जेवीद्वि व्रत - द्विभूक्त्स्य वजनो दास:

Submitted by चामुंडराय on 23 December, 2018 - 10:50

एक आटपाट नगर होते. तेथे एक मध्यवयीन, मध्यमवर्गीय सद्गृहस्थ रहात होता. खाऊन पिऊन सुखी होता, चरबी आणि ढेरी बाळगून होता परंतु शारीरिक समस्येमुळे त्रासाला होता. वाढता रक्तदाब आणि रक्तातील वाढत्या साखरेमुळे पिडला होता. प्रयत्न करूनही कमी न होता, कलेकलेने वाढणारे वजन आणि पुढे येणारी ढेरी यामुळे गांजला होता. वजन आणि ढेरी कमी करण्याचे विविध प्रयत्न करून थकला होता. वाढत्या वजनाबरोबरीने येणारे विविध आजार त्याला भीती दाखवत होते. काही विशिष्ट व्यक्ती समोर आल्यावर पोट आत ओढून ओढून दमला होता. वजन आणि ढेरी कमी करण्यासाठी अर्धबरीच्या सूचना ऐकून ऐकून कंटाळला होता. जिम मध्ये घाम गाळून गाळून कित्येकदा भिजला होता परंतु यश काही दृष्टीपटावर दिसत नव्हते, त्याला वजन कमी होईल अशी अंधुकशी देखील आशा वाटत नव्हती अशा परिस्थितीत असताना त्याला त्याच्या एका मित्राकडून कायप्पा वर एका व्रताची माहिती मिळाली. द्विभुक्त आहार आणि ४.५/४५ - जेवीद्वि व्रत असे या व्रताचे नाव होते. ३ महिन्यात ६ किलो वजन आणि २ इंच ढेरी कमी होत असल्याचा व्रत पुरस्कर्त्याचा दावा होता. ते वाचून आणि यू ट्यूब वरील विविध व्हिडीओज् श्रद्धापूर्वक बघून त्या सगृ ने हे व्रत करण्याचा, हा शेवटचा उपाय असे समजून, निश्चय केला.

उतणार नाही मातणार नाही
२ पेक्षा जास्त वेळा जेवणार नाही
४५ मिनिटे चालणे टाकणार नाही
जय जय जेवीद्वि (वकक*) समर्थ

* वजन कमी करण्यास - वकक

त्या सगृ ने तात्काळ व्रताची पूर्व तयारी सुरू केली. विविध रक्त तपासण्या केल्या. वजन आणि शरीराची मापे यांची नोंद केली. वेगवेगळ्या अँगलने फोटो काढून ठेवले. वेगवेगळे फॉर्म्स भरले आणि रिपोर्ट्स अधिकृत कायप्पा नंबरवर पाठवून दिले. आता सगृ पुढील प्रक्रियेची उत्सुकतेने वाट पाहू लागला.

सर्व त्या आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यावर त्याला त्याच्या श्रेणी नुसार एक आहार प्लॅन पाठवण्यात आला आणि त्याला एका कायप्पा समूहात संलग्न करण्यात आले अशा प्रकारे त्याच्यावर अधिकृत भक्तगण असा शिक्का बसला (भक्त गण फक्त "नमो किंवा रागा" चेच असले पाहिजे असे नाही).

त्याने मोठया श्रद्धेने जेविद्वि व्रताला सुरवात केली. सुरवातीला दोन एक आठवडे रेल्वे जशी रूळ बदलताना खडखडाट करते तसा खडखडाट झाल्यावर द्विभुक्त आप्लॅ सगृ च्या अंगवळणी पडला आणि तो ४५ मिनिटांमध्ये ४.५ किमी चालण्याचा प्रयत्न करू लागला. कार्ब्ज, प्रोटीन, फॅट्स, ग्लुकोज, इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, इन्सुलिन रेझिस्टन्स, इंटरमिटंट फास्टिंग, १६/८, ओमॅड अशा अनाकलनीय शब्दांबद्दल तो बोलू लागला. हा या व्रताचा महिमा आहे याची आजूबाजूच्या लोकांची खात्री पटू लागली. तो कायप्पा ग्रुप वरून दररोज येणारे ऍडमिनचे वेगवेगळे माहितीपर मेसेजेस मोठया उत्सुकतेने वाचू लागला. इतर जेष्ठ मेम्बरांचे यशोगाथा विषयक मेसेजेस् वाचून स्वतःचे वजन कमी झाल्याचे दिवास्वप्न बघू लागला. दोन वेळा जेवण्या व्यतिरिक्त फक्त पाणी पिण्यासाठी किंवा बोलण्यासाठी तोंड उघडू लागला.

होता होता हे जेवीद्वि व्रत सुरू करून एक महिना व्हायला आला. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण कमी न होता देखील वजनाचा काटा डावी कडे झुकतो आहे असे त्या सगृ ला जाणवू लागले. अशा रीतीने त्याचा प्रवास आता भारतीय जनते प्रमाणे उजवी कडून डावी कडे व्हायला लागला. व्रत पाळताना येणाऱ्या मोहाच्या क्षणांवर तो मोठया संयमाने मात करू लागला. गोड गोड मिठाया, अरबट चरबट चटक मटक पदार्थ जेवणाव्यतिरिक्त समोर आल्यास मोठया निग्रहाने नाही म्हणू लागला.

या व्रतामुळे सगृ च्या पापराशी (इन्सुलिन) कमी होऊ लागल्या आणि त्याच बरोबर पुण्यराशी (ग्लुकॅगॉन) वाढू लागल्या. "ग्लुकॅगॉन ऑन चरबी गॉन" या जेवीद्वि व्रताच्या महामंत्राची जादू अनुभवायला येऊ लागली.

सगृ ला आजूबाजूच्या मंडळींकडून वजन आणि आकारामध्ये फरक दिसत असल्याचे सकारात्मक संदेश मिळू लागले. होता होता या व्रताचे तीन महिने पूर्ण झाले. सगृ मोठ्या उत्सुकतेने वजन काट्यावर उभा राहिला तर वजन चक्क साडेचार किलो कमी दाखवत होते. ढेरी मोजली तर दोन इंचाचे कमी झाली होती. त्याने पुन्हा एकदा वेगवेगळ्या अँगलने फोटो काढले. लॅब कडे धाव घेऊन नवीन रिपोर्ट्स तपासले तर त्यात देखील सकारात्मक बदल दिसत होता. त्याने ते रिपोर्ट्स, वजने मापे, फोटो व्रताच्या संयोजकाकडे पाठवून दिले. ते कायप्पा ग्रुपवर आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले. सगृ ला रातोरात प्रसिद्धी मिळाली. त्याला सेलेब्रिटी झाल्यासारखे वाटू लागले.

सगृ ला हे व्रत पुढे आयुष्यभर चालू ठेवण्याचा सल्ला आणि लवकरच आपल्या इप्सित वजनापर्यंत पोचण्याचा आशीर्वाद मिळाला.

जे कोणी रंजले गांजले असतील, लठ्ठपणा ने पिडले असतील त्यांनी हे जेवीद्वि व्रत श्रद्धापूर्वक करावे. फळ निश्चित मिळेल. सगृ ला जसा या व्रताचा फायदा झाला तसा तुम्हा-आम्हालाही होवो हि सदिच्छा.
उतू नका मातू नका
जेवीद्वि व्रत टाकू नका

ही जाड्या-ते-रोड्या ची कहाणी सुफळ संपन्न.

कृशम् भवतु !

तळ टिप :
हि कहाणी अर्वाचीन आहे. सध्याच्या दर दोन तासांनी आणि दोनच वेळा या मतामतांचा गलबल्यात त्यातील विचार प्रत्येकाला पटेलच असे नाही. परंतु शंका कुशंकांच्या पोस्ट टाकण्यापेक्षा "करके देखो" या गांधी मंत्राचा अवलंब करून प्रचिती घ्यावी आणि आवडो वा नावडो, चांगला बोध घ्यावा हि विनंती.

Group content visibility: 
Use group defaults

छान माहिती.
मलाही हे व्रत घ्यायला आवडेल. कायप्पा नंबर विपु कराल?

मस्त लिहिलंय.
आधी संस्कृतमध्ये शीर्षक पाहून लेख वाचायचं टाळला होता.

अज्ञातवासी : माहिती दिली आहे.

भरत : चरबी, ढेरी यांच्यासाठी संस्कृत/संस्कृतोद्भव शब्द सापडले नाहीत ( ८ ते १० वी ५० मार्कांचे संस्कृत होते).

इतर सर्व वाचक आणि प्रोत्साहन देणाऱ्या माबोकरांचे आभार.