चीन -२

Submitted by प्राचीन on 14 March, 2019 - 12:38

बीजिंग लू अर्थात सब ले लूँ
त्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे भटकंतीपेक्षा खरेदी करण्याचा पर्याय निवडला. मुद्दामच गाडीने न जाता १९७ क्रमांकाच्या बसने गेलो. पुढून चढायचं असतं बसमध्ये. दारातच एक स्क्रीन व पेटी असते.कार्ड असल्यास स्क्रीनवर दाखवायचं नि नसेल तर २ आर एम बी पेटीत टाकायचे. चालक महाशय तिथेच असतात.त्यामुळे संभावितपणाचा विचारही करू नये. बसच्या मागच्या भागात आपल्या इथल्यासारख्या सीटस्, दाराजवळ कचरा टाकण्यासाठी सोय (पेटी) नि त्यापुढील भागात समोरासोर सीटस्. दर मिनिटाला बसेस् येत असतात. त्यामुळे गर्दी असली तरी दुथडी भरून वाहण्याइतकी नाही. कंडक्टर नसतो. पतिदेवांना जरा माहिती असल्याने मला गंतव्यस्थान कळले; नाहीतर “दादा,जरा स्टॉप आला की सांगा“ हा प्रकार इथे शक्य नव्हता.
बीजिंग लू (हे सर्व उच्चार स्थानिक हिंदी मैत्रिणीकडून उचललेले) म्हणजे आपल्या फॅशन स्ट्रीटसारखा भाग- मात्र भव्य आवृत्ती ! इथे वाहनांना मज्जाव त्यामुळे चालण्याची मज्जा घेत खरेदी करायची. मिंग राजवटीतील शेकडो वर्षे जुने रस्ते इथे जतन करून ठेवलेले आहेत. त्यांना धक्का न लावता सभोवती दुकानांची उभारणी केलेली आहे. लहान-मोठी, खास नाममुद्रा असलेली व साधीदेखील ,सर्व प्रकारच्या वस्तूंनी भरलेली, अं हं ,लगडलेली दुकाने.. विक्रेत्या कन्यकांचा एक अद्भुत प्रकार बघायला मिळाला ! काहीजणी दुकानापुढे उभ्या राहून टाळ्या वाजवून लक्ष वेधून घेत होत्या . खाद्यपदार्थाची दुकानेही आहेत. एक गंमत म्हणजे एका सोनाराच्या दुकानात शोकेसमध्ये सोन्याने मढलेल्या खर्‍याखुर्‍या सुंदरी उभ्या केल्या होत्या ! शिवाय सोन्याच्या छोट्या पायर्‍यादेखील कलाकुसर करून ग्राहकांना खुणावत होत्या !
चकाकतं ते सोनं नसतं यावर दृढ विश्वास असल्यामुळे (?) आम्ही अगदी उदासीनपणे तिथून पुढे गेलो. घासाघीस वगैरे आवश्यक पायर्‍या ओलांडून काही खरेदीही केली. परंतु अधिक रमले ती मिनिसो, बलेनो या नाममुद्रांकित दुकानांमध्ये. मला जी बार्गेनिंग ची हौस आहे, त्याचा फील यावा, याची पतिदेवांनी जरूर तेवढी मुभा दिली. इथे आपण घासाघीस केल्यावर सेल्समन फार गंमतीशीर ऑ आऽऽ असा नाराजीचा अनुनासिक स्वर काढतात, याचा सार्वत्रिक अनुभव आला. जपानी नाममुद्रा मिनिसो येथील खरेदीचा अनुभव विशेष आवडला. मनसोक्त खरेदी, तीही वाजवी किंमतीत असा तो अनुभव. पतिदेवांनी माझी प्रथम चीनवारी असल्याने जरी मुक्तद्वार दिले होते, तरी मी एक सजग (?) व्यक्ती असल्याने मुक्तपणा एंजॉय केला पण त्यास बेबंदपणाच्या मार्गावर नेले नाही !(हा:हा:) .
सर्वाधिक खरेदी अर्थातच चॉकोलेटस् ची. अन्नपदार्थांची नावे व माहिती चिनी (मॅँडरिन)मध्ये.फक्त अंक तेवढे वाचता येत,त्यामुळे खरेदी करताना विचार करावा लागत होता. उदा: शेंगदाणे घ्यायला जावं,तर खाली बारीक इंग्रजी शब्द नजरेस पडले, बीफ फ्लेवर्ड, की झटकन पाकीट खाली ठेवणे ! फळे मात्र तर्‍हेतर्‍हेची नि गोड,रसाळ अशी. भाज्या अगडबंब आकाराच्या. दुधाचे,पावाचे अनंत प्रकार.एका विभागात अंडी होती. मी कुतूहलाने पाहिले तर काळी,भुरी असेही नमुने होते, जे मला पहिल्यांदाच दिसले!
चिनी नवे वर्ष येऊ घातल्याने सर्वत्र लाल रंगाचे स्टीकर्स, उभी तोरणे,कंदील,घंटा, शोभेच्या वस्तू इ. नी बाजार नुसता सजला होता. नववर्षानिमित्त केक्स वगैरे (तिळाची मिठाई हा खास पदार्थ) पाहून, निदान सणासुदीला गोड हवं ह्या माझ्या खास भारतीय मानिसकतेला दिलासा मिळाला. कसलीही चव घेण्याच्या मात्र फंदात पडलो नाही (प्रतिगामी असा शिक्का बसला तरी चालवून घेऊ म्हणावं) भाषेचा प्रश्न असल्याने मूकबधिर असल्याप्रमाणे हातवारे करून, मोबाईलवर ट्रान्स्लेटरच्या मदतीने संवाद साधावा लागे. मग तो खरेदी करताना असो की ट़ॅक्सी करताना.

काँक्रिटमधील निसर्गधून – बैयून

दुसर्‍या दिवशी पाऊस थांबून थोडी उघडीप आल्याने आम्ही बैयून पर्वतावर स्वारी करण्याचा बेत आखला. प्रचंड थंडीला तोंड देण्याची जय्यत तयारी करून निघालो. वरती जाण्यासाठी विस्तीर्ण, रेखीव बगीचा व त्यामधून जाणारी फरसबंद वाट. पण आम्ही एक वेगळा अनुभव घ्यावा, म्हणून ट्रॉलीचा पर्याय स्वीकारला. नुकतेच मी व माझा लेक रायगडावर ट्रॉलीने जाण्याचा थरारक (3 तास प्रतीक्षा) अनुभव घेतलेला होता. त्यामुळे जरा निरुत्साही होतो. पण इथे सतत ये–जा करणार्‍या अनेक ट्रॉलीज्.. स्वयंचलित दरवाजे, सिटा भरेपर्यंत थांबा हा प्रकार नाही आणि भाडेही तुलनेन कमी. जसजसे वर जाऊ तसतसे ग्वांग झौ (चौ) शहर आख्खे नजरेच्या टप्प्यात येऊ लागले. संपूर्ण बैयून पर्वत हा हिरवाईचे आवरण घेऊन होता, तरी मला त्या निसर्गामध्ये तजेलदारपणा आढळला नाही. फुलांच्या रचनांमध्ये सौंदर्यदृष्टी दिसत होती, हे मात्र खरे. पर्वताचा विस्तार इतका आहे, की तेथे फिरण्यासाठी मिनिकारची सोय केलेली आहे. सर्वत्र स्वच्छता, टापटीप,शांतता, प्राथमिक सोयीसुविधा यांची दखल घेत फिरू लागलो. येथील अभयारण्यात मोर,चिमणी,बदक,पोपट हे पक्षी दिसले. मोर फार म्हणजे फारच धीट होते.त्यांनी आमच्यावर चालच केली म्हणाना ! मात्र चिनी पक्षी हे सामान्यपणे पक्षी जसे दिसतात, तसेच दिसले (उगीचच वाटत होतं की चिन्यांसारखे दिसत असतील का ) थंड वातावरणाला चवदार कॉफीची ऊब दिली. चक्क चार कबूतरेही बागडताना दिसली. सौंदर्य जपण्याची चिनी हौस कोणत्या थराला जाऊ शकते, याचे प्रत्यंतर तेथील स्वच्छतागृहामध्ये आले. स्वच्छता तर अध्याह्रतच होती, परंतु आश्चर्य वाटले ते तेथील पुष्परचना व विविध आकारांतील बिलोरी आरसे पाहून!
प्राचीन वा ऐतिहासिक पुतळे असलेला एक भाग होता. नावे तर वाचता येणे शक्य नव्हते, पण त्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या, एवढे लक्षात आले. एक अजब दृश्यही बघायला मिळाले. धर्मगुरू असतील अशा दोन पुतळ्यांसमोर दोन चिनी मध्यमवयीन स्त्रिया हाती तलवार, पंखे घेऊन संथ लयीत तल्लीनतेने नृत्यसाधना करीत होत्या. फारच छान दृश्य होतं ते !
भरपूर पायपीट झाल्यावर पायथा गाठला. तर तिथले फेरीवाले व स्टॉल्स बघून मला अगदी घरच्यासारखं वाटलं! कसलातरी रानमेवा वगैरे दिसेल या अपेक्षेने तिथे गेलो, आणि हाय रे ड्रॅगन (देवा ! प्रमाणे घ्यावे) !
मेवा जरूर होता, पण तो रान होता, खान करण्याइतपत नव्हता ! (बसमधून जाताना) भारतात टांगलेले बोकड (मांस) बघण्याचा मला सराव होता; पण इथे तर यच्चयावत् प्राणिसृष्टी – जी कधीकाळी सचेतन होती- तिला झोपाळ्यावाचून झुलायला ठेवलं होतं! नाक दाबणे शक्य होते पण डोळे हे जुल्मी गडे कसे झाकणार ? तरीही स्थानिक व्यापार्‍यांना उत्तेजन मिळावे या हेतूने एक कांद्याची माळ घेऊन तेथून सटकलो. डोळे निवले असले तरी पोट भरले नव्हते. त्यामुळे बॉम्बे ग्रिल या हॉटेलमध्ये पुढचा टप्पा. धुरी या कुडाळकडील माणसाचे हे हॉटेल. छान सजावट आणि उत्कृष्ट अन्न. कुल्फी व समोसा ह्या सिग्नेचर डिशेस्. गेली तेरा वर्षे येथेच वास्तव्य असल्यामुळे धुरी अस्खलितपणे चिनी भाषेत बोलतात. मराठी बोलायला मिळाल्याचा त्यांनाही आनंद झालेला दिसला.
आणि आता एक चायनीज नमुना
ज्यो- ज्यो

रीगल कोर्टच्या आवारात हिचं एक छोटंसं दुकान आहे. खरं तर चिमुकलंच. तिथे भारतीय किराणा, भाज्या ,हल्दीरामची मिठाई आणि हो, मला इतरत्र न मिळालेलं - मॅगीसुद्धा मिळतं. फक्त मेख अशी आहे, की किमान पाच ते दहापट किंमतीमध्ये! त्यातही ज्यो-ज्यो,तिचा मुलगा व भाऊ तिघेही मूँहमाँगे दाममध्ये जिन्नस विकतात. फरक एवढाच की त्यांच्या मूँह ने मागितलेल्या भावाने! म्हणजे तिघेही एकाच वस्तूचे वेगवेगळे भाव सांगतात. इथल्या भारतीयांसमोर अन्य पर्याय नसल्याने बहुतेक हा व्यवहार सुरळीतपणे चालतो. इथे ज्यो- ज्यो वांछील तो तो भाव!

जाता जाता -

इथे मोठ्या प्रमाणात सुधारणेचा वारू दौडताना दिसला, हे खरेच. अगदी घरापासून ते विमानतळापर्यंत.. घरातील मला जाणवलेला वेगळेपणा म्हणजे झाडू ब्रशसारखा नि सूप लांब दांड्याचं. कपडे हँगरवर वाळवणे अधिक प्रचलित. मायक्रोवरही चायनिज अक्षरे असल्याने अंदाजपंचे वापरता येऊ लागला. दुधाला वेगळी चव, टी.व्ही. हा इंटरनेटच्या कृपेवर, हवामान सारखे बदलते.इ.. एकदा मी ब्रेड घेऊन यायला निघाले, पिशवी शोधत होते. तेव्हा चिरंजिवांनी आश्वस्त केलं, इथे कुत्रे नाहीत,हातांत पाव बघून मागे लागायला! खरंच की! इथे भटकी जनावरे दिसली नाहीत; भलेमोठे रस्ते,मॉल्स,फ्लायओवर्स इ. अनेक पाऊलखुणांतून इथल्या आधुनिकतेची, विकासाची वाट दृगोच्चर होत जाते. सामाजिकशिस्त, गतिमान जीवन यांचे कौतुक वाटते. अर्थात हे काही चीनचे प्रातिनिधिक चित्र नव्हे. हे माझ्यापुरते!
आंतरराष्ट्रीय प्रवास माणसाला समृद्ध करतो, असे म्हणतात. माझ्या ह्या प्रवासाने व चीनमधील अल्पकालीन वास्तव्याने अनुभवांची श्रीमंती तर दिलीच, परंतु जाणिवादेखील विस्तारल्या हे तितकेच खरे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख वर्णन. आवडले.
मात्र चिनी पक्षी हे सामान्यपणे पक्षी जसे दिसतात, तसेच दिसले (उगीचच वाटत होतं की चिन्यांसारखे दिसत असतील का ) >>> Lol Lol