दळणीय धागे

Submitted by थॅनोस आपटे on 30 January, 2019 - 10:40

हा धागा म्हटलं तर अ‍ॅडमिन, अ‍ॅडमिन टीम साठी आहे. म्हटलं तर वाचनमोड मधे असलेल्या मूकवाचकांसाठी आहे. म्हटलं तर चांगलं वाचायला येणा-यांसाठी आहे.

अशा सर्वांतर्फे आगंतुकपणा करून हा उपद्व्याप.

आपल्याकडे (म्हणजे भारतात फेसबुक, मायबोली व इतर समाजमाध्यमांवर) त्याच त्याच गोष्टींचे तेच ते दळण दळणारे असंख्य विषय इसवीसनापासून सुरू आहेत. अनेकदा पात्रं तीच असूनही पुन्हा पुन्हा तेच ते दळण दळलं जातं. साधारण पणे असे समजले जाते की एखाद्याला मी अमूक तमूक ठिकाणी राहतो असे सांगितले की त्याला फारतर विस्मरण झाले म्हणून पुन्हा एकदा किंवा दोनदा सांगण्याची आवश्यकता पडते. मात्र इथे रोजच उठून त्याच त्या पार्ट्या तेच ते दळण दळतात हे आठवे आश्चर्य नव्हे का ?

उदा.

समजा धागा कुणा राजकीय व्यक्तीच्या अभिनंदनाचा असेल. मग त्या व्यक्तीचं अभिनंदन, नंतर विरोधकांकडून पण त्याने त्या वेळी असे केले होते / किंवा केले नव्हते असे करत करत धागा लगेचच गांधी खून - गोडसे - नेहरू - पटेल - कश्मीर प्रश्न, फाळणी, दंगल, बाबरी मस्जीद - शहाबानो - गुजरात दंगल - शीख हत्याकांड या मार्गाने जातो. या प्रत्येक मुद्द्यावर हजारो वर्षे घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे तेल काढूनही पुन्हा प्रत्येक धाग्यावर हेच सुरू होते. मग मोदी येतात, राहुल गांधी येतात. मग अध्यादेश फाडणे, सोनिया गांधींचा अंतरात्म्याचा आवाज हे सगळे येते.

आता हे इतरांना पाठ झालेले असले तरी या विद्वतसभेला तसे वाटत नाही. तसेच कुशल गा़ंजेकश मनुष्यास तार लागली असता कुणी त्याची तंद्री भंग केलेली चालत नाही तद्वतच विषयभरकटीकरणाच्या नादात कुणी धाग्याच्या विषयाला अथवा दिनविशेषाला धरून प्रतिसाद दिलेला चालत नाही. नवीन कुत्रे दिसल्यावर ज्याप्रमाणे भटके कुत्रे वस्सकन अंगावर येते अगदी तसे काही प्रतिसादक नव्यांच्या अंगावर देखील येत राहतात.

पण या मंडळींच्या मेहनतीमुळे बुद्धाची कणव / करूणा अंतःकरणात जागृत होते आहे. एखाद्याला घाण्याला जुंपणे हे माणुसकीला धरून नाही. तरी अ‍ॅडमिन साहेबांनी मानवी हक्कांच्या पायमल्लीबाबत जागृत असावे ही विनंती. मंडळाचे घाण्याला जुंपणे कसे सुकर करता येईल याबाबत एक सुचवणी करीत आहे. सुहृद वाचकांनी आपापले प्रस्ताव पाठवावेत ही नम्र विनंती.

१. फाळणीबाबतचा एक धागा असावा.. ज्यात फाळणी का झाली, कोण जबाबदार, कुणाचे चुकले, कुणाचे चुकले नाही, कोण बरोबर ही चर्चा असावी.
२. गांधीजींचा खून का झाला हा दुसरा धागा असावा
३. गोडसेने खून का केला, खूनाचे सहा प्रयत्न १९४८ च्या आधीही कसे झाले होते त्यामुळे खूनाची कारणे लंगडी कशी याबाबत तिसरा धागा.
४. पटेलांनी २० जानेवारीला मारेकरी सोडून संघाला मदत केली का या विषयावर चौथा धागा. सदर घटनेबाबत गृहमंत्रायलायच्या अहवालाबाबतची चर्चा या धाग्यात केली जावी.
५. भारताचे धोरण नेहरूंनी ठरवले, पटेलांनी, गांधींनी की आंबेडकरांनी याबाबतची चर्चा पाचव्या धाग्यात.
६. पटेल नसते तर भारताचे तुकडे कसे झाले असते हा सहावा धागा
७. संघाचा स्वातंत्र्यसंग्रांमात सहभाग काय हा सातवा धागा. यात संघाने ब्रिटीशांना केलेली मदत, सावरकरांनी मागितलेली माफी ही सर्व चर्चा असावी.
८. घराणेशाही आणि लोकशाही हा आठवा धागा. यात एका घराण्याला पर्याय नाही का या प्रश्नास उत्तर देताना वसुंधराराजे. मुंडे, महाजन यांच्या सहीत एकमेकांच्या घराण्याचा उद्धार करीत लाथाळ्या असाव्यात.
९. रामजन्मभूमी वादाबाबत कुलूप कुणी काढले, शाहबानो प्रकरण, शीख दंगल, बाबरी दंगल, नरसिंहराव यांची भूमिका, जमीन समतल इत्यादी लाथाळ्या असाव्यात. गुजरात दंगल याच धाग्यात आले तरी चालेल. कारण २००० प्रतिसाद करायची क्षमता आहेच आणि दुसरा भाग काढायची पद्धत आता रूढ आहे.
१०. अटलबिहारी वाजपेयी -दीन दयाळ उपाध्याय - बलराज मधोक - शामाप्रसाद मुखर्जी - एल के अडवाणी यांची कारस्थाने, उपाध्याय आणि मुखर्जी खून प्रकरणासाठी हा दहावा धागा असावा.
११. इंदिरा गांधी खूनासाठीच्या या धाग्यात त्यांनी आणीबाणी कशी आणली, त्याच पुन्हा कशा आल्या, संजय गांधी यांचे निधन झाल्यावर त्यांनी घड्यालाची चौकशी कशी केली, स्विस बँकेत किती पैसे यासाठी या धाग्याचा वापर केला जावा
१२. असे करत करत मोदी - राहुल - प्रियंका अशा लाथाळ्यांसाठी हा डझनवा धागा असावा. या बारा धाग्यात सर्व मुद्दे यावेत.

मग कुठल्याही धाग्यावर कुणालाही उबळ आली तरी यातल्या नेमक्या धाग्याची लिंक द्यावी. परत पहिल्यापासून सूर्यवंशम ची स्टोरी सांगत नसू नये.

एव्हढे केले तर भाजप आणि काँग्रेस या पलिकडेही जग असलेल्यांवर अनंत उपकार होतील एव्हढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जयहिंद ! जय भारत !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकिस्तान, नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक हे मुद्दे राहिलेत, ह्यांच्या साठी हि नवा धागा असावा. ५६ इंच साठी वेगळा असावा, त्यात मगर पकडणे वगैरे येईल.

कुणावर अन्याय झाला असेल तर क्षमस्व !
या १२ धाग्यात हे विषय मावत नसतील याची खात्री असेल तर एखाद्या धाग्याचे दुसरे तिसरे भाग काढण्याची मुभा असेलच

पॅराग्राफ ३ आणि ४ वाचून Lol
तुम्ही म्हणताय तसे धागे आजवर भरपूर निघाले आहेत पण कधी कधी आहेत त्याच धाग्यांवर लिहिलं की आपल्याकडे हवं तसं लक्ष वेधून घेता येत नाही हे एक आणि दुसरं म्हणजे आपण स्वतंत्र धागा काढून मायबोलीला हातभार लावायला नको?
तुमच्या लिस्टमध्ये स्क्रिनशॉट्स साठवून ठेवायला एक धागा द्या.

त्यात राजकीय सिनेमे व त्यांचे परीक्षण अशी एक कॅटेगरी वाढवा.

कालाविष्कारांचे राजकीय परिप्रेक्षातून विश्लेषण

या डझनभर धाग्यांच्या सूचनेबरोबर काही विशेष साहित्यप्रेमींकडून अजून एक विनंती,
यांपैकी कुठल्याही धाग्यावर कितीही ऊतमात, लाथाळ्या, शिव्या काहिही झाले तरी धागा बंद करण्यात येवू नये. 'संपूर्ण मायबोलीवरील लेखन' यातही दिसणार नाही अशा एखाद्या ग्रूपमधे (महा-विरंगूळा नाव द्या हवं तर Wink ) हलवण्यात यावे. जेणेकरुन अशा प्रकारांतून करमणूक होणार्यांना त्याचा लाभ घेता यावा. Wink

पूमाराना हळहळ समितीला वेळोवेळी हळहळ व्यक्त करण्यास स्वतंत्र धागा असावा.

पूमाराना = पूर्वीची मायबोली राहिली नाही.

मानव Lol परफेक्ट.
आणि 'युजलेस धागे' असाही एक धागा असावा. ह्या धाग्याचे लेखक त्यात बिनकामाचे भारंभार धागे, दळणीय धागे, मळणीय, तळणीय धागे घालुन भर घालतील. Light 1

'संपूर्ण मायबोलीवरील लेखन' यातही दिसणार नाही अशा एखाद्या ग्रूपमधे (महा-विरंगूळा नाव द्या हवं तर Wink ) हलवण्यात यावे. +११११११११११

Lol जबरी धागा आहे. Lol

वेगवेगळ्या चक्क्या वेगवेगळ्या दळणासाठी टाकण्याचा प्रस्ताव आहे, त्यात अजून एक गुर्र गुर्र चालणारं जातं पण ठेवून द्या - शाहरुख प्रेमाचं दळण अखंड गळतं त्यातून तेच. आधी मजा वाटायची आता महान वात आणला आहे.

भारत कसा बेस्ट आणि अमेरिका कशी बेकार (आणि व्हाईस वर्सा) यावर अजुन एकही दळण दळलं गेलं नाहीये!!!
पूर्वीची माबो राहिली नाही हेच खरं. Proud

सोशल मीडीया आल्यानंतर कुजबूज मीडीयाचा प्रचार ख-या अर्थाने चव्हाट्यावर आला. तो खोडून काढणे आवश्यक आहे अशी धारणा झालेल्या लोकांनी आपल्या खांद्यावर ही जबाबदारी उचलली. कुजबूज मीडीया संघटीत मीडीया आहे. त्यात दर वर्षी ताज्या कुमकेची भर पडते आणि ते परत पहिल्यापासून तेच दळण दळू लागतात. जुनेही आपला हेका सोडत नाहीत. उत्तर देणारे मात्र तेच ते लोक आहेत. तिथे कुठेही संघटना नाही, नवीन भरती नाही. त्यामुळे काहींनी आपले जीवितकार्यच या प्रकारच्या प्रपोगंड्याला वारंवार उत्तर देणे हे करून घेतलेले आहे. आणि आता ते त्यातच सुखी आहेत.

मुळात यांना सोशल मीडीयावरूनच (जमेल तेव्हढी) जागृती करायची आहे. कारण त्यात कष्ट नाहीत. त्यामुळे स्वभावात प्रचंड नकारात्मकता येत राहते. सोशल लाईफ बंद होते. यातला फोलपणा कधी कधी कळत नाही, कधी कधी कळतो तेव्हां व्याधींनी घेरलेले असते. या शारीरीक अथवा मानसिक असू शकतात.

प्रत्यक्ष जीवनात टोकाच्या विचारसरणीचे दोन मनुष्यप्राणी एव्हढे अंगावर धावून जात नाहीत.
बदल आणायचा असेल तर बाहेर पडून लोकांच्या भेटीगाठी घेतल्या पाहीजेत. सोशल मीडीयावर प्रवचने झोडून अथवा उखाळ्या पाखाळ्या करून तो होणार नाही हे जेव्हां समजेल तेव्हां बदल होईल..... कदाचित तेव्हांच सोशल मीडीयाही सोशल होईल. अर्थात हे सर्व राजकीय पक्षांचे सक्रीय कार्यकर्ते आणि पाठीराखे यांना उद्देशून नाही.

राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असलेल्या सदस्यांचा पोटापाण्याचा धंदा असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत. त्यांना सामान्यांनी डोके न देणे हेच योग्य. कारण पक्षहितापुढे व्यक्तीची प्रतिष्ठा, संकेत याच्याशी त्यांना देणेघेणे नसते. स्वतःवर चिखल उडवून घेण्यासारखे आहे ते.

वेगवेगळ्या चक्क्या वेगवेगळ्या दळणासाठी टाकण्याचा प्रस्ताव आहे, त्यात अजून एक गुर्र गुर्र चालणारं जातं पण ठेवून द्या - शाहरुख प्रेमाचं दळण अखंड गळतं त्यातून तेच. आधी मजा वाटायची आता महान वात आणला आहे.>>>>>> मीरा Rofl गुर्र गुर्र भारी वाटले.

फार फार भारी.

गां धीजीन्च्या धाग्यावर लिहिण्याचा मुर्खपणा केला अस वाटत असताना (द्वेषारोप, चष्मे, त्या चष्म्यातून निघालेले अर्थ, त्या चष्म्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न निरर्थक आहे हे जाणवल्याने, हे सगळेच अगदीच निरुपयोगी आहे असे अजून प्रकर्षाने जाणवल्याने) - हा धागा आला आणि एकदम हहपुवा झाली!

किरणुद्दी नची पोस्ट तर अगदी अगदी झा ली. आपण कसे आहोत हे आपली फॅमिली, फ्रेन्ड्स, कलिग्ज, कामवाल्या मावश्या आणि शेजारी च (सोशल कामात असाल तर तो ग्रूपही) जाणतात. हे सोडून बाकीच्यांशी घेणदेण ठेवलं नाही तरी चालू शकत खरतर. एस्पेशियली अशा सोशल प्लॅटफॉर्म वर आपले विचार मांडणं हे काऊंट र प्रॉडक्टिव आहे असं वाटत य आजकाल - काल फारच जाणवलं. त्यापेक्षा ज्या कॉज करता काम करतोय त्या करता एनर्जी राखून ठेवावी - म्हणून नंतर गांधीजींच्या धाग्यावर फिरकलेच नाही ठरवून.

मेरीच गिनो आणि किरणुद्दीन - रिस्पेक्ट!

किरणुद्दीन - पोस्ट आवडली, प्रत्येक शब्द पटला...

<< कुजबूज मीडीया संघटीत मीडीया आहे. त्यात दर वर्षी ताज्या कुमकेची भर पडते आणि ते परत पहिल्यापासून तेच दळण दळू लागतात. >>
------- Happy बारिक निरीक्षण

<< बदल आणायचा असेल तर बाहेर पडून लोकांच्या भेटीगाठी घेतल्या पाहीजेत. सोशल मीडीयावर प्रवचने झोडून अथवा उखाळ्या पाखाळ्या करून तो होणार नाही हे जेव्हां समजेल तेव्हां बदल होईल..... >>

------ खुप महत्वाचे आहे.

भेटी गाढी घेताना एकाच डबक्यातल्या विचारसरणीच्या लोकांच्या सतत संपर्कात असलात तर त्याने खुप फायदा होणार नाही. मी चार देशात राहिलो आहे, २० देशांना भेटी दिल्या आहेत आणि म्हणुन आता माझे विचार, त्यांची खोली/ व्याप्ती प्रगल्भ आहे असा भलताच गैरसमज नाही होणार. वैचारिक भिंती आपणच बांधल्या आहेत.

भेटी घ्या पण निर-निराळ्या विचारसरणीच्या, निर-निराळ्या स्तरातुन आलेल्या लोकांच्या भेटी घ्या... या छोट्या डबक्याच्या बाहेरही विशाल पण सुंदर जग आहे हे पण समजायला हवे.

आयडिया आवडली Lol
इतर सुचवण्या उदा. पुमाराना पण भारीच आहेत.

>> त्यामुळे स्वभावात प्रचंड नकारात्मकता येत राहते. सोशल लाईफ बंद होते. यातला फोलपणा कधी कधी कळत नाही, कधी कधी कळतो तेव्हां व्याधींनी घेरलेले असते. या शारीरीक अथवा मानसिक असू शकतात.

+११११

मस्त हहपुवा. Lol
पण कधी कधी आहेत त्याच धाग्यांवर लिहिलं की आपल्याकडे हवं तसं लक्ष वेधून घेता येत नाही हे एक आणि दुसरं म्हणजे आपण स्वतंत्र धागा काढून मायबोलीला हातभार लावायला नको? +१११११
मोदी विरोधक किंवा मोदी समर्थक ( नीच भक्त असं म्हटलं जात माबोवर ) किंवा उलट काँग्रेस विरोधक आणि समर्थक असेही धागे पाहिजेत Happy