चष्मा

Submitted by क्षास on 10 December, 2018 - 05:49

" चलो आ जाओ वज्रासनमे" असं म्हणत संध्याताईंनी योगा शिकवायला सुरवात केली.
" बताओ, किसकीसने जलधौती कीयी पिछले हफ्तेमे? "
सगळ्याजणी एकमेकींकडे बघू लागल्या. सात दिवस सलग कोणीच केलं नव्हतं. आता ताई काहीतरी बोलणार याची कल्पना येताच आम्ही पाय सोडून बसलो.

आम्हाला वज्रासनमध्ये तसंच बसवून त्या आमच्याशी बोलत असत, एकामागून एक नाव घेत हजेरी लिहीत असत. तोपर्यंत आमचे पाय दुखत असत मग आम्ही पुन्हा आमचे पाय सोडून थोडं रिलॅक्स होत असू. हजेरी झाली की पुन्हा चलो आ जाओ वज्रासनमे, मग आम्ही पुन्हा वज्रासन घालून तयार. आठवडाभर कोणी किती प्रकार केले याचा तपशिल विचारता विचारता संध्याताई थोडया गप्पा मारत असत.

"बोलो" , ताईंनी पुन्हा विचारलं.
जलधौतीचं नाव काढलं तरी मला भीती वाटायची... एवढे सात-आठ ग्लास पाणी पिऊन पुन्हा सहजरित्या बाहेर काढणं काही सोपं काम नाही... प्रयत्न केला एकदोनदा... शेवटी नाहीच जमलं..
" काय तुम्ही मुली! मेकअप करायला भरमसाठ वेळ खर्च करता पण हेल्थसाठी वेळ नाही? ", ताई नाराजीच्या सुरात म्हणाल्या...."बाहेरून अप टू डेट अगदी चकाचक राहता आणि आतला गुंता तसाच्या तसा ठेवता ! मन शांत असेल, शरीर बळकट असेल तरच पुढच्या लढाया लढता येतील. सेल्फीत न दिसणारे आचारविचारही सुंदर असायला हवेत ना? "
त्यांचे प्रश्न आम्हाला नेहमीच निरुत्तर करत. आजवर मी छोट्या वर्तुळातच जगत होते. अनावश्यक पोकळ गोष्टींना नाहक महत्व दिलं गेलं.... इथे योगाकुटीरमध्ये आले आणि डोळ्यावरची झापडं गळून पडली तेव्हा वास्तवातलं विस्तृत अर्थपूर्ण वर्तुळ दिसलं... न संपणारं वर्तुळ...

संध्याताईचं बोलणं इतकं प्रभावी होतं की माझ्यासारख्या अनेक आळशी मुलींना त्यांनी प्रोत्साहित करून योगाची सहज सवय लावली होती... त्यांच्या 'पुश'मुळेच मी न चुकता दोन महिने नियमित योगकुटीरमध्ये येत होते. मला संध्याताई खूप आवडायच्या. त्यांच्याबद्दल खूप कुतूहल वाटायचं. पांढरा शुभ्र पंजाबी ड्रेस, कमरेला बांधलेली ओढणी, कानात नाजूक सोनेरी रिंगा, नाकावर खूप जुन्या स्टाईलचा गोलाकार चष्मा... मध्यम उंचीच्या गोऱ्यापान संध्याताई खूप तेजस्वी भासायच्या. त्या शिस्तीला कडक पण प्रेमळ होत्या. आवाज भारदस्त होता पण शब्द मोजून-मापून वापरायच्या. पन्नाशीच्या असतील कदाचित पण अंगात नेहमी उत्साह संचारलेल असायचा...अधेमधे स्वतःबद्दलही खूप सांगायच्या. योगकुटीरमध्ये सामील होऊन त्यांना बरीच वर्ष झालेली. त्यांच्यासारख्या अनेक जणी दर रविवारी इथे योगा शिकवायला यायच्या. ते ही विनामूल्य! स्त्रियांना शरीराने आणि मनाने बळकट करणं हेच योगकुटीरचं ध्येय होतं. मला या बायकांचं विलक्षण कौतुक वाटायचं. महिला सक्षमीकरणाची भाषणं देणाऱ्या किंवा सोशल मीडियावर मोठमोठाले परिच्छेद टाकणाऱ्या फेमिनिस्ट बायकांपेक्षा कृतीतून समाजपरिवर्तन करणाऱ्या या कुटीरमधल्या बायका श्रेष्ठ वाटायच्या. स्क्रीनवर टीचक्या मारून स्त्री किती प्रभावशाली आहे हे सांगणं आणि स्त्रीला कणखर बनवण्यासाठी निःस्वार्थी प्रयत्न करणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे....खरंच त्यांच्याकडे पाहिलं की वाटतं आपण नुसतीच चर्चा करतो, प्रत्यक्ष कृती मात्र काहीच नाही.
.
.
.

"तुमच्याकडे एकूण कपड्यांचे जोड किती? चपलांचे जोड किती? ", पुढे त्या म्हणाल्या , " हल्ली कोणीही कधी काही मोजतच नाही. नुसतं विकतं घेत जायचं. गरज आहे की नाही किंवा या वस्तू शिवाय आपलं खरंच काही अडणार आहे का हे प्रश्न वस्तू खरेदी करताना विचारायला हवेत. आपल्या हातांना फक्त घेण्याची सवय आहे. देण्याची सवय कधी लागणार? तुम्हाला खोटं वाटेल पण गेल्या कित्येक वर्षात मी एकही नवीन साडी विकत घेतलेली नाही. घरातलं जुने कपडे, जुनी भांडीकुंडी, वस्तू सगळं गरजूंना वाटून टाकलंय... कारण मला जगण्यासाठी नक्की काय आणि किती गरजेचं आहे हे समजलंय."
संध्याताईंचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यांसमोरून आमचं कपड्यांनी खचाखच भरलेलं कपाट तरळून गेलं. पुढच्या महिन्यातला बिग बझार सेल, ॲमेझॉन ,फ्लिपकार्टवरची विषलिस्ट, यूट्यूबवर पाहिलेला हेअर कट आणि नवीन स्टायलिश फ्रेमचा चष्मा एकेक करून सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या. मी सध्या वापरत असलेला चष्मा मला नकोसा झाला होता कधी मोडकळीला येतो आणि कधी मी नवीन चष्मा घेतेे याची मी वाट बघायचे. पण आता माझ्या सटरफटर इच्छांचा पसारा बघून मलाच माझी लाज वाटली. नवीन चष्मा बिष्मा काही नाही! असं मनाशी ठरवून मी चष्मा बाजूला काढून ठेवला. कोण जाणे कसा गोमुखासन करायला पाय पसरले आणि पायाच्या धक्क्याने चष्मा कुठल्याकुठे भिरकावला गेला. भिंतीच्या खालच्या टाईलला जाऊन आदळला. काचेला तडा गेला. आता काच बदलावी लागणार या विचाराने मी हळहळले.
"काय झालं फुटला की आहे धडधाकट?", मागून संध्याताई म्हणाल्या.
"काचेला तडा गेलाय", नेमका आत्ताच कसा हा फुटला... कसला योगायोग आहे हा... मी आश्चर्यचकित होऊन चष्म्याकडे बघतच बसले.
"नवीन बसवून घे. चांगल्या ब्रँडची घे गं, कारण दृष्टी सगळ्यात महत्त्वाची...खरं तर तुम्ही सगळ्यांनी चष्मे जपले पाहिजेत.", संध्याताई सगळ्या मुलींना उद्देशून म्हणाल्या.
"ताई मला कुठेय चष्मा !", मागच्या सतरंजीवर बसलेली आर्या म्हणाली."
"आय टू डोन्ट हॅव स्पेक्स" ,लिंडा म्हणाली.
" प्रत्येकीकडे चष्मा आहे ...एक वैचारिक चष्मा.. यातून तुम्हाला मोह, लालच, हव्यास,ईर्ष्या या पलीकडचं जग स्वच्छ दिसतं...हा चष्मा तुम्हाला दिखाऊपणा पलीकडचं जग दाखवतो. हा चष्मा चोवीस तास तुमच्या डोळ्यावर असतोच. त्याला खाली पडू देऊ नका. "
आम्हाला हा विचार मनोमन पटला.

आज इतके दिवस जपलेला चष्मा फुटला पण तरीही काहीतरी नवीन गवसल्याचा आंनद होत होता...खरंच योगकुटीरमध्ये गवसलेल्या या वैचारिक चष्म्याने माझा दृष्टिकोन बदलून टाकलेला.....आणि माझं आयुष्यही !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!!!

खूप चांगले विवार. मला अश्या कथा अावडतात. काही शिकायला मिळतं अाणि कथेत काही वायफळ भाग सुद्धा नाही. To the point.

ज्यांच्याकडे पैसे आहेत ते त्यांनी त्यांना हव्या त्या गोष्टींवर खर्च करावेत. उगाच गिल्टट्रिप देणाऱ्या संध्याताय नाय आवडल्या Angry

चांगली आहे कथा. विषलिस्ट चुकून झालंय की मुद्दाम केलंय>>>
चुकून झालंय खरंतर. पण तसाही अर्थ लागतोय... किंचितसा

प्रत्येकीकडे चष्मा आहे ...एक वैचारिक चष्मा.. यातून तुम्हाला मोह, लालच, हव्यास,ईर्ष्या या पलीकडचं जग स्वच्छ दिसतं...हा चष्मा तुम्हाला दिखाऊपणा पलीकडचं जग दाखवतो. हा चष्मा चोवीस तास तुमच्या डोळ्यावर असतोच. त्याला खाली पडू देऊ नका. " हा विचार मनोमन पटला.

अंबिका योग कुटीर का? >>> ही कथा लिहिण्याची idea तिथूनच मिळाली.. पण बाकीचे संदर्भ काल्पनिक आहेत

अँमी +1
कथा म्हणून ठीक आहे, पण सरसकट दुसऱ्यांना एकतर्फी उपदेशाचे डोस पाजणारी ते ही गिल्ट फीलिंग देणारे आणि आपण भोगून नंतर उपरती झालेले लोक चीड आणण्याइतके डोक्यात जातात.

/शेवटी कमावलेला पैसा किती आणि कसा खर्च करायचा हा ज्याचा त्याचा 'चॉईस' आहे. आदर्शवादाची सक्ती नसते.

/काही लोक नुसतेच उपदेशाचे डोस पाजतात तर काही अनुभवातून मिळालेल्या गोष्टी वाटण्याचा प्रयत्न करतात.... व्यक्तिपरत्वे सगळं बदलत राहतं.