‘अ’ जीवनसत्व : निरोगी दृष्टीचा मूलाधार

Submitted by कुमार१ on 8 January, 2019 - 00:45

जीवनसत्त्वे लेखमाला : भाग २

( भाग १ : https://www.maayboli.com/node/68579)
* * * *

सामान्यजनांना ‘अ’ या नावाने परिचित असलेल्या या रासायनिक घटकाला जीवनसत्वांच्या यादीत अग्रस्थान द्यायला काहीच हरकत नाही. त्याचे अधिकृत नाव Retinol आहे. आपल्या निरोगी दृष्टीसाठी ते अत्यावश्यक असते. याव्यतिरिक्त इतरही अनेक महत्वाची कार्ये ते शरीरात करते. गरीब देशांतील दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्यांमध्ये त्याचा आहारातील अभाव बऱ्यापैकी आढळतो. त्यामुळे अनेक राष्ट्रीय आरोग्यसेवांच्या माध्यमातून ‘अ’ च्या गोळ्यांचा पुरवठा वंचितांना केला जातो.
अशा या महत्वाच्या जीवनसत्वाचा परिचय या लेखात करून देत आहे.

शोधाचा इतिहास:
रातांधळेपणाची समस्या प्राचीन काळापासून माहित होती. तेव्हा इजिप्तमध्ये यावर संशोधन चालू झाले. सुरवातीस आहारातील एखाद्या पदार्थाने त्यावर फरक पडतो का यावर लक्ष केंद्रित केले गेले. प्रयोगांती असे आढळले की मांसाहारातील यकृताचा भाग अशा रुग्णास नियमित दिल्यास त्याला बराच फरक पडतो. नंतर काही वैज्ञानिकांनी दुधामधून काही ‘मेदरुपी घटक’ शोधले आणि ते शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यावेळेस या घटकांना ‘अ’ असे तात्पुरते नाव देण्यात आले. पुढील संशोधनात हे घटक डोळ्याच्या दृष्टीपटलात (retina) असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांचे रासायनिक नामकरण Retinol असे झाले. हेच ते ‘अ’ जीवनसत्व. ते केवळ एक रसायन नसून अनेकांचे मिळून एकत्र कुटुंब आहे (Retinoids).

नंतर ते वनस्पतींत शोधण्यात आले. तेव्हा असे आढळले की नारिंगी रंगाच्या भाजीपाल्यांत ते Carotene या रुपात आढळते. किंबहुना गाजरामध्ये (Carrot) ते विपुल असल्यानेच त्याला हे नाव पडले. Carotene हे Retinol चे पूर्वरूप (precursor) आहे. अशा भाज्यांमधून ते शरीरात गेल्यावर त्याचे पक्क्या ‘अ’ मध्ये रुपांतर होते.

आहारातील स्त्रोत:
Foods+High+in+Vitamin+A+Carrots+Papaya+Squash+Fish+Meat+Eggs+&+Cheese.jpg

१. शाकाहार: गाजर, तांबडा भोपळा, रताळे, हिरव्या पालेभाज्या, इ.
२. प्राणीजन्य आहार: यकृत, मासे, दूध, अंडे.

आता या दोन्ही प्रकारच्या स्त्रोतांमधील फरक पाहू. शाकाहारातून Carotene मिळते आणि शरीरात त्याचे ‘अ’ होते. ही प्रक्रिया होताना एक महत्वाचा बदल होतो. जर आपण Caroteneचे १० भाग खाल्ले तर शरीरात त्यापासून फक्त १ भाग Retinol (‘अ’) तयार होते. शुद्ध शाकाहारीनी हा मुद्दा ध्यानात घ्यावा. म्हणून त्या भाज्या भरपूर खाल्ल्या पाहिजेत. याउलट प्राणीजन्य आहार थेट Retinol पुरवतो.
आहारातून शोषलेल्या ‘अ’ चा बऱ्यापैकी साठा आपल्या यकृतात केला जातो. तिथून गरजेप्रमाणे ते सर्व शरीराला पुरवले जाते. त्यातील डोळ्याचा वाटा महत्वाचा आहे.
अलीकडे तेलासारख्या खाद्यांमध्ये कृत्रिम ‘अ’ घालून त्यांना ‘ संपन्न' केले जाते. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकातून ते सर्वांना मिळू शकते.

शरीरातील कार्य:
१. त्याचे सर्वात महत्वाचे कार्य आपल्या दृष्टीसंदर्भात आहे. दृष्टीपटलामध्ये Rhodopsin हे प्रथिन असते ज्यामध्ये ‘अ’चा समावेश असतो. प्रकाशकिरण या प्रथिनावर पडल्यावर अनेक रासायनिक क्रिया होतात. त्यातून आपल्या मेंदूला ‘दृष्टीसंदेश’ पाठवला जातो. निरोगी दृष्टीसाठी आपल्या दृष्टीपटलात Rhodopsin चा भरपूर साठा असावा लागतो.

२. आपल्या त्वचेवर आणि सर्व पोकळ इंद्रियांमध्ये एका पातळसर संरक्षक पेशींचे (epithelium) अस्तर असते. या सर्व पेशींना ‘अ मजबूत करते. या पेशी श्वसनमार्ग, मूत्रमार्ग, आतड्यांमध्ये आणि अन्यत्रही संरक्षक असतात. असे हे अखंड अस्तर आणि त्वचेवरील थर रोगजंतूना रोखण्याचे काम करतात.

३. सर्व पेशींमध्ये ‘अ’ सूक्ष्म पातळीवर काम करते. त्याद्वारे ते अनेक जनुकांच्या नियंत्रणात भाग घेते. परिणामी ते पेशींची वाढ आणि विकास या मूलभूत गोष्टींचे नियंत्रण करते.

४. त्याचा antioxidant हा अजून एक महत्वाचा गुणधर्म. पेशींमधील रासायनिक क्रियांतून free radicals प्रकारची अस्थिर रसायने तयार होतात. ती जर जास्त प्रमाणात साठू लागली तर त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. त्यातून कर्करोगादिंचा धोका संभवतो. पेशीतले antioxidant पदार्थ या घातक अस्थिर रसायनांचा नायनाट करतात. या कामी ‘अ’ च्या जोडीने ‘इ’ व ’क’ या जीवनसत्वांचे योगदान महत्वाचे आहे.

अभावाचा जागतिक प्रादुर्भाव:
जगातील ७५ देशांमध्ये हा मोठा आरोग्य-प्रश्न आहे. त्यातले बरेचसे देश दक्षिणपूर्व-आशियाई व आफ्रिकी आहेत. प्रौढांच्या तुलनेत मुलांत ‘अ’ चा यकृत-साठा बराच कमी असतो. त्यामुळे त्यांच्यात अभावाची लक्षणे लवकर दिसतात. आज जवळपास २५ कोटी मुले या अभावाची शिकार झाली आहेत. त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य चिंताजनक आहे. त्यापैकी सुमारे चार लाख मुले दरवर्षी अंध होतात. यावरून या प्रश्नाचे गांभीर्य कळेल.

आहारातील अभावाखेरीज आतड्यांच्या व स्वादुपिंडाच्या काही आजारांमध्ये ‘अ’ चे शोषण नीट न झाल्याने अभावाची लक्षणे दिसू शकतात.

अभावाचे परिणाम:
१. दृष्टीवरील दुष्परिणाम सर्वात महत्वाचे. रोगाच्या सुरवातीस जेव्हा Rhodopsinचा साठा कमी होऊ लागतो तसे रुग्णास अंधुक प्रकाशात कमी दिसते. पुढे रातांधळेपणा होतो. या स्थितीतच ‘अ’ चे उपचार सुरु करायचे असतात. जर दुर्लक्ष केले तर मग दृष्टी हळूहळू अधू होत जाते. त्याचबरोबर डोळ्यातील अस्तराचा ऱ्हास होऊन डोळा कोरडा पडतो. याही स्थितीत दुर्लक्ष केल्यास डोळ्याची अवस्था खराब होत शेवटी पूर्ण अंधत्व येते.
अभावाच्या सुरवातीस जर डोळ्यांची तपासणी तज्ञाने केली तर त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण ठिपके (Bitot spots) दिसू शकतात.

२. त्वचेवरील परिणाम : ती कोरडी पडते. जाड, लालसर व खवले पडल्यासारखी दिसते आणि खूप खाजते.

३. जंतूसंसर्ग : रक्तक्षय आणि दुबळ्या प्रतिकारशक्तीमुळे शरीरात जंतू सहज शिरतात आणि विविध दाह होतात.

उपचार:

अभावाची लक्षणे दिसू लागताच त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार चालू करावेत. त्यासाठी ‘अ ’च्या गोळ्या मिळतात. गंभीर रुग्णांमध्ये इंजेक्शनचा पर्याय वापरला जातो.
रोगप्रतिबंध:
आपल्या देशातील बालकांना शालेयपूर्व वयात रोगप्रतिबंधक म्हणून ‘अ’ चे मोठे डोस देण्याची पद्धत अवलंबली जाते.

‘अ’ चे उपचार नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. अनावश्यक जास्त डोस घेतल्यास त्याचे यकृत, मेंदू व त्वचेवर दुष्परिणाम होतात.
* * *

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती
चष्मा लागणे हा विकार 'अ 'च्या अभावामुळे होतो का?
'अ' जास्त प्रमाणात घेतल्याने नम्बर वर फरक पडतो का
(मी शाकाहारी आहे)

मला वारंवार पडणारा प्रश्न म्हणजे भाज्या चिरून खूप वेळ ठेवल्या की त्यातली जीवनसत्त्वे उडून जातात असं आपण वाचतो. तर याचा नेमका रेट काय असतो? म्हणजे समजा गाजराची कोशिंबीर करायची आहे तर अगदी जेवायला बसण्यापूर्वी १० मिनिटं गाजरं किसायला घ्यावी की अर्धा तास आधी किसली तरी फारसं बिघडत नाही?

@ किल्ली,
'अ" जीवनसत्व व चष्मा यांचा संबंध आहे का? >>>

नाही ,थेट संबंध नाही. ‘चष्मा लागणे” हा प्रकार ‘Refraction errors’ यात मोडतो. त्याची कारणे अन्य आहेत. ‘अ’ हे डोळ्याच्या विविध पेशींना निरोगी ठेवते.

जेव्हा ‘अ’ चा शरीरसाठा उत्तम असतो तेव्हा आपण खूप कमी प्रकाशात सुद्धा नीट पाहू शकतो. याला ‘Dark adaptation’ म्हणतात. साठा कमी झाला की हे आधी बिघडते.

छान माहिती.
माझेही दोन प्रश्न आहेत. शाकाहारी लोक या जीवनसत्वा करिता जास्त करून गाजरांकडे वळतात, भरपूर उपलब्धता आणि चव यामुळे. पण अ जीवनसत्त्वाच्या बायोअव्हेलिबिलिटीच्या दृष्टीने गाजर कसे खावे? कच्चे,- काप करून /किसून, त्याचा रस काढून पिऊन की शिजवून /वाफवून?

तसेच मेदात विद्राव्य असणारी जीवनसत्वे खाताना सोबत मेदयुक्त पदार्थांचे सेवन करणे चांगले त्यामुळे बायोअव्हेलिबिलिटी वाढते, असे म्हणतात यात तथ्य आहे का?

@ वा वे,
भाज्या आधी धुवून मग चिराव्यात हे योग्य. बऱ्याच जणांना उलट सवय असते ती अयोग्य.

काही जीवनसत्त्वांचा नाश शिजवण्यामुळे होतो. ‘अ’ हे उष्णतेला स्थिर आहे. त्यामुळे इथे तो प्रश्न नाही. निव्वळ किसून ठेवण्याने सत्वाचा नाश होईल असे मला वाटत नाही.
गाजराच्या बाबतीत तर ते कच्च्या पेक्षा शिजवले असता त्यातून होणारा ‘अ’ चा लाभ अधिक असतो.

गाजराच्या बाबतीत तर ते कच्च्या पेक्षा शिजवले असता त्यातून होणारा ‘अ’ चा लाभ अधिक असतो.>> ही नविन माहेती आहे, ह्याचा उपयोग होईल नक्कीच

गाजराच्या बाबतीत तर ते कच्च्या पेक्षा शिजवले असता त्यातून होणारा ‘अ’ चा लाभ अधिक असतो.>> अरेच्चा! हे माहीत नव्हते.
निव्वळ किसून ठेवण्याने सत्वाचा नाश होईल असे मला वाटत नाही.>> अच्छा! धन्यवाद डॉक्टर.

मानव, धन्स. चांगला प्रश्न.

तसेच मेदात विद्राव्य असणारी जीवनसत्वे खाताना सोबत मेदयुक्त पदार्थांचे सेवन करणे चांगले त्यामुळे बायोअव्हेलिबिलिटी वाढते, असे म्हणतात यात तथ्य आहे का? >>>>
होय, अगदी बरोबर. जर पचनसंस्थेच्या आजाराने मेदांचे अपचन झाले तर त्याबरोबर च या जीवनसत्वांचेही पचन व शोषण होत नाही.

गाजराच्या बाबतीत तर ते कच्च्या पेक्षा शिजवले असता त्यातून होणारा ‘अ’ चा लाभ अधिक असतो.>> नवीनच माहिती.
पण शिजवलेले गाजर खाववत नाही. Happy
पालक पण शिजवल्यावर त्यातले लोह जास्त मिळतात ना?

पण शिजवलेले गाजर खाववत नाही.>>> +१११

कोणीतरी हे लिहायची वाटच पाहत होतो ! कशी गंमत असते बघा. जे जिभेला प्रिय ते पोषणमूल्यात कमी असा साधारण संकेत आहे. Bw
गाजर शिजवले की त्यातील Carotene चे शरीरात ‘अ’ होण्याचे प्रमाण वाढते.
पालकातील लोह हे क्षारांशी संयुगित असते. उष्णतेमुळे ते सुटे व्हायला मदत होते.

जे जिभेला प्रिय ते पोषणमूल्यात कमी असा साधारण संकेत आहे.>>>> हो. खरंय Happy

गाजराचा हलवा असतो, पण गोड.
त्याव्यतिरिक्त :
पॅन फ्राईड कॅरट्स विथ गार्लिक
आणि
चायनीज कॅरट एग स्टर-फ्राय

तसेच उपमे (रवा, शेवया, किन्वा) गाजर घालून चांगले लागतात.

पण शिजवलेले गाजर खाववत नाही.>> नुसतं नाही खायचं. फरसबीच्या भाजीत गाजर घालता येतं. छान लागतं. मुगाच्या डाळीच्या खिचडीत गाजर चांगलं लागतं. भो. मि. कांदा बटाटा गाजर मिक्स भाजी चांगली लागते.

मुगाच्या डाळीच्या खिचडीत गाजर चांगलं लागतं. >> हे एक आवडते मला.
बाकी आता मानव आणि वावे यांच्याकडे 'गाजर स्पेशल'ची online order द्यावी असे म्हणतो ! ही अनुभवी मंडळी असणार याची खात्री आहे. ☺️

मावे - मायक्रोवेव्ह
बाकी आता मानव आणि वावे यांच्याकडे 'गाजर स्पेशल'ची online order द्यावी असे म्हणतो ! ही अनुभवी मंडळी असणार याची खात्री आहे>> Lol
बंगळूरला गाजरं खूप वापरतात हे खरं आहे. वाट्टेल त्या पदार्थात ( म्हणजे भेळेतसुद्धा) गाजर किसून घालतात.
आणि इथे वर्षभर उटीची चांगली गाजरं मिळतात.

या हैद्राबादला डॉक्टर कुमार. तसंही मागे कुठल्याशा धाग्यावर झिरो ऑइल कुकिंग खाऊन बघायला येतो म्हणाला होतात.

ही खूप छान लेखमाला आहे. थँक्यू डॉक्टर. आणि तुम्ही लगेचच प्रतिसाद देता, हे अजून एक छान. Happy

@ वा वे, आयुष्यात अजून ‘मावे’ शी संबंध आला नसल्याने माहीत नव्हते !

@मानव, आमंत्रणाबद्दल धन्यवाद. तुमच्या तेलशून्य स्वयंपाका बद्दल कुतूहल आहेच !

@ मीरा, धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या सहभागाने मजा येतेय.

ही खूप छान लेखमाला आहे. थँक्यू डॉक्टर. आणि तुम्ही लगेचच प्रतिसाद देता, हे अजून एक छान+११११
खरच, खुप धन्यवाद

लेन्स ओपेसीटी कशी तपासता येते?. मला मायोपिया आहे पण माईल्ड. तरीही रात्री कमी दिसते . याचा संबंध लेन्स ओपेसिटीशी असू शकतो की रेटिनाशी?

मस्त लेख.
गाजराची कोशिंबीर आवडते मला.

सुंदर माहितीपूर्ण लेख !

वरती गाजर पुराण बरेच झाले आहे. लहान मुले जेवणात गाजर खायला कुचकूच करतात. आम्ही घरी त्यावर तोडगा काढला. मुलांना पपई देतो. अगदी आवडीने खातात. या फळाचे इतरही खूप फायदे आहेत.

के तु,
वरवर पाहता तुमच्या तक्रारीचा ‘अ’ शी संबंध वाटत नाही. अर्थात तुमच्या प्रश्नाचे उत्तर नेत्ररोग तज्ज्ञाने तपासणी करून द्यावे हे उत्तम.

Pages