भाग 5
कळवणवरून भराभर सरकता तांडा
मुल्हेरची ‘पेठ’ ही वाहतूक करणाऱ्या मालजनावरांच्या अदलाबदलीकरिता प्रसिद्ध असावी. अहवा ते सध्याच्या काळात ताहेराबाद. हा घाटवाटांच्या उभ्या चढणीचा, चिंचोळ्या वाटेचा भाग, जंगलातील अदिवासी व अनेक लुटारू टोळ्यांनी घेरलेल्या प्रदेशातून तांडा श्रमपूर्वक घाटमाथ्यावर आला असावा. मुल्हेरच्या आसमंतात आल्यावर गुजराती भाषेचा प्रभाव कमी होऊन मराठी बोलीचा वापर करणाऱ्या मुलखात प्रवेश केल्याचे जाणवले असावे. गुजराती मालवाहू जनावरांच्या मालकांपेक्षा नव्या दमाच्या जनावरांच्या पाठीवरून नव्या लमाण्यांचा (लवणाची वाहतूक करणारे ते लवाणी चे लमाणीत रुपांतर असावे)तांडा पुढे घेऊन जाणे महाराजांच्या आखणीतून सामोरे येते. वेगवेगळ्या दिशांनी होणाऱ्या व्यापारी मार्गावरील नाके व बाजारपेठेत दोन कामांना प्राधान्य दिले असावे.
१. सुरतहून आलेल्या मालवाहू जनावरांच्या मालकांकडून मुल्हेरच्या बंजारा मालवाहतुकदारांशी पुढच्या वाटचालीसाठी जनावरांची जोडणी करणे, त्यांना जुन्या गाढवांसमोर नवे गाढव, बैलासमोर बैल, बैलगाड्या लावून इकडून तिकडे मालाची उठाठेव व्यवस्था करायला सर्व सैनिक लोक लागले असावेत. इतकी प्रचंड मालमत्ता घेऊन चाललेले सैनिक पाहून तिथल्या बाजारात गवगवा होऊन मोठे व्यापारी, सावकारांनी आपल्या व्यवसायाची, घरादाराची शाश्वती न वाटून भयभीत होऊन पळापळ झाली असावी. सहकार्य करायच्या ऐवजी पळणाऱ्या लोकांना धरून त्यांच्याकडून हवा तो माल मिळवायला हाणामारी करून बराच नवा माल भर पडला असावा. मालवाहू जनावरांना घेऊन आपल्या पोट्यापाण्याचा व्यवसाय करणारा बंजारा समाज हा फार पूर्वीपासून गावोगावी फिरणारा आणि सामान घेऊन जात येत असत. त्यांच्या ठराविक विभागात एकाधिकारशाही असल्याने मात्र त्यांच्याशी सलोखा ठेवला नाही तर ते आपल्या कर्तृत्वाचा इंगा ज्यांचा माल घेऊन जाणारऱ्या मालदारांवर दाखवायला कमी नसत.
२. सातमाळाच्या डोंगराळ भागातील मार्गावर प्राचीन काळापासून किल्ले, देवड्या, व्यापारी, सैनिकांसाठी सराया, देवी-देवांच्या यात्रा, बौद्ध भिक्षुकांच्या ध्यान साधनेसाठी निघालेल्या संघाचे जाणे येणे, यामुळे वाटा रुळलेल्या असाव्यात. सातमाळाच्या एका बाजूला सध्याच्या नाशिक जिल्ह्यातील सुपीक आणि संपन्न भाग आहे. त्यात सप्तशृंगी, वणी, गोदावरीचे उगमस्थान त्रिंबक, रामचंद्र प्रभूंच्या वास्तवाने पुनित पंचवटी, प्रवरा नदीकाठी अगस्त्य-लोपामुद्रा यांच्या सारख्या महर्षींच्या अकोले तपोभूमी, जुन्नर भागातील अष्टविनायकापैकी लेण्याद्री, वगैरे धार्मिक स्थानाचा प्रभाव आहे. तेथील वार्षिक यात्रा, कुलदेवतांच्या दर्शनासाठी जमणारे शेकडो जनसामान्य भाविक असावेत. त्यांच्या प्रभावाने वातावरण पवित्र होत असेल.
३. संस्कृत, प्राकृत भाषांमध्ये काव्य, शास्त्राचे लेखन - पठण यामधून सांस्कृतिक वारसा पुढे नेणारा विद्वान ब्राह्मण वर्ग तयार झाला असावा. मालगुजारी, कापड व्यापारी, गावकुसातील लोकांना विविध सेवा देणारे बलुतेदार, शेतीच्या कामांना वाहून घेतलेल्या बहुजनांच्या वस्त्या, गावकुसाबाहेर राहून गावाला उपद्रवी जनावरांपासून, चोर दरोडेखोरापासून संरक्षण करणे, मृत जनावरांचे कातडे काढून देणारे ढोर समाजातील धीट, शूर आणि चपळ लोक. सैन्याला लागणारी शस्त्रे व अन्य सामुग्री बनवणारे लोहार, शिकलगार, चांभार, काही गावांमध्ये आखाडे, रिंगणात शारीरिक कसरती, व्यायाम, शस्त्र संचालन, घोडे स्वारी, याच्या शिक्षणासाठी सोय असावी. लढाईत कामाला लागणाऱ्या जनावरांची पैदास, शिकवण, रखरखाव यातून जीवनयापन करत असतील.
४. वरील प्रमाणे गावगाड्याच्या संथ, पण संघटित जीवनात अनेकदा भीषण नैसर्गिक आपत्ती, सैन्य हालचालीतून लढायांची आणीबाणी, बदलत्या राजसत्तेखाली आपले गाव, जहागिरी, किल्ले, शिबंद्या राखून ठेवणे, शेती करणाऱ्यांना पावसाच्या मेहेरबानीने पीक पिकवून धान्याचा, पैशाचा सारा बिनबोभाट भरणे वगैरे कामात विविध स्तरांतील लोकांना मुसलमान धर्म संकल्पनेतील भीषणता समजून येत असावी.
५. मुघल सलतनत, अदिलशाही, निजामशाही, विदेशातून व्यापार करायला आलेल्या गोऱ्यांच्या सत्तांना टक्कर देऊन उभे राहता येते याची जाणीव आपल्या रयतेला करून द्यायची असेल तर शिवाजी या व्यक्तीला सुपे आणि आसपासच्या मुलखाचा ‘जहागीरदार’ या हुद्द्यातून बाहेर पडून हिंदवी स्वराज्याचा ‘राजा’ होणे गरजेचे आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली असावी. हस्तगत केलेला किंमती माल, सामान भविष्यकाळात ऐशारामात राहून आळशी, विलासी जगून, एकमेकांच्या विरोधात राहून पिढ्यानपिढ्या वैरभाव सांभाळत राहण्याची सवय जडलेल्यांच्या हाती पडू न देणे शिवाजी महाराजांच्या मते आवश्यक असावे.कळवणहून पुढे सातबारी ओलांडायला ३ पर्याय- वणीकडून (निळारंग), कांचनबारीतून (लाल रंग)किंवा देवळामार्गे चांदवड (निळा व हिरवा रंग)
या सर्व वैचारिक भूमिकेतून या पुढील वाटचालीतील अडथळे दूर करण्यासाठी मुघल अंमलातील प्रदेशाला टाळून जावे किंवा लढून पुढे जायचे तर मिळवलेल्या संपत्तीच्या रक्षणासाठी त्याचे भाग करून जावे. वेळ पडल्यास ती कुठल्यातरी किल्ल्यावर काही काळ सुरक्षित राहील अशी व्यवस्था करणे आवश्यक असावे. सोबतच्या वरिष्ठ सरदारांशी विचार विनिमय करताना इथून २५ किमीवरील कळवण या गावातून दोन तीन पर्यायी वाटातून तोवर निर्माण होणाऱ्या सैन्य प्रतिकारातून पुढचा मार्ग ठरवावा असे ठरले असावे. सुरतकडील कटु वार्ता औरंगाबाद येथे दक्षिणेचा सुभेदार मुअज्जम यांच्याकडे पोचली असेल.
राजकुमार मुअज्जम जो दक्षिण सुभ्यांचा लष्करी सत्ताधारी होता. तो औरंगजेबाचा दोन नंबरचा मुलगा होता. दौलताबाद (म्हणजे आत्ताचे नाव औरंगाबाद किंवा संभाजीनगर) येथे सुरतेवरील हल्ल्यातील वाताहत ऐकून त्यातल्या त्यात जवळच्या म्हणजे बऱ्हानपुर (त्यातील न चा उच्चार मराठीत ण करतो) च्या दाऊद खानाला बंदोबस्तासाठी तैनात करून त्याच्या खाली अन्य सरदारांनी सैन्य घेऊन जायचे हुकूम दिले असावेत.
*मोहम्मद सुलतान अकबर नामक मोठ्या भावाला बापाच्या पश्चात गादी मिळणार असेल तर कट कारस्थान करून त्याला शह देण्यासाठी आपल्या बाजूने सेना उभी हवी या विचाराने संभाजीच्या नावे ५ हजारी जहागिरी देऊन त्याच्या वतीने लढणाऱ्या ‘सिवा’ ला विरोध तर करायला हवा पण इतका नको की नंतर तोच सत्ता हस्तगत करायच्या गळेकापू स्पर्धेत कामाला यायला नाकारेल याची जाणीव ठेवून दाऊदखानाला काही सैन्य आणि दारूगोळा पाठवून तो स्वस्थ बसून राहिला असावा.
*हा १६७६ सालात वारला. नंतर मुअज्जम बहादूर शाह (प्रथम) उर्फ शाहआलमला औरंगजेबाची गादी १७०७ नंतर मिळवता आली. भाऊ शाह आझम गादीवर हक्क बजावला निघाला असताना वाटेत त्यांनी संभाजी पुत्र शाहूंना काही सरदासमावेत मराठा राज्यात परत जायची परवानगी दिली. मात्र दिल्लीत पोचण्याआधी तो मारला गेला. उरलेला औरंगजेबाचा त्यातल्या त्यात आवडता मुलगा कामबक्ष १७०९ मधे मारला गेला.
सुरत ते औरंगाबाद,
औरंगाबाद ते बऱ्हानपुर,
बऱ्हानपुर ते चांदवड
वरील नकाशातून वर उल्लेख केलेल्या ठिकाणांतील अंतर, रस्ते, बऱ्हानपुर ते चांदवड २५० किमी अंतर (जिथून शिवा चे सैन्य सातमाळाच्या डोंगरातून नाशिकच्या (त्या वेळचे नाव गुलशनाबाद) भागात उतरायची जास्त शक्यता वाटून आपले सैन्य एकत्र केले असावे)
वरील गावातील सूरत ते औरंगाबाद ३५० किमी, औरंगाबाद ते बऱ्हानपुर २१३ किमी, बऱ्हानपुर ते चांडवड २५० किमी अंतरे, रस्त्यांची सोय, हव्या त्या सैन्याला एकत्र करायचे झाल्यास लागणारा वेळ आणि नंतर त्याचा पुढे सरकण्याचा वेग पाहता महाराज आरामात सातमाळाच्या बाजूने सटकून सिन्नर, अकोले करत कोकणात उतरून गेले असते. परंतु दाऊदखान कदाचित चांदवडच्या आसपास काही कारणांनी सैन्यासह तयार असावा. त्याला सुरतच्या प्रकाराची माहिती मिळताच सिवा चांदवडच्या खिंडीतून सातमाळ उतरेल असा सैनिकी अंदाज बांधून चांदवडच्या किल्लेदारापाशी धनुष्यबाण, तलवारी, शस्त्रे, मोहिमेचे सामान, जनावरांचा दाणागोटा, तोफा, बंदुका, त्यांची ठासणीची दारू, लोखंडी, दगडी गोळे वगैरेची सोय करण्यात गुंतला असावा.
लढाई करायची वेळ आली की काय नियोजन करावे यावर दाऊदखानाने आपल्या बरोबरच्या सरदारांसमावेत विमर्ष केला असेल. सुरतहून मिळवलेल्या संपत्तीच्या रक्षणासाठी सिवा ला तांड्यांसोबत राहूनच आपल्याशी संघर्ष करावा लागेल. म्हणून आपल्या सैनिकांनी ‘शिवा’ च्या सैन्याला गुंतवून ठेवून आपले मुख्य काम म्हणजे त्वरित तांड्यातील मालजनावरांच्या चालकांना ताब्यात घेऊन त्यांना परत उलटे फिरवून शक्य तितकी संपत्ती सूरतेच्या मालिकांकडे परत करावी हे असेल.
अशावेळी कोणी काय कामे करायला हवीत याचा तपशील मुघलांच्या सैन्यात काम करणाऱ्या भीमसेन सक्सेना यांनी नमूद केले आहे. डॉ श्रीनिवास सामंत, प्रा. नामदेव जाधव, श्री गजानन मेहेंदळे यांनी विविध संदर्भ तपासून निष्कर्ष काढले आहेत. त्यातून ह्या लढाईचे रणक्षेत्र एकच ठिकाण, खिंड, गाव किंवा रस्ता असे न मानता त्या तांड्यांसोबत विविध भागात सैन्य संचलन करत ठिक ठिकाणी हातघाईच्या समरातून शिवाजी महाराजांच्या सेनेने मुघल सेनेला जबर जखमी करून नामोहरम अवस्थेत पाठलाग करणे सोडून द्यायला लावले असेल.
हजारो मालजनावरांच्या पाठीवरील ओझ्यातून नेत तो तांडा नंतर कुठे कुठे थांबत गेला? मधल्या मधे कुठे तरी तो ठेवून त्यात इतर ठिकाणाहून हल्ले करून हस्तगत करून नंतर एकत्रित करून मग टप्प्या टप्प्याने पोचला? महाराज तो रायगडावर पोहोचेपर्यंत बरोबर होते का? मालवाहक जनावरांच्या चाऱ्याचा, विश्रांतीचा, पुन्हा अदलाबदलीकरिता कुठेतरी थांबायला लागले असेल तर ते कुठे असावे? यावर प्रकाश टाकायची गरज आहे…..
भाग ६ पुढे चालू...
स्वतःच्या गावाचं नाव
स्वतःच्या गावाचं नाव मायबोलीवरच्या शीर्षकात वाचून धन्य झालो!
छान लेख!
धन्यवाद
धन्यवाद