देहामधुनी एक उदासी

Submitted by माउ on 18 February, 2019 - 18:15

ओठांवरती आले नाही...पण श्वासांना कळते आहे
देहामधुनी एक उदासी...रक्त होउनी पळते आहे

विझतानाच्या दिव्यासारखे
जराजरासे जिवंत आहे
जखम वाहती नाही कोठे
दु:खालाही उसंत आहे
भास कुठे रेंगाळुन जातो..आस मनाला छळते आहे..

जगण्यावर ना कसले ओझे
मरणावर ना भार कुणाचा
नाव कुणाचे नाही ओठी
हृदयी ना आकार कुणाचा
खिन्न चांदणे घेउन गगनी..रात पुन्हा घुटमळते आहे ..

चंद्राचे आभास नकोसे
ता-याचे उश्वास नकोसे
सांडून गेलेले प्रेमाचे
पेल्यामधले भास नकोसे
रित्या मैफिलीतुनी विराणी..सूर ताल आळवते आहे..

अडला आहे अलगद कोठे
उरला सुरला एक उसासा
प्राण जसा शोधीत असावा
जगण्यासाठी एक दिलासा

अस्तित्वाचे स्वप्न गुलाबी..उदासीत साकळते आहे...
देहामधुनी एक उदासी..रक्त होउनी पळते आहे..

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults

जगण्यावर ना कसले ओझे
मरणावर ना भार कुणाचा
नाव कुणाचे नाही ओठी
हृदयी ना आकार कुणाचा
खिन्न चांदणे घेउन गगनी..रात पुन्हा घुटमळते आहे ..

सुरेख जमली आहे.

कविता (याला कविताच म्हणतात ना, की काही वेगळेच नाव आहे, गझल वगैरे?) फार आवडली.
माझीहि अवस्था अशीच आहे, अगदी प्रत्येक ओळ माझ्या भावना दाखवते. पण मला इतके चांगले गद्यात सुद्धा लिहिता येत नाही.

मी आता खोटा खोटा उत्साह. आनंद दा़खवत ही उदासी लपवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामुळेहि कधी कधी जास्तच उदास होते मन.

उत्कृष्ट रचना,
हळू हळू भिनणारी, चढत जाणारी, अंगावर येणारी.

नन्द्या४३ - Big hug to you. Be yourself, express. आयडी उडाला तरी चालेल पण असे जीवाचे हाल करून घेऊ नका.

खूप छान.

विझतानाच्या दिव्यासारखे
जराजरासे जिवंत आहे
जखम वाहती नाही कोठे
दु:खालाही उसंत आहे
भास कुठे रेंगाळुन जातो..आस मनाला छळते आहे..

हे विशेष आवडले.