सुषुम्ना

Submitted by अनन्त्_यात्री on 9 January, 2019 - 03:22

स्क्रीनवर उमटणारे तुझे शब्द
थुई-थुई पिसारू लागताच
भानावर ये.
भगभगत्या भवतालाचा घसाजाळ आवंढा गीळ
नेटाने टंकत जा पुढे
मग दोन रस्ते हाकारू लागतील
पहिला : कातीव-वळणदार-निवांत सावल्यांचा-टाळ्या-जयजयकारांचा-सुबक (दोन्ही बाजूंना वायफळाचे मळे)
दुसरा : सरळसोट-उघडा-बोडका-डोकं वितळवणाऱ्या उन्हाचा (दुर्बोधाच्या खाईत चिरंतन मुक्काम)
भरकटू नकोस ह्या इडा-पिंगला रस्त्यांवर
परज पहार सृजनाच्या उत्फुल्ल-अधीर-अदम्य-अतृप्तीची
भीड वास्तवाच्या कभिन्न पथ्थराला
तसू तसू बनव
तुझी पायवाट
तुझ्या अस्तित्वाच्या मूलाधारापासून
श्रेयसाच्या सहस्रारापर्यंत
तुला
तेजाळत नेणारी

Group content visibility: 
Use group defaults