केस नं. दोन: क्रिकेट

Submitted by संदीप डांगे on 15 January, 2019 - 00:44

केस नं. दोन

क्रिकेट स्टेडियममध्ये गर्दी फुललीये. महत्त्वाची मॅच सुरु आहे. प्रेक्षकांच्या गर्दीला चणे फुटाणे आईस्क्रीम विकणार्‍यांचीही बरीच लगबग सुरु आहे. ह्या सर्व वस्तू प्रेक्षकांना बसल्या जागी मिळत असल्याने, नेहमीप्रमाणे इथेही ह्या वस्तूंच्या किमती बाहेर मिळेल त्यापेक्षा थोड्या जास्तच आहेत. असाच एक आईस्क्रीमवाला विक्री करत फिरतोय. त्याला एका माणसाने आवाज देऊन बोलावले. हा माणूस मघाचपासून फोनवर कोणाशी बोलतोय. आईस्क्रीमवाल्याला त्याने विचारले की एक आईस्क्रीम कितीला दिले, तो म्हणाला, तीस रुपये... झालं, हा माणूस प्रचंड भडकला. त्याला अद्वातद्वा बोलायला लागला. अरे, काय लूट लावली आहे तुम्ही लोकांनी, बाहेर हेच आईस्क्रीम वीस रुपयाला मिळतं, तू इथे तीस रुपयाला विकतोय. इथे किती ग्राहक आहेत, तुला आयतेच इतके ग्राहक मिळालेत, त्यात तू हे आईस्क्रीम फॅक्टरीतून दहा रुपयाला घेत असशील, मघापासून इतक्या रुपयाला इतके आईस्क्रीम विकले, इतका तुला महाप्रचंड नफा झाला आहे, किती माजलेत तुम्ही लोक, इत्यादी इत्यादी... अशी सर्व महान बडबड, त्रागा करुन त्याने त्या आईस्क्रीमवाल्याला शेवटी आईस्क्रीम न घेता घालवून लावले. आणि परत फोनवर कोणाशी तरी मोठमोठ्याने बोलायला लागला...

जसजशी मॅच पुढे सरकू लागली, तसा त्याचा नूर मात्र बदलू लागला. जसजशी एक एक विकेट पडू लागली तस तसा त्याचा आनंद गुणाकारात वाढू लागला. पुढे तर तो बसल्या जागी चक्क उड्या मारुन चित्कारु लागला. फोनवर त्याचे बोलणे सुरुच होते.. अक्षरशः तो माणूस आता अत्यानंदात चेकाळून गेलेला दिसत होता..

तेवढ्यात त्याला तोच आईस्क्रीमवाला परत दिसला. त्याने त्याला हाक मारुन बोलावले. त्याच्याकडचे सगळे आईस्क्रीम विकत घेतले आणि आजूबाजूच्या सर्व प्रेक्षकांना वाटून टाकले. आईस्क्रीमवाल्याला सांगीतले की अजून चार पाच पेट्या लवकर घेऊन ये आणि हे पन्नास रुपये स्पेशल तुला टीप घे... आश्चर्य म्हणजे त्याने एकही आईस्क्रीम स्वतः मात्र घेतले नाही खाल्ले नाही.

गंमत आहे ना? थोडावेळापूर्वी हाच माणूस दहा रुपयांसाठी किती भांडत होता..? साहजिक आहे की तो बुकीशीच बोलत होता व त्याला ह्या मॅचवरच्या बेटींगमधून जिंकल्यामुळे प्रचंड पैसा मिळालेला दिसत आहे. तो आनंद तो अशा पद्धतीने शेअर करत आहे.

आता प्रश्न असा की ह्या माणसाच्या आधीच्या व नंतरच्या वागणूकीचे तुम्ही विश्लेषण करु शकता का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो बुकीशीच बोलत होता हे कशावरून?

कदाचित त्याला आवडत असलेल्या संघाची गोलंदाजी उत्तम होत असेल आणि प्रतिस्पर्ध्यांच्या संघातील फलंदाज लवकर बाद होत असतील. आपला संघ आता जिंकेल असा विचार त्याच्या मनात असावा. म्हणूनही हा आनंदाने चेकाळत असेल.

दुसरा अंदाज:
तो विकेट पडल्यामुळे आनंदीत होत होता असा ठाम निष्कर्ष काढण्याइतपत माहिती लेखात नाहीये. तो फोनवर बोलत होता, कदाचित समोरून एखादी (किंवा बऱ्याच) आनंदाची बातमी हि आली असू शकते!

तिसरा अंदाज:

मघाशी आईस्क्रीमवाल्याशी झालेल्या हुज्जतीचा त्याला पस्तावा आल्यामुळे मनात शल्य नको म्हणून त्याने त्या आइस्क्रीमवाल्याकडून सगळ्या आईस्क्रीम विकत घेतल्या असतील?

> अचानक विनासायास मिळालेल्या संपत्तीची कदर नसते. > +१

किंवा सहज मिळालेला पैसा सहज खर्चदेखील केला जातो.

किंवा जास्त पैसा मिळाला कि जास्त खर्च, विनाकटकट केला जातो.

परत फोनवर कोणाशी तरी मोठमोठ्याने बोलायला लागला...>>>
इथे थोडं लॉजिक गंडलंय, बेटिंग करणं काही लीगल काम नाही, त्यामुळे तो सगळ्या जगाला ऐकू जाईल, अशा रीतीने बोलणार नाही. आणि हे काम करतांना आईस क्रिम घेऊन खाण्याची त्याची मनस्थिती असेल? शक्यता वाटत नाही.
जावेद यांच्या तिन्ही शक्यता वास्तवतेच्या अधिक जवळ जाणाऱ्या वाटतात...

साहजिक आहे की तो बुकीशीच बोलत होता व त्याला ह्या मॅचवरच्या बेटींगमधून जिंकल्यामुळे प्रचंड पैसा मिळालेला दिसत आहे >>>

यावरून लेखकाला हे सांगायचे आहे की तो बुकीशी बोलत होता, आणि बेटिंगमध्ये पैसा जिंकला. या पार्श्वभूमीवर त्याच्या वागण्याचे विश्लेषण करा.