क्वांटम मॅन - रिचर्ड फाइनमन - विज्ञानभाषा मराठी

Submitted by टवणे सर on 21 February, 2019 - 00:06

जीन वाइग्नरने रिचर्ड फाइनमनबद्दल बोलताना म्हटले होते "He's another Dirac. Only this time human.".
फाइनमनमधला हा ह्युमन असण्याचा गूण फार मोलाचा होता. आयुष्यभर या माणसाचे कुतुहल शमले नाही, जाणून घेण्याची आस संपली नाही आणि लहान मुलासारखे हसू मिटले नाही.
आइन्स्टाइनच्या रिलेटिव्हिटीचा सिद्धांत e = mc2 हा त्याच्या सौंदर्याकडे न पाहता ५गुणांसाठी सिद्धता पाठ करणार्‍या लोकांपैकी मी एक. तेव्हा फाइनमनच्या संशोधनाबद्दल लिहिण्याची माझी योग्यता नाही. मात्र फाइनमनवद्दल व त्याने लिहिलेल्या व त्याच्यावर लिहिलेल्या काही पुस्तकांची ओळख इतपतच या लेखाची मर्यादा असणार आहे.

१९१८ साली एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात न्युयॉर्कमध्ये रिचर्ड फाइनमनचा जन्म झाला. सेल्समन असलेल्या त्याच्या वडिलांनी त्याच्यात कुतुहल जागृत होईल याची मात्र पुरेपूर खात्री बाळगली. एखाद्या स्थिर वस्तुला जर बाहेरून बल लावले नाही तर ती वस्तु आपली जागा सोडत नाही हा न्युटनचा पहिला सिद्धांत समजावताना 'मात्र तसे का आहे हे मात्र माहिती नाही' हे सांगायला त्याचे वडिल विसरले नाहीत. एखाद्या संकल्पनेचे वा अनुभव माहिती असणे आणि ती संकल्पना वा अनुभवाच्या मागचे कारण माहिती असणे यातला फरक फाइनमनला नकळत कळला होता.
लहानपणीच गणितात विशेष प्राविण्य दर्शविलेल्या फाइनमनला एम.आय.टी.मध्ये सहज प्रवेश मिळाला. सुरुवातीला तो गणित विभागात दाखल झाला होता पण लवकरच त्याच्या आतल्या निसर्गाच्या अभ्यासकाने भौतिकशास्त्राकडे गाडी वळवली. हा फार महत्त्वाचा निर्णय ठरला. फाइनमनच्या भौतिक शास्त्रातील संशोधनात त्याच्या अचाट गणिती प्रतिभेचा फार मोठा सहभाग आहे. एमआयटीमधून पदवीधर होताना दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. ओपेनहायमरचे फाइनमनला अणुबाँब बनवण्याच्या प्रोजेक्टमध्ये सामील होण्याची संधी दिली आणि दूर न्यू मेक्सिकोत लॉस अलामोस या ठिकाणी रुजू होण्यास सांगितले. पण फाइनमनची लहानपणापासूनची मैत्रिण व वाग्दत्त वधू आर्लिन हिला विशीतच टीबी झाला होता. फाइनमनने तरिही तिच्याशी लग्न केले व तिला त्या स्थितीत सोडून दूर जाण्यास तो तयार नव्हता. ओपेनहायमर केवळ महान शास्त्रज्ञच नव्हता तर कुशल व्यवस्थापक आणि माणसांचा माणूस होता. त्याने आर्लिनची लॉस अलामोसच्या जवळच एका सॅनिटोरियममध्ये व्यवस्था करून दिली व फाइनमन मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये कामाला लागला. इथे त्याने भौतिकशास्त्रात फार मूलभूत कामगिरी केली नसली तरी भली मोठी आणि अवघड गणिते/गणितांच्या सिस्टम्स कमी वेळात सोडवण्यासाठी पॅरलल प्रोसेसिंगच्या क्लॄप्त्या वापरून प्रोजेक्टचा एकूण काळ कमी करण्यात मोलाची कामगिरी बजावली.
फाइनमनचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती मूलभूत होता याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा पहिला अणुस्फोट केला तेव्हा सर्व शास्त्रज्ञ गडद काळ्या रंगाच्या चष्म्यातून पाहात होते कारण अणुस्फोटातून होणार्‍या प्रकाशाने हानी पोचेल अशी अटकळ होती. हा जगातला पहिला अणुस्फोट होता. फाइनमन शांतपणे एका ट्रकच्या केबिनमध्ये जाउन बसला आणि तिथून बहुतेक त्याने एकट्यानेच चष्म्याविना प्रत्यक्ष हा स्फोट पाहिला. कारण अल्ट्रावायोलेट किरण विंडशिल्डमधून गाळले जातील आणि फार फार तर फार ब्राइट प्रकाश असेल ज्याने फार हानी होणार नाही ही कारणमिमांसा त्याने तिथल्या तिथे केली.

याच दरम्यान आर्लीनचा मृत्यु झाला. फाइनमन त्यामुळे चांगलाच खचला. जपानवर अणुबाँब पडल्यावर झालेल्या हानीनेदेखील त्याला मोठा धक्का बसला. सुदैवाने त्याला समजून घेऊ शकेल अशी मानसिकता असलेल्या हान्स बेथ या थेरॉटिकल फिजिसिस्टबरोबर फाइनमनची लॉस अलामोसमध्ये दोस्ती झाली होती. बेथेच्या बरोबर काम करता येईल म्हणून तो कॉर्नेल विद्यापीठात रुजू झाला. आपली मानसिक मरगळ हळू हळू झटकत, अनेक मुलींबरोबर डेटिंग करत फाइनमन आपल्या कामातदेखील मोठी प्रगती करू लागला. हा काळ पुंजभौतिकीचा (क्वांटम मेकॅनिक्स) एक प्रकारे सुवर्णकाळ होता. फाइनमनच्या गणिती प्रतिभेचा नमुना त्याने पाथ इंटिग्रल ही संकल्पना मांडून व त्याद्वारे पुंजभौतिकीतला एक अनेक दिवस न उकललेल्या प्रश्नाचे उत्तर त्याने शोधले. ज्या सिद्धांत/प्रमेयाचा प्रत्यक्ष प्रयोगाबरोबर मेळ घालता येत नाही तो चूक, मग भले तो कितीही सुंदर असो यावर फाइनमनचा ठाम विश्वास होता. फाइनमनच्या पद्धतीने अनेक दिवस ठाण मांडून बसलेल्या अनंताला (इन्फिनिटीला) पूर्णविराम मिळाला वा क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स या शाखेला गती मिळाली. अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेल्या फाइनमन डायग्रॅम्स तर पुढे अनेक इतर विषयात वापरल्या गेल्या. त्याच्या नोबेल पारितोषिकाच्या वेळी केलेल्या भाषणातले हे एक वाक्य त्याच्या संशोधनामागच्या प्रेरणेचे एक समर्पक रुपक आहे.
Perhaps a thing is simple if you can describe it fully in several different ways without immediately knowing that you are describing the same thing.
फाइनमनने पुढे सुपरफ्लुइडिटी, मटेरिअल सायन्स आणि अनेक विविध विषयात मुक्त संचार केला. त्याच्या कल्पनांनी प्रेरीत होऊन इतरकी काही शास्त्रज्ञांनी मूलभूत संशोधन केले जसे फ्रीमन डायसन आणि मरे-गेलमन. चॅलेंजर अवकाशयानाच्या दुर्घटनेसाठी नेमलेल्या समितीत फाइनमने केलेल्या कामामुळे या दुर्घटनेच्या मुळाशी असलेली कारणे जगासमोर आली. या समितीवरील कामामुळे व तिच्या दुरचित्रवाणीवर दाखवल्या गेलेल्या पत्रकार परिषदांमुळे फाइनमन अमेरिकेत घरोघरी पोचला.

फेनमनने शुअरली यु आर जोकिंग नावाने त्याचे 'कुतुहलांचे' चरित्र प्रकाशित केले आणि तो अनेक सामान्य वाचकांपर्यंत पोहोचला. हे पुस्तक वाचताना एक अत्यंत प्रामाणिक, मस्करी करणारा मनुष्य आपल्याशी गप्पा मारतो आहे असेच वाटत राहते. फाइनमनने ब्राझिलमध्ये जाउन पोर्तुगीज भाषा शिकून तिथे भौतिकशास्त्राच्या अध्यापनात भर घालण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झालाच पण त्याचसोबत जगाला एक सांबा र्हिदम वाजवणारा ड्रमर मिळाला. तिथल्या कार्नवलमध्ये ड्रम वाजवणार्‍या परेडमध्ये सहभागी होण्याइतके प्राविण्य त्याने मिळवले.
द प्लेजर ऑफ फाइंडिंग थिंग्ज आउट या त्याच्या दुसर्‍या पुस्तकात त्याच्या कधीही न शमलेल्या कुतुहलाबद्दल त्याने विस्ताराने लिहिले आहे. आयुष्यात कधीही ब्रश हातात न धरलेल्या या माणसाने वयाच्या पन्नाशीत एका चित्रकाराला भौतिकशास्त्र शिकवले व बदल्यात त्याच्याकडून चित्रकला शिकला. शास्त्रज्ञ एखाद्या सुंदर गुलाबाचे शास्त्रीय वर्णन करून त्यातले सौंदर्य नष्ट करतात या विधानाचा समाचार घेताना शास्त्रीय निरिक्षणात आणि निवेदनातले सौंदर्य फाइनमन फार समर्पकरित्या मांडतो.
लॉस अलामोसमध्ये इतर शास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी यांच्या कार्यलयाची कुलुपे उघडणे, तिजोर्‍यांची काँबिनेशन ओळखणे यासाठी फाइनमन प्रसिद्ध झाला होता. ते तो कसे करायचा हे वाचण्यातच मजा आहे. जसे की तिजोरीच्या कॉम्बिनेशन लॉकचे कॉम्बिनेशन तिथेच कुठेतरी लिहून ठेवलेले असे! अवघड अंकगणिते सोडवताना कधी कधी इन्टुइशन कशी उपयोगाची ठरते याचेही काही किस्से पुस्तकात आहे. ही इन्टुइशन फाइनमनला आयुष्यभर साथ देत राहिली.

फाइनमनची अफाट निरिक्षणशक्ती आणि तार्किक विचारपद्धतीचा नमुना त्याच्या आयुष्यातील सर्वात दु:खद प्रसंगीसुद्धा दिसून आला. त्याची पहिली पत्नी आर्लीनचे निधन झाले तेव्हा ती पंचविशीत होती आणि फाइनमन जेमतेम सत्तावीस. तिच्या निधनाने तो अत्यंत दु:खी झाला होता. ती गेल्यावर त्याच्या लक्षात आले की तिच्या दवाखान्यातील पलंगाशेजारील घड्याळ ती गेली त्याच वेळेस थांबले होते. दुसरा कुणीही त्याच्या जागी असता तर या घटनेची सांगड अधिभौतिकाशी घातली असती. पण फाइनमनच्या लगेच लक्षात आले ते घड्याळ त्याने खाटखुट करून दुरुस्त केले होते व हलवाहलवी केली तर बंद पडत होते. आर्लीन गेली तेव्हा बहुतेक नर्सने वेळ बघण्यासाठी ते उचलले असणार आणि त्यामुळे ते बंद पडले असण्याची शक्यता सर्वात अधिक आहे. आर्लीन गेल्यागेल्या त्याने तिच्या केसांचा मुका घेतला व त्याच्या लक्षात राहिले की तिच्या केसांना येणारा वास ती जीवंत असताना होता तसाच आहे. त्या क्षणी त्याला विभ्रम वाटला. पण दुसर्‍या दिवशी त्याच्या लक्षात आले की ती गेल्याक्षणी केसांना येणार वास बदलण्याची शक्यता काही नव्हतीच.

सिक्स इझी पिसेस आणि सिक्स नॉट सो इझी पिसेस ही त्याची मूलभूत भौतिकशास्त्रावरची व्याख्याने पुस्तकरुपाने प्रदर्शित केलेली आहेत. यातले सिक्स इझी पिसेस तर प्रत्येकाने वाचावेच. न्युटनच्या मूलभूत तीन सिद्धांतापासून सुरुवात करत आपण शाळेत/कॉलेजात शिकलेल्या भौतिकशास्त्राला फाइनमन अत्यंत रंजकतेने व सुलभतेने आपल्यासमोर सादर करतो.

या व्यतिरिक्त फाइनमनची इतरही काही पुस्तके आहेत - काही पुंजभौतिकीवर तर व्हॉट डू यु केअर व्हॉट आदर पीपल थिंक सारखी त्याची आयुष्यावरची. ही सर्वच वाचनीय आहेत.

फाइनमनवर लिहिलेल्या पुस्तकांपैकी मी जी दोन वाचली त्यांचा नक्कीच उल्लेख करेन. लिओनार्ड म्लॉडिनॉव्ह एक नुकताच विशीत पदार्पण केलेला खूप मोठे नाव होऊन कॅलटेकमध्ये दाखल झालेला आणि आता पुढे काय हा प्रश्न एव्हरेस्टसारखा पुढ्यात ठाकलेला एक तरुण भौतिकशास्त्रज्ञ होता. त्यावेळी फाइनमन कॅन्सरच्या एका चक्रातून बाहेर पडून दुसर्‍या चक्रात सापडला होता, अशक्त झाला होता. म्लॉडिनॉव्हच्या सक्षम लेखणीतून त्याच्या फाइनमनबरोबर कॅलटेकच्या भौतिकशास्त्र विभागात झालेल्या काही मोजक्या भेटीघाटी व त्याचवेळी स्वतः म्लॉडिनॉव्हच्या अंतर्गत द्वंद्वाचे फार सुरेख चित्रण उमटले आहे.
लॉरेन्स क्राउसने क्वांटम मॅन या फाइनमनवरील पुस्तकात त्याच्या संशोधनाची, वैज्ञानिक सिद्धांतांची, विचारपद्धतीची, आयुधांची व त्याद्वारे आयुष्याकडे बघण्याच्या त्याच्या नजरेची फारच सुरेख ओळख करून दिली आहे. फाइनमन म्हटले की त्याचा विलक्षण स्वभाव, वन-लाइनर्स अ‍ॅनेक्डोट, बंधनांना झुगारून देण्याची बंडखोर वृत्ती याच बाबींवर जास्त भर दिला जातो. मात्र क्राउस याला बाजूल ठेवत फाइनमनच्या विज्ञानाची ओळख आपल्याला करून देतो पण त्याचवेळी फाइनमनचे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्वही आपल्या समोर आणतो. फाइनमनचे काही दुर्गुण जसे पेपर लिहिण्यास आळस करणे, इन्टुशनने उत्तराशी आधी पोचून मग सिद्धता सोडवत मागे येणे इत्यादी बाबी पुस्तकात सविस्तर येतात. पण जसे आइन्स्टाइनची 'चूक'सुद्धा बरोबर 'कॉन्स्टंट' निघाली तसे फाइनमनचे हे दुर्गुण त्याला फार तोट्यात घेऊन गेले नाहीत. तो त्याच्या क्षेत्रातल्या प्रगतीवर बारीक लक्ष ठेवत नसे, जर्नल्समध्ये वगैरे येणारे लेखांकडे कधी कधी दुर्लक्ष करी. त्यामुळे अनेकदा आधीच प्रसिद्ध झालेले सिद्धांत तो त्याच्या दृष्टीने नव्याने सिद्ध करे. पण त्यामुळे त्याला स्वतः शोधण्याचा जो आनंद मिळत असे तो अवर्णनीय असे. तसेच त्याने आधी शोधले वा सिद्ध केले पण प्रकाशित करण्याच्या आळसामुळे बरेचदा दुसरा कोणीतरी काही काळानंतर स्वतःच्या प्रयत्नातून ते प्रसिद्ध करत असे. अश्यावेळी दुसर्‍याला त्याचे श्रेय मिळाले याबद्दल फाइनमनच्या मनात मुळीच कटूता नसे, बरेचदा आनंदच असे.

आपल्या सुदैवाने फाइनमनची अनेक व्याख्याने (लेक्चर्स), मुलाखती, बीबीसीने त्याच्यावर बनवलेला महितीपट इत्यादी दृकश्राव्य संसाधने उपलब्ध आहेत जी या विलक्षण प्रभृतीला जिवंतपणे आपल्यासमोर आणतात.

व्याख्या पाठ करवणार्‍या व त्या जशाच्या तश्या परिक्षेत उतरवणार्‍या शिक्षणाच्या विरोधात फाइनमन आयुष्यभर बोलला. माझे सर्व शिक्षण या पुनरोत्पादनाच्या पद्धतीतच झाले. रिसर्च म्हणजे जे सर्च केले आहे ते पुन्हा लिहिणे असे माझा रूममेट म्हणत असे. माझ्या सुदैवाने मला आयुष्यात फाइनमन पुस्तकरुपाने भेटला. तो तुम्हालाही व तुमच्या द्वारे तुमच्या पुढल्या पिढीला भेटो ही सदिच्छा!

त.टि.१: लेखाचे शीर्षक क्राउसच्या फाइनमनवरील पुस्तकाचे जसेच्या तसे वापरले आहे.
त.टि.२: शास्त्रीय संकल्पनांना जर चुकीच्या पद्धतीने मांडले असेल तर दोष पूर्णपणे माझा आहे. प्रतिक्रियात चुका दाखवल्या तर लेखात तसे लगेच बदल करेन.

फाइनमन यांची ग्रंथसंपदा: https://www.goodreads.com/author/show/1429989.Richard_Feynman

म्लॉडिनॉव्हचे पुस्तकः https://www.goodreads.com/book/show/45776.Feynman_s_Rainbow

लॉरेन्स क्राउसचे पुस्तकः https://www.goodreads.com/book/show/8586536-quantum-man

जेम्स ग्लेइकने लिहिलेले चरित्रः https://www.goodreads.com/book/show/98685.Genius

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला लेख.
रिचर्ड फाइनमन मला माणूस म्हणूनही आवडतो.

छान ओळख. शुअर्ली यु आर जोकिन्ग वाचल्यानंतर मला माझा इंटलेक्चुअल बाप सापडल्या चे फीलिन्ग आले होते . ते अजूनही कायम आहे.
सांबा ड्रमर, चित्रकार शास्त्र ज्ञ व अतिशय चांगला सेन्स ऑफ ह्युमर असलेला माणूस.

लेख आवडला. पुस्तकांच्या नावांबददल धन्यवाद.

हा काळ पुंजभौतिकीचा (क्वांटम मेकॅनिक्स) एक प्रकारे सुवर्णकाळ होता.>> पुंजभौतिकी =क्वांटम फिजिक्स ना?

एक चांगला आणि माहितीपूर्ण लेख.

फाइनमन यांच्या विषयी वाचले होते. त्यातून त्यांच्याविषयी प्रामुख्याने दोन गोष्टी लक्षात राहिल्या होत्या:

१/ ऐंशीच्या दशकात, जेंव्हा आपल्याकडे सध्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉम्पुटर विषयीसुद्धा फार कोणी ऐकले नव्हते, तेंव्हा फाइनमन यांनी क्वांटम कॉम्पुटर (भविष्यात येऊ घातलेले) साठीचे अल्गोरिदम लिहून ठेवले आहेत.

२/ चॅलेंजर अवकाशयानाच्या अपघाताची कारणमीमांसा शोधण्याचे काम फाइनमन यांच्याकडे आले (या लेखात त्याचा उल्लेख आहे). तेंव्हा फाइनमन यांनी "अतिथंडीमुळे यानाची रबरी बुशिंग कडक झाली (प्रक्षेपणाच्या आदल्या दिवशी मायनस मध्ये तापमान असलेली थंडी होती) आणि प्रक्षेपणानंतर अचानक वाढलेल्या तापमानामुळे त्यांना तडे गेले आणि अपघातास कारणीभूत ठरली" अशी कारणमीमांसा शोधली. पण नासा आणि बुशिंग बनवणाऱ्या एजन्सीचे अधिकारी हे मानायला तयार नव्हते. तेंव्हा फाइनमन यांनी सर्वांसमोर तसलीच रबरी बुशिंग आणून ती कमी तापमानाच्या वातावरणात काळ ठेऊन पुन्हा बाहेर काढून त्यांचे तापमान अचानक वाढवले तेंव्हा त्यांना तडे गेल्याचे दाखवून दिले.

त्यांच्या ठाई विश्लेषण क्षमता प्रचंड होती.

>> जगातला पहिला अणुस्फोट होता. फाइनमन शांतपणे एका ट्रकच्या केबिनमध्ये जाउन बसला आणि तिथून बहुतेक त्याने एकट्यानेच चष्म्याविना प्रत्यक्ष हा स्फोट पाहिला.

आपण जे करतोय त्यावर आपले किती प्रभुत्व असावे याचे उत्तम उदाहरण. He was knowing what is being done, than anyone else. So commanding.

मराठीत तैलबुद्धी असा शब्द आहे, रिचर्ड फाइनमन हे त्याचे अगदी तंतोतंत उदाहरण होते असे मला सतत वाटते. या लेखाद्वारे त्यांच्या विषयी खूप काही वाचायला मिळाले याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. लेखात उल्लेख आलेली काही पुस्तके आता नक्की वाचणार.

>> पुंजभौतिकी =क्वांटम फिजिक्स ना?
>> Submitted by स्वदेशी on 21 February, 2019 - 11:31

हो. Quantum Physics किंवा Quantum Mechanics हे दोन्ही शब्दप्रयोग एकाच अर्थाने वापरले जातात.

लेख आवडला.
शुअरली यु आर जोकिंग पलीकडे फाइनमनबद्दल काही वाचल्याचे आठवत नाही .
सिक्स इझी पिसेस तर प्रत्येकाने वाचावेच- नोंदवून ठेवतोय.

महामंदीचा काळ १९२९ पासूनचा. तेवढं तपासून घ्याल का?

त्यांनी कुलूप कसे उघडायचे लॉक पिकिंग पण शिकून घेतले होते. . लै भारी. ते ओ रिंग चा अ‍ॅनालिसीस संपूर्ण वाचण्याजोगे आहे.

हा एक लईच भारी माणूस होता. पुंजभौतिकीसारख्या डोक्यावरून जाणार्‍या क्षेत्रात काम करत असताना देखिल ह्याने सामान्य लोकांसाठी पॉप्युलर सायन्सवर लेख लिहिले, व्याख्याने दिली. बर्‍याच हाय लेव्हलच्या अभ्यासकांना लेमॅन लेव्हलवर येऊन बोलणं जमत नाही. पण फाईनमनकडे कुठलाही विषय अतिशय सोपा करून सांगण्याची विलक्षण हातोटी होती, उत्साह होता आणि सामान्यातल्या सामान्य प्रश्नांना उत्तरे देण्याचा पेशन्स पण होता. लेखाबद्दल अनेक आभार!

छान परिचय, टवणे सर.
आइन्स्टाइनच्या रिलेटिव्हिटीचा सिद्धांत त्याच्या सौंदर्याकडे न पाहता ५गुणांसाठी सिद्धता पाठ करणार्‍या लोकांपैकी >>> मी ही. आपल्याला पासिंगचेही टेन्शन आणणारा विषय हे लोक कसा आयुष्यभर अभ्यासतात असेच वाटत राहिले. त्यामुळे फाइनमन लेक्चर्स माहीत आहेत ( सगळी वाचलेली नाहीत). बाकी पुस्तके आता शोधायला हवीत.

हे मोरपिसारातही चालले असते. ज्यांना विज्ञानाची आवड नाही त्यांना एका शास्त्रज्ञाची बहुगुणी व्यक्ती म्हणून ओळख वाचायला आवडेल कदाचित.

लेख आवडला.

फाइनमन हा अगदी स्वतंत्र विचार करणारा होता आणि त्याला साच्याप्रमाणे, काटेकोर नियमानुसार वागायला आवडत नसे. त्याला ब्युरोक्रसीचा अगदी तिटकारा होता. मुरे गेलमन (१९६९ भौतिकशास्त्राचे नोबल प्राइज) याने त्याची एक आठवण सांगितली आहे की त्यांच्या फॅकल्टी लंचरूममध्ये टाय आणि जॅकेट घालूनच जेवायला जाता येत असे. तर फाइनमन मुद्दाम तिथे जाताना टाय आणि जॅकेट घालून जात नसे आणि मग तिथे स्पेअर ठेवलेला जुना टाय आणि कळकट जॅकेट वापरत असे. (गंमत म्हणजे युनिव्हर्सीटीत येताना तो सूट घालून येत असे, तरीही स्वतःचा टाय्/जाकिट मग ऑफिसमध्येच ठेवत असे).

अशीच अजून १ गंमत फाइनमनने स्वतः सांगितली आहे की गव्हर्मेंटसाठी कुठलेतरी भाषण देताना मी फक्त १३ वेळा सह्या करीन असे त्याने सांगितले होते. ब्युरोक्रसीमुळे त्याला १२ वेळा सह्या कराव्या लागल्या होत्या. त्याचे मानधन मिळावे म्हणून १३ वी सही करायची बाकी होती, पण त्याआधी मी भाषण केले असे लिहून द्यावे लागणार होते, तेव्हा त्याने नकार दिला. जर मी तसे लिहून सही केली, तर मला तुमचा मानधनाचा चेक मला नको असे त्याने सांगितले आणि गव्हर्मेंट पेचात पडले. शेवटी कुठल्यातरी माणसाने त्या १३ व्या सहीशिवाय कसाबसा तो चेक त्याला दिला आणि १३ वी सही त्याने त्या चेकवर केली असा किस्सा आहे. (हे मी कुठे वाचले ते नक्की आता आठवत नाही.)

चॅलेंजर का कोसळले याचा तपास करताना त्याला नासाचे अनेक दोष सापडले होते, पण नासा शेवटी गव्हर्मेंटची संस्था आहे आणि तिच्यावर टीका करू नये असे रॉजर्स कमिशनमधील बहुतेकांचे मत होते म्हणून त्याने रॉजर्स कमिशनच्या रिपोर्टवर सही करायला नकार दिला होता किंवा माझे नाव काढून टाका असे सांगितले. शेवटी त्याचे स्वतंत्र मत हे अपेंडिक्स म्हणून मूळ रिपोर्टमध्ये सामील करण्यात आले, तेव्हाच त्याने रिपोर्टवर सही केली.

या अपेंडिक्समध्ये त्याने स्पष्ट लिहिले आहे की
Let us make recommendations to ensure that NASA officials deal in a world of reality in understanding technological weaknesses and imperfections well enough to be actively trying to eliminate them. They must live in reality in comparing the costs and utility of the Shuttle to other methods of entering space. And they must be realistic in making contracts, in estimating costs, and the difficulty of the projects. Only realistic flight schedules should be proposed, schedules that have a reasonable chance of being met. If in this way the government would not support them, then so be it. NASA owes it to the citizens from whom it asks support to be frank, honest, and informative, so that these citizens can make the wisest decisions for the use of their limited resources.

For a successful technology, reality must take precedence over public relations, for nature cannot be fooled.

शुअरली यू आर जोकिंग मिस्टर फाइनमन हा पुस्तकातील १ चॅप्टर इथे आहे, जो खूप गमतीशीर आहे.
त्याने लिहिलेला पॉप्युलर सायन्समधील हा लेख ज्यात फाइनमनने म्हटले की There's plenty of room at the bottom आणि आव्हान दिले की एनसायक्लोपिडिया ब्रिटानिकाचे संपूर्ण २४ भाग हे टाचणीच्या टोकावर लिहून दाखवता येतील. यामुळे पुढे नॅनोटेक्नॉलॉजीला चालना मिळाली असे म्हटले जाते.

पुढे काही व्हिडिओ दिले आहेत ते नक्की बघा.

त्याच्याबद्दलच्या पुढील २ डॉक्युमेंटरीज अप्रतिम आहेत.
The Pleasure of Finding Things Out

"Fun To Imagine"

जवळ्जवळ तीस-पस्तीस वर्षापूर्वी मी ऑस्ट्रेलियात टीव्हीवर एक documentary पहिली होती. (ही documentary केम्व्हा केली होती ते आठवत नाही) त्यात फाईनमनने रशियातल्या Kyzl नावाच्या देशात जाण्यासाठी केलेले प्रयत्न त्याने सान्गितले आहेत. तो त्यान्ची भाषा शिकला. तेथे तो त्याच्या २-३ शिष्याबरोबर जाणार होता परन्तु तसे होण्यापूर्वीच तो म्रुत्यु पावला. त्याचे शिष्य काही तिकडे गेले नाही. कारण त्यान्च्या मते रिचर्ड शिवाय जाण्यात काही मौज नव्हती. यामुळे ते करत असलेली ६-७ महिन्यन्ची तयारी फुकट गेली होती.

त्यात फाईनमनने रशियातल्या Kyzl नावाच्या देशात जाण्यासाठी केलेले प्रयत्न त्याने सान्गितले आहेत.
>>

Tuva नावाचा देश आहे तो. Kyzyl शहराचे नाव आहे. मध्यंतरी टुवन वंशाचा कोणीतरी पुतीनचा खास मार्जितला बडा अधिकारी बनला आहे असे वाचल्याचे आठवते.

Tuva or bust नावाचे पुस्तक आहे यावर, मी वाचलेले नाही

उ. बो. , मस्त प्रतिसाद. या documentaries बघायला हव्यात.
तुम्ही लिहिलेल्या किश्श्यावरून मला डॉ. नारळीकरांच्या आत्मचरित्रातला फाइनमनचा किस्सा आठवला.
१९६३ मध्ये कॉर्नेल युनिव्हर्सिटीत The nature of time या विषयावरील एका परिसंवादात डॉ. नारळीकरांनी फाइनमन आणि इतर रथी-महारथींबरोबर भाग घेतला होता. ही चर्चा रेकॉर्ड करून नंतर त्या आधारे परिसंवादाचे इतिवृत्त लिहून प्रसिद्ध केले जाणार होते. बाकी कुणी नाही, पण फाइनमनने या गोष्टीला जोरदार आक्षेप घेतला. त्याचे म्हणणे असे होते की चर्चेत रेकॉर्डिंग चालू असेल तर मोकळेपणाने एखादे धाडसी विधान करता येणार नाही. बाकीच्यांनी खूप सांगून पाहिले की तुझ्यासारख्याचे धाडसी विधानही इतरांना विचार करायला लावणारे असेल. पण फाइनमनने मान्य केले नाही. शेवटी तो एका अटीवर तयार झाला की त्याचे नाव इतिवृत्तात कुठेही येता कामा नये. अखेरीस इतिवृत्त फाइनमनच्या जागी ' X ' लिहून छापले गेले Happy

मस्त लेख.
प्रतिसादही आवडले. प्रतिसादांमधल्या लिंक्स, व्हिडिओज वेळ काढून बघणार.
फाईनमनबद्दल इथे-तिथे बरंच काय काय वाचलेलं आहे; पण पुस्तक असं एकही वाचलेलं नाही. Sad

म्लॉडिनॉव्हच्या पुस्तकाची शेवटी लिंक आहेच, पण मजकुरात जिथे पुस्तकाचा उल्लेख येतो, तिथेही पुस्तकाचं नाव देणार का?

लेख सुंदरच आहे. आता e = mc2 यातल्या सौंदर्याबद्दल लेख येऊ दे.

सर, तुम्हाला कुठला तरी विषय वर्ज आहे का? आत्तापर्यंत भस्म्या रोग ऐकला होता - ज्यात माणूस नुसता खात सुटतो आणि त्याला ते पचतेही. वाचनाबाबतही तसा काही रोग असतो हे माहित नव्हते. _/\_

> सर, तुम्हाला कुठला तरी विषय वर्ज आहे का? आत्तापर्यंत भस्म्या रोग ऐकला होता - ज्यात माणूस नुसता खात सुटतो आणि त्याला ते पचतेही. वाचनाबाबतही तसा काही रोग असतो हे माहित नव्हते. > त्यांना डॅन ब्राऊन, स्टिफन किंग व तत्सम पदार्थांची ऍलर्जी आहे Wink