कसं सांगू मी तुला

Submitted by किल्ली on 4 January, 2019 - 04:39

ही कथा मायबोली गणेशोस्तव २०१८ मध्ये कथासाखळी उपक्रमासाठी दिली होती. तिथे कथा पुर्ण करून देणार्‍या सर्वांचे आभार.
लिन्कः https://www.maayboli.com/node/67504
किरणुद्दिन ह्यांच्या प्रतिसादाचा समावेश करून, थोडीशी बदलून, लघुकथेच्या स्वरूपात लिहिली आहे. कशी वाटली जरूर सांगा.
आणि हो, अजूनही सूत कातायला वाव असेल तर "कतिया करू, कतिया करू" होउन जाउ द्या ... Happy
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

“हे काय, जेवणात मीठच नाही. रोज रोज हे असं बेचव अन्न खाऊन कंटाळा आलाय मला. कधी अळणी, तर कधी खारट, कधी बचकभर मसाले तर कधी पांचट चवीच्या भाज्या. मेस बदलली तर एक – दोन महिने बरे जातात, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. खरं तर मला स्वयंपाक करता येतो पण करून खावं म्हटलं तर हॉस्टेलवर परवानगी नाही .
परवानगी असती तर मी पोटापुरतं तरी बनवुन खाल्लं असतं. घरी सांगितलं तर घरचे म्हणतात, तू शिक्षणासाठी राहतो आहेस बाहेर, अभ्यास करणार की स्वयंपाक? त्यांचं सुद्धा खरं आहे म्हणा. स्वयंपाक बनवायला मला १ ते दिड तास तरी लागेल, पुन्हा ती खरकटी भांडी घासून ठेवावी लागतील. नको रे बाबा! सगळा वेळ त्यातच जायचा. आधीच अभ्यास थोडा कठीण जात आहे. गावात सगळं सोपं होतं. इथे शिक्षणासकट सगळंच अवघड.”
अभिलाष विचार करत होता. इतक्यात त्याला कोणीतरी हाक मारली. ती मंदा होती, जवळच्याच एका गावातून इकडे शहरात शिकण्यास आली होती. दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. थोड्याच दिवसात त्यां दोघांची चांगली मैत्री झाली होती. आज काय बेत आहे मेसमध्ये बघू बरं असं पुटपुटत मंदा थाळी वाढून घेऊन आली.

मंदा: “मस्तय की आजचं जेवण! अभिलाष, उगाच कुरकुरत असतोस तू , ह्या जेवणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिक. आपल्याला निदान पोटभर खायला तरी मिळते, जगात कित्येक लोक उपासमारीने तडफडतात.“
अभिलाष: “खरंय तुझं, ही भाजी बघ, किती कलात्मकतेने बनवलीय नाही का? मावळतीच्या किरणांचा तांबूस रंग तळ्याला व्यापून राहतो आणि तळंही त्याच रंगाचं होऊन जातं. अगदी तसाच हा रस्सा दिसतोय. ह्यात इटुकल्या पिटुकल्या भाजीच्या फोडी मनमुराद पोहत आहेत. जराश्या कच्च्याच असल्यामुळे त्यांची खुमारी अजून वाढतेय. वाफाळत्या पाण्यात ढकललेला गोड रवा म्हणजे मिष्टान्न म्हणून दिलेला चिमूटभर शिरा जणू! अहाहा, शिऱ्याचा सुवास दरवळतोय, तशी रसना वासानेच तृप्त होतेय! पोळ्या वर्तमानपत्रावर उलगडून ठेवल्या, तर पेपर वाचता येईल अशी सोय! “
मंदा: “तुझा उपरोध कळतोय बरं मला, गुपचूप नाव न ठेवता जेव एवढंच म्हणायचं होतं,पण तू बोलायची एकही संधी सोडत नाहीस.”
अभिलाष: “अगं, पण मी तुला बोल लावत नाहीये.”
मंदा: ”काय करू शकतो मग आपण? तूच सांग आता.”
आता मंदाने माघार घेतली होती त्यामुळे तिने त्यालाच विचारले की उपाय काय.
अभिलाष: “आपण ना, स्वतःच एक छान चवदार जेवण पुरवणारं हॉटेल काढूया. तिथे विद्यार्थ्यांना सवलतीत जेवण मिळेल अशी व्यवस्था करू. कॉलेजच्या प्राध्यापकांना मात्र डबल चार्ज लावू, काय? असं म्हणून तो हसायला लागला.”
अभिलाषची ही स्वप्नरंजन करण्याची सवय नेहमीची होती. कुठेही काही समस्या असेल तर ह्याचा उपाय म्हणजे स्वतः ती इकोसिस्टिम उभी करणे! बाग, थिएटर, कॉलेज, हॉटेल असं सगळं तो स्वतःच बनवणार होता.
अभिलाष पुढे बोलत होता.
“त्या हॉटेल मध्ये ना, आपण रोज पक्वान्न देऊ. ज्याला जे आवडेल त्याने ते खावे अशीही सोय करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे तुम्हाला वाटेल तितके भरा अशी सुविधा देऊ, म्हणजे खूप लोक येतील खायला. चांगलं आणि आवडीचं जेवण असल्यावर की लोक खूप पैसे देतील. मग त्या पैश्यातून आपण एक लॉज उघडू. तिथे निवासाची व्यवस्था असेल. तिथे आयतं जेवण आणि टेन्शन फ्री आयुष्य असं दोन्ही मिळेल. (आता टेन्शन फ्री आयुष्य तो कसे देणार हा प्रश्न तुमच्या आमच्याप्रमाणे मंदाला सुद्धा पडला होता. पण अभिलाषला बोलताना डिस्टर्ब केलं तर तो अजून पकवतो, हे माहित असल्यामुळे ती नुसतंच त्याच्याकडे पाहत तो काय बोलतो ते ऐकत राहिली). ह्या व्यवसायातून आपण रग्गड पैसे कमवू. मग आलेल्या पैश्यातून एक बंगला विकत घेऊ. तो बंगला आपण चित्रपटांच्या शूटिंग साठी भाड्याने देऊन आणखी पैसे कमवू………..”
ह्यापुढे तो काय बोलला ते काही मंदाला ऐकायला आलं नाही कारण तिला मस्तपैकी डुलक्या लागत होत्या. खरकटा हात ताटात तसाच ठेवून मंदा पेंगायला लागली होती. अभिलाषचं स्वतःच्या बडबडीच्या तंद्रीतून तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्याने तिला हलवून जागं केलं. डोळे कसेबसे उघडे ठेवून ती ऐकण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा अभिलाष”आपल्या गोठ्यात ४ दुभत्या गाई , त्यांची वासरं….” असं काहीबाही बोलत होता. इतक्यात मेस बंद होण्याची वेळ झाली म्हणून तिथल्या काकूंनी दोघांनाही हाकलून लावलं.

मंदाला अभिलाषचे हे वागणे कधीकधी विक्षिप्त वाटत असे, तर कधी तो महत्वाकांक्षी आहे असं वाटत असे. पण एक मात्र खरं होतं की ती त्याच्यावर मनापासून प्रेम करत असे. पण ते प्रेम अव्यक्त होतं.
तिने अभिलाषला कित्येक वेळा आपल्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण दर वेळी तो एखादा विषय पकडून त्याच स्वप्नरंजन सुरु करत असे. आज मात्र काहीही करून त्याला सांगायचं असं ठरवून सकाळी सकाळी मंदाने अभिलाषला गाठलं. तिने छान टवटवीत ताजा लालचुटुक प्रेमाची खूण म्हणून ओळखला जाणारा गुलाब त्याला दिला. लाल गुलाब पाहून अभिलाषच्या चेहेऱ्यावर हसू उमटले.
जरासा लाजूनच तो म्हणाला,

“वॉव, किती सुंदर गुलाब आहे हा! बाजारातल्या मोठ्या फुलांच्या तुलनेत अगदीच छोटुकला असल्याने कसा मनात भरतोय. प्रियकराने चुंबन घेतल्यावर ओठांची लाली उतरल्यावर उरतो तसा विस्कटलेल्या रंगाचा असल्याने नजर हटत नाहीये. आपण कि नाही या फुलांची १४ फेब्रुवारीला विक्री करू. त्या पैशातून कुठेतरी एक एकर जमीन विकत घेऊ. त्यात गुलाबच गुलाब लावूयात. त्यांच्या विक्रीतून आपल्याला आणखी जमीन घेता येईल. मग १०० एकरवर आपली गुलाबाची शेती होईल. आपण फुले युरोपात एक्स्स्पोर्ट करू. पुढे पैसे आणि वेळ वाचवण्यासाठी आपल्याला आप्ल्स पर्वतात जमीन घ्यावी लागेल. तिकडे ही आपण गुलाबाची शेती करूयात.
तिथे यशराज फिम्ल्सवाले आपल्याशी संपर्क साधतील. मग आपण बागेतल्या शूटींसाठी करोडो रूपये चार्ज लावू. त्यातून इंग्लंड अमेरीकेत आउटलेट्स उघडता येतील.
झाले मग अजून पैसे. त्यातून मग गुलकंद, रंग असे उप- उद्योग निघतील. मग इतका पैसा होईल कि आपण आल्प्स मधे एक राजवाडा बांधूयात. भारतात हाऊसिंग कंपनी उघडूयात.
त्यातून पुन्हा पैसा आला कि एखाद्या राजकीय पक्षाला फंड्स पुरवून निवडून आणू. मग त्यांचा पीएम आपण म्हणू ते ऐकेल. मग आपण डिफेन्स मधे शिरू. विमाने विकत घेऊ. रणगाडे सप्लाय करू. मात्र या सर्वांना गुलाबीच रंग द्यायचा कारण तो आपल्या गुलाबापासून निर्माण झालेला असेल. पुढे आपण गुलाबी नावाने टेलिफोन कंपनी सुरू करू. नेट फ्री, फोन लाईन्स फ्री असा धमाका करू. मग काय हे क्षेत्रही आपलेच होईल….

मग मग…………………………….”

दुस-या दिवशी तो जागा झाला तेव्हां तिची चिट्ठी होती.

“सॉरी, डिस्टर्ब केल्याबद्दल. मी आपल्या गावच्या अजितदादा टेलिफोन शॉपीच्या भावी मालकाबरोबर पुढची स्वप्ने पाहण्यासाठी जात आहे. तुझी स्वप्ने पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा. जमल्यास लग्नाला ये…… “

तुझी गुलाबी रंगाची सर्व प्रॉडक्ट्स घेऊन ये.गिफ्ट म्हणून मला तेच हवंय. त्यात गुलाब, गुलकंद, रंग आणि जे जे काही तो बनवणार होतास ते सगळं घेऊनच येशील ह्याची काळजी घे. माझ्या होणाऱ्या नवऱ्याला गुलाबांचा गुच्छ तुझ्याच बागेतून आला पाहिजे.

मंदाची चिठ्ठी वाचून अभिलाष विचार करू लागला,

“लग्नात मी टपोऱ्या गुलाबाची फुले असलेला सुंदर बुके घेऊन जाईन. तिथे लग्नाला आलेल्या एखाद्या मुलीला फुलं खुप आवडतील. फुलांबरोबर ती फुले घेऊन येणारा मी सुद्धा तिला आवडेल. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडू. मग तिने मला लग्नासाठी विचारल्यानंतर मीही होकार देईल. मग आम्हाला एक गोड मुलगी होईल. तिच्यासाठी मी सुंदर गुलाबी फ्रॉकआणीन. पण पण तिचं नाव मात्र मी रोझी किंवा गुलाबो नाही ठेवणार……………………………………………………………………………..

तिचं नाव मात्र मंदा असणार. माझ्या वेडापायी माझी होऊ न शकलेली मंदा!!!!! “

अभिलाषची विचारधारा नेहमीप्रमाणे अनियंत्रित वाहत होती आणि एकीकडे चिठठीच्या जवळ ठेवलेल्या मलूल गुलाबाच्या पाकळ्या ओल्या होत होत्या…..........

------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं ते मी इसरलंय Lol
आता कुणी सस्मित ताई म्हणत नाहीये ना बरेच दिवस म्हणुन Happy

धन्स जुईले Happy
पुढचा भाग<<< बघू, सुचलं तर

नाही आवडलं का तुम्हाला डिंपल,
खऱ्या प्रतिसादासाठी धन्यवाद Happy
काही सुधारणा सांगाल का, तुमची मते कळू द्या, म्हणजे तसा विचार करता येईल Wink

किल्ली
आधुनिक शेखचिल्ली मस्त रंगवलाय कथेत
पुलेशु