ठरविले अनंते

Submitted by चिमण on 6 December, 2018 - 04:29

(टीपः हा लेख मायबोलीच्या २००८ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता तो इथे परत टाकतोय. त्याला ३ कारणं आहेत. १) मायबोलीच्या काही दिवाळी अंकामधले लेख बघताच येत नाहीत सध्या! त्यात २००८ चा पण आहे. २) २००८ साली दिवाळी अंकातल्या लेखांवर प्रतिक्रिया देता येत नव्हत्या. त्यामुळे मला हा लेख लोकांना कसा वाटला ते कधीच समजलं नाही. ३) कॉपी-पेस्ट करणं हा प्रत्येक कोडग्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. )

"चिमण्या? तू बघता बघता शंभरी गाठलीस?" मित्रांबरोबर आमचा साप्ताहीक बाहेरख्यालीपणा (म्हणजे बाहेरचं हादडणं) चालू होता तेंव्हा मक्या एवढ्या जोरात ओरडला की आजुबाजूच्या टेबलांवरचं वातावरण एकदम तंग झालं.. लहान पोरं घाबरून रडायला लागली... पण नंतर सगळं आलबेल आहे हे कळताच लोकांच्या प्रश्नांकित नजरा 'सोसत नाही तर ढोसायची कशाला इतकी' अशा बदलल्या. आम्हाला हे नेहमीचच होतं म्हणून त्याचं काही सुखदु:ख नव्हतं. मक्याच्या डोळ्यात मात्र 'काय होतास तू, काय झालास तू' असे भाव विस्फारले होते. हे आश्चर्य मी वयाची शंभरी गाठण्याबद्दल नसून वजनाची शंभरी गाठण्याबद्दल होतं कारण माझ्या बायकोनं.. म्हणजे सरीतानं.. नुकताच तसा गौप्यस्फोट केला होता.

मी, सरीता, मकरंद (मक्या) प्रभू व त्याची बायको माया आणि दिलीप(दिल्या) अत्रे दर आठवड्याला भेटतो. सामान्य लोकांसाठी असलेल्या एका सामान्य बँकेत मी एक सामान्य मॅनेजर आहे व सरीता घर सांभाळते. मक्या आय टी कंपनीत मॅनेजर आहे आणि माया आयुर्वेदीक डॉक्टर आहे. दिल्या CA आहे आणि त्याची स्वतःची इन्व्हेस्ट्मेंट कंपनी आहे. 'ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हा मृत्यु' या उक्तीवर गाढा विश्वास असल्यामुळे दिल्या अजून सडाफटींगच आहे. त्याला चतुर्भुज करायचे आमचे सर्व प्रयत्न असफल झाल्यानं आम्हीही आता नाद सोडून दिलाय.

मक्या: "तुला आता क्विंटलकुमारच म्हणायला पायजे!" मक्यानं काडी लावली.. त्याला आम्ही काडीपैलवान म्हणतो.. सारख्या काड्या लावतो म्हणून.

दिल्या: "त्यापेक्षा 'चिमण्या गणपती' चांगल आहे! यावर अजुन एक पेग!" मक्यानं नावं ठेवायला सुरवात केल्यावर दिल्या कसा मागं राहणार?
मक्या: "चिमण्या, तू टिळक रोडवरून जाऊ नकोस हां! तिथं 'जड वाहनास प्रवेश बंद' अशी पाटी आहे!" मक्याला दारू आणि अतिशयोक्ती एकदमच चढते.

सरीता: "हो ना! लग्नात कसा मस्त पाप्याचं पितर होता!" मस्त पाप्याचं पितर? मी सरीताकडे 'ईश्वरा! या वयात आता काय काय ऐकायला लावणार आहेस?' अशा नजरेनं पाहीलं. ही बया आमचा मधुचंद्र चालू असतांना माझ्यावर रुसली होती... का? तर, ती एका ओढ्यात पाय घसरून पडली आणि मी तिला हीरोसारखं उचलू शकलो नाही. हीरो पण कसे अगदी एखादी पिशवी उचलून खांद्यावर टाकावी इतक्या सहजपणे हिरॉइनला खांद्यावर टाकतात ना?.. त्यांच बरं असतं म्हणा.. रोज हिरॉइन्या उचलून प्रॅक्टीस झालेली असते.. पण माझी पहीलीच वेळ होती ना? पोरीपण काय काय खुळचट रोमँटीक कल्पना घेऊन लग्न करतात ना? तेंव्हा मला काय माहीत असणार म्हणा.. माझं तर पहीलच लग्न होतं.. मग काय? मधुचंद्राचा कडुचंद्र झाला.. अर्ध्यातूनच परत यावं लागलं.

मी: "हे बघा! या सगळ्याला सरीताच जबाबदार आहे. ती एवढ्या ढीगभर गोष्टी खायला करते की बस्स! आमच्याकडे सगळ्यांची पोटभर जेवणं झाल्यावरसुध्दा चार माणसांच उरतं. आणि मग नवरा नावाचा हक्काचा कचरा डेपो असतोच ते डंप करायला." मी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला पण तो अंगाशी आला.

सरीता: "एs! हा माझ्या स्वैपाकाला कचरा म्हणतो!!!" बायकांमधे कांगावखोरपणा उपजतंच असतो की काय कोण जाणे. पण सरीताची ही आर्त फिर्याद ऐकून सगळे लगेच 'इस्लाम खतरेमें हैं' ष्टाईलमधे मदतीला धावले.

दिल्या: "पहीलं म्हणजे कोकणस्थाच्या घरात चार माणसांच जेवण उरतं ही सरासर अतिशयोक्ती आहे." दिल्याला इथं प्रादेशिक रंग देण्याचं काही कारण होतं का?.. पण त्याच देशस्थी रक्त अशी कुठलीही संधी सहसा सोडत नाही.. दिल्या खरा माझा शाळेपासुनचा मित्र.. माझ्याबाजुनं बोलणं जमणार नसेल तर किमानपक्षी त्यानं गप्प रहावं एवढीच माझी अपेक्षा असते.. पण सरीतानं त्याला येताजाता खाऊपिऊ घालून असा पध्दतशीरपणे फितवलाय की मला तोंडावर पाडण्यातच त्याला मजा वाटते!

माया: "गाढवाला काय गुळाची चव?" इतका वेळ मोबाइलवर 'अय्या! खरंच?' इ.इ. चीत्कार करणार्‍या मक्याच्या बायकोनं... मायानं.. सरीताची बाजू घेतली... नुस्ती घेतली नाही तर वरती सरीताला टाळी दिली. एकाच वेळेला दोन्हीकडे लक्ष ठेवण्याची किमया फक्त बायकानांच जमते म्हणा, नाहीतर मोबाईलवरची टुरटुर संपल्या संपल्या सरीताच्या बाजूनं बोलणं कुणा पुरूषाला जमलं असतं का?

मक्या: "अरे, सरीताच्या स्वैपाकाला कचरा म्हणणं म्हणजे चितळेंच्या बाखरवडीला कोळसा म्हणण्यासारखं आहे." मक्या काय बायकोचीच री ओढणार! यालाच म्हणतात 'घर फिरलं की वासे पण फिरतात'!

मी: "गाढवांनो! निष्कारण चेकाळू नका! मी क्वांटीटी बद्दल बोलतोय क्वालीटी बद्दल नाही!"... मी जोरदार निषेध सुरू केला... "मी कोब्रा असलो तरी सरीता देब्रा आहे हे तुम्हालाही माहीतीय त्यामुळे अतिशयोक्तीचा काही प्रश्नच येत नाही. पण रोज थोडं अन्न उरवायचं अशी माझ्या शत्रुपक्षाची (म्हणजे सासुरवाडी) शिकवण आहे व त्याचं ती निष्ठेनं अजून पालन करते.. त्याला कोब्रा काय करणार?". माझ्यावरच्या चढाईला मी अगतिकतेचं डायव्हर्जन दाखवलं.

दिल्या: "अन्न कशाला उरवायचं?" दिल्याचं कुतुहल जागं झालं.. डायव्हर्जनचा उपयोग झाला वाटतं(!).
मी: "अरे, कधी आपल्या पितरांच्या आत्म्यांना भूक लागली तर खायला". मी नाटकी आवाजात आमच्या शत्रुपक्षाच्या कुळाचाराची चिलीम पेटवली.
दिल्या: "मग सकाळी अन्न कमी झालेलं असतं का?" दिल्याला यूएफो, भुतं-खेतं अशा सर्व गूढगोष्टींबद्दल विशेष आकर्षण आहे.

सरीता: "हो! कधी कधी कमी होतं!" सरीतानं सत्य परिस्थीती सांगितली.

दिल्या: "आईशप्पssत! खरंच?" दिल्याच्या हातातला चमचा खाली पडला. आमच्या घरात भुतं येऊन जेऊन जातात आणि आम्ही निवांतपणे झोपलेलो असतो याचा भीतियुक्त आदर त्याच्या डोळ्यात चमकायला लागला.

मी: "हो! मला कधी कधी रात्रीची जाग येतेना....." मी सुरुवात केली आणि इष्ट परीणामासाठी बिअरचा घोट घ्यायला थांबलो... सगळे कानात प्राण आणून ऐकायला लागले.

मी: "तेंव्हा माझ्या आत्म्याला भूक लागलेली असते आणि तो थोडफार संपवतो." मी थंडपणे सगळ्यांच्या उत्सुकतेचा फुगा फोडला... विशेषतः दिल्याच्या चेहर्‍यावरचा अपेक्षाभंग पाहून मला हसू आवरेना.

दिल्या: "हसतोस काय माकडा! मला वाटलं खरंच काहीतरी अद्भुत सांगतोयस!" वैतागून दिल्या ओरडला आणि मला आणखी जोरात हसू आलं. खरंतर मक्यालाही माझं हे उत्तर अपेक्षित नव्हतं पण सगळ्यांसमोर मान्य कसं करायचं म्हणून तो दिल्याकडे "काय येडा आहे" अशा अर्थाचे हातवारे करत हसायला लागला.

सरीता: "अय्या! हे पाप्याचं पितर खात होतं इतकी वर्षं?" सरीता माझ्याकडे बोट दाखवून किंचाळली. तिच्या चेहर्‍यावर आश्चर्य, भ्रमनिरासाचे दु:ख आणि खूप वर्षांपासून पडलेला प्रश्न सुटल्याचा आनंद सगळं एकत्रितपणे दिसत होतं.

मी: "अरे दिल्या, अडाण्या, आमचं घर म्हणजे भुतांची खानावळ वाटली काय तुला? आं? हां, तसा तू अधूनमधून खाऊन जातोस म्हणा! पण तुला भूत म्हंटल तर भुतं अब्रूनुकसानीचा खटला भरतील ना माझ्यावर." चला! काही नाही तर दिल्याला चेपायची थोडी संधी तरी मिळाली.

मक्या: "आणि चारपेक्षा जास्त भुतं आली तर काय करतोस?" अरे वा! डायव्हर्जन चांगलच काम करतंय.

मी: "उरलेल्यांना पुढच्या दारी जा म्हणून सांगतो". मी त्याला पण वाटेला लावलं.

मक्या: "पण ते काही नाही, तू वजन कमी करायलाच पाहीजे. तुझ्या तोंडाला जरा वेसण घाल." 'खाजगीकरण थांबवलच पाहीजे' सारखं घोषणा वाक्य म्हंटल्याच्या आवेषात मक्यानं परत माझ्या वजनाकडे मोहरा वळवला.

दिल्या: "वेसण तोंडात नाही नाकात घालतात. मायेनं घातलीय तुझ्या नाकात तरी कळत नाहीय्ये तुला." नरडीचा घोट घेतल्यासारखा बिअरचा घोट घेऊन दिल्यानं माझ्यावरचा राग मक्यावर काढला.

माया: "एs! मी नाही हां त्याच्या नाकात वेसण बिसण घातली. एवढ्याशा नकट्या नाकात कशी घालणार?" मायेला इन्कार करायचा होता की खरी अडचण सांगायची होती काही कळलं नाही.

मक्या: "दिल्या! अरे, 'मायेssनं' घातलीय म्हणून कळत नाहीये. तू नस्ता शब्दच्छल कशाला करतोस? भावार्थ समजून घे ना. तर चिमण्या, You need to tighten your belt." मक्यानं त्याच्या कुठल्याशा अमेरीकन क्लायेंटचा वाक्प्रचार फेकून परत माझ्या वजनावर घसरला.. आता नवीन डायव्हर्जन शोधायला पाहीजे.

मी: "बेल्ट कसला टाईट करतोस? अरे फुगा जिथे दाबू तिथे बारीक झालातरी आजुबाजूला फुगतोच ना! माझा डंबेलसारखा आकार होईल ना अशानं! आणि आता मला कुठलाच बेल्ट बसत नाही ते वेगळच". डायव्हर्जनचा एक क्षीण प्रयत्न!

दिल्या: "हां! तू आता असली कोकणस्थासारखं खायला लाग. रोज सकाळ संध्याकाळ पंचपात्रात बसेल एवढंच खायचं. नैवेद्याच्या वाटीत बसेल एवढंच तोंडीलावणं अन् कानकोरण्यात मावेल एवढंच तूप!" दिल्यानं प्रिस्क्रीप्शन दिलं.

मी: "अरे एवढंच? अशानं मी दिसेनासा होईन काही दिवसांनी! "

मक्या: "नेहमीसारखं खाल्लस तरीही दिसेनासा होशील काही दिवसांनी!". खलनायकाच्या सुरात मक्यानं परिस्थितीचं गांभीर्य पटवायचा प्रयत्न केला.

दिल्या: "आणि हो! शिवाय रोज थोडा घाम गाळायचा". दिल्याचं संपतच नाहीय्ये.

मी: "अरे मी घाम गाळतो म्हणून तर आमचा संसार चालू आहे ना! नाहीतर तो केंव्हाच वार्‍यावर गेला असता!" डायव्हर्जनचा अजुन एक प्रयत्न!

सरीता: "काही एवढं आडुन आडुन बोलायला नकोय! सरळ सांग मला, 'तू पण नोकरी कर' म्हणून!". सरीता मुद्दामून असं करते की खरच बोलणं कळत नाही म्हणून करते हे अजूनही मला कळलेलं नाही.

मी: "सरीता तू विरोधीपक्षात जा! कुठल्याही बोलण्याचा विपर्यास करून सरकारला कोंडीत पकडणारी माणसं त्यांना हवी असतात!"

दिल्या: "चिमण्या! तुझे फालतु विनोद बंद कर आणि इकडे लक्ष दे नीट! सरीता, तो तुला काहीही म्हणत नाहीय्ये!" दिल्या कसा माझ्याबाजूनं बोलला?.. छे! आज कोणावरच डायव्हर्जनचा परीणाम होत नाहीय्ये!

दिल्या: "तू जिमला जायला सुरवात कर."

मी: "अरे पण ते फार खर्चिक असतं! शिवाय मला दरवर्षी नवीन कपडे पण घ्यायला लागतात.. मी वाढत्या अंगाचे घेतो तरीही!"

दिल्या: "तू त्याचा ROI बघ आधी! तू काहीच केलं नाहीस तर दोन वर्षांत तुझ्यावर बायपास सर्जरी करायला लागेल. त्यासाठी डॉक्टरला किती द्यावे लागतील माहीतीय?" दिल्यातला इन्व्हेस्टर जागा झाला की तो 'बुल' 'बेअर' असल्या रानटी भाषेत बोलायला लागतो. ROI म्हणजे Return on Investment हे मक्या हळूच बायकोच्या कानात कुजबुजला.

मक्या: "दोन पेट्या!" दाऊद कत्तलखान्याचा प्रोजेक्ट मॅनेजर असल्याच्या थाटात मक्या गुरगुरला.

मी: "डॉक्टर पेट्या घेऊन काय करणार?" डायव्हर्जनचा शेवटचा प्रयत्न!

मक्या: "तुझं मढं कोंबणार कारण ते एका पेटीत मावणार नाही! तू हिंदी पिक्चर पहात नाहीस काय हल्ली? अरे एक पेटी म्हणजे एक लाख रुपये!" हा ऊठसूट मला का पोचवतोय काही कळत नाहीय्ये.. आज माझ्या रूपात त्याला त्याचा क्लायंट दिसतोय बहुतेक!!

माया: "शीsss! काहीतरी अभद्र बोलू नकोस" मायानं त्याला परस्पर झापलं.

दिल्या: "बघ! तू आत्ता काही हजार खर्च केलेस तर पुढे तुझे काही लाख वाचतील!". दिल्या हाडाचा इन्व्हेस्टर आहे. एखादा गुंड त्याच्याकडे चुकून खंडणी मागायला गेलाच तर दिल्या आधी त्याला शांतपणे पैसे देईल.. पण नंतर ते गुंतवल्यावर कसे पटापट वाढतील हे पटवून देऊन परत तेच अलगदपणे काढून घेईल.

शेवटी 'एका मित्राला मृत्युच्या खाईतून वाचवायचं!' असं सामाजिक कार्याचं स्वरूप त्या वादाला आल्यामुळं माझ्या प्रतिकाराला न जुमानता सर्वांनी 'मी वजन कमी केलचं पाहीजे' यावर शिक्कामोर्तब केलं.
******************************************************************

दुपारचं जेवण करून मी नेहमीप्रमाणे चहा घेऊन माझ्या खोलीकडे चाललो होतो तेवढ्यात बँकेतल्या साळकाया माळकायांची डबा चरता चरता चाललेली बडबड ऐकू आली नी मी थबकलो.

कुलकर्णीबाई: "....तो विसपुते आला होता ना परवा पैसे काढायला". मला या विसपुतेची परवाची केस चांगली लक्षात आहे म्हणूनच मी लोकांच्या मनाचा कानोसा घ्यायला लपून उभा राहीलो.

शिंदेबाई: "विसपुते म्हणजे तो विश्वकर्मा फर्नीचरचा मालक ना! हरामखोर आहे मेला!" शिंदेबाईंनी पूर्वी त्याच्याकडून घेतलेल्या फर्नीचरमधे नंतर काहीतरी गोची झाली म्हणून त्यांचा त्याच्यावर कायमस्वरूपी राग आहे.

कुलकर्णीबाई: "हो हो तोच तो! थोडेथोडके नाही चांगले अडीच लाख रुपये काढायला आला होता! कॅश! मोठी रक्कम आहे म्हणून मी सुमोकडे गेले सही घ्यायला!" आयला! माझ्याचबद्दल बोलताहेत की या बायका! माझ्याकडेच आली होती ही बया परवा सही घ्यायला. सुमो? हे नवीन दिसतंय.. पूर्वी मला टकलूहैवान म्हणायच्या ते माहिती होतं.. आता 'सुमो' काय?

पायगुडेबाई: "मग?"

कुलकर्णीबाई: "तर सुमो म्हणतो कसा.. 'अहो बाई! तुमच्या अधिकारातली आहे ती रक्कम.. तुम्ही पण सही करू शकता!'. एवढं म्हणून थांबला नाही तर मला सही करायला लावली आणि वर म्हणाला 'तुम्ही आता जबाबदारी घेतली पाहीजे'".

शिंदेबाई: "म्हणजे बघा! आपण जबाबदारी घ्यायची नाही ते नाहीच आणि वर दुसर्‍याला अक्कल शिकवायची!"

कुलकर्णीबाई: "बघ ना! वरचीच माणसं अशी करायला लागली तर आपण काय करायचं?" या गहन समस्येवरील सर्व तात्विक चर्चा ऐकायला थांबलो तर स्त्रियांचा होणारा मानसीक छळ, पुरूषांची अरेरावी, स्त्रियांच्या हक्कांची तुडवणूक असं बरच काही मिळालं असतं.. मी तिथनं काढता पाय घेतला... पण जाता जाता डोक्यात एकच... बघून घेईन या भवान्यांना!.. सुमो म्हणतात काय? नाही नॅनो होऊन दाखवलं तर नावाचा चिमण नाही.
******************************************************************

झालं, एका शनीवारी जाऊन आमच्या जवळच्या जिममधे नाव नोंदवून आलो... एकदम एका वर्षासाठी.. हो, कारण ते स्वस्त पडत होतं. मग बाजारात जाऊन ट्रॅक सूट, नवीन शूज, आयपॉड अशा इतर वस्तू खरेदी केल्या.. आपलं म्हणजे कसं व्यवस्थित असतं. सगळ्या जाम्यानिम्यानिशी पहील्या दिवशी बरोब्बर सकाळी सहा वाजता जिममधे हजर झालो. गेल्या गेल्या एका ट्रेनरनं कब्जा घेतला आणि पुढचा तासभर हाल केले.. पहील्यांदा त्यान मला ट्रेड मिलवर चालायला सांगीतलं.. चालायला कसलं? पळायलाच.. आयपॉडचे बोळे कानात कोंबून मी गाणी चालू केली आणि पळायला लागलो.. थोड्याच वेळात हेमंतकुमारचं 'दूरका राही' मधलं गाण लागलं.. अशी धीरगंभीर गाणी पळत पळत ऐकतात काय?.. ती शांतपणे, नीट आस्वाद घेतच ऐकली पाहीजेत.. मग मी ट्रेड मिल थांबवून ऐकू लागलो..

'मंझिलकी उसे कुछभी ना खबर'
'फिरभी चला जाय दूरका राही'

वा! वा! काय आवाज आहे या माणसाचा? माझं पूर्ण लक्ष गाण्यात असतानाच हेमंतकुमार एकदम 'चला! गोखले! चला!' असं शुध्द मराठीत खेकसला.. इतका वेळ त्या दूरका राहीला 'चला, चला' करणारा हेमंतकुमार एकदम मला कसा काय चला म्हणाला?.. बघतो तर तो ट्रेनर 'हल्याss! थिर्रर्रsss!' चा आविर्भाव करून मला पळायला सांगतोय असं लक्षात आलं.. आयला! पूर्वी शेतावर कामाला होता काय? हॅ! आता असली सगळी गाणी काढून त्याऐवजी 'नौजवान सैनिका उचल पावला, पुढे चला पुढे चला ध्वनी निनादला' असली देशभक्तीपर गाणी भरायला लागणार.. म्हणजे मुळीच व्यायाम थांबवून ऐकावीशी वाटणार नाहीत आणि झोपही लागणार नाही.

सर्वसाधारणपणे सर्व व्यायाम प्रकार इकडे पळ, तिकडे उड्या मार, हे उचल किंवा ते ढकल यातच मोडणारे होते. जाता जाता त्यानं मला न्युट्रीशनीस्टला भेटायला सांगीतलं. न्युट्रीशनीस्ट, कल्पना नायडू नावाची एक बाई निघाली.. साधारण ३५-३६ वर्षांची असेल.. पण एकदम आकर्षक.. गव्हाळ वर्णाची.. खांद्यापर्यंत रुळणारे केस.. अधुनमधुन मानेला हलकासा झटका देऊन कपाळावरचे केस मागे नेण्याची ष्टाईल.. सगळच मोहक. मग माझं वजन करण्यात आलं.. ते पाहून तिनं काहीच आश्चर्य दाखवलं नाही.. माझ्यासारखी पुष्कळ वजनदार मंडळी रोजच तिला पहायला मिळत असणार म्हणा. मी तिचं सौंदर्यग्रहण करण्यात दंग होतो तेवढ्यात तिनं माझ्याकडं न बघताच बोलायला सुरुवात केली.

कल्पना: "तुमचं वजन उंचीच्या मानानं जरा जास्त आहे. तुमच्या उंचीला ६५ किलो वजन योग्य आहे. तुम्हाला जवळपास ३५ किलोतरी कमी करायला लागतील. आता मी तुम्हाला तुमचं डाएट सांगते." ती हे बोलत असताना प्रथमच मी तिच्या डोळ्यात नीट पाहीलं. काय विलक्षण डोळे होते तिचे.. मोठे.. काळेभोर.. नक्कीच काहीतरी जादु होती त्यात.. बोलणं ऐकता ऐकता तिच्या डोळ्यांच्या डोहात मी बुडायला लागलो.. आजुबाजुला काय चाललं आहे ते समजेनासं झालं.. ती काय काय खायचं नाही ते सांगत असावी बहुधा.. मला ते नीट ऐकू येत नव्हतं.. फक्त 'खायचं नाही' 'खायचं नाही' असं काहीतरी खूप लांबून ऐकू येत होतं.. एव्हाना मी डोहात पार गटांगळ्या खायला लागलो होतो.. ना धड तळ सापडत होता.. ना किनारा.. एवढ्यात असं वाटलं की कुणीतरी मला ओढून बाहेर काढतय.. खाडकन् शुध्दीवर आलो.. कल्पना माझा हात ओढून विचारत होती.

कल्पना: "अहो! काय झालं तुम्हाला? काय काय खायचं नाही सांगत होते मी?" मी एकदम शरमिंदा झालो.. काय हे!.. केवढी गोची केली आपण!.. बँकेत इतक्या बायकांशी रोज बोलतो.. पण असं कधी झालं नाही मला!.. आयला! न्युट्रीशनीस्ट आहे की हिप्-नॉटीस्ट! आता काहीतरी सारवासारव केली पाहीजे ना!

मी: "अंss! हां! गटांगळ्या खायच्या नाहीत! नाही.. नाही.. आपलं ते हे... बरच काही खायचं नाही. तुम्ही मराठी फार छान बोलता हो!" मी नजर टाळत काहीबाही बकलो.. बाईची काहीतरी कारण काढून स्तुति करणं हा सारवासारवीचा उत्तम प्रकार आहे असा अनुभव आहे.

कल्पना: "अहो! मी लहानपणापासून इथंच वाढलेय!". अच्छा! म्हणजे मराठी मातीत छान मिसळली आहे तर!

मी: "असं होय? अरे वा!" याच्यात वा! वा! करण्यासारखं काय होतं? पण मी अजून नीट सावरलो नव्हतो त्याच हे लक्षण!

कल्पना: "हां! तर मी तुम्हाला कॅलरींबद्दल सांगत होते. तुमचं वजन आहे तेवढं टिकवायला तुम्हाला साधारणपणे रोज २२०० कॅलरी लागतात. वजन १ किलोने कमी करायचं असेल तर अंदाजे ७७०० कॅलरी बर्न करायला लागतात. तुम्ही रोज जिममधे तासभर घालवला तर अंदाजे ५०० कॅलरी बर्न होतील." आयला! माझं शरीर म्हणजे जळाऊ कॅलरींची वखार आहे काय?.. सारखं काय बर्न बर्न!.. चुकून जास्त बर्न झालं तर आगच लागायची.

कल्पना: "तुम्ही दिवसभरात १८०० कॅलरी घेतल्या तर साधारणपणे ९ दिवसांनी तुमचं वजन १ किलोनं कमी होईल." अरेच्च्या! हे सोप्प दिसतंय! म्हणजे अकाऊंटला डेबीट जास्त टाकायचं आणि क्रेडीट कमी की बॅलन्स आपोआपच कमी होणार! मला ही डेबीट क्रेडीटची भाषा लवकर समजते. हं! पण ९ दिवसांनी १ किलो म्हणजे ३५ किलो घटवण्यासाठी वर्षभर लढायला लागणार? बापरे!

कल्पना: "तर असं तुम्ही दोन महीने करा मग आपण परत बघू!" तिनं हे समारोपाचं वाक्य टाकल्यावर डोळ्यांकडे न पाहता मी लगेच 'थँक्यू' म्हणून सुटलो.

रस्त्यानं जाताना मला उगीचच हलक हलक वाटत होतं.. नेहमीपेक्षा जास्त वेगान हालचाली करत दिवस घालवला. दुसर्‍या दिवशी जाग आली ती अंग दुखीमुळे.. या कुशीवरून त्या कुशीला पण वळता येत नव्हतं.. शरपंजरी भीष्माच्या वेदना अनुभवल्या अगदी.. देवानं माणसाला इतके अवयव का दिले बरं?.. काही अवयव काढून खुंटीला टांगता आले असते तर किती बरं झालं असतं ना?.. त्यात खूप भूक लागलेली.. पोटात सर्व प्राण्यांनी सभा भरवून कोकलायला सुरूवात केलेली.. काही खाण्याची सोय नाही.. कसाबसा दिवस काढला.. रात्री स्वप्नात नुसते निरनिराळे पदार्थ दिसले.. हारीनं लावलेले.. एक महामाया त्यांच रक्षण करीत होती.. तिच्या दहा हातात दहा शस्त्र होती.. डोळ्यातनं एक मायाजाल विस्तारत होतं.. संमोहन करणारं.. मी नजर चुकवून फक्त एक पेढा खायला गेलो आणि कडाड्!.. एका हातातल्या चाबकाचा फटका ढु-वर बसला.. दरदरून घाम फुटून जाग आली.. भूक लागलेलीच होती.. घरात फारसं काही खाण्याजोगं दिसत नव्हतं.. आत्म्यांवरचा विश्वास उडाल्यामुळे सरीता हल्ली काही उरवत नाही.. एक ब्रेडची स्लाईस खाऊन परत झोपलो.. जावे बुभुक्षितांच्या वंशा तेंव्हा कळे!
******************************************************************

असेच दोन महीने निघून गेले.. पहील्या महीन्यात तब्बल ५ किलो वजन घटवूनसुध्दा दुसर्‍या महीन्यात मी परत पूर्वस्थितीला आलो होतो. गमावलेलं परत कमावल्याचं प्रचंड दु:ख उरावर घेऊन मी साप्ताहीक सभेला आलो.. दोन्ही बायका कुठलसं भुक्कड नाटक बघायला गेल्यामुळे नव्हत्या.

मक्या: "अरे चिमण्या? सुरवातीला जरा कमी झाला होतास. आता परत बाळसं धरलं आहेस वाटतं. डोंगरे बालामॄत पितोस का काय?" माझ्या विशाल इस्टेटीवर हात फिरवीत मक्यानं ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडली.

मी: "पहीला महीना झकास चाललं होतं. चांगलं ५ किलो कमी केलं पण पुढच्या महीन्यात बोंबललं!" वैतागून मी म्हणालो.

दिल्या: "का? काय झालं?"

मी: "अरे! सगळं क्रेडीट डेबीट टॅली झालं". मी हताशपणे सांगीतलं आणि ते दोघेही बुचकळ्यात पडले.

मक्या: "ए भाऊ! जरा सभ्य लोकांच्या भाषेत बोल ना! तू जिमला जातोस का बँकेत?""

मी: "अरे त्या जिममधली सीए आहे ना...".

मक्या: "जिममधे सीए? तुझं मानसिक संतुलन बिघडलंय नक्की!"

मी: "हां! सीए! म्हणजे कॅलरी अकाऊंटंट! माझा नवीन शॉर्टफॉर्म आहे तो!". मग मी वजन कमी जास्त होण्यामागचं क्रेडीट डेबीट तत्व सांगीतलं.

दिल्या: "अच्छा! म्हणजे दोन महीन्यात तुझा बॅलन्स बदललाच नाही! कशामुळे? जिमला जाणं होत नाही म्हणून की हादडणं जास्त होतय म्हणून?"

मी: "दोन्हीही! मागच्या महीन्यात मी आठवडाभर दिल्लीला गेलो होतो ना?.. ट्रेनिंगसाठी! मग एकदम खूप क्रेडीट झालं!"

मक्या: "पण ते तर फक्त आठवड्यासाठीच होतं ना? आल्यावर भरून काढायचं!"

मी: "अरे वा! तुला पण कळतं की! मला वाटलं फक्त मलाच अक्कल आहे!" मी उपरोधानं म्हणालो. "मी परत जायला लागल्यावर एकदा मराठीत पाटी नाही म्हणून गुंडांनी जिमची तोडफोड केली. ३ दिवस जिम बंद होती."

दिल्या: "हम्म! एकंदरीत बराच घोटाळा झालेला दिसतोय. पण एवढ्यान तू परत ५ किलो कमावले?"

मी: "अजून खूप आहे! एकदा मी जिममधे असताना आमच्या कस्टमरचा फोन आला. त्याला तातडीने ५०,००० रू. पाहीजे होते, आईला हॉस्पीटलमधे दाखल करायला. एटीम मधून एकदम एवढे काढता येत नाहीत ना!.. तो तर आमचा चांगला कस्टमर! नशीबान माझ्या घरी ३५००० होते... आदल्या दिवशी सरीताला द्यायला काढलेले.. ते त्याला नेऊन दिले आणि उरलेले एटीम मधून काढायला सांगीतले.. या भानगडीत जिम बुडाली पण."

मक्या: "हेच मी तुला करायला सांगीतलं असतं तर सत्रा कारणं देऊन वाटेला लावला असतास मला!". मघाशी त्याची अक्कल काढल्याचा राग अजून त्याच्या डोक्यातनं गेला नव्हता तर!

मी: "अरे! मी फक्त 'चांगल्या' कस्टमरशीच असा वागतो!". मी मक्याच्या रागाला थोडी फोडणी दिली.

मक्या: "आत्ता तू मॅनेजर आहेस म्हणून तो तुला सारखा गूळ लावतोय. तुझ्याजागी दुसरा कुणी आला की तो त्याला लावेल न् तुला ओळखसुद्धा देणार नाही. पण संकटात हाच वाईट कस्टमर तुला तारायला येईल हे लक्षात ठेव!". हे त्यानं सांगायची काही गरज नव्हती म्हणा! एकमेकांची कितीही टिंगल टवाळी केली तरी ती केवळ मजेखातर असते हे सगळ्यांना माहीत होतं म्हणूनच आमची मैत्री इतकी वर्षं टिकून होती.

दिल्या: "माहीतीय! माहीतीय! उगाच उगाळत बसू नकोस. ए गणपती! तू पुढचं सांग बरं!"

मी: "सध्या गोट्याला स्थळं बघतोय ना त्यामुळे अधनंमधनं शूटिंगला जावं लागतं!". गोट्या म्हणजे माझा मुलगा. कांदेपोहे कार्यक्रमाला आम्ही शूटिंग म्हणतो.

मक्या: "पहाटे सहा वाजता शूटिंग असतं का कधी? काहीही फेकतो! उद्या म्हणशील पुण्याचं गणपती विसर्जन सहाच्या आत संपत म्हणून!"

मी: "पुढचं ऐक ना माठ्या! आत्तापर्यंत १५-१६ शूटिंग झाली.. पण एकीचाही होकार नाही. मग काही ओळखीतून आलेली स्थळं होती त्यांच्याकडून खोदून खोदून कारण काढलं. तर, मी शूटिंगच्या वेळेस तेलकट तूपकट पदार्थांना नाही म्हणतो ना.. माझ्या डाएटसाठी... त्यामुळे मुली नकार देतात असं कळलं.. त्यांना होणार्‍या सासर्‍याचं डाएट म्हणजे 'फाजील लाड' वाटतात... लग्नानंतर प्रत्येक माणसासाठी वेगळा स्वैपाक करायला लागेल अशी आत्तापासून भीति वाटते त्यांना!"

दिल्या: "काय म्हणतोस? खरचं? मग आता काय करणार?"

मी: "आता सुरू केलंय, देतील ते सगळं खायला! माझं डाएट फाफललं ना पण!"

मक्या: "पण जिमला तरी जातोयस ना?"

मी: "अरे कुठलं? हल्ली लोड शेडींग चालू झालय ना.. नेमकं सहा वाजता.. त्यामुळं माझं लोड शेडींग थांबलय. मला वेळ पण बदलून मिळत नाहीय्ये... पुढच्या बॅचेस फुल्ल आहेत. आणि त्यांच्याकडे जनरेटर नाहीय्ये.. पूर्वी पॉवर जायची नाही म्हणून घेतला नव्हता."

दिल्या: "म्हणजे तू हल्ली सहा वाजता भजनं म्हणतोस आणि खायला जे समोर येईल ते रेटतोस. त्यापेक्षा दुसरी जिम लाव ना"

मी: "अरे मी वर्षाची फी भरलीय. ते पैसे परत द्यायला तयार नाहीत.. उलट जेवढे दिवस बुडतील तेवढे वाढवून देऊ म्हणताहेत. आता पैसे सोडून मी दुसर्‍या जिमला जाऊ शकतो पण मग ROI ची वाट लागते ना." दिल्याला त्याच्याच भाषेत ठोकलं की तो निरुत्तर होतो.

मक्या: "हम्म! मामला गंभीर आहे. आपल्याला Out of the box thinking करायला पाहीजे". हॅ! या अमेरीकन लोकांनी मक्यासारख्या एकेकाळी साध्या सरळ बोलणार्‍यांची भाषा पोल्यूट केलीय अगदी.

मी: "कायतरी काय? बॉक्सच्या आतुन, बाहेरून किंवा फटीतून विचार केला तरी लोड शेडींग थांबणार आहे का?"

मक्या: "हे, हेच ते! आपण अशा सगळ्या समस्यांचं एक अदृश्य खोकं आपल्या मनाभोवती नकळत तयार करतो आणि त्यातच गुरफटून जातो. मग आपल्याला काही मार्गच सुचत नाही. म्हणून आपण ते खोकं झुगारून देऊन विचार केला पाहीजे." इथं त्यानं ते अदृश्य खोकं माझ्याकडे फेकण्याचा आविर्भाव केला, पण मला वाटलं तो खरच काहीतरी फेकतोय म्हणून मी चुकवण्याचा प्रयत्न केला.

मी: "बरं तर मग! मी माझ्या अंगाला एक भोक पाडून त्यात एक वात घालतो आणि ती पेटवतो. म्हणजे मग कॅलरी बर्न होतील शिवाय आमच्या घरात उजेड पण होईल. मस्त आहे की नाही आयडीया. एका दगडात दोन पक्षी".

दिल्या: "तू भंकस बंद कर रे, चिमण्या! मक्या, तूच खोक्याच्या बाहेच जाऊन विचार करून दाखव बरं!"

मक्या: "हां! मी तोच विचार करत होतो. एक उपाय आहे. चिमण्या तू ट्रेड मिल विकत घे. मला माहीतीये तू परत ROI काढणार म्हणून.. पण मी त्याचा पण विचार केला आहे. तुझं काम झालं की ते ट्रेड मिल मी विकत घेईन."

मी: "आणि ते ठेवणार कुठे? आमच्या घरात जागाच नाहीय्ये! सरीताला आमच्या त्या गावातल्या घरातून हलायचं नाहीय्ये अजिबात.. सगळी ठिकाणं.. मुख्य म्हणजे माहेर.. जवळ जवळ आहेत म्हणून!"

मक्या: "हात्तिच्या! त्यात काय? माझ्या घरी ठेव!"

मी: "मी मुळीच तुमच्यापैकी कुणाच्या घरी ठेवणार नाही. एकतर तुमची घरं लांब आहेत.. आणि दुसरं म्हणजे मी पहाटे येईन तेंव्हा दुधवाला आलाय असं समजून तुम्ही भांड पुढं कराल."

मक्या: "मग तू सकाळी उठून पळायला जात जा!"

मी: "आमच्या इथं जॉगिंग पार्क वगैरे काही नाहीय्ये बाबा! रस्त्यावरनं पळायला लागलो तर गल्लीतली कुत्री मागे लागतील. आणि नंतर चोर समजून लोक मागे लागतील."

दिल्या: "मग तू असं कर! एखाद्या मुलीच्या प्रेमात पड!"

मी: "काssय? तू माझा संसार खोक्याच्या बाहेर काढून रस्त्यावर मांडणार काय?.. त्यापेक्षा स्वतःच्या मनाला खोक्याच्या बाहेर काढ." यावेळेला माझ्या ओरडण्यामुळे आजुबाजुच्या टेबलांवर शांतता आणि पोरांची रडारड झाली.

दिल्या: "अरे पण कोण तुझ्या प्रेमात पडणार आहे? हे एकतर्फी प्रेम असणार आहे.. त्यामुळे प्रेमभंग अटळ.. तो झाला की झुरून झुरून कॅलरी बर्न होतील."

मी: "अरे, मला गेल्या २५ वर्षात सरीतावरसुध्दा प्रेम करायला जमलेलं नाही.. आणि समज ती पण माझ्या प्रेमात पडली तर?"

मक्या: "We will cross the bridge when we reach there". परत अमेरीकन पोल्यूशन!

दिल्या: "अरे कोणत्याही पोरीचा बाप तिचं तुझ्याशी लग्न लावायच्या ऐवजी तिला विहीरीत नाही का ढकलून देणार? तू त्या तुझ्या जिममधल्या सीएच्या प्रेमात पड."

मक्या: "कल्पना मस्त आहे रे!"

मी: "आँ! तुला कसं काय रे तिचं नाव माहीती? हे बघा.. काहीतरी मूर्खासारखे सल्ले देऊ नका.. मी असल्या कुठल्याही फंदात पडणार नाही.. आणि जिम दोन दिवसांनी सुरू होणारेय ना.. लोड शेडींगच्या वेळा बदलल्यावर!"

दिल्या: "भडभुंज्या! हे तू आधी का नाही सांगीतलस?".

मी: "पण तुम्ही कुठं विचारलत? आणि मक्या! तू पण हाडाचा प्रोजेक्ट मॅनेजर आहेस अगदी! खरच आग लागलीय की नाही हे बघायच्या आधीच धावाधाव!" या वाक्यावर सभा बरखास्त झाली.
******************************************************************

दोन दिवसांनी माझ्या जिमवार्‍या परत सुरू झाल्या.. परत ती सगळी पळापळ, ओढाताण आणि भूक! ठरलं होतं त्याप्रमाणे कल्पनाला दोन महीन्यांनी भेटलो. मी मूळ अवस्थेला परत गेल्याचं पाहून तिनं माझं डाएट अजून कडक केलं. मी भूक मारण्यासाठी येताजाता चहा प्यायला लागलो होतो.. आता बिनदुधाचा व बिनसाखरेचा चहा.. साखर माझ्या सर्व खाण्यातून हद्दपार झाली हे जरा जास्तच झालं.. साखरेशिवाय कोकणस्थ म्हणजे पाण्याशिवाय मासा!.. त्यात भर म्हणजे फॅटफ्री दूध घ्यायला सांगीतलं.. फॅटफ्री दुधाला दूध म्हणू शकतात तर डालड्याला साजूक तूप का नाही म्हणत?.. फॅटफ्री दुधातून एकदा सकाळचं सिरीअल खाल्ल.. मग ते साघ्या पाण्यातूनसुध्दा तेवढच वाईट लागेल हे लक्षात आलं आणि मी साधं पाणी वापरू लागलो.. ते बघून सरीताच डोक फिरलं.. "हे काय असलं भिकार्‍यासारखं कदन्न खायचं? त्यापेक्षा तू चांगलंचुंगलं खाऊन वर गेलेला चालेल मला! नाहीतर भूत होऊन 'भूक' 'भूक' करत पिंगा घालशील माझ्याभोवती!".. असल्या जीवघेण्या शब्दात तिनं ठणकावलं.. पण ध्येय गाठायचं म्हणजे असल्या विरोधांना सामोरं जावचं लागतं हे थोरामोठ्यांच्या चरीत्रात वाचलेलं असल्यामुळे मी विचलीत झालो नाही.

नंतर काही दिवसांनी कल्पनेच्या टेबलावर मी बर्‍याचशा बिल्डरची ब्रोशरं पाहीली आणि मला व्यवसाय वाढवायची संधी दिसली.. नाहीतरी माझ्यावरची माणसं 'लोन द्या! लोन द्या' असं करून माझ्या मागे लागलीच होती!

मी: "काय, घर घ्यायचा विचार करताय काय? कुठे घेताय?". मी खडा टाकला.

कल्पना: "अजून काही नक्की नाहीय्ये! नुसता अभ्यास सुरू केलाय!"

मी: "काही लोन बिन लागलं तर या माझ्याकडं. मी बँकेत मॅनेजर आहे." असं म्हणत मी माझं कार्ड दिलं.. अर्थातच डोळ्यांकडे न बघता.

कल्पना: "लोन तर मला लागणारच आहे! काय अफाट किमती आहेत ना घरांच्या?" इथं मला दिल्याच्या कनेक्शनचा वापर करायची कल्पना आली.. समोरची नाही.. मराठी भाषेतली.

मी: "तुम्ही माझ्या मित्राला जरूर भेटा. तो तुम्हाला स्वस्तात घर मिळवून देऊ शकेल. शाळेपासूनचा मित्र आहे माझा.. अगदी खात्रीचा.. दिलीप अत्रे नांव त्याचं.. त्याची स्वतःची इनव्हेस्टमेंट कंपनी आहे.. आणि बरेचसे बिल्डर त्याचे गिर्‍हाईक आहेत. माझ्या दुसर्‍या एका मित्राला त्यानं बाजारभावापेक्षा २५% स्वस्तात घर मिळवून दिलं होतं." मी माझ्याच कार्डाच्या मागं त्याचा पत्ता फोन लिहून दिला.

कल्पना: "वा! हे बरं झालं बाई! नाहीतर मी अगदी कन्फ्यूज झाले होते.. इतके बिल्डर.. इतक्या स्कीमा.. काही कळतच नव्हतं बघा! थँक्स हं!"

मी: "अहो थँक्स कसले त्यात? खरं म्हणजे मी आमचा धंदा वाढवायचं बघतोय!" मी प्रामाणिकपणे सांगीतलं.

त्यानंतरचा एक-दीड महीना कल्पना दिल्याबरोबर रोज कुठल्याना कुठल्या साईट बघत फिरत होती. मला पुढं काय झालं याचा काहीच पत्ता नव्हता.. मग मक्याच्या भाषेत Touch base करण्यासाठी एकदा तिला मी छेडलं..

मी: "काय? घर मिळालं की नाही अजून?"

कल्पना: "हो! हो! कालच मी एक घर फायनल केलं" चला! शेवटी एक घर तिला पसंत पडलं म्हणायचं.. मलाच सुटल्यासारखं झालं.. नस्ती ब्याद मागं लावल्याबद्दल दिल्या मला शिव्यांची लाखोली वहात असणार अशी एक भीति मनात होती.. पण, आश्चर्य म्हणजे, दिल्यानं अजूनपर्यंत तरी काही कटकट केलेली नव्हती.

कल्पना: "तुमच्या मित्राच्या मदतीशिवाय जमलं नसतं हं पण मला! काय अफाट नॉलेज आहे त्या माणसाचं! मी त्यांनी सांगीतलेले शेअर्स घेतले ते सगळे खूप वाढलेत." तरीच दिल्यानं मला शिव्या घातल्या नव्हत्या.. तिच्या डोळ्यात गुंतून न पडता त्यान चलाखपणे आपल्या रानटी भाषेनं तिला घोळात घेतलं होतं आणि स्वतःचाही धंदा बघीतला होता. हाडाचा ब्रम्हचारी आहे बुवा!

कल्पना: "शिवाय त्यांच्यामुळं मला घरही स्वस्त मिळतय!"

मी: "चला बरं झालं! मग लोन घ्यायला कधी येताय?" मी लगेच धंदा दामटला.

कल्पना: "लोनचं काम आपण उद्यापासून करू या का?"

मी: "तुम्हाला अजून रजिस्ट्रेशन वगैरे करायचं असेल ना? तुम्ही उद्या बँकेत या.. मी तुम्हाला काय कागदपत्रं लागतील ते लिहून देतो. ती जमली की मग सुरू करू."

मग कल्पना रोज बँकेत येऊ लागली. ते बँकेतल्या काही भवान्यांना खुपलं. त्यातली एक आमच्याच घराशेजारी रहाते.. ती आणि सरीता बर्‍याचवेळेला घराशेजारच्या भाजीवाल्याकडे भेटतात.. तिथं बहुतेक तिनं काडी लावली असणार.. काडी कसली चांगली दिवाळीची फुलबाजीच! अर्थात् याची मला काहीच कल्पना नव्हती.

दरम्यान मला बढती मिळाली.. पगारही वाढला. दिल्यानं एका कार डीलरला पटवून स्वस्तात ३ होंडा सिटी बुक केल्या.. तो, मी आणि मक्या या तिघांसाठी. माझ्याकडं जुनी मारूती व्हॅन आहे तरीसुध्दा अजून एक घ्यायची ठरवलं! सरीताला हे काहीच माहीत नव्हतं.. आमच्या गाड्या येईपर्यंत डीलरला 'डेमो' गाडी घरी नेऊन दाखवायला सांगीतली.. सरीताला सरप्राईझ देण्यासाठी. तो दुपारी ४ वाजता पाठवतो म्हणाला. लगेच मी सरीताला 'दुपारी ४ वाजता घरी थांब. मी एक सरप्राईझ पाठवतो आहे. ' असं सांगीतलं. असं सगळं व्यवस्थित प्लॅन केलेलं होतं.. पण म्हणतात ना? 'God proposes man disposes' किंवा काहीतरी.. तसच झालं.. कल्पनेला काही कागदपत्रं मला द्यायची होती आणि तिला बँकेत यायला जमणार नव्हतं म्हणून ती माझ्या घरी आली.. तेही बरोब्बर ४ वाजताच! बरं नुस्ती कागदपत्र देऊन जावं की नाही? तर छे! सरीतानं आग्रह केला म्हणून चहा प्यायला थांबली.. बरं निमूटपणे चहा पिऊन जावं की नाही? तर छे! चहा पिता पिता माझ्या मराठीची आणि माझ्या मदतीची वारेमाप स्तुती केली.. बायकांना कुठे किती बोलावं याचा काही पाचपोचच नसतो. सगळ्यात कहर म्हणजे त्या डीलरनं गाडी घरी पाठवली नाही हेही मला माहीत नव्हतं. मी संध्याकाळी घरी जाईपर्यंत वणवा चांगला धुमसलेला होता. नेहमीसारखी सरीता गुणगुणत नव्हती.. वरती दिवाही न लावता अंधारात बसली होती. म्हंटलं हिचं काहीतरी बिनसलं असेल.. शेजारची काहीतरी खडूसपणे बकली असेल.. म्हणून तिकडे दुर्लक्ष करून मी हर्षवायूच्या अपेक्षेने विचारलं..

मी: "काय पाहीलं का सरप्राईझ?".

सरीता: "हो!". तिच्या आवाजानं माझ्या काळजात चर्रss झालं. नक्कीच काहीतरी हुकलं आहे. हिचा आज वाढदिवस आहे काय? माझा आहे काय? हिनं मला काही करायला सांगीतलं होतं काय? मी काही विसरलोय काय? असं काहीच नाहीय्ये.. हां! मी तिला अजून माझ्या प्रमोशनचं सांगीतलच नाहीय्ये.. एवढी महागडी गाडी घेऊन मी पैसे उधळतोय असं समजून तिला राग आला असणार.. त्यात नुकत्याच झालेल्या कुठल्याश्या लग्नात तिला मी नवीन शालू घेण्यास स्पष्ट नकार दिला होता.. तिच्याकडे डझनभर तरी आहेत म्हणून.. मग आता तिला चांगलाच स्कोप मिळालाय बदला घ्यायचा.. त्यात घरी एक गाडी आहेच शिवाय.. हेच कारण असणार, दुसरं काय?

मी: "काय मस्त देखणी आहे ना?"

सरीता: "हो हो देखणी असेल नाहीतर काय? सगळे पुरूष मेले सारखेच!". बायकांना आमचं गाड्यांवरचं प्रेम आणि टीव्हीवरचं क्रिकेट प्रेम कधी कळणार?

मी: "आता एका आठवड्यात घरी येईल!". इतका वेळ नुस्ता धुमसणारा वणवा मी नकळत पेटवला.

सरीता: "काय? तू घरी आणणार? कायमची?". गोष्टी या थराला गेल्या आहेत हे तिला अजिबात अपेक्षित नव्हतं.

मी: "हो! कायमची! असल्या गोष्टी भाड्यानं परवडतात काय?"

सरीता: "ती भाड्यानं पण मिळते?". ही असं काय काहीच माहीत नसल्यासारखं करतेय? आत्तापर्यंत य वेळेला गाड्या भाड्यानं घेतल्या असतील आम्ही!

मी: "न मिळायला काय झालं? दुनियामे हर चीज बिकती है और भाडेसेभी मिलती है!". आमच्या बँकेत आम्हाला सारख राष्ट्रभाषेचा वापर करा असं सांगतात त्याचा परीणाम!

सरीता: "पण एक घरात आहे ना इतकी वर्षं! तिचं काय?". सरीतानं इथं एक हात स्वतःकडे केल्याचं मला कळलं नाही.

मी: "ती जुनी झाली आता! टाकून देऊ! एवढं काय!"

सरीता: "जुनी झाली? टाकून देऊ? अरे देवा!". जुनी गाडी टाकायची म्हंटल्यावर ही एवढी का विव्हळायला लागली बरं? एवढं गाडीवर प्रेम? कमाल आहे बुवा!

मी: "बरं तर! नको टाकुया! दोन दोन ठेवून ऐश करू या!".

सरीता: "ऐश! तू या गोष्टींना ऐश म्हणतोस?"

मी: "ऐश नाही तर काय म्हणणार? फार कमी लोकं दोन-दोन ठेवतात!"

सरीता: "अरे! तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? सरळ सरळ दोन-दोन ठेवायच्या म्हणतोस!". 'ठेवायच्या' शब्दावरचा ठसकाही मला जाणवला नाही. आता काय म्हणावं?

मी: "त्यात हाडाचा कुठं प्रश्न आला? फक्त पैशाचा येतो. बाय द वे! मी अजून एक सरप्राईझ तुला दिलं नाही अजून! मला प्रमोशन मिळालय आणि पगार पण वाढलाय चांगला! आता माझ्या खिशाला दोन सहज झेपतील! खर तर जुनी स्टेटसला शोभणार नाही आता! पण ठीक आहे!"

सरीता: "आणि शेजारी पाजारी? ते काय म्हणतील याचा काही विचार?"

मी: "ते काय म्हणणार? वरकरणी 'वा! वा! फार छान चॉईस आहे हं!' असं म्हणतील पण मनातल्या मनात खूप जळतील"

सरीता: "हे तुझं सगळं फायनल आहे?". सरीतानं एकदम शांतपणे विचारल. तिनं काहीतरी निर्णय घेतला होता वाटतं.

मी: "हो!". यावर सरीता काही न बोलता बेडरूममधे गेली. मी तोंड धुवेपर्यंत ती दारातून बाहेर पडलेली होती. जाता जाता 'मी माहेरी चाललेय' एवढच ओरडली. अशी ती अधनंमधनं जातेच त्यामुळे मला तेंव्हा काही विशेष वाटलं नाही.. पण दोन दिवस झाल्यावरसुध्दा आली नाही, फोन पण नाही म्हंटल्यावर माझी चलबिचल सुरू झाली. मी तिच्या घरी फोन लावला.. नेमका सासरेबुवांनी उचलला.

मी: "हॅलो! मी चिमण बोलतोय! सरीता आहे का?"

सासरा: "आहे! पण ती फोनवर येणार नाही!"

मी: "का?"

सासरा: "आता का म्हणून परत मलाच विचारताय?". सासरा जरा तिरसटच आहे. पूर्वी सरकारी नोकरीत होते.. तिथं अरेरावी करायची सवय लागलेली.. आणि आता वय पण वाढलं. त्यांच्या 'अरे'ला 'कारे' केलं तरच थोडा निभाव लागतो हे मला अनुभवानं माहीत झालं होतं.

मी: "अहो, तुम्हाला नाही तर कोणाला विचारणार? फोन तुम्हीच घेतलाय ना?".

सासरा: "माहीतीये! उगाच अक्कल शिकवू नका! एकतर या वयात नस्ते धंदे करायचे आणि वर 'का?' म्हणून विचारायचं?"

मी: "धंदे? मी काय धंदे केले?"

सासरा: "उगी भोळेपणाचा आव आणू नका! सगळ्या जगाला माहीतीहेत तुमचे धंदे!" फोन दाणकन आदळला. नंतरचे दोन-तीन फोन असेच काहीसे झाले. असल्या तप्त वातावरणात तिच्या घरी जाण्यात काही पॉईंट नव्हता. आयला! असे कुठले धंदे मी करतोय जे मलाच माहीत नाहीत पण सगळ्या जगाला माहीती आहेत? सरीताला दिलेलं सरप्राईझ सरप्राईझिंगली असं माझ्या अंगाशी कसं येतय?

दुसर्‍या दिवशीच्या साप्ताहिक सभेत मी माझी व्यथा सांगीतली. त्यावर बरीच चर्चा होऊन शेवटी मायाला सरीताच्या घरी पाठवायचं ठरलं. इतका वेळ दिल्या काहीच बोलला नव्हता. त्याची सारखी चुळबुळ चालली होती.. बहुतेक त्याला काहीतरी सांगायचं होतं.. पण माझ्या सरप्राईझमुळं त्याची पंचाईत झाली असावी.

दिल्या: "अरे हां! तुम्हाला एक बातमी द्यायची होती!". दिल्याला आवाज फुटला. सर्वसाधारणपणे त्याच्या बातम्या आता कुठले शेअर्स आता घ्यायला / विकायला पाहीजेत अशा प्रकारच्या असतात असा आमचा अनुभव आहे.

मक्या: "तुला बायको नाही त्यामुळे ती पळून गेली अशी बातमी नक्की नसणार!"

दिल्या: "आता करणार आहे!"

माया: "काय करणार आहेस?". आम्ही सगळेच एकमेकांकडे 'हा काय गूढ बोलतोय?' असं बघत राहीलो.

दिल्या: "मी.. मी लग्न करतोय!"

"काय? तू? आणि लग्न?" आम्ही तिघेही एका सुरात ओरडलो. परत एकदा टेबलांवर शांतता आणि रडारड!

माया: "कुणाशी? नाव काय तिचं?"

दिल्या: "कल्पू"

मक्या: "कल्पू? हे एखाद्या भातुकली खेळणार्‍या मुलीच नाव वाटतय! मुलगी सज्ञान आहे ना?" मक्या रंगात आला.

दिल्या: "तिचं नाव कल्पना आहे.. कल्पना नायडू! मी तिला कल्पू म्हणतो." एकंदरीत आमच्या या विश्वामित्राची तपश्चर्या कल्पनेनं भंग केलीच तर.

मक्या: "आयला! ह्या नायडूला नेमका तुझ्यासारखा ब्रम्हचारीच कसा भेटला 'आय डू' म्हणायला?".

मी: "अरे पण ती आपल्यापेक्षा बरीच लहान आहे! जरठ-कुमारी विवाह होतोय म्हणून लोकं निदर्शनं करतील हां!"

माया: "नायडू? तिला मराठी येतं का? का मी आता हिंदी इंग्रजी शिकायला लागायचं?"

दिल्या: "अरे तिचं वय ४० आहे. चिमण्यानं तिला माझ्याकडे पाठवलं होतं.. तिच्यासाठी घर शोधता शोधता तीच मला सापडली.. काय विलक्षण डोळे आहेत तिचे".

मक्या: "चला बरं झालं. इतके दिवस तुला फक्त इनव्हेस्टमेंट आणि रिटर्न एवढंच समजत होतं. आता खर्च नावाचा प्रकारही कळायला लागेल."

उरलेली सर्व सभा दिल्याची आणखी टिंगल करण्यात गेली. दुसर्‍या दिवशी माया सरीताकडे गेली.. तिच्या कल्पनेतल्या कल्पनेचं भूत उतरलं आणि सरीता घरी आली.. तिला फार अपराधी वाटत होतं.. ती मला सॉरी म्हणाली.. मी पण तिला 'सरीता! मी तुझ्यावाचून रिता आहे!' असली कादंबरीतली वाक्यं टाकून खूष केलं.

यथावकाश दिल्याच लग्न झालं. कल्पना आमच्या दोघांच्या पाया पडली. आता मी हिला काय आशिर्वाद देणार? मी फक्त "'दिल्या' घरी तू सुखी रहा" एवढच म्हणू शकलो.

या सगळ्या भानगडीत माझी जिम चालू होती. माझं वजन १० किलोनी कमी झालं होतं. मी आनंदात होतो.. पण.. त्यांच्या लग्नानंतर एकदा मी जिमला जायला निघालो.. जरा उशीरच झाला होता,, खूप पाऊस झाला होता.. रस्त्यात प्रचंड पाणी साचलं होतं.. घाईघाईत जिमला जाताना ड्रेनेजच्या खड्ड्यात पाय अडकून पडलो.. पाय मोडला.. प्लॅस्टर घातलं ६ आठवड्यांसाठी.. मी परत प्रसरण पावणार हे लख्ख दिसत होतं.. तंगडी वर करून पडल्या पडल्या मला साक्षात्कार झाला.. मी बारीक होणं न होणं हे माझ्या हातात नाहीच्चै.. ते सगळं वरती ठरलेलंच आहे.. तेंव्हा आपण ------
ठरविले अनंते तैसेचि फुगावे
चित्ती असु द्यावे समाधान!

---- समाप्त -----

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद विनिता, स्मिता आणि सस्मित!
सस्मित, माझ्या विपुत काहीच दिसत नाहीये मला Proud तुझ्या विपुत उत्तर दिसलं मला Lol

धम्माल Lol
कॉपी-पेस्ट करणं हा प्रत्येक कोडग्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. +११११

धन्यवाद वैशाली, मोद, असामी, किल्ली, डुआयडू व अथेना!

>> हे एकदम 'चिमण' पंचेस असलेले होते रे. आठवत नाहि आधी वाचलेले अजिबात.
असाम्या, आता मला कॉपी-पेस्ट केलेलं अजिबात टोचत नाहीये! Proud