मरावे परि देहरूपी उरावे......!

Submitted by ASHOK BHEKE on 19 December, 2018 - 12:22

विशाल भिसे यांचा वाढदिवस झाला अनेकांनी शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला. त्यानिमित्ताने त्यांनी समाजाला देऊ केलेली परताव्याची भेट ही अनमोल आहे. त्याविषयी विस्तृत मी खाली लिहीलच अगोदर थोडसं या तरुण रक्ताविषयी.विशाल नावाचं रत्न घोडपदेव,फेरबंदर, काळाचौकी प्रभागात सध्या कार्यरत आहे. मध्यंतरी कविता चान्दोस्कर या गतिमंद मुलीसाठी डी पी वाडीतील तरुण मंडळी या सामाजिक उपक्रमात उतरलेले पाहून स्वत:हून अभिनंदन इमारतीच्या बाहेर ते सहकारी मित्रांसोबत मदत गोळा करायला बसलेले होते. त्यांची जीवनाभिमुख वृत्ती आणि कुतूहल हे पाहिले की विंदांच्या कवितेच्या ओळीचा आशय डोळ्यासमोर उभा राहतो.

देणाऱ्याने देत जावे
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेणाऱ्याने एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावेत....!

समाजातील अनेक समस्यावर पर्याय निवडताना संभ्रमित आणि मरगळलेल्या मनाला उत्तुंग प्रेरणा देणारी कविता अंगिकारली तर निश्चित समाज वेगळ्या वाटेवर मार्गक्रमण करील.
श्री विशाल भिसे आपल्या समाजजीवनात अत्यंत चांगले काम करीत आहेत. अभिनंदन क्रिडा मंडळ, मुंबई या माध्यमातून सामाजिक सेवेची संधी उपलब्ध झाल्यानंतर, फेरबंदर सार्वजनिक मंडळ आदी संस्थामध्ये काम करीत असताना केवळ विभागापूरते मर्यादित न राहता त्यांनी *क्रिएटीव्ह स्कील अकॅडमी* महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, या संस्थेची स्थापना ११ फेब्रुवारी २०१६ मध्ये केली. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मोफत सौंदर्यप्रसाधन, शिवणकाम, संगणक प्रशिक्षण वर्ग सुरु केले. आतापर्यंत किमान ६०० प्रशिक्षणार्थीनी याचा लाभ घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत अखंड मुंबईत महिला बचत गट,यांना खाद्यपदार्थ बनविणे, शिवणकाम आणि सँनिटरी पँड मेकिंग प्रशिक्षण देत कौशल्य विकास संस्थेच्या २०१७ च्या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. शिवाय दिव्यांग व्यक्तींना देखील प्रशिक्षित करून त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिला आहे.

आपले आयुष्य, आपला वेळ इतरांच्या भल्यासाठी खर्च करणारी, गरजूंसाठी धावणारी समाजात अनेक देवमाणसं भेटतात. खरं तर त्यांच्या आईवडिलांच्या संस्काराची शिकवण ही खोलवर रुजली की, अशी ध्येयवेडी माणसं समाजासाठी काय करतील त्याचा नेम नाही. विशाल भिसेंचा वाढदिवस झाला आणि त्यांनी लोकस्नेहप्रती त्यांनी आपला मरणोत्तर देहदान करण्याचा इरादा के ई एम रुग्णालयात जाऊन पूर्ण केला. प्रेमाच्या बदल्यात समाजाचे पांग फेडण्यासाठी त्यांनी घेतलेला महत्वपूर्ण निर्णय आप्तस्वकीयांना कदाचित आवडणार नाही. परंतु मरावे परी देहरूपी उरावे... याप्रमाणे आपल्या मरणोत्तर काळात आपला देह देखील समाजाच्या भल्यासाठी देऊ करणारी माणसं विरळच. देहदानाची संकल्पना अद्याप रुजलेली नसताना विभाग परिसरात नवा पायंडा पाडण्याचे काम श्री विशाल भिसे यांनी सुरु केले आहे. खरं तर कुणी धर्माच्या विरोधात तर देहाची चिरफाड करू द्यायला देहदानाला विरोध करतात. पण एक देहदान दहा डॉक्टर देते. दोन व्यक्तींना दृष्टी बहाल करते. आगीने जखमी झालेल्या रुग्णाला त्वचा कामाला येते.वेळेच्या गणितात कुणाच्या कामाला जर हृदय देखील जीवनदायी ठरते. अशाच एक बाळ जन्मत: हृदयरोगी होते. आई त्या निरागस बाळाकडे पाहून फक्त रडत बसायची. कुणी माझ्या बाळाला हृदय देता का हृदय....? असा रुग्णालयात टाहो फोडीत असताना एका महिलेचे बाळ जन्मत: काही क्षणातच निर्वतले. तेव्हा डॉक्टरांनी त्या महिलेला या बाळासाठी दान मागितले. तिने देखील स्वखुशीने दिले. जेव्हा त्या बाळावर हृदयरोपण झाले तेव्हा त्या मृत बालकाच्या आईने त्या बाळाचे हृद्य ठोक्यातून आई असे शब्द ऐकले....! तात्पुरती त्या महिलेची शुध्द हरपली पण आपल्या बाळामुळे दुसऱ्या बाळाने घातलेली साद....! कल्पना करवत नाही.
आमच्या येथे राहणारे ज्येष्ठ गृहस्थ म्हणतात, तुम्ही शरीराचा अवयव जर या आयुष्यात दान दिला तर पुढच्या जन्मात तुम्हाला देव तो अवयव देत नाही. अशा बिनबुडाच्या सल्यात तथ्य किंचितही नाही. कुणाला माहिती आपण पुढच्या जन्मात काय रूंपात असणार आहोत. रक्तदान ज्याप्रमाणे अंगिकारले त्याप्रमाणे देहदान, नेत्रदान, त्वचादान याबाबत म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. कारण मृत्यू नंतर देहाची चिरफाड नको, देहदान केल्याने मोक्ष मिळत नाही....! हा प्रसार कोठे तरी थांबला पाहिजे.
यावर नातलगांचे भावनिक रुढींचा पगडा किंवा शासकीय आरोग्य प्रणालीचा हवा तेवढा प्रतिसाद लाभलेला नाही. जगात प्रवेश करणारे बाळ आपल्या मुठी बंद करून येते पण ते जाते तेव्हा उघड्या मुठीने का जाते.....? असा प्रश्न जनमनात येत असतो. स्वकेंद्रित जीवन जगण्यापेक्षा जन्माला आलेल्यांनी आपल्या आयुष्याचे सार्थक करायचे असेल तर क्षणभर का होईना दुसऱ्यासाठी जमेल तेवढे करा.मानव हा त्रिमित आहे. त्यांची लांबी ( वय) रुंदी (प्रकृती ) आणि खोली ( इतरांसाठी तुम्ही काय केले...?) यापैकी माणसाचे मोठेपण हे या तिसऱ्या मितीवर ठरते.
संतांच्या कामगिरीविषयी आतापर्यंत खूप काही लिहिले गेले. आजही त्यावर चर्चा घडून येतात. संतांचे मुख्य लक्ष्य परमार्थिक हित होते. *अवघाची संसार सुखाचा करीन* अशा वचनात त्यांचे परोपकार, औदार्य दिसून येते. अशा थोर व्यक्तिमत्वाची बरोबरी करणे इष्ट नाही. परंतु त्यांच्या मार्गावरचे गवताचे एखादे पाते व्हावे, असे जर विशाल सारख्यांना वाटत असेल तर आनंदच म्हणावा लागेल. विशेष म्हणजे विशाल भिसे सारखी सत्प्रवृत्त माणसं असतील, निदान त्यांच्यात असलेली कृतज्ञतेची भावना सामाजिक बांधिलकी म्हणून इतरांसाठी काही तरी करू इच्छित असतील तर त्यांचा आदर्श हा इतरांपर्यंत हमखास पोहचेल. नव्हे पोहचायला हवा.

*अशोक भेके*

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users