श्री वसंत गावंड - घरा घरात पोहोचलेला कलाकार

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 December, 2018 - 02:54

घाव सोसूनच एखादी कलाकृती जन्माला येते, घाव बसत असताना, चटके खात असतानाच ती सुबक होत असते. घडवणाराही योग्य असला की कलाकृती कशी सुबक सुंदर बनते व कलाकृती तयार झाली की ती जनमानसांत डोळ्यांत भरते, सुंदर दिसू लागते असेच काहीसे घडले गेलेले श्री वसंत लडग्या गावंड ह्या उरण - कुंभारवाडा येथील चित्रशिल्पकारा विषयी माहिती करून घेऊया.

आपण रोजच्या व्यवहारात चलनी नाणी व नोटा पाहत असतो. नोटा व नाण्यांवरची चित्रशिल्पे आपले लक्ष वेधून घेत असतात. जुन्या पाचशेच्या नोटेचं डिझाइन, विशेष स्मरणार्थ नाणी व चलनी नाणी ही श्री वसंत गावंड या अस्सल महाराष्ट्रीयन, आगरी जातीतील मराठी माणसाने बनवली आहेत ही फार अभिमानाची गोष्ट आहे.

श्री वसंत लडग्या गावंड यांचे बालपण उरण मधील आवरा व करंजा या दोन गावी खडतर परिस्थितीत गेले. ब्रिटिश काळी काही दुर्गम खेड्यांमध्ये आगरी समाजातील कुटुंबे दारूने व्यसनाधीन झाली होती त्यात महिला व लहान मुलांचाही समावेश होता. रोजीरोटीचे साधन म्हणून श्री वसंत गावंड यांच्या वडिलांची आवरे व करंजा गावात त्यावेळी दारूची दुकाने होती. श्री वसंत गावंड यांच्या आईला दारूबद्दल चीड होती पण भवतालच्या परिस्थितीमुळे श्री वसंत गावंड यांना काय चूक काय बरोबर हे समजायचं वय नसतानाच बालपणात दारूचे व्यसन जळवांसारखे चिकटले. भारताला स्वातंत्र्य मिळून दारूबंदी लागू झाली आणि गावंड कुटुंबांची रोजीरोटीची दारूची दुकाने बंद झाली. त्यानंतर सन १९५१ साली गावंड कुटुंब उरणमधील आवरे गावात स्थायिक झाले. श्री वसंत यांचे आई वडील त्यावेळी तिसरी-चौथी इयत्ता शिकले होते. अत्यंत हलाखीत दिवस चालू होते पण ह्या ही परिस्थितीत शिक्षणाचे महत्त्व व आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे हे विशेषकरून आईला वाटत असल्याने श्री वसंत यांच्या आईवडीलांनी त्यांना पहिलीच्या वर्गात दाखल केले. परंतु श्री वसंत यांचे काही शिक्षणात लक्ष लागत नसे. कोवळ्या वयात लागलेले दारूचे व्यसन त्यांची साथ सोडत नव्हते. ते शाळेतही दारू पिऊन जात. इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण त्यांनी दारूच्या व्यसनात झिंगतच घेतले. चौथी इयत्तेत मात्र त्यांच्या समोर गणपत जाखू म्हात्रे नावाचे शिक्षक दत्त म्हणून ठाकले आणि श्री वसंत यांच्या आयुष्याच्या प्रगतीच्या पाया भरणीला जणू सुरुवात झाली. श्री गणपत म्हात्रे गुरुजींनी एक दिवस वसंत दारू पिऊन आलाय हे कळल्यावर त्याला बेदम मारले व वडिलानं बोलावून त्यांचीही कान उघडाने करून यापुढे दारू प्यायलात तर पोलिसांत देईन अशी धमकी दिली. ह्या धमकीमुळे श्री वसंत यांनी त्यांना चिकटलेले दारूचे व्यसन कायमचे झटकून टाकले व शिक्षणात लक्ष दिले. सातवी पास झाल्यावर श्री वसंत यांना शिक्षकाची नोकरी मिळू शकली असती परंतू मुलाने अजून शिकावे अशी त्यांच्या आईवडीलांची इच्छा होती. तेव्हा उरण पूर्व भागात माध्यमिक शिक्षणाची सोय तिथे नव्हती. पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग असतो. एक दिवस एन.आय. हायस्कूल उरण चे प्रिन्सिपल श्री किनरे सर हे भर चिखलातून वाट तुडवत गावंड कुटुंबाकडे आले आणि त्यांनी वसंत यांना व आवरे, पिरकोण, गोवठणे गावातीलही काही मुलांना शिक्षणासाठी एन.आय. हायस्कुलमध्ये भरती करून घेतले. येथे श्री वसंत यांनी एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

श्री वसंत यांना उत्तम चित्रकला येत होती हे त्यांची आई जाणत होती. त्यांच्यातील कलाकार त्यांच्या आईने अचूक टिपला होता. त्यामुळे डॉक्टर, वकील होण्यापेक्षा आपल्या मुलाने ड्रॉईंग कॉलेजला जावे अशी आईची असलेली प्रबळ इच्छा पुढे फळाला आली. हे शिक्षण कुठे मिळेल ह्याचा शोध श्री वसंत घेत होते. त्याच दरम्यान जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. श्री गणेश लक्ष्मण पाटील हे एक आगरी समाज नेते काँग्रेसच्या प्रचारासाठी गावात आले असताना त्यांना वसंत ह्या शिक्षणासाठी रखडलेल्या कलाकाराची ओळख झाली. श्री गणेश पाटील यांची शैक्षणिक क्षेत्रातील बर्‍याच लोकांची मैत्री होती. श्री. बा.वा. फाटक हे जि.पि.ओ. मध्ये अधिकारी होते. त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टस मध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी श्री वसंत यांना नेले पण बॅचेस पूर्ण झाल्याने त्यांना तिथे अ‍ॅडमिशन मिळू शकले नाही. परंतू श्री वसंत यांच्यातील कलेला योग्य न्याय मिळावा म्हणून तेथील डीन श्री अडारकर यांनी श्री वसंत यांना माधव सातवडेकर आणि बोरकर सर यांच्या इंडियन आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये कमर्शिअल आर्ट साठी अ‍ॅडमिशन मिळवून दिले आणि अशा प्रकारे श्री वसंत यांचे सन १९६२ सालात कॉलेजमध्ये पदार्पण झाले. श्री वसंत चिकाटीने शिक्षण घेत होते पण दोन वर्षातच त्यांना प्रचंड आघात सोसावा लागला तो म्हणजे त्यांच्या आईच्या मृत्यूचा.१९६४ साली श्री वसंत यांची आई वारली आणि त्यांची मानसिक शोचनीय अवस्था झाली. ह्या धक्क्यामुळे ते दोन वर्षे नापास झाले आईचा अत्यंत लळा त्यांना होता. आईच त्यांचे पालन पोषण करायची त्यामुळे त्यांचे अत्यंत हाल झाले. काही दिवस त्यांनी भिकार्‍यांच्या खानावळीत जेवण जेवून दिवस काढले. आता त्यांनी कमर्शिअल आर्ट सोडून फाईन आर्टला ३ वर्षे शिक्षण घेतले. परंतू जाणकारांनी पटवून दिले की फाईन आर्टचा पुढील आयुष्यात नोकरीसाठी उपयोग नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा जे.जे. स्कूल ऑफ आर्टसला कमर्शिअल आर्ट साठी अ‍ॅडमिशन घेतले व त्यांच्या मुळातच चांगल्या असणार्‍या चित्रकलेमुळे सन १९७१ ला ते डिप्लोमा पास झाले.

१)

१९७४ साली वर्तमानपत्रात पत्रात आलेली जाहीरात पाहून त्यांनी मुंबई मिंट मधील ज्युनियर आर्टिस्ट एन्ग्रेव्हर पदासाठी अर्ज केला. त्यांना तिथे दीड वर्षे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांचे उल्लेखनीय काम पाहून अल्पावधीतच श्री वसंत गावंड यांना आर्टिस्ट एन्ग्रेव्हरपदी बढती मिळाली. हे पद खूपच कमी लोकांच्या पदरी पडत असल्याने ते खूप मानाचे समजले जाते.

हे सगळे शिक्षण व संधी ही त्यांना मिळालेले कुटुंबातील शिक्षक, ग्रामसेवक यांच्या मदतीच्या साहाय्याने पुरे करता आले. आपआपल्या परीने या सर्वांनी श्री वसंत यांच्या गुणांना योग्य न्याय मिळावा म्हणून आर्थिक मदतही केली. याबद्दल श्री वसंत गावंड कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच ते सी.आर.ए. उमरोडकर यांच्या स्टुडिओमध्ये असिस्टंट आर्टिस्ट म्हणून पार्टटाइम जॉब करत होते.

जरी ते अधिकारी झाले होते तरी बरेचसे काम त्यांना माहीत नव्हते. या क्षेत्रातील जाणकार मार्गदर्शन करायला तयार नव्हते. पण खडतर परिश्रम आणि जिद्दीने श्री वसंत यांनी ते एकलव्याच्या जिद्दीने आत्मसात केले व भारत सरकारच्या चलनी नाण्यांचे अप्रतिम डिझाइन्स ते बनवू लागले.
२)

३)

४)

५)

६)

७)

८)

सन १९८२ ला झालेल्या नवव्या एशियन गेम्स (एशियाड) साठी श्री वसंत गावंड यांनी इतकी अप्रतिम स्पर्धात्मक आणि स्मरणार्थ मेडल्स व नाणी बनवली ती अप्पू एशियाडची नाणी व मेडल्स प्रसिद्ध झाली व त्याबद्दल भारत सरकार तर्फे त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सन १९८४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यांच्या स्मरणार्थ सरकारच्या आदेशानुसार स्मरणार्थ आणि चलनी नाणी काढण्यात आली. ह्या मॉडेलसाठी शिल्पकाम प्रचलित शिल्पकाराला दिले होते पण ते प्रॉडक्शन साठी चालले नाही. फक्त श्री गावंड यांनी तयार केलेल्या नाण्याचे अचूक, अभ्यासपूर्ण व सुबक इंदिरा गांधींचे शिल्प स्वीकृत झाले. नाण्यांच्या अचूक डिझाइन तंत्राबद्दलची माहिती सन्माननीय श्री मेस्त्री साहेब व काते साहेब यांच्याकडून मिळाली ही जणू मोलाची देणगीच त्यांना मिळाली होती त्याचा त्यांना पुढील आयुष्यात खूप उपयोग झाला.

स्व. पंडित जवाहरलाल नेहरू, स्व. राजीव गांधी, स्व. अरविंद घोष, छत्रपती शिवाजी महाराज, भारत छोडो आंदोलन, स्वातंत्र्याची ५० वर्षे आणि स्व. जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमा हुबेहूब प्रतिमा श्री वसंत गावंड यांनी चलनी नाण्यावर आणल्यामुळे मिंट या संस्थेला जागतिक स्तरावर गौरविण्यात आले. ह्या चित्रशिल्पकलेसाठी उरण मधील आगरी समाजातील व्यक्तीला म्हणजे श्री वसंत गावंड यांना भारत सरकारची पुरस्कार (अ‍ॅवॉर्ड) मिळाले ही बाब किती गौरवास्पद आहे. त्यांनी १७ प्रकारची चलनी नाणी बनवली. या कलेबद्दल श्री वसंत गावंड यांना वेगवेगळे १५ देशपातळीवरील पुरस्कार मिळाले.

श्री वसंत गावंड सांगतात की डिझाइन बनवताना कलाकाराला अचूकतेचं भान ठेवावं लागत. ज्या व्यक्तीचे शिल्प काढतो त्याचं हुबेहूब स्वभाव वैशिष्ट्य त्या डिझाइनमध्ये उतरणे गरजेच असत. प्रत्येकाच्या प्रतिमेनुसार, स्वभाव वैशिष्ट्या नुसार विचार करून ते नाण्याला फॉन्ट देत. डिझाइन, स्कल्पचर (थ्रीडी), मास्टर, सिट पंचेस, डाइज यांच्या तंत्रामध्ये ते अतिशय निष्णात होते. ब्रिटिश साम्राज्य गेल्यानंतर बरीच वर्षे म्हणजे ६० व्या दशका पर्यंत हिंदुस्तानी नाण्यांच्या डिझाइन्स व फिनिशिंग खास नव्हते याची कल्पना त्यांना देण्यात आली होती. मग त्यांनी ब्रिटिशकालीन नाण्यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यावरून खुपसे बदल करून अप्रतिम नाणी तयार केली. आताचे कित्येक क्वाईन कलेक्टर विचारात आहेत की पूर्वीसारख्या आता अशा डिझाइन्स का उतरत नाहीत.

९)

श्री वसंत गावंड हे १९७४ साली काँग्रेसचे प्रसिद्ध पुढारी श्री. श्रीनिवास पाटील यांची कन्या कु. शकुंतला हिच्याबरोबर विवाहबद्ध झाले व त्यांच्या आयुष्यात सुखाची बरसात झाली. सौ. शकुंतला ह्या एन.ए.डी. नेव्हल हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करत होत्या. त्यांना एक मानसी नावाचे कन्यारत्न आहे. ती विवाहित असून तिनेही वडिलांच्या कलेचा वारसा चालू ठेवला आहे. ती एका ड्रॉइंग संस्थेमध्ये प्रोफेसर आहे. तिघांनाही वाचन, संगीताची आवड आहे.

श्री वसंत गावंड २००२ साली निवृत्त झाले. श्री वसंत गावंड यांना आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांच्यातील कलाकाराला ओळखून त्यांना अनेक व्यक्तींनी मदतीचा हात दिला व त्या मदतीचे श्री वसंत यांनी सोने केले. परंतू त्यांनी स्वतःचा कधीच प्रचार केला नाही. त्यामुळे आपल्यात, महाराष्ट्रात - उरणमध्ये, आगरी समाजात इतका महान प्रोफेशनल कलाकार आहे ह्याबद्दल त्यांची मुलाखत घेतानाच प्रचंड गर्व वाटला. वास्तविक त्यांच्या चित्रशिल्प कलेचे प्रदर्शन मुंबईत भरणार होते परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे.

तर असा हा ज्याची कला घराघरात पोहोचलेली आहे असा महाराष्ट्रीयन, उरण मधील आगरी समाजात लपलेला तारा श्री वसंत लडग्या गावंड, भारतातील पहिला महाराष्ट्रीयन मिंट इन्ग्रेव्हरआर्टिस्ट असलेला हा आगरी सुपुत्र उरणवासीयांना, आगरी समाजाला आणि मराठी माणसाला उर भरून अभिमान वाटावा असे ह्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.

प्राजक्ता म्हात्रे

प्राजक्ता म्हात्रे

वरील लेखन अग्रसेन दिवाळी अंक २०१८ मध्ये व्यक्तिविशेष सदराखाली प्रकाशित झाला आहे.

हाच लेख ब्लॉगवर पहा - https://prajaktamhatretarangmaniche.blogspot.com/2018/11/blog-post.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर ओळख
अशा महान पण अप्रसिद्ध कलाकाराला सगळ्यांसमोर आणण्याचे मोठेच काम केलेत त्या बद्दल धन्यवाद

अशा महान पण अप्रसिद्ध कलाकाराला सगळ्यांसमोर आणण्याचे मोठेच काम केलेत त्या बद्दल धन्यवाद>>>>>>>>>>+१

खूपच छान. जागु , श्री वसंत गावंडांची मुलाखत आवडली. विशेषतः त्यांच्या आईचे पण कौतुक, की ज्या माऊलीने आपल्या मुलामधला कलाकार ओळखुन त्याच्या आवडीला वाव देऊन , मुलाचे आयुष्य घडवले. दंडवत तिला पण ! धन्यवाद गं मुलाखतीबद्दल.

खूप सुंदर ओळख
अशा महान पण अप्रसिद्ध कलाकाराला सगळ्यांसमोर आणण्याचे मोठेच काम केलेत त्या बद्दल धन्यवाद>>>>+11

खूप सुंदर ओळख
अशा महान पण अप्रसिद्ध कलाकाराला सगळ्यांसमोर आणण्याचे मोठेच काम केलेत त्या बद्दल धन्यवाद >> +११

सुंदर ओळख!
>>अशा महान पण अप्रसिद्ध कलाकाराला सगळ्यांसमोर आणण्याचे मोठेच काम केलेत त्या बद्दल धन्यवाद >> +१

सुंदर ओळख!
>>अशा महान पण अप्रसिद्ध कलाकाराला सगळ्यांसमोर आणण्याचे मोठेच काम केलेत त्या बद्दल धन्यवाद >> +१

छान लिहिलय ग.. एकदम वेगळी माहिती मिळाली. तुझा प्रत्येक लेख माहितीपूर्णच असतो. आणि खूप सकारात्मक..

अशा महान पण अप्रसिद्ध कलाकाराला सगळ्यांसमोर आणण्याचे मोठेच काम केलेत त्या बद्दल धन्यवाद >> +१
खूपच अभिमानास्पद आहे ही गोष्ट!

कसलं भारी आहे हे _/\_
आम्ही असली वेगळी चित्र असलेली नाणी जमा करून ठेवतो.
पहिल्या चित्रात कोणकोण आहे ती नावं दिली असती तर बरे झाले असते.

सगळ्या सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

खूप सुंदर ओळख
अशा महान पण अप्रसिद्ध कलाकाराला सगळ्यांसमोर आणण्याचे मोठेच काम केलेत त्या बद्दल धन्यवाद >>>>+999 Happy

हटकून केलेला आणि पदोपदी अधोरेखित केलेला जातीचा उल्लेख सोडला तर लेख नेहमीप्रमाणे उत्तम.

छान ओळख !
अशा महान पण अप्रसिद्ध कलाकाराला सगळ्यांसमोर आणण्याचे मोठेच काम केलेत त्या बद्दल धन्यवाद >>>>+१०००