© संवाद सर्वार्थ साधनम.

Submitted by onlynit26 on 26 December, 2018 - 00:20

© संवाद सर्वार्थ साधनम.

राघव कशीबशी एक चपाती खात ताटावरून उठला.
" अहो, अर्धवट नाष्टा का सोडताय? "
त्याने घड्याळाकडे बोट करत आपली बॅग पाठीला लावली. त्याने ताटात सोडलेली चपाती तिने त्याच्या दुपारच्या डब्यात भरली.
" यातली एकही चपाती परत आणायची नाहीये, हल्ली तुमचे खाण्याकडे लक्ष नाहीये. कामाचे टेंशन घेवून काम कसे करता येईल?" तिच्या बडबडीकडे लक्ष न देता त्याने पायात चप्पल सराकावून सायकलवर टांग टाकली. कावेरी मात्र काळजीने उंबरठ्यावर उभे राहून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली.
राघव आणि कावेरीचे वर्षापूर्वीच लग्न झाले होते. जन्माने अनाथ कावेरी खऱ्या अर्थाने एका कुटुंबात दाखल झाली होती. त्या दोघांशिवाय घरात राघवचे बाबा गणपतराव होते. ते करत असलेली पोरीसारखी माया तिला सुखावून जायची. तिही आपला नवरा आणि पित्यासमान सासऱ्याची मनापासून सेवा करायची. तिच्या आयुष्यात असे हे सुखाचे क्षण आलेच होते इतक्यात राघवच्या बाबांचे अकस्मात निधन झाले. खरंतर त्यांच्या शिवाय राघव आणि कावेरी यांना कोणाचाच आधार नव्हता. कावेरीला परत एकदा पोरकेपणाची झळ लागली. पण राघवने तिला आणि तिने राघवला सावरत ते दोघे संसार रेटू लागले. गणपतरावांच्या निधनानंतर उत्पन्नाचे साधन बंद झाले होते. वडील असताना राघवने नोकरीसाठी खुप प्रयत्न केले होते पण त्याच्या पदरी निराशाच आली होती. गणपतरावांना राघवची चिंता लागून राहायची. त्यांनी त्याचे लग्न करायच्या वेळेला हजारदा विचार केला होता. आपल्या पश्चात आपल्या राघवचे कसे होईल या काळजीने अन्न गोड लागत नसायचे. हल्लीच ते त्याला आपले डबे पोचवण्याचे काम शिकवू लागले होते. त्यासाठी त्याला कामाच्या ठिकाणी घेवून जायचे. थोड्याच दिवसात त्यांने ते काम शिकूनही घेतले. पण कधी कधी होणाऱ्या चुका महागात पडायच्या आणि त्याचा परिणाम सगळ्या डबेवाल्यांना भोगावा लागायचा. त्यावेळी गणपतराव त्याच्या वर चिडायचे, रागावायचे पण त्याच्या पाठीशी फोंडके मामा खंबीरपणे उभे राहायचे.

" राघव आज लयीच उशीर झाला गड्या." सायकलवरून येणाऱ्या राघवला पाहत फोंडके मामा म्हणाले. राघवने काहीच न बोलता सायकल बाजूला लावून सगळे डबे विभागवार लावले.
" राघव , बरं वाटत न्हाई का?" त्याचा पडलेला चेहरा पाहून फोंडके मामा म्हणाले.
" हं " असा हूंकार भरत तो आपले काम करत राहीला.
मामानी त्याच्या अंगाला हात लावून पाहीला. अंगाचा रसरसीतपणा त्यांना जाणवला.
ते काही बोलले नाहीत. कारण तो ऐकणारा नव्हताच.
थोड्याच वेळात कामाची विभागणी झाल्यावर राघव डबे वाटायला निघाला. मामानी मुद्दाम त्याच्याकडे कमी काम दिले होते.
एका वळणावर राघवला थोडे भोवळ आल्या सारखे झाले. त्याला काही कळायच्या आतच तो खाली कोसळला. कोणीतरी तोंडावर पाणी मारले तेव्हा तो सावरला. सगळे डबे खाली पडले होते त्यातला एका डब्याचे झाकन उघडले गेले होते. पण बाकी सर्व डबे सुस्थितीत होते. राघवने देवाचे आभार मानले. नाहीतर आज आपल्या चूकीचा भुर्दंड बाकीच्यांना भोगावा लागला असता. झाकन उघडलेल्या डब्यातून सगळी भाजी रस्त्यावर सांडली होती. राघवला काय करावे कळेना. त्याला समोरच पोळीभाजी केंद्र दिसले. त्याने तिथे भाजीचा डबा धुवून त्यात भाजी घेतली.
तो डबे वाटपाच्या कामाला लागला तेव्हा दुपारचा एक वाजत आला होता. जेवनाची वेळ झाली होती. अंगात त्राण नसून पण तो जिने चढून डबे पोचवत होता. भाजी बदललेला डबा देताना तो समीरच्या डेस्ककडे घुटमळला. पण त्याच्या तोंडातून शब्द फुटले नाहीत. तो तिथून निघाला.

" हॅलो."
" बोल समीर."
" प्रेमा आहे का ? " प्रेमाचा फोन तिच्या आईने उचलला होता.
" नाही, ती सोहमला दूध पाजतेय, मी तुला कॉल करायला सांगते." असे बोलून त्यांनी फोन ठेवला होता.

जेवन संपवल्यावर समीरला थोडं आश्चर्य वाटले. डब्यातील भाजीला प्रेमाच्या हातची चव नव्हती. पोळ्या मात्र घरातीलच होत्या. तो काही न बोलता थोडा फेरफटका मारायला बाहेर निघाला. आनंदला सोबत घ्यावे म्हणून तो त्याच्या डेस्ककडे जावू लागला. आनंद ऑफीसमध्ये वर्षभरापूर्वीच जॉईन झालेला. काहीसा अबोल. कामापुरते बोलणारा. एरव्ही समीर सहीत सारा स्टाफ हास्यविनोद करत असताना हा मात्र आपल्या जागेवर बसून काम करत बसणारा. त्याला कधी कोणी हसताना पाहीले नव्हते. कधी कधी तो समीरसोबत लंचब्रेकमध्ये बाहेर फेरफटका मारायला यायचा. फक्त समीरसोबतच तो आपली सुख दु:खे शेअर करायचा. तो काहीतरी हातचे राखत असावा असे समीरला कायम वाटायचे. त्याच्या नजरेत एक प्रकारचे कारूण्य दिसायचे. आपल्या घरच्यांबद्दल बोलणे तो टाळायचा. समीरही त्याला फोर्स करत नसे. काही जुजबी गोष्टी बोलण्याव्यतिरिक्त तो फारसे काही सांगायचा नाही

समीर त्याच्या डेस्कजवळ पोचत होता. त्याने समोर पाहीले तर आनंद चक्क गालातल्या गालात हसत होता आणि डोळ्यातील आनंदाश्रू तो लपवू शकत नव्हता. असं काय घडले असावे ? समीर त्याच्या जवळ गेला तसा तो सावरला. पण चेहऱ्यावरचे हास्य फुललेलेच होते.
त्याने उठून समीरला मिठी मारली. क्षणभर तो विसरला कि समीर त्याचा बॉस आहे.
" समीर सर, मी आज खुप खुश आहे."
" अरे वा, दिसतेयं ते, पण खुशीचे कारण तरी कळ तर दे." समीर त्याच्या मिठीतून विलग होत म्हणाला.
" हे वाचा." आनंदने एक कागदाचे चिटोरे समीरकडे देत म्हणाला.
समीरने चिठठी उघडली. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्यातला मजकूर वाचून त्याने चेहऱ्यावर उसने हासू आणत चिठ्ठी परत आनंदकडे दिली.
" समीर , खरं सांगू. आज खूप दिवसानी आमच्यात संवाद सुरू झालाय. मी खूप वेळा प्रयत्न करून आम्हा नवरा बायको मध्ये बोलणे होत नव्हते. दोघांचा अहंकार काहीसा आड येत होता. मला हे सगळ असह्य व्हायचे. मी कधी कधी बोलायचा प्रयत्न करायचो पण साक्षी त्याचा वेगळा अर्थ काढायची. मग समेट न होता वादच व्हायचे. पण आज चक्क तिने छोटं का होईना प्रेमपत्र लिहून मला एक सरप्राईज दिलयं. आज संध्याकाळी तिलाही माझ्याकडून मी सरप्राईज देणार आहे." समीर हे सारं ऐकून गार झाला होता. खरं काय ते सांगून तो आनंदचा आनंद हिरावून घेणार नव्हता. फेरफटका रद्द करून तो आपल्या खुर्चीत येऊन बसला.

डोकं सुन्न झाले होते. त्याने परत आपल्या बायकोला फोन लावला.
" हॅलो."
" बोला, आज लवकर शोध लागला वाटते."
" हो, पण तू दिलेली चिठ्ठी आमच्याच ऑफिसमधल्या आनंदच्या डब्यात कशी गेली तेच कळत नाही आणि तू आज डब्यात भाजी काय दिली होतीस?"
" काय सांगतोस? मी तर आज पालक पनीर दिले होते आणि चिठ्ठी तूझ्याच डब्याच्या खाली ठेवली होती."
" पुढची गंमत ऐकशील तर गार होशील."
" काय झालं?"
" अगं, आनंदला वाटतेय ती चिठ्ठी त्याच्या बायकोने पाठवलीय, पठ्ठा जाम खुश झालायं."
" अय्या हे काय आता, तू सांगायचे ना त्याला."
" त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझी त्याला सांगायची हिमंत नाही झाली, किंबहुना त्याच्या चेहऱ्यावर असे हास्य मी कधीच पाहीले नव्हते. ते सर्व तुला मी घरी येऊन सांगतो, अगोदर चिठ्ठी आनंदच्या डब्यात कशी गेली ते शोधतो."
" बरं."
" पण माझं गिफ्ट तयार ठेव."
" आला मोठा शहाणा , गिफ्ट मागायला.. गिफ्ट तर आनंदला मिळालयं ." प्रेमाच्या उत्तराने समीर सुखावला.
" बरं डिअर." असे बोलून त्याने फोनचा रिसीव्हर खाली ठेवला.

प्रेमाच्या एका वाक्याने समीरच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. खरचं गिफ्ट तर आनंदला मिळाले होते. समीर आणि प्रेमाने सुरू केलेल्या खेळाने आज वेगळीच कलाटणी घेतली होती. समीर आणि प्रेमा यांच्यातील संवाद त्यांच्या लग्नाला पाच वर्षे होऊन पण कधी थांबला नव्हता कि शब्द अपूरे पडत नव्हते. भांडणे त्यांचीही व्हायची पण अबोला एक दिवसाच्या वर टिकत नव्हता. त्यांच्यात अबोला आला कि ते घालवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत. त्यावेळी अहंकाराला ही थोडंस लांबच ठेवत. शिवाय लग्न झाल्यापासून ते दोघे एक खेळ खेळत आले होते. आठवड्याला एका विशिष्ट दिवशी फक्त महीन्यातील चार दिवस उभयंतापैकी एकाने आपल्या साथीदाराला एक प्रेमपत्र, कविता किंवा चारोळी लिहायची आणि तो कागद साथीदाराच्या वस्तूमध्येच लपवायचा. मग ती चिठ्ठी साथीदाराला सापडली तर चिठ्ठी लिहणाऱ्याने त्याला एक कोणतेही गिफ्ट द्यायचे. नाही सापडली नाहीतर दुसऱ्याने गिफ्ट द्यायचे. हा खेळ समीर आणि प्रेमा आळीपाळीने खेळत. पूरा एक महीना एकाला हा खेळ असायचा. या महीन्यात चिठ्ठी लिहण्याचे काम प्रेमा करत होती आणि तिने समीरला चिठ्ठी लिहून डब्याच्या तळाला ठेवली होती. आजही समीर सकाळपासून चिठ्ठी शोधत होता. प्रयत्न करूनही त्याला ती सापडली नव्हती.

राघवने समीरला हात लावला. समीर तंद्रीतून बाहेर आला.
" साहेब डबा ?"
त्याने डबा राघवच्या हातात दिला.
" थांब, थांब जरा. आज डब्यातील भाजी बदलली कशी?"
असे समीरने विचारल्यावर राघव गोंधळला. तरीही मला काय माहीत ? असे हावभाव करत जाऊ लागला.
" मी तुला काहीतरी विचारले आणि माहीत नाही बोलतो. खरं सांग काय केले पालक पनीर भाजीचे? तू खाल्ली नाहीस ना? " राघव काहीच बोलत नव्हता. त्या ढिम्मासारखे नुसते उभे पाहून समीर अधिकच चिडला. सगळा स्टाफ तिथे जमा झाला. राघवबद्दल कोणालाच फारशी माहिती नव्हती. सगळेजण राघवला बोलू लागले. शेवटी राघवने खुनेनच पेन आणि कागद मागितला. तेव्हा कळले की तो मूकबधिर आहे. समीर थोडा वरमला. त्याला वाईट वाटले.
काही वेळात राघवने कागदावर लिहीलेला मजकूर दाखवला.
त्यावेळी त्याला सारा प्रकार कळला. राघवचा रडवेला चेहरा त्याला पाहवेना. एकंदरीत झालेल्या गोंधळात राघवने भाजी बदली करताना प्रेमाने लिहीलेली चिठ्ठी समीरच्या डब्यातून नकळत आनंदच्या डब्याच्या खाली गेली.
सगळे आपआपल्या जागेकडे गेल्यावर समीरने राघवला बसवले. त्याने केलेल्या कामाचे त्याला कौतुक वाटले. त्याच्या भाजी बदली करण्याच्या कृतीबरोबरच त्याच्या हातून नकळतपणे घडलेल्या चिठ्ठी बदलीमुळे आनंद कसा खुश झाला तेही सांगितले. राघव थोडा सावरला होता. बराच वेळ समीर राघवला काही गोष्टी सांगत बसला होता.
इतक्यात आनंद समोरून येताना दिसला. तो राघव आणि समीरला पाहून हसला आणि पुढे निघून गेला.
" पाहीलसं? त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद?"
राघव नुसता मान हलवत होता.
" हे सगळे तुझ्या त्या कृतीमुळे घडलंय."
राघवने परत एकदा मान हलवली.

राघव तिथून निघाला. संवादामध्ये एवढी ताकद असते हे त्याला पहील्यांदाच कळाले. कावेरी सोबत आपला कोणताही संवाद होतो का? आपण कधी कामाशिवाय तिच्याशी बोललो आहोत का? आपले पण त्या आनंदसारखे होणार नाही ना? त्याचे मन त्याला खाऊ लागले. त्याने वडील गेल्यापासून स्वताला कामाला जुंपून घेतले होते. कावेरी समजूतदार असल्यामुळे तो तिला गृहीत धरत होता. तिलाही मन आहे, तिच्या काही अपेक्षा आहेत याचा कधी विचार केला नव्हता. देवाने वाचा जरी दिली नसली कावेरीशी संवाद साधण्याचे अनेक माध्यमं त्याला आज समीरशी बोलताना समजली होती.
घरी जाताना त्याने कावेरीसाठी एक छानसा गजरा घेतला आणि तिच्या आवडीची जिलेबीही घेतली. सायकलवरून जात असताना त्याची नजर शुभेच्छा कार्ड दुकानाकडे गेली. कसाबसा बारावी शिकलेल्या राघवला कॉलेजमध्ये असताना त्याचे मित्र, मैत्रिनींना द्यायला विविध कार्ड घ्यायचे हे आठवले. सायकल बाजूला लावून तो दुकानात शिरला. दुकानात फारशी कार्ड दिसत नव्हती. हल्ली व्हाट्सएपच्या जमान्यात कार्डस कालबाह्य झालीत असे त्याला दुकानदार म्हणाला. शेवटी त्याला हवे असलेले कार्ड सापडले. दुकानदाराने टोपीवाल्या राघवचा फोटो काढला. दुकानदाराला एक मूकबधीर डबेवाला कार्डसाठी आपल्या दुकानात आल्याचे अप्रूप होते.

आनंदने घरी फोन करून जेवन बनवू नको सांगितले. असे त्याने पहील्यांदाच केले होते. कधी नव्हे तो साक्षीनेही का असा प्रतिप्रश्न केला नाही. समीरने आनंद आणि साक्षीला डिनरसाठी आमंत्रित केले होते खरे, पण साक्षी तयार व्हायला हवी होती. त्यातली एक पायरी आनंदने पार केली होती.
आनंद घरी पोचला तेव्हा साडेसहा वाजले होते. साक्षीने दार उघडले. त्याने हसत तिच्याकडे पाहिले. तिनेही आपल्या चेहऱ्यावरील आश्चर्य लपवत किंचित हसली. त्यांना मूलबाळ नसल्यामुळे त्या दोघांशिवाय घरात तिसरे कोणीच नव्हते.
" साक्षी मला माफ कर." असे बोलून त्याने साक्षीला घट्ट मिठीत घेतले. त्याच्या अनपेक्षित कृतीने ती थोडी बावरली. त्याचे हात तिच्या कमरेभोवती घट्ट होत होते. तिला मात्र ह्या सगळ्या गोष्टी स्वप्नवत वाटत होत्या. तिने स्वतालाच चिमटा काढून पाहीला. ते स्वप्न नव्हते. त्याचा उबदार स्पर्श तिला हवा हवासा वाटत होता. काहीवेळाने मिठीतून विलग होत त्याने तिला आपल्या बाजूला बसवले. जो ड्रेस घेण्यावरून त्याचे आणि तिचे भररस्त्यात वाद झाले होते अगदी तोच ड्रेस त्याने तिच्या हातात ठेवला. त्यावर तिच्या आवडीचा सोनचाफा आणि एक भलं मोठं चॉकलेट. ठेवले.
तिला काय बोलावे तेच कळत नव्हते. आपल्या नवऱ्याला आज झालयं तरी काय? एकदा चॉकलेटवरून किती बोलला होता. ' तू काय लहान झालीस का?' आणि ड्रेस घेण्यावरून 'ड्रेसच्या किंमतीत आपण दुसरे काय काय करू शकतो ' याचा हिशोबही त्याने मांडला होता. आज असं अचानक काय झालं?
" आनंद, काय झालयं तुम्हाला?"
" असं मी तुला विचारले तर." असे बोलून त्याने खिशातून चिठ्ठी बाहेर काढत तिच्याकडे दिली.
" हे काय आता?"
" वाच तर. हे तू अगोदर का नाही केलं?" असे बोलून तो फ्रेश व्हायला गेला.
साक्षी चिठ्ठी वाचत असताना तिचा चेहरा गंभीर होऊ लागला. कोणी लिहीली असेल ही चिठ्ठी? त्यावर ना लिहीणाऱ्याचे नाव होते ना पाठवणाऱ्याचे. चिठ्ठी मधला मजकूर तिला अस्वस्थ करत होता.
" साक्षी किती छान लिहलयं गं तू." तिला मागून दोन्ही हातानी कळटाळत आनंद म्हणाला.
" काय बोलताय तुम्ही ? मी नाही लिहलयं हे."
" काय ?"
" मी तोच विचार करतेय कोणाची चिठ्ठी आहे ही. "
" अगं पण."
" म्हणजे तुम्ही ही चिठ्ठी मी लिहीली समजून घरी आल्यावर असं वागत होता का?"
" हे बघ साक्षी तू चिडू नकोस, मी तसं जरी समजून केले असले तरी मनापासून केलयं, मला आपल्यातील कटूतेचा त्रास होत होता गं."
साक्षी गप्पच होती.
" काहीतरी बोल ना ."
" पण ही चिठ्ठी लिहीली कोणी आणि तुमच्याकडे कशी?"
" मला काहीच माहिती नाहीये गं."
" ते काहीही असूदे, आनंद मला आज खूप अपराधी वाटतेयं, मी तुमच्या साध्या अपेक्षा पण पूर्ण करू नाही शकले. या चिठ्ठीमधील शब्दात किती प्रेम, आदर आहे. आपण का नाही करू शकलो असं? आपल्यालाही आपले नाते हवेच होते की. "
" माझ्याकडूनही काही चूका झाल्यात. बायकोलाही मन असते, त्यात तिच्या काही इच्छा, आकांक्षा, मतं असतात. असा कधी मी विचारच केला नाही. आपले ते खरं करत आलो. मलाही वाटायचे आपल्यात संवाद व्हावा. पण ते फक्त वाटायचे , पण कधी त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही, तुझ्या पुढाकाराची वाट पाहत राहीलो."
" आणि मी तुमच्याकडून अपेक्षा करत राहिले."
" झालं ते झालं, आता आपल्याला दोघांनाही जाणीव झालीय ना. बस."
" हो " असं बोलून साक्षी त्याच्या कुशीत शिरली होती.

इतक्यात दारावर बेल वाजली.
तिने दरवाजा उघडला.
" आपण ?"
" मी समीर आणि ही माझी बायको प्रेमा , आनंद आणि मी एकाच ऑफिस मध्य काम करतो. आनंद कुठे आहे?"
" समीर असं काय विचारतोस ? आनंद तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय." समोरून आनंदला येताना पाहून प्रेमा म्हणाली.
" अरे हा. खरचं की."
समीर आणि प्रेमाला आपल्या घरी पाहून आनंद आश्चर्यचकीत झाला होता.
" चला तर मग लवकर तयार व्हा, आपल्या डिनरसाठी बाहेर जायचेय. "
" सर, तुम्ही तर तुमच्या घरी बोलविले होते ना? "
" हो, पण राघवसाठी बेत रद्द केला."
" राघवसाठी ?"
" त्यालाही मी बोलवलयं डिनरसाठी. "
" पण त्याला का? काही विशेष?"
" अरे वेड्या त्याच्यामुळेच तर माझ्या बायकोने माझ्यासाठी लिहीलेले प्रेमपत्र चुकून तुझ्या डब्यात गेले आणि..."
" आणि तुमची संवादाची गाडी सुरू झाली." समीरचे वाक्य प्रेमाने पूर्ण केले.
" ओह सर.. ते पत्र तुमच्यासाठी होते.. मी किती हूरळून गेलो होतो." आनंद तोंड पाडत म्हणाला.
" अरे आनंद नाराज का होतोस? तसं पण तुला कळलेच आहे ना कि तुझ्या बायकोने हे पत्र लिहिले नाहीये. मग? तसंही एका चुकीमुळे तुमची संवादाची गाडी सुरू झालीच आहे ना. आमच्यामुळे तुमच्यातील दरी संपुष्टात आली यातच आम्हाला आनंद आहे. " समीर प्रेमाला जवळ घेत म्हणाला.
" वहिनी तुमचे खूप खूप धन्यवाद."
" मला तुमचे धन्यवाद नकोत, मानायचे असतील तर राघवचे माना."
" खरचं राघवच्या हातून नकळतपणे घडलेल्या एका चुकीला आमच्याकडून माफी असेलच पण एक कॉफी देखील असेल." साक्षी कधी नव्हे ती कोटीमध्ये बोलली.
" चुकीला कॉफी? मी समजलो नाही. " आनंद साक्षीकडे पाहत म्हणाला.
" अरे वहीनीनी कोटी केली गड्या ? चुकीला कॉफी सही.. हे कसं वाटतेयं वहीनी?"
" छान." असे बोलून साक्षी सहीत सगळे हसू लागले.
खुप दिवसापासून आनंद आणि साक्षीचे घर माणसांचे आवाज ऐकायला आसूसले होते. आज मात्र तिला खुप बरे वाटत होते.
घरात सुसंवाद आणि स्त्रियांच्या हसण्याचे आवाज ऐकून तिचे कान समाधानाने तृप्त होत होते. आणि वास्तू तथास्तु बोलत होती..तथास्तु बोलत होती..

समाप्त..

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन दशरथ राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - २४.१२.२०१८

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगल लिहीलय Happy

पण जरा घाई झालीये का? आनंद आणि साक्षीत झालेला संवाद, चिठ्ठी तिने लिहीली नाही हे समीरला कसे कळले??

छान... Happy
संवाद हवाच नात्यांमध्ये..
हेच मी सांगत असते नवर्‍याला तर सगळ्यांना मी बडबडी आहे असे वाटते... Proud

हेच मी सांगत असते नवर्‍याला तर सगळ्यांना मी बडबडी आहे असे वाटते... Proud>>>>> अगं त्यात काय, त्याने चावी ( किल्ली ) मारली की तू चालू होत असशील ना ! Proud म्हणून तुला सगळे बडबडी म्हणत असतील. Happy Light 1

नितीन, मस्त आहे कथा. एकदम हलकी फुलकी ! वेळेवर गैरसमज दूर झाले ते बरे.

सुंदर, फील गुड कथा आहे.
डबेवाल्याचा पार्ट अजून मोठा चालला असता.पण कथा वाचून मस्त वाटले.

पण जरा घाई झालीये का? आनंद आणि साक्षीत झालेला संवाद, चिठ्ठी तिने लिहीली नाही हे समीरला कसे कळले?? >>>>> समीरला तर ऑफिस मध्येच माहीत पडले होते कि चिट्ठी प्रेमानेच लिहिली आहे ते ..

छानच लिहिले आहे... नात्यामध्ये संवाद हवाच तरच नाते ( मग ते कुठले ही असो नवरा- बायको भाऊ- बहीण पालक - मुले) सुंदर राहील Happy