पेंटर

Submitted by बिपिनसांगळे on 2 March, 2019 - 11:28

पेंटर

“टेस्ट पॉझिटिव्ह आहे. पोराला स्वाईन फ्लू झाला आहे.’’ डॉक्टर शांतपणे म्हणाले, “फक्त आताशी सुरुवात आहे. बरं केलं, लवकर आणलंत.’’
नवर्याला आवडणार नाही, त्याला राग येईल हे माहिती असूनही शकुंतला पटकन् म्हणाली, “हे नकोच म्हणत होते; पण मलाच राहवलं नाही. म्हणून आणलं तरी.’’
रघूने आपल्या काळ्या-सावळ्याशा, साध्या बायकोकडे रागाने पाहिलंच. त्याला कामाची खोटी होते म्हणून दवाखान्यात यायचंच नव्हतं. बायकोने एकटीनेच पोराला आणलं असतं तर काय झालं असतं, असा विचार त्याच्या डोक्यात होता. पण स्वाईन फ्लू म्हटल्यावर त्यालाही धक्का बसला.
रघू एक पेंटर होता. आताही तो त्याच कपड्यात होता. त्याला टेन्शन आलं होतं, असं की, स्वाईन फ्लू म्हणजे काळजीची गोष्ट. म्हणजे कामाची वाट लागली. टेन्शन फक्त एवढंच - कामाचं!
आज त्याला नेमकं नवीन घर सुरू करायचं होतं.
“सिस्टर केस पॉझिटिव्ह आहे. पोराला लगेच अॅडमिट करून घ्या.’’ डॉक्टर अगदी सरकारी स्वरात बोलले. त्यांनी औषधं लिहून दिली. त्यांना घाई होती. बाहेर पेशंटची रांग लागलेली होती.
सिस्टरने ‘हं’ म्हणून मान उडवली. शहरात स्वाईन फ्ल्यूने उच्छाद मांडला होता. त्या सरकारी दवाखान्यात पेशंटची तोबा गर्दी होती. एक कॉट रिकामी नव्हती. या पोराची पथारी आता पॅसेजमध्येच जमिनीवर टाकावी लागणार होती.
दादूला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. दादू हा दहा वर्षांचा एक गोड पोरगा होता. पण आता त्याचा चेहरा वेदनेने पिळवटलेला होता.
ते बाहेर आवारात आले. दादूला घशामध्ये ओढल्यासारखं होऊ लागलं, मळमळलं. अन् त्याला बक्कन उलटी झाली. सकाळी चहाबरोबर खाल्लेली बिस्कीटं, चहासकट तो भराभरा बाहेर ओकला, उलटीचा आंबटघाण वास पसरला.
शकुंतलाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. दादूला उलटी झाल्यावर बरं वाटलं. पण शकुंतलाचं अवसान गळालंच.
ते दोघे नळाकडे गेले. रघू औषधं घ्यायला गेला.
काउंटरपलीकडच्या माणसाने मख्खपणे रघूला सांगितला - “टॅमीफ्लू गोळी संपलीये. पण त्याने रिलेंझा मात्र दिलं.
दादूला पॅसेजमध्ये कशीबशी जागा मिळाली. तीही खूप वेळाने.
आजूबाजूला सगळीकडे पेशंट, बरेचसे स्वाईन फ्लूचे. सगळीकडे औषधांचा आणि अस्वच्छतेचा एकच वास पसरलेला. आणि नक्की किती साली रंग दिलाय हे न कळणारा भिंतीचा कळकटपणा सोबतीला. त्यावरच धरलेले पोपडे.
सगळं स्थिरस्थावर झाल्यावर कामाला जायला उशीर झाल्यामुळे रघू चडफडतच निघाला.

रघूने बेल वाजवली. दार उघडलं.
समोर शलाका उभी होती. तिच्या अंगावर अबोली रंगाचा स्लीव्हलेस् टी-शर्ट होता, खाली जीन्स्.
ती खूप सुंदर आहे, अगदी जाहिरातीत दाखवतात त्या बायांसारखी, अशी त्याच्या मनाने दखल घेतली. पण त्याला अशा गोष्टींशी काही घेणं नसायचं. कामाशी काम.
रघू पक्का पेंटर होता. त्याचे कपडे म्हणजे त्याचा ट्रेडमार्क होता. त्याच्या अंगावरच्या कपड्यांचा मूळ रंग नीट सांगता येण्याच्या पलीकडे गेलेला होता. डोक्यावर टोपी. कपड्यांवर, टोपीवर अनेक रंगाचे शिंतोडे उडालेले. टोपीवर काहीतरी लिहिलेलं होतं, तेही आता वाचता येत नव्हतं.
रघूचा व्यवसायच रंगाचा. त्याचा अनेक रंगांशी संबंध येत असे. अनेक रंगांच्या अनेक शेडस्शी. पण त्याच्या व्यक्तीमत्त्वाची एकच ठसठशीत शेड होती. आणि ती म्हणजे - काम, काम आणि काम! काम करायचं, पैसा मिळवायचा. या पलीकडे त्याच्या आयुष्यात दुसरं काही नव्हतंच. चाळीशीचा असला तरी वयाने मात्र तो खूप जास्त वाटायचा. त्यात काळी-पांढरी दाढी नेहमी अर्धवट वाढलेली असायची. त्याला वाटायचं, काय करायचंय दाढी करून? दाढीसारख्या गोष्टीसाठी कशाला पैसे खर्च करायचे!
रघू आत गेला. त्याची नजर हॉलवरून फिरली. हॉलला सगळीकडे पांढरा रंग दिलेला होता आणि तो सुस्थितीत होता. रंग छान दिसत होता. त्याला तो आवडला. त्याने स्वत:, असा पांढरा रंग कधीच दिला नव्हता.
रंग तर चांगला दिसतोय, मग? तरी बदलायचाय? असेल. आपल्याला काय करायचंय? पैसेवाल्यांचं खूळ एकेक!
हॉलमध्ये श्रीमंती आणि सौंदर्यदृष्टी झळकत होती. तिथे दोन उत्कृष्ट पेंटिंग्ज लावलेली होती. पण रघूचं याही गोष्टींकडे लक्ष नसे. मग त्याचं तिथे असलेल्या उत्तम फर्निचर आणि सजावटीच्या अनेकानेक गोष्टींकडे तरी कसं काय लक्ष जाणार होतं?
“बोला मॅडम, काय काम आहे?’’ रघूने विचारलं.
“बेडरूम रंगवायची आहे’, असं म्हणत शलाका आत गेली.
तिच्या जाण्यासरशी तिने लावलेल्या उंची परफ्यूमचा वास दरवळला. तो मात्र रघूला आवडला. कारण तो नेहमी रंगाच्या वासांच्या सान्निध्यात असायचा. त्या उग्र केमिकल्स्च्या वासापेक्षा हा वास खूपच मंद, हवाहवासा वाटणारा होता. पण त्या सुवासाची किंमत त्याला कळाली असती तर त्याने त्या परफ्यूमच्या एका थेंबाचाही विचार केला नसता!
बेडरूम मोठी होती. पंधरा बाय पंधराची असावी. तिथलाही ऑफ व्हाईट रंग सुस्थितीत होता.
“इथे मला सगळीकडे फिकट म्हणजे अगदी फिकट गुलाबी रंग द्यायचा आहे. हा रंग नकोय.’’
बेडरूमच्या एका बाजूला खिडकी होती. एका बाजूला दार. एका भिंतीला पूर्ण रंगीबेरंगी, फक्त मुलांसाठी तयार केलेलं कपाट होतं. म्हणजे एकच भिंत सलग होती. लांबच लांब.
रघूने खिशातून टेप काढला. लपलपणारा पत्र्याचा कडक टेप घेऊन पहिल्यांदा तो त्या भिंतीकडे वळला. त्याबरोबर -
“नाही नाही, या भिंतीला नाही’, शलाका म्हणाली.
“या भिंतीला नाही? मग?’’ रघू बुचकळ्यात पडला. त्याचा मूडच गेला. खरे तर याच भिंतीचे पैसे झाले असते.
“ही भिंत मी वेगळी रंगवून घेणार आहे - माझ्या मित्राकडून.’’
मित्र? या सुंदर बाईला मित्र? या मोठ्या लोकांचं काही सांगता येत नाही आणि - आणि एक पेंटर या लग्न झालेल्या बाईचा मित्र आहे? कमालच आहे.
“पण रंगवणार आहात ना? मग मीच रंगवतो ना.’’
“अहो, तसं नाही. ती भिंत मला खास माझ्या मुलासाठी एक थीमप्रमाणे रंगवायची नाही. माझा मित्र आर्टिस्ट आहे. मोठ्ठा आर्टिस्ट. पण तो हे काम करायला तयार झालाय तो फक्त माझ्यासाठी.’’
हे सांगताना तिच्या चेहर्यावर गर्वमिश्रित आनंद होता.
रघू आपलं उगाच, ‘हं हं’ म्हणाला. त्याला एवढं किरकोळ काम नको होतं. त्याला मोठं काम हवं होतं. पण त्याचा नाईलाज होता. त्याच्या हातामध्ये काम नव्हतं. दिवसाची खोटी करणं रघूच्या मनाला पटणं ही अशक्य गोष्ट होती. त्याने एकट्यानेच काम करायचं ठरवलं, जोडीदार न घेता. तरी दोन दिवसांचं काम होतं.
“आजच काम सुरू करतो. सामान घेऊन येतो.’’ रघू शलाकाला म्हणाला.

रघू त्याच्या सायकलवर टांग मारून निघाला. त्याची सामानाची पिशवी पुढे लावलेली होती. कॅरियरला घोडा लावलेला होता. तो घोडा, त्याची ती कामाची लाकडी घडीची शिडी डगमगत होती. बदलायला झाली होती. पण तो रघू होता. जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस तर तो ती लंगडी घोडी चालवणारच होता.
वाटेत तो चहा प्यायला थांबला. ही चहाची टपरी त्याची ठरलेली होती. तो एवढीच चैन करायचा.
चहावाला चेष्टेने म्हणाला, “चहा प्या ऐश करा!’’
“हो हो करतो ना. अरे, दाम्या, तुझंही माझ्यासारखंच हातावरचं पोट आहे. आपण थकल्यावर कोण देणार काढून? आपल्याला काय पेन्शन आहे? आणि तुझं चहावाल्याचं बरंय पण माझ्या कामाची गॅरंटी नसते. आज आहे तर उद्या नाही.’’
चहा पिता येत नव्हता एवढी चिलटं हवेमध्ये होती. किरकोळ चिलटं, पण त्यांनी माणसांना अक्षरश: भंडावून सोडलं होतं. ऊन वाढलेलं होतं. पण उन्हाळा अजून चालू व्हायचा होता.
चहावाला पुन्हा चेष्टेने म्हणाला, “तुमच्या डोक्यात लय विचार असतात राव! या चिलटांपेक्षा जास्त.’’
“ए, चल. आपला फक्त एकच विचार असतो - पैसे कमवण्याचा.’’
रघू शलाकाकडे निघाला.
वसंत ऋतू होता. सगळीकडच्या झाडांनी नवं हिरवं रूप ल्यायलेलं होतं. चहाच्या गाडीवर सावली धरलेला लालभडक गुलमोहोर, वाटेत एका बंगल्याच्या कुंपणावर फुललेली राणी कलरची बोगनवेल, पुढे एके ठिकाणी डवरलेला पिवळा धम्मक, डेरेदार, नजर गुंतवून ठेवणारा बहावा, तर ज्या झाडांना फुलं नव्हतं, ती झाडंही हिरवी श्रीमंती मिरवत होती. वाटेत देवळापाशी फुलवाला बसलेला होता. त्याकडे असलेल्या मोगर्याचा घमघमाट पसरला होता. वसंत आता अगदी वयात होता.
रघूला वसंत ऋतू वगैरे कुठला कळायला. पण त्याला हे सगळे रंग पहायला आवडायचे. रंगच रंग. त्याला वाटायचं असे जिवंत रंग रंगवावेत. भिंती एकदम कलरफुल करून टाकाव्यात. गिर्हाईक कसं एकदम खूष झालं पाहिजे आणि त्याने आपला खिसा फुल केला पाहिजे.
आताशा ट्रेंड बदलला आहे. लोक वेगवेगळ्या रंगांना, नवीन रंगाना, फिकट-गडद अशा सार्याच शेडस्ना पसंती देताहेत. वेगवेगळे प्रकार आले आहेत बाजारात. लोक काय काय रंगवतात... अन् मध्येच त्याचा विचार तुटला.
ती बाई त्या मोठ्या भिंतीवर काय रंगवणार असेल? पोरांसाठी रस्त्यांवरच्या भिंती रंगवतात, प्राणी-पक्षी काढतात, कार्टून्स काढतात तसलं काहीतरी असेल. भिंतभर रंग पण चित्रकारी कमी!...

रघू भरभर कामाला लागला.
त्याने बेडरूमच्या भिंती एमरी पेपरने घासल्या. त्याला प्रायमर दिला. त्यामध्ये दिवस गेला.

दिवसभरात दादूची तब्येत जास्त झाली होती. त्याला उलट्या होत होत्या. डोळे पांढरे करणारा खोकला तर सतत होताच. शकुंतला काळजीत होती. काय करावं कळत नव्हतं. काय होणार तेही कळत नव्हतं.
रात्री दादूला नीट झोप लागली नाही. सतत खोकल्याची ढास. शकुंतला तर जवळजवळ जागीच. पोराच्या काळजीने आणि जागरणाने तिची रात्र संपता संपेना. कधी एकदा उजाडतंय आणि डॉक्टर येताहेत, असं तिला झालं होतं. एकुलत्या एक पोराच्या काळजीने तिची माया जागीच होती आणि तिला कळत नव्हतं की आपला नवरा एवढा शांत कसा झोपू शकतो? रघूही पलीकडच्या मोठ्या पॅसेजमध्येच झोपला होता.

सकाळ झाली. रघूला लवकर काम आटपायची इच्छा होती. त्याने पटापटा आवरलं. शकुंतलेला खर्चासाठी पैसे दिले. दादू झोपलेला होता.
पैसे घेताघेता शकुंतला म्हणाली, “आवं, पोराला लय त्रास होतोय, थांबा की जरा.’’
रघूचा नाईलाज झाला. दादूला आता श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला होता.
डॉक्टरांनी तपासलं.
“याला आधीचा कसला त्रास आहे का?’’ त्यांनी विचारलं.
“दमा हाये,’’ शकुंतला म्हणाली.
“दमा?’’ डॉक्टर केवढ्यांदा ओरडले.
“याला दमा आहे? अहो बाई, मग आधी नाही का सांगायचं? याला रिलेंझा औषध दिलंय. दमेकर्याला ते देता येत नाही. म्हणून त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय. डोक्याला त्रास!...’’
“मग काय करायचं डॉक्टर?’’
“पहिले ते औषध बंद करा. टॅमीफ्लू घ्या,’’ डॉक्टर गरजले.
“गोळ्या मिळाल्याच नाहीत.’’
डॉक्टरांनी एका सिस्टरला विचारलं, “सिस्टर, टॅमीफ्लू आता तरी आल्यात का?’’
“आत्ताच आल्यात. थोड्याच आहेत. तुटवडा आहे ना,’’ ती म्हणाली.
“त्या द्या यांना आणि यांच्याकडून ते रिलेंझा आधी काढून घ्या. अडाणी साले! उद्या पोराचं काही कमी-जास्त झालं तर हेच आम्हाला मारायला येतील, दवाखान्यावर दगड फेकतील.’’ डॉक्टर तिडीकीने गरजले.
“नाही नाही डॉक्टर. मी तसला माणूस नाही.’’ रघू काकुळतीने म्हणाला.
“ठीक आहे ठीक आहे.’’ पोराची अवस्था अवघड आहे. तुम्हाला कळत नाही? वर आमच्या गळ्याला फास लावता? सरकारी नोकर आहोत आम्हीसुद्धा.’’
पोराच्या अवस्थेमुळे, शकुंतलाच्या काळजाचं पाणी-पाणी झालं.
“डॉक्टरसाहेब, माझ्या पोराला वाचवा हो. हवं तर मी तुमचं अख्खं घर फुकटं रंगवून देईन.’’ रघू म्हणाला.
डॉक्टर त्याच्याकडे आश्चर्याने पहात राहिले.
“मिस्टर काहीही बोलू नका. ओके?’’ डॉक्टर म्हणाले.
मग त्यांनी सिस्टरला बोलावलं आणि काही सूचना दिल्या.
थोड्या वेळाने दादू झोपला.
रघू शलाकाच्या घरी कामाला गेला. त्याला स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं.

रघूने कामाला सुरुवात केली. हातातला रोलर गुलाबी लस्टर रंगामध्ये बुचकळून तो सफाईदारपणे भिंतीवर फिरवू लागला.
कनक आला. शलाकाचा मित्र.
शलाकाने रघूला त्याची ओळख करून दिली, “हा कनक. मी तुम्हाला म्हणलं नव्हतं, खूप मोठ्ठा आर्टिस्ट आहे.’’
कनक खळखळून हसला व तो रघूला म्हणाला, “यार, हम तो एकही बिरादरीके है. जो रंगोंसे खेलते है.’’
“नाही साहेब, तुम्ही कुठं-आम्ही कुठं? तुम्ही मोठे पेंटर, आम्ही तर रंगारी.’’
“अरे छट्! मी एखादी फ्रेम जिवंत करतो. तुम्ही तर अख्खं घर जिवंत करता राव!
“साहेब, हा तुमचा मोठेपणा आहे.’’
पण कनकच्या मोकळ्या, दिलखुलास स्वभावाने रघूला खूपच बरं वाटलं. कारण त्या बेडरूममध्ये आता दोघांना एकत्र काम करायचं होतं. रंगकामच असलं तरी एक आर्टिस्ट होता आणि एक पेंटर!
कनक एकदम मॉड होता. मोठे वाढवलेले, काळेभोर केस, त्यामध्ये झिगझॅग हेअर बँड, मागे केसांची पोनी. गळ्यात कसलीशी मोठ्या-मोठ्या मण्यांची रंगीबेरंगी माळ. हातामध्ये कडं, जपमाळेसारखी माळ - मनगटाला गुंडाळलेली. अंगात एक शॉर्ट कुर्ता, ज्यावर असंख्य वेगवेगळ्या आकृत्या आणि खाली विटकी जीन्स्.
कनकने बघता बघता, त्या भल्यामोठ्या भिंतीवर एक चित्र रेखाटलं -
शेतं, माळरान, छोटी-मोठी झाडं, देऊळ, त्यामागे धावणारी रेल्वे, एक प्रचंड वड, एक तलाव, तलावात होडी, भिंतीच्या एका बाजूला एक जुना मोठा वाडा आणि त्या वाड्याच्या प्रवेशद्वाराच्यावर गवाक्षात उभी असलेली, या सार्या दृश्याकडे पाहणारी एक शाळकरी मुलगी, गोबर्या गालांची वार्यावर भुसभुस केस उडत असलेली अशी एक गोड मुलगी.
रघू त्याचं काम थांबवून ते पहात राहिला.
शलाकाही आली. पहात राहिली.
रघू म्हणाला, “एवढं फास्ट?’’
“हा हा. मला एवढं फास्ट स्वत:लाच आवडत नाही, पण काय करणार? मॅडमना प्रॉमिस केलंय ना,’’ कनक शलाकाकडे पहात म्हणाला.
“साहेबांना हे उरकून आर्ट एक्झिबिशनसाठी पॅरीसला पळायचं आहे, हे कोण सांगणार?’’ शलाका कौतुकाने म्हणाली.
रघूला पॅरीस म्हणजे कुठे हे माहिती नसलं तरी कनक खरोखर मोठा माणूस आहे, हे त्याला कळलं.
“साहेब, मी याचा फोटो घेऊ?’’ रघूने विचारलं.
“घे ना. बिनधास्त घे,’’ कनक म्हणाला.
रघूने त्याच्या स्मार्टफोनमध्ये त्याचा फोटो घेतला. त्याच्या कंजूषपणावर त्याचा स्मार्टफोन अगदी उठून दिसायचा. पण ती धंद्याची गरज झाली होती. रंगवलेल्या घरांचे फोटो दुसर्या गिर्हाईकांना दाखवायला.
“खूप भारी चित्र आहे...! रघू उद्गारला.
“भारी नाहीये. आता ते भारी होईल, जिवंत होईल - रंगवल्यावर,’’ शलाका म्हणाली.
“पण तुम्ही हेच चित्र का काढलं?’’
शलाकाची नजर भूतकाळात हरवली.
“का म्हणजे? हे दृश्य खरं आहे. हा माझा गाव आहे आणि ती मुलगी म्हणजे मी आहे... आता गाव सुटलं. पण ते अजूनी माझ्या मनात आहे. स्वत:च्या घराच्या अंगणात मोठं तुळशी वृंदावन बांधणं हे जरी स्वप्न समजलो तरी घरातल्या कुंडीत तुळस लावता येतेच की!...
तेवढ्यात तिचं बोलणं तोडत तिचा मुलगा अनीश आत आला. त्याच्या डोळ्यांत बेफिकीर भाव होते. त्याच्या हातामध्ये टॅब होता. कुठलातरी मारधाड प्रकारचा गेम त्यात चालू होता.
“अंकलने चित्र भारी काढलंय. पण मग हे कशाला काढलंय? इथे मस्त मस्त सुपरहिरोज् काढायचे ना - स्पायडरमॅन, क्रिश, सुपरमॅन!...’’
रघू त्या पोराकडे पहात राहिला. दादूच्याच वयाचा होता तो.
“कसले डोंबलाचे सुपरहिरो?’’ शलाकाला ते अजिबात आवडलं नाही.
पण कनक खळखळून हसला. “अरे राजा, तुझ्या खोलीत हे चित्र हिने काढायला लावलं. आपण तिच्या खोलीत सुपरहिरोज्ची चित्र काढू.’’
अनीशला हसू आले. शलाका काहीतरी बोलणार होती; पण कनकने तिला गप्प बसण्यासाठी खुणावलं.
रघूला कनक एकदम आवडलाच.
अनीश आणि शलाका दोघेही बाहेर गेले. कनकने दार लावून घेतलं आणि तो चित्रावर रंगाचा पहिला हात देऊ लागला. आता चित्र, विचित्र दिसत होतं.
मग त्याने ब्रेक घेतला. रघू देत असलेल्या गुलाबी फिकट रंगाकडे तो पहात राहिला. “शलाकाने इथे गुलाबी रंग का निवडलाय, माहितीये? गुलाबी रंगाचं काय काय महत्त्व आहे, माहितीये?’’ त्याने विचारलं
रघूने नकारार्थी मान हलवली.
“गुलाबी रंग प्रेमाचा असतो आणि गुलाबी रंग माणसाचं मन शांत करतो. म्हणून तिने ही शेड निवडलीये पोरासाठी. पोरगं चंचल आहे.’’
रघू त्याच्या त्या सांगण्याकडे आश्चर्याने पहात राहिला.
“स्साला! इतकी वर्ष रंग देतो; पण हे नव्हतं माहिती.. शकुंतलाला हे कळलं तर ती हाच रंग द्या आपल्या घराला, असं म्हणेल, आपलं डोकं शांत व्हायला.’’
मग कनकने सिगरेट काढली व ती पेटवून त्याने झुरका घेतला.
“ओढणार का?’’ त्याने रघूला विचारलं.
“नाही.’’
“नाही? कसं काय - का तंबाखू?’’
“नाही साहेब. मला कुठलंच व्यसन नाही.’’
कनकला आश्चर्य वाटलं - खूप! पेंटिंगचं काम करणारा एक माणूस आणि त्याला कुठलंच व्यसन नाही?
“व्यसन नसेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण दिवसभर हे असं दमवणार, रंगांच्या वासांनी नको होणारं काम करूनही तुम्हाला असं काही करावं वाटत नाही?’’
“नाही साहेब. भरपूर काम करायचं आणि पैसे कमवायचे. बस एवढंच. मी कुठला शौक, कुठली हौस-मौज, काही करत नाही. मला फक्त कामाचं व्यसन आहे.!
“चांगली गोष्ट आहे. पण कामामध्ये ब्रेक पाहिजे. मी माझ्या आवडीचं काम करतो तरी मी पण ब्रेक घेतो. तो घेतल्याने माणूस ताजातवाना होतो. अन् तुम्हाला तर ब्रेक घेणं खूप आवश्यक आहे. त्याशिवाय तुमचं मन फ्रेश कसं होणार? त्या रंगाच्या सतत जवळ राहिल्याने शरीरावर परिणाम होतो. शेवटी केमिकल्स्च ना.
“होय साहेब.’’
“मग ब्रेक घ्यायचा. फॅमिलीबरोबर वेळ घालवायचा. काय पोरं-बाळं?’’
“आहे ना पोरगा. दवाखान्यात अॅडमिट आहे. स्वाईन फ्लू झालाय.’’
“अरे, मग तुम्ही इथे काय करताय? आधी पोराकडे जा तुम्ही.’’ कनक मनापासून ओरडला.
“पण पण...’’
कनकने रघूला बाहेरच काढलं, “मी सांगतो शलाकाला. काम तर नंतरही होईल.’’
रघू दवाखान्यात गेला. रस्त्याने सगळीकडे फडकी बांधलेली माणसं. सार्या शहरालाच स्मशानाची कळा आलेली होती.

दादूची अवस्था बिकट होती.
रघूने तयार पोळी-भाजी आणली. दादू तर काही खात-पित नव्हताच. पण शकुंतलानेही चारच घास खाल्ले. तेही बळजबरीने.
संध्याकाळ झाली आणि दादूला उलटी झाली - रक्ताची!
“बया!’’ करून शकुंतला ओरडली.
दादूचा शर्ट, बेडशीट सगळं लालभडक झालं. रघू पेंटर असला तरी पोराच्या रक्ताचा लाल रंग बघणं त्याला असह्य झालं. त्याने सिस्टरला बोलावून आणलं. तिने मावशीला बोलवलं. मावशीने सगळं स्वच्छ केलं अर्थात शकुंतलाची मदत घेऊनच.
आता शकुंतलाचा धीर सुटला होता.
रघूने मावशीला बाजूला घेतलं. मावशी एकदम जहाँबाज आणि तोंडाळ बाई होती. मध्यमवयीन आणि अंगाने आडवी. पेशंटस् आणि नातेवाईकांशी वाट्टेल तसं बोलायला मागे-पुढे न पाहणारी.
“अहो, नका काळजी करू. होईल ठीक. एकतर आधीच हा स्वाईन फ्लू डेंजर. त्यात तुमच्या पोराला दमा. अशा वेळेस धोका जास्त असतो...’’ मावशी बोलत होती.
धोका? - रघूच्या मनात कालवाकालव झाली.
“आन् तुम्ही आधी सांगितलं नाही. अशावेळी ते रिलेंझा औषध देता येत नाही. त्यामुळे डब्बल त्रास! दमा वाढला ना पोराचा. पण आता ते औषध थांबवलंय ना. होईल बरा.’’
“कधी?’’ रघूने मावशीसारख्या बाईला भाबडेपणाने, काळजीने प्रश्न विचारला.
“कधी? हे कसं सांगता येईल? डॉक्टरलापण सांगता येत नाही तर मी कधी सांगणार? काही होऊ शकतं!...’’ मावशी फटकळपणे बोलून पुढच्या कामाकडे वळाली.
रघू दादूशेजारी बसला. पण आता त्याची नजर हरवली होती.
थोड्या वेळाने दादू क्षीण हसला.
मग त्याला बरं वाटण्यासाठी रघू म्हणाला, ‘गंमत दाखवू?’’
दादूने मान हलवली.
रघूने त्याला कनकने काढलेल्या चित्राचा फोटो दाखवला.
दादूच्या क्षीण डोळ्यात चमक आली.
“बापू, आपल्या घरी असं एखादं चित्रं काढू या?’’
रघू एकदम सटकलाच. पोराला बरं नाही हे विसरलाच. त्याचा सगळा ताण रागाच्या स्वरूपात बाहेर आला.
“आपल्या घरी? अरे, आपल्या घरी काढायला जागा तरी आहे का? आणि त्याच्यात वेळ घालवून मी कामाची खोटी करून घेऊ काय?’’ तो जोरात ओरडला.
आजूबाजूचे लोकही पहायला लागले.
दादू बिचारा हिरमुसला. रडू लपवण्यासाठी त्याने डोळे मिटून घेतले.
शकुंतला कडाडली, “हा! नुस्ता पैसाच कमवा. आम्ही कोणी नकोच तुम्हाला. नुस्ता काम करा. बाकी काहीच नको... पोराचा जीव, पोराचं मन पण तुम्हाला महत्त्वाचं नाही...’’
साध्याशा शकुंतलाचा आत्ताचा आवेश वेगळाच होता. पोराची काळजी अन् नवर्याच्या निष्काळजीपणामुळे तर त्याला जणू धार चढलेली.
रघूच्या डोक्यात सणक गेली. तो तिरमिरला. त्याच्या डोळ्यात पाणी आले, पण रागाने.
तो उठून चालायला लागला. दवाखान्याच्या बाहेर गेला आणि आसपासच घुटमळत राहिला. भिंतीच्या रंगाचे जसे पोपडे पडतात तसे त्याच्या जणू मनाचे पोपडे पडत होते.
त्याला वाटत राहिलं - अनेक रंगांमध्ये बुचकळून निघाला तरी ब्रश तसाच राहतो. रंगहीन, कोरडा, राठ केसांचा. तसे आपण झालो आहोत, एखाद्या जुनाट ब्रशसारखे!
मग तो चहाच्या टपरीवर गेला. टपरीवाल्यालाही रघूची गाडी बिनसलीये हे कळलं. काही न बोलता त्याने चहा दिला. शून्यात नजर लावून रघू चहा पित राहिला.

तो शलाकाच्या घरी गेला.
कनक चित्र अजूनी रंगवत होता आणि ती भिंत आता जिवंत झाली होती. तो गाव जणू प्रत्यक्षात उतरला होता. नजरबंदी करणारा, नजर आत ओढून घेणारा. रघू त्याचं दु:ख, त्याचा रागही क्षणभर विसरला.
“काय पेंटर, पोरगा कसा आहे?’’
रघू काहीच बोलला नाही.
कनकच्या ते लक्षात आलं. मग तो पुढे म्हणाला, “डोंट वरी! होईल बरा.’’ मग त्याने विषय बदलला, “कसंय चित्र? जमलंय का?’’
“हे काय बोलणं झालं का साहेब? एक नंबर.’’
“अप्रतिम!’’ शलाका म्हणाली, “अप्रतिम म्हणा! मनाने तर मी केव्हाच माझ्या टुमदार गावात पोचलीये. तळेगावात. असं वाटतं आता वाड्यापुढच्या अंगणातल्या झाडाला दोर बांधून झोका खेळावा. हिंदोळून टाकावं स्वत:ला. या चकाचकपणाला झुगारावं आणि मोकळ्या मातीचा वास घ्यावा. पण हे सौंदर्य आणि हा निसर्ग राहिलाय कुठे गावात? सगळं निमशहरी भकासपण!...’’ शलाका गतकाळाच्या हरवलेल्या वैभवाच्या दु:खाने म्हणाली.
मग तिने विषय बदलला, “कसा आहे छोकरा आता?’’
“तब्येत नाजूक आहे. तेच सांगायला आलो होतो. आज काम झालं असतं. पण उद्या आणि उद्या नाही जमलं तर परवा पूर्ण करतो.’’
“ठीक आहे हरकत नाही.’’ शलाका म्हणाली.
मग रघूने कनकच्या परवानगीने चित्राचे अजून फोटो काढले. चित्र झालं होतं. पण अजून कनकचा स्वत:चा खास टच राहिला होता.

आता दुकानं बंद व्हायची वेळ आली होती. रघू त्याच्या नेहमीच्या दुकानात गेला व त्याने अनेक रंग विकत घेतले. वेगवेगळ्या शेडस्चे. छोट्या-मोठ्या साईजचे ब्रशसुद्धा. आणि त्याच्या मनाला आज खर्चाचा विचारसुद्धा शिवला नाही.
रात्र झाली होती. रघू घराकडे चालला होता. त्याने शकुंतलाला फोन केला नव्हता. तिनेही फोन केला नव्हता. तशी ती मानी होती.
त्याला वाटत होतं - तिचा फोन येऊच नये. जर आलाच - जर आलाच तर दादूच्या तब्येतीच्या खुशालीचाच यावा.
त्यांच्या मनाला आता उभारी नव्हती. पोराला रक्ताची उलटी झालेली, त्यात त्या मावशीने जे खरं आहे ते स्पष्ट सांगून टाकलेलं.
वारं अगदी थांबलं होतं. झाडाचं पानही हलत नव्हतं. सारं कोंदट वातावरण. वाटेत त्याला बहावा लागला, बोगनवेल आणि गुलमोहोरही. पण रात्रीच्या अंधारात जणू सगळ्या झाडांनी तोंड काळं केलं होतं. पानांचा हिरवेपणा, फुलांचा रंगीबेरंगीपणा काळवंडलेला होता. रात्रीच्या भिंतीवरचे फिकट काळेपणाचे पोपडे पडून त्याठिकाणी जणू आतला गडद काळेपणा त्या झाडांच्या रूपाने उघडा पडला होता.

दादूचं घर एका झोपडपट्टीत होतं. म्हणायला झोपडपट्टी पण सगळी पक्की बांधलेली बैठी घरं. त्यातलीच एक खोली त्याची होती.
छोटंसं घर. दाराच्या समोर ओटा. त्यापलीकडे फ्रीज. त्यापलीकडे एक कपाट. त्यामध्ये टीव्ही. त्यावर देवाचे दोन फोटो.
एका कोपर्यात एक कॉट. कॉटच्या वर नायलॉनच्या दोन दोर्या बांधलेल्या. त्यावर सगळे कपडे. रघूचे, शकुंतलाचे आणि दादूचेही आणि कॉटच्याही खाली काही सामान, बोचकी, पाण्याने भरलेली बादली.
रघू आपल्या घरावरून नजर फिरवत राहिलेला. त्याच्या नजरेतून तर अनेक घरं गेलेली. छोटी-मोठी, बंगले, अन् फार्महाऊसेससुद्धा. पण आज स्वत:चंच घर तो जणू नव्याने पहात होता.
घरसुद्धा त्याने गिर्हाईकाच्या उरलेल्या रंगांतून रंगवलेलं होतं. पण ते रंगही काळवंडलेले होते. भिंतीला पोपडे धरले होते. रघू घरं रंगवायचं काम करतो यावर विश्वास बसणार नाही, घराची अशी अवस्था होती.
त्याने कॉटवरचे सगळे कपडे काढले. एका बाजूला टाकले. मग त्या नायलॉनच्या दोर्याही सोडवल्या. भिंत मोकळी झाली. तो साधारण पाच फूट बाय तीन फूट एवढा पट्टा होता. त्याने कॉटवर पेपर अंथरले आणि एमरी पेपरने भिंत खरडायची सुरुवात केली. मग त्याने प्रायमरही दिला.
प्रायमर वाळण्याची वाट पहात तो कॉटवर लवंडला. त्या रंगवलेल्या मोकळ्या पट्ट्याकडे पहात. त्याची नजर त्या रंगात ओढली गेली.
रघूचं मन दादू एवढं झालं. तो मनाने त्याच्या गावात पोचला. त्याच्या शाळेत पोचला. त्याच्या वर्गात आणि त्याच्या चित्रकलेच्या वहीत...
गावाकडच्या आठवणींचा त्याच्या मनात जपलेला एक हळवा कोपरा आज अचानक उघडा पडला. हरवलेले ते सोनेरी क्षण वरचा कृत्रिम रंग झुगारून स्वत:च्या मूळ सौंदर्यानिशी लखलखू लागले.
रघू खरं तर हुशार मुलगा होता. त्याला चित्रकलेची आवड होती. पण मार्गदर्शन नव्हतं. पुढे तर गरिबीमुळे त्याची शाळाच सुटली. गावही सुटलं. शिक्षणही राहिलं आणि चित्रकलाही. पण हातात ब्रश तेवढा आला - भिंती रंगवायचा!
एव्हाना रात्र चांगलीच वाढलेली. रघूला केव्हा झोप लागली ते त्याला कळलंही नाही. थोड्या वेळाने त्याला जाग आली. उष्म्यामुळे आणि फॅनमुळे प्रायमर वाळला होता. किंचितच ओलसरपणा होता.
मग त्याने कनकच्या चित्राचा फोटो पाहिला. मोबाईलमध्ये तो आधीचा, नंतरचा असे फोटो पहात राहिला. अंदाज घेण्यासाठी.
आता तो दादूसाठी चित्र रंगवणार होता. खूप वर्षांनी तो चित्र काढणार होता.
त्याने चित्र काढायची सुरुवात केली.
एका बाजूला छोटा त्रिकोण साधलेला जमिनीचा पट्टा, गवताने मढलेला. त्यावर काही रानटी फुलं. एक फुलपाखरू त्यावर बागडणारं. त्यानंतर नदी. पलीकडच्या काठावर एक भलं मोठं वडाचं झाड. झाडाखाली, आसपास सगळी हिरवळ. त्यावर चरणार्या गाई. वडाचं झाड केंद्रस्थानी होतं. त्या झाडावरून एक मुलगा डोकवत होता. शाळेचा पांढरा सदरा आणि खाकी चड्डी घातलेला. तो रघू होता.
पण रघूला त्याचा चेहरा दादूसारखा वाटत होता.
पण तो फक्त एका मुलाचा चेहरा होता. तो चेहरा रघूचाही नव्हता आणि दादूचाही. कारण चित्र छान होतं. फक्त छान. शलाकाच्या घरातल्या चित्राशी कुठल्याच बाबतीत तुलना न होणारं. शेवटी ‘ते’ चित्र कनकने काढलं होतं.
मग त्याने रंगवायची सुरुवात केली. त्याला त्याचं चित्र छान वाटत होतं आणि नव्हतंही. प्रायमर पूर्ण वाळला नसल्याने थोडा रंगही नीट बसत नव्हता.
रघू दमला. चित्र जवळजवळ पूर्ण झालं होतं. तो पुन्हा लवंडला. खालचा थोडा भाग राहिला होता. गवताचा. तो त्या चित्राकडे पहात राहिला. त्याला वाटलं.
छे! भिंतभर रंग आणि चित्रकारी कमी. रस्त्यावरच्या भिंतींसारखं!... चित्र काही जमलेलं नाही आपल्याला.
त्याला कधी डोळा लागला ते कळलंच नाही.
पण त्याच्या चेहर्यावर झोपेतही समाधान होतं. शेवटी त्याने पोरासाठी म्हणून चित्र काढलं होतं, एका बापाने काढलेलं चित्र.
त्याने चित्रात काढलेलं ते खालच्या बाजूचं केशरी रंगाचं फुलपाखरू एकदम उडायला लागलं आणि उडत-उडत चित्रातून बाहेर आलं. नाहीसंच झालं...
नंतर दवाखान्यातल्या मावशीचा चेहरा दिसू लागला. तिने ते फुलपाखरू निष्ठुरपणे धरलेलं होतं आणि ती म्हणत होती - काहीही होऊ शकतं!
रघू दचकून झोपेतून जागाच झाला. काय तरी स्वप्न?... त्याचा चेहरा घामाने डवरला. त्याचा श्वास जोरजोरात सुरू झाला. त्याने डोळे उघडले.
त्याचं लक्ष चित्राकडे गेलं. फुलपाखरू आहे त्याच जागी होतं. रंगविहीन. ते रंगवायचं राहिलं होतं.

तो तसाच वेड्यासारखा दवाखान्यात गेला.
आता उजाडायला लागलं होतं.
जाताना त्याच्या डोक्यात ते मावशीचंच वाक्य घुमत होतं - काहीही होऊ शकतं!
तो धावतच वॉर्डात शिरला.
दादू झोपला होता की निश्चल पडला होता? देव जाणे. त्याला कळेचना. त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यात शकुंतला जागेवर नव्हती.
त्याने दादूच्या डोक्यावरून हात फिरवला.
आणि बापूच्या स्पर्शाने दादू जागा झाला.
पोराला जिवंत पाहून दादूचा जीव भांड्यात पडला. तो आनंदला.
वडलांना पाहून त्याच्या डोळ्यांत आनंदाची चमक आली. काल संध्याकाळपासून त्याला त्याचा बापू दिसला नव्हता. पलीकडून शकुंतला पाणी घेऊन आली.
नवरा आल्याचं पाहून शकुंतलाला बरं वाटलं; पण तिने दाखवलं नाही.
“दादूबाबा, कसा आहेस आता? तुला काय आणू? काय पाहिजे तुला? तू म्हणशील ते आणीन, तू म्हणशील ते करीन.’’
दादूला चित्राचा विषय अजूनही काढायचा होता. पण तो गप्प बसला.
“मला काही नको. आता मी बरा आहे.’’
रघूचे डोळे पाण्याने डबडबले. त्याने शकुंतलाकडे पाहिलं. मग ती म्हणाली, “औषध बदलल्यावर त्याला फरक पडला. रात्री झोपही लागली. आज त्याला बरंय...!’’
त्याने शंकुतलाचा हात हातात धरला.
मग तीच म्हणाली, “आज कामाला नाही जायचं?’’
रघू ठामपणे म्हणाला, “नाही! आज मी इथेच थांबणार.’’
मग शकुंतलाच म्हणाली, “अहो, जावा कामाला. थोडं काम राहिलंय म्हणाला ना. संपवा ते. आज पोराला बरं वाटलं तर संध्याकाळी सोडणारेत. तेव्हा लवकर या.’’

रघूने शलाकाचं काम संपवलं.
कनक चित्र पूर्ण करून गेलाही होता. भिंतीवर एक अस्सल, जिवंत कलाकृती उमटवून. आता ती भिंत जणू अदृश्य झाली होती. तिथं होतं - एक जुनं गाव जिवंत करणारं, काव्यात्म, भलंमोठं, सुंदरसं लँडस्केप!

दवाखान्यात पेशंटची रीघ चालूच होती. अतिदक्षता विभागातले, व्हेंटिलेटरवर असलेले पेशंट सोडून, जे पेशंट बाहेर होते, ज्यांना बरं वाटत होतं, त्यांना घरी सोडण्यात येत होतं. सतत येणार्या पेशंटस्मुळे नवीन लोकांसाठी जागा केली जात होती.
दादूला पुष्कळ बरं होतं. संध्याकाळी दादूला डिस्चार्ज मिळाला. ते घरी आले. दारातून पाय आत टाकताक्षणीच दादू आनंदला. घरातलं चित्र पाहून तो ‘वॉव!’ करून ओरडला.
शेवटी बापूने चित्र काढलं होतं आणि त्याला ते खूप आवडलं होतं. खूप!... साधंसच असलं तरी.
जमिनीवर रंगाचं साहित्य तसंच होतं.
मग त्याने खाली असलेल्या ब्रशमधून एक ब्रश उचलला, केशरी रंगात बुचकळला आणि तो कॉटवर चढला.
त्या बिनरंगाच्या फुलपाखराला त्याने केशरी रंगाने रंगवलं.
तेवढ्या श्रमानेही त्याला थकवा आला. तो मटकन खाली बसला. त्याला आजारातून पूर्ण बरं व्हायला अजून बरेच दिवस लागणार होते.
मग रघूने त्याला प्रेमाने जवळ घेतलं. त्याला निजवलं.
दादूचे डोळे त्या फुलपाखरावरच होते.
ते केशरी रंगाचं फुलपाखरू आता जणू जिवंत झालं होतं. कुठेही बागडायला!... चौकटीच्या आतही अन् बाहेरही!

- बिपीन सुरेश सांगळे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

साधारण दहा मिनिटे मोबाईल स्क्रीनकडे बघत बसलो होतो, कारण अशा दर्जेदार कथेला काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हतं.
या वर्षातील माबोवरची सर्वात उत्तम कथा, ज्या प्रकारे कथेचा शेवट केला आहे, त्याला तोड नाही.
प्रतिभेचा वरदहस्त तुमच्यावर आहे, तर आता फक्त नियमित लिहीत रहा.

अतिशय सुरेख आणि गुंगवून टाकणारी कथा .
म्हटलं तर किती छोटा जीव आहे कथेचा.. पण इतकी सुंदर लिहिली आहे .
खूप छान.

Submitted by चैतन्य रासकर on 2 March, 2019 - 23:28. >>>>>>. या पूर्ण पोस्टशी सहमत.
अतिशय सुंदर कथा. उत्कृष्ट रंगवली आहे, खूप खूप आवडली. शेवट तर उच्चच आहे. मनात सतत ताण होता की दादू चं काय होणार, पण इतका हळुवार शेवट अवडला.

चैतन्यजी ,

आपली प्रतिक्रिया खूप अमूल्य आहे माझ्यासाठी .
मी नम्रपणे स्वीकार करतो .
तुमच्या प्रतिक्रिया देण्यात हि एक लेखक पण डोकवतेच , त्याचे हि कौतुक आहे !

आणि काय बोलू ?

लिहायला हुरूप येतो हो , असे वाचले कि .

नितांत सुंदर,
सुखद शेवट केल्याबद्दल विशेष धन्यवाद Happy

अगदी सुरेख आहे कथा! Happy काही कथा मनाला स्पर्शून जातात, वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात, कथा वाचून झाली तरी तिचा गाभा, तिच्यातली पात्रं डोक्यात घोळत राहतात; अगदी त्याच पंक्तीत बसणारी ही कथा आहे! कथेची मांडणी, पात्रं, त्यांचं भावविश्व, प्रसंग अगदी उत्कृष्ट जमलंय.

असंच दर्जेदार लिखाण तुमच्याकडून वाचायला मिळूदेत! Happy

अप्रतिम...खूपच सुंदर...खरे पाहता शब्दच अपुरे आहेत...प्रत्येक पात्राचे विश्व सुरेख रंगवले आहे..चित्रच डोळ्यासमोर उभे राहिले Happy

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार .
मायबोली साठी मी एक नवीन लेखक आहे ,
तरीही एवढे प्रेम ... शब्द नाहीत माझ्या कडे .

एक नम्र विनंती ,
कृपया ज्यांनी माझ्या इतर कथा वाचलेल्या नाहीत यांनी त्या वाचाव्यात .
त्यातले बरे वाईट सांगावे .

पुन्हा धन्यवाद .

खूप खूप सुंदर झाली आहे कथा !
मला थेट " The Last Leaf " या " O Henry" च्या कथेची आठवण झाली.
तुम्ही वाचली नसेल तर " O Henry" च्या कथा जरूर वाचा. तुम्हाला आवडतील , तुमच्या कवी मनावर उत्तम संस्काऱही होतील, त्या तुमचे लिखाण आणिक सम्रुद्ध करतील.

खूप सुंदर आहे कथा! रघू, कनक, शलाका, शकुंतला, दादू, अनीश, चहावाला , सगळी पात्रं काय बरोब्बर रेखाटली आहेत! डोळ्यांसमोर उभी राहिली. जबरी!

शेवट सुखी केल्याबद्दल धन्यवाद.

<< अगदी सुरेख आहे कथा! Happy काही कथा मनाला स्पर्शून जातात, वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात, कथा वाचून झाली तरी तिचा गाभा, तिच्यातली पात्रं डोक्यात घोळत राहतात; अगदी त्याच पंक्तीत बसणारी ही कथा आहे! कथेची मांडणी, पात्रं, त्यांचं भावविश्व, प्रसंग अगदी उत्कृष्ट जमलंय.

असंच दर्जेदार लिखाण तुमच्याकडून वाचायला मिळूदेत! >>+१००००

Pages