चांदणे जागेच आहे - नचिकेत जोशी लिखित गझल संग्रहाबद्दल

Submitted by पल्ली on 27 January, 2019 - 05:22

चांदणे जागेच आहे...
बरेच दिवस वाचलं खुप जात होतं पण कश्यावर उत्स्फूर्तपणे काही लिहावं असा काही योग येत नव्हता. अश्यात आमच्या आनंदयात्री चं कवितांचं पुस्तक 'चांदणे जागेच आहे..' हाती आलं आणि योग आणि शब्द सगळं जुळून आलं.

संपूर्ण गजल संग्रह किंवा गजलांचे रसग्रहण करण्याइतकी माझी योग्यता नाही पण म्हणून एकेका गजलेतलं सौंदर्य टिपण्याचा माझा एक छोटासा प्रयास आहे. दिग्गजांनी सांभाळून घ्यावे.

मायबोली.कॉम सोबत नाते जुळले तसे नचिकेत सारखे खुप छान सुहृद मिळत गेले. मी 'पल्ली' म्हणून घडत गेले. म्हणून त्या मायबोली.कॉम चे प्रथम आभार.

नचिकेतची पहिली गजल, 'अजूनही'
मनात ह्या कुठे कुठे तुझे ठसे अजूनही...
कधी न कधी प्रत्येकानं पहिलं प्रेम, पहिली नजर वगैरे अनुभवलेलं असतं. असं मला वाटतं. मला तरी त्या पहिल्या वहिल्या कोवळ्या प्रेमाची आठवण झाली.

नभी ढगाळताच , मी तुझीच वाट पाहतो
नभात दाटतात रोज भरवसे अजूनही...
ह्या ओळीतून ढगाळून आलेलं आभाळ आणि मनात उठणारे तरंग ह्यांचं सुन्दर समिकरण व्यक्त करतात. तसंही मला पाऊस, भरून आलेलं आभाळ आवडतं. त्यावर हे 'अजूनही....' फारच कातील झालं राव. सुरुवातच अशी तर पुढे काय काय तरंग उठवणार हा आनंदयात्री माझ्या मनांत!

मग समोर आली 'रहदारी'. येणे जाणे, झुरणे मोहरणे अशा आठ्वणींच्या गर्दीतून नचिकेतनं अचानक एका शांत निर्मनुष्य गल्लीतून वास्तववादी कोपर्‍यावर आणलं.
जसे वय वाढते आहे, तसे भय वाढते आहे
कमाईच्या छताखाली जिणे नुसतेच नादारी...
कमाई प्रत्येकाच्या पेशावर अवलंबून असते, अर्थात मटेरियलिस्टिक असते तेव्हा. कुणी खुप काही कमावतो तर कुणी न कमवताही समाधानी असतो. सगळा मनाचा खेळ. एक स्त्री म्हणून मला उंबरठा खुप महत्वाचा वाटतो. उंबरठ्याच्या अल्याड आणि पल्याड दोन भिन्न विश्व असतात. नेमकं तेच चपखल असं नचि नं 'पेशा' या गजलेत मांडलंय.
उंबरठ्याच्या पार मनाची सत्ता नाही
उंबरठ्याच्या आत मनाची इच्छा नाही...
ह्या दोन ओळींशी मला एका स्त्रीचे वैयक्तिक नाते जाणवले तर पुढील ओळीत तो सामान्य माणसाचे मनोगत मांडतोय.
सहनशीलता म्हणू ह्यास कि हतबल जगणे?
प्रश्न जागतिक आहे, माझ्यापुरता नाही...

कवीचं मन जात्याच हळवं. जराश्या धक्क्यानं हुळहुळणारं, कधी कधी आघात सहन करण्याची क्षमता संपते. बोलून विषय वाढवण्यापेक्षा मौन बरं असं वाटू लागतं. कविता करणं किंवा चित्रं रेखाटणं म्हणजे कलाकाराचं व्यक्त होणं. अश्या व्यक्त होण्यातून उगीच अर्थ-अनर्थाचे प्रश्न उभे राहू लगतात. इथे नचिकेत मौन धरतानाच अलगद कसा सुरेख व्यक्तही होतोय पहा,
मूक जगण्यानेच आता वादळे टळतील बहुधा
व्यक्त होणे हेच आता वाटते संकट खरोखर...
आठवणीतल्या एका रेशमी नात्याचा धागा हळूवरपणे स्पर्शताना कवी म्हणतो,
मला 'आम्ही' म्हणाया लागलो आहे
तुझ्याबद्दल दिलेली ती हमी आहे...

प्रियकराचं मन. वेडं मन. खुळं मन. गुंतलेलं मन म्हणतंय,
तुला नकोसा होतो हे ठाऊक, तरीही
खुळ्या मनाशी हवेहवेसे विचार झाले..

नचिकेतनं जितकं आशिक मिजाज लिहिलंय तितकंच सामाजिक किंवा खरं तर सर्व सामान्य मध्यम वर्गीय माणसाचं मनही किती छान व्यक्त केलंय.
दु:खासवे लढाया मी नित्य सज्ज होतो
पण सामना सुखाशी होताच बिचकलो मी
दु:खाशी चार हात करायची सवय झालेल्याला अचानक सुख हात जोडून दारी आलं तरी दचकायला होतं, कि खरंच सुख आलंय माझ्या आयुष्यात? टिकेल नं हे? सुखाच्या ह्या अनुभुतीनंतर पुन्हा दु:खाची झळ तर येणार नाही ना? मग चंद्राचा सुद्धा आधार वाटू लागतो. दूरावलेल्या कोणाच्या तरी अस्तित्वाचा, आठवणींचा आधार वाटू लागतो...
दूर तो कोठेतरी असणार नक्की
एवढा पुरतो मला आधार नक्की

कलाकाराचा स्वतःचा असा एक काळ असतो. शब्द सुचणं ही एक दैवी कृपाच म्हणायला हवी. न सूचण्याचा काळ कधी कधी जरासा लांबतो. तरीही निराश न होता नचि विश्वासाने म्हणतो,
वेळ लागू दे भले, मी वाट बघतो
आज नाही तर उद्या सुचणार नक्की
ही पॉजिटीविटी पाहिजे रे भावा. जगण्याच्या जगवण्याच्या प्रोसेस मध्ये दुसर्‍या साठी जगण्यात काही और मजा असते. सर्वस्व अर्पण करण्यात धन्यता असते. पण आयुष्याच्या प्रवाहात कधी कधी नकळत साथ सुटते.
कधीकाळी तुझ्यासाठी दिला मी जीवही असता,
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते...
'चांदणे जागेच आहे' वाचल्यावर एखादा अख्खा जीवनपट असावा असे वाटले. त्या शब्दांसोबत जुळत गेले. काही ओळी तर अगदी माझ्या मनाचा आरसाच जश्या.
हसून देतो उत्तर काही आणि विसरतो तेही
मीही आता जुन्या वेदना उगाच मिरवत नाही.
.
अनेकदा जे जगून झाले
फक्त एकदा लिहून झाले
बास रे बास... काय लिहिलं आहेस रे अप्रतीम!

रिक्त संध्येसारखे ही गझल तर आपोआप चालीतच आली जशी. संपूर्ण गजल मी गुणगुणायला लागले. अवखळ अल्लड तर कधी सुजाण कविता, आणि गझल म्हणजे प्रेम, दु:ख, वास्तव... त्यात ही गझल म्हणजे एक समंजस अनुभवी जाणकार जणू!
रिक्त संध्येसारखे आयुष्य कलताना तिचे,
फक्त सूर्यासारखी दे साथ रेंगाळून तू...
वाह! एखाद्या अमूर्त रंगचित्रात प्रत्येकाला वेगवेगळे रुपक दिसू शकते. तसं नचि च्या गझलात मला माझ्या परिनं वेगवेगळी चित्रणं दिसली.

पुन्हा एकदा नचिकेतची गझल भावभावनांची वेगेवेगळी गावे ओलांडत वास्तववादाच्या वळणावर येते.
सर्व कामे एकटा पैसाच करतो
भावना झाल्यात का नादार हल्ली
ठेचली जातात स्वप्ने रोज येथे
धावते आयुष्य बेदरकार हल्ली...
.
स्वप्नातही मनाने मन मारले स्वतःचे
स्वप्नातही मनाला तितकाच त्रास झाला...
.
मीच नेहमी शब्दांसाठी वणवण भटकत असतो
त्यांनी वाट पहावी, इतका मी भाग्यवंत नाही...

आपल्या सभोवती मुखवटे घालून वावरणारी माणसं मनाला उद्विग्न करतात. खोटी विचारपूस, खोटी कळकळ यापेक्षा कमी बोलणारे, सत्य बोलणारे, मुद्द्याला धरून बोलणारे बरे वाटतात.
उगाच काळजी नको, विचारपूसही नको
सुखावतात आजकाल शब्द मोजके मला...

संकटांचा जेव्हा हल्ला होतो, माणूस ज्योतीष, वास्तू, तोडगे अशा वेगवेगळ्या पर्यायांचा आधार घेऊ पहातो. तेव्हा कवी म्हणतो,
भाग्य अन दुर्भाग्य ठरते कोणत्या रेषेमुळे?
मीच उत्सुकतेमुळे ह्या हात दाखवतो मला...

नचिकेतच्या प्रत्येक गझलेचा संदर्भ वेगळा, विषय वेगळा. थाट वेगळा. काही आशिक, तर काही तत्वज्ञानी. काहींध्ये तर नशा आहे, अजब धुंदी आहे.
केवळ तुझी पुरते नशा गझले मला
वेगळी नाही पुन्हा मग 'पीत' मी...
खरंय रे! इतकी पवित्र नशा असताना त्या विविध रंगी, विविध नावांच्या अपेय पानाचे काय कौतुक!

बुल्स आय कि काय म्हणतात ना तसे 'सुवास' ह्या गझलेच्या ह्या ओळी मला वाटल्या.
उजाड गावे, उनाड शहरे
फाइल म्हणते, 'विकास आहे' !

एखाद्याला त्याच्या अपराधाबद्दल क्षमा करावी वाटतं पण मन मानत नाही. मग नचिकेत म्हणतो,
क्षमा करणे तुझ्या हातात नाही
मना, सुटका तुझी इतक्यात नाही...

मनांत सुलट उलट भावना येत रहातात. नकारात्मक विचार कधी कधी अंधारून येतात. का असं? माझं काय चुकलं? हे असं का? ते तसं का? नुसते उपद्रवी क्लिष्ट विचार. तरीही संस्कारी सारासार विचार हार मानत नाही.
अंधार खोल रुततो, डसतात सावल्या
पणती मनात देवा, पेटव कधीतरी..

अरे मना, किती रे प्रतारणा करतोस माझ्याशी? माझा असूनही असा कसा रे भरकटत जातोस तू मना?
मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही...

सारे जुनेच आहे ही गझल म्हणजे वेगवेगळ्या रंगांच्या सुगंधी फुलांचा गजरा. संपूर्ण सुंदर!

उंबरठा, उंबरा ह्या अर्थाशी नचिकेतच्या गझलांत वेगवेगळे संदर्भ येतात. तसाच हाही एक सुंदर संदर्भ 'उंबर्‍या बाहेरचा....' ह्यातल्या ह्या चार ओळी खुपच भावल्या. मनाला बिलगल्या.
रडत असतो मामुली गोष्टीतही
छंद हा तर पाळण्यापासूनचा...

आयुष्य फार पुढे गेलंय. जुने संदर्भ पुसट होत चाललेत. वर्तमानाची कसरत आणि भविष्याची चिंता ह्यात दिवस कुठे सुरु होतो आणि कुठे संपतो कळतही नाही. कशालाच वेळ नाही. ना भावना कुरवाळालायला ना मनाची चलबिचल गोंजारायला. तरीदेखिल एखाद्या निवांत क्षणी पाठीमागून वाकुल्या दाखवत भूतकाळ पुढे येतो, खिजवतो. दुखावतो. त्यावरही नचिकेतनं सुंदर ओळी लिहिल्यात.
चांदणे जागेच आहे खरे की भास नुसता?
भूतकाळाचा जिवाला त्रास नुसता!

भविष्य, वर्तमान ह्याची तरतूद करताना 'पैसा' ह्या वास्तवापाशी सारं येउन थांबतं. आपली आवड, छंद म्हणजे एक अफवा होती कि काय वाटू लागतं. पैसा नसलेल्या एखाद्याला विचारा त्यानं काय काय गमावलं पैशासोबत! साधी भोळी निरागस मन हळूहळू कणखर होउ लागतात. मनाच्या कुठल्याश्या अंधार्‍या कपारीत एक बुजरी खंत लपून दडून बसलेली असते,
पैसा मिळेल मुबलक, इज्जत कुठून आणू?
आधार वाटणारी सोबत कुठून आणू?

फेसबूक, इन्स्टा, व्हॉटसअ‍प, ट्वीट आणि अजून काय काय! सोशल मिडिया म्हणजे आभासी बुडबुडे. एकटेपण जेव्हा घेरून येते तेव्हा मोबाईल मध्ये काँटॅक्टस स्क्रोल करताना कुठला काँटॅक्ट असा आहे कि जिथे आपण मन मोकळ करु शकतो? जिथे मन मोकळ केलं ती माणसं दुरावल्याचीच उदाहरणे जास्त. का होतं असं? त्यांची समजून घेण्याची कुवत कमी पडते, कि आपण चुकिचं ठिकाण गाठतो कि आपण फारच नकारात्मक होउन उगीच बडबड करतो. चूक होते. मन नाजूक अवस्थेतून जात असेल तर होते चूक. सोशल मिडिया काय किंवा आजच्या घडीला कुठलीही मैत्री काय, इथे फक्त छान छान बोलायचं असतं. कुणालाही कुणाच्या मनाची वगैरे पडलेली नाही. सोशल होणं म्हणजे समाजाभिमुख, मैत्रीपूर्ण नसून हे सो कॉल्ड सोशल मिडिया हाताळता येणं असा अर्थ झालाय सध्या.
सोशल बनून जगणे, आहे बरेच सोपे
माणूस बनवणारी संगत कुठून आणू?

भोगण्याचा मोह नाही
अन विरक्तीही जमेना...
मित्रा, काय बोलावं तुझ्या ह्या रचनेबद्दल! निरुत्तर; नि:शब्द केलंस रे...

अखेर संग्रहाची शेवटची काही पानं आलीत. पुन्हा पुन्हा वाचत रहावं असं वाटतंय. तहान काही भागेना. लिहि रे तू. खुप लिहि. खुप वाचायला दे.
या ढगांच्या आतले कोणी रिते झाले असावे
बरसणे झाले कमी पण गर्जना तितकीच आहे...
.
उगमापाशी अजून थोडे हळवेपण आहे
अवचित येते तुझी आठवण वाहत एखादी...
.
हळवी वळणे आता विसरत आहे
आज तुझ्याही दारावरून आलो...

अन अखेरीस...
एकटा आहे बरा मी, कोणत्या चर्चेत नाही
रात्र माझी, स्वप्न माझे, झोप उसनी घेत नाही
वाहत्या गर्दीत माझा शोध घेणे व्यर्थ आहे
मुखवटे आहेते तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही.....

--सौ. पल्लवी देशपांडे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आया ला शुभेच्छा !
.. कलाकाराचा स्वतःचा असा एक काळ असतो. शब्द सुचणं ही एक दैवी कृपाच म्हणायला हवी. न सूचण्याचा काळ कधी कधी जरासा लांबतो. तरीही निराश न होता नचि विश्वासाने म्हणतो,
वेळ लागू दे भले, मी वाट बघतो
आज नाही तर उद्या सुचणार नक्की>> १०० ट़्क्के खरे आहे
तुमचे लिखानही उत्तम !