११९ वर्षांचा वेदनारहित प्रवास

Submitted by हेमंतकुमार on 26 December, 2018 - 04:28

“डोकेदुखी? अंगदुखी? त्यामुळे अगदी बेजार झाला आहात? मग एक अ‍ॅस्पिरीन घ्या अन या त्रासापासून लगेच मुक्ती मिळवा, ढँ ट ढँण... !” यासारख्या अनेक माध्यमांतील जाहिरातींनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या मनावर गारूड केले आहे. मला खातरी आहे की आपल्यातील बहुतेकांनी ही गोळी आयुष्यात कधी ना कधी नक्की घेतली आहे. अ‍ॅस्पिरीनयुक्त अनेक औषधी गोळ्या औषध-दुकानात कुणालाही अगदी सहज (ओव्हर द काउंटर) मिळतात. अ‍ॅस्पिरीनचा तात्पुरता वेदनाशामक आणि तापविरोधी गुणधर्म यामुळे रुग्णास त्याने काहीसे बरे वाटते. अ‍ॅस्पिरीन हे आधुनिक वैद्यकाच्या इतिहासातील एक मूलभूत आणि आश्चर्यकारक औषध (wonder drug) आहे. आज त्याच्या गुणधर्माची कित्येक नवी औषधे उपलब्ध असतानाही त्याने बाजारातील आपले स्थान टिकवून ठेवले आहे यात शंका नाही. अंगदुखी व तापाखेरीज हृदयविकार आणि अन्य काही आजारांतही त्याची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. अशा या वलयांकित औषधाचा शोध, त्याचे उपयोग, दुष्परिणाम आणि त्याबद्दलचे नवे संशोधन या सर्वांचा या लेखात आढावा घेत आहे.

अ‍ॅस्पिरीनचे रासायनिक नाव Acetyl salicylic acid असे आहे.

अ‍ॅस्पिरीनचा शोध:
अनेक आजारांचे एक महत्त्वाचे लक्षण असते ते म्हणजे वेदना. तिच्या तीव्रतेनुसार रुग्ण कमी-अधिक अस्वस्थ असतो. त्यामुळे वेदनाशामक औषधांचा शोध ही वैद्यकातील फार प्राचीन गरज होती.
Salicylic acidच्या वेदनाशामक उपयोगाची पहिली नोंद सुमारे ४००० वर्षांपूर्वी सुमेरिअन संस्कृतीत झालेली आढळते. हे आम्ल अनेक झाडांच्या खोडात असते. त्यात प्रामुख्याने ‘विलो’ या झाडाचा समावेश आहे. हेच ते झाड, ज्यापासून क्रिकेटची बॅट बनवली जाते. पुढे चिनी व ग्रीक संस्कृतीमध्येही वेदना व तापनिवारणासाठी त्याचा वापर केला जाई.

* विलोचे झाड (चित्र):
willo.jpg

त्यानंतरचा आधुनिक वैद्यकाचे पितामह Hippocrates यांनी त्याचा महत्त्वाचा वापर केला. ते रुग्णांना विलो झाडाचे खोड चघळण्यास देत. तसेच स्त्रियांच्या प्रसूतिवेदना कमी होण्यासाठी या खोडापासून केलेला चहा त्यांना पिण्यास देत असत.
नंतर १८व्या शतकाच्या उत्तरार्धात अ‍ॅस्पिरीनचा वापर थंडी वाजून ताप येणाऱ्या रुग्णांवर केला गेला. पुढे एक शतकानंतर विलोच्या खोडाच्या पावडरीचा प्रयोग rheumatismसाठी केला गेला आणि अशा रुग्णांची सांधेदुखी व ताप त्यामुळे कमी झाला.

यापुढील टप्प्यात विलोपासून पिवळ्या रंगाचा एक पदार्थ वेगळा करण्यात यश आले आणि त्याला Salicin हे विलोचे लॅटिन नाव दिले गेले. पुढे Salicin हे शुद्ध स्फटिक स्वरूपात तयार केले गेले आणि मग जर्मनीतील एका कंपनीने Salicylic acidचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले. आता त्याचा रुग्णांसाठी सररास वापर होऊ लागला. या रुग्णांना त्याचा गुण आला खरा, पण त्याचबरोबर खूप उलट्याही होत. हा अर्थातच औषधाचा दुष्परिणाम होता. त्यावर मात करता आली तरच हे औषध रुग्णांसाठी वरदान ठरणार होते.

मग जर्मनीतील ‘बायर’ कंपनीने यात विशेष रस घेतला. त्याकामी Felix Hoffmann या तंत्रज्ञाची निवड करण्यात आली. खुद्द त्याच्या वडिलांना खूप सांधेदुखीचा त्रास असल्याने त्याने या कामात अगदी जातीने लक्ष घातले. मग खूप विचारांती त्याने Salicylic acid च्या रेणूत एक रासायनिक बदल केला. तो म्हणजे त्यात Acetyl group घालून Acetylsalicylic acid हे नवे रसायन तयार केले. मग या नव्या औषधाचे रुग्णांवर बरेच प्रयोग झाले. आता त्यामुळे उलट्या होण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याचे दिसले. अखेर या औषधाच्या सर्व चाचण्या पूर्ण होऊन मार्च १८९९मध्ये ‘बायर’ने ‘अ‍ॅस्पिरीन’ या व्यापारी नावाने त्याची रीतसर नोंदणी केली. वेदनाशामक औषधांच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण म्हटला पाहिजे!

felix.jpg
(Felix Hoffmann)

या मूलभूत औषधाच्या शोधासाठी अनेकांकडून समांतर संशोधन चालू होते. त्यामुळे हा शोध नक्की कोणी लावला याबाबत काही प्रवाद आहेत.
आता ही कंपनी दवाखान्यांना व रुग्णालयांना अ‍ॅस्पिरीनची पांढरी पावडर पुरवू लागली. ‘अ‍ॅस्पिरीन’ शब्दाची व्युत्पत्ती रोचक आहे:
A = acetyl,
Spiraea हे विलो झाडाच्या गटाचे शास्त्रीय नाव आणि
in हा अंत्य प्रत्यय त्याकाळी औषधी नावांना लावला जाई.

asp bottle.jpg

ही औषधी पावडर आता मोठ्या प्रमाणावर वापरात आली. मात्र रुग्णांना ती पुडीत बांधून देणे हे तसे कटकटीचे वाटे. मग वर्षभरातच कंपनीने अ‍ॅस्पिरीनची गोळी तयार केली. त्यामुळे त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली. किरकोळ अंगदुखीसाठी कुणालाच डॉक्टरकडे जायला नको वाटते. त्या दृष्टीने ही गोळी डॉक्टरांच्या चिठ्ठीविना उपलब्ध होणे आवश्यक होते. मग तिला या औषध नियमातून मुक्त करण्यात आले. १९१५पासून अ‍ॅस्पिरीन हे औषध दुकानात कुणालाही सहज (OTC) मिळू लागले. किंबहुना OTC हा शब्दप्रयोग तेव्हापासून रूढ झाला. त्यानंतर आजतागायत या गोळीने बहुतेक कुटुंबांत औषधांच्या घरगुती बटव्यात स्थान मिळवले आहे.

आता जरा अ‍ॅस्पिरीनचा औषधी गुणधर्म व्यवस्थित समजावून घेऊ. ते मुख्यतः वेदनाशामक आहे आणि काही अंशी तापविरोधी. जेव्हा एखाद्याला जंतुसंसर्ग अथवा कुठलीही इजा होते, तेव्हा शरीरपेशी त्याचा प्रतिकार करतात. या प्रतिकाराला दाह (inflammation) असे म्हणतात. या दाह-प्रक्रियेत पेशींत अनेक रसायने सोडली जातात. त्यांच्यामुळे मग रुग्णास वेदना व ताप ही लक्षणे जाणवतात. ती कमी करण्यासाठी ही दाह-प्रक्रिया नियंत्रित करावी लागते. अ‍ॅस्पिरीन नेमके हेच काम (anti inflammatory)करते. आता सूक्ष्म पातळीवर हे नेमके कसे होते हे जाणून घेणे ही संशोधनातील पुढची पायरी होती. त्या दृष्टीने संशोधकांचे अथक प्रयत्न चालू होते.

ही उकल व्हायला १९७१ साल उजाडावे लागले.

वर उल्लेखिलेल्या पेशींतल्या दाह-प्रक्रियेत पेशींत जी रसायने सोडली जातात, त्यापैकी एक प्रमुख म्हणजे Prostaglandins. त्यांच्यामुळेच वेदना जाणवते. अशा वेळेस जर रुग्णास अ‍ॅस्पिरीन दिले, तर ते या रसायनांच्या निर्मितीत अडथळा आणते. परिणामी दाह कमी होऊन वेदनेपासून आराम मिळतो. अत्यंत मूलभूत स्वरूपाचे हे संशोधन होते. म्हणून कालांतराने त्यासाठी नोबेल परितोषिक दिले गेले.

एव्हाना अ‍ॅस्पिरीन हे वेदनाशामक औषध म्हणून प्रस्थापित झाले होते. तरीही त्यावरील संशोधन अद्याप चालूच होते. त्यातून त्याच्या आणखी एका पैलूचा शोध लागला. हा पूर्णपणे वेगळ्या संदर्भात होता. आपल्या रक्तात बिम्बिका या वैशिष्ट्यपूर्ण पेशी (platelets) असतात. जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा रक्तस्राव होतो आणि थोड्याच वेळात तो थांबवण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेत बिम्बिकांमध्ये Thromboxane हे रसायन तयार होते आणि ते या पेशींना घट्ट एकत्र आणते. एक प्रकारे त्यांचे ‘बूच’ तयार होते आणि ते जखमेला ‘सील’ करते. इथे एक महत्त्वाचा मुद्दा ध्यानात घ्यावा. जेव्हा जखमेतून रक्त वाहते तेव्हाच हे ‘बूच’ तयार झाले पाहिजे. परंतु, या बिम्बिकांची एक गंमत आहे. एरवीही जेव्हा त्या रक्तप्रवाहात असतात, तेव्हासुद्धा त्यांच्यात एकत्र येऊन चिकटण्याचा गुण असतो. जर का हे नेहमीच्या रक्तप्रवाहात होऊ लागले, तर मात्र आफत ओढवेल. कारण आता त्यांची गुठळी तयार झाली तर त्यामुळे रक्तवाहिनीत अडथळा होईल. त्याचे परिणाम अर्थातच गंभीर असतील. अर्थात असे होऊ न देण्याची नैसर्गिक यंत्रणा रक्तवाहिन्यांत असते. त्यांच्या पेशींतून असे एक रसायन सोडले जाते, ज्यामुळे बिम्बिका एकत्र येऊ शकत नाहीत.

काही रुग्णांत मात्र हा नैसर्गिक समतोल बिघडतो आणि बिम्बिका विनाकारण एकत्र येऊन चिकटण्याची प्रक्रिया जास्तच होऊ लागते. परिणामी रक्तवाहिन्यांत गुठळ्या होउन रक्तप्रवाहास अडथळा होतो. जर ही प्रक्रिया कॉरोनरी वाहिनीत झाली, तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. तर मेंदूच्या रक्तवाहिन्यातील अडथळ्याने Strokeचा आजार होतो. अशा रुग्णांवर उपचार करताना बिम्बिका एकत्र येण्याला विरोध करणारी औषधे देतात. त्यामध्ये अ‍ॅस्पिरीनचा समावेश आहे. त्याचे दीर्घकालीन उपचार या रुग्णांसाठी लाभदायी असतात. अ‍ॅस्पिरीनच्या इतिहासातील हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. त्यामुळे आता ते निव्वळ किरकोळ अंगदुखीवरचे औषध न राहता एका ‘वरच्या’ पातळीवरचे औषध म्हणून मान्यता पावले. आता रक्त- गुठळीने होणाऱ्या ह्रदयविकाराच्या आणि मेंदूविकाराच्या रुग्णांसाठी ते प्रतिबंध आणि उपचार अशा दोन्ही आघाड्यांवर सररास वापरले जाते.

हृदयविकाराच्या प्रतिबंधात्मक वापराबद्दल मात्र तज्ज्ञांमध्ये काही मतभेद आहेत. या संदर्भात रुग्णांचे दोन गट पडतात:
१. ज्यांना हा विकार होण्याचा धोका अधिक संभवतो - यात आनुवंशिकता, मधुमेह, रक्तदाब व लठ्ठपणा हे घटक येतात.
२. ज्यांना विकाराचा प्रत्यक्ष एक झटका येऊन गेलेला आहे.

यातील दुसऱ्या गटातील रुग्णांना पुढचा झटका येऊ नये म्हणून अ‍ॅस्पिरीनचा उपयोग बऱ्यापैकी होतो. परंतु, पहिल्या प्रकारच्या रुग्णांना ते झटका न येण्यासाठी कितपत उपयुक्त आहे यावर अलीकडे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. किंबहुना यावर वैद्यक विश्वात खडाजंगी चालू आहे. विशेषतः सत्तरी ओलांडलेल्या लोकांना ते न देण्याची सूचना पुढे आली आहे. एखाद्या औषधाचा प्रतिबंधात्मक वापर करताना त्याच्या दीर्घकाळ वापराने होणाऱ्या दुष्परिणामांकडेही लक्ष द्यावे लागते. तेव्हा अपेक्षित फायदा आणि संभाव्य धोका यांचा तुलनात्मक विचार करून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे रुग्णतपासणीनुसार हा निर्णय वेगवेगळा असतो.
एव्हाना आपण अ‍ॅस्पिरीनची उपयुक्तता पहिली. वैद्यकात त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. पण हेही लक्षात घेतले पाहिजे की ते एक आम्ल आहे आणि त्याचे काही दुष्परिणामदेखील होतात. त्याबद्दल आता माहिती घेऊ.

दुष्परिणाम:
वर आपण पहिले की मूळ Salicylic acid तर जठराम्लता खूपच वाढवायचे. अ‍ॅस्पिरीन ही जरी त्याची सुधारित आवृत्ती असली, तरी त्यानेही काही प्रमाणात जठराम्लता वाढते. त्यामुळे रुग्णास मळमळ व तोंड आंबट होणे हा त्रास कमीअधिक प्रमाणात होतो. काहींना उलट्या होऊ शकतात. अशा रुग्णांना जर अ‍ॅस्पिरीन दीर्घकाळ घ्यावी लागली तर जठराचा वा आतड्यांचा ulcer आणि त्यानंतर रक्तस्रावदेखील होऊ शकतो.
काही लोकांना या औषधाची allergy असू शकते. त्यांना त्यामुळे अंगावर पुरळ वा गांधी उठू शकतात. तर काहींना श्वासनलिका आकुंचनाचा त्रास होतो. त्यामुळे जरी हे औषध OTC मिळणारे असले, तरी ते नेहमी वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे, हे बरे !
विशेषतः पोटाचे अल्सर, गाऊट, यकृताचे आजार आणि रक्तस्राव होणाऱ्या रुग्णांनी अ‍ॅस्पिरीन टाळले पाहिजे. अतिरिक्त मद्यपानानंतर ते घेणे धोक्याचे आहे (hangoverमुळे जे डोके दुखते, त्यावर हा उपाय नाही!).
ज्यांना आधीच दीर्घकालीन मूत्रपिंड विकार आहे त्यांना ते अत्यंत जपून दिले पाहिजे.
लहान मुलांच्या बाबतीत तर ते चुकूनही वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नये. मुलांत विषाणू संसर्गामुळे ‘फ्लू’सारखे आजार वारंवार होतात आणि त्यात तापही येतो. अशा वेळेस अ‍ॅस्पिरीन कटाक्षाने घेऊ नये. अन्यथा त्यातून आजाराची गुंतागुंत वाढते आणि मेंदूस व यकृतास गंभीर इजा होते.
गरोदर स्त्रियांनीदेखील ते दीर्घकाळ अथवा मोठ्या डोसमध्ये घेऊ नये. इथेही वैद्यकीय सल्ला अत्यावश्यक.

अ‍ॅस्पिरीन हे वेदना, ताप आणि विशिष्ट हृदयविकार आणि मेंदूविकार यासाठी वापरले जाणारे औषध म्हणून विसाव्या शतकात चांगलेच रुळले आहे. अन्य काही गंभीर आजारांत त्याचा वापर करता येईल का, यावर चालू शतकाच्या गेल्या दोन दशकांत तुफान संशोधन होत आहे. त्यापैकी दोन महत्त्वाचे आजार म्हणजे कर्करोग आणि अल्झायमर आजार. विशेषतः मोठ्या आतड्याच्या कर्करोगाबाबत खूप संशोधन झाले आहे. त्याचा आढावा आता घेतो.

अ‍ॅस्पिरीन व आतड्याचा कर्करोग:
पन्नाशीनंतर सतावणाऱ्या कर्करोगांत हा एक महत्त्वाचा आणि गंभीर आजार आहे. त्यामुळे त्याच्या प्रतिबंधावर बरेच लक्ष केंद्रित झालेले आहे. या रोगाचा धोका अधिक संभवणाऱ्या लोकांना अ‍ॅस्पिरीन कमी डोसमध्ये दीर्घकाळ दिल्यास रोगप्रतिबंध होऊ शकतो, असे गृहीतक आहे. यासंबंधीचे अनेक प्रयोग जगभरात झाले आहेत. ५०–५९ या वयोगटांतील लोकांना जर १० वर्षे सलग अ‍ॅस्पिरीन दिले, तर रोगप्रतिबंध होऊ शकेल असे काही संशोधकांना वाटते. तसेच प्रत्यक्ष हा रोग झालेल्या रुग्णांना जरी ते देत राहिले, तरी या पूरक उपचाराने त्यांचा जगण्याचा कालावधी वाढू शकेल असेही काहींचे मत आहे.

“कर्करोगावर अ‍ॅस्पिरीन? कसे काय बुवा?” हा प्रश्न सामान्यांना तसा बुचकळ्यात टाकणारा आहे. या संदर्भात ते नक्की कसे काम करते हे अद्याप पुरेसे स्पष्ट झालेले नाही. ती प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. कर्करोगाच्या पेशींचा शरीराच्या प्रतिबंधक यंत्रणेकडूनच नाश करवणे, अशी काहीशी ती क्रिया आहे. अ‍ॅस्पिरीनच्या या उपयुक्ततेबाबत संशोधकांत अद्याप एकवाक्यता नाही. एखादी वैद्यक संघटना त्याचा हिरिरीने पुरस्कार करतेय, तर दुसरी एखादी त्याचा तितकाच विरोध करतेय. सध्या याबाबतचा पुरेसा पुरावा नसल्याने ही स्थिती आहे. तसेच दीर्घकाळ अ‍ॅस्पिरीन दिल्याने आतड्यांत रक्तस्राव होऊ शकतो, हाही मुद्दा दुर्लक्षिता येत नाही. भविष्यातील संशोधन यावर अधिक प्रकाश टाकेल. अ‍ॅस्पिरीनच्या सखोल आणि व्यापक संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय अ‍ॅस्पिरीन ‘फाउंडेशन’ची स्थापना झालेली आहे. यावरून अ‍ॅस्पिरीनचे वैद्यकातील महत्त्व अधोरेखित होते.

‘विलो’चे खोड चघळण्यापासून या औषधाचा ऐतिहासिक प्रवास सुरू झाला. आज अ‍ॅस्पिरीन विविध प्रकारच्या गोळ्यांच्या आकर्षक रूपात उपलब्ध आहे. अचंबित करणारे हे वैविध्यपूर्ण प्रकार असे आहेत -
१. साधी गोळी
२. पाण्यात लगेच विरघळणारी
३. चघळण्याची गोळी व च्युइंग गम
४. लेपित (coated) गोळी
५. शरीरात हळूहळू विघटित होणारी आणि
६. दीर्घकाळ प्रभाव टिकणारी कॅप्सूल
७. गुदद्वारात ठेवायची गोळी (suppository)

Aspirin tab.jpg

रुग्णाचा आजार आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार यांपैकी योग्य त्या गोळीची निवड केली जाते. अर्थातच आजारानुसार तिचे ‘डोस’ वेगवेगळे असतात. गोळ्यांचे काही प्रकार हे OTC मिळतात, तर अन्य काहींसाठी (नियमानुसार) डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक असते. हे औषध दीर्घकाळ स्वतःच्या मर्जीने कधीही घेऊ नये. त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यकच. तसेच हृदयविकाराच्या व मेंदूविकाराच्या ज्या रुग्णांना अ‍ॅस्पिरीनचे उपचार चालू आहेत, त्यांनी कधीही स्वतःच्या मनाने ते बंद करू नयेत. गोळी थांबवणे अथवा डोसचे फेरफार करणे हा सर्वस्वी डॉक्टरांचा अधिकार आहे.
अ‍ॅस्पिरीन हे Salicylates या कुळातील औषध आहे. त्याच प्रकारातील एक रसायन हे विविध वेदनाशामक मलमांच्या रूपात उपलब्ध असते. अंगदुखी, सांधेदुखी इ.साठी बरेचदा अशी मलमे त्वचेवरून चोळण्यासाठी वापरतात.

......
एक सामान्य रसायन असलेले अ‍ॅस्पिरीन हे आज कुठल्याही स्वामित्वहक्कापासून मुक्त आणि सहज उपलब्ध असलेले औषध आहे. पुन्हा बऱ्यापैकी स्वस्त आणि जगभरात उपलब्ध. वर उल्लेखिलेल्या गंभीर आजारांत जर ते भविष्यात खरोखर उपयुक्त ठरले, तर ते आपल्यासाठी वरदान असेल. अनेक संशोधक त्या बाबतीत आशावादी आहेत. या पिटुकल्या गोळीचा एखाद्या जादूच्या कांडीप्रमाणे अनेक आजारांत उपयोग व्हावा असे त्यांना मनोमन वाटते. अशा या बहुमूल्य संशोधनास मी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो.
**********************************************************************************************
लेखातील सर्व चित्रे जालावरून साभार.
(मिपा : दिवाळी अंक, २०१८ मध्ये पूर्वप्रकाशित)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहज माहिती म्हणून .......

पाश्चिमात्य जगात औषधांमुळे होणाऱ्या विषबाधेत (drug overdose) पॅरासिटामॉल (= Crocin, Tylenol) चा प्रथम क्रमांक आहे.
औषधाची सहज उपलब्धता असे प्रश्न निर्माण करते.

उत्तम माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.

वर कोणी लिहिल्याप्रमाणे, थोडं शुगर फ्री पावडर्स आणि पिल्स बद्दल पण लिहा ना. माहीत करून घ्यायची उत्सुकता आहे कारण वेट कंट्रोल साठी नॉर्मल शुगर स्कीप करून शुगर फ्री वापरताना त्याचे भलतेच काही दुष्परिणाम असतील तर वेळीच थांबता येईल.

पॅरासिटामॉल सुद्धा काळजीपूर्वक वापरली नाही तर ऍस्पिरिन/ इतर NSAID पेनकिलर्स एवढी दुष्परिणामकारक असु शकते. इथे वाचा

“Paracetamol can actually be a very dangerous drug,” says Dr John Dickson, who retired from general practice in Northallerton, North Yorkshire, last year. “It can cause kidney and liver problems, and causes as much gastrointestinal bleeding as the NSAIDs.”

मला याचा चांगलाच अनुभव आला आहे. माझी GERD ची (hyper acidity, gastritis, acid reflux, अन्ननलिका ठणकणे) महिनाभराची ट्रीटमेंट सुरू झाली होती. २० दिवसात मला खूपच आराम वाटला होता. मी मधूनच थोडेसे तिखटही खाऊ लागलो होतो. साधारण २५ दिवसांनी मला Viral Polyarthritis / Chikungunya झाला. ताप १०२-१०३, सांधेदुखी. डॉक्टरांनी पॅरासीटामॉल, पेनकिलर आणि अँटिबायोटिक लिहून दिले. मी म्हणालो पेनकिलर अगदीच गरज पडली तर घेईन पण अँटीबायोटिक टाळता येतील का? आणि माझी GERD कंडिशन सांगितली. डॉक्टर म्हणाले ठीक आहे, हायजीन, स्वच्छता काटेकोरपणे पाळा दोन दिवसांनी भेटा नंतर बघु अँटिबायोटिक बद्दल. तर चार दिवस मी फक्त पॅरासीटामॉल घेतल्या, पाहिले तीन दिवस ताप उतरत नव्हता तेव्हा दिवसातून ३ गोळ्या आणि चौथ्या दिवशी ताप उतरून परत आला म्हणून १ /२ गोळ्या. या गोळ्या मी जमेल तेवढे खाऊन मगच घेतल्या होत्या.
तरी या चार दिवसांच्या पॅरासिटामॉलने माझ्या इतक्या दिवसांच्या GERD च्या ट्रीटमेंटची पूर्ण वाट लावली,परिस्थिती जैसे थे.
ट्रीटमेंट, कडक पथ्ये अजून महिना दीड महिना लांबली.

मीरा, धन्यवाद. सूचनेची नोंद घेत आहे.

मानव, सहमत. तुम्ही बेकार अनुभव घेतलात. म्हणूनच या लेखात खालील वाक्य अधोरेखित केले आहे:

त्यामुळे जरी हे औषध OTC मिळणारे असले, तरी ते नेहमी वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे, हे बरे !

मला एक शंका आहे.

या लेखात विलोच्या झाडापासून क्रिकेटची बॅट करतात असा उल्लेख मी केलेला आहे. सध्या अशी बॅट खरोखर या झाडापासून करतात की अन्य प्रकारे?

क्रिकेटप्रेमींनी माहिती द्यावी .

आमच्या घरातले ज्येना रोज एक चाॅकलेट खावं तश्या क्रोसीनच्या गोळ्या खातात. >>>> हो निधी,आमच्या घरच्या ज्ये.ना अशाच निमहकीम आहेत.आई स्वतः औषधें सुचवते.अर्थात मलाच.

छान माहितीपूर्ण लेख! आमच्या कंपनीच्या मेडिकलमध्ये पूर्वी 'हर रोग पे अक्सीर इलाज' म्हणून APC ची पावडर मिळायची ते आठवले.

'हर रोग पे अक्सीर इलाज' म्हणून APC ची पावडर मिळायची >>>>+1
खरे आहे. त्याकाळी आपल्या बऱ्याच सरकारी दवाखान्यात अशी अवस्था होती.

नवे संशोधन:

साध्या वाटणाऱ्या पण बहुगुणी ऍस्पिरीनवरचे जागतिक संशोधन सतत चालू आहे. अलीकडे सुमारे दीड लाख रुग्णांवर त्याचे प्रयोग करून असे निष्कर्ष हाती आले आहेत:

१. पचनसंस्थेच्या ( विशेषतः मोठे आतडे) कर्करोगात जर ऍस्पिरीनचे पूरक उपचार चालू असतील, तर या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होते.

२. तीव्र डोकेदुखीच्या (migraine) रुग्णांना देखील या औषधाचा उपयोग होतो. या आजाराचे वारंवार attacks कमी करण्यातही ऍस्पिरीनचा चांगला उपयोग होत आहे.

उपयुक्त माहिती. मात्र वरील गोष्टी anyibiotics ना सुध्दा लागू होतात. एक सर्वसाधारण लक्षात आलेली गोष्ट अशी की, ज्या कुटुंबात कोणी medical background चे नाही तिथे अॅस्प्रिन पर्यंत या गोष्टी मर्यादित राहतात. मात्र अर्धवट वैद्यकिय ज्ञान असलेले लोक ज्या घरात आहेत ते आपल्या घरातील लोकांवर आपल्या 'ज्ञानाचे' प्रयोग करतात ही गोष्ट जास्त धोकादायक आहे.उदा. एखादा फार्मसी क्षेत्रातला माणूस असेल तर ' डाॅ. तरी काय सांगणार आहे वेगळे? मला माहिती आहे ना.मी सांगतो त्या गोळ्या घे.एका दिवसात बरा/बरी होशील.' असे म्हणून लिमलेटच्या गोळ्यांसारखी azithromycin ची औषधे/गोळ्या अगदी लहान मुलांनाही हव्या त्या डोसमध्ये दिली जातात. वर एखाद्या कुटुंबातील व्यक्तीने आक्षेप घेतलाच तर 'मी' सांगतोय त्यावर विश्वास नाही,मग जा डाॅ. कडे आणि घालवा पैसै. करा स्वतःचे समाधान! ' असे ईमोशनल ब्लॅकमेलिंग ठरलेले. अशा घरातील लोकांचे आरोग्य अक्षरशः वेठीस धरलेले असते. बरीच antibiotics अगदी सहज मेडिकल शाॅप मध्ये मिळतात.

Cuty,
चांगला प्रतिसाद. पूर्ण सहमत आहे .

@cuty
एकदम बरोबर

आमच्या माहितीतील केमिस्टने तर रक्तदाबाच्या रुग्णाला डोकं दुखतंय म्हणून रक्तदाबाचं औषधही दिलं होतं. सुदैवाने ते होमिओपॅथिक डॉस मध्ये असल्याने फारसा फरक पडला नाही.

जवळच्या केमिस्टने (मारवाडी आहे) तर केवळ स्त्रीरोग तज्ज्ञाची फी द्यायला नको म्हणून चार वेळेस बायकोला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या. चौथ्या वेळेस तिच्या ओटीपोटात चार ठिकाणी पू (abscess) झाला होता आणि म्हणून तिला भरपूर ताप आला होता. त्या साठी स्त्रीरोग तज्ज्ञाने सोनोग्राफीसाठी माझ्याकडे पाठवले होते.
मी त्याला विचारले तर हा दीड शहाणा तोंड वर करून म्हणाला मागच्या तीन वेळेस काहीही झालं नव्हतं. मी संतापाने त्याला म्हणालो कि तुम्ही तुमच्या बायकोच्या जीवाशी खेळता आहात.बायको हताश चेहऱ्याने माझ्याकडे पाहत होती.
पण त्याला कुठलाही खेद किंवा खंत नव्हती.

हे बहुगुणी औषध सध्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. सध्या जगभर कोविडने घातलेला धुमाकूळ आपण जाणतोच.

अस्पिरीनचे पुढील गुणधर्म सध्या लक्षात आलेले आहेत:

१. विषाणूची पेशींमधली वाढ रोखणे, आणि
२. विषाणूमुळे फुफ्फुसांना होणारी इजा कमी करणे.

त्या दृष्टीने अधिकृत रुग्णप्रयोग चालू झालेले आहेत. पुढील संशोधनाअंती यावर अधिक माहिती मिळेल.

उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचे योग्य ते औषध उपचार चालू असतात. अशा रुग्णांनी जर वारंवार ऍस्पिरिन किंवा अन्य वेदनाशामक औषधे घेतली तर या गोळ्यांमुळे रक्तदाबाच्या नियंत्रणात अडथळा निर्माण होतो.
म्हणूनच ऍस्पिरिन सारख्या गोळ्या वारंवार घेण्याची सवय लावू नये.

Felix Hoffmann यांनी शुद्ध स्वरूपातील ऍस्पिरिन प्रथम तयार केले तो दिवस होता 10 ऑगस्ट 1897. सध्या या वैज्ञानिक शोधाचे 125वे वर्ष चालू आहे. यानिमित्ताने ऍस्पिरिन संदर्भात झालेले काही संशोधन आणि तज्ञांची मते वाचनात आली.

१. अलीकडे अस्पिरिनचा वापर मायग्रेनच्या रुग्णांसाठी ही केला जातो. युरोपमध्ये यासाठी या औषधाचे इंजेक्शन-स्वरूप सुद्धा उपलब्ध आहे.
२. घशाचा दाह झाला असताना ऍस्पिरिनच्या गुळण्या करून आराम पडतो. असे प्रयोग वैयक्तिक पातळीवर झालेले आहेत.

३. हे औषध म्हणजे एक प्रकारची दुधारी तलवार आहे. म्हणून त्याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य त्या कालावधीसाठीच केला जावा.
४. किंबहुना डॉक्टरांच्या चिट्ठीनुसारच ते मिळावे असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Pages