माथेरान’ व्हाया ‘गारबेट’ आणि ‘असालची वाट’

Submitted by योगेश आहिरराव on 6 January, 2019 - 06:20

‘माथेरान’ व्हाया ‘गारबेट’ आणि ‘असालची वाट’
जुन्या जिवलग मित्रांसोबत ट्रेक ठरला. जवळपास मार्च २००९ नंतर आता योग जुळून आला! थोडक्यात यांचे पुनरागमन म्हणावे लागेल, त्या दृष्टीने ट्रेक रूट ही तसाच हवा. प्रवासाची वेळ, अंतर, गर्दी, अतिरिक्त तंगडतोड, या सर्व बाबींना फाटा देत निवांत रमणीय असं काही तरी हवे होते. यावर माझ्याकडे तरी सध्याची परिस्थिती पाहता माथेरानला पर्याय नव्हता.
111_1.jpg
हिरवगार गारबेट पठारावर मन केव्हाच जाऊन पोहचलं होते. शनिवारी सकाळी पहिली ठाणे कर्जत लोकल पकडून भिवपुरी रोड उतरलो तेव्हा पावसाची रिमझिम साथ होतीच. मी, सौरभ, प्रशांत आणि त्याचा ऑफिस मधील मित्र दिनेश. चौघेही चहासाठी एका बऱ्यापैकी मोठ्या हॉटेलात गेलो, आता नाव आठवत नाही पण चौक किंवा कर्जत भिवपुरी जाताना बहुतेक वेळी इथे थांबा घेतलाय. प्रशांतचा शनिवार असल्यामुळे उपवास होता त्याने फक्त चहा घेतला आम्ही सोबत गरमागरम दोन प्लेट भजी. निघताना हॉटेल मालक बजावून सांगत होते, “चुकूनही धरणात उतरू नका, पाय धुतो, तोंड धुतो, हाथ धुतो असं काहीही चुकून सुद्धा करू नका, सरळ वाडीची वाट धरा. तिथल्या धबधब्यात हवं तर पाहिजे तेवढं खेळा पण हाथ जोडतो धरणात मुळीच नका जाऊ”. अगदी याच भाषेत सांगितले. याला कारण इथला प्रसिद्ध पावलेला आशेणे कोषेणे धबधबा आणि पाली भुतीवलीच (भिवपुरीचे) छोटे धरण. खरंय हल्ली बेशिस्त आणि टुक्कार जत्रेमुळे चुकून काही दुर्घटना घडली तर इथल्या स्थानिक जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो. दुर्दैवाने हल्ली अश्या घटना वाढतच जात आहेत. डिकसळ मधून उजवीकडे पाली गावासाठी दहा पंधरा मिनिटांची चाल. गावाबाहेर येत लहानसा चढ चढून वर आल्यावर काठोकाठ भरलेले धरण. सुचना इशारावजा बोर्ड लावला आहे.
धरणाच्या डावीकडून मळलेली पायवाट आम्हाला सागाची वाडी येथे नेणार ! अधून मधून येणारा पाऊस, एकीकडे माथेरान त्याची गारबेटहून सोंडाई पर्यंतची बाजू यातून अनेक छोटे मोठे धबधबे ओहोळ याच धरणात भर घालतात.
333.jpg
टिपिकल जलाशयाच्या काठचा हा रस्ता संपू नये असाच. रमत गमत तासाभरानंतर एक मोठा ओढा पार करून वाट समोरच्या टेपाडावर चढली.
पुढचा सौम्य चढ नंतर वाटेवरची मुख्य खूण असलेलं आंब्याचे झाड. तिथे थांबा घेतला. मागे आम्ही आलो ती वाट.
555_0.jpg
इथून डावीकडे चिंचवाडी तर उजवीकडे सागाचीवाडी. सागाच्या वाडीच्या वाटेवरचे हे एक झाड काही वर्षांपूर्वी यावर वीज पडली. भर पावसात वाडीच्या वेशीवर येताच शेतीची कामे पूर्ण झालेली दिसत होती. गार वाऱ्या सोबत भात शेतीची रोप चांगलीच डोलत होती. वाडीतील जिल्हा परिषदेची शाळा चौथी पर्यंत नंतर डिकसळ किंवा नेरळ कर्जत. एका घरात पाणी पिऊन पुढच्या वाटेची चौकशी करून निघालो.
वाडीच्या बाहेर पडताच एक विहीर लागते पुढे जात डावीकडे वळलो. थोडं चाचपडायला झाले, वाटेतल्या गुराखी आजोबांकडून खात्री करून घेतली. साधारणपणे वाडीच्या मागे उजव्या हाताला एक मोठी धार उतरली आहे तीच आहे गारबेटची वाट.
11.jpg
सर्वत्र हिरवगार आणि मधोमध रुळलेली वाट स्पष्ट नजरेत येते. सुरुवातीला हळूहळू मग पुढे थोडा छातीवर येणारा असा हा चढ. डावीकडे पाहिलं तर डोंगराला पडलेल्या निर्या मधोमध अनेक छोटे धबधबे. वाटेवर जंगल असे नाहीच अध्ये मध्ये लागवड करून जपलेली सागाची झाडे आणि ठराविक टप्प्यावर आंब्याचे झाड. बऱ्याच वर्षांनी आलेल्या मित्रांसोबत चालीतला फरक लगेच जाणवला तसेही आम्हाला कुठे शर्यत लावायची होती उलट आजूबाजूचा बहरलेला निसर्ग त्याचा पुरेपूर आनंद घेत निवांत पणा अनुभवत त्या निमित्ताने का होईना ब्रेक घेत मोबाईलने फोटोग्राफी सुरू होती. तसेही मला स्वतःला पळणारी माणसं ट्रेकला अजिबात आवडत नाहीत त्यापेक्षा मजबूत चालणारी कधीही चांगली, असो...
अशाच एके ठिकाणी थांबलो तेव्हा खाली दूरवर धरणाच्या एकीकडे आम्ही सुरुवात केली ते डिकसळ पाली तर वरच्या भागात डावीकडून चिंचवाडी, सागाची वाडी, बोरीची वाडी. कधी काळी या वाडीत चिंचाची, सागाची व बोराची झाडं भरपूर असावीत म्हणून तर अशी नावं पडली नसावीत? अधून मधून पाऊस चांगलाच झोडपत होता. हिरव्यागार डोंगरावर काळया ढगांचे लोट अधून मधून येणारा क्वचित क्षणा पुरता का होईना सूर्य प्रकाश मग ठिगळ दिसावे तसे मध्येच दिसणारे निळे आकाश, असे सतत बदलणारे चित्र फारच मोहक. जसजसे पुढं सरकत होतो तसे गारबेट पठार आणि उजवीकडचा पॉईंट जवळ भासू लागले. एका मोठ्या आंब्याच्या पुढे जात वाट उजवीकडे वळाली. डावीकडे कडा उजवीकडे दरी मध्येच अरुंद वाट काही अंतर जाताच डावीकडे नैसर्गिक गुहा. हळूहळू तिरक्या रेषेत वाट चढू लागली बोरीची वाडी आणि भुतीवलीहून येणारी वाट एके ठिकाणी एकत्र आली. छोटासा ट्रेव्हर्स मारुन वाट अलगदपणे पठारावर घेऊन आली.
गारबेट पठारावर दाखल होताच भन्नाट वारा स्वागताला हजर. पलीकडे माथेरानचे लिट्ल चौक पॉईंट पासून रामबाग, अलेक्झांडर, माधवजी ते पार मारया पॉईंट धुक्यासोबत लपंडाव खेळत होते. खाली दरीत खाटवण ते पाहून या भागातल्या साऱ्या वाटा रामबाग, अलेक्झांडर, माधवजी, बीटराईस क्लिफ या सर्व ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. अधून मधून मिनी ट्रेनचा आवाज येत होता, अमन लॉज ते बाजार पेठ अशी शटल सेवा सद्या तरी सुरू आहे.
पूर्ण हिरव्यागार पठारावर मोठी झाडी नाहीच मुळी आजूबाजूचा नजारा आणि वारा खात बराच वेळ रेंगाळलो. थोड उन यायचं चिन्ह दिसू लागताच त्याच मोकळ्या पठारावर जेवणासाठी थांबलो. चिक्की, वेफर्स, सुकामेवा हे उपवासासाठी बाकी पराठे, चटणी आणि ठेपले. जेवण अर्थातच घरून आणलेले.
गारबेट पठारवरून मुख्य पॉईंट अंदाजे तीन चारशे फूट उंच असेल. पॉईंटच्या दिशेने निघालो मध्ये गावकरी शेळ्या मेंढ्या सोबत पठारावर त्यांना मी असाल गावात उतरणाऱ्या वाटेबद्दल विचारलं, 'कठीण आहे तुम्हाला नाही जमायचं' असे उत्तर मिळाले. रेलिंग लावलेल्या पॉईंटच्या टेकाडाखालून डावीकडे गावाची वाट, सरळ जाणारी पॉईंटवर तर उजवीकडची असालकडे.
IMG_20180804_130514_HDR (3).jpg
आम्ही सरळ वाटेने मधले छोटे कातळ टप्पे पार करून आणि उजवीकडील एक्सपोजर असलेल्या अरुंद पायवाटेने पॉईंटवर आलो. समोर आम्ही आलो ते हिरवेगार गालिचे ओढलेले पठार थेट सोंडाई पर्यंत नैऋत्येला मोरबे धरण त्यामागे दूरवर पुसटसा माणिकगड. पूर्वेला भिवपुरी कडील सह्याद्रीची मुख्य रांग नेरळ कर्जत रेल्वे मार्ग. वळणदार प्रवाहाची उल्हास नदी आणि अनेक छोटी छोटी गावं आम्ही आलो ते भिवपुरी धरण. उजव्या हाताला खाली पूर्णतः धनगर वस्ती असलेलं गारबेट.
55.jpg
पावसाळी शेती थोड्या प्रमाणात पशू पालन, माथेरान येते जाऊन दूध व खवा विकून तसेच काही जण छोटी मोठी कामे तर काही घोडे टांगा चालवतात. माथेरानच्या आसपास वाडी पाड्यांमध्ये यांची सोयरिक खरंतर माथेरानचे यांचे फार पूर्वीपासून संबंध. माथेरानचे आरंभीचे प्रवासी हे धनगरच होते.
गारबेट बद्दल माझा मायबोलीकर मित्र सतीश कुडतरकर याने एक पोस्ट शेअर केली होती.
नाव लिहिण्याच्या आणि उच्चार करण्याच्या पद्धतीमुळे Garbett हे इंग्रजी नाव असल्यासारखे वाटते. त्यात माथेरानच्या सर्व पोईंट्सची नावे इंग्रजीतच असल्याने आपल्याला गार्बेटही इंग्रजीच वाटते.
पण, हा एकमेव पोईंट आहे ज्याच नाव इंग्रजांनी स्थानिक भाषेतून घेतलय.
...त्याला इंग्रज GHARBUT म्हणत.
कारण तिथे स्फटिकासारखे पांढरे दगड मुबलक प्रमाणात होते. डोंगरदर्या फिरताना काळ्या बेसाल्टच्या बेचक्यांमध्ये, वाटांवर आपल्याला हे दगड दिसतात.
हा Gharbut म्हणजे मराठीत गारबेट असा शब्द असावा. आठवा "गारगोटी".
गारगोटी एकमेकांवर घासून ठिणग्या निर्माण करतो तोच दगड.
संदर्भ- Matheran Hill
Its people, plants and animals-1881
-J. Y. Smith, M.D.
Bombay Medical Staff

गारबेट गावातून वळसा घालून प्रशस्त वाटेने सुद्धा पॉईंट वर येता येते. पाऊस आणि नवखे भिडू असतील तर गावातूनच यावे. थोडासा एकाकी असलेला माथेरानच्या प्रमुख पॉईंट पैकी एक हा गारबेट. बाझार पेठे पासून अंदाजे साडेचार पाच किमी अंतरावर दस्तुरीहून येताना परस्पर इथे येणे सोयीचं. वेळ पहात भानावर आलो पायच निघेना, वसंत ऋतूत एखाद्या दुधाळ पौर्णिमेच्या रात्री नाहीतर अमावस्येला काळ्याकुट्ट अंधारात चांदण्यांची नक्षी पाहत या पठारावर मुक्काम करायलाच हवा. असो बघू कधी योग येईल.
एक पॅनोरमा घेण्याचा प्रयत्न. दस्तूरी पुढे जूम्मापट्टी मार्गे टपालवाडी नेरळ असे उतरायचं तशी मुख्य गाडी रस्त्याची त्याला अगल बगल देऊन जाणारी ही वाट आम्ही या आधी केली होती. पण इथून थेट गाडी पकडून नेरळ जाणे म्हणजे हाफ डे ट्रेक किंवा हाफ ट्रेक जे आमच्या पैकी कुणालाही नको होते. माझ्या तरी डोक्यात असालची वाट घोळत होती. जेव्हा पहिल्यांदा अलेक्झांडर रामबाग ट्रेक केला होता, त्यावेळी बुरुजवाडीच्या शाळा मास्तरांनी या वाटेबद्दल सांगितले होते.
गारबेट पॉईंटहून मुख्य वाट जी दस्तुरीच्या दिशेने जाते. याच वाटेने जात डावीकडून गारबेट गावातून येणारी वाट मिळाली. समोरून एक जण दुधाची किटली घेऊन. मी विचारलं, कुठे गारबेट का ? त्यावर म्हणाला, 'नाही असाल'. मी लगेच वाटेबद्दल विचारायला सुरुवात केली. हा पण तेच सांगू लागला, 'अवघड आहे तुम्हाला नाही जमणार'. झटपट पुढे निघून गेला. काही अंतर जाताच आणखी एक लहान मुलीसोबत येताना भेटले त्यांना विचारलं. असाल गावात राहणारे ते आपल्या मुलीसोबत शनिवारची अर्धा दिवसाची शाळा करून घरी निघाले होते. शाळेची पायपीट हि तर इथे नित्याची बाब. त्यांचे सुद्धा वाटे बद्दल तेच मत पडले. या दोघांचे ऐकून बाकी मंडळी बोलू लागली, जाऊ दे दस्तूरी जूम्मापट्टी मार्गे जाऊया. तसेच पुढे निघालो काही अंतरावर वाट थोडी बाहेर येऊन उजवीकडे खाली नेरळ जूम्मापट्टी बाजू दिसू लागली. तसेच खाली मागे धारेवर वळून पाहिले असता, बारीक पायवाट कड्याला बिलगून खाली उतरत होती. नीट निरखून पाहिल्यावर आधीचा माणूस उतरताना दिसला. ती वाट पाहून माझी तर उत्सुकता वाढली. आता जर आणखी कुणी या वाटेने जाणारा गावकरी भेटला तर आपण याच वाटेने जायचे असे मी जाहीर करून टाकले. आश्चर्य म्हणजे काही मिनिटांत आणखी एक मामा दुधाचा कॅन घेऊन आले.
मी : काय असाल का ?
मामा: हो
मी : वाट कशी आहे
मामा : हाये थोडी अवघडच. पाऊस आहे ना !
मी : तुम्ही रोज समान घेऊन, लहान मुलांसोबत येजा करतात. आम्हाला न जमायला काय झालं!
मामा : चला तर मग.
मामांच्या बोलण्याने एक दोघांना हुरूप आला. पुन्हा माघारी वळून आता पर्यंत जितके अंतर कापले होते त्याच्या बरोब्बर निम्मे अंतर जाताच उजवीकडे झाडीत देव रचलेले मामांना विचारल्यावर कळलं की हा ‘पिसारनाथ’ गारबेट मधील लोकांनी तिथं जाणं दूर पडते म्हणून या वाटेवर त्यांच्या सोयीसाठी बसवलेला. या देवाच्या ठिकाणा पासून चार पावलांवर बारीक वाट कड्याला बिलगून खाली उतरताना दिसली.
103.jpg
बऱ्यापैकी दृष्टिभय असलेली वितभर वाट झेड आकाराची वळण घेत टप्प्या टप्प्यात उतरत गेली. उतार तीव्र असल्यामुळे गुडघ्यांवर त्यात अँक्शन ट्रेकर मुळे पायाच्या बोटांवर चांगलाच ताण पडत होता. मधले कातळ टप्पे सततच्या पावसामुळे शेवाळलेले.
एके ठिकाणी गेल्या वर्षी वाट ढासळलेली थोडीफार डागडुजी या गावकरीनीं केली तेवढा भाग सावकाश पार करून वाट रानात शिरली काही अंतर जाताच दोन वाटा उजवीकडची असाल धनगरपाडा तर डावीकडची असालवाडी. पुढची वाट समजवून सांगून मामा धनगर पाड्याकडे निघून गेले. झोडप्या पावसाला सुरूवात झाली. आम्ही डावीकडच्या वाटेने उतरू लागलो थोड खाली आल्यावर बैलगाडी जाईल एवढा रस्ता दस्तुरीच्या बाजूने आडवा आला तो ओलांडून पुन्हा वाट सरळ झाडीत शिरून उतरणीला थोड बाहेर येत आंब्याचे मोठे झाड खाली दगड रचून ठेवलेले, मामांनी सांगितलेली वाटेतली हि खूण. आता पर्यंत अर्ध्या पाऊण तासात सलग उतराई झाली, झाडाखाली पंधरा वीस मिनिटे मोठा ब्रेक घेतला. या वाटेने उतरताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे नेरळ ते माथेरान हा घाट रस्ता त्यावर धावणारी छोटी वाहनं त्याला एक दोन ठिकाणी छेदलेले मिनी ट्रेनचे रुळ सारं बऱ्यापैकी दिसते. झाडी भरला जंगलाचा टप्पा उतरून वाट पुन्हा कड्यालगत बाहेर आली. ही वाट उतरताना पि वी सी पाइप लाइन सतत सोबत करते. पाईपपाच्या साहाय्याने उन्हाळ्यात अमन लॉज पासून या वाडीत पाणी आणलं जाते. दक्षिणेला सरळ रेषेत पाहिलं तर खाली चिंचाची वाडी, सागाची वाडी तिथूनच आम्ही चढाई केली ती गारबेटची सोंड अलीकडे असालची वाडी, धनगरपाडा आणि या बाजूला असणारे अनेक धबधबे तर उत्तरेला दस्तुरी कडील भाग नेरळ माथेरान घाट रस्ता, जूम्मापट्टी ठाकूरवाडी, धनगरपाडा, बेकरेची वाडी. पहिल्या टप्प्या सारखीच ही वाट फक्त आता उतार थोडा सौम्य, छोटे कातळ टप्पे सावकाश उतरत दुसरा ब्रेक घेतला. आता पाऊस उघडून चक्क उन पडले होते ते दृश्य फारच मोहक. पूर्वेला दूरवर तुंगी, कोथळीगड ते फेण्यादेवी कुसुर पर्यंतचा भाग नजरेत आला तसेच आजूबाजूचे धबधबे आणि हिरवगार माथेरान त्याच्या आसपासच्या या धनगर ठाकरांचे वाडे पाडे छोटी छोटी घरं आंगण चौकोनी शेताचे तुकडे सार काही पाहताच राहिलो. निःशब्द शांत मध्येच कुठून तरी मलबार व्हिसल थ्रश (शिळकरी कस्तुर) शीळ घालतोय ऐकु येतय पण तो काही दिसत नाही आम्हीही शोधायच्या भानगडीत पडत नाही तसेच हरवून जात फक्त अनुभवतोय याच साठी तर आपल्या सारखे भटके तंगडतोड करतात. असाल वाडीत उतरलो तेव्हा चार वाजून गेले होते. जूम्मापट्टी पासून हि वाडी तसेच पुढे असाल धनगरपाडा भूतीवली पर्यंत हा कच्चा रस्ता गेला आहे. उन्हाळ्यात जीप सारखं वाहन इथं येते.
503.jpg
आम्ही डावीकडे रस्त्याला लागलो, मागे वळून पाहिले आम्ही आलो ती वाट. पंधरा वीस मिनिटांच्या चालीनंतर बेकरेची वाडी लागली. या बेकरे वाडीतून पण अशीच एक उभ्या चढाईची अवघड वाट जाते. असालवाडी आणि बेकरीची वाडी या मधल्या भागात बऱ्याच ठिकाणी लँड स्लाइड पडझड झाली आहे. यामुळं सध्या ही वाट पावसाळ्यात गावकरी सुद्धा वापरत नाहीत. डावीकडे माथेरानचा भव्य पहाड त्यावरचे अनेक धबधबे आणि या वाडी वस्त्यांना जोडणारा हा माळ रानातला लाल मातीचा रस्ता. थोडक्यात सांगायचे झाले तर जूम्मापट्टी, धनगरपाडा, बेकरेची वाडी, असालवाडी, असाल धनगरपाडा, नाण्याचा माळ, भुतिवली, बोरीची वाडी, सागाची वाडी, चिंचवाडी या जवळ पास सारख्याच उंचीवर एकाच पातळीत वसलेल्या. माथेरानची उंची अंदाजे अडीच हजार फूट पेक्षा थोडी जास्तच आणि जूम्मापट्टी अंदाजे आठशे फूट म्हणजेच याला माथेरानचा पदर म्हणता येईल. तसेच जूम्मापट्टी ते सागाची वाडी हा भाग पहिला तर माथेरानची पूर्व दिशेची अर्धी प्रदक्षिणा होते तर !
तासाभरात जूम्मापट्टीत आलो. रिमझिम पाऊस होताच. स्टॉलवर कडक चहा घेऊन पुढे रिक्षा पकडून नेरळ. शनिवार असल्यामुळे निदान ट्रेन मध्ये शिरता तरी आले. कुणावरही अवलंबून न राहता अवघ्या ९० रुपये माणशी या हिशोबात, तेही पदरात असालच्या वाटेचे दान पडून हा ट्रेक सुफळ संपूर्ण झाला.

अधिक फोटोसाठी हे पहा. https://ahireyogesh.blogspot.com/2018/08/matheran-garbet-asal.html

योगेश चंद्रकांत आहिरे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२७ डिसेंबरला फारच हुक्की आली. बसनेच(१२:३०) जाऊन बसनेच(०३:३०) परत आलो. मधल्या वेळात पनोरमाला जाऊन आलो. दस्तुरी नाक्याला झालेले नवे जय गुरुदेव टी हाऊस छान आहे. स्वस्त अन स्वच्छ. एकट्या ट्रेकरला फार उपयोगी. थंडीचं एक वाइट म्हणजे पक्षी गप्प बसतात.

छान आहे वृत्तांत !!! तुम्ही ते गारगोटीचे दगड घासून बघितलेत का ठिणग्या निर्माण होतात का ते ? एक कुतूहल म्हणून विचारतोय. मी तिथे कधी गेलो तर नक्की घासून बघेन आणि एक-दोन दगड घेऊन येईन.

२७ डिसेंबरला फारच हुक्की आली. बसनेच(१२:३०) जाऊन बसनेच(०३:३०) परत आलो. मधल्या वेळात पनोरमाला जाऊन आलो. दस्तुरी नाक्याला झालेले नवे जय गुरुदेव टी हाऊस छान आहे. स्वस्त अन स्वच्छ. एकट्या ट्रेकरला फार उपयोगी. >>> छान. माथेरान मध्ये मी आत्ता पर्यंत अनेक वेळा माथेरानला तिन्ही ऋतूत भरपूर हिंडलो आहे पण खाण्याच्या जेवणाच्या कुठल्याही बाबतीत मला माथेरान ने कधीच निराश केले नाही.