बनाना / अ‍ॅपल पॅनकेक

Submitted by वावे on 10 December, 2018 - 03:37
लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ केळी किंवा १ सफरचंद
१ वाटी कणीक
२ वाट्या तांदुळाची पिठी
१ अंडं
अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ/ साखर/ पिठीसाखर
अर्धी वाटी सुकामेवा ( बदाम, अक्रोड, अंजीर इत्यादी)
भाजण्यासाठी तूप
IMG_20181210_063433656.jpg

क्रमवार पाककृती: 

कणीक आणि तांदुळाची पिठी एकत्र करून घ्या.
अंडं एका वाटीत फोडून फेटून घ्या.
सुकामेवा बारीक चिरून घ्या. अगदी लहान मुलं ( दीड-दोन वर्षांची ) खाणार असतील तर सरळ किसून घ्या.
कणीक आणि तांदुळाच्या पिठीत फेटलेलं अंडं, चिरलेला सुकामेवा, गूळ/ साखर यापैकी जे वापरत असाल ते घालून थोडं पाणी घालून हाताने गुठळ्या मोडून ओलसर भिजवा. पातळ अजिबात करू नका.
केळं मॅश करा. / सफरचंद किसा आणि वरच्या मिश्रणात घाला.
आता हळूहळू पाणी घालत घालत नीट ढवळत मिश्रण थोडं सैल करा.
साधारणपणे आपण केकचं बॅटर करतो तेवढं सैल मिश्रण पुरे. डावेने सहज तव्यावर घालता आलं पाहिजे.
तवा/ फ्रायपॅन तापवून घ्या. थोडं तूप घाला आणि त्यावर लहान लहान पॅनकेक घाला. तव्याच्या आकाराप्रमाणे २/३/४ एकावेळी होतील. झाकण ठेवा. एका बाजूने झाले की उलटा. खरपूस भाजून घ्या.
IMG_20181210_073528154.jpgIMG_20181210_093154052_HDR.jpg

वाढणी/प्रमाण: 
एवढ्या सामग्रीत १३-१४ पॅनकेक होतील
अधिक टिपा: 

अंडं घालायचं नसेल तर बहुतेक बेकिंग पावडर किंवा सोडा घालावा लागेल हलके होण्यासाठी. अंडं घातलं की पोषणमूल्य वाढतंच, पण शिवाय अजून एक फायदा हा, की नॉनस्टिक नसेल तरीही तव्यावरून सहज सुटतात.

गूळ/ साखर काहीच नको असेल तर खजूर सिरप मिळतं ते घातलं तरी चालेल.

फळं ऐनवेळीच मॅश करा. नाहीतर काळी पडतील. बाकी तयारी आधी करून ठेवता येईल.

मुलांना डब्यात देता येतात. अगदी लहान मुलांनाही ( एक-दीड वर्षाच्या) आवडतात.

माहितीचा स्रोत: 
काही वर्षांपूर्वी आम्ही सारे खवय्ये किंवा मेजवानी यापैकी एका कार्यक्रमात पाहिला होता.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद भरत आणि वेडोबा.
अंडं नसेल घालायचं तर एकतर बेकिंग सोडा किंवा फ्रूट सॉल्ट घाला ढोकळ्यात घालतो तसं, किंवा पिठं एकत्र करून भिजवून ठेवा आणि जरा पातळ घाला धिरडं टाईप.

छान.

माझा अत्यंत आवडता प्रकार, फक्त मी केळिच वापरते आणि कणिक.
आणि भिजवायला अर्धं दुध, उरलेल पाणि.

दालचिनी पूड घालण्याची आयडिया छान आहे. मला नाही सुचली कधी Happy हा प्रकार नेहमी डबा देण्यासाठी सकाळी घाईत करते. त्यामुळे फार विचार नाही केला
दक्षिणा, मूळ रेसिपीत दूधच होतं Happy
सर्वांना धन्यवाद!

छान पाकृ.

फक्त मी केळिच वापरते आणि कणिक. आणि भिजवायला अर्धं दुध, उरलेल पाणि.>>+ सुका मेवा पावडर +१

आम्ही बनवतो तो साधारण असाच असतो पण जास्त सुटसुटीत

1 अंडे+एक केळे एकत्र फेटावे,
त्यात व्हॅनिला इसेन्स + किसलेला गुळ/काकवी/मॅपल सिरप/ खजूर सिरप घालावे, हे पूर्णपणे ऐच्छिक आहे
1 वाटी ओट चे पीठ किंवा कणिक
1 चिमूट बेकिंग सोडा ऐच्छिक

हवे तितके मिश्रण सैल करण्यासाठी दूध

बाकी कृती सेम.

यात पीठ घातले नाही तर नीर डोश्यासारखे एकदम लुसलुशीत बनाना ऑम्लेट बनतात ( पण उलटायला अशक्य असते)

मी अमि, दोनच पॅनकेक म्हणजे बरंच कमी प्रमाण घ्यावं लागेल. एकच छोटं सोनकेळं घेऊन करून बघा.
सिम्बा तुमची पद्धतपण छान वाटतेय. करून बघायला पाहिजे. ओट्सऐवजी लाह्यांचं पीठ चालेल ना! मस्त हलके होतील छान. ( मला ओट्स आवडत नाहीत Happy )

सुटसुटीत आणि छान रेसीपी आहे. ब्रेकफास्ट आयटेम म्हणून चालून जाईल. घरात काकवीची बाटली तिचा उपयोग कुठे करावा न कळल्यामुळे पडून होती. आता सिम्बच्या पोस्टमध्ये टीप मिळाली.

पॅनकेक्स टिफिन मध्ये चांगले लागतील का? मी नेहमी गरमच खाल्ले आहेत

शाली आणि मीरा, धन्यवाद!
मीरा, मी मुलांना डब्यात देते हे पॅनकेक्स. मीही उरलेला गार झालेला एखादा नंतर खाते. चांगले लागतात. फक्त soggy नको व्हायला. वाफ पूर्ण गेली पाहिजे गार करताना.

अंडे न घालता , ह्याच मटेरियलचे गाकर होऊ शकतात , मिसळून पोळीप्रमाणे लाटून भाजावे

त्यात थोडा रवा , बडीशेप आणि अर्धी हिरवी मिरची तुकडे करून घालावी, गोड तिखट मस्त चव लागते.