दुधातील ए -१ व ए -२ घटकांबाबत भ्रामक प्रचार

Submitted by रंगराव on 8 January, 2019 - 12:14

पौराणिक कथा, संस्कृती व आहारात भारतामध्ये दुधाला वैशिष्ठपूर्ण स्थान आहे. दुधाला संपूर्ण अन्न मानले गेले असले तरी काही लोकांच्या मते दुध हे प्रोस्ट्रेट ग्रंथी व बीजांडा (ओव्हरी) चा कॅन्सर, टाईप-१ डायबेटीस, मल्टीपल स्क्लीरोसिस, रक्तातील क्लोरेस्टरॉल ची उच्च पातळी, वजन वाढणे व हाडांची ठिसूळपणा इत्यादी विकारांसाठी कारणीभूत आहे. निसर्गोपचारात, अस्थमा व सोरीयासिस च्या रुग्णांना तर दुध सेवन थांबविण्याचा सल्ला दिला जातो. या उलट जगात बहुसंख्या लोक – दुग्ध शर्करा (लॅक्टोज) न पचविता येणारे सोडून – कुठलाही दृश्य त्रास न होता दररोज दुधाचे सेवन करीत आहेत.

१९९२ मध्ये या वादाला एक नवे रूप मिळाले जेंव्हा न्युझीलॅड मधील शास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले कि टाईप-१ डायबेटीस व सेवन केलेल्या दुधाच्या प्रकारचा परस्पर संबंध आहे. यातूनच पुढे दुधातील तथाकथित ए १ व ए २ या घटकांचा बाबत शोध लागला.

गायीच्या दुधात ८७-८८ % पाणी व १२-१३% घन पदार्थ असतात. घन पदार्थांमध्ये दुग्ध शर्करा (४.८ %), स्निग्ध पदार्थ (३.९ %), प्रथिने (३.२ %) आणि खनिजे (०.७% ) यांचा समावेश होतो. जवळपास दुधातील प्रथिने हि ‘केसिन’ या प्रकारात मोडतात. या केसिन पैकी ३०-३५% केसिन हे बीटा – केसिन या रुपात असते. बीटा –केसिन हे ए -१ किंवा ए -२ आढळते. ए -१ बीटा-केसिन असलेले दुध प्यायल्या नंतर पचनक्रिये दरम्यान लहान आतड्यात बीटा –केसोमॉर्फिन -७ किंवा बी.सी.एम. -७ नावाचे एक जैव-सक्रीय पेपटाईड तयार होते. बी.सी.एम.-७ हे अफूधर्मीय असून त्या मुळे रोगप्रतिकारक क्षमतेवर प्रतिकूल परिणाम, टाईप-१ डायबेटीस, हृदयाचे रोग, अर्भकांचे मृत्यू व लहान मुलांतील स्वमग्नता (ऑटीझम) हे विकार होतात असा संशय आहे.

मुख्यतः युरोपिअन गायींच्या जाती जसे होल्स्टीन फ्रेझीअन (एच.एफ.), आयरशायर आणि ब्रिटीश शॉर्ट हॉर्न यांच्या दुधात ए-१ घटक असतात. या उलट जर्सी व गरन्सी या चॅनेल आयलंड मधील जाती, चॅरोलाईस आणि लीमोसीन या दक्षिण फ्रांस मधील जाती तसेच आफ्रिका व आशिया खंडातील झेबू या जातींच्या दुधात ए -२ घटक असतात, ज्या मधून पचनक्रिये दरम्यान बी.सी.एम. -७ तयार होत नाही.

बऱ्याच सर्वेक्षणातून असे आढळून आले आहे कि ए -१ आणि ए -२ दुध निर्माण करण्याच्या क्षमते चा संबंध जाती शी नसून क्षेत्राशी निगडीत आहे. त्या मुळे उत्तर अमेरिकेतील ५०-६५% एच. एफ. गायी ए -१ दुध निर्माण करतात पण त्याच जातीतील जर्मनीतील ९० % पेक्षा जास्त गायी ए-२ दुध निर्माण करतात. ९८ % भारतीय वंशाच्या गायी व १०० म्हशी ए- २ दुध निर्माण करतात.

सन २००० मध्ये स्थापन झालेल्या ‘ए२ कोर्पोरेशन’ या न्युझीलॅड मधील एका नव्या कंपनी ने ए-२ दुध देणाऱ्या गायींची जनुकीय चाचणी पद्धतीने ओळख पटवून त्यांच्या ए -२ दुधाला बाजार निर्माण करणे सुरु केले. सन २००३ मध्ये या कंपनीने ‘फूड स्टॅडर्डस आस्ट्रेलिया न्युझीलॅड’ या उभय देशांच्या संयुक्त शासकीय संस्थेस ए-१ दुधाच्या पॅकेजेस वर आरोग्य विषयक इशारा छापण्यात यावा अशी मागणी केली. केवळ हि मागणीच धुडकावण्यात आली नाही तर या कंपनी ला ए-२ दुधाविषयी चे दावे मागे घेण्याबाबत सांगण्यात आले. पण या मुळे हि कंपनी खचली नाही तर तिने ‘ए २ डेअरी मार्केटर्स’ या आस्ट्रेलिया मधील कंपनी बरोबर ए-२ दुधाची निर्मिती व विक्री या बाबत करार केला. सन २००४ मध्ये या दोन्ही कंपनींना आस्ट्रेलिया सरकारने ए-२ दुधाबाबत दिशाभूल करणारा प्रचार केल्या बद्दल दंड केला.

सन २००६ मध्ये कीथ वूडफोर्ड या लेखकाने ‘डेव्हिल इन मिल्क’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्याने ए-१ बीटा-केसिन चा संबंध टाईप -१ डायबेटीस बरोबर जोडला, ज्या मुळे आस्ट्रेलिया व न्युझीलॅड या दोन्ही देशात ए-२ दुधाची मागणी प्रचंड वाढली व त्या मुळे ‘न्युझीलॅड फूड सेफ्टी अॅथॉरीटी ‘ ला ‘युरोपिअन फूड सेफ्टी अॅथॉरीटी’ (ई.एफ.एस.ए.) मार्फत सखोल शास्त्रीय पुनर्वालोकन करणे भाग पडले. सन २००९ मध्ये प्रकाशित झालेल्या ई.एफ.एस.ए. च्या अहवालात नमूद केले आहे कि आहारातून सेवन केलेल्या बी.सी.एम -७ व विविध रोग यांच्या मध्ये कुठला हि कार्य-कारण भाव सिद्ध झाला नाही. परंतु, ए -२ दुधाची मागणी घटली नाही व २०१४ साली आस्ट्रेलिया मध्ये या दुधाने ८ % बाजारपेठ काबीज केली. दरम्यान ‘ए २ कार्पोरेशन’ ने दुधाची विक्री अमेरिका, इंग्लंड व चीन मध्ये सुरु केली.

मागील वर्षाच्या मे महिन्यात, ए- १ व ए- २ दुधाच्या सद्यस्थिती बाबत मी केलेल्या पृच्छेस ए. एस. ट्रस्वेल, या नामांकित आहारतज्ञा ने उत्तर दिले कि त्यांनी या विषयावरील संपूर्ण संशोधन धुंडाळले पण त्यांना कुठला हि खात्रीशीर अथवा संभाव्य पुरावा आढळला नाही जो डायबेटीस किंवा हृदयरोग (कोरोनरी हार्ट डिसीज ) या रोगाचे कारण ए -१ बीटा–केसिन आहे असे सिद्ध करतो. त्यांनी या संदर्भात पुढे असे हि सांगितले कि ए-२ दुधाची विक्री करणाऱ्या कंपन्या दुध ‘चवीस चांगले आहे’ किंवा ‘या मुळे पोटात वायू होत नाही’ केवळ एव्हढाच दावा करतात. त्या ए-१ दुधामुळे विविध रोग होतात असा आरोप करीत नाहीत.

भारतात नॅशनल ब्युरो ऑफ अॅनीमल जेनेटिक रीसोर्सेस (एन. बी.ए.जी.आर.), नॅशनल डेअरी रिसर्च इंस्टीट्युट व इंडिअन व्हेटर्नरी रिसर्च इंस्टीट्युट यांनी २००९ मध्ये ए-१ व ए-२ दुधावर संशोधन चालू केले. पण ते बहुतेक इतर ठिकाणी झालेल्या संशोधांचा मागोवा घेणारे होते. त्यात सुद्धा त्यांनी मुख्यतः न्युझीलॅड येथील शास्त्रीय शोध निबंध व पुस्तके यांचाच आढावा घेतला ज्या मध्ये ए-१ दुधाच्या हानिकारक प्रभावाचा मुद्दा अधोरेखित केला होता. त्यांनी ट्रस्वेल यांनी २००५ साली व ई.एफ. एस.ए. ने २००९ साली प्रकाशित केलेल्या महत्वपूर्ण अहवालांकडे दुर्लक्ष केले. तथापि, एन.बी.ए.जी.आर. ने १५ भारतीय जातीच्या गायींचे ६१५ प्रातिनिधिक नमुने तपासले व त्यांना त्या पैकी १३ जातीत ए२ ए२ असा जीनोटाईप सापडला. केवळ मलनाड गिड्डा व खैरागड जातीतील काही जनावरांमध्ये ए१ ए२ असा जीनोटाईप आढळला.

२०१२ साली, एन.बी.ए.जी.आर. ने. शिफारस केली कि प्रजननासाठी वापण्यात येणाऱ्या वळूंमध्ये सावधगिरी म्हणून ए२ हा अलील (जीन) असावा. त्यांनी विविध प्रदेशातील १८० वळूंची रॅन्डम पद्धती ने तपासणी केली, ज्या मध्ये केवळ ११% वळूंमध्ये ए१ ए१ , ४८% मध्ये ए१ ए२ व ४०% मध्ये ए२ ए२ जीन आढळला. उल्लेखनीय म्हणजे एच.एफ. वळूंमध्ये केवळ २२% मध्ये ए१ ए१, ४५% मध्ये ए१ ए२ व ३३% मध्ये ए२ ए२ जीन आढळला. जर्सी वळूंमध्ये ६०% मध्ये ए१ ए२, ३७.५% मध्ये ए२ ए२ व केवळ २.५% मध्ये ए१ ए१ जीन आढळला. संकरीत वळूंमध्ये केवळ १% मध्ये ए१ ए१ तर ५०.६% मध्ये ए२ ए२ व ३९% मध्ये ए१ ए२ जीन आढळला.

क्षणभर असे गृहीत धरले कि ए-१ दुध आरोग्यास अपायकारक आहे तरी भारतात संकरीत गायीच्या दुधाची टक्केवारी केवळ १% असेल. त्याच बरोबर बहुतांश डेअऱ्या प्रक्रिया करतांना गाय व म्हशीचे दुध मिसळतात. त्या मुळे ए-१ दुधाचा प्रभाव उपेक्षणीय ठरतो.

२००९ साली प्रकाशित झालेल्या ई.एफ.एस.ए. च्या अहवालानंतर ए-१ दुधाच्या बाबत चा वाद जागतिक पातळीवर जवळपास संपुष्टात आला परंतु भारतात काही गट हा वाद जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. युरोप व अमेरिकेतील लोक ए-१ दुध कित्तेक शतका पासून पीत आहेत. आपण भारतात सुद्धा गेल्या ५० पेक्षा जास्त वर्षा पासून संकरीत गायींचे दुध कुठलाही प्रतिकूल परिणाम न होता पीत आहोत. भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आय. सी. ए.आर.) ने संकरीत गायीच्या दुधाचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामा बाबत संशोधन मोहीम हाती घेतली आहे, ज्याचे परिणाम अजून यायचे आहेत. शासनाने तो पर्येंत ए-१ व ए-२ दुधाबाबत तटस्थ भूमिका घ्यावी व ए-१ दुधातील बी.सी.एम.-७ निर्मिती मुळे होणाऱ्या सौम्य उपशामक (सीडेटिव्ह) प्रभावाचा सामना करण्यासाठी केवळ सतर्कता म्हणून धोरण ठरवावे.

(श्री. नारायण हेगडे यांच्या इंडिअन एक्सप्रेस वृत्तपत्र, दिनांक १९/४/२०१८ मधील लेखाचे भाषांतर)

--()--

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्षणभर असे गृहीत धरले कि ए-१ दुध आरोग्यास अपायकारक आहे तरी भारतात संकरीत गायीच्या दुधाची टक्केवारी केवळ १% असेल.

आपण भारतात सुद्धा गेल्या ५० पेक्षा जास्त वर्षा पासून संकरीत गायींचे दुध कुठलाही प्रतिकूल परिणाम न होता पीत आहोत.

एकतर वरील दोन्ही वाक्ये परस्परविरोधी आहेत किंवा मला लेखकाला काय म्हणायचे आहे हे कळले नाही. संकरित दूध 1 टक्काच असेल तर बाकी संकरित गायींचे दूध कुठे जातेय? जास्त दूध हवे म्हणून संकरित गायींनाच प्राधान्य मिळते.

संकरीत दूध १% हा टायपो असावा, संकरीत गायींमध्ये A1 दूध देणाऱ्या गायींची टक्केवारी केवळ १% असेल असे असावे ते.

Sadhana ++
Nakkee parinaam zala nahi, he kashavarun ani?
Gelya 50 varshat asalya diseases chi sankhya vadhalelee disate mag tee dudhamule nahi he kashavarun?

चांगला लेख.
साधना यांच्या शंकेबाबत मूळ लेखातले वाक्य So, even if one were to assume that A1 milk is harmful, the proportion of crossbred cows in India producing this milk would be just one per cent.
मानव+१. सगळ्याच संकरित गाईंचे दूध A1 प्रकारचे नसते, फक्त १% संकरित गाईंचे दूध ए१ प्रकारचे असते, असा अर्थ लागला.
देशी गाईंचे दूध ए२ प्रकारचे आणि विदेशी/संकरित गाईंचे दूध ए१ प्रकारचे हे समीकरण डोक्यात घट्ट बसवलेय.

राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार २०१२ मध्ये भारतात संकरित गाईंचे प्रमाण १६% देशी गाईंचे ४१.५% आणि म्हशींचे ४२.५^% होते.

रोचक माहिती.
गेल्या अनेक वर्षात डायबिटीस कँसर वगैरे काही ठराविक आजार जास्त टक्केवारीत दिसतात त्यांचे मुख्य कारण जंक फ़ूड हैबिट असावे. फक्त दुधाला दोषी ठरवून चालणार नाही असे वाटते.

वरील लेखात असेही आलेय की A1 A2 हे गायीच्या जातीवर अवलंबून नसून क्षेत्राशी आहे. त्या त्या क्षेत्रात जे लोक राहतात व पिढ्यानपिढ्या तिथले अन्न खातात त्यांना कुठल्या प्रकारचे दूध पितात याने फरक पडत नसावा कारण ते सगळे अन्न पचवणारे जिवाणू त्यांच्या आतडयात असणार.

भारतीय लोक जर 50 वर्षांपूर्वीपर्यंत A2 पित असतील आणि आता संकरित गायींचे दूध पित असतील तर त्यांना नक्कीच त्रास होणार. भारत मधुमेहाची राजधानी ठरण्यामागे हेही कारण असावे.

हे A1/A2 प्रकरण केवळ मार्केटिंगशी संबंधित असणार हे माझे वैयक्तिक मत आहे. काही वर्षांपूर्वी खोबरेल तेलावर आक्षेप घेऊन पाम तेल लॉबीने स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले. गेल्या 3 4 वर्षात परत खोबरेल तेलाला चांगले दिवस आले आहेत .

असल्या कुठल्याही संशोधनाला भारतीय लोक हा टेस्ट डेटाबेस नसतो. आहारावर आधारित संशोधन करताना ज्यांनी शेकडो वर्षे तो आहार घेतलेला आहे, त्यांचा अभ्यास करणेही गरजेचे आहे. पण इथे भारतात या विषयात फारसे संशोधन होत नसल्याने, तशा सोयी/संधी नसल्याने तिथल्या आहारावर आधारित निघालेले निष्कर्ष मान्य करून घ्यावे लागतात.

१. ९८ % भारतीय वंशाच्या गायी व १०० म्हशी ए- २ दुध निर्माण करतात.
२. भारतातील फक्त १% संकरित गाईंचे दूध ए१ प्रकारचे असते
३. भारतात दूध देणार्‍र्‍या गाईम्हशींत फक्त १६% संकरित गाई आहेत, उरलेल्या देशी गाई आणि म्हशी आहेत.

ही आकडेवारी आपण नजरेआड करूया.

मूळात A1 दूधामुळे मधुमेह होतो हे सिद्ध झाले आहे का?
भारतातील लोक युरोप, अमेरिकेत स्थायिक झाले आणि A2 ऐवजी A1 दूध पिऊ लागले, त्यांच्यात मधुमेहाचे प्रमाण वाढले असे काही निदर्शनास आले आहे का?

गेल्या पन्नास वर्षात अनेक बदल झालेत. हरीत क्रांती झालीय, पॅकेज्ड फूडचे प्रमाण वाढलेय, अन्नाची सुबत्ता वाढलीय त्यात कर्बोदकांचे प्रमाण वाढलंय, रिफाइण्ड पदार्थ वाढलेत, शारीरिक श्रम कमी झालेत, मधुमेह स्क्रिनिंगसाठी रक्तशर्करा FBS/PPBS १४०/२०० (?) वरून १००/१४० वर आलीय ज्यामुळे पूर्वी मधुमेह असूनही मधुमेहींमध्ये ज्यांची गणना होत नव्हती त्यांची आता होऊ लागली आहे.

स्क्रिनिंगसाठी रक्तशर्करा FBS/PPBS १४०/२०० (?) वरून १००/१४० वर आलीय ज्यामुळे पूर्वी मधुमेह असूनही मधुमेहींमध्ये ज्यांची गणना होत नव्हती त्यांची आता होऊ लागली आहे>>>>

पॅरॅमिटर्स बदलून मधुमेहींची संख्या वाढवणे हाही फ्रॉडच आहे असेही एक मत आहे.

ही आकडेवारी आपण नजरेआड करूया.>>>>>>
अवश्य करा.

मग मी तरी काय करू?
<<
मेंदू डोळ्यावर पट्टी बांधून गुरुमाउलींनी दिलेल्या ऑर्डरचे पालन करा.

मेंदू डोळ्यावर पट्टी बांधून गुरुमाउलींनी दिलेल्या ऑर्डरचे पालन करा.>>>>>>

कुठलीही पट्टी न बांधलेली व्यक्ती आधी दाखवा.

One set of my mom's cousins have heavy diabetes. They found that when they stop milk, their sugar comes to normal despite other params being same.
This was 20 years ago.
It would be interesting if they can consume A2 milk alone and find if that makes a difference.
(I know, people will come back saying these r individual results , not clinical trials etc.
But still interesting for me.

ए१ मुळे पचनसंस्थेचे इन्फ्लामेशन बाढते. हे तर नक्कीच एक फॅक्टर आहे.
मी दूध बंद केल्याने खुपच फस्यदे झालेत.
मी बकरीचे दूध पिते.

छान,, माहिती पूर्ण लेख. आवडला

भरत एक सूचना,
उपरोधाचा वापर शक्यतो टाळा, लोकांच्या लक्षात येत नाही , किंवा आला तरी ते दुर्लक्ष करून त्यांना हवा तो अर्थ घेतात.

"या आकडेवारीकडे आपण दुर्लक्ष करूया " ऐवजी "या आकडेवारी बद्दल तुमचे काय म्हणणे आहे/ या आकडेवारीची संगती तुम्ही कशी लावाल?" असे विचारले असतेत तर (कदाचित ) उत्तर मिळाले असते किंवा त्यांच्याकडे उत्तर नाही आहे हे स्पष्ट झाले असते