गझल - या हृदयाची साधी अटही कुणीच नाही पाळत

Submitted by बेफ़िकीर on 10 January, 2019 - 10:47

गझल - या हृदयाची साधी अटही कुणीच नाही पाळत
=====

या हृदयाची साधी अटही कुणीच नाही पाळत
एक हृदय द्या मोफत, त्या बदल्यात हृदय घ्या मोफत

कोणकोण अपुले आहे हे क्षणोक्षणी जाणवते
फक्त नेमक्यावेळी नसते कुणीच अपुल्यासोबत

लोक बिघडले असते सारे, जर मी नसतो येथे
बनलो असतो सभ्य, मला जर माझी नसती संगत

नाही त्यांची भूक शमवण्या रोज धावतो आहे
एक चपाती कमावण्याची ज्याची नाही ऐपत

विहिरीमध्ये वाह वाह होण्यात समाधानी तू
'बेफिकीर' होण्यास लागते प्रचंड मित्रा किंमत

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users