शिवकालीन नागाव

Submitted by सागरसाथी on 21 January, 2019 - 11:07

शिवकालीन नागांव --
नागांवचा जन्म झाला तोच मुळी समुद्र किना-यावरच्या बेटाच्या किंवा बेटांच्या समुहाच्या रुपात. ते बनलेय ते सह्याद्रीचा गाळ आणि समुद्राची वाळू याच्यापासून.
इ.स. १५३०-३१ मध्ये पोर्तुगीजांनी चौल मारले आणि पश्चिम किना-यावर राजनैतिक आणि धार्मिक आक्रमणास प्रारंभ झाला.
चौलच्या शेजारीच असल्याने पोर्तुगीजांच्या दृष्टिक्षेपात आले.इ.स. १५३८ मध्ये पोर्तुगीज प्रवासी डी.कॅस्टो याच्या लिखाणात नागांवचा प्रथम उल्लेख दिसतो.
नागांवचे मुळ नांव नागग्राम असावें असे म्हटले जाते, नागांवातील एका वाडीत नागाच्या आकृती खोदलेले दगही आहेत.
नागांवच्या भिमेश्वर मंदीराजवळ एक पुरातन शिलेलेख होता, जो पेशवाईत मंदिर दुरुस्ती करताना मंदिराच्या पायरीत बसवला गेला. कै.राजवाडे यांच्या मताने हा लेख इ.स. १३६७ मधील असून तो यादवकालीन आहे.२८ ओळींचा हा शिलालेख
१ स्वस्ति श्री हिजरत ७६१ सकु संवतु १२८१ पळवंग सवंसरे आद्येअ
२ श्रीमत्यप्रौढीप्रतापचक्रवर्ती माहाराजाधिराज श्रीहंबिरुराओ
३ ठाणे कोकण राज्यं क्रोती सत्ये तस्मिन काळे प्रवर्त्तमाने धरमादि —-
४ पत्र ळिखिते यथा सर्वव्यापारी सिहिप्रो तंनिरोपित आठागर आधि —-
५ कारिआ कुसनाकु हासणनाकाचा सैणवे देऊप्रो पहोऱ्ह वेळित सं —-
६ मंध चिचावळित्रामपैकि तेथिळ मिजिगिति सिहिप्रो केळि तेथें मरंगी
७ द्या ळावेआळागी आठागरसमंध मुष्य नागवें आगरुपैकि कातळवाडि
८ १ नारदे कवळिआपैकि भाटाळि १ उभै वाडिआ २ ससिम फळभोगास –
९ हिते श्रीरायाजा प्राधानु सिहिप्रो विकति सडाउनि चिचावळियेचिये मिजिगि –
१० तिवर भीघा तळिया कातिळवाडी विक्रीता द्रामा १६० नारदे कवळिआ जि –
११ ये भाटाळैये विक्रिता द्रम ४० उभै वाडिआ २ विक्रीता दामा सतें २००
१२ हे दाम वरतकु कोश कवळिआ मुष्य करुनि समथि आगरियां समागित
१३ डिळि धाकुटा बाळगोपाळिं वाटुनि घेतळें आठी आघाटातु वाह नाहि वाडि-
१४ आ दातारेंहिन करुनि जाळिआ म्हाणौनि समथिं आगरिचां सहानि व्रि –
१५ किळि ते गुति कैवाह सोडवुनि सिहिप्रो ळागौनि वाडिआ विकिळिआ हे
१६ वाडिआ कोण्हि दातारु ठमटेळित गुंती करि तर समथिं आगरिचांई नि –
१७ (वा) रवें हा धरमु सिहिप्रोमचा नितीचरु समथि आगरिचांई समाग्रि प्रतिपाळावे
१८ (वा) डिआचि जमेति सवारा जेतुकें आगर सोई झाडांते पावे तेतुकें आगाराचेआ प्र
१९ झाडाचेंचि रोपउवा वाडि सिहिप्रो सासनविषयें भोगवावी हा धरमु समथि प्र
२० तिपाळावा आघाटाणें पुर्व दिसे नाउ म्हातारेआचि वाडि उतरदिसे चोरलेवाडि पष –
२१ सिम दिसे पठिआरवाडि दसिण दिसें कोणिष्ठिआचि वाडी ऐसि आघटणें चि –
२२ आरि निवारति आदिपाळक वरतकु कोश कवळिआ पोगुनाकु रामदेओ
२३ वेद म्हातारेआचा धरमुदेओ विभु म्हातारेआचा वाउरें पैकि कावंदेओ कपाटे –
२४ आ अधोयारि सोम्हाळ म्हातारा राउत नागदेओ भाई दार्शु जसदे सेठि
२५ साकु म्हतारा वाईदेओ कावंदे म्हातारा सवद म्हातारा गोरु म्हातारा सा—
२६ जकार सोमदेओ जोनदेओ वारैकरु वरतकु भुपळ पाटैळु नाभळा पाटैळु
२७ वैजकरु हे जन १८ मुष्य करुनि समथिं प्रतिपाळावें अप्राशे सासि ना—
२८ गावु जमतेपैकि म्हैरु माहामदु दाउवार आया हाजि दाउवार आया

हिजरी ७६९ शक संवत १२८९ प्लवंगनाम संवत्सर रोजी ठाणे कोकणवर राज्य करणाऱ्या श्रीमत्यप्रौढिप्रतापचक्रवर्ती महाराजाधिराज श्रीहंबीरराव धर्मदान लिहीन देत आहे असे लेखाच्या सुरवातीला कोरले आहे. हंबीररावाचा सर्वव्यापारी (मुख्य प्रधान) सिहीप्रो याने आपला ‘तंनिरोपित’ (म्हणजे मुतालिक), अष्टागाराचा अधिकारी कुसनाक व हासणनाकाचा सेनापती देऊप्रो (यांच्या सहाय्याने) पहोऱ्हवेळित(?) संबध्द चिंचावळी गावात मिजिगिति (मशीद) उभारून तेथे रत्नदीप (मरंगी द्या) लावण्यासाठी काही दान दिले. अष्टागारातील संबध्द असलेल्या नागाव आगारापैकी एक कातळवाडी आणि नारदे कवळ्यापैकी एक भाटाळी, अशा दोन वाड्या त्यातील फळांसहित श्रीरायाचा प्रधान सिहिप्रो याने विकत घेतल्या. कातिळवाडीच्या विक्रीचे १६० द्राम व नारदे कवळ्यापैकी भाटाळीच्या विक्रीचे ४० द्राम, असे दोन्ही वाड्यांच्या विक्रीचे २०० द्राम त्याने (सिहीप्रो) कोशात भरले. ते द्राम कवळ्यातील धरून सर्व आगरी लोकास सामायिकपणे दिले व ते त्यांच्या मुलाबाळांनी आपापसात वाटून घेतले. आठही कुटुंबात वंश पुढे चालू नाही, त्यामुळे जोपासना करणारा कोणीही नाही, म्हणून त्या वाड्या सर्व आगरी लोकास मिळून विकल्या होत्या, त्या आता सर्व गुंता सोडवून सिहीप्रोला विकल्या आहेत. कोणी मालक जबरदस्ती करेल किंवा गुंता करील त्यास सर्व आगऱ्यांनी मिळून निवारावे असा सिहीप्रोचा सासनविषय (नितीधर्म) असून तो सर्व आगऱ्यांनी पाळावा. या वाड्यातील जितक्या आगरात झाडे येतील तितके आगार त्यातील झाडझाडोऱ्यासुध्दा सिहीप्रोच्या शासनविषयाने भोगावे. हा धर्म सर्वांनी पाळावा. तसेच पूर्व दिशेस नाउ म्हाताऱ्याची वाडी, उत्तरदिशेस चोरलेवाडी, पश्चिमदिशेस पठिआरवाडी, दक्षिणदिशेस कोणिष्टियाची वाडी अशा चतु:सीमा निवारण करतात. या कोशाचे पालक कवळीचा पोगुनाक रामदेव, वेद म्हाताऱ्याचा धरमुदेव, विभु म्हाताऱ्याच्या वाउरेंपैकी कावंदेव, कपाट्याचा अधोयारि सोम्हाळा म्हातारा, राऊत नागदेव, भाई दार्शु, जसदे सेठी, साकु म्हातारा, वाईदेव, कावंदे म्हातारा, सवद म्हातारा, गोरु म्हातारा, साजकार सोमदेव, जोनदेव वारीकर, वरतक भूपळ, पाटील नाभळा व पाटील वैजकरु हे अठराजण मुख्य असून सर्वांनी हे प्रतिपाळावे. नागांव येथील जमातीपैकी म्हैरु महामद, दाउवार आया आणि हाजी दाउवार आया हे प्रत्यक्ष साक्षी होत.
शिवकालीन नागांव --इ.स. १९६२ मध्ये शिवाजीराजांनी अष्टागाराचा बराचसा भाग आदिलशहाकडून ताब्यात घेतला आणि नागांववर त्यांची सत्ता प्रस्थापित झाली. अण्णाजी दत्तो सुभेदार झाला.
भारतात राजा तोरडमल, मलिकंबर आणि आण्णाजी दत्तो जमीन महसुलाची पद्धति निर्माण करणारी प्रसिद्ध आहेत. कोकण प्रांत आणि घाटावर आण्णाजी दत्तो याने जमीन महसुलाची पद्धत घालून दिली.
नागांव आणि साखरेची खाडी अंमलाखाली आणल्यावर शिवाजीराजांनी कुलाबा,खांदेरी आणि पद्मदुर्ग असे तीन पाणकिल्ले बांधण्यास प्रारंभ केला.त्यायोगे पोर्तुगीज,इंग्रज आणि जंजि-याचा सिद्दी या तीन पाणसत्तांना काबूत आणण्याचे आणि उत्तरकोकणात आपली सागरीसत्ता निर्माण करण्याचे धोरण होते.
खांदेरीमुळे नागांवला सुरक्षितता आली आणि नागांव मुळे कुलाबा आणि खांदेरीची उभारणी झाली.
नागांवपासून ७ मैलावर खांदेरी,उंदेरी ही दोन बेटे आहेत. मुंबईहून मलबार किना-यावर जाणा-या जहाजांना खांदेरी जवळूनच जावे लागत असे.
१६७० मध्ये शिवाजीमहाराजांचे लक्ष या बेटाकडे गेले.राजांचा समुद्रावरचा मुख्य शत्रू सिद्दी हा होता, सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी राजांनी जंजि-या जवळच पद्मदुर्ग उर्फ कांसा किल्ला बांधला पण इंग्रज सिद्दीला मदत करत होते.
इ.स. १६७० च्या आखेरीस वेढा घालण्याच्या, हल्ला करण्याच्या, बांधकामाच्या सर्व साहित्यानिशी चाळीस दिवसांचा शिधा घेवून राजांचे तीन हजार लोक आरमारासह नागांवच्या खाडीत आले.
इ.स. १६७८ १४ ऑगस्ट रोजी शिवाजीराजांनी खांदेरीचा पाया घातला.
राजांच्या आज्ञेनुसार माया नाईक १५० लोक व चार तोफांसह खांदेरीजवळ हजर होता.माया नाईकाचा मुकाबला करण्यासाठी इंग्रजांनी हंटर नावाची बोट खांदेरीजवळ तैनात केली.
११ सप्टेंबर रोजी दर्यासारंग दौलतखान आरमाराच्या लहानशा काफिल्यासह माया नाईकच्या जोडीला आला.
१९ सप्टेंबर रोजी खांदेरीजवळ युद्धास प्रारंभ झाला त्यात इंग्रजांचा पराभव झाला.प्रत्येक दौलतखान खांदेरीवर रसद पोचवी आणि नागांवच्या खाडीत परत येई.
१८ ऑक्टोबर रोजी दुस-या युद्धात मराठी आरमाराने मोठी लुट केली व नागांवच्या खाडीकडे परतले.
मराठी आरमार पहाटे मतलई वा-यावर नागांवच्या खाडीतून बाहेर पडे आणि खांदेरीवर रसद पोचवून नागांवच्या खाडीकडे परत येई.
शेवटी इंग्रजांचा पक्का बंदोबस्त करण्यासाठी मराठ्यांची १३ जहाजे खांदेरीच्या आस-याला जावून राहीली व ३७ जहाजांचा काफिला नागांवच्या खाडीत तयार राहीला. इंग्रजी अधिका-यांच्या लक्षात परिस्थिती आली आणि त्यांनी माघार घेतली.
नोव्हेंबर १७ रोजी मराठी आरमारांनी इंग्रजांवर जोरदार हल्ला चढवून त्यांना पराभूत केले.डिसेंबर २४ रोजी मराठा आरमाराला हरवणे शक्य नाही असे ठरवून इंग्रजांनी माघार घेतली, सुभेदार आण्णाजीच्या मध्यस्थीने तह होवून खांदेरीवरचे युद्ध थांबले व तिथे मराठ्यांची सत्ता स्थापन झाली.या प्रसंगी आरमारी तळ म्हणून नागांवचा उपयोग झाला,नागांवची सुरक्षित खाडी नसती तर कुलाबा आणि खांदेरी मराठ्यांच्या हाती राहीले नसते आणि हे किल्ले नसते तर नागांव आणि अष्टागाराचे रक्षण झाले नसते.
संदर्भ:- शा.वि.आवळसकर- नागांव आर्थिक व सामाजिक जीवन
पंकज समेळ

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

छान माहिती पूर्ण लेख रोह्यास बरीच वर्षे काढल्याने नागाव चांगलेच जवळचे!!

शिवकालीन नागांव --इ.स. १९६२ मध्ये शिवाजीराजांनी अष्टागाराचा बराचसा भाग आदिलशहाकडून ताब्यात घेतला आणि नागांववर त्यांची सत्ता प्रस्थापित झाली. अण्णाजी दत्तो सुभेदार झाला.>>>

सनावळी दुरुस्त करावी.... व इतरही तपासाव्या.. ही लगेच लक्षात आली!

चौल आणि नागावात जे पुरातन अवशेष आहेत ,जे आता ज्या स्थितीत आणि कोणत्याही सत्तेचे असले तरीही त्यांचे फोटो द्यावेत.