पोटॅशियम : पेशींच्या रंगमंचाचा सूत्रधार

Submitted by कुमार१ on 6 February, 2019 - 08:46

खनिजांचा खजिना : भाग ३
भाग २ (सोडियम) : https://www.maayboli.com/node/68970
...................................................................................

सोडियमचा भाऊबंद असलेले हे मूलद्रव्यसुद्धा (K) शरीरासाठी तितकेच महत्वाचे आहे. जरी ही दोन्ही मूलद्रव्ये शरीरात एकत्र नांदत असली तरी त्यांनी आपापला प्रभाव असणाऱ्या हद्दी आखून घेतलेल्या आहेत. मागील लेखात आपण पहिले की सोडियम हा प्रामुख्याने पेशीबाह्य द्रवांत असतो. पोटॅशियमचे मात्र बरोबर उलटे आहे. शरीरातील ९८% पोटॅशियम हा पेशींच्या आतमध्ये वास्तव्य करतो. तिथे तो क्षाररूपांत असतो. रक्तातील त्याचे प्रमाण हे अत्यल्प, म्हणजेच सोडियमच्या अवघे एक पस्तीसांश असते.

पोटॅशियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, त्याची सोडियमच्या प्रमाणाशी तुलना, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे.

आहारातील स्त्रोत:
त्यांची यादी सादर करण्यापूर्वी एका वाक्यात असे म्हणता येते की ‘’फळे व भाज्या भरपूर खाव्यात”, म्हणजे मग Kची चिंता नको. काही प्रमुख स्त्रोत असे:

१. टोमॅटो, सालासह बटाटे, ब्रोकोली, वाटाणे.
२. केळे, संत्रे, लिंबू , जर्दाळू
३. मांस व मासे
४. दूध व दही

Potassium-Rich-Food-1.jpg

यावरून लक्षात येईल की वनस्पती जगतात पोटॅशियम मुबलक आहे. त्याच्या शोधादरम्यान ते वनस्पतींच्या राखेत (ash) आढळले होते. म्हणूनच त्याला ‘पोटॅशियम’ हे नाव मिळाले.

आहारातील प्रमाण:
हा कळीचा मुद्दा आहे आणि त्यावर मतांतरे आहेत. एका शिफारसीनुसार निव्वळ पोटॅशियमचे प्रमाण ठरवण्यापेक्षा त्याचे व सोडियमचे तुलनात्मक प्रमाण महत्वाचे आहे. त्यानुसार सोडियम व पोटॅशियमच्या प्रमाणाचे गुणोत्तर १.२ असावे.( युरोपीय समुदायाच्या शिफारसीनुसार आहारातले रोजचे सोडियम २.३ ग्रॅम तर पोटॅशियम २ ग्रॅम असावे). आधुनिक खाद्यशैलीत हे गुणोत्तर वाढत्या दिशेने ( >२) जाताना दिसते कारण खारावलेले (सोडियम +++) प्रक्रियाकृत पदार्थ जास्त खाल्ले जातात. इथेच उच्चरक्तदाब आणि हृदयविकाराची बीजे रोवली जातात. यावर उपाय म्हणून ‘पोटॅशियमयुक्त मीठा’ची संकल्पना चर्चेत आली.

पोटॅशियमयुक्त मीठ : एक दृष्टीक्षेप
वर उल्लेखिल्यानुसार बिघडलेली आहारशैली सुधारण्यासाठी NaCl ऐवजी KCl हा आहारातील मिठाचा पर्याय म्हणून चर्चेत आला. NaCl हे मुळात चवदार आहे हे सांगणे नलगे. याउलट शुद्ध KCl हे कडू आणि बेक्कार वासाचे आहे. म्हणून मग शुद्ध KCl मध्ये काही चव सुधारणारे घटक मिसळून सुधारित ‘मीठ’ केले जाते. याबाबतीतील संशोधनातून असेही एक ‘मीठ’ तयार केले गेले की ज्यात NaCl, KCl व MgCl असे तीन घटक योग्य प्रमाणात मिसळलेले असतात. या मिठात सोडियमचे प्रमाण नेहमीच्या मिठापेक्षा निम्म्याने कमी असते.

आता ‘हया सुधारित मिठाचे काही तोटे आहेत का ?’ हा प्रश्न उपस्थित होतो. ज्या रुग्णांना पोटॅशियमची रक्तपातळी वाढण्याचा धोका असतो त्यांनी याच्या अजिबात नादी लागू नये. खालील प्रकारचे लोक या गटात येतात:
१. दीर्घकालीन मधुमेह
२. मूत्रपिंडविकार
३. उच्च रक्तदाबाचे वय ६० चे वरील रुग्ण जे अशी औषधे घेत असतात की त्यांमुळे पोटॅशियमची पातळी वाढते.

नेहमीचे की ‘सुधारित’ मीठ? हा प्रश्न अधिकाधिक संशोधनानंतर वादग्रस्त झाला आहे. अनेक संदर्भ पाहिल्यानंतर माझे असे मत आहे की -
शरीरातील सोडियम-पोटॅशियमचा समतोल राखण्यासाठी खालील उपाय करता येतील:

१. निरोगी व्यक्तींनी सोडियमचे प्रमाण शिफारशीइतकेच काटेकोर ठेवावे आणि त्याच्या जोडीला आहारात फळफळावळ व भाज्या भरपूर खाव्यात. हीच खरी निसर्गस्नेही आरोग्यदायी खाद्यशैली होय.
२. उच्चरक्तदाबाच्या रुग्णांनी सोडियम हे शिफारशीपेक्षा थोडे कमीच ठेवावे, आणि
३. या रुग्णांनी पोटॅशियमयुक्त सुधारित मिठाचा वापर हा गरज आणि वैद्यकीय सल्ल्यानुसारच करावा.

शरीरातील अस्तित्व आणि कार्य:

वर उल्लेखिल्याप्रमाणे शरीरातील ९८% पोटॅशियम हा पेशींच्या आतमध्ये असतो. तिथे तो फॉस्फेटशी संयुगीत असतो. खऱ्या अर्थाने तो पेशींमधील रासायनिक क्रियांचा राजा आहे. त्याची विविध कार्ये अशी आहेत:
१. पेशींतील मूलभूत प्रक्रियांत आवश्यक .यातून ऊर्जानिर्मिती होते
२. रक्तातील हायड्रोजनचे प्रमाण(pH) सोडियमच्या मदतीने स्थिर राखणे
३. मज्जातंतूंच्या संदेशवहनात मदत.
४. स्नायूंची वाढ व विकास

शरीरातील चयापचय:
आहारातील पोटॅशियम रक्तात सहज शोषले जाते. त्याचे शरीरातून उत्सर्जन हे मुख्यतः लघवीतून आणि अल्प प्रमाणात शौचातून होते. लघवीतून जाणारे प्रमाण आहारातील प्रमाणाशी थेट निगडीत असते. हे उत्सर्जन व्यवस्थित होण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित असले पाहिजे आणि या कामात Aldosterone हे हॉर्मोन महत्वाची भूमिका बजावते.

पोटॅशियमची रक्तपातळी:

सोडियमच्या तुलनेत ही खूपच कमी असते. ती अवघी ३.५ – ५.१ mmol/L असते. सामान्य आजारांत ती बिघडत नाही आणि ती मोजण्याची गरज नसते. ही चाचणी रुग्णालयात दाखल केलेल्या बऱ्याच रुग्णांत मोजली जाते. पातळी खूप कमी असल्याने त्यातील एकेक दशांशाचा बदलही महत्वाचा ठरतो. फार मोठे बदल हृदयासाठी घातक ठरतात.

रक्तातील पोटॅशियम कमतरता :
ही खालील आजारांत आढळते:
१. तीव्र उलट्या व जुलाब
२. मूत्रप्रवाह वाढवणाऱ्या काही औषधांचा दुष्परिणाम
३. मूत्रपिंडासंबंधी काही हॉर्मोन्सचे आजार

अशा रुग्णांना अशक्तपणा, स्नायूंत पेटके येणे ही लक्षणे जाणवतात. पातळी जास्तच खालावाल्यास नाडीचे ठोके वाढतात आणि हृदयकार्यावर परिणाम होतो. पातळी ३ चे खाली गेल्यास ते गंभीर असते.

रक्तातील पोटॅशियम अधिक्य:

याची प्रमुख कारणे अशी:
१. दीर्घकालीन मूत्रपिंड विकारात जेव्हा चाळणी यंत्रणेचे काम कमी होत जाते तेव्हा.
२. मूत्रपिंडासंबंधी काही हॉर्मोन्सचे आजार
३. मोठ्या स्नायूंना गंभीर अपघातात होणारी इजा.

जशी ही पातळी वाढू लागते तसा रुग्णाचा मानसिक गोंधळ होऊ लागतो. त्यापुढे पक्षघात आणि श्वसनदौर्बल्य होते. पातळी खूप वाढल्यास हृदयक्रिया बंद पडते. पातळी ६चे वर जाऊ लागल्यास ते गंभीर असते.

सारांश
तर असे हे धातूरुपी मूलद्रव्य- पोटॅशियम. आपल्या पेशींत वास्तव्य करणारे आणि जीवनावश्यक. आहारातील भाज्या व फळांतून ते सहज मिळते. आहारात त्याचे व सोडियमचे तुलनात्मक प्रमाण योग्य राखणे हे हितकारक. त्यासाठी भाज्या व फळे भरपूर खावीत. म्हणजे मग आहारातील सोडियमचा बाऊ करण्याची गरज नाही.
****************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाही लेख छानच डॉ. अनेक धन्यवाद.

Na व K चा समतोल व्यवस्थित समजला.
काही व्यायामशाळात पोटॅशियम वॉटरच्या बाटल्या ठेवतात. खूप व्यायाम केल्यास हे प्यायचे असते का?

वरील सर्व नियमित वाचकांचे आभार.
व्यायामशाळात पोटॅशियम वॉटरच्या बाटल्या>>>>

खरे तर याची गरज नाही. घामातून किरकोळ K बाहेर जाते. दणकून व्यायाम करणाऱ्यानी मस्तपैकी शहाळे प्यावे किंवा केळ खावे.

मानव व शाली,
उत्साहवर्धनाबद्दल आभार.