" खायला उठलेला अनुत्तरित प्रश्न ! "

Submitted by Charudutt Ramti... on 21 March, 2019 - 23:39

काही प्रश्न हे वेळच्या वेळीच सोडवावे लागतात. ते नाही सोडवले गेले किंवा ‘नाही सुटले प्रयत्न करूनसुद्धा’ असं म्हणूयात फारतर, मग मात्र ते अनुत्तरित प्रश्न केवळ तिथेच थांबत नाहीत. पुढे ते न सुटलेले प्रश्न, कर्क रोगाच्या पेशी जश्या जिथे जन्माला येतात, त्याच शरीराला शेवटी खायला उठतात, तसाच काश्मीर चा ‘न’ सुटलेला प्रश्न, राजकीय कर्करोगाच्या पेशी बनून भारताच्या शरीरात वास्तव्यास असलेली सात दशकांची एक दुर्धर अशी व्याधी बनून राहिली आहे.

अभ्यासंच करायचा झाला ह्या प्रश्नाचा तर, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा काही महिने अथवा वर्ष दीड वर्षांचा आणि स्वातंत्र्य मिळाल्या नंतरचा पुन्हा दोन अडीच वर्षांचा काळ - तो अभ्यासायला हवा. अत्यंत वादळी आणि वेड्यासारखा झंझावाती असा होता ह्या भारतीय उपखंडासाठी, तो काळ. आणि तितकाच लक्षवेधी.

इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केलं . पण हे राज्य करत असतानां त्यांनी काही सर्व भारतभूमी वर एकसमान राज्य केलं नाही. भारताचा काही भाग हा ब्रिटिशांच्या पूर्ण अधिपत्या खाली होता. म्हणजे तिथे फक्त ब्रिटिशच त्या भूभागाचे आणि तेथील जनतेचे सर्वेसर्वा होते. परंतु भारतातील उर्वरित भूभाग आणि तेथे वसलेल्या जनतेवर मात्र राजेरजवाड्यांची सत्ता होती. फक्त हे राजे स्वयंभू मात्र नव्हते, ते होते ' फक्त नामधारी' आणि पूर्णत्वे इंग्रजांचे मांडलिक. पण काही टक्के भारतीय जनता आणि इंग्रज प्रशासन ह्या दोहोंच्या मध्ये त्यांचं अस्तित्व शाबूत होतं. इंग्रजांनी जेव्हा हा देश आपल्याला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा ह्या मांडलिक आणि नामधारी राजांची संख्या तब्बल ५६५ इतकी होती. हा आकडा थोडा थोडका नव्हे. अंदाजे ह्या ५६५ नामधारी मांडलिक राजांच्या कडे, ज्याला इंग्रजांनी प्रिन्सली स्टेट्स असं गोंडस नाव दिलं होतं, एकूण भारत भूमीच्या (अर्थातच फाळणी आधीचा अखंड भारत ) ४०% क्षेत्रफळ असलेला भूभाग होता आणि २३% जनता ही ह्या राजांची प्रजा होती. हे राजे, त्यांच्या जनतेचे राजे होते आणि इंग्रजांचे मात्र गुलाम. थोडक्यात अमीर खानच्या 'लगान' मध्ये कुलभूषण खरवंदा ची जी असते, ( सिनेमात दाखवलेला ‘छुम गोश्त खाओ’ वगैरे अतिरंजितपणा वगळता ) तशीच अवस्था ह्या राजांची होती. काही राजांची कुलभूषण खरवंदा पेक्षा कदाचित बरी असेल किंवा काही जणांची त्याहून वाईट असेल. हे फक्त झालं प्रिन्सली स्टेस्ट्स विषयी. ह्या व्यतिरिक्त इंग्रजांनी पाळलेले ठाकूर, वतनदार आणि जहागीरदार हे वेगळेच, त्यांचा तर कुठे हिशेब सुद्धा लागत नाही पण त्यांची संख्या हजारांच्या वर होती नक्की.

इंग्रजांचा धूर्त पणा असा की ह्या सर्व ५६५ प्रिंसली स्टेट्सना त्यांनी काही समान दर्जा दिलेला नव्हता. एकंदर त्यांची ‘ताकद’, त्यांची प्रजेवरील ‘पकड’, त्यांची ‘लोकप्रियता’, त्यांच्या कडून येणारा 'कर', त्यांची इंग्रजांना भासणारी ‘गरज’, आणि त्यांनी इंग्रजांना वेळोवेळी केलेली मदत ( पहिल्या, दुसऱ्या महायुद्धात वगैरे ) ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांचे ह्या प्रिंसली स्टेट्स बरोबर वेगवेगळ्या दर्जाचे करार आणि तह होते. त्यामुळे साहजिकच काही प्रिंसली स्टेट्स हे इतर प्रिंसली स्टेट्स पेक्षा महत्वाचे आणि पुढील रांगेत होते, दिल्लीत युनियनजॅक च्या सावलीत कारभार करणाऱ्या व्हाइसरॉय च्या कोर्टयार्डात. त्यामुळे काहींना २१ तोफांचा मान, काहींना १९, काहींना फक्त पाचच, काहींना तोही नाही. ह्या प्रतवारीला ब्रिटिश 'डिफरन्ट लेव्हल्स ऑफ सुझरेंटी' असं म्हणत. वसाहती म्हणजेच कॉलनीज, सुझरेंटी, प्रोटेक्टोरेट, ट्रीब्यूटरी ह्या वसाहतवाद आणि साम्राज्यवाद सबंध जगात स्थापन केलेल्या ब्रिटिशांच्या विश्वकोशातील विविध व्याख्या. त्यांच्या खोलात नंतर परत कधीतरी जाता येईल. पण ही गुलामगिरी ह्या राजांच्या रक्तात एवढी भिनलेली होती की , भारत स्वतंत्र झाला तेंव्हा व्हाइसरॉय होते 'लॉर्ड माउंटबॅटन'. ५६५ पैकी अनेक संस्थानिकांचा आपल्या स्वातंत्र्य लढ्यात विजयी झालेल्या भारतीय नेत्यांच्यापेक्षा ह्या लॉर्ड माउंटबॅटन ह्यांच्यावर अंमळ अधिक विश्वास होता.

स्वातंत्र्याची घोषणा झाली इंग्रजांच्या कडून तेंव्हा, इंग्रजांनी भारतीय नेत्यांना , म्हणजेच मुख्यत्वे इंडियन नॅशनल काँग्रेस च्या पुढाऱ्यांना सांगितलं, की आमचा ज्या भारताच्या ६० % भूभागावर आणि ७७ % जनतेवर सरळ पणे अंमल आहे तो आम्ही तुम्हाला स्वतंत्र भारत किंवा द्विराष्ट्र वादानुसार (टू नेशन थिअरी) स्वतंत्र पाकिस्तान ला बहाल करू. परंतु उर्वरित ४० % भूभाग आणि २३ % जनता जी, त्या त्या राजेरजवाड्यांच्या अधिपत्या खाली आहे त्या राजांनां मात्र त्यांनी तीन पर्याय उपलब्ध करून दिले. त्यातील दोन पर्याय साधे आणि सरळ होते. पहिला एकतर भारतात विलीन व्हा, दुसरा, नसेल जमत तर पाकिस्तानात विलीन व्हा. पण तिसरा पर्याय मात्र त्यांना जर हवे असेल तर त्यांना "स्वतंत्र राज्य" म्हणून अस्तित्व ठेवण्याचाही एक तिसरा पर्याय लॉर्ड माउंटबॅटन ह्यांनी ठेवला होता. ह्याचं एक उदाहरण म्हणजे सिक्कीम राज्य. जे १९७५ पर्यंत स्वतंत्र होतं आणि त्यानंतर १९७५ साली सिक्कीमचं भारतात विलिनीकरण झालं.

स्वातंत्र्या नंतर आजता गायत भारत काश्मीर मध्ये जे काही भोगतो आहे त्याची खरी मेख इथे ब्रिटिशांनी ह्या प्रिन्सली स्टेट्स ना दिलेल्या "वाटल्यास स्वतंत्र रहा” ह्या दिलेल्या तिसऱ्या पर्याया मध्ये आहे. ५६५ पैकी बरेचश्या राजांनी त्यांच्या राज्याचं हे एकतर भारतात विलीनकरण केलं किंवा नाहीतर पाकिस्तानात विलीनीकरण केलं. विलीनीकरणाच्या कराराला कायद्याने "इन्स्ट्रुमेंट ऑफ एकसेशन" असं म्हणलं जातं. विलीनीकरण मान्य असलेल्या राजांनी ह्या इन्स्ट्रुमेंट ऑफ एकसेशन वर रीतसर सह्या केल्या. परंतु ह्या ५६५ राजांच्या पैकी, पाच जण जास्त मात्र हुशार निघाले. त्यांनी आम्ही ‘ना भारत ना पाकिस्तान’ आम्ही आपले स्वतंत्रच राहतो असा पवित्रा घेतला.

त्या पाच अतिहुशार राजांपैकी पहिले म्हणजे, त्रावणकोर संस्थानाचे दिवाण सर सी.पी. रामस्वामी ऐय्यर ! सर्व प्रथम ह्या सर सी. पी. रामस्वामी ऐय्यर ह्यांनी विरोधाचं निशाण फडवकलं आणि भारतीय प्रजासत्ताकात आपले राज्य विलीनीकरण “न” करण्याचा आणि आपलं राज्य स्वतंत्र ठेवण्याचा मनसुबा जाहीर केला. त्या लगोलग जूनागढ, हैदराबाद, भोपाळ आणि प्रामुख्यानं “जम्मू आणि काश्मीर” च्या राजांनी आपापली संस्थानं अबाधित राखण्यासाठी “स्वतंत्र” राहण्याची भूमिका घेतली. जुनागढ आणि भोपाळ चे मुस्लिम राजे तर चक्क पाकिस्तानात विलीनीकरणाची तयारी करत होते. जुनागड चा राजा मुस्लिम असला तरी प्रजा बहुसंख्य हिंदू होती. एक जुनागढ, दुसरं भोपाळ आणि तिसरं हैदराबाद ह्या तीन संस्थांनांमध्ये, परिस्थिती अशी होती की पाकिस्तानचा ह्या राज्यांना स्वतंत्र राहण्यासाठी आणि त्याही पेक्षा पाकिस्तानात विलीनीकरण करण्याच्या दृष्टीने छुपा ( खरंतर खुला ) पाठिंबा होता. पण ह्या पाच पैकी चारही राज्यांचे प्रश्न त्यावेळच्या नेत्यांनी तशीच गरज पडल्याने दोन हात करून सोडवले. कारण जुनागढ आणि हैदराबादमध्ये चक्क भारतीय सैन्य शिरून त्यांनी रीतसर त्यांचे राज्य जिंकले. जुनागढ मध्ये तर चक्क त्यानंतर सार्वमत घेतले गेले. आणि भारतात विलीनीकरणाचा ९०% जनतेचा कौल आला. तिकडे दक्षिणेत त्रावणकोरच्या दिवाणावर त्यांच्या ह्या स्वतंत्र राहण्याच्या भूमिकेवर जीवघेणा हल्ला झाला, आणि बिथरून मग त्यांनी आपली मागणी मागे घेत, विलीनीकरणास मान्यता दिली. तिकडे भोपाळ च्या नवाबानं सुद्धा 'मुस्लिम लीग च्या' लोकांशी अत्यंत जवळचे संबंध असूनही नाईलाजास्तव एकंदर स्वतःच्या हट्टाला मोडता घालत पाकिस्ताना ऐवजी भारतात विलीनीकरण मान्य केले. हैदराबाद, जुनागढ आणि भोपाळ मध्ये राजे मुस्लिम असले तरी बहुसंख्य प्रजा हिंदू. त्यामुळं हे भारत, पाक की स्वतंत्र अशी द्विधा ( खरं तर त्रेधा ) परिस्थिती उत्पन्न झाली होती.

तिकडे पाकिस्तानातसुद्धा 'कलत' नावाचं एक बलोचिस्तानातलं संस्थान होतं. त्या संस्थानिकाला सुद्धा पाकिस्तानात विलीन व्हायचं नव्हतं. एक वर्ष भर चक्क हे एक स्वतंत्र राज्य म्हणून जगलं. पुढे ४८ ते ५५ हे सात वर्ष हे ‘कलत’ राज्य पाकिस्तानातील एक प्रिन्सली स्टेट म्हणून पाकिस्तानातच पण थोडीशी स्वायत्तता बाळगून होतं. पण पुढे १९५५ साली ते राज्य सुद्धा पाकिस्तान ह्या राष्ट्रात विलीन झालं.

अश्या रीतीने त्रावणकोर, भोपाळ, जुनागढ आणि मुखत्वे हैदराबाद असे पाच पैकी चार प्रश्न सुटले. आता प्रश्न उरला जम्मूकाश्मीरचा. जी परिस्थिती जुनागढ आणि हैदराबाद मध्ये होती त्याच्या बरोब्बर उलट परिस्थिती काश्मीर मध्ये होती. राजा हरिसिंग हिंदू आणि प्रजा बहुसंख्य मुस्लिम. बहुसंख्य मुस्लिम म्हणजे किती तर, इंग्रजांनी केलेल्या जनगणनेमध्ये १९४१ साली काश्मीर मध्ये ७७ % मुस्लिम आणि २० % हिंदू होते. उर्वरित ३ % हे शीख आणि बौद्ध धर्मीय होते. आधी "जम्मू आणि काश्मीर" स्वतंत्र ठेवत मी राज्य करतो असा हेका धरलेल्या ५२ वर्षांच्या राजा हरीसिंगांना, जेंव्हा पाकिस्थानातून पश्तुन जमातीचे अफगाण सैन्य काश्मीरच्या उत्तरपश्चिम सीमेतून राज्यात घुसून, हरिसिंगाच्या सैन्याची धूळधाण करू लागले तेंव्हा कुठे भारताची आठवण आली. आता ह्या पश्तुन जमातीच्या टोळ्या काश्मीरवर चाल करून आल्या त्या खरेच पश्तुनी टोळ्या होत्या की काही जाणकारांच्या मते ते पाकिस्थानी सैन्यच होतं ( आर्मी रेगुलर्स ) फक्त त्यांना पाकिस्तानने टोळ्यांच्या स्वरूपात पाठवलं होतं. काही जणांच्या मते ही पाकिस्तानी सैनिक आणि टोळ्या ह्यांची संमिश्र अशी घुसखोरी होती.

( पुढे हेच कपट पाकिस्तानने ५२ वर्षांनंतर कारगिल मध्ये घुसखोरी करताना वापरलं. पाकिस्तानी सैनिकांना मुजाहिद्दीन च्या स्वरूपात आर्मीचा युनिफॉर्म न घालता सिव्हिलिअन किंवा जिहादी भासवण्याचा पाकिस्तानाचा प्रयत्न कारगिलचे घनघोर युद्ध जिंकून भारतानं हाणून पाडत, जगासमोर पाकिस्तानला आंतराष्ट्रीय पटलावर अक्षरशः नग्न केले होते. ) भारतानं राजा हरीसिंगांना मदत करायचं मान्य केलं पण एका अटीवर. जर जम्मू आणि काश्मीरचं भारतात विलीनीकरण करण्याचं राजानं कबुल केलं तर, भारत आपलं सैन्य पाठवून राजा हरीसिंगांची मदत करेल अशी अट टाकली गेली. राज्य आणि जीव दोन्हीही पणास लागलेल्या हरिसिंगानी शेवटी ‘इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सएशन’ वर सही केली. तो दिवस होता २६ ऑक्टोबर १९४७.. म्हणजे कायद्याने काश्मीर त्या दिवशी भारताचं एक गणराज्य म्हणून दाखल झालं होतं. खरंतर प्रश्न इथं संपायला हवा होता. कारण जर जुनागढ, भोपाळ आणि हैदराबाद किंवा खाली दक्षिणेत त्रावणकोर चा प्रश्न जर राजा आणि संस्थानिकांच्या दिवाणांनी “इंस्ट्रुमेंट ऑफ एक्सएशन” वर सही करून सुटला तर मग फक्त काश्मीर चा प्रश्न का नाही सुटू शकला?

पण जोपर्यंत भारतीय सैन्य राजा हरिसिंगाच्या सैन्याच्या मदतीस गेलं तोपर्यंत, तथाकथित पश्तुनी टोळ्या आणि पाकिस्तानी सैन्य काश्मीर मध्ये बरेच आत पर्यंत घुसून धुमाकूळ घालू शकलं होतं. इथवर राजा हरिसिंगाच्या "जम्मू अँड काश्मीर स्टेट फोर्सेस" आणि "पश्तुन टोळ्या व पाकिस्तान मिलिटरी " ह्या दोघांच्यातलं युद्धाचं परिवर्तन आता भारत आणि पाकिस्तान ह्यांच्यातील आता पर्यंत लढलेल्या चार पैकी पहिल्या युद्धात झालं. १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेल्या ताज्यातवान्या स्वातंत्र्याचा उत्सव दोन्ही राष्ट्रांत अजूनपूर्णपणे संपायचा होता आणि २६ ऑक्टोबर १९४७ रोजी म्हणजे अवघ्या साठ पासष्ट दिवसात काश्मीर च्या मालकीहक्का वरून भारत पाक युद्ध सुरु झालं. हे युद्ध तब्बल १ वर्ष २ महिने चाललं. दरम्यान च्या काळात भारताने काश्मीर प्रश्न युनो मध्ये नेला. आणि तिथे भारतानं 'जम्मू आणि काश्मीर' चे रीतसर भारतात विलीनीकरण होऊन सुद्धा, जम्मू काश्मीर च्या जनतेचे सार्वमत ( plebisite ) घेण्यास मान्यता दर्शवली. कारण स्वातंत्र्य बहाल करताना ब्रिटिशांनी, भारत आणि पाक ह्या दोन पैकी कोणत्या राष्ट्रात विलिनीकरण व्हावे हा निर्णय “केवळ संस्थानिकांच्या मर्जीवर न घेतला जाता तेथील जनतेचे मतही तितकेच मोलाचे मानले जावे” असाही सल्ला दिला होता, जो दोन्ही राष्ट्रांकडील नेत्यांनी ग्राह्य मनाला होता. राजा हरीसिंगांच्या विलीनीकरणावरती सह्या होऊन सुद्धा परत एकदा "हा प्रश्न सार्वमत/जनमत घेऊन सोडवू" हे युनो मध्ये सांगणं म्हणजे खरंतर एक राजकीय आत्महत्या होती. पण इतिहास वाचताना "कोण कुठे चुकले? किंवा कुणाचा मुत्सद्दी पणा कुठे कमी पडला?" ह्यावर टिपणी करणे ह्याला 'हायिंन्डसाईट बायस' असं म्हणतात. किंवा साध्या भाषेत पश्चातबुद्धी . म्हणजे घटना घडून झाल्यावर "अरे! असं नको करायला पाहिजे होतं आपण, एवढं साधं कसं कळू शकलं नाही?' असं जे राहून राहून वाटतं, ते वाटणं. अश्या वेळी "दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती..." असं म्हणायचं आणि पुढील इतिहास वाचायला घ्यायचा. प्लेबिसाईट मान्य केल्यावर खरंतर राजा हरीसिंगांच्या स्वाक्षरीस काहीही किंमत उरली नव्हती. पण इकडे जुनागढ ला मात्र प्लेबिसाईट म्हणजेच सार्वमत घेऊन आपण विलीनीकरण पूर्णत्वाला नेले होते. म्हणजे आपण एक प्रकारे न कळत कात्रीत अडकलो होतो.

हे पहिलं भारत पाक युद्ध जरी आंतराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते हे युद्ध अनिर्णित राहिलं आणि शेवटी ३१ डिसेंबर १९४८ रोजी रात्री ठीक बारा वाजता युद्ध विराम करत, पाकिस्तानचं सैन्य जिथं होतं त्या रेषेत आणि भारताचं सैन्य जिथं होतं त्याच रेषेत थांबवून "सिज फायर" मान्य करण्यात आले असले, तरीही भौगोलिक दृष्ट्या आपण दोन त्रितीयांश जमीन ताब्यात घेतली होती. आपले सैन्य हजाराच्यावर बलिदान गेले होते. पाकिस्तानच्या सुळे वर गेलेल्या सैनिकांची यादी ५००० च्या वर होती. आणि पश्तुनी टोळ्यांमध्ये भारतीय सैनिकांच्यागोळ्यांनी यमसदनी धाडले गेलेले वेगळेच. ज्या रेषजवळ सिज फायर करण्यात आले त्या रेषेस पुढे १९७१ साली भारत आणि पाकिस्तान दरम्यान जो सिमला करार झाला त्या रेषेला "लाईन ऑफ कंट्रोल" म्हणून संबोधण्यात आले. आता आपण रोज " रिपीटेड व्हायोलेशन ऑफ सीझ फायर एट द एल.ओ.सी. बाय पाक फोर्सेस” अश्या ज्या बातम्या ऐकतो त्या बातम्या म्हणजे ३१ डीसे. १९४८ ला जो सीझ फायर करण्यात आला आणि पुढे १९७१ चा जो सिमला करार झाला त्या कराराचे उल्लंघन केले गेले असल्याच्या बातम्या म्हणजे ह्या "व्हायोलशन ऑफ सिज फायर एट द एल.ओ.सी. !" आजतक आणि झी वाले ओरडून ओरडून सांगतात त्या बातम्या ह्या सिज फायर च्या १९४८ साली ठरलेल्या.

आता सीझ फायर तर झाला भारत पाकिस्तान ह्यांच्यात. पण हा सीझ फायर झाला तेंव्हा राजा हरिसिंगाने ज्या काश्मीरच्या विलीनीकरणाची मान्यता दिली होती भारतात, त्या काश्मीरचा जवळ जवळ एक त्रितीयांश भूभाग पाकिस्तान आणि पश्तुन टोळ्यांच्या ताब्यात गेला होता. ज्याला आज आपण "पाक ऑक्युपाईड काश्मीर" ( P.O.K. ) असं म्हणतो. म्हणजेच भारताला पूर्ण काश्मीर कधी मिळालेलाच नाही. तो भूभाग फक्त कागदावरच भारताचा राहिला. प्रत्यक्षात तो १ जानेवारी १९४९, पासून पाकिस्तानच्याच ताब्यात आहे. थोडक्यात अनधिकृत पणे पाकिस्तान त्या जागेवर गेले ७० वर्षे घुसखोरी करून आहे. पण आता घुसखोरच मालक अशी परिस्थिती ह्या पाकव्याप्त काश्मीर ची आहे. उरलेला जो काश्मीर आपण कागदोपत्री आणि त्याचबरोबर लष्करी प्राबल्य दाखवून आपला केला, तिथे सुरु असलेला रक्तप्रपाताचे सर्वच जण साक्षीदार आहेत. पुढे १९५५ ला कलम ३५ A आणि ३७० कलम आलं, त्यानं प्रश्न सोडवण्या ऐवजी अधिकच क्लिष्ट केले. पुन्हा एकदा 'हायिंन्डसाईट बायस' म्हणायचं आणि पुढे जायचं.

हझरत बल असो, कारगिल युद्ध असो, एयर इंडिया आय. सी. 814 असो, संसदेवरचा हल्ला असो, ताजमहाल हॉटेल आणि छबड-नरिमन हाऊस असो, उरीवरील हल्ला असो आणि अजून ओल्या जखमांचा पुलवामा चा हल्ला असो! गेल्या महिना भरापासून पासून सुरु असलेलं तांडव. आणि अगदी गेल्या आठवड्यातील बातमीनुसार चीननं युनोत व्हेटो वापरून पुन्हा चौथ्यांदा दहशतवाद्यांना अभद्र आणि निर्ल्लज पणे दिलेलं अभय! चीन च्या ह्या अपेक्षित आणि अनपेक्षित अश्या दोन्हीही पवित्र्यामुळं एकंदर हे काश्मीरचं भयनाट्य अजून तरी शेवटच्या म्हणजे तिसऱ्या अंकात असावं अशी काही चिन्हं दिसत नाहीत.

भारताच्या स्वातंत्र्याला आणि त्या नंतर लगेचच झालेल्या काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाला तब्बल एक्काहत्तर वर्ष पूर्ण झाली. म्हणजे जो काश्मिरी नागरिक ( खरंतर काश्मिरात जन्मलेला भारतीय नागरिकच , पण कश्मिरीयत जळत आणि धुमसत ठेवणारे काही मूठभर फुटीर समाजकंटक, म्हणून काश्मिरी नागरिक ) हा काश्मीर प्रश्न उद्भवला तेंव्हा जन्माला आला तो आता एक्काहत्तर वर्षांचा वृद्ध झाला असेल. पंचवीस वर्षांची एक पिढी मानतात इतिहासाकडे पाहताना. त्या मोजमापाने काश्मीर मधली तिसरी पिढी सुरु आहे. दिशाहीन अवस्थेतील तरुण वर्ग. काहीही आशावाद उराशी नसलेला. त्यामुळं सहज कुणीही दिशाभूल करू शकणार. कुठं तरी वाचताना समजलं की कशिमरी युवा पिढीत प्रचंड मोठ्या स्वरूपात व्यसनाधीनतेचं प्रमाण आहे. एका पिढी कडूनकडून दुसऱ्या पिढीला राजकीय अस्थैर्याशिवाय काहीही देऊ न शकलेल्या तीन काश्मिरी पिढ्यांची दुर्दैवी अशी ही निराशाजनक कहाणी काश्मीरच्या जनतेवर दुसऱ्या तिसऱ्या कुणी लादलेली नसून ती परिस्थिती त्यांनी स्वतःवर ओढावून घेतलेली आहे. कारण विलीनीकरण होण्यासाठी नकार देणारे त्यावेळी काश्मीर हे एकमेव राज्य नव्हते. पाच पाच राज्यांचे प्रश्न 'आ' वासून उभे होते. पण आता सत्तर वर्षांनंतर सुद्धा "आपण नक्की कोण? भारतीय? पाकिस्तानी? की काश्मिरी? " अशी त्रिशंकू अवस्था असलेलं आजमात्र ते एकमेव राज्य उरून राहिलेलं आहे. काश्मीर मध्ये पूर्वीही बर्फ पडायचा आणि आज ही तो पडतो, पण तो बर्फ आता पारदर्शी आणि आल्हाददायक न राहता त्या बर्फाला गेल्या कित्त्येक दशकांचा रक्तरंजित विध्वंसाचा आणि हिंसाचाराचा काळिमा मात्र लागलेला आहे. - थोडी न थोडकी गेली सत्तर वर्षं !

( टीप: ह्या लेखाचा उद्देश कोणत्याही नेत्यावर अथवा राजकीय पक्षावर टीका करणे अथवा कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करणे हा नसून घडलेल्या इतिहासाचं आकलन करणे हा आहे. त्या दृष्टीने हा लेख शक्य तितका 'ओपिनियन न्यूट्रल' करण्याचा प्रयत्न केलेला आहे. )

चारुदत्त रामतीर्थकर
पुणे, १६ मार्च २०१९.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऍडमीन जी , ह्या लेखाचा धागा अयोग्य ठिकाणी पडला असल्यास, त्याला कृपया तो योग्य त्या ठिकाणी हलवण्यास मदत करावी.

पुढे १९५५ ला कलम ३५ A आणि ३७० कलम आलं, त्यानं प्रश्न सोडवण्या ऐवजी अधिकच क्लिष्ट केले.>>> हे कसं, हे कसं, हे वाचायला आवडेल. बाकी उत्तम लेख.

छान लेख.
भारतीय? पाकिस्तानी? की काश्मिरी? " अशी त्रिशंकू अवस्था असलेलं आजमात्र ते एकमेव राज्य उरून राहिलेलं आहे. > खरच. पाकिस्तान मधे काश्मिर साठी रीतसर मंत्री असतो मंत्रिमंडळात. पण जेव्हा सीमेवरील हलचालींच्या नुकसानीचा मोबदला देण्याची वेळ येते; तेव्हा पाकिस्तानी नागरिकंएवढा दिला जात नाही. काश्मिर दिवस साजरा करणे , इतर छुपे कारनामे पार पाडणे बरोबर जमते; पण जिथे मानवी द्रुष्टीकोन पाहिजे तिथे भेदभाव करतात.

चांगला आढावा घेतला आहे. विशेषतः काश्मिर प्रश्न ज्यांना इतिहास्/भूगोल्/नागरिकशास्त्र पुस्तकांच्या पलिकडे माहित नाहि, त्यांच्याकरता उपयोगी ठरावा. जुनागढ, भोपाळ, हैद्राबादचा तिढाहि त्यावेळेला युनोत नेला असता तर आज काय परिस्थिती असती, हा प्रश्न हाइंडसाइट बायस मुळे उद्भवतो...

मात्र, लेखातलं एक वाक्य खटकलं - "एका पिढी कडूनकडून दुसऱ्या पिढीला राजकीय अस्थैर्याशिवाय काहीही देऊ न शकलेल्या तीन काश्मिरी पिढ्यांची दुर्दैवी अशी ही निराशाजनक कहाणी काश्मीरच्या जनतेवर दुसऱ्या तिसऱ्या कुणी लादलेली नसून ती परिस्थिती त्यांनी स्वतःवर ओढावून घेतलेली आहे."

का? ते सूज्ञास सांगणे नलगे...

मागे असं वाचलं होतं (आता संदर्भ आठवत नाही, पण शोधीन) की स्वातंत्र्य - फाळणी नंतर संस्थानिकांना जे अधिकार दिले होते (भारत, पाकिस्तान किंवा स्वतंत्र) त्यात आणखीन २ महत्वाचे मुद्दे होते - प्रजेच्या धार्मिक बहुसंख्येचा आणी भौगोलिक संलग्नतेचा. ह्या दोन्ही निकषांवर भारताकडून काश्मिर ने पाकिस्तानात विलीन व्हावे अशी भुमिका घेतली गेली होती. जेव्हा हरिसिंगाने लष्करी मदत मागितली तेव्हा सुद्धा भारतानं स्वतंत्र काश्मिर आणी पाकिस्तानात त्याने विलीन व्हावे ह्या दोन भुमिकांमधून सुरूवातीला ती नाकारली होती. त्यामुळे ती तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी हरिसिंगानं विलीननामा पाठवला. त्यावेळी असा निर्णय घेतला गेला की ही घुसखोरी आधी अ‍ॅड्रेस करून मग सार्वमत घेतलं जाईल. पण त्या युद्धात भारतीय सैन्याची हानी झाली आणी तिथून ते चित्र बदलत गेलं.

अभ्यासपूर्ण आणि संतुलित लेख आहे व या विषयाच्या अभ्यासकांना संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल असे वाटते
अनुमोदन.

पीओके दिल्यावर तरी शांतता नांदावी, पण नाही Sad .
अजूनहि पाकीस्तानी जवळ जवळ उघडपणे तिथे अशांतता मा़जवतात नि सगळे अस्थिर करून टाकतात.

हरिसिंगच्या राज्यात आजचा जम्मू भाग आणि लडाख भाग पण होता की केवळ काश्मिर/गिलगिट होते?

युनोमध्ये सार्वमत घेण्याच्या तयारीस काही पूर्व अटी भारताने ठेवल्या होत्या का (जसे सैन्य दोन्ही देशांनी मागे घ्यायचे वगैरे)?

सर्वच घटना क्रम चुकलं आहे .
सुरवातीलाच सर्व संस्थाने बरखास्त करणे गरजेचं होत
मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणात पाकिस्तान ला भूभाग वाटून दिला पाहिजे होता.
नंतर सर्व मुस्लिम पाकिस्तान मध्ये आणि सर्व हिंदू भारतात ही योजना पूर्ण केली असती तर कोणताच प्रश्न दोन्ही देशात राहिला नसतं भले १९४७ aivji १९५७ ल स्वतंत्र मिळाले असते तरी चाललं असतं

सर्वांचे लेखाविषयी दिलेल्या अभिप्राया करिता मनापासून आभार. काही प्रश्न इथे उपस्थित केले गेलेले आहेत त्यांना, यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

>>> “ पुढे १९५५ ला कलम ३५ A आणि ३७० कलम आलं, त्यानं प्रश्न सोडवण्या ऐवजी अधिकच क्लिष्ट केले.>>> हे कसं? ”<<<
आपल्या राज्यघटने नुसार, प्रशासकीय अधिकारांचे आणि राज्यकारभाराचे तीन प्रकारे विभाजन करण्यात आले आहे. पहिली युनियन लिस्ट. दुसरी स्टेट लिस्ट. आणि तिसरी कनकरंट लिस्ट. युनिअन लिस्ट म्हणजे अशी जी खाती की ज्यात निर्णय आणि अंमलबजावणीचे सर्वाधिकार फक्त केंद्र सरकार कडेच आहेत. उदाहरणार्थ संरक्षण, परराष्ट्र, रेल्वे, बँकिंग, नागरी उड्डयन इत्यादी. स्टेट लिस्ट म्हणजे अशी खाती जिथे निर्णय आणि अंमलबजावणीचे सर्व अधिकार फक्त राज्य शासनाला आहेत. त्या खात्यांमध्ये आणि राज्यसरकारच्या निर्णयांमध्ये केंद्र शासनाला ढवळा ढवळ करण्याचे अधिकार नाहीत. उदा, स्वच्छता आणि आरोग्य, लॉ अँड ऑर्डर ( पोलीस ) इत्यादी. आणि तिसरी कनकरंट लिस्ट, उदाहरणार्थ अशी खाती जीथे राज्य शासन आणि केंद्र शासन ह्या दोघांनी एकत्रितपणे निर्णय आणि अंमलबजावणी करणे अपेक्षित आणि कायद्याने मंजूर आहे. उदाहरणार्थ, लोकशिक्षण, लोकसंख्या, वन खातं, बेरोजगारी इत्यादी.
आता कलम ३७० मुळं जम्मू आणि काश्मीर मध्ये सरकारला फक्त संरक्षण, परराष्ट्र आणि दळणवळण ( कंम्युनिकेशन ) ह्या तीनच क्षेत्रात हस्तक्षेप करण्याची मुभा आहे. बाकी कनकरंट लिस्ट जिथे आपले केंद्र सरकार, जम्मू आणि काश्मीर व्यतिरिक्त बाकी सर्व राज्य सरकारां बरोबर काम करून राज्याचे प्रश्न मार्गी लावू शकते, तसे करण्यास कलम ३७० मुळे अनेक अडचणी आहेत. कारण हे कलमच मुळात जम्मू काश्मीर ला स्पेशल स्टेटस देण्या विषयी विषयी आहे. त्यामुळे नाही म्हंटले तरी जम्मू काश्मीरच्या सर्वंकष प्रश्नांना उत्तरे शोधणे केंद्र सरकारला तसे अवघड जाते. कारण तो कलम ३७० अनुसार केंद्राचा ह्या स्पेशल स्टेटस विरुद्द केलेला हस्तक्षेप ठरू शकतो. ह्या सर्वाचा परिणाम अर्थात रोजगार निर्मितीवर आणि काश्मिरी जनतेच्या दैनंदिन अडीअडचणींवर होतो. परिणाम : तरुण वर्ग रोजगार निर्मितीच्या अभावे आणि पुढे काही आशादायी भविष्य दिसत नसल्यामुळे शस्त्र हाती घेण्यास मागे पुढे पाहत नाही.
कलम ३५ अ, मुळे सुद्धा इतर भारतीयांना (उद्योजकांना वगैरे ) तिथे स्थावर मालमत्ता विकत घेण्यावर कायद्याने प्रतिबंध घातले गेले आहेत. परिणाम , अर्थात पुन्हा बेरोजगारी आणि दहशतवाद. ह्या सर्व कायदेशीर तरतुदी, तेथील सर्वसामान्य जनतेस मुख्य राष्ट्रीय प्रवाहापासून विलग करतात ( barriers to the main stream of nation ) असा एक जोरदार मतप्रवाह आहे. आणि त्या मतप्रवाहात बऱ्याच औंशी तथ्य सुद्धा आहे. खरंतर हे स्वतन्र लेखाचे विषय आहेत.

>>> “मात्र, लेखातलं एक वाक्य खटकलं - "एका पिढी कडूनकडून दुसऱ्या पिढीला …………………………स्वतःवर ओढावून घेतलेली आहे." <<<
" इन डेमोक्रसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दे डिझर्व " अशी एक म्हण प्रचलित आहे. जरी काश्मीरच्या जनतेची स्वातंत्र्यानंतरची सुरुवात वादग्रस्त पद्धतीने झाली असली तरीही, जनतेच्या उघड/छुपा पाठिंबा तिथल्या अतिरेकी कराव्यांना असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया बळावणं शक्य नाही. त्यामुळे जितके इतिहासातील आणि अलीकडच्या काळातील सत्ताधीश काश्मीर खोऱ्यातील गंभीर अश्या सद्य परिस्थितीस जवाबदार आहेत तितकीच जवाबदार तेथील जनताही आहे. अश्या अनुषंगाने म्हणून हे मत मांडले आहे. अर्थातच ह्या प्रश्नाच्या वेगवेगळ्या अभ्यासकांना आणि काश्मीर चा इतिहास आणि राजकारणाच्या विविध पैलूंचा आढावा घेणाऱ्यांना, ह्याहुन वेगळे असं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहेच, आणि त्या सर्व मत मतांतरांचा आदरसुद्धा केला पाहिजे.

>>> “हरिसिंगच्या राज्यात आजचा जम्मू भाग आणि लडाख भाग पण होता की केवळ काश्मिर/गिलगिट होते?” <<<
होय, १८४६ साली जे जम्मू आणि काश्मीर हे प्रिन्सली स्टेटची निर्मिती झाली. राजा गुलाब सिंग, त्या प्रिन्सली स्टेटचे (दोग्ग्रा राजघराणं) प्रथम राजे, आणि राजा हरिसिंग हे त्याच घराण्याचे चौथे आणि राज्य खालसा झाल्यामुळे शेवटचे राजे. तर १८४६ ते १९४७ ह्या शंभर वर्षांच्या कालावधीत ह्या राज्याच्या अधिपत्या खाली हे सर्व भूभाग दाखल होते. १८४६ साली जी राज्य निर्मिती निर्मिती झाली त्यात जम्मू, काश्मीर चे खोरे, गिलगिट बाल्टिस्तान आणि लद्दाख हा सर्व भूभाग समाविष्ट होता.

>>> “युनोमध्ये सार्वमत घेण्याच्या तयारीस काही पूर्व अटी भारताने ठेवल्या होत्या का (जसे सैन्य दोन्ही देशांनी मागे घ्यायचे वगैरे)?”<<<
ह्या प्रश्नाचं उत्तर अभ्यास केल्या शिवाय सांगणं अवघड आहे. त्याविषयी तितका सखोल अभ्यास नाही, तो करावा लागेल.

>>> “आणखीन २ महत्वाचे मुद्दे होते - प्रजेच्या धार्मिक बहुसंख्येचा आणी भौगोलिक संलग्नतेचा” <<<
धार्मिक बहुसंख्येचा विषय हा थोडा वादग्रस्त आहे कारण भारताने "धर्मनिरपेक्ष राज्य" स्थापनेची घोषणा केली होती. आपण जी काही प्रगती केली आहे ती माझ्या मते आपण कोणत्याही धर्माधारित राष्ट्र स्थापनेला थारा न दिल्यामुळं आहे ( हे माझं वैयक्तिक मत. ) जगातील बहुतेक प्रगत राष्ट्र ही धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत पायावर प्रगतिशील आहेत. पाकिस्तानने धर्माधिष्टीत राष्ट्र स्थापना केली, परिणाम जगासमोर आहेत.
भौगोलिकतेला महत्व होतंच. पूर्व पाकिस्तान आत्ताचं स्वतंत्र बांगलादेश हे उत्तम उदाहरण. भौगोलिक संलग्नता ही सर्वच दृष्ट्या उपयुक्त पडते. विशेषतः आंतरराष्ट्रीय सीमा आणि त्याच्या सौरक्षणाचे प्रश्न उद्भवतात तेंव्हा तर अतिशय जास्त. भौगोलिक संलग्नता नसल्यास त्यांना "एनक्लेव्हज" असं संबोधलं जातं. म्हणजे राष्ट्राची भूमी जी मुख्य भौगोलिक भूमीपासून अलग आहे आणि त्या भूमीच्या क्षेत्रफळाच्या सर्व बाजूस इतर देशांची भूमी आहे. अश्या काही एनक्लेव्हज बांग्लादेशात आपल्या (आणि त्यांच्या आपल्या पश्चिम बंगाल मध्ये ) होत्या, त्याचे प्रश्न आपण बांगलादेश सरकार बरोबर सामोपचाराने अलीकडेच सोडवले आहेत.

>>> “मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणात पाकिस्तान ला भूभाग वाटून दिला पाहिजे होता. “<<<
लोकसंख्या आणि भूभागाचे क्षेत्रफळ ह्याचे सरळ सरळ गुणोत्तर करणे तितके सहज सोपे नाही. देशा च्या वाट्याला आलेला सर्व भूभाग हा जनतेच्या राहण्यास भौगोलिक आणि हवामानाच्या दृष्टीनं योग्यच असेल असं नाही ( inhabitable land ), त्यामुळं हे जरी सोपं वाटलं तरी प्रत्येक्षात असं करणं हे तितकंस योग्य नव्हते. काश्मीर मध्ये १६००० फूट उंचीवर बराचसा बर्फाच्छादित भूभाग आहे जो मनुष्य वसाहतीस अजिबातच अनुकूल नाही. द्रास, कारगिल, लद्दाख, आणि तिकडे पाकिस्तानात काराकोरम च्या रांगांमध्ये मनुष्य वस्ती अत्यंत विरळ आहे. त्याचे कारण इथे हिवाळ्यात पारा उणे पंचिवस ते तीसच्या सुद्धा खाली जातो. आणि उन्हाळा वर्षातले फक्त चार महिनेच असतो. बऱ्याच ठिकाणी ग्लेशियर्सचं आहेत. जिथे राहणं शक्य नाही. सियाचीनच्या उंच गिरिशिखरावर सैन्य सुद्धा टिकवणे अवघड आहे. अगदी दोन्ही बाजूने. तिथे सर्वसामान्य जनमान तर अशक्यच.पर्वत राजी आणि त्यामधील दुर्गमता हा इथला प्रमुख प्रश्न आहे, त्यामुळे क्षेत्रफळानुसार आणि लोकसंख्ये नुसार वाटप हे शक्य नव्हते. "पॉप्युलेशन डेन्सिटी" चे गणित सोडवायला अधिकच क्लिष्ट आहे.

चारुदत्त,
लेख आणि प्रतिसाद आवडला.
===

> राजा, ठाकूर, वतनदार आणि जहागीरदार
कॉलनीज, सुझरेंटी, प्रोटेक्टोरेट, ट्रीब्यूटरी > यांच्यात काय फरक होता याबद्दल वेगळा लेख येउद्या.
===

> कारण जुनागढ आणि हैदराबादमध्ये चक्क भारतीय सैन्य शिरून त्यांनी रीतसर त्यांचे राज्य जिंकले. जुनागढ मध्ये तर चक्क त्यानंतर सार्वमत घेतले गेले. आणि भारतात विलीनीकरणाचा ९०% जनतेचा कौल आला.

राजा हरीसिंगांच्या विलीनीकरणावरती सह्या होऊन सुद्धा परत एकदा "हा प्रश्न सार्वमत/जनमत घेऊन सोडवू" हे युनो मध्ये सांगणं म्हणजे खरंतर एक राजकीय आत्महत्या होती.

प्लेबिसाईट मान्य केल्यावर खरंतर राजा हरीसिंगांच्या स्वाक्षरीस काहीही किंमत उरली नव्हती. पण इकडे जुनागढ ला मात्र प्लेबिसाईट म्हणजेच सार्वमत घेऊन आपण विलीनीकरण पूर्णत्वाला नेले होते. म्हणजे आपण एक प्रकारे न कळत कात्रीत अडकलो होतो. >
माझ्यामते भारताने नैतिकदृष्ट्या योग्य स्टँड घेतला होता.जर १९४९ मधेच सार्वमत घेतले गेले असते तर बरे झाले असते.

> इंग्रजांनी केलेल्या जनगणनेमध्ये १९४१ साली काश्मीर मध्ये ७७ % मुस्लिम आणि २० % हिंदू होते. उर्वरित ३ % हे शीख आणि बौद्ध धर्मीय होते. > आता काय स्थिती आहे? लोकसंख्या विभागणी कशी आहे POK मधे आणि IOK मधे?
आणि POK मधले जनजीवन, राहणीमान कसे आहे?

> १९५५ ला कलम ३५ A आणि ३७० कलम आलं, त्यानं प्रश्न सोडवण्या ऐवजी अधिकच क्लिष्ट केले. > कसे हे तुम्ही खाली प्रतिसादात लिहलेलंच आहे, फक्त त्याचा मूळ लेखात उल्लेख कराल का?

> एका पिढी कडूनकडून दुसऱ्या पिढीला राजकीय अस्थैर्याशिवाय काहीही देऊ न शकलेल्या तीन काश्मिरी पिढ्यांची दुर्दैवी अशी ही निराशाजनक कहाणी काश्मीरच्या जनतेवर दुसऱ्या तिसऱ्या कुणी लादलेली नसून ती परिस्थिती त्यांनी स्वतःवर ओढावून घेतलेली आहे. > पटले नाही पण ठिकय.
===

> जुनागढ, भोपाळ, हैद्राबादचा तिढाहि त्यावेळेला युनोत नेला असता तर आज काय परिस्थिती असती, हा प्रश्न हाइंडसाइट बायस मुळे उद्भवतो... > या चारही ठिकाणी सार्वमत घेतले असते तर बहुसंख्य जनता हिंदूच होती ना?

छान माहिती मिळत्येय. अजुन काही प्रश्न आहेत - बांग्ला देश निर्मिती झाल्यावर मग (बदले की भावना) ; पाकिस्तान च काश्मिर प्रेम उफाळून येऊ लागलं का ? सध्या आपण जो पाकव्याप्त काश्मिर म्हणतो तिथे शासनव्यवस्था काय आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा कश्मिर मधे पूरपरिस्थिती आली होती; तेव्हा आपल्या भागात भारतीय लष्कराने फार प्रभावशाली कामगिरी केली होती; तेव्हा POK मधे कोणी मदत केली होती का?

जर पकिस्तानव्यात काश्मीर कधीच भारतात नव्हता तर नकाशात पूर्ण काश्मीर भारताचा कसा दाखवला जातो? आजही
म्हणजे नकाशे बनले तेव्हा पूर्ण काश्मीर भारताचं असलच पाहिजे ना?

"जर पकिस्तानव्यात काश्मीर कधीच भारतात नव्हता तर नकाशात पूर्ण काश्मीर भारताचा कसा दाखवला जातो? " - आशुचँप, हा पूर्ण काश्मिर असलेला नकाशा मी फक्त भारतातच पाहिला आहे. बाहेर च्या देशात पीओके चा भुभाग भारतात दाखवत नाहीत हे माझं निरीक्षण आहे (सर्वसमावेशक अभ्यास वगैरे नाही).

"धार्मिक बहुसंख्येचा विषय हा थोडा वादग्रस्त आहे कारण भारताने "धर्मनिरपेक्ष राज्य" स्थापनेची घोषणा केली होती. " - गल्लत होतेय असं वाटतं. भारतानं १९५० साली स्विकारलेल्या घटनेनुसार भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. परंतू त्याचा संस्थानांविषयी भारत-पाकिस्तान-ब्रिटन ह्यांनी ठरवलेल्या धोरणाशी संबंध नाही. संस्थानांना भारत अथवा पाकिस्तानात सामील होणे किंवा स्वतंत्र रहाणे हे पर्याय होते. पण भारत / पाकिस्तानात सामील होताना प्रजेचं धार्मिक बहूसंख्य आणी भौगोलिक एकसंधता हे मुद्दे असणार होते. ह्या मुद्द्यांवरच हैद्राबाद हा हिंदू बहुसंख्य प्रजा असलेला आणी भारताशी भौगोलिक एकसंध असणारा भूभाग भारतानं पोलिस कारवाई-अंतर्गत भारतात सामील करून घेतला. त्याच न्यायानं काश्मिर पाकिस्तानात जावं असा मतप्रवाह होता.

पूर्ण काश्मिर असलेला नकाशा मी फक्त भारतातच पाहिला आहे. बाहेर च्या देशात पीओके चा भुभाग भारतात दाखवत नाहीत हे माझं निरीक्षण आहे

ओह हे माहिती नव्हते

हैदराबाद मध्ये धार्मिक परिस्थिती कशीही असली असती ते देशाच्या मध्येच असल्याने पाकिस्तान किंवा स्वतंत्र असा पर्यंत देणे शक्यच नव्हते कारण देशाच्या सुरक्षेच्या हिताने पोटात स्वतन्त्र राज्य किंवा मिनी पाकिस्तान हा पर्याय नव्हताच

तेव्हा घेतलेल्या निर्णयानुसार काश्मीर पाकिस्तानमध्ये जाणेच योग्य होते व त्याला अनुसरून नेहरू काश्मीरचा राजा कितीही पत्रे पाठवत राहिला तरी तिकडे दुर्लक्ष करून गप्प राहिले. शेख अब्दुल्लाला काश्मीरचा राजा बनण्याची इच्छा नसती तर काश्मीर शेवटी पाकिस्तानातच गेला असता. केवळ त्याच्या आग्रहाखातर नेहरूंनी काश्मीरवर हल्ला झाल्यावर सैन्य पाठवले, तेही थोडे उशिरा. काश्मीरचा प्रश्न विचित्रच होता. राजाला भारतात राहायचे होते, भारत म्हणत होता तुम्ही पाकिस्तानात जा व काश्मीर जनता स्वतंत्र राहायची स्वप्ने पहात होती. त्यांना भारत व पाकिस्तान दोघातही जायचे नव्हते. आजही ह्या परिस्थितीत फारसा बदल नाही. अर्धा काश्मीर पाकव्याप्त व उरलेला भारत व्याप्त. जनता आजही आजादीची स्वप्ने पाहतेय.

आम्ही काश्मीरला गेलो होतो, तेव्हा आमचा आझादीवाला काश्मिरी ड्राईव्हर म्हणलेला की लदाखी जनतेने सरकारला संगीतलेय म्हणे की उर्वरित काश्मीरला हवे तिकडे जाऊदे, स्वतंत्र व्हायचे तर स्वतंत्र व्हा, पाकिस्तानात जायचे तर तीकडे जा, आम्ही मात्र भारतातच राहणार. खखोदेजा.

टीप देऊन डिस्क्लेमर लिहिला ते बरे केलेत.
लेख कदाचित अन्य ठिकाणी प्रसिद्धीस तयार केला असावा. लांबी मुळे आपणास नक्की काय म्हणायचे आहे ते रेंगाळत गेल्याचे वाटले.
१९८९ नंतर या प्रकरणी पंडित लोकांची अस्मिता, घरदार सोडून जाण्याची परवड हा खरा प्रश्न आहे. माजोरीपणा करण्यात प्रवीण लोकांना शेफारून सोडल्यामुळे प्रश्नाचा विचका करत करत पिढी दर पिढी आपण नवनवीन समस्या निर्माण करत आहोत.
सर्व प्रकरण रेडक्लिफ यांनी गुरदासपुर जिल्हा पाकिस्तानच्या वाट्याला न दिल्याने व ती ही घोषणा १४ ऑगस्ट नंतर केल्याने झाली. जीना भडकले. गुरदासपुर जिल्हा भारतात राहिला म्हणून काश्मीर राज्य भारताला काँटिग्युअस झाले. तसे होणार नाही याची खात्री जीनांना वाटत होती. पण नेमके घडले उलटे. सर्व संस्थानिकांना विलिनीकरणाचे पत्र गेले तसे हरिसिंहांना पाठवले गेले नव्हते. पटेलांनी देखील मनात गुरदासपुरच्या मुस्लिम बाहुल्याचा विचार करून हरिसिंहांवर दडपण आणले नव्हते.
हे काश्मीर पंडित लोक धर्मांधतेच्या समस्यांना भिवून पळून जाऊन 'आम्हाला वाचायला या ' म्हणून वारंवार मागे लागत. हा इतिहास आहे. दिल्लीत शीशगंज गुरुद्वारा नवव्या गुरूंच्या रूपाने पळपुट्या काश्मिरी पंडितांसाठी बलिदान दिले म्हणून निर्माण झाले. गोविंद सिंहाला नंतर दर दर भटकत आपल्या गुरुडम ची व प्राणाची आहुती द्यायला लागली होती.
जर काश्मिरी मुसलमान (जे कालांतराने हिंदूंचे मुसलमान झाले) जीवावर उदार होऊन ७० वर्षे पाकिस्तानात जायचे स्वप्न पाहतात मग काश्मिरी हिंदूंनी अशा संघटना बनवून तिथल्या तिथे का नाही प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले?
मी (विंग कमांडर शशिकांत ओक) स्वतः सन 1977-1978मधे श्रीनगरच्या उपनगरात राहात असे तेंव्हा ज्या काश्मीर पंडितांच्या घरी (हवाई दलाचे क्वार्टर्स नसल्याने) राहात असे त्यांना हा प्रश्न विचारला तर ते गप्प बसून राहात. सैन्यात तुम्ही का भरती होत नाही? उत्तर नाही...
असो. सध्या इतकेच.

काश्मीर व काश्मिरी पंडितांबद्दल इतके उलटसुलट वाचायला मिळते की नक्की खरे काय हेच कळत नाही.

जुनागड, हैद्राबाद भौगोलिक कारण देऊन आपण बळाचा वापर करून भारतात सामावून घेतली तर त्याच न्यायाने काश्मीर पाकिस्तानात जाणे योग्यच होते. त्या दृष्टीने मला तरी नेहरूंची भूमिका पटते. नंतर युनोत जाणे टाळता आले असते. प्रश्न इथेच राहिला असते. Unoने दोन्ही देशांनी सैन्य मागे घेऊन मग सार्वमत घ्या हा निकाल दिला. पाकिस्तानने pok वर कब्जा केला होता पण भारतीय सैन्य काश्मिरात नव्हते त्यामुळे सैन्य मागे घ्यायची जबाबदारी पाकिस्तानची होती. त्यांनी सैन्य मागे घेतले नाही, त्यामुळे सार्वमत घेता आले नाही।

आज बदलत्या परिस्थितीत भारत काश्मीर सोडणार नाही. असे करणे देश संरक्षणाच्या दृष्टीने खूप धोक्याचे होईल कारण काश्मीर कधीही एकटा स्वतःच्या पायावर समर्थ उभा राहू शकत नाही. तो कोणाच्यातरी अधिपत्याखाली जाणार व भारताच्या कटकटी अजून वाढणार.

आणि काश्मीरमध्ये सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय वीरांची संख्या व त्यात असलेली भारतीयांची भावनिक गुंतवणूक लक्षात घेता असे निर्णय घेणारे सरकार परत सत्तेत येणे शक्य नाही Happy

हे सगळे पाहता काश्मीर लोकांनी हट्ट सोडून भारताला जवळ केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असे वाटते. कित्येक हिंदू व मुस्लिम काश्मिरी भारताच्या इतर राज्यात आरामात राहतात. त्यांना भारतात राहण्याचा त्रास नाही तर काश्मिरात राहणाऱ्यांना का त्रास असावा??

चांगला लेख आहे. एक दोन महत्त्वाचे पॉइण्ट्स आहेत. १९४७-१९५० मधे दोन्ही देशांच्या लष्करांत टॉपचे अधिकारी अनेक ब्रिटिशच होते. ब्रिटिश लोक पाकला धार्जिणे होते - इव्हन वैयक्तिक लेव्हलला ब्रिटिश अधिकार्‍यांना पाक लष्करातील लोक जास्त जवळचे वाटत. ब्रिटिशांना एकूणच भारतीय नेतृत्वावर भरवसा नव्हता (ब्रिटिश इण्टरेस्ट्स च्या दृष्टीने). जीनांपासून ते खालपर्यंत एकूणच ब्रिटिशांना हवे तसे करण्याची तयारी पाकने दाखवली हे फाळणीच्या अनेक कारणांपैकी एक होते.

तेव्हाच्या संस्थानिक लोकांना भारतीय नेत्यांपेक्षा माउण्टबॅटन किंवा 'ब्रिटिश राज' जवळचे वाटे - हे आज सांगताना थोडा हाइण्डसाइट बायस यात आहेच. आता आपण लोकशाही च्या दृष्टिकोनातून याचा विचार करतो. तेव्हाचा विचार केला तर ही पारंपारिक राजघराणी होती. त्यांच्या दृष्टीने ब्रिटिश राजा हा त्यांच्या लेव्हलचा होता. जरी श्रेष्ठ असला तरी. नेते लोक सामान्य जनतेतून आलेले होते. त्यामुळे त्यांची जवळीक साहजिकच होती. हे आता कितीही चूक वाटले तरी त्या संस्थानिकांच्या बाजूने विचार करता आपण समजू शकतो.

चांगला लेख. प्रतिसादातील स्पष्टीकरण ही तितकंच चांगलं आहे.
भावनेच्या पलीकडे जाऊन विचार करायलाअनेकांना या लेखाने उद्युक्त केलं असेल.
या विषयाला हात घातल्याबद्दल आणि विस्तृत लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.

फेरफटका यांच्या प्रतिसादातूनही मला एका गोष्टीबद्दल क्लॅरिटी आली.

'आज' लिहिणाऱ्या बोलणाऱ्या अनेकांना 'त्या काळात' काय योग्य ते आजच्या स्थितीवरून बोलावे वाटते. नुकतेच महाभयंकर असे दुसरे महायुद्ध संपले होते. नेहरूंनी प्रश्न युनोमध्ये नेण्याला शिव्या दिल्या जातात पण दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी लक्षात घेतली जात नाही.