तिची आठवण कुठे रिकामी फिरते आहे

Submitted by माउ on 11 March, 2019 - 21:17

उजाड गावी रिते ऊन पाझरते आहे
तिची आठवण कुठे रिकामी फिरते आहे

भग्न नभाच्या काठावरती बसू पाहते
उगी पाखरू सांजेला सावरते आहे

तरंग कुठले मनावरी येऊन उजळले
तळ्यातला अंधार कुणी आवरते आहे

पुन्हा असावा दु:खाचा डोळा मिटलेला
पापणीवरी स्वप्न जुने थरथरते आहे

जीव जडावा तुझ्यापरी या रितेपणावर
मनात आता एकच इच्छा उरते आहे

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults