शरीर जेव्हा अस्तित्व
नाकारायला लागते
तेव्हा भावना अमर्याद होतात,
मनाची गती कुंठीत होते,
रात्र दिवस
असा फरक राहत नाही
सर्वत्र एक फकिरी भावना
दाटून राहते.....
यशाचे वाटेकरी सगळेच
असतात,
अपयशाचे तांडव जेव्हा सुरु होते
तेव्हा सारे शिव मौन होतात,
आसुरी संकेत दिसायला लागतात
मग
मोहिनिरुपाची भुरळ
सारे विश्व व्यापते
अन जीवनाची राखरांगोळी होते.....
तुलनेला मोह आवरत नाही,
प्रत्येक उध्वस्त झालेल्या
राजवटीच्या चिन्हांवर
नवे अलंकार सजतात,
नवी द्वाही नवी विटी आणते,
अस्तित्वत्यागले धर्म
निकाराचा लढा सुरु करतात
तरीही
बाटवाबाटवी माजते अन
अनंत यातनांचे धर्मपरिवर्तन होते......
मी सांगत नाही
माझ्या प्राचीन संस्कृतीचे वैभव
कारण ते
मातीमोल झालेले असते,
उंटाच्या चाली
घोड्यांच्या चालीवर मात करतात
मग अनामिक आल्या वळवाचे
हिरवट शेवाळे
अणुरेणु व्यापून टाकते
उरती ती फक्त बाटगी भावना.......
शेवट काय ?
कुणीच सांगू शकत नाही !
जे माझ्या पूर्वजांनी भोगले
ते मीही भोगतो
अन
वाट पाहतो
.
.
.
नव्या आक्रमणाची.
विजयकुमार कणसे ...........
२५ / ०९ / २०१२, मुंबई.