दर्शनी मूल्य कमी झाल्याने कंपनीचा बाजारभाव पण त्या प्रमाणात कमी होइल.
हक्क समभाग किंवा राईट शेअर:- अनेकदा कंपन्या भांडवल वाढी साठी पब्लिक ऑफर न आणता कंपनीच्या भागधारकानाच नवीन समभाग अग्रहक्काने विकतात. बहुतेकदा अशा वेळी ऑफर करण्यात आलेले शेअर प्रचलित बाजारभावापेक्षा कमी असतात. त्यामुळे भागधारक ही ऑफर स्वीकारतात व कंपनीची भांडवल उभारणी होते.
बक्षीस किंवा बोनस शेअर- काही कंपन्या त्यांच्या नफ्याचे वाटप त्यांच्या भागधारकांना बोनस शेअर देऊन करतात. समजा कंपनीने १;१ असा बोनस शेअर रेशिओ ठरवला तर एका शेअर वर एक बोनस मिळून असणारे शेअर /समभाग दुप्पट होतात. रिलायन्स, आय टी सी, लार्सेन अंड टुब्रो, इन्फोसिस इत्यादी कंपन्या वेळो वेळी बोनस देत असतात त्यामुळे या कंपन्याचा शेअर्सना बाजारात खूप मागणी असते.
शेअर्स ची खरेदी विक्री
१. प्रायमरी मार्केट:- प्रचलित कंपनी किंवा अगदी नवीनच निर्माण झालेली कंपनी जेव्हा भांडवल उभारणी करण्यसाठी लोकांना आपले समभाग ऑफर करते यालाच पब्लिक शेअर इश्यू से म्हणतात. कंपनी जेव्हा पहिल्यांदा लोकांना शेअर ऑफर करते तेव्हा त्याला आय पी ओ (initial public ऑफर) असे म्हणतात. कंपनी हे समभाग दर्शनी मूल्याला किंवा premium घेऊन विक्रीस काढले जातात. म्हणजे १० रुपये मूल्याचा समभाग जेव्हा ५० रुपया किमतीने विक्रीस काढला जातो तेव्हा हा शेअर ४० रुपये प्रीमियम घेऊन लोकांना घ्यावा लागतो. या आय पी ओ साठी तज्ञ लोक मार्गदर्शन करायला असतात. शेअर ची वाटणी झाल्यावर त्याची शेअर बाजारात नोंदणी होते. जर समभागाची नोंदणी ऑफर केलेल्या भावापेक्षा ज्यास्त झाल्यास आपणाला लगेच ते विकून अल्पावधीत चांगला नफा कमावता येतो. यालाच लिस्टिंग गेन असा शब्द प्रचलित आहे. प्रायमरी मार्केट मध्ये शेअर घेण्याचे फायदा म्हणजे चांगल्या कंपन्यांचे शेअर रास्त भावात मिळू शकतात व तोटा होण्याची शक्यता कमी असते. शेअर बाजारात बरेचदा अशा शेअर्सची नोदणी चढ्या भावाने होते व अल्पावधीत फायदा (लिस्टिंग गेन) कमावता येतो. मात्र चांगल्या कंपन्याच्या समभागांना खूप मागणी असते त्यामुळे समभाग मिळतीलच याची खात्री नसते. त्याच प्रमाणे मार्केटच्या त्तेजीचा लाभ उठवण्यासाठी अनेक बनावट कंपन्या भरपूर प्रीमियम घेऊन शेअर विक्री करतात परिणामतः लोकांचे पैसे बुडतात कारण अशा समभागांना मागणी नसते व मार्केट मध्ये कमी भावात नोंद होते.
सेकंडरी मार्केट :- ज्या कंपन्यांचे समभाग हे शेअर बाजारात नोंदले जातात अशा शेअर्सची खरेदी विक्री शेअर बाजारात नियमित पणे होत असते. आपण शेअर बाजारातून या शेअर्स ची खरेदी विक्री करू शकतो.शेअर बाजारातून हे शेअर आपण विकत घेऊ शकतो व भाव वाढल्यावर विकू पण शकतो. यात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी, अल्पकाळासाठी खरेदी, शेअर ट्रेडिंग, फ्युचर/ ऑप्शन असे अनेक गुंतवणुकीचे प्रकार असतात. मात्र इथे शेअर चे भाव खूप वाढलेले असतात तसेच मागणी पुरवठा या तत्व नुसार त्यात सतत वाढ घट होत असते .
आता एखाद्याला शेअर गुंतवणूक सुरु करायची असेल तर त्याला काय पूर्व तयारी करावी लागेल ते पाहू.
१. Demat Account.:- आता शेअर इलेक्टोनिक फौर्म मध्ये म्हणजेच डीमटेरिल स्वरुपात खरेदी किंवा विक्रीला उपलब्ध असतात. त्यामुळे NSDL किंवा CDSL सलंग्न डीपौझीटरी मध्ये आपले Demat खाते काढावे लागेल, आज सर्व राष्ट्रीयाकुत बँका, खाजागी बँका,वित्तीय संस्था, ब्रोकिंग कंपन्या या सर्वांकडे Demat खाते काढता येते. त्यामुळे आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा ते इलेक्ट्रोनिक फॉर्म मध्ये आपल्या Demat खात्यात जमा होतात. व शेअर विकतो तेव्हा आपल्या खात्यातून वजा होतात. जसे आपल्याकडे किती पैसे आहेत हे आपल्या बँक पासबुकावरून समजते, तसेच कोणत्या कंपन्यांचे किती शेअर आपल्याकडे जमा आहेत हे आपल्याला Demat खाते दाखवते.
२. ट्रेडिंग खाते :- शेअर्स चे खरेदी विक्री साठी ट्रेडिंग खाते पण असणे आवश्यक आहे.भारतात अनेक ब्रोकिंग कंपन्या आहेत. त्यांच्या मार्फत आपण शेअरची खरेदी विक्री करू शकतो, ट्रेडिंग अकौंट साठी PAN कार्ड आवश्यक आहे. कारण शेअर वर होणारा नफ्यावर आपणाला सरकारला कर द्यावा लागतो. म्हणून शेअरचे व्यवहार ट्रेडिंग खात्यामार्फत केले जातात.
३. बँक खाते :- बहुतेक सर्वांचे बँक खाते असतेच आपण ते आपल्या ट्रेडिंग अकौंटला/ डीमैट अकौंटला लिंक करू शकतो म्हणजे आपल्या शेअर्स वर जेव्हा कंपनी dividand जाहीर करते तेव्हा ते आपल्या बँक खात्यात जमा होतात, तसेच जेव्हा शेअर्स विकतो तेव्हा त्याचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतात.आपणाला शेअर विकत घ्यायचे असतात तेव्हा या खात्यातून आपण ब्रोकरला पैसे देऊ शकतो.
आज अनेक बँका, वित्तीय संस्था ही तीनही खाती एकत्र देतात. त्याला थ्री इन वन account म्हणतात. यावर आपण स्वतः शेअर ची खरेदी विक्री करू शकतो. हे account उघडण्यासाठी खालील कागदपत्र लागतात – (KYC documents)
 फोटोग्राफ
 Identity proof & Address proof – आधार कार्ड, पासपोर्ट,ड्रायविंग लायसेन्स ईत्यादि
 Pan card.
 .इतर कागदपत्र गरजेनुसार
थ्री इन वन खाती माझ्या माहिती नुसार खालील ठिकाणी उपलब्ध आहेत.या व्यतिरिक्त ठिकाणी पण असतील. खाती उघडताना मिळणारी सेवा, द्यावे लागणारे चार्जेस व इतर बाबींचा नीट अभ्यास करून ज्याला जिथे सोयीचे वाटेल तिथे त्याने खाते उघडावे.थ्री इन वन उघडायचे नसेल तर तीन वेगळ्या ठिकाणी demat, trading व बँक account उघडू शकता, मात्र ही तीनही खाती शेअर खरेदी विक्रीसाठी आवश्यक आहेत.
• ICICI Bank – ICICI Direct
• IDBI Bank – IDBI Capital Market
• HDFC Bank – HDFC Securities
• State Bank of India – SBI capital
• Kotak Mahindra Bank- Kotak Securities.
• Axis Bank.
• Angel Broking
• Motilalal Oswal
• India Bull Finance.
• Sherekhan.
• Wisdom capital.
ह्या गोष्टी लक्षात असुद्या............
शेअर गुंतवणूक सोपी नाहीये. यासाठी अनुभवी मान्यवरांनी, तज्ञांनी केलेले मार्गदर्शन आपल्या माहितीसाठी दिले आहे.........
 टिप्स वर शेअर खरेदी करू नका. बाजारात अनेक वाईट प्रवृत्तीचे लोकं असतात. त्यामुळे अनेकदा स्वतःच्या स्वार्थासाठी ते चुकीचे शेअर सांगतात. त्यामुळे अशावेळी स्वतः अभ्यास करून गुंतवणूक निर्णय घ्यावा किंवा योग्य मार्गदर्शक निवडावा. त्यामुळे आपली गुंतवणूक फसणार नाही.
 आपण ज्या कंपनीचे शेअर खरेदी करणार आहोत त्या कंपनीची पूर्ण माहिती मिळवा. म्हणजे कंपनी कोणत्या क्षेत्रात आहे, प्रमोटर कोण, आर्थिक स्थिती, इत्यादी.
 शेअर खरेदी किंवा विक्री याची वेळ महत्वाची आहे, शेअरचा भाव वरती जाणे खाली येणे हे चक्र चालू असते. प्रत्येक शेअरचा कमाल किमान भाव समजू शकतो (high Low) आपली शेअर खरेदी त्या शेअरचा भाव किमान पातळीवर असताना करावी आणि विक्री भाव कमाल पातळीवर गेल्यावर करावी. अर्थात मार्केट time करणे सोपे नाही.
 सर्व खरेदी एकाच वेळी करू नका. टप्या टप्प्याने गुंतवणूक करा. त्यामुळे मार्केटच्या चढ उताराचे तोटे कमी होऊन आपल्या खरेदीची सरासरी किंमत कमी राहील.
 शेअर खरेदी करतना आपणाला किती नफा अपेक्षित आहे ते ठरवून विक्रीचा भाव ठरवून ठेवा, आणि तो भाव येताच शेअर विका.
 एकाच कंपनीत सर्व पैसे गुंतवू नका. आपली गुंतवणूक निवडक ८ – १० शेअर्स मध्ये करा. त्याने जोखीम विभागली जाईल. कारण काही कारणाने १-२ कंपन्यांच्या भावात घट झाली तरी बाकीच्या कंपन्या तो तोटा भरून काढतील. यालाच Risk diversion म्हणतात.
 लक्षात असुद्या की शेअर गुंतवणूक नफा मिळवण्यासाठी आहे. त्यामुळे योग्य नफा मिळत असेल तर शेअर विका. अति लोभ टाळा. जर आपला गुंतवणूक निर्णय चुकला असेल असे वाटले तर प्रसंगी थोडा तोटा सहन करून शेअर विका. भावनेच्या आहारी जाणे टाळले पाहिजे.
 शेअर गुंतवणूक ही दीर्घकालीन असुद्या. योग्य अशा शेअर मध्ये केलेली दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरते. कंपन्या कारण चांगल्या कंपन्या बोनस शेअर्स देतात त्याने आपली गुंतवणूक वाढत जाते. शिवाय दरवर्षी नियमित dividand मिळत असतो. अशा कंपन्यांना मागणी खूप असते त्यामुळे त्यांचे भाव पण वाढत असतात.
 आपणाकडे असणारे गुतंवणूक योग्य असे पैसेच शेअर्स मध्ये invest करा. कर्ज काढून कधीही शेअर्स मध्ये गुंतवणूक करू नका, शेअर खरेदी करताना रिस्क – रिवार्ड बघा. नेहेमी रिस्क कमी व मिळणारा फायदा ज्यास्त असला तरच रिस्क रिवार्ड योग्य समजावे.
 आपण शेअर गुंतवणूक केल्यावर आपल्या वेळो वेळी आपल्या गुंतवणुकीचा आढावा घ्या आणि त्यानुसार निर्णय घ्या.
नव्याने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणार्यांनी शक्यतो सेन्सेक्स निफ्टी मधील निवडक शेअर पासून सुरवात करावी. हे शेअर जरी महाग वाटले तरी आपली गुंतवणूक सुरक्षित राहील. जर काही कारणामुळे भाव खाली आले तरी त्यात सुधारणा पण लवकर होईल. या बाबतीत तज्ञांचा सल्ला घ्यावा. ................

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या भाचा सिव्हील इंजिनियर आहे आणि त्याचा स्वतःचा बिझिनेस आहे .
तर मी ट्रेडिंग करत असल्यामुळे त्याने मार्गदर्शन करता का म्हणून विचारले असता , तू फक्त व्यवसाय बघ मार्केट मध्ये उतरू नको म्हणून सांगितले .
काही दिवसानंतर मुंबईतील एका ब्रोकर ची माहिती त्याने दिली .
आणि त्याच्याकडे पन्नास महिना दहा टक्के रिटर्न च्या हिशोबाने गुंतवल्याचे सांगितले. म्हणजे त्याला पाच लाख रुपये महिना तो ब्रोकर देत होता . या गोष्टीला आता दीड वर्ष होऊन गेले आहे
वर्तमान पत्रात असल्या फ्रॉड च्या बातम्या भरपूर वाचल्यामुळे मी त्याला वेळोवेळी सावध करत रहायचो .
पण त्याला आलेले रिटर्न्स मोठ्ठे आकडे दाखवून तो मला गप्प गार करायचा !
मी गेली सात वर्ष झाले बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग करतो , महिन्या काठी मुश्किल ने दोन तीन निघतात .
पण त्या ब्रोकर कडे पैसे गुंतवायचे हिम्मत आज पर्यंत झाली नाही .

छान माहिती. यासाठी उपयुक्त पुस्तकं कोणती? आजकाल शेअर मार्केटचे क्लासेस पण असतात. त्याचा उपयोग होतो का?

काल बायकोला तिच्या मैत्रिणीचा अचानक फोन आला. (म्हणजे ती मैत्रीण स्वतःहून कधी फोन करत नाही, म्हणून आश्चर्य). तर ती मैत्रीण माझ्या बायकोला आग्रह करत होती की अवधूत साठे म्हणून कुणी तरी प्रसिद्ध व्यक्तीचे इंवेस्टमेंटचे क्लासेस आहेत म्हणे, तर तू ₹. ६६०/- चा क्लास कर म्हणून. तिच्या मुलाने तर ₹. ८०,०००/- भरून advanced class जॉईन केले आहेत म्हणे. बायकोला लगेच संशय आला की हा MLM चा प्रकार आहे की काय. तिने परस्पर सांगितले की माझ्या नवऱ्याशी बोल, पण तो ट्रेडर नाही, इंव्हेस्टर आहे. यूट्यूब वर आणि आंतरजालावर अवधूत साठे इन्स्टिट्यूटचे भरभरून कौतुक सुरू आहे. (माझ्या मते या paid जाहिराती आहेत आणि म्हणून धोक्याची घंटा आहे. ) अजून तरी मला फोन आलेला नाही, पण इतरांना कळावे म्हणून हा प्रपंच.

छान माहिती. यासाठी उपयुक्त पुस्तकं कोणती? आजकाल शेअर मार्केटचे क्लासेस पण असतात. त्याचा उपयोग होतो का? >>>>>>>
ड्रायव्हिंग क्लास चा उपयोग होतो तितकाच या क्लास चा उपयोग असतो.
गिअर, क्लच ,ब्रेकची माहिती आणि थोडेफार ड्रायव्हिंग जजमेंट येते , बाकी नंतर रस्त्यावरील धडका तुम्ही मारतातच ना ?
म्हणून शेवटी क्लास तुम्ही साठे चे करा नाही तर बाठे चे !
मनावरील कंट्रोल सर्वात महत्त्वाचा .
स्वतःला अती हुशार समजला की तुमचे भांडवल गायब होण्यास वेळ लागत नाही.
मी जास्त करून वीरेंद्र पांडे चे व्हिडिओ बघत असतो. महिन्यातून २२ दिवस ट्रेडिंग चे , त्यात एक दोन दिवस तो प्रॉफिट मधून लॉस मध्ये जातो.
लॉस थोडे थोडा थोडका नाहीतर एका दिवसाचे २५/३० लाख रुपये !!!!
आपल्या सारख्या सामान्य लोकांनी चार पाच हजार प्रॉफिट असतानाच शाण्या सारखे बाहेर पडावे पुन्हा डोकावून बघू नये .
पण लोभ खूप खतरनाक असतो , आत्ता ११ वाजेपर्यंत च मी चार कमवले तीन वाजे पर्यंत अजून चार पाच सहज भेटतील .
हीच अशा बऱ्याच जणांना घातक ठरते .
तुम्ही केलेला साठेचा क्लास देखील तुम्हाला वाचवू शकत नाही . बरेच जण सकाळी प्रॉफिट तर संध्याकाळी लॉस मध्ये असतात . म्हणून मनावरील नियंत्रण सर्वात महत्त्वाचे !

शक्यतो करून मी ट्रेडिंग करताना piot traditional daily चा इंडिकेटर वापरतो , हा इंडिकेटर् लावला की त्या चार्ट वर support आणि resistance आपोआप दिसू लागतात . support वर आला तर बरेच लोक बाय करतात आणि resistance वर आला की बरेच जण सेल करण्याचा .
त्या प्रमाणे सुसंगत भूमिका घेतली तर नुकसान होण्याची शक्यता कमी असते .
फक्त संयम ठेवून support आणि resistance वर येण्याची वाट पाहायची .
Screenshot_20230730_164926_TradingView.jpg

उपयुक्त पुस्तकं कोणती?
For position trading - they all follow CANSLIM methodology
1. How to Make Money in Stocks: A Winning System by William O'Neil
2. Trade Like a Stock Market Wizard by Mark Minervini
3. Monster Stocks: How They Set Up, Run Up, Top and Make You Money by John Boik

Does it work in Indian market? chk a study here: https://rebrand.ly/How-to-find-top-gainers

Also check twitter handle: ChartStudy_IN

तळ्याच्या काठावर माशाची वाट पाहत थांबलेल्या बगळ्या सारखं स्थितप्रज्ञ थांबणे ज्याला येत तोच शेअर बाजारात यशस्वी होऊ शकतो .
रोज इंट्रा डे करायलाच हवा असा नियम नाही , त्यामुळे संधी येताच मैदानात उतरणे केंव्हा ही श्रेष्ठ !
आज बँकनिफ्टी ने बॉक्स पॅटन ट्रेण्ड तोडला आणि अपेक्षे प्रमाणे धाडकन कोसळला .
त्यामुळे PE ne ने मार्केट उघडताच तीन रेजिस्टांस तोडले.
Screenshot_20230809_222233.jpg

तर CE चे २ वाजल्या नंतर रॉकेट सुटले .

Screenshot_20230809_222338.jpg

थोडीशी वाट पाहिली तर चार्ट वर pivot point इंडिकेटर लावणे फायद्याचे ठरतेच ......

कामाची माहिती.
कृपया मुद्यांना क्रमांक द्या
१-०
१-१
१-२.
.
.२-०
२-१
२-२
.
.
३-०
३-१
३-२
.
.
इत्यादी. म्हणजे वाचकांना प्रश्नांसाठी क्रमांक टाकून विचारता येईल.
तुम्हाला उपमुद्दे वाढवायचे असतील तर संपादन नसल्याने नवीन धागा काढावा लागेल.

हा धागा भारतातील शेअर बाजारासाठी आहे ना?

(माझा एक वर्गमित्र गोरे म्हणून आहे तो अमेरिकेत इन्वेस्टमेंट सल्लागार आहे .तिकडचे रूल वेगळे असतील ना.)

<< माझा एक वर्गमित्र गोरे म्हणून आहे तो अमेरिकेत इन्वेस्टमेंट सल्लागार आहे .तिकडचे रूल वेगळे असतील ना. >>

--------- उत्पन्नाचा सोर्स (dividend income, investment income, return of capital, business / salary income ) काय आहे यावर टॅक्स % अवलंबून असेल आणि ते सतत बदलत असते.

टॅक्स % अवलंबून असेल आणि ते सतत बदलत असते.

- बरोबर.
म्हणून दरवर्षी जानेवारी किंवा एप्रिल महिन्यात आर्थिक विषयाचा नवा धागा असावा. हा शेजारचा आहे पण बहुतेक इथला आहे.