किचनपुराण
"आजी , तू आमटी करत आहेस ?" मोठ्ठे डोळे करून मी आजीला विचारायचे तेव्हा जेमतेम तिच्या कंबरेपर्यंत पोहोचत असेन मी. किचन आणि माझी ओळख तेव्हापासून आहे असं कायमच वाटत आलं आहे मला. मी तिथे आले की वाटीत काहीतरी खायला देऊन , उचलून घेऊन आजी ओट्यावर बसवायची. ओटा ऐसपैस असल्यामुळे एकीकडे माझ्याशी गप्पा आणि दुसरीकडे तिची कामं अगदी लीलया पार पाडायची. अगोदर आजी आणि नंतर आई , ओट्यावर बसून गप्पा मारणं अगदी लग्न होईपर्यंत कायम होतं माझं. लहानपणीच्या बहुतेक आठवणी स्वयंपाकघर आणि पर्यायाने वेगवेगळ्या पदार्थांशीच जोडलेल्या आहेत माझ्या. कोळश्याच्या शेगडीवर आजी खास माझ्यासाठी करायची तो ऊन ऊन भात , ती पिवळसर , टिपीकल गोड्या मसाल्याची चव असलेली आमटी , किंचित हळद आणि हलकासा लसूण घातलेली तांदळाच्या पिठाची उकड , गरमागरम नेटका आकार असलेली आणि अतिशय प्रमाणबद्ध उगाच पोळपाटभर न लाटलेली पोळी , अतिशय साधी पण तितकीच रुचकर फ्लॉवरची भाजी तीसुद्धा फ्लॉवरचा तो 'जगप्रसिद्ध' वास अजिबात येत नसलेली , भाजणीचं थालीपीठ अशा खास आजीचा 'टच' असलेल्या कितीतरी आठवणी आहेत. रेशमाची लड उलगडावी तशा हळूवारपणे मनात उलगडत जाणाऱ्या !!
आजी आमटी करताना तर मी हमखास तिथेच थांबायचे , मिरच्या कडीपत्ता घातल्यावर मोहरीचे ते तडतडणे , शिजलेली डाळ सारखी करून फोडणीवर घालणे , तिखट मीठ मसाला घातल्यावर आमटीला येणारा तो फेस , उकळत असताना घरात सुटलेला घमघमाट काय आणि कसं वर्णन करायचं या सगळ्याचं? शेवटी कोथिंबीर घालण्यापूर्वी आमटीला येणारा तो फेस अगदी आवर्जून बघायला फार आवडायचं मला. परत यातही वेगवेगळी व्हरायटी असायची , कधी चिंचगूळ, कधी एखाददुसरं आमसूल , कधी कांदा टोमॅटो घातलेली आमटी , कधी शेवग्याच्या शेंगांची आमटी. पोळीबरोबर कुस्करुन खाताना अगदी स्वर्गसुख अनुभवायचे मी ! हात धुतल्यावरही खोलवर मुरलेला तो आमटीचा गंध अगदी जाणवायचा हाताला !!
आई आजीच्या तालमीत तयार झालेली. तिचे संस्कार , तिच्या हातची चव अगदी सही सही उचलणारी आई आहे माझी. खास पांढरे तीळ घातलेल्या बटाट्याच्या काचऱ्या आजही तिच्याच हाताच्या खाणं पसंत करेन मी. त्या काचऱ्या इतक्या पातळ पाहिजेत की डोळ्यांसमोर धरल्या तर पलीकडंच अंधुक का होईना दिसलंच पाहिजे तरच ही भाजी पर्फेक्ट आणि हवी तशी होणार असं ठाम मत आहे तिचं. बरेचदा मी हसते तिला पण खाली कढईला लागून खरपूस झालेल्या काचऱ्यांसाठी जीव गोळा होतो माझा. पिठलं करताना डाळीचं पीठ भिजवायची स्वतःची एक पद्दत आहे तिची. पिठलं झाल्यावर कढईला कडेने एक पातळसर थर जमा झालाच पाहिजे. तो नुसता बोटाने काढून खातानाही अवर्णनीय सुख असतं. मला बरेचदा असं वाटतं मूळ मुद्दलापेक्षा असं उरलंसुरलं खाण्यात फार मजा असते. अंबाडीची भाजी हा अजून एक हमखास हिट होणारा प्रकार आहे आईच्या हातचा. एकतर या भाजीचे नखरे फार असतात , हिला उकडलेले शेंगदाणे लागतात , भाजीत थोड्या तांदळाच्या कण्याच काय लागतात , थोडीशी तूरडाळ काय लागते , वर परत वरून घेण्यासाठी लसणाची फोडणीच काय लागते , इतकंकरून अजिबात आंबट न होता मूळ चव लागलीच पाहिजे!! हुश्श , त्यापेक्षा गड्डी आणून तिच्याकडे नेऊन दिली की निगुतीने केलेली भाजी खाणं जास्त आवडतं मला.
भरलेली मिरची घालून आई करते ती मूगडाळ खिचडी निव्वळ लाजवाब! एकसारखे शंकरपाळीसारखे पोळीचे तुकडे करून वरणफळे खावीत तर तिच्याच हातची. साध्या वरणभाताच्या कुकरपासून शिकायला सुरुवात केलेला माझा प्रवास मागच्या होळीपर्यंत पुरणपोळीपर्यंत येऊन ठेपला आहे , वाटेत लागणारी वन डिश मील , चायनीज सारखी आधुनिक स्टेशन्स पार पाडून. माझ्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या अन्नपूर्णा आणि या आभासी जगातल्या अन्नपूर्णांशिवाय हा प्रवास खरं तर शक्य नव्हताच!
स्वयंपाकघर हा विषय आला की एक असं नाव आहे ज्याशिवाय हा विषय पूर्ण होऊ शकत नाही ते म्हणजे कमलाबाई ओगले यांचं. 60-70 च्या दशकात अमेरिकेतच नव्हे बाकी कुठेही पाठवणी होणाऱ्या मराठी सुनांच्या बॅगमधे कमलाबाईंचं 'रुचिरा'अगदी आवर्जून ठेवलं जायचं. प्रमाण वाटी म्हणजे नेमकी कशी वाटी , चमचाभर म्हणजे नक्की किती आणि कोणता चमचा प्रमाण मानावा इथंपासून ते ताट कसं वाढावं इथंपर्यंत 'रुचिरा' मधे सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं कमलाबाईंनी!! नवशिक्या मुलीपासून ते अगदी तरबेज सुगरणींपर्यंत एक मानाचं स्थान 'रुचिरा' आजही पटकावून आहे. रुचिरा होतं म्हणून निभाव लागला गं अमेरिकेत ,नाहीतर सगळं कठीणच होतं असं तेव्हाच्या सुना आणि आज आज्जी झालेल्या सगळ्या अगदी प्रामाणिकपणे मान्य करतात. कमलाबाईंचा वारसा नंतर उषा पुरोहित , मेघना भुस्कुटे ते अगदी अलीकडेपर्यंत सायली राजाध्यक्षांनी फार समर्थपणे सांभाळला आहे!
साध्या सोप्या शब्दांत, अगदी सहजपणे सायलीताई 'अन्न हेच पूर्णब्रह्म'मधून कितीतरी विस्मरणात गेलेल्या पदार्थांबरोबरच निरनिराळे सलाड,असंख्य प्रकारचे पराठे,वेगवेगळ्या भाज्या यांची ओळख करून देत असतात. रोजच्या खाण्याची एक शिस्त कशी असावी , स्वयंपाकघर म्हणजे नेमकं काय , ते कसं असावं आणि का असावं यासारख्या कितीतरी गोष्टी त्या फार सुंदर समजावतात.
खरं तर न संपणारा विषय आहे हा, वेस बदलली की खाद्यसंस्कृती बदलते असं म्हणतात. 'रुचिरा' ते आतापर्यंतचे 'फूड ब्लॉग' असा फार मोठा प्रवास आपल्या इथल्या खाद्यसंस्कृतीने पार पाडला आहे. निरनिराळ्या पदार्थांना कवेत घेऊन, जोडीला आता 'फूड चेनेल्स'ही आली आहेत. बाकी जग कसंही आणि कितीही बदललं तरी गरमागरम वरणभात, त्यावर पिवळंधमक साधंवरण, आणि त्यावर घरचं साजूक तूप हे अजरामर राहणार हेही तितकंच खरं!!
मायबोलीवरच्या लिखाणाचा पहिलाच
मायबोलीवरच्या लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे. कितपत जमला आहे माहीत नाही. गोड मानून घ्या..
चांगला झालाय पहिला लेख.
चांगला झालाय पहिला लेख. आठवणींतून रूचीराकडे जाताना थोडा विस्कळीत वाटतो मात्र.
आजीच्या आठवणी वाचताना अगदी मला माझेच लहानपण आठवले
पुलेशु
छान आहे की
छान आहे की
हो जरासा विस्कळीत झाला असं
हो जरासा विस्कळीत झाला असं मलाही वाटलं. खरं तर लिहिण्याच्या ओघात झालं असावं बहुदा, म्हणजे आठवणींतून जरा वास्तवात येताना जरा गडबड झाली असावी.
धन्यवाद..! अजून सुधारणा करेन.
खुप सुंदर लेख..
खुप सुंदर लेख..
छान जमला आहे लेख.
छान जमला आहे लेख.
पुढल्या लिखाणाकरता शुभेच्छा!
साजिरी_11 , मस्त लिहिलंय!
साजिरी_11 , मस्त लिहिलंय!
धन्यवाद सगळ्यांना. हळूहळू
धन्यवाद सगळ्यांना. हळूहळू हुरूप येत आहे.
छान लेख झालाय, माझी सुगरण आजी
छान लेख झालाय, माझी सुगरण आजी आणि आई आठवली..
छान झालाय लेख!
छान झालाय लेख!
मस्त जमलाय की लेख, अगदी साधं
मस्त जमलाय की लेख, अगदी साधं वरण, भात आणी साजूक तुपासारखा
भूक लागली ☺️
भूक लागली ☺️
गल्लत! शीर्षक 'चिकनपुराण'
गल्लत! शीर्षक 'चिकनपुराण' नसून 'किचनपुराण' आहे हे अख्खा लेख वाचल्यावर कळालं.
असू देत. ठीक लिहिलाय.
मस्तच जमलाय लेख!
मस्तच जमलाय लेख!
जावेद_खान हाहाहा...
जावेद_खान हाहाहा...
कधी चिंचगूळ, कधी एखाददुसरं
कधी चिंचगूळ, कधी एखाददुसरं आमसूल , कधी कांदा टोमॅटो घातलेली आमटी , कधी शेवग्याच्या शेंगांची आमटी. पोळीबरोबर कुस्करुन खाताना अगदी स्वर्गसुख अनुभवायचे मी !
अगदी खरंय.
बटाट्याच्या काचऱ्या , पिठल्याची कुरकुरीत खरवड वाचून भूक खवळली. ह्या आज्यांचा हाताच्या चवीला तोड नाही.
छान झालाय लेख .
छान लिहिलंय.आज्जीच्या हातचे
छान लिहिलंय.आज्जीच्या हातचे पदार्थ आणि ती चव हरवलीय आयुष्यात असे नेहमी वाटते.
मटण, कोंबडीचा काढा, काळ्या वाटाण्याचे सांबार, वडे, आंबोळ्या, पुरणपोळ्या, मालपोवा आणि खरवस! हे तर आज्जीनेच करावेत ! आज्जी गेली. सोबत ती चव घेऊन गेली. रेसिपी वाचून नाही आणू शकत ती आता...
छान जमलाय लेख.
छान जमलाय लेख.
शीर्षक काही वेगळं हवं होतं असं वाटलं.
चांगल्या लिहील्या आहेत आठवणी
चांगल्या लिहील्या आहेत आठवणी.. लिहीत रहावे..
मस्त जमलाय लेख.. लिहित रहा..!
मस्त जमलाय लेख.. लिहित रहा..!
छान लिहील आहे.
छान लिहील आहे.
मी अजूनही मंगलाताईंच अन्नपूर्णा हे पुस्तक फॉलो करते. रुचिराही चांगल आहे.
भरलेली मिरची घालून आई करते ती मूगडाळ खिचडी निव्वळ लाजवाब!
ही कशी करतात?
मस्त झालाय लेख. आवडला.
मस्त झालाय लेख. आवडला.
छान
छान
मीही अशीच फिश करी करतो पण
..
प्रतिसादांबद्दल मनापासून
प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद..
जागू-प्राजक्ता तळणीची मिरची असते ना त्या बुटक्या पण जाड मिरच्या मसाला भरून वाळवून ठेवतात त्यालाच भरलेली मिरची असंही म्हणतात. खमंग फोडणी करून त्यात साध्या हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी ह्याच दोन तीन मिरच्या घालून परतायच्या. गोडा मसाला थोडा कमी घातला किंवा नाहीच घातला तरीही चालतो. नेहमी करतो तशी मुगाच्या डाळीची खिचडी करायची. तुफान चव येते..!
स्वयंपाकघराशी रिलेटेड म्हणून
स्वयंपाकघराशी रिलेटेड म्हणून "किचनपुराण" हेच सुचलं पटकन. ☺
खमंग फोडणी करून त्यात साध्या
खमंग फोडणी करून त्यात साध्या हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी ह्याच दोन तीन मिरच्या घालून परतायच्या>>>>> नक्की करून पाहेन.
छान लिहिलयं......
छान लिहिलयं......
छान लिहीलय.भुक चाळवली.
छान लिहीलय.भुक चाळवली.
छान.
छान.
पण मेघना भुस्कुटेने ओगले आज्जींचा वारसा चालवण्यासारखं काही लिहिलेलं माझ्या वाचनात आल्याचं आठवत नाही. विचारते तिलाच.
Pages