खानदेशातील जलसंस्कृती

Submitted by भुजंग on 10 March, 2019 - 08:24

खानदेशातील जलसंस्कृती
असिक, ऋषीक, स्कंधदेश, खांडवदेश, कान्हदेश, दानदेश, डांगदेश, तानदेश अशी कधीकाळी विविध नावे असलेला आणि ज्याचा विस्तार उत्तरेला सातपुडा, दक्षिणेस सातमाळा, चांदोर, अजिंठा डोंगररांगांपर्यंत, पूर्वेला हाती टेकड्या तर पश्चिमेस सह्याद्री डोंगररांगांपर्यंत असलेला हा खानदेश. वाघुर काठच्या अजिंठ्याच्या रॉबर्ट – पारो व डोंगरी-तित्तूर काठच्या चाळीसगावच्या केकी मूस यांची अजरामर प्रेम कहाणी देणारा खानदेश.
खानदेश हा १९०६ पूर्वी एकच जिल्हा होता पण प्रशासकीय सोयीसाठी नंतर त्याचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे २ भाग करण्यात आले. १९६० साली पूर्व खानदेश हा जळगाव जिल्हा झाला, १९६१ मध्ये पश्चिम खानदेशचा धुळे जिल्हा झाला आणि पुढे १ जुलै १९९८ ला नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा झाल्यामुळे तेव्हापासून जळगाव, धुळे व नंदुरबार असे याचे आत्ताचे ३ जिल्ह्यांचे स्वरूप आले. अशा या खानदेशातील पुरातत्वीय कालखंड ते आधुनिक काळापर्यंतच्या जलसंस्कृतीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे.
भारतीय संस्कृती हि पंचमहाभूतांना म्हणजेच जल, वायू, आकाश,पृथ्वी व अग्नी यांना महत्व देणारी संस्कृती आहे. याच संस्कृतीत आदिम कालखंडात म्हणजेच सिंधू संस्कृतीत देखील निसर्गदेवतांचीच पूजा व्हायची ज्यात प्रामुख्याने जलदेवतांची पूजा व्हायची असे अनेक पुरावे आता उपलब्ध झालेले आहेत. प्राचीन भारतीय साहित्यापैकी एक असलेल्या अथर्ववेदात उल्लेख येतो की – ज्याप्रमाणे गाई मागे वासरू त्याप्रमाणे नदी मागे कालवा आवश्यक आहे. तसेच ऋग्वेदातहि शेतीसाठी पाण्याचा वापर कसा करावा, पाणी उपसा कसा करावा याचे दाखले दिलेले आहेत.
खानदेशात उपलब्ध झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्व पुरातत्वीय अवशेषांवरून तापी व गिरणा हे दोन खानदेशच्या जलसंस्कृतीचे मुख्य प्रवाह असून प्रकाशा, सावळदा, बहाळ-टेकवाडे, पाटणे-पाटणादेवी, चित्तेगाव-मानेगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शेकडो पुरातत्वीय स्थळांवरून या प्रदेशातील जलसंस्कृतीची मुळे शोधणे शक्य झाले आहे. १९५२-५३ पासून डॉ. शंकर साळी, बी. के. थापर, बोपर्डीकर, डॉ. वसंत शिंदे या तज्ञ पुरातत्ववेत्त्यानी केलेल्या संशोधनांतून २०० पेक्षा जास्त अश्मयुगीन, १०० पेक्षा अधिक ताम्रपाषाण व जवळपास ५० उत्तर हरप्पा कालीन वसाहती खानदेशात होत्या हे उजेडात आले.१ यातून सर्वात मोठा पुरावा आपल्या हाती तो म्हणजे प्राचीन काळी मानवी वसाहती या जलसमृद्ध असलेल्या प्रदेशातच होत असत म्हणजेच खानदेशची भूमी हि खऱ्या अर्थाने जलसंपन्न होती. माझ्या अल्पमती ज्ञानानुसार जगाच्या पाठीवर कोणत्याही एका जिल्ह्यात इतकी पुरात्वीय स्थळे नाहीयेत जितकी एकट्या धुळे जिल्ह्यात आहेत.
खानदेशातील तापी आणि गोमई नदीच्या काठावर प्रकाशा येथे भारतातील पहिली शेती झाली तसेच डोंगरी नदीच्या काठावर पाटणे जेथे धवलतीर्थ सारखा अप्रतिम सुंदर असा जलप्रपात आहे (ता. चाळीसगाव) येथे प्रत्यक्ष वस्ती असलेले भारतातील सर्वात प्राचीन अश्मयुगीन वसाहत स्थळ १९७२ साली संशोधकांना प्राप्त झाले.२ याच पाटणे या ठिकाणी ४० ते ६० हजार वर्षा पूर्वीची शहामृगाच्या अंड्यावर केलेली कोरीव नक्षी, अंड्याचे मणी प्राप्त झाले जे मणी भारतातील दागिन्यांपैकी सर्वप्रथम होत.३ तसेच येथेच सापडलेले पाटा-वरवंटा व धान्याचे कण यावरून प्राचीन मानवाचा धान्य बारीक करून खाण्याचा प्रथम पुरावा म्हणता येईल. इ.स. पूर्व १८०० ते १६०० पूर्वीच्या उत्तर हडप्पा संस्कृतीच्या समकालीन असलेल्या मानवाने पाटणेच्या महादेव मंदिरा पासून जवळच असलेल्या आड नामक नाल्याकाठी एक गांव वसविले.
याच परिसरातील गिरणा-बहुळा नदीच्या काठावरील बहाळला सापडलेल्या आहत (पंचमार्क्ड) नाण्यांवरून या भागावर इ.स. पूर्व चौथे शतक ते दुसरे शतक या काळात मौर्यांचे राज्य होते. नंतर सातवाहन राजांच्या काळात उत्तरेकडून अंबा गाव व तेथून पितळखो-याच्या रस्त्यावर हंकारी नावाचे मातीचा कोट असलेले गाव वसविले होते. अजिंठ्यातील शिलालेखानुसार पुढे येथे वाकाटकानी येथे राज्य केले. यावरून एक निष्कर्ष काढता येतो तो म्हणजे इ.स. पूर्व दुसर्या शतकात ज्याची निर्मिती सुरु झाली त्या पितळखो-याच्या लेणी निर्मितीसाठी पाटणे हे एक मदत केंद्र नक्कीच ठरलेले असणार. पुरातत्ववेत्ते एम. एन. देशपांडे यांच्या मतानुसार पितळखो-याच्या जगप्रसिद्ध यक्षाचे नाव संकारी असल्यावरूनच येथील गावाला संकारी हे नाव दिले असावे. पिंपळनेरच्या ताम्रपटानुसार बदामीच्या चालुक्यांचीहि येथे सत्ता होती. पुढे अभीर, यादव यांनी येथे राज्य केले. पाटणादेवीच्या मंदिरातील इ.स. ११५३ व इ.स. १२०७ च्या शिलालेखानुसार हे स्थळ म्हणजे निकुंभ राजांनी आपली राजधानी बनविले होते. तेर, पैठण (तत्कालीन प्रतिष्ठान) ते सोपारा (कल्याण) या प्राचीन व्यापारी मार्गावरील पाटणे हे एक महत्वपूर्ण स्थळ होते.४ शासनाच्या एका ग्रंथ लेखनाच्या कामानिमित्त या सर्व परिसरातील मंदिरांचा जेव्हा आम्ही सर्वे केला त्या मंदिरांच्या शिल्प स्थापत्यांवरून तसेच उपलब्ध हस्तलिखित ग्रंथ५, शिलालेख – ताम्रपट यांच्या अभ्यासावरून हि नृत्य, संगीत, शिल्प या कलांचीही भूमी असल्याचे स्पष्ट होते.
याच पाटणादेवीच्या धवलतीर्थाच्या परिसरात १२ व्या शतकात गणित व ज्योतिष शास्त्राचा महान अभ्यासक भास्कराचार्य यांनी गणित लिलावती, लिलावती भाष्य, सिद्धांतसारशिरोमणी सारख्या ग्रंथांची रचना केली. आणि जवळच असलेल्या डोंगरी व तित्तूर च्या काठावर असलेली चाळीसगाव हि फोटोग्राफी व चित्रकलेचा ध्येयवेडा कलावंत केकी मूस यांची कर्मभूमी आहे. गंगा-यमुनेचे अप्रतिम शिल्प निर्माण करणाऱ्या या कलावंताचे जीवन म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी प्रेमकहाणी आहे.
गिरणा नदीच्याच काठावर नुकतेच २०१७-१८ मध्ये प्रस्तुत लेखकाला प्राप्त झालेल्या अवशेषांवरून डेक्कन कॉलेज, पुणे येथील श्री. निलेश जाधव व इतर ४ संशोधकांच्या टीमने केलेल्या सर्व्हेनुसार हडप्पा संस्कृतीच्या समकालीन ३० लहान-मोठी वसाहत स्थळे प्राप्त झाली आहेत.६
उपरोक्त सर्व माहितीवरून हे सिद्ध होते की पूर्व खानदेशचे गिरणा-बहुळा-डोंगरी-तित्तूर नद्यांचे खोरे हा एक समृद्ध आर्थिकदृष्ट्या संपन्न जलसंस्कृतीचा प्रदेश होता.
पूर्व खानदेश व पश्चिम खानदेशला जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे तापी नदी. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या या तापी नदीला खानदेशात लहान मोठया १३ नद्या व असंख्य ओढे मिळतात तसेच खानदेशचा बहुतांश भूभाग हा तापीच्या दक्षिणेला वसलेला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या एका टोकावरून नर्मदेचा प्रवाह खळाळतो तर मध्यातून तापी वाहते. या तापी-बोरी-बुराई नदीच्या काठांवर प्रकाशा-कवठे-मेथी-शिंदखेडे अशी असंख्य प्राचीन स्थळे वसलेली आहेत. या पैकी प्रकाशा-सावळदा हे भारतातील अत्यंत महत्वाचे पुर्तात्वीय स्थळ आहे कारण या ठिकाणी ४ विविध संस्कृतींचे असंख्य अवशेष प्राप्त झालेले आहेत. भारतात जेथे जेथे अत्यंत समृद्ध जलसंस्कृतीची स्थळे होती तेथेच कुंभमेळ्यांची परंपरा सुरुवात झाली व ती कायम राहिली. तापी नदीच्या काठावरील प्रकाश येथेही हि परंपरा कायम राहिलेली दिसते. ज्याप्रमाणे पश्चिम खानदेशात तापी-बोरी-बुराई नदीच्या काठांवर शेकडो पुरात्वीय स्थळे प्राप्त झालेली आहेत (विस्तार भयास्तव त्यांची अधिक माहिती येथे वगळलेली आहे) त्याच प्रमाणे पूर्व खानदेशातहि याच तापी-पूर्णेच्या संगमावर चांगदेव जवळ चितेगाव, मानेगाव येथे आद्य पुराश्मयुगीन वसाहतीचे दीड ते एक लाख वर्षा पूर्वीचे अवशेष प्राप्त झालेले आहेत.७
तापीचे मूळ नाव बदरी व पुर्णेचे पयोष्णी असे होते. या दोन्ही नद्यांच्या संगमाजवळच असलेल्या मेहूण या गावातील अभिलेखातून जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल अशी एक माहिती मिळते. चालुक्य विक्रमादित्याचा मांडलिक हैहय वंशीय (कलचुरी) राजा प्रतिकंट व त्याच्या मुलाचा शुभंकंटचा खानदेशातील एकमेव असे सूर्य मंदिर येथे उभारल्याच्या संदर्भात उल्लेख मेहूण अभिलेखात येतो. हे घराणेही रत्नपूरच्या कलचुरीप्रमाणेच सूर्यवंशीय होते. विशेष म्हणजे यातील प्रतिकंट या राजाचे ‘महाराष्ट्र’ हे व्यक्तिनाम. संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या एकाही राजाचे ‘महाराष्ट्र’ नाव या व्यतिरिक्त दुसरे नव्हते हे येथे लक्षात घ्यावे. इ.स. ८०७ पासून हि सत्ता या तापीच्या खोऱ्यात नांदत होती. ८ अशा या २ संपन्न जलसंस्कृतीचा वारसा देणाऱ्या तापी व गिरणा यांचा संगम जळगाव व चोपडा तालुक्याच्या सीमेवर होतो.
आत्तापर्यंतच्या या प्राचीनतम संदर्भा बरोबरच मध्ययुगीन कालखंडातील खानदेशातील जलसंस्कृतीचे संदर्भ आपणाला प्राप्त होतात. भारतीय इतिहासात साधारणतः १२ वे शतक ते १८५७ पर्यंतचा काळ हा मध्ययुगीन काळ मानला जातो.

ज्ञानेश्वरीत उल्लेख आल्याप्रमाणे
शके बाराशे बारोत्तरे तै टिका केली ज्ञानेश्वरे | सच्चिदानंदबाबा अत्यादरे लेखकू जाहला ||
या प्रमाणे शके १२१२ मध्ये म्हणजेच इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरीचे लेखन पूर्ण झाले याच्याच अवघ्या काही वर्षानंतर खानदेशातील तापी नदीच्या या काठावरच मेहूण येथे हठयोगी वटेश्वर चांगदेवाची गुरु आद्य स्त्री साहित्यक संत, मुक्ताई समाधीस्थ झाली. नामदेव गाथेतहि येथीलच तापीकाठच्या सोमेश्वराचे वर्णन करणारे अभंग उपलब्ध आहेत. नाथपंथाच्या तत्वसार या महत्वपूर्ण ग्रंथाची निर्मितीहि इ.स. १३१२ मध्ये येथेच तापी तीरावर झाली.९
महानुभाव साहित्यातील इ.स. १४१८ मध्ये लिहिल्या गेलेल्या ‘ऋद्धिपूरवर्णन’ या महान काव्याचा रचियता नारायण बास – नारोबास हा बहुळा नदीच्या काठावर राहणारा असल्याने त्यांना बहाळीये हे संबोधन प्राप्त झाले.१० यातील एकूण ६४१ ओव्यांपैकी कांही ओव्यात बहुळा नदीकाठचे जनजीवनाचे सुंदर वर्णन कवीने केलेले आहे.
यावरून आपणाला असे म्हणता येईल की तापी-पूर्णा काठावरील हि सर्व स्थाने तत्कालीन कालखंडात ज्ञानसाधनेने संपन्न होती.
दुसरा फारुकी सुलतान नसीर खान (इ.स. १३९९-१४३७) याने असिरगडावरून हस्तगत केलेल्या संपत्तीतून तत्कालीन खानदेशच्या तापीकाठावर इ.स. १४०० मध्ये आपल्या राजधानीचे नवीन शहर बांधले व त्यास बुऱ्हाणपूर हे नाव दिले. या शहरात त्यावेळी २ लाख ३५ हजार व्यक्तींना पुरेल अशी १ कोटी लिटर पाणी मिळण्यासाठीची पाणीपुरवठा योजना पद्धती इ.स. १६१५ मध्ये अमलात आणली गेली. जी आजही कसलाही एक रुपये लाईट बिल खर्च न येता चालू आहे. (केवळ योग्य देखभाल न केल्यामुळे व पाण्यात मिठाचा गुणधर्म जास्त असल्यामुळे आता ३० लाख लिटर पाणी या पद्धतीतून होतो.)११
नंदुरबार जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धी व जीवनमान याचे वर्णन करताना १३३५ ते १३६५ या कालखंडात खानदेशातून प्रवास करताना लिहितो – ‘इस छोटे से नगर के लोग कला-कौशल के द्वारा हि अपना निर्वाह करते है. इनमे से कोई कोई वैद्यक तथा ज्योतिष के भी अपूर्व ज्ञाता है. चावल, हरे शाक-पात और सरसों का तेल यहां के प्रधान खाद्यपदार्थ है. यहां मदिरापान दूषण समझा जाता है और कोई आदमी मद्यसेवन नही करता. १२
मध्ययुगाच्या उत्तरार्धात अबुल फझलच्या एन-इ-अकबरी (इ.स. १५७७) मध्ये, माझ्याकडे उपलब्ध असलेल्या तबकात-ए-अकबरी (इ.स. १५९३) या हस्तलिखित ग्रंथात,१३ तारीख-ए-दख्खन (इ.स. १७२९) या ग्रंथातहि येथील जलसंस्कृतीची वर्णने आढळतात.१४ समकालीन हिंदुस्थानात अतिपवित्र मानलेल्या २८ नद्यांमध्ये अबुल फझलने तापी नदीचा समावेश केलेला आहे. तो लिहितो – ‘तापी नदी वऱ्हाड गोंडवनच्या दरम्यान उगम पावुन खानदेशातून वाहते आणि पूर्णा व गिरणा या तिच्या उपनद्या आहेत. येथील हवामान सुखद व हिवाळा आल्हाददायक आहे. येथे ज्वारी हे मुख्य पीक असून कांही ठिकणी ते ३ वेळा काढले जाते. येथे उत्तम प्रतीचा तांदूळ होतो. फळफळावळ विपुल असून विड्याची पानेही भरपूर आहेत. येथे चांगल्या प्रतीचा कापड तयार होतो व धरणगावचा ‘सिरी साफ’ व ‘भिरीन’ हा कपडा प्रसिद्ध आहे. एदलाबाद हे देखील चांगले शहर असून त्या नजीकच्या तलावाचा जलसिंचनास्तव उपयोग होतो. चोपडा हे मोठे समृद्ध शहर असून डांभूर्णी गाव व जामोद परगणा सधन आहे.१५ या लिखाणातून देखील तापीकाठच्या संपन्न खानदेशी लोकवसाहतीचे संदर्भ समोर येतात.
खानदेशच्या जलसंस्कृती व तिच्या परिसरातील जनजीवनाची अशीच वर्णने आदिल खान फारुकीच्या गुलशन – इ – इब्राहीमी, १६५६ ते १७१७ पर्यंत खानदेशात अनेक वेळेला फिरलेल्या निकोलाय मनुची, ट्र̆व्हेनियर, टा̆मसरो, मा̆र्टीन, थेवेनॉट, बर्नियर व डेक्कन कॉलेज, पुणे येथील मराठा वस्तुसंग्रहालयात व पेशवे दफ्तर, पुणे येथे असलेल्या खानदेश जमाव रुमाल क्र. १२, ५७, ११३, ११५, ११८, १३३, १६८, १६९, १७०, १९९ व २१८ मध्ये येतात.
४ ते ७ ऑगस्ट १६८१ या ३ दिवसात पॉ͘डेचेरी येथील फ्रेंच्यांच्या वखारीचा प्रमुख प्रासोन्क्षा मार्टिन याने खानदेशातून प्रवास केला ज्याचे त्याने आपल्या डायरीत फ्रेंच भाषेत वर्णन करून ठेवलेले आहे. त्यात तो म्हणतो – ४ ऑगस्ट रोजी आम्ही फर्दापूर येथे पोहचलो. अजिंठ्याचा मैल – दीड मैल घाट उतरत असताना पाहणाऱ्याला भोवतालचे दृश्य इतके सुंदर वाटते की, त्याचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही. या प्रदेशातील सर्व भाग अतिशय सुपीक आहे आणि जेथे पहाल तेथे जमीन शेतीखाली आलेली दिसते. डोंगरातून उगम पावलेल्या नद्या (वाघूर इ.) या प्रदेशातून वाहत जातात. ह्या प्रदेशात जिकडे-तिकडे आंब्याच्या बागा व चिंचेची झाडे दिसतात. पुढे तो शेंदुर्णी, गिरणा नदी व तिचा भोवताल, एरंडोल व धरणगावच्या संपन्नतेचे वर्णन करतो.१६ वाघूर नदीकाठच्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसराचे हे पहिलेच यथार्थ वर्णन ठरते. आजही येथील सप्तकुंड धबधब्यातून पडणारा वाघूरचा विलोभनीय प्रपात पाहताना १३९ वेळा अजिंठ्याला भेट देऊनही रॉबर्ट-पारो च्या प्रेमकथे प्रमाणे माझेही मन अतृप्त राहिल्या सारखे वाटते. परंतु मनाला हि मोठी खंतहि राहून जाते की मागच्या ५० वर्षात या परिसरातीलच मानवाने आपल्या कर्माने या जगप्रसिद्ध जागतिक वारसाचे प्रचंड नुकसान करून ठेवलेले आहे जि हानी आता कधीच भरून येऊ शकणार नाही.
एकूणच मुघल व मराठा कालीन सर्व दस्ताऐवजांमध्ये तापी व गिरणाकाठची जळगाव व भुसावळ याचे उल्लेख वगळून अमळनेर, बहाळ, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, लोहारा, एरंडोल, धरणगाव, अडावद, चोपडा, डांभूर्णी, नशिराबाद, यावल, सावदा, न्हावी, चांगदेव, वरणगाव, बोदवड, एदलाबाद, अंतुर्ली, रावेर, बहाद्दरपूर, जामनेर, वाघळी, जामोद, जैनाबाद, नंदुरबार, देवपूर, धुळे, कवठे, साक्री, दोंडाइचा इ. स्थानाचे उल्लेख तेथील वनस्पती, प्राणी, पिके व सुपीक जमिनी इ. सह येतात. पुणे पुराभिलेखागारातील पत्रांवरून आपणास खानदेशातील पेशवे काळातील पाणीपुरवठा केंद्रांची म्हणजेच धरणे वा बंधारा-यांची माहिती मिळते. या काळात नेर, डोंगरी, जापी, निमखेड, भवाली, कुसुंबे, दहिवेल, पाटणे, बेटावद, पिंपळनेर, कासारे इ. गावांना पाटाद्वारे पाणी दिले जायचे. व त्यापैकी एका ठिकाणी या पाण्यावर जवळपास २७ बिघे जमिनीत १७८५-८६ मध्ये उसाची लागवड केल्याचे उल्लेख मिळतात.१७
आधुनिक काळातील खानदेशच्या जलसंस्कृतीवर वाईट परिणाम झाल्याचे आढळून येतात. एकेकाळी अतिशय संपन्न म्हणून ज्याचा उल्लेख झाला त्या नंदुरबारला मुंबई प्रांताचा गव्हर्नर माउंट स्टुवर्ट एल्फिन्स्टन याने ऑगस्ट १८१८ मध्ये भेट दिली तेंव्हा तो आपल्या डायरीत लिहतो की, ‘दक्षिण भारतात दयनीय कोणते शहर मला दिसले असेल तर ते नंदुरबार’.
१९२१ मध्ये खानदेशचा पहिला नकाशा तयार केला तो क̆प्टन जॉन ब्रिग्ज याने – आर्थर व्हाईट व जेम्स एव्हर्स यांच्या सहाय्याने. यावेळच्या सर्व्हेनुसार खानदेशात विहिरींची संख्या २७०३१ व बंधारा-यांची संख्या १४० इतकी होती. तसेच २१६८ चौरस मैल जंगल सरकारच्या ताब्यात होते. एकूण ५३८ शाळा त्यावेळी होत्या. याचाच अर्थ बदललेल्या पर्जन्यमानामुळे पश्चिम खानदेशचा नंदुरबार सारखा भाग होरपळलेला होता परंतु पूर्व खानदेशात विशेषतःरावेर, सावदा, फैजपूर या भागावर त्याचा कोणताच दुष्परिणाम झालेला नव्हता, आजही भारतातील केळीच्या एकूण उत्पन्नापैकी २०% केळीचे उत्पादन तापीच्या याच पट्ट्यात होते. तरीदेखील १८ वे ते २० वे शतक या दरम्यान धुळे जिल्ह्यात जाल्संकृतीचे रक्षण करण्यासाठी फड पद्धतीचा विकास झाला ज्या १९८४ मध्ये धुळ्यास वास्तव्यास असलेल्या भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांनी मैसूर संस्थानातही मोठया प्रमाणात उपयोग केला.
स्वातंत्र्योत्तर काळखंडात मात्र हरताळे, म्हसवे, वेल्हाळे, मेहरूण या जळगाव जिल्ह्यातील तलावांबद्दल बोलायचे तर ज्या मेहरुनच्या काठावर बहिणाबाई सारखी जीवनाचे तत्वज्ञान अत्यंत सोप्या शब्दात सांगणारी आधु महान कवयित्री राबली तो मेहरूण असो व इतरही तलाव या सर्वाकडे, जाणून बुजून दुर्लक्ष होत राहिले, इतरही धुळे नंदुरबार जिल्ह्यातील तलावाचे कित्येक वर्ष हीच स्थिती आहे.
परंतु आम्ही खानदेशच्या जलसंस्कृतीच्या उपासकाने कधीही हे विसरता कामा नये की खानदेशातील एकूण ग्रामनामांपैकी १३% वर गावांची नावे पाण्याशी संबधित आहेत.१८ उदा :-
पाणी :- अंबापाणी, गेरुपाणी, भांगरापाणी, मोगरापाणी, कुंड्यापाणी इ.
विहिरी :- अलविहीर, दगडीविहीर, खोलविहीर, वाव्याविहीर, धावळीविहीर इ.
कुवा :- अक्कलकुवा, मालकुवा, अमलकुवा, बोरीकुवा इ.
तळे :- निमतळे, तामतळे, खडतळे, तळेगाव इ.
कुंड :- बोरकुंड, बेडाकुंड, माकडकुंड इ.

खानदेशच्या आधुनिक जलसंस्कृतीत दोन अत्यंत महत्वाच्या बाबी नोंद करणे इथे संयुक्तिक ठरते.
पाण्याचा थेंब थेंब रुजवून अब्जावधी लिटर पाण्याची बचत करावी या उद्दिष्टाने याच खानदेशच्या मातीतील सुपुत्राने पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांनी जैन इरिगेशन ची स्थापना करून खऱ्या अर्थाने जलक्रांती घडवली. एक महान स्वप्न उराशी बाळगून स्वप्न त्यांनीच उभारलेल्या गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव च्या ३० जानेवारी ते १२ फेब्रुवारीच्या पदयात्रेत मला हे पाहायला मिळाले की सातपुड्याच्या कुशीत कुंड्यापाणी हे ७०० लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे. या गावात डोंगराच्या कुशीतून वाहत येणारा केवळ पाण्याचा झरा हे एकमात्र साधन असतानाही लागेल तेवढेच पाणी वापरून कधीही पाण्यासाठी संघर्ष न करणारे हे एक आनंदी गाव आहे. तसेच गिरणेच्या काठावर जळगाव तालुक्यात लमांजन हे एक असे गाव आहे की ज्याच्या शेजारून वाहणाऱ्या गिरणा नदीत मोठे मोठे पाषाण आहेत पण ज्या गावाने ४६ वर्षापूर्वी ग्रामसभेत ठराव पारित केला की ‘जो कोणी नदीतच नव्हे तर नदीकडील बाजूला जरी शौचाला गेले तर तो गावातून हद्दपार करण्यात येईल, संपूर्ण गाव त्याच्यावर बहिष्कार टाकेल. आपल्या गावाच्या नदीचे पावित्र्य आणि पाण्याची शुद्धता राखण्याची जबाबदारी आपली आहे.’ आणि आजही सर्व ग्रामस्थ याचे पालन करतात.
खरे म्हणजे आजच्या काळात हि अत्यंत आदर्श अशी उदाहरणे आहेत कारण आपण जर नदी, तलाव इ. मध्ये शौच व इतर घाण करत असू आणि आपण जर कितीही फिल्टर लावले, कितीही पाणी शुद्धीकरण यंत्र वापली तरी आपल्याला पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून कोणीही वाचवू शकत नाही.
जलसंस्कृतीचा असा आदर्श निर्माण करून देणाऱ्या खानदेशचे आपण वारस आहोत त्यामुळे हा घेतला वसा टाकू नका, पाणी वाया घालू नका, वाया कोणाला घालू देऊ नका, हि जलसंस्कृतीची साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण.

संदर्भ
१. साळी, डॉ. चेतन शंकर – संदर्भ महाराष्ट्र, इंटेलक्चुअल बुक ब्युरो, भोपाळ, प्रथम आवृत्ती, २००५, पृष्ठ क्र. ७६४
२. जळगाव जिल्हा ग̆झेटयिर- मराठी आवृत्ती १९९४, पृष्ठ क्र. ५४-५५
३. साळी, शंकर अण्णाजी – ‘दि अप्पर प̆लिओलिथिक कल्चर अ̆ट पाटणे, डिस्ट्रीक्ट ग̆झेटयिर जळगाव, महाराष्ट्र’ रिसेंट अ̆डव्हान्सेस इन इंडो प̆सिफिक प्रिहिस्टरी, १९८५, पृ. क्र. १३९-१४०
४. कित्ता २, पृ. क्र. ५५
५. सकाळ वृत्तपत्र – दि. १ जानेवारी २०१७, गिरणेच्या काठावर आढळले ३७०० वर्षापूर्वीचे अवशेष
६. बोपर्डीकर, बी. पी. – ‘अर्लि स्टोन एज साईट अट मानेगाव ऑन दि पूर्णा रिव्हर, डिस्ट्रीक्ट ग̆झेटयिर जळगाव, महाराष्ट्र,’ इंडियन अ̆न्टीक्वरी, खंड क्र. ४, १९७०, पृ. क्र. ८ – १२
७. कित्ता २ पृ. क्र. ६५
८. मराठी वांग्मयाचा इतिहास, खंड क्र. १, १९८४ पृ.क्र ६२४-२७
९. दिवेकर डॉ. ह. रा. – तत्वसार ग्रंथ, १९३६
१०. कित्ता ८ पृ. क्र. ३६६
११. शेरवानी, एच. के. व जोशी, पी. एम. (संपा.)- हिस्ट्री ऑफ मिडिव्हल डेक्कन, आंध्र गव्हर्न्मेंट
प्रकाशन, प्रथम आवृत्ती, हैद्राबाद, १९७६, पृ. क्र. ६
१२. इब्नबतुता की भारत यात्रा – चौदहवी शताब्दी का भारत – नशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी
दिल्ली, चौथी आवृत्ती, २००५, पृ.क्र. १८७.
१३. बोबडे, बी. आर. – तबकाते-ए-अकबरी व चचनामा, अरुणा प्रकाशन, लातूर, प्रथम आवृत्ती,
२०१७ (प्रकाशित तसेच मूळ हस्तलिखित उपलब्ध आहे)
१४. बोबडे, बी. आर. – मूळ हस्तलिखित उपलब्ध – लेखक हफिजुधीन अहमद, मूळ नाव गंज इ –
मानी, तवारिखे दक्खन, २८९ पृष्ठे.
१५. कित्ता ११, पृ. क्र. २३२
१६. शहा, जी. बी. – पेशवेकालीन खानदेश- अप्रकाशित पीएच. डी. प्रबंध, पुणे विद्यापीठ, पुणे
१७. भामरे, डॉ. सर्जेराव – खानदेशातील अभिनव फड सिंचन पद्धत, जलसंवाद स्मरणिका, जानेवारी
२०१८

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीपूर्ण आहे खरा, पण खूप विस्कळित आहे आणि प्रदीर्घ आहे. लेख जर दोन तीन भागांत विभागला असता तर थोडा मुद्देसूद वाटला असता. खूपशी जंत्री आहे. असो.
१)प्रकाशा येथे कुंभमेळ्याची परंपरा खरेच आहे का? ही माहिती मला नवीन आहे.
२)सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा मृत्यु दि. १२/४/१९६२ रोजी झाला. १९८४मध्ये नव्हे.
३)"नंदुरबार जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धी व जीवनमान याचे वर्णन करताना १३३५ ते १३६५ या कालखंडात खानदेशातून प्रवास करताना लिहितो – ‘इस छोटे से नगर के लोग कला-कौशल के द्वारा हि अपना निर्वाह करते है. इनमे से कोई कोई वैद्यक तथा ज्योतिष के भी अपूर्व ज्ञाता है. चावल, हरे शाक-पात और सरसों का तेल यहां के प्रधान खाद्यपदार्थ है. यहां मदिरापान दूषण समझा जाता है और कोई आदमी मद्यसेवन नही करता. १२'' हे वर्णन इब्न बतूताचे आहे हे तळटीप बघितल्यावरच कळते. शिवाय हे सर्व आधुनिक शुद्ध हिंदी रूपांतर आहे ह्याचा उल्लेख हवा होता.
४)केळ्यांची लागवड खानदेशात पूर्वापार असली तरी तिला खरा बहर कोंकणात ठाणे जिल्ह्यातली लागवड रोगग्रस्त झाल्यावर म्हणजे १९७० नंतर आला. तोपर्यंत हिरव्या सालीच्या केळ्यांची ग्रोझ मिशेल व तत्सम उपजाती आणि वेलची, मुठेळी, राजेळी वगैरे ठाणे जिल्ह्यातल्या जाती मुंबईत लोकप्रिय होत्या. पाठ्यपुस्तकांतही वसईच्या केळ्यांविषयी माहिती असे.

हिरा छान प्रतिसाद. लेख काही भागांमध्ये लिहायला हवा असं मलाही वाचताना वाटले होते.
वसईची केळी प्रसिध्द आहेत हे माहीत होते पण १९७० नंतर, म्हणजे अगदी अलिकडे जळगाव केळ्यांसाठी प्रसिध्द झाले ही माहिती माझ्यासाठी नविन आहे.

भारीच.
केनेथ एंडरसनच्या शिकारकथा पुस्तकात इथे भरपूर वाघ असल्याचा उल्लेख वाचला आहे. स्वातंत्र्याअगोदर इथले बरेच वाघ केवळ शिकार म्हणून ( नरभक्षक नव्हे) मारले गेले होते. अती सुपीक प्रदेशामुळे हरणं खूप होती. मला वाटतं सध्याचे पाल यावल अभयारण्य यामुळेच नियोजले गेले.

आणखी एक (अवांतर पण उल्लेखनीय) म्हणजे सह्याद्री वाहिनीवर 'खानदेशरत्न' नावाची मालिका(माहितीपट) होती त्यात वीसबावीस कर्तृत्ववान पुरुषांची कामगिरी दाखवली गेली.)