फ्रेंच फ्राईज

Submitted by मकरंद गोडबोले on 6 December, 2018 - 12:08

आपट्यांची टीना आमच्या बिल्डिंगिला फ्रेंच फ्राईज म्हणते. म्हणजे त्याचे काय झाले, तिनी नको त्या वयात नको ते केले. ती चांगली बघत्या पिढीतील मुलगी, ती आमच्या वाचत्या पिढितल्या लोकांचे ऐकून, केवळ पुलंची शंभरी आली म्हणून, आणि कलपकाका, हे तिनीच ठेवलेले नाव बरंका. तसे कलपकाका म्हातारे नव्हते. पण ते दिसायचे. त्यांना चिरतारुण्याची विलक्षण हौस. ते अगदी चाळिशिच्या जवळपास होते. फक्त तिसेक वर्षांचा फरक. पण यांचे सगळे केस पूर्ण काळे होते. अगदी नैसर्गिक कलप लावल्यासारखे दिसायचे. म्हणून कलपकाका. चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून खरेतर त्यांचे आडनाव सुरकुतलेले असे ठेवायला हरकत नव्हती. पण टिनाचे समाधान कलपकाकावर झाले. त्यामुळे सुरकुतलेले, हे खानकाकूंनी ठेवलेले नाव मागे पडले. अर्थांत त्यांना याचा योग्य तो राग आहेच.
तर कलपकाकांनी सांगितल्यामुळे टिनानी, आणि पुलंची शंभरी आल्यामुळे, अशा दोन कारणांमुळे, टिनानी, युट्यूबवर पोटॅटो चाॅल, हे अर्थातच इंग्रजीत टायपून मनापासून शोधले. त्याचे झाले असे, की कलपकाकांचा नारळ, टिनाच्या धक्क्यानी लिफ्टमधे, कलपकाकांनी, आठवडेबाजारातून नुकत्याच खरेदी केलेल्या पिशवीतून, उडी मारून बाहेर पडला. आता अतितारुण्यामुळे कलपकाकांना, वाकून तो नारळ उचलणे शक्य नव्हते. वाकताना दुसऱ्या हातातली पिशवी, खाली ठेवायला लागली असती. मग तिच्या बंदांनी मलूल होउन जमिनीवर लोळण घेतली असती. आणि मग ती पिशवी उचलणे केवळ अशक्य झाले असते. त्यापेक्षा टीनाला ओरडणे सोपे होते. म्हणून ते वराडले. टिनाची काहीच चूक नव्हती. लिफ्टचे दार बंद होउन सिग्नल मरतुकडायच्या आधी तिला एक महत्वाचा मेसेज व्हाॅट्सॅपायचा होता. नाहीतर जगात ती क्रांती वगैरे झाली असती. इकडची खबर तिकडे नेटवेगाने गेलीच नसती. त्यामुळे तिचा धक्का कलपकाकांच्या पिशवीला बसून त्यातला एक नारळ धरातिर्थी पडल्याचे तिला खरेच कळले नाही. नाहीतर तिने, लगेच त्याचा फोटो, काढून "शेम इन लिफ्ट. पीपल्स सांडींग देर थिंग्ज हीरॅंडदेर, ॲंड गार्बेजिंग आॅर ब्युटिफूल लिफ्ट" हे लगेच व्हाॅट्सॅपी वर्ग केले असतेच. पण ही प्रतिक्षिप्त क्रिया व्हायच्या आधीच कलपकाका, पिंकिच्या आईला म्हणाले, " बघा ही हल्लिची पोरं. एक तर धक्का दिल्याचे काहीच नाही. त्या फोनात इतके डोळे घालतात की आजूबाजूचे दिसतही नाही. वर आमचे निरपराध नारळ सांडतात ते सांडतातच" यावर पिंकिच्या आईची, लिफ्टमधल्या आरशात गुंतलेली नजर जराही ढळली नाही. हे बघून कलपकाका टिनाला म्हणाले, "हिला जायचंय खरेतर चौथ्या मजल्यावर, पण हिनी त्या मजल्याचे बटण दाबलेच नाहीय" हे मात्र खरे होते. ती लिफ्टमधे घुसल्यावर लगेचच समोरच्या आरश्यात गुंतून जाते. आणि मग तो हिप्नाॅटिक प्रकार तिची पाठच सोडत नाही. मग समोर दिसणाऱ्या स्वर्गीय सौंदर्यापुढे लिफ्टचे बटण दाबणे वगैरे फालतू गोष्टींचे तिला काही पडलेले नसते. म्हणजे माझी आणि तिची ओळख ही अशीच झाली होती. झाले काय तर आम्ही एकाच वेळी लिफ्टलो. मी तिला हॅललो. तर ती ही अशी, आरशात गुंतलेली. मी मग न बोलताच माझ्या मजल्यावर उतरलो. ही बया पोठोपाठ. सरळ आमच्या फ्लॅटसमोर जाउन उभी राहिली. नजर मोबाईली गुंतली होती. खाली बघतच बेल वाजवली माझ्या फ्लॅटची. मी मागे नुसताच उभा. ही मधे असल्याने काहीच करू शकत नव्हतो. आतून सिडने मला बघून दार उघडले. ही सरळ आत घुसली. दार लावताना माझ्यावर नजर गेली, आणि मग म्हणाली, "कोण हवंय?" हे बघून मी बावचळलो, आणि सिड हसत सुटला. त्याला बघून तिला अजून प्रश्न पडला, की तो तिच्या फ्लॅटमधे काय करतोय. मग एकदम पिंकि आठवून, ती त्याच्याकडे रागाने बघत आत गेली. तेव्हा तिला हा फ्लॅट तिचा नाही हे कळले. मग साॅरी म्हणताना सुरेख लाजली. मी मोटरसायकल घेउन गेल्यामुळे डोक्यावर हेल्मेट होते, म्हणून असेल कदाचित. नाहीतर मला इतके सुंदर लाजून साॅरी कोण म्हणणार?
तर ते बघून उगाच लाजलेले हेल्मेट मी त्वरेने काढून शेल्फी रुजू केले. आणि गाल परत काळे होईपर्यंत बूट काढायचे नाटक करत बसलो. पण चाणाक्ष चिरंजीवांच्या नजरेतून काही हे सुटले नाही. त्याच्या मित्रांच्या पार्टिची लगेचच सोय झाली त्यामुळे. म्हणजे मी काही अगदी….. असो, ही गोष्ट माझी नसून कलपकाकांची, आणि त्यांच्या टिनाबरोबरच्या अफेअरची आहे.
थोडक्यात काय, तर कलपकाकांच्या मुखवाफेकडे पिंकीच्या आईने संपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे, त्यांना नाईलाजानी टिनाशी बोलावे लागले. नारळ उचलून देण्याचा परोपकार, पिंकीची आई करणार नाही हे नक्की होते. ती चारपाचवेळा लिफ्टमधून खालीवर करेल, आणि भानावर आली, की खाली उतरेल. आज दुसऱ्या कुणाच्या घरात, पोराच्या पार्टिची सोय होईल. त्यामुळे या परोपकाराची भीक, ही टीनाकडेच मागायला लागणार होती.
पण टीना तशी गुणी मुलगी आहे. ती बिल्डिंगितल्या सगळ्यांची सोय बघत असे. आमच्या बिल्डिंगीत टॅंकटाॅप नावाचा आखूडशिंगी बहू…… ते महत्त्वाचे नाही. तर हा प्रकार तिनीच आणला. त्याखाली घातलेली तुमान फाटलेली होती. यावर काळजी वाटून खानकाका तिच्या आईला म्हणाले होते, की त्यांच्या झरिनाकडे कपडे थोडे जास्त होते. आणि तसेही बुरख्याच्या आत झरिनाने फाटकी तुमान घातली काय, अन चांगली घातली काय. तर तिची तुमान हिला देउन, हिची तुमान झरिनाला देउया असा त्यांच्यापरिने योग्य सल्ला त्यांनी टीनाच्या आईला दिला. यावर टीनाचा टॅंक टाॅप इतका उसळला, की ज्याचे नाव ते. दिपिकाने केलेल्या लाकडी घाण्यावरच्या बदामी तेलाच्या जाहिरातीत दिसलेली जीन्स बघून, अनेक माॅलआवर्स खर्ची करून बरोब्बर तशी फाटलेली जीन्स, ही काय अशी कुणालाही देण्यासाठी आणली आहे काय? असा तिनी रागीट प्रश्न केला. पण हे नवीन कपडे न आवडणाऱ्या खानकाकांचे लक्ष, त्या उसळलेल्या टॅंकटाॅपकडेच होते, त्यामुळे त्यांच्या कानावर फारसे पडले नाही. वर उमरका लिहाजा वगैरे काहीतरी बरळत ते निघून गेले.
सांगायचा मुद्दा असा, की टीना तशी परोपकारी आणि गुणी मुलगी. तिनी आपल्यामुळे कलपकाकांचा नारळ खाली पडला हे बघून, लगेचच तो उचलून त्यांना दिला. दिला म्हणजे, त्यांच्या पिशवीत टाकला. तो टाकताना तिला पाटॅटो दिसले. ते तिला भयंकर आवडतात. त्यामुळे, ती "अय्या पोटॅटो" अशी चित्कारली. ही तरूण पिढीबरोबर करायच्या इन्फाॅर्मल संवादाची संधी कलपकाका सोडतील तरच नवल. याची संधी घेउन त्यांनी तिला कसे आत्ताची मुले पुस्तके वाचत नाहीत. मराठी साहित्य कसे नेटच्या उदरात गडप होत चालले आहे. पुल नावाचे महान लेखक आज कुणाला तरी माहीत आहेत का? वगैरे मोलाचे प्रश्न तिच्या कानी उतरवले. वर हे समाजकार्य केल्याच्या आनंदात ते इतर काही वयोत्तर गोष्टी विसरून गेले. आणि पिशव्या जपत, चुकून पिंकिच्या आईच्या मजल्यावरच उतरले.
पण टिनाच्या बालमनावर मात्र परिणाम झाला होता. तिच्या कट्ट्यावर मराठी कशी आपली अजूनही मातृभाषा आहे, आणि आपण कसा तिचा आदर करायला हवा हे झालेले बोलणे आठवून तिला आपण हे करतच नाही यांचे वाईट वाटले. मगाच्या परोपकाराचा, तिनी कलपकाका, नारळ आणि ती असा सेल्फी काढलाच होता. त्यात तिचा टाॅप योग्य रितिने टॅंकलेला बघून ती खूष झाली, आणि लगेचच हा परोपकारी डिपी, तिनी इन्स्टाग्रामी वर्ग केला. तसेच यौरस्टोरीमधे पण टाकला. पण हे करताना तिच्या मनात मात्र कलपकाकांचे शब्द वळवळत होते. मग तिनी सिग्नलची पर्वा न करता यूट्यूबी नवा सर्च दिला, 'पोटॅटो चाॅल'
बटाट्याच्या साधारण सगळ्या रेसिपीज संपता संपता गेलाबाजार तिनेकशे व्हिडिओजनंतर, तिला खाली दात पुढे असलेल्या एका हसणाऱ्या माणसाचे चित्र दिसले. त्यांच्यावर लिहिले होते बटाट्याची चाळ. किती बॅकवर्ड, असे मनातल्या मनात म्हणत तिनी तो व्हडिओ चालू केला. साधारण दीड सेकंदात त्याचे बोअर म्युझिक एकून तिनी तो बंदही केला. एकंदरीत मराठिची लायकी ती एवढीच, असे ती मनाशी म्हणाली. पण रात्री सगळे व्हाॅट्सॅपी फ्रेंड आॅफलाईन झाल्यावर खूप स्क्रिन ॲक्टिव्हिटी झाल्यामुळे उडालेल्या झोपेमुळे तिच्याकडे इतका वेळ होता, की ती त्या बोअर म्युझिकच्या पुढे जाईल. मग मात्र त्या दात पुढे आलेल्या आजोबांनी, जे काही तिला धरून ठेवले. ते समेळकाकांपासून पेद्रोपर्यंत सगळी नावे पाठ झाल्यावरच मोबाईल हातातून सुटला.
सकाळी आईशी बोलताना ती म्हणाली, 'मम्मा, पुलंचे फ्रेंच फ्राईज मस्त आहेत गं" मम्मा असूयेनी तिला म्हणाली, " हो का, आज करते, ते खाऊन बघ, मग मला सांग" असे म्हणून तिने रागाने बटाट्यांवर सालकाढी चालवायला सुरुवात केली. पण टीनाची कळी खुलली होती. तिला सिल्वन टाॅवर नावाच्या बारा मजली चाॅलिला एक छान नवे नाव सुचले होते. तिनी तातडिनी खाली उतरून, रस्ता ओलांडून, त्याच्या पलीकडून सिल्वन टाॅवर संपूर्ण येईल याची काळजी घेत एक माॅर्निॅग सेल्फी काढला, आणि यौर स्टोरीमधे टाकला, 'आवर ओन फ्रेंच फ्राईज'

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Rofl Rofl
ऑफिसमध्ये लेख वाचण्याची चूक केली... हसून हसून खुर्चीतून पडायचाच बाकी होतो.
हो का, आज करते, ते खाऊन बघ, मग मला सांग" असे म्हणून तिने रागाने बटाट्यांवर सालकाढी चालवायला सुरुवात केली. >> Lol
'लिफ्टलो' वगैरे शब्द फारच आवडले.

मस्त लिहिलंय
ते बुरख्या आड फाटकी जीन्स वगैरे कल्पना जबरा.