अर्थाचा अनर्थ

Submitted by सदा_भाऊ on 25 March, 2019 - 12:30

अर्थाचा अनर्थ

प्रत्येक जीव जंतू आणि प्राण्यांकडून काहीतरी शिकावं अशी आपली संस्कृती सांगते. ही गुंतवणूकीची कला आपण कोणत्या प्राण्या पासून घेतली काय माहीत! कदाचित ते श्रेय मुंग्याना आणि मधमाशाना जात असावे. पोर कमवायला लागलं की वडीलांचा पहीला सल्ला असतो की “चार पैसे गाठीला ठेव रे! सगळे उधळून टाकू नको.” हे गाठीला ठेवलेले पैसे परत नक्की कधी गाठ पडणार अशा माझ्या प्रश्नावर पिताश्रीनी मला बरंच अनाकलनीय लांबलचक उत्तर दिले होते. उत्तराची एकंदरीत लांबी रूंदी पाहता आणि खोली न समजता मी सगळं मान्य करून टाकलं होतं.

तर मुद्दा इतकीच की माणसानं कमावायला लागल्यावर कुठं ना कुठं आर्थिक गुंतवणूक करीत राहीलं पाहीजे. असं केल्याने त्याला भविष्यकाळ सुखाचा वाटू लागतो. वर्तमानकाळात कळ सोसून भविष्याची गोड स्वप्ने पहाणे असा माणसाचा स्वभावच आहे. मी पण त्यातलाच एक. सरकारी नोकरीत पेन्शन नामक भविष्याची हमी दिली जाते. पण माझ्या खाजगी नोकरीतल्या माणसाचे अशा प्रकारचे फाजील लाड पुरवले जात नाहीत. जे काही कमवायचे ते नोकरीत असे पर्यंतच! सुमारे वीस बावीस वर्षांपुर्वी नुकताच नोकरीत चिकटलो असताना हातात थोडाफार पैसा खेळू लागला. महिना अखेरीस शिलकीत पडणारा इवलासा ऐवज मला भलताच खुश करीत होता. तब्बल पाच हजाराचा ऐवज माझ्या खात्यात पाहून मला जग विकत घेण्याची कुवत मिळवल्याचा आनंद झाला. पिताश्रींच्या सल्ल्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करून मी एक रंगीत टिव्ही खरेदी केला. त्याच्या पुढील हप्त्यांमधे आगामी महिन्यांची शिल्लक सुध्दा गमावून बसलो होतो.

बॅंका मधील सुस्मित करीत स्वागत करणारा कर्मचारी वर्ग हा सर्वात घातक असतो. सुरवातीस गोड बोलून स्मित हास्य देत भुरळ पाडतात आणि नंतर दरमहा हप्त्याची माळ गळ्यात मारतात. नंतर तीच गुंतवणूक गळ्याशी आली की तेच सुहास्य चेहरे सापडत नाहीत. फारच खटाटोप करून जाब विचारलाच तर “थोडासा धीर धरा. मार्केट थोडं डाऊन आहे. आखाती प्रश्न सुटला की अमेरीकेत पुन्हा तेजी येईल आणि तुमची गुंतवणूक नक्की फायदा देईल.” आणि उगाचच आपल्या गुंतवणूकीला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाल्याच्या कल्पनेने सुखावून गप्प बसवले जाते. काही गुंतवणूका कधी कधी फायदा सुध्दा करून देणाऱ्या असतात. पण कदाचित त्यासाठी पुर्व पुण्याई किंवा त्या वेळची ग्रहांची स्थिती आणि थोरा मोठ्यांचे आशिर्वाद असावे लागतात. पुर्वी कधीतरी कोणी मला सोन्यात पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. मी पण जमेल तसे थोडे थोडे सोने खरेदी करून बॅंकेच्या लाॅकर मधे धुळ खायला ठेवू लागलो. दहा हजार तोळा किमती पासून तीस हजार तोळा असा प्रवास पाहून मन सुखावून गेले. पण गेल्या बऱ्याच महिन्यात तोच दर तीस हजारात अडकून पडलेला पाहून सोन्यावरचा विश्वासच उडाला आहे. आता “आम्हा साधू संता सुवर्ण मृत्तीके समान” या न्यायाने मी सोनेच नाही तर घरात एखादे स्टीलचे भांडे पण खरेदी करण्याच्या विरोधात आहे.

स्थावर मालमत्ता या मधील गुंतवणूक खुपच फायद्याची ठरते असे बऱ्याच तज्ञांचे मत आहे... माझी पुर्ण सहमती नाही. माझे स्पष्ट मत आहे की त्यात उगाचच मानसिक त्रास होतो. प्लाॅट घेतला तर त्याच्या सीमा अबाधित ठेवण्या कडे लक्ष द्यावे लागते. पण विकताना निश्चित नफा होतो. जर फ्लॅट घेतला तर तो रिकामा ठेऊन चालत नाही. त्या साठी भाडेकरू पहावा लागतो. लांब बसून पटकन भाडेकरू मिळत नाही. रिकामे राहीलेले घर तिथे न राहताच खायला उठते. एकदा का भाडेकरू मिळाला की तो वेळच्या वेळेले घरभाडे देतो का, घर नीट ठेवतो का, त्याच्या कार्ट्याची चित्रकला भींतीवर चितारल्या तर जात नाहीत ना, शेजार पाजार कोणी तक्रार तरी करीत नाहीत ना... एक ना हजार प्रश्न. आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे विकण्याचा. पटकन चांगली किंमत मिळेल याची खात्री नसते. चोखंदळ गिऱ्हाईक घराची किंमत झोपडीच्या भावाने करून मागतात. पंधरा वीस वर्षापुर्वी किंमती पटापट वाढत होत्या, आता ते ही थंड झाले आहे. लोक काळा पांढऱ्या च्या प्रश्नात अडकून पटकन खरेदी साठी तयारच होत नाहीत. मी या मालमत्ते मधे का गुंतवणूक केली असा प्रश्न पडू शकतो. तरीपण माझे मत असे की जर कर्ज काढून घर घेणार असाल तर मुळीच घेऊ नका. त्यातल्या त्यात स्वत:च्या रहाण्यासाठी कर्ज काढले तर एकवेळ चालू शकेल. पण गुंतवणूकी साठी मुळीच तसल्या फंदात पडू नका. नीट विचार करून चांगल्या ठिकाळी केलेली गुंतवणूक नक्की फायदा देऊ शकते. त्या साठी तुमच्या अटकळी बरोबर यायला हव्यात आणि तात्काळ पैसा मिळणार नाही याची तयारी ठेवायला हवी.

लोन, क्रेडीट कार्ड, गुंतवणूक यांची गळ घालणारे फोन मला कायम येत असतात. कधी मला पैशाची नितांत गरज आहे किंवा माझ्या चंगळखोर स्वभावाला पुरक क्रेडीट कार्डाची गरज आहे अथवा माझ्या अकौंटवर बराच पैसा वाह्यात लोळत पडलाय असा काहीतरी गैरसमज मनाशी धरून हे फोनवाले बोलू लागतात. नेमका मी जर काही महत्वाच्या कामात असेन तर असे फोन हमखास येतात. तर एकदा मला असाच फोन आला. मी थोडासा रिकामा होतो म्हणा किंवा तो आवाज मंजूळ होता म्हणा; मी नेहमी प्रमाणे धुडकावून न लावता बोलायला सुरू केले. पलिकडून गोड शब्दात मला देऊ घातलेल्या सुवर्णसंधीची कुंडली ऐकवण्यात आली. मला पण आता थोडी उत्सुकता वाटली आणि प्रत्यक्ष भेटीची तारीख वेळ ठरली. मी आॅफीस मधून थेट सांगितलेल्या पत्त्यावर हजर झालो. छानशा सजवलेल्या आॅफीस मधे मी जाऊन धडकलो. मला रिसेप्शनीस्ट ने स्मित स्वागत करीत प्रतिक्षा करायला सांगितले आणि माझ्या समोर काॅफीचा कप सरकवण्यात आला. ठरलेल्या वेळे नुसार तो मंजूळ आवाज प्रत्यक्ष प्रकट झाला. साधारण तिशीतील सुंदरी माझ्या समोर येऊन बसली. अपेक्षे पेक्षा अधिक सुंदर रूपडं नसलं तरी फेरी अगदीच फुकट गेल्याचं दु:ख नक्की नव्हतं. त्या पुढील तब्बल तासभर ती सुंदरी माझ्या आर्थिक परिस्थितीची गंभीर अवस्था समजावून सांगत होती. चांगली धडधाकट नोकरी चालू असून सुध्दा तिच्या वर्णना वरून अचानक मी खुप मोठ्या आर्थिक संकटाच्या दाराशी घुटमळतोय असा भास होऊ लागला. मी अखेरीस शरण जाऊन त्या महिलेला यातून मार्ग दाखव असे साकडे घातले. तिने त्यावर मिश्किल हसत निव्वळ माझ्यासाठीच बनवण्यात आलेला गुंतवणूकीचा प्रस्ताव माझ्या समोर सादर केला. या भवसागरातून तुच माझी नौका पार पाडणार अशा भावनेने मी ताबडतोब ती सांगेल तिथे सह्या करून टाकल्या. त्या नंतर गेली कित्येक वर्षे मी इमाने इतबारे हप्ते भरतोय आणि माझा गुंतलेला पैसा बाहेर कधी पडेल याची वाट बघतोय. दरम्यान च्या काळात जागतिक मंदीमुळे माझे शंभराचे सत्तर झालेले पाहून उर भरून आले. त्या सुंदरीला फोन करण्याचा किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटण्याचा प्रयत्न विफल ठरला. चुकून फोनवर सापडलीच तर “अहो थोडा धीर धरा” अशा पोकळ समजूतीने माझे समाधान करण्याचा प्रयत्न तीने केला. आता किमान गुंतवणूकीची रक्कम जरी पदरी पडली तरी ते मी माझे भाग्य समजेन.

मी गुंतवणूकीतून घवघवीत फायदा मिळवलेल्या लोकांच्या बऱ्याच कथा ऐकल्यात. एक तर ते लोक तद्दन खोटारडे असावेत किंवा त्यांच्या कडे भविष्य पहाण्याची काहीतरी युक्ती असावी. माझ्या नशिबात असा घवघवीत फायदा देणारा योग लिहलेलाच नाही. माझ्या एका मित्राने तर हातातली चांगली नोकरी सोडून शेअर मार्केट मधे पुर्ण वेळ लक्ष केंद्रीत केले. सकाळी नऊ वाजल्या पासून तीन वाजे पर्यंत सतत फोन वर कोणाशी तरी बोलत तो असतो आणि “इसमे पचास हजार लगावो, उसको आज निकल दो” असल्या गौडबंगाल भाषेत बरळत असतो. मित्राच्या काळजी पोटी एक दिवस त्याला मी गंभीरपणे प्रश्न विचारला. तुझं कसं चाललंय मित्रा? बरं चाललंय ना? काही मदत हवी असेल तर नि:संकोच पणे सांग. यावर तो हसून म्हणाला, अरे बरं कसलं! मस्तच चाललंय. महिन्याला लाख दोन लाख सहज सुटतात. मी तर त्याच्या बोलण्यावर उडालोच. या सट्टे बाजारातून इतका पैसा मिळू शकतो? माझा तर विश्वासच बसेना. एक दिवस मी पण धाडस करून डिमॅट अकौंट चालू केले. बैंकेच्या मदतीने पैसे कसे गुंतवावेत आणि कसे परत काढावेत याचे प्रशिक्षण घेतले. गुंतवणूकीवरच्या लेखांचे अध्ययन सुरू केले. बऱ्याच तज्ञ लोकांचे अगम्य शब्दातले लेखन वाचण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि कोणाच्या तरी सल्यावरून काही चांगल्या कंपन्यांमधे पैसे गुंतवायला सुरू केले. महिन्याभरात त्यातील बऱ्याचशा कंपन्या तेजीत वर चढू लागलेल्या पाहून खजिन्याची किल्ली सापडल्याचा आनंद होऊ लागला. मार्केट अजून वर जाणार असे अंदाज वाचून मनाला अधिकच उभारी येऊ लागली. काही संथ गतीने चढणारे स्टाॅक मी विकून किरकोळ फायदा वसूल करून घेतला. बाकीच्या चढ्या कंपन्या मला रोज दिलासा देत होत्या. नियतीला माझा हा आनंद फार दिवस बघवला नाही. एक दिवस अचानक मार्केट घसरले. मला पत्त्याचा बंगला कोसळावा तसा भास झाला. तज्ञानी “घाबरू नका, हे फक्त करेक्शन आहे” असा दिलासा दिला तरी त्या नंतर मी गुंतवलेल्या कंपन्या घसरतच गेल्या. माझ्या गुंतवणूकीच्या निम्या किमतीला येऊन त्या स्थिरावल्या. दोन चार लाखाचा सहज चुराडा झालेला पाहून हे जग मिथ्या आहे याची प्रचिती आली. नाही म्हणायला काही कंपन्यानी मला चांगला हातभार दिला होता, पण एकंदरीत गोळाबेरीज करता दोन वर्षात दोन तीन टक्के कमावले होते. या पेक्षा एफडी मधे गुंतवले असते तर सात-आठ टक्के नक्की कमावले असते या विचाराने नंतर वाईट वाटून घेत शेअर मार्केट मधील गुंतवणूक बंद करून टाकली.

कितीही पैसा मिळवला तरी माणसाची सुखाची व्याख्या रात्रीच्या शांत झोपेतच संपते. उगाच कटकटी, चिंता, काळजी जर पोखरत असतील तर सगळा पैसा काय कामाचा? माझ्या एफडी च्या निर्णयावर सौ ने शिक्का मोर्तब केल्याने मी अधिक उत्साहाने आणि विश्वासाने एफडी, पोस्टाच्या अल्पबचत योजना, पीपीएफ आदी खात्यांमधे डोळे झाकून पैसे गुंतवू लागलो. एक दिवस माझ्या मित्रा बरोबर असताना त्याच्या ओळखीच्या एका तज्ञाची माझी ओळख झाली. त्याने मित्राचा परीचय गेल्या पाच सहा वर्षाचा असून तब्बल बारा ते पंधरा टक्के वार्षिक परतावा दिल्याची गोष्ट माझ्या कानावर आली. मी पण माझे कान टवकारले आणि त्यांच्या चर्चेत लक्ष देऊ लागलो. म्युचल फंड मधे दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहीले तर काही वर्षात आपण चांगला नफा मिळवू शकतो. मार्केट कोसळले तर अधिक युनीटस मिळतात आणि मार्केट चढले तर अधिक फायदा मिळवता येतो. पण यामधे घाई करून चालत नाही. शांतपणे वाट पहाणे आणि महिन्याच्या महिन्याला गुंतवत राहणे गरजेचे असते. अशा अनेक मोलिक सल्यात मी बुडून गेलो. त्या तज्ञाने माझा रस पाहून माझी विचारपूस सुरू केली. मी केलेल्या गुंतवणूकीचा त्याने आढावा घेतला. जर तोच पैसा मी म्युचल फंड मधे गुंतवला असता तर आत्ता पर्यंत मी कैक लाख बँकेत पडलेले पाहून सुखानं झोपू शकलो असतो. असा काहीसा टोमणा मारून त्याने मला उगाचच खजिल केले. मी ताबडतोब महिना दहा हजाराची एसआयपी चालू करून त्या तज्ञाच्या प्रयत्नाना यश आणि मला मन:शांती दिली. त्यानंतर बरीच वर्षे दहा हजाराचे हप्ते भरीत राहीलो, अजूनही भरतोच आहे. पंधरा टक्क्या पर्यंत पोचलेला परतावा घसरून आता पाच टक्क्या पर्यंत आलेला आहे. पण मी माझा विश्वास ढळू दिलेला नाही. तज्ञाच्या सांगण्यावर माझा अजूनही विश्वास आहे. निवृत्ती पुर्वी नक्की बारा टक्क्याने मी नफा मिळवेन याची आजही मला खात्री वाटते.

एका गोष्टीचे मात्र मला कायमच आश्चर्यच वाटते. चंगळखोर अमेरीकन देशवासीय जगात आर्थिक साम्राज्य गाजवतात पण संचयी वृत्तीचा देश जपान सतत आर्थिक संकटात गर्तेत अडकलेला दिसतो. इतके असूनही आपल्या वर पिढ्यान पिढ्या संचयी वृत्तीचेच संस्कार केले जातात.

Group content visibility: 
Use group defaults

अगदी योग्य लिहिले आहे. थोडीफार गुंतवणूक करावी परंतु आज उपभोगता आला पाहिजे. बचत बचत करत आजचं जिणं
अवघड करू नये, कल किसने देखा है

अगदी योग्य लिहिले आहे. थोडीफार गुंतवणूक करावी परंतु आज उपभोगता आला पाहिजे. बचत बचत करत आजचं जिणं
अवघड करू नये, कल किसने देखा है

ह्यात LIC agents राहिले.
लेखन विनोदी असले तरी तरुण मुलांनी नक्की वाचावे असे आहे.
आमच्या स्न्हेह्यांच्या मुलाने कुनाही मोठ्या माणसाम्चा सल्ला न घेता निव्वळ मित्राअंचे बघुन एक फ्लॅट बालेवादी मधे घेतला.
त्याचा maintenance per month 2500. Municipality taxes annually approx 9000.
घरभाडे फक्त ९५००/१००००. भाडेकरुंना दुसरीकडे नोकरी मिळाली कि ते घर बदलणार. नवीन भडेकरु शोधताना यातायात.
घरात साधा नळ जरी बिघडला तरी भाडेकरुंचे तक्रारीचे फोन.
सगळा आतबट्ट्याच व्यवहार आहे लक्शायाय्त्ला ४ वर्षे लागली. मग विकायला काधला तर गिर्हाइक किमती पाडून मागत होते. म्हनून आप्त स्वकियांना विकत घ्या म्हणून मागे लागला. तसेही कोणी तयार होइना.
भविश्यात (म्हनजे कधी माहीत नाही)किंमती वाधतील ह्या भरोशावर आहे.
बर हे बघुन इअततर लोक धदा शिकतील तर तसेही नाही. peer pressure मुळे extra flat घेणारी तरुन मुले आजही आजुबाजुला दिसतात.

धन्यवाद मंडळी _/\_
बऱ्याच जणाना रिलेट झालेले पाहून जरा हायसे वाटले. “या अनर्थाचा अर्थ समजून त्याचा स्विकार करणारे बरेच आहेत. या माया भवसागरात आपण एकटेच गटांगळ्या खाणारे नसून अनेक जण बुडू पहात आहेत या कल्पनेने दोन श्वास वाढले.”

असेच भरघेस प्रतिसाद द्या. दोनदा दिलात तरी चालेल. मी सुध्दा धन्यवादाच्या निमीत्ताने प्रतिसादांची संख्या वाढवत जाईन.
LIC agent हा विषय मी मुद्दामून टाळला. अहो ते LIC काका माझे वाचक आहेत आणि माझ्या पाॅलिसीज लौकरच मॅच्यूअर होणार आहेत. त्यांचीच मला गरज पडणार आहे. जाणकार वाचकानी समजून घ्यावे आणि स्वत:चे LIC अनुभव बिनधास्त मांडावेत. तुमच्या पाॅलिसीज तुचे कुटूंबीय वसूल करतील, काळजी नसावी.(आपल्या पश्चात असे वाचू नये.)
पुन्हा एकदा धन्यवाद. Happy

प्रचंड नफा किंवा परतावा ह्या गोष्टी नेहमी दुसऱ्यांच्या बाबतीतच घडतात असा माझा दांडगा अनुभव आहे.
वरील सर्व गुंतावणुकी मी करून बघितल्या आणि सपाटून मारही खाल्ला (fd सोडून).

किंवा समजतात तरी.

छान लिहीलाय लेख.
आपण आर्थिक गुंतवणूक करण्यापेक्षा लोकांशी चांगले संबंध ठेवण्यात गुंतवणूक करावी. मग तेच आपल्यासाठी आर्थिक गुंतवणूक करतात. म्हणजे ऑर्डर्स मिळतात हो, आम्हाला सेल्स मार्केटिंगही बघावं लागतं.