आग्र्याहून सुटकेचे नाट्य - पुस्तक परिचय

Submitted by शशिकांत ओक on 3 February, 2019 - 01:35

शिवरायांचा आठवावा प्रताप !

आग्र्याहून सुटका मुखपृष्ठ.JPGशिवजयंती निमित्ताने शिवाजीरायांच्या एका महत्वाच्या जीवनप्रसंगावर आधारित पुस्तकाचा परिचय करून देत आहे.

escape-from-agra.jpg

वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरतीसारख्या ठिसूळ व नरम मिठायांना 60 -70 किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल. चौक्यावर पहारेकऱ्यांना चकवायला खाली लपलेल्या व्यक्तीच्या अंगावर मिठाया ठेवायला हव्यात. अशा पेटाऱ्यांना दोन भोयांनी ते कमीत कमी 7-8 किमी दूर नेताना लागणारा वेळ. भोयांना कटात सहभागी करून कितीवेळ हे निसटणे लपलेले राहणार, वगैरे कसे शक्य आहे याची चिकित्सा करायला हवी. त्यातील त्रुटी पाहता मिठाईच्या पेटाऱ्याची युक्ती फक्त कल्पना होऊ शकते असे लेखकाला वाटते.

लेखक, डॉ. अजित प. जोशी आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्तिदायक जीवनावर आजपर्यंत अनेक छोटे मोठे ग्रंथ लिहिले गेले आहेत. (त्यात) संशोधनात्मक लेखन खूप कमी आहे. आगऱ्याहून सुटका प्रसंगाची उपलब्ध ऐतिहासिक पत्रे, बखरी तसेच शिवाजी महाकाराजींची व्यक्तिरेखा लक्षात घेऊन एक नवी मांडणी प्रस्तूत ग्रंथात केली आहे. त्यामुळे त्याला काही प्रमाणात संशोधन प्रबंधाचे स्वरूप आले आहे. चिकित्सक वाचक तसेच इतिहासाचे अभ्यासक यांना हा ग्रंथ आवडेल असा विश्वास वाटतो.

‘नव्याने जुने शुद्ध करावे’ असा कौटिलिय अर्थशास्त्राच्या 25व्या ‘दुर्गनिवेश’ नावाच्या प्रकरणात उल्लेख आहे. दुर्गनिवेश म्हणजे किल्ल्याची मांडणी. उपलब्ध लेखन सामुग्रीवर आधारित नवीन विचार करून त्याचा नवीन अन्वयार्थ लावून प्रस्तूत ग्रंथात नवीन प्रमेय मांडले आहे.
सध्या मान्य असलेल्या मिठाईच्या पेटाऱ्याच्या कथेचे विश्लेषण केले आहे. पुरंदरच्या तहापासून शिवाजीराजे व संभाजीराजे राजगडावर परत येईपर्यंतचा कालखंड विस्तृत पुराव्यांसह सादर केला आहे. शिवाय नेताजी पालकरबद्दल उपलब्ध माहिती परिशिष्ठ 1 मधे दिलेली आहे.

नवीन प्रमेय - पेटाऱ्याची कथा आणि तिचा फोलपणा

बहुसंख्य इतिहासकारांचे मत शिवाजीमहाराज संभाजीसह औरंगजेबाच्या नजरकैदेतून मिठाईच्या पेटाऱ्यात बसून निसटले असा आहे. याचे कारण बहुतेक सर्व ऐतिहासिक साधनांमधून राजे पेटाऱ्यातून निसटल्याचा उल्लेख आहे. या प्रमेयाच्या विरोधात दुसरे कोणतेच प्रमेय उपलब्ध नसल्यानेही पेटाऱ्याची कथाच जनमानसात मान्य आहे. पेटाऱ्याच्या कथेतील सोपेपणा, साधेपणा, नाट्य तसेच त्यातून दिसणारा मोगल अधिकाऱ्यांचा बावळटपणा यांच्यामुळे कथेस अधिक उठाव येत असल्याने ती सामान्य जनतेस मान्य झाली असावी.
या प्रमेयाला मारक 12 मुद्दे कसे विरोधी ठरता याचे विवेचन लेखनाने सविस्तर केले आहे. त्यातील एक मुद्दा जास्त बिनतोड वाटतो तो असा –
पेटाऱ्यात बसणाऱ्या माणसाला अगदी असहाय्यपणे पाय व अंग मुडपून बसावे लागते. अशा अवस्थेत खूप ताकदवाद व लवचिक देहाचा माणूस देखील फार काळ बसून राहू शकणार नाही. दोन-तीन कोस म्हणजे 5-7 मैल (8 ते 10 किमी) चालण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागतो. (असा प्रवास पेटाऱ्यांची कावड करून जाताना भोयांच्या चपळ पायगतीचे अंदाज बांधता, प्रत्येक चौकीवर थांबत थांबत 2 पेक्षा जास्त तास तरीही लागतील असे म्हणता येईल. - कंसातील विचार माझे)
अशा अवस्थेत बंदिस्त पेटाऱ्यात तलवारी सारखे शस्त्र जवळ बाळगता येत नाही. त्यामुळे पेटाऱ्यातील माणूस संरक्षणासाठी पूर्णपणे बाहेरील माणसांवर अवलंबून असतो. जर सापडले तर शिरच्छेद ठरलेलाच! इतक्या असहाय्य स्थितीत, संपूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून, अतिशय सावधपणे सुरक्षित योजना आखणारे शिवाजी महाराज नजरकैदेतून निसटण्याचा धोका पत्करतील असे वाटत नाही.
राजांच्या महालापासून ते रस्त्यापर्यंत 5-6 चौक्या पार करायला लागत होत्या. एवढ्या पहाऱ्यातून एकदाही तपासणी न होता एखादा पेटारा डेऱ्यातून बाहेर पडणे शक्य नाही. प्रत्येक पेटाऱ्याची किमान एकदा तपासणी होतच असणाऱ. संशयी औरंगजेबाचे हेर किंवा फौलादखानाचे सैनिक ते पेटारे कुठे, कोणाकडे जातात ते पाहण्यासाठी पाळतीवर असण्याची शक्यता आहे. धूर्त बादशाहाने राज्यांवर पहारा करणाऱ्या सैनिकांना पेटाऱ्याच्या कडक तपासणीचा हुकूम दिलेच असणार. म्हणून मिठाईचे पेटारे तपासणी न होताच राजांच्या डेऱ्याबाहेर पडणे अशक्य आहे. (आणखी एक मला सुचलेला विचार - राजांच्या स्थानबद्धतेत ही मिठाई त्यांच्याकडील स्वयंपाक्यांनी बनवलेली नसावी. ती बाहेरील गावातील नामांकित हलवायांच्या दुकानातून आत मागवली जात असेल. ज्या पेटारा किंवा बुट्ट्याच्या करंडीत वा पेटीत मिठाई आली त्याच पेटीतून ती परत मोठ-मोठ्या सरदार व मानकऱ्यांच्या घरी पोहोचवायला, देण्यास पाठवली जात असेल. मिठाई ही वस्तू ठिसूळ असल्याने त्याची पेटी वा पेटारा जर माणूस बसेल इतक्या मोठ्या आकाराचा व इतका भक्कम तरीही बाहेरून कोणी तलवार खुपसली तर आत आरपार जाईल पण मिठाई शाबूत राहील अशी असायला हवी. अशा करंडीवजा पेटीतून पलायन एक अति धोक्याचा प्रयत्न म्हणून अशक्य वाटतो)
काही इतिहासकरांच्या मते शिवाजीमहाराज पेटारे वाहून नेणाऱ्यांच्या वेषात व संभाजीराजे पेटाऱ्यात बसून डेऱ्याभोवतालच्या पहाऱ्यातून निसटले आसावेत. परंतु या प्रकारातही तेवढाच धोका संभवतो. एक वेळी 2-4 भोईच एक पेटारा घेऊन चौकाबाहेर पडू शकतात, पेटाऱ्यांप्रमाणे भोयांचीही कडक तपासणी होत असणार. त्यामुळे एखादा नवा भोई (जो आत आलाच नाही) पहारेकऱ्यांकडून ओळखला जाण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय सर्वात म्हत्वाचे म्हणजे शिवाजीमहाराजांचे राजबिंडे रूप आणि जरब! ते भोयाच्या वेशात लपून राहणे अशक्य आहे. (‘त्यांना पाहूनच हा माणूस राजाच असला पाहिजे असे वाटते’ असे वर्णन राजस्थानी पत्रात सापडते)

निसटण्याच्या तारखेचा घोळ

दुसरे असे की शिवाजी महाराज आग्र्याहून कोणत्या दिवशी निसटले याबद्दल ऐतिहासिक कागदात एकमत नाही. मात्र 18 ऑगस्टच्या सकाळी ते दोघेही निसटल्याचे पहाऱ्यावरील सैनिकांच्या लक्षात आले. ही गोष्ट निर्विवाद आहे. शिवाजीमहाराजांची दरबारातील भेट 12 मे 1666 व नंतरची सुटका 18 ऑगस्ट 1666 अशा तारखा पक्क्या आहेत.
सध्या मान्य असलेल्या घटनाक्रमानुसार औरंगजेब 18 ऑगस्ट रोजी आपणास दुसऱ्या हवेलीत नेऊन ठार मारणार अशी बातमी समजल्यामुळे शिवाजीमहाराज 17 ऑगस्ट रोजी घाईघाईने आग्र्यातील नजरकैदेतून निसटले, नंतर 25 सप्टेंबर 1666 रोजी सुमारे 25 दिवसात दक्षिणेत 700 मैलावर राजगडाला पोहोचले. शिवाय दक्षिणेत जाण्याआधी त्यांनी संभाजीला मथुरेला म्हणजे आग्ऱ्याच्या उत्तरेला 33 पोहोचवले. म्हणजे त्यांना तसे फक्त 22 -23 दिवसच मिळतात. आग्र्याहून घाईघाईने बाहेर पडण्यामुळे त्यासाठी लागणारे माणसांचे, घोड्यांचे आयोजन, करण्यासाठी राजांकडे वेळ नाही. आणि ते सर्व आयोजन महाराजांनी आधीच करून ठेवले होते असे मानले तर मग औरंगजेबाने मारण्याचा हुकूम काढण्याचा वाट बघत राजे आग्र्यात का थांबले असा प्रश्न निर्माण होतो!
पुर्व योजनेचा अभाव, घोड्यांचा वेग व क्षमता, पावसाळ्याचा ऋतु, या गोष्टी लक्षात घेतल्यास आग्रा ते राजगड अंतर घोड्यावरून 22-23 दिवसात पार करणे अशक्य वाटते. राजांनी राजगड ते आग्रा हा लवाजम्यासह जातानाचा प्रवास 5 मार्च ते 11 मे या काळात म्हणजे एकूण 66 दिवसात पुर्ण केला होता. मोजक्या माणसांना बरोबर घेऊन आग्रा ते राजगड हे अंतर (जास्तीत जास्त वेगाने) सुमारे 45 ते 50 दिवसात वेगाने कापणे शक्य आहे. असे लेखक मानतात. या बाबत लेखकाने भांबोरकर भोसल्यांची एकदा दस्तऐवजासाठी व जीव वाचवायसाठी केलेली (सुमारे 200 वर्षांच्या फरकाने घडलेली) घोडदौड सविस्तर निवेदली आहे. ‘त्यात घोड्याला तीव्र गती देऊन कोठेही न थांबता ते रात्रभर चालून (पळवून)18 कोस – 45 मैल – 72 किमी) ते सुरक्षित स्थळी पोहोचले होते असा उल्लेख केला आहे. मात्र त्यानंतर ते (व घोडा?) 3 अतिश्रमाने 3 दिवस जाग्यावर पडून होते.’ असे ही म्हटले आहे. ‘एका दिवसात इतकी दगदग केली की कसे थकायला होते याचे ते प्रतीक आहे. असे 22 - 23 दिवस सतत घोडदौड करणाऱ्या माणसाचे काय हाल होतील याची कल्पना देखील करणे अवघड आहे.’ असे लेखक म्हणतात.
मग अशी सर्वमान्य प्रमेये अमान्य होत असतील तर मग लेखकनी नवे प्रमेय ते काय मांडले?
याचा आढावा पुढील भाग 2 मधे ....
escape-from-agra.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगली मालिका. आग्र्याहून सुटका ही अनेक शक्यतांनी भरलेली एक ऐतिहासिक घटना आहे. यावर कधीही जास्त न बोलले गेलेले आहे. कारण उघड आहे.
दुस-या एका धाग्यावर त्याची लगेचच प्रचिती देखील आली आहे. पेटा-यांच्या कथेशिवाय अन्य कुठली शक्यता ही विद्वानांना मजेशीर कथा वाटू शकते (किंवा कारस्थान ).

औरंगजेबने शिवाजी महाराजांना पळायला मदत केली होती, त्या दिवशी औरंग्या महाराजांना बोलला मी उद्या शिकारीला गेलो की तुम्ही लगेच निसटून जा, नाही म्हणायला दोन साथीदार इथेच ठेवा म्हणजे मी त्यांना पकडून मारल्यासारखे करतो आणि ते रडल्यासारखे करतील आणि शंभूराजेना मथुरेत ठेवा , मागाहून बोलवा म्हणजे तुम्ही पण सुखरूप पोहचाल, साथीदार पण सुखरूप आणि माझ्यावर पण संशय नाही घेणार कोण, कसा काय वाटला माझा प्लॅन द्या टाळी. Lol

कसा काय वाटला माझा प्लॅन द्या टाळी
प्लान तर भन्नाट आहे...
फक्त तो पार आपल्याला समजा कैद केले तर उपयोगात आणला जाऊ शकतो.