सुर्यमालांच्या निर्मितीची रंजक थियरी - विज्ञानभाषा मराठी (२)

Submitted by अतुल. on 19 February, 2019 - 02:22

सूर्यमालेच्या निर्मितीच्या अनेक थियरीज आजवर मांडल्या गेल्या. अर्थात हि सगळी हायपोथेसिस असतात (कि ज्यातून निर्माण झालेले फोर्म्युले आणि सध्याची निरीक्षणे जुळावी लागतात). पैकी "नेब्युलर हायपोथेसिस" हे संशोधकांमध्ये सर्वात जास्त स्वीकारले गेलेले हायपोथेसिस आहे.

"नेब्युलर हायपोथेसिस" नुसार सूर्यमालिका एका अतिविशाल नेब्युला पासून बनली आहे. केवळ आपली सुर्यमालाच नव्हे तर विश्वातील सर्वच सूर्यमाला (तारा आणि त्याभोवती फिरणारे ग्रह) अशा महाकाय नेब्युला पासून बनल्या असाव्यात असे संशोधकांना वाटते. नेब्युला म्हणजे धूळ व प्लाज्मा वायूंचे आकाशगंगेत फिरणारे अतिविशाल महाकाय असे ढग. (जाता जाता: प्लाज्मा म्हणजे धनभारीत कण आणि इलेक्ट्रॉन्स समप्रमाणात असलेली वायूंची मुलभूत अवस्था. आकाशात विजा चमकत असतात तेंव्हा तेथील वायूंची अशी अवस्था असते). ताऱ्यांची निर्मिती कशी झाली असावी हे शोधण्यासाठी अशाच ढगांचा अभ्यास संशोधक करीत असतात. पैकी "इगल नेबुला" चे हबल दुर्बिणीतून घेतलेले फोटो खूप प्रसिद्ध आहेत.

Pillars-of-Creation-located-in-the-Eagle-Nebula-0142.jpg

असो. तर "नेब्युलर हायपोथेसिस" नुसार आपली सूर्यमाला ज्या नेब्युला पासून बनली, तो ढग सूर्यमालेच्या सध्याच्या आकाराच्या असंख्य असंख्य पटीने महाकाय व पसरलेला असावा. इतका विरळ आणि पसरलेला कि त्यातील वायू आणि धुळीचे आपल्या पृथ्वीइतक्या आकाराचे वस्तुमान केवळ काही किलोच भरेल! यावरून त्याची व्याप्ती लक्षात यावी. अशा या महाकाय नेब्युला ढगात वस्तुमानाचा गुरुत्वीय समतोल साधला होता. म्हणजे सगळे वस्तुमान (धूळकण वायू इत्यादी) आपापल्या कक्षेत या ढगाच्या मध्याभोवती संथ गतीने फिरत होते.

पण यातील काही भागाचा गुरुत्वीय तोल काही कारणाने ढासळला आणि तो भाग आतल्या आत कोसळायला सुरवात झाली. हि क्रिया अतिशय किचकट आणि शेकडो दशलक्ष वर्षे (आपल्या सध्याच्या कालमापने नुसार) सुरु होती. कोसळल्याने मध्यभागी आलेले घटक, भौतिकशास्त्रातील कोनीय गती अक्षयतेच्या (Conservation Of Angular Momentum) तत्वानुसार, आणखीन वेगाने फिरू लागले.. त्यामुळे त्यांच्यात घर्षण निर्माण होऊन प्रचंड दाब आणि उष्णता उर्जा निर्माण झाली. हे प्रमाण पुढे प्रचंड वेगाने वाढत वाढतच गेले आणि मध्यभागी तेजपुंज अशा अनेक गोलकांची (Short lived stars) निर्मिती झाली. त्यांच्या स्फोटातूनच (सुपरनोव्हा) पुढे मध्यभागी आपला सध्याचा सूर्य आकाराला आला असावा असे संशोधक मानतात (याचे कारण, पृथ्वीवर सापडणारी काही दुर्मिळ मूलद्रव्ये वा काहींची समस्थानिके (isotopes) निर्माण होण्यासाठी लागणारा दाब व तापमान केवळ सुपरनोव्हा मध्येच शक्य आहे).

या प्रचंड कोसळण्याची आणि स्फोटांची परिणीती मध्यभागी तेजपुंज महासूर्य असलेल्या व स्वत:भोवती फिरणाऱ्या महाकाय व विशाल अशा तबकडी (Protoplanetary disk) मध्ये झाली. हि इतकी मोठी होती कि तिचा व्यास सध्याच्या सूर्य आणि पृथ्वी मधील अंतराच्या जवळपास दोनशे पट इतका असेल.

protoplanetarydisc3.jpg

त्यानंतर पन्नास दशलक्ष वर्षांच्या काळात केंद्रस्थानी असलेल्या सूर्यामध्ये दाब व तापमान इतका प्रचंड वाढला कि आत एक प्रकारची अणुभट्टी तयार होऊन त्यात हायड्रोजनचे अणु (नेबुला मध्येच जे वायू असतात त्यात हायड्रोजन हा प्रामुख्याने जास्त असतो) एकत्र येऊन हेलियम बनायला सुरवात झाली आणि आपण सध्या पाहत आहोत त्या रुपात सूर्य आला. अजूनही त्यात हायड्रोजन जाळून हेलियम बनणे सुरूच आहे. सूर्यावरील हायड्रोजनचा साठा पूर्ण जळायला अजून किमान साडेचार अब्ज वर्षे तरी लागतील.

दरम्यानच्या काळात या तबकडीत बाह्यभागात असणारे धूळ आणि वायू यांच्यात तबकडीच्या केंद्राभोवती फिरता फिरता गुरुत्वीय कोसळणे सुरूच राहिले आणि त्यातून त्यांचे गोलक बनायला सुरवात झाली. ते छोटे गोलक एकत्र येऊन मोठाले ग्रह निर्माण झाले. अर्थात केंद्रा इतके वस्तुमान नसल्याने त्यात हवा तितका दाब निर्माण न झाल्याने अणु क्रिया झाल्या नाहीत. तर केवळ गुरुत्वाकर्षणमुळे ते घनगोल बनून फिरत राहिले. तेच आजचे ग्रह होत. अशा रीतीने आपली ग्रहमाला आकारास आली असे "नेब्युलर हायपोथेसिस" सांगते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा ही लेख खूप छान.

समजा मभादि निमित्ताने लिहायला सुरु केले असेल तरी असे लेख लिहिणे पुढेही चालू ठेवा ही विनंती.

सर्वांचे मन:पूर्वक आभार.

>> असे लेख लिहिणे पुढेही चालू ठेवा ही विनंती.

नक्की Happy प्रोत्साहनासाठी धन्यवाद.
(काही चुका सुद्धा झालेल्या असू शकतात. दाखवून दिल्यास आभारी राहीन. जसे कि माझी मलाच जाणवलेली चूक 'हायपोथेसिस' ऐवजी 'हायपोथिसिस' हवे होते)

हे tas कितीही सोप्या भाषेत सांगितलं तरी पूर्ण समजणे अवघड भले आपण ते कबुल करत नाही
प्रत्येक भौतिक नियमांचा सखोल अभ्यास आसलेल्या व्यक्तीलाच समजेल आपण फक्त समजून घेण्याचं प्रयत्न करायचं

छान लिहीलेय. खूपदा हा विषय वाचून समजून घ्यायला सुरूवात केली आणि अर्धवट सोडले.
या सगळ्या अभ्यासाचे ( शास्त्रज्ञांच्या, तुमच्या नव्हे) प्रयोजन काय. सगळे कसे कसे झाले ते कळले की पुढे त्या ज्ञानाचे काय करणार आपण / मानवजात?

>> या सगळ्या अभ्यासाचे ( शास्त्रज्ञांच्या, तुमच्या नव्हे) प्रयोजन काय. सगळे कसे कसे झाले ते कळले की पुढे त्या ज्ञानाचे काय करणार आपण / मानवजात?

मुख्य प्रयोजन म्हणजे उस्तुकता (curiosity) आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधणे. सत्य शोधणे. प्राचीन काळी पृथ्वी विश्वाच्या मध्यभागी आहे असे समजून जगरहाटी सुरु होतीच. त्याला धार्मिक अधिष्ठान मिळाल्यानंतर या समजुतीविरोधात काही बोलणे हा गुन्हा मानला जात होता. पण कोपर्निकस नावाच्या एका तत्ववेत्याने उत्सुकतेपोटी संशोधन करून सत्य जगासमोर आणले. पुढे मानवजातीच्या इतिहासात जी प्रचंड वैज्ञानिक क्रांती झाली आणि आज उपग्रहांमुळे मानवी जीवन किती झपाट्याने बदलले आहे हे आपण पाहतो आहोतच. विज्ञानातील आजचे संशोधन हे येणाऱ्या काळातल्या मानवजातीच्या प्रगतीचा पाया ठरत असते.

कळले. धन्यवाद. Happy
थोडक्यात सद्ध्या वेगवेगळी गृहीतके घेऊन विश्वाचे रहस्य उलगडणे चालू आहे.
जेव्हा निष्कर्ष निघतील, जे निघतील त्यानुसार मग पुढे काहीतरी प्रगती / संशोधन वगैरे होईल.
एखादा प्रश्न / समस्या घेऊन त्याच्या कारणाच्या शोधात / उपायासाठी असे हे संशोधन सुरू झालेले नाही.

सुंदर लेख. इतर हायपोथिसिस बद्दल पण थोडक्यात माहिती आली असती तर लेख अजून सुंदर झाला असता. आता प्रत्येक हायपोथिसिस बद्दल सविस्तर लिहा Happy

हे हायपोथिसिस खोडून काढणारे जे मुद्दे आहेत त्यातला एक मुद्दा आठवतोय - एकाच नेब्युलापासून सगळे ग्रह बनले असते तर सर्वच ग्रहांवर थोड्या फार फरकाने सारखीच मूलद्रव्ये सापडली असती. पण तशी ती नाहीत.

मभादि निमित्ताने लिहायला सुरु केले असेल तरी असे लेख लिहिणे पुढेही चालू ठेवा ही विनंती. >>> +१