नोबेल-संशोधन ( ७) : इंद्रिय प्रत्यारोपण

Submitted by कुमार१ on 17 March, 2019 - 23:07

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग ७

(भाग ६:
https://www.maayboli.com/node/69290)
**********

या लेखमालेत १९०१च्या पुरस्कारापासून सुरवात करून आपण २०व्या शतकाच्या अखेरच्या दशकात आलो आहोत. आता १९९०च्या पुरस्काराची माहिती घेऊ.

विजेते संशोधक : जोसेफ मरे आणि डोनाल थॉमस
देश : अमेरिका (दोघेही)

संशोधकांचा पेशा : मरे (सुघटन शल्यचिकित्सा), थॉमस (औषधवैद्यक)
संशोधन विषय : इंद्रिय व पेशींच्या प्रत्यारोपणाचे उपचार

आपल्या शरीरात अनेक महत्वाची इंद्रिये आहेत – जसे की हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड इत्यादी. अनेक प्रकारच्या आजारांत त्यांच्यावर विपरीत परिणाम होतो. परिणामी त्यांचे कार्य ढासळते. मग आपण विविध उपचार करून ते पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचदा त्याला यश येते. पण, काही दीर्घकालीन आजारांत मात्र एखाद्या इंद्रियाची प्रमाणाबाहेर हानी होते. मग ते नेहमीच्या उपचारांना दाद देत नाही. किंबहुना ते कामातून गेलेले असते. अशा परिस्थितीत संबंधित रुग्णाची मृत्यूकडे वाटचाल सुरु होते. अशा वेळेस एकच उपाय त्याला जिवंत ठेऊ शकतो. तो म्हणजे रोगट इंद्रिय काढून टाकून त्याच्याजागी दुसरे मानवी इंद्रिय बसवणे. या प्रक्रियेला आपण प्रत्यारोपण म्हणतो.
आज काही इंद्रिये आणि पेशींचे प्रत्यारोपण सहजगत्या केले जाते. परंतु एक शतकापूर्वी ही परिस्थिती नव्हती. सुरवातीस याची कल्पना वैद्यकविश्वात मांडली गेली. मग त्यावर खूप विचारविनिमय झाला. पुढे असंख्य प्रयोग झाले. त्यातून या प्रक्रियेतील अडीअडचणी समजून आल्या. अनेक संशोधकांच्या मेहनतीतून प्रत्यारोपणशास्त्र विकसित झाले. आज ते अनेक रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. या शास्त्राचा मूलभूत पाया जोसेफ मरे आणि डोनाल थॉमस यांच्या संशोधनामुळे घातला गेला. या सर्व इतिहासाचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.

अवयवदानाच्या प्रकारांचे मुख्यतः ३ गटांत वर्गीकरण करता येईल:

१. स्वतःच्या शरीरभागाचे स्वतःमध्येच रोपण करणे: यात त्वचेचा काही भाग आणि रक्तवाहिनीचा भाग ही उदा. आहेत.

२. एका व्यक्तीच्या अवयवाचे दुसऱ्या (तिऱ्हाईत) व्यक्तीत रोपण करणे. बहुतेक इंद्रिय-प्रत्यारोपणे या प्रकारची असतात.
जेव्हा एका व्यक्तीतील अवयव दुसऱ्यात रोपण करायचा असतो तेव्हा एक नैसर्गिक अडचण उपस्थित होते. दोन तिऱ्हाईत व्यक्तींची जनुकीय रचना भिन्न असते. त्यामुळे त्यांचे रक्तगट आणि पेशींतील इतर प्रथिनेही (antigens) भिन्न स्वरूपाची असतात. त्यामुळे एकाचा अवयव दुसऱ्याच्या शरीरात रोपित केल्यास तो परकीय समजला जातो. मग तो घेणाऱ्याच्या शरीरपेशी उद्दीपित होऊन त्या नव्या अवयवावर हल्ला चढवतात(immune reaction) . परिणामी त्याचा नाश होतो. या अडचणीवर मात करणे ही प्रत्यारोपणाच्या इतिहासातील पहिली पायरी होती.

३. एकाच्या अवयवाचे दुसऱ्या जनुकीयदृष्ट्या तंतोतंत असलेल्या व्यक्तीत रोपण करणे. म्हणजेच या दोन व्यक्ती एकमेकाची एकसमान (identical) जुळी भावंडे असतात.

वरील गटांपैकी दुसऱ्या गटातील प्रत्यारोपण हेच खरे वैद्यकातील आव्हान होते. त्यादृष्टीने १९व्या शतकापासून यावर विचार चालू झाला. शरीराच्या विविध अवयवांपैकी डोळ्याच्या बाहुलीच्या पारदर्शक पडद्यावर (Cornea) प्रथम लक्ष केंद्रित करण्यात आले. काही रोगांत हा पडदा अपारदर्शक होऊन अंधत्व येते. या पडद्याच्या प्रत्यारोपणाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकारात दाता आणि प्राप्तकर्ता यांचे कुठल्याही प्रकारे ‘matching’ करावे लागत नाही. याला एक कारण आहे. या पडद्यात रक्तवाहिन्या नसतात. त्यामुळे रक्तप्रवाहातून येणारे antigens तिथे पोचत नाहीत. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीचा पडदा दुसऱ्यात रोपित केल्यावर तिथे काहीच immune प्रतिक्रिया उमटत नाही. परिणामी तो पडदा सहज स्वीकारला जातो. या रोपणाचे अनेक प्रयोग होऊन अखेर १९०६मध्ये पहिले प्रत्यारोपण यशस्वी झाले.

आता पुढील टप्पा होता तो म्हणजे इंद्रियांच्या प्रत्यारोपणाचा, ज्यात रक्तप्रवाहाचा थेट संबध येतो. त्यात दोन मुद्दे येतात. पहिला म्हणजे रोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी होणे आणि दुसरा म्हणजे रोपित इंद्रिय स्वीकारले जाणे. पहिला भाग शल्यचिकित्सकाच्या कौशल्याने साध्य झाला. मात्र दुसरा भाग यशस्वी होण्यासाठी संशोधकांना अतोनात कष्ट करावे लागले.

दीर्घकालीन मूत्रपिंड विकार ही तशी प्राचीन समस्या आहे. शरीरात दोन मूत्रपिंडे असतात आणि वेळ आल्यास त्यापैकी एकावर आपण जगू शकतो. त्यामुळे प्रत्यारोपणाच्या इतिहासात मूत्रपिंडावर लक्ष केंद्रित होणे स्वाभाविक होते. १९०२ –१९५३ या कालवधीत त्याचे अनेक प्रयोग झाले. त्यामध्येमूत्रपिंड- दाता आणि प्राप्तकर्ता असे होते:
१. कुत्रा आणि कुत्रा
२. मृत माणूस आणि माकड
३. कुत्रा/माकड/बकरा आणि माणूस
४. मृत माणूस आणि जिवंत माणूस

पण हे सर्व प्रयत्न असफल ठरले कारण प्रत्यारोपित इंद्रिय हे निकामी होत असे. पुढे १९५३मध्ये एका १६ वर्षाच्या युवकाला त्याच्या आईने जिवंतपणे मूत्रपिंडदान केले. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली पण अल्पायुषी ठरली.

पण या घटनेतून अनेक शल्यविशारदांना स्फूर्ती मिळाली आणि ते यावर नेटाने काम करू लागले. अखेर १९५४मध्ये जोसेफ मरे यांना त्यात स्पृहणीय यश मिळाले. त्यांनी मूत्रपिंडाचे रोपणासाठी जुळ्या भावंडांची निवड केली. त्यातील एकाचे मूत्रपिंड काढून ते दुसऱ्या आजारी भावास बसवले गेले. या नव्या मूत्रपिंडाने ८ वर्षे काम केले आणि त्या व्यक्तीस तेवढी आयुष्यवाढ मिळाली. आतापर्यंतच्या इतिहासातील हे सर्वात मोठे यश होते. या प्रत्यारोपणात एक महत्वाचा मुद्दा होता. तो म्हणजे रुग्णास त्याच्या जुळ्याचेच इंद्रिय बसवल्याने त्याच्या शरीरात कोणतीही immune प्रतिक्रिया उमटायचा प्रश्न नव्हता. त्यामुळे या रोपणानंतर त्याला कुठलीच प्रतिक्रियारोधक औषधे (immunosuppresants) द्यावी लागली नाहीत.

यानंतरच्या टप्प्यात १९६०मध्ये संशोधकांना जुळ्या नसलेल्या पण सख्ख्या भावंडांदरम्यान प्रत्यारोपण यशस्वी करता आले. नंतर १९६२मध्ये यापुढील टप्पा यशस्वी झाला. त्यात दोन कुठलेच नाते नसलेल्या भिन्न व्यक्तींदरम्यान ही क्रिया सफल झाली. अर्थात यावेळेस रुग्णास रोपाणानंतर प्रतिक्रियारोधक औषधे द्यावी लागली.

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी जिवंत दाता मिळवणे शक्य असते. कारण प्रत्येकाला २ मूत्रपिंडे असतात आणि त्यापैकी एकावरही जगता येते. परंतु हृदय प्रत्यारोपणाचा विचार करता त्यासाठी ‘मेंदू-मृत’ दाताच मिळवणे आवश्यक होते. आता त्या दिशेने वैद्यकाची वाटचाल सुरु झाली. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती नेमून तिने ‘मेंदू-मृत’ व्यक्तीची व्याख्या निश्चित केली. यामुळे आता अशा व्यक्तीतील विविध अवयव प्रत्यारोपित करता येऊ लागले. आजच्या घडीला हे शास्त्र खूप विकसित झाले असून जगभरात अनेक इंद्रियांची प्रत्यारोपणे नित्यनेमाने होत आहेत. अवयवदान चळवळीचा प्रसार आता चांगला होत आहे. कित्येक अपघाती मृत्यूंमध्ये संबंधित नातेवाईक या दानासाठी पुढाकार घेताना दिसतात.

या अमूल्य जीवनदायी शास्त्राचा पाया जोसेफ मरे यांच्या पथदर्शक संशोधनाने घातला गेला. त्यामुळेच या नोबेलच्या पुरस्काराचे ते हक्कदार ठरले. १९५४ मध्ये केलेल्या त्यांच्या कामाचा गौरव व्हायला १९९० उजाडले हे मात्र खरे.
***************************

१९९०च्या पुरस्काराचे दुसरे हक्कदार होते डोनाल थॉमस. त्यांचेही कार्य प्रत्यारोपणासंबंधीच आहे पण हे रोपण अवयवाचे नसून विशिष्ट पेशींचे आहे. आपल्या रक्तपेशी ह्या मुख्यत्वे हाडांतील मज्जेत (bone marrow) तयार होतात. या निर्मितीप्रक्रियेत काही वेळेस गंभीर बिघाड होतो आणि त्यातून कर्करोग उद्भवतो. त्या आजाराला Leukemia म्हणतात. त्याकाळी या आजारावर प्रभावी उपचार करणे हे वैद्यकापुढचे एक आव्हान होते. २०व्या शतकाच्या पूर्वार्धात त्यासाठी औषधोपचार(chemotherapy) आणि क्ष-किरणांचा मारा करण्याचे उपचार विकसित झाले होते. परंतु तरीसुद्धा अशा रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण बऱ्यापैकी होते.

त्यामुळे या आजारावर अन्य काही उपचार करता येतील का याचा सखोल विचार संशोधक करू लागले. रुग्णाच्या शरीरातील रोगट पेशी नष्ट करणे ही उपचाराची एक बाजू होती आणि आतापर्यंत फक्त त्यावरच लक्ष केंद्रित झालेले होते. काही मार्गाने रुग्णाच्या शरीरातच नव्या निरोगी रक्तपेशी निर्माण करता येतील का या दिशेने आता डॉ. थॉमस विचार करू लागले. त्यातून ‘हाडमज्जा प्रत्यारोपण’ ही कल्पना विकसित झाली. त्यात प्रथम रुग्णाच्या हाडमज्जापेशींचा औषधे आणि क्ष-किरण वापरून नाश केला जातो. त्यानंतर निरोगी व्यक्तीतील हाडमज्जेच्या अंशाचे प्रत्यारोपण रुग्णात केले जाते. असा प्रथम यशस्वी प्रयोग थॉमस यांनी १९५६मध्ये केला. त्यासाठी त्यांनी रुग्ण व दाता ही एकसमान जुळ्या भावंडांची जोडी निवडली होती. त्यापैकी एकास दुर्धर leukemia होता तर दुसरा निरोगी होता. हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला.

आता पुढची पायरी होती ती म्हणजे जुळ्या नसलेल्या पण भावंडे असलेल्या व्यक्तीदरम्यान हा प्रयोग करणे. आता त्या दिशेने थॉमस प्रयत्न करू लागले. त्यासाठी दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले गेले. पहिले म्हणजे दाता व रुग्णाच्या शरीरपेशी एकमेकाशी किती ‘जुळतात’ (matching) याचा अभ्यास करणे. दुसरे म्हणजे अशा प्रत्यारोपणानंतर रुग्णाच्या शरीराने नव्या पेशी नाकारू नयेत म्हणून उपाय करणे. थॉमसनी प्रयत्नांती हे साध्य केले. पेशींची ‘जुळणी’ तपासण्यासाठी त्यांनी काही चाचण्या विकसित केल्या. नंतर पेशीरोपण रूग्णाकडून यशस्वीपणे स्वीकारले जावे यासाठी methotrexate या प्रतिक्रियारोधक औषधाचा वापर त्यांनी केला. हे साध्य झाल्यामुळेच १९६८मध्ये त्यांना दोन सामान्य भावंडांदरम्यान असा प्रयोग यशस्वी करता आला

थॉमस यांच्या या पथदर्शक कार्यामुळे रक्तकर्करोगाच्या अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले. पुढे या शास्त्राचा खूप विकास झाला. आता अशा प्रत्यारोपणासाठी मूळ रक्तपेशी आपल्या शिरेतील रक्तातूनही मिळवता येतात. ही पद्धत दात्यासाठी सुखावह आहे. त्यामुळे १९९०चे नोबेल देताना इंद्रिय प्रत्यारोपणाबरोबरच याही वैशिष्ट्यपूर्ण प्रत्यारोपणाची निवड ही यथोचित होती.

इंद्रिय प्रत्यारोपणाशी तुलना करता या प्रकारच्या प्रत्यारोपणासाठी दाता निवडताना तशा मर्यादा आहेत. इथे शक्यतो अगदी जवळच्या नात्यातील दाता रुग्णाशी ‘जुळू’ शकतो. थॉमस यांच्या नंतर अनेक संशोधकांनी हे शास्त्र मेहनतीने अधिक विकसित केले. यातील दात्याची अडचण लक्षात घेऊन रक्ताचा एक नवा स्त्रोत शोधला गेला. तो म्हणजे एखादे मूल जन्मतःच त्याच्या नाळेतील रक्त काढून ते साठवून ठेवले जाते. या रक्तातील ‘मूळ’पेशी पुढे अशा प्रत्यारोपणासाठी वापरता येतात. या रक्ताची रुग्णाशी ‘जुळणी’ तुलनेने सोपी असते.
आज या प्रत्यारोपणाचा उपयोग रक्तकर्करोगाशिवाय इतरही काही रक्ताच्या आजारांसाठी केला जातो. उदा.:

१. Aplastic anemia
२. सिकलसेलचा आजार
३. थालसिमिया

१९९०चे नोबेल प्राप्त केलेल्या या संशोधक द्वयीचे हे कार्य वैद्यकाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीण्याजोगे आहे हे निःसंशय.
*********************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला धागा व सकारात्मक प्रतिसाद.
मी मृत्युपश्चात नेत्रदान व अवयवदान केले आहेत.
मला प्लाझ्मा/बोन marrow दान करण्यात सुद्धा रस आहे. घरातल्या एका तरुण मेंबरने सांगितले की गोंदवून घेतले की रक्तदान/अवयवदान करता येत नाही , हे खरं आहे का ? माझा विचार होता पण दान करता येत नसेल तर करवून घेणार नाही.

अस्मिता
मृत्युपश्चात हा शब्द वाक्याच्या सुरुवातीस घेतल्यास बरे होईल Happy

मानवी हृदयाच्या प्रत्यारोपणासाठी दाते गरजेपेक्षा कमीच पडतात. त्यादृष्टीने अन्य प्राण्यांची हृदये जनुकीय बदल करून माणसात प्रत्यारोपण करण्याचे प्रयोग गेले काही वर्षे चालू आहेत.

नुकतेच अशा एका प्रयोगाला अमेरिकेत यश आलेले आहे. डुकराच्या हृदयात जनुकीय बदल करून ते एका रुग्णात प्रत्यारोपित करण्यात आले. आता या रुग्णाचे निरीक्षण करीत राहावे लागेल.
जर असे हृदय मानवी देहाने चांगल्यापैकी स्वीकारले तर तो एक चांगला पर्याय उपलब्ध होईल.

https://www.umms.org/ummc/news/2022/first-successful-transplant-of-porci...

डोळ्याच्या काही गंभीर आजारांमध्ये दृष्टीसंवेदना असलेला पडदा (retina) निकामी होतो. परिणामी संबंधित व्यक्तीची दृष्टी खूप कमजोर होते. अशा काही रुग्णांसाठी कृत्रिम रेटिनाचे प्रत्यारोपण हे नवे संशोधन प्रगतिपथावर आहे.

https://www.chu-lyon.fr/dmla-une-patiente-recoit-une-retine-artificielle...
इथल्या बातमीनुसार संबंधित रुग्ण या प्रकारचे प्रत्यारोपण स्वीकारणारी जगातील पाचवी रुग्ण आहे.

संशोधक डॉक्टरांचे अभिनंदन आणि भावी प्रगतीसाठी शुभेच्छा !

सोनाली
त्या पानावर इंग्लिश भाषांतर पर्यायावर टिचकी मारून बघा
मी तसे करूनच दुवा दिला होता परंतु दुवा मूळच्याच भाषेत घेऊन जातो

कृत्रिम कॉर्नियाचे प्रत्यारोपण : नवे उत्साहवर्धक संशोधन

कॉर्नियातील दोषामुळे अंधत्व येते. अशा प्रकारचे सुमारे 1.30 कोटी लोक जगभरात मानवी कॉर्निया मिळण्याच्या प्रतीक्षा यादीत आहेत.
परंतु सध्याच्या मानवी नेत्रदानातून ७० गरजूंपैकी फक्त एकाची गरज भागते.

हा प्रश्न सोडवण्यासाठी वैज्ञानिकांनी कृत्रिम कॉर्निया बनवण्याचे अन्य प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. त्यापैकी एका प्रयोगात डुकराच्या त्वचेपासून एक प्रथिन वेगळे काढून त्यापासून कॉर्निया तायार करण्यात आला. त्याचे प्रत्यारोपण भारत व इराणमधील मोजक्या रुग्णांवर करण्यात आले. ते यशस्वी झालेले आहे. यातून पुढील संशोधनास गती मिळेल.
सर्व संबंधित वैज्ञानिक व डॉक्टरांचे अभिनंदन !

https://www.nature.com/articles/s41587-022-01408-w

रेटिना आणि कॉर्नियाच्या बातम्या चांगल्या आहेत.
आम्हांला बारावीला एक कविता होती. त्या कवींची दृष्टी अचानक detachment of retina मुळे गेली होती.
माझ्या वडिलांच्या दोन्ही डोळ्यांत प्रत्यारोपित कॉर्निया आहेत.
त्यांना तसे लवकर मिळाले होते. लोकांना नेत्रदानाला उद्युक्त करणं कृत्रिम कॉर्नियापेक्षा स्वस्त आणि सोयीचं असेल ना?

लोकांना नेत्रदानाला उद्युक्त करणं कृत्रिम कॉर्नियापेक्षा स्वस्त आणि सोयीचं
>> होय, नक्कीच.
नैसर्गिक सर्वोत्तम .
पण दाते खूप कमी पडत असल्याने हे संशोधन.

अजून एक मुद्दा आहे.
काही रुग्णांत रसायनांमुळे डोळे भाजल्यास किंवा काही autoimmune आजारांमुळे मूळचा कोर्निया खराब झालेला असतो. अशांमध्ये जर मानवी कोर्नियाचे प्रत्यारोपण केले तर तो शरीराकडून नाकारला जाण्याची शक्यता असते.

अशांच्या बाबतीतही या कृत्रिम कोर्निया चा विचार करता येतो.

गेल्या दोन वर्षात कोविडमुळे अवयवदान थंडावले होते. आता या प्रक्रियेने पुन्हा वेग घेतलेला आहे.

पुण्यातील ही एक बातमी:
38 मृतमेंदू रुग्णांच्या नातेवाईकांकडून अवयवदानाला परवानगी मिळाली. त्यातून अन्य 100 रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

(छापील सकाळ : 5 नोव्हेंबर, 2022)

एक अत्यंत वाईट बातमी लिहिताना दुःख होत आहे.
विरार येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनीत दंडवते यांचा मुलगा साकेत याचे मोटरसायकल अपघातात निधन झाले. त्यानंतर कुटुंबाने स्वतःचे दुःख मनात ठेवून साकेतच्या विविध अवयवांचे गरजूंना दान केलेले आहे.

dandawate.jpg

त्यातून 11 गरजूंना असा लाभ झालेला आहे:
३ : यकृत, २ मूत्रपिंडे, २ डोळे,
२ मुलांना हृदयाच्या झडपा आणि
अन्य २ : त्वचा.
अवयवदानाच्या या श्रेष्ठतम दानाबद्दल संबंधित कुटुंबाचे कौतुक.
साकेतला आदरांजली !

https://www.lokmat.com/mumbai/saket-gave-hope-to-11-people-organ-donatio...

सुरतेत ५ दिवसाच्या बाळाचे अवयवदान
भारतातील पहिली आणि जगातील दुसरी घटना
3 मुलांना फायदा.
https://www.lokmat.com/national/five-day-old-newbor-gave-new-life-to-4-c...

https://www.ndtv.com/india-news/5-day-old-brain-dead-infants-organs-give....

अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सर रॉय कान यांचे नुकतेच निधन झाले. २०१२ मध्ये त्यांना वैदयकातील ‘नोबेल’ खालोखाल समजला जाणारा लास्कर पुरस्कार(विभागून) देण्यात आला होता.

अवयव प्रत्यारोपणानंतर शरीराची अतिरिक्त प्रतिकारशक्ती रोखणारी औषधे देणे खूप महत्त्वाचे असते. त्या संदर्भातही त्यांनी काही मूलभूत संशोधन केलेले आहे.
आदरांजली !

https://www.cam.ac.uk/news/pioneering-transplant-surgeon-sir-roy-calne-d...

आदरांजली. मागच्या आठवड्यात माझे क्रिए टिनाइन हाय म्हणजे १.८ ला गेले म्हणून ऑन्को ने किडनी स्पेशालिस्ट ला भेट असे सांगितले होते. तदनुसार मी पहिले डॉ हासे ह्यांची ज्युपिटर स्पेशालिटी क्लिनिक मध्ये बुक केली. साडेपाचाची अपॉइन्ट मेंट तर मी पाच ला तिथे होते पण ते बंद पडले आहे व तुमची अपॉइन्ट मेंट ठाण्यातील ज्युपिटर ओपि डीत आहे असे कळले. मग धावत तिथे आटोने.

१.८ निदानानंतर परत १.४ परेन्त क्रिए . घसरले होते. ज्यु पिटर ठाणे एकदम हायटेक हॉस्पिटल आहे. ग्राउंड फ्लोअर ला हासे कुठे भेटतील विचारले तर साडीवा ली सुंदरी फर्सट फ्लोअर ऑर्गन डिपा. म्हटली मग तिथे गेले. तर ते ऑर्गन ट्रान्सप्लांट डिपा आहे. मनात एकदम हे भगवान झाले. पण माझे कन्सल्ट एकदम नीट पार पडले. ऑब्झर्वेशन खाली आहे व सर्व औषधे चालू ठेवा काही नवे दिले नाही.

तर ह्यांच्याच शेजारी लिव्हर ट्रान्सप्लांट वाले स्पेशालिस्त पण बसतात. किडनी व लिव्हर ट्रान्सप्लांट पण मेजर लाइफ सेविन्ग प्रोसीजर्स आहेत.
ह्याची नव्याने जाणीव झाली. जय हो.

आठ वर्षाच्या मुलाचे अवयवदान केल्यानंतर मृत्युपश्चात त्याचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
https://www.indiatoday.in/cities/bhubaneswar/story/odisha-8-year-old-org...

अभिवादन व आदरांजली !

मृत्युपश्चात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार >>>. महाराष्ट्रामध्ये पण मुख्यमंत्र्यांनी काहीतरी आदेश दिल्याचे वाचनात आले होते. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कि शासकीय अधिकाऱ्यांना अंत्यसंस्काराला उपस्थित राहायचे आदेश दिले आहेत. अगदी गेल्या १०-१२ दिवसात वाचनात आले होते.

भारतात होणाऱ्या एकूण अवयव प्रत्यारोपणापैकी सुमारे 65% प्रत्यारोपण मूत्रपिंडांचे असते. या उलट फुफ्फुस प्रत्यारोपणाचे प्रमाण जेमतेम 1.5% आहे. फुफ्फुसांच्या बाबतीत प्रत्यारोपण ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि प्रचंड खर्चिक आहे.

मराठी अभिनेते विद्याधर जोशी यांच्यावर फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुमारे वर्षापूर्वी झालेली असून त्या संदर्भातील त्यांची मुलाखत इथे पाहता येईल :
https://www.youtube.com/watch?v=XRbprwgjEpI

त्यांनी दाता मिळण्यासाठी प्रतीक्षा यादीत नाव नोंदवले होते.
दरम्यान त्यांना ECMO या यंत्रणेवर (अर्थात कृत्रिम फुफ्फुस) ठेवावे लागले. असे झाले की अत्यंत गरजू ठरले जाऊन प्रतीक्षा यादीतील क्रमांक एकदम वर नेण्यात येतो.
त्याचा त्यांना फायदा झाला.

>>>विद्याधर जोशी मुलाखत >>>>
पाहिली. त्यांच्या जिद्दीला सलाम. या ऑपरेशनमध्ये एकच फुफ्फुस बसवतात की दोन्ही?

या ऑपरेशनमध्ये एकच फुफ्फुस बसवतात की दोन्ही?
>>
ते आजारावर अवलंबून असते. काही आजारांमध्ये एक फुफ्फुस तर अन्य काही आजारांमध्ये दोन्ही बसवतात. श्वसनमार्गातील दीर्घकालीन अडथळ्याच्या आजारामध्ये (COPD) रुग्णाच्या वयानुसार निर्णय घेतला जातो - तरुण असल्यास दोन आणि वयस्कर असल्यास एक फुफ्फुस.

Pages