उंबरठ्यावर भक्ती (ग्रीस - शेवटचा भाग)

Submitted by Arnika on 5 December, 2018 - 18:32

20181122_010631.jpg.zip (1.98 MB)
चार महिने झाले हिची चाकं फिरतीवर आहेत. बॅगांच्या पट्ट्यावरून सहज ओळखता यावी म्हणून ही विकत घेतली तीन वर्षांपूर्वी. मला त्या वर्तमानपत्रासारख्या प्रिंटसाठी ही बॅग हवी होती, पण कुठलातरी झेंडा एखाद्या वस्तूवर बाळगण्याची सवय नव्हती. शेवटी दुकानातला अफगाण म्हणाला, “ताई, इंग्लंडला दुकानात हे यूनियन जॅक लहान-मोठ्यांच्या चड्ड्यांपासून स्वयंपाकाच्या भांड्यांपर्यंत सगळ्या गोष्टींवर असतात. पर्यटक हौसेने घेऊन जातात आणि इथल्या लोकांनाही काही वाटत नाही. घ्या बिनधास्त!” तेव्हापासून आम्ही दोघी जोडीने फिरतोय सगळीकडे. जाईल तिथे सगळ्यांना आवडते ती. फक्त ग्रीसला येण्याआधी जर्मनीत भोज्जा केला तेव्हा बॅगेवरच्या झेंड्यांमुळे जर्मन माणसं माझ्याकडे अशी काही बघत होती की मी चैत्रगौरीच्या हळदी-कुंकवाला बिकीनी घालून गेल्ये असं वाटावं. आता बसलोय दोघी समोरासमोर पुन्हा एकदा. आवरून घरी जायच्या तयारीत.

तीन महिने झाले ग्रीसमध्ये येऊन. इथले सुरुवातीचे काही आठवडे खूप हळवे गेले. विशेषतः गेल्या तीन महिन्यांत घरच्यांपासून लांब राहाणं काही वैयक्तिक कारणांमुळे कठीण जात होतं. लिहिणं-बिहिणं तर फार लांबची गोष्ट! त्यामुळे “प्रवासवर्णनं वगैरे प्रकार मला आवडतंच नाहीत”, “माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नाहीये”, “मला लिहायचंच नाहीये” असा जप चालवला होता मी. त्यावेळी प्रेरणा महाजन, ललिता जेम्स आणि श्वेता भोसले या तिघींनी माझी उदास बडबड प्रेमाने सांभाळून घेतली आणि तरीही लिहीत राहायला सांगितलं. त्यांच्याशी बोलले नसते तर माझी ‘आपुलाची वाद आपणांसी’ फेज अजूनही संपली नसती कदाचित... म्हणून इथे असताना जे काही लिहिलं ते त्या तिघींच्या नावे करत्ये. मुलींनो, गोड मानून घ्या.

रोजच्या कामामुळे लिहायला वेळ मिळत नाही; म्हणून हल्ली गाणं म्हणत नाही; म्हणून तब्येतीची काळजी घेता येत नाही असं म्हणायची सवय लागली होती मला. मग ती हळुहळू फॅशन होत गेली. आपल्या आनंदासाठी, आरोग्यासाठी काही करायला वेळ मिळत नाहीये म्हणजेच आपल्या हातून कष्ट किंवा महत्त्वाचं काम घडतंय असं वाटायला लागलं होतं. इतकं, की ग्रीसमध्ये दुपारी लिहायला, रात्री चंद्राकडे बघून गायला आणि सकाळी समुद्रावर पोहायला वेळ मिळाल्याने मला गिल्टी वाटायचं सुरुवातीला. आपल्या वयाची मुलं-मुली एवढ्या कष्टाने ऑफिसमध्ये जाऊन जीवतोड काम करतायत आणि आपल्याला लिहायला वेळ मिळतोय हेही चुकीचं वाटायचं. पण लिहीत गेले तसतशी त्यातूनही बाहेर येऊन शांत होत गेले. कोणाचबद्दल लिहायची घाई किंवा हट्ट केला नाही. जगण्यापेक्षा लिहिणं मोठं वाटून घेतलं नाही. मला प्रवासवर्णनं वाचायचा कंटाळा येतो त्यामुळे मी लिहिलेलंही काही एडिट करताना मला कंटाळा आला तर त्यावर फुली मारायची एवढा एकच नियम पाळून ग्रीसबद्दल लिहिलं. ते ज्यांनी ज्यांनी वाचलं त्यांची मला कळत-नकळत सुंदर सोबत झाली.

ग्रीसच्या गोष्टीतल्या ज्यांना आपापली नावं खरी हवी होती त्यांची नावं तशीच ठेवली. ज्यांना गर्दीपासून लपायचं होतं त्यांना नवी नावं दिली. त्यातल्या दोन नावांशी आज त्यांच्या परवानगीने ओळख करून द्यायची आहे. आपापलं काम जीव ओतून करणारी यांच्यासारखी प्रेमळ माणसं भेटायला नियतीचे फासे परफेक्ट पडावे लागतात. आपल्या गोष्टीतली सिक्याची दीमित्रा म्हणजे खरी दाफ्नी. तिच्या नवऱ्याचं, म्हणजे गोष्टीतल्या कोस्तीसचं, खरं नाव नीकोस आहे. दाफ्नी चालवते त्या होटेलची माहिती आणि फोटो बऱ्याच जणांनी बघायला मागितले. तर हे माझं सिक्यामधलं घर: https://daphnesclub.com.

नीकोस अप्रतिम गातो, गिटार वाजवतो आणि आठवड्याचे काही दिवस अथीनामध्ये गाणं शिकवतोही. टूरिस्टिक जागा वगळून तो त्याच्या ग्रीकली नावाच्या कंपनीतर्फे लोकांना ग्रीसमधली द्राक्षांची लागवड, बागा, डोंगर-दऱ्या आणि अनवट किनारे बघायला घेऊन जातो. इथे सुट्टीसाठी जायचं म्हणत असाल तर ह्या दोघांना गाठा. सिक्यामध्ये राहाण्याची सोय आणि ग्रीसभर फिरण्याची सोय यांच्याकडे लागली!

Daphne and Nick, please let me introduce you to my friends. Those who have followed this series on Greece already know you virtually (and can vouch for my claim that I wasn’t swearing at you in these blog posts). Glad as I am to tell everyone about you, the joy has a possessive tinge because I feel like I am sharing my family and the many moments we have cherished over the past few months. That said, I think the world should know about the love and passion with which you run Daphne's Club Hotel Apartments and Greekly. I hope my friends start flocking to Sykia and exploring the nooks and crannies of Greece with Greekly. It is an honour to know people like you, and I cannot thank you enough for making me a part of your lives. Here’s raising our glasses and wishing that our paths always cross for a good cause. And now, assuming you trust the tone of this piece, I’ll go back to writing the rest in Marathi. <3

ग्रीसची बकेट लिस्ट पूर्ण झाली का असं विचारत होतं परवा कोणीतरी. तर माझी बकेट लिस्ट उलटी आहे, कारण ती कॉन्सेप्ट मला आरती प्रभूंनी शिकवल्ये. भरल्या बकेटमधून एकेक गोष्ट वजा करण्याऐवजी रिकाम्या हाती जाऊन सोनं वेचून यायचं असं सांगून गेलेत ते. त्यांच्या शब्दाबाहेर जाणारी मी कोण? “बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा, सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे” एवढं वाचून फक्त “मम” म्हणायचं त्यांच्या मागोमाग...

कितीतरी माणसं भेटली. आकाशाशी आणि मातीशी पुन्हा जोडणारी गावं सापडली. त्यातल्या काहींबद्दल भरभरून लिहिलं आणि काही स्वतःसाठी राखून ठेवली. आजपासून तीन महिने दररोज फक्त ग्रीसबद्दल सांगायला गेले तरी काहीतरी निसटेलच इतकं दिलं ग्रीसने गेल्या तीन महिन्यांत. शिवाय या ना त्या निमित्ताने माझी पावलं पुन्हा इकडे वळतील आणि तेव्हाही सिक्या किंवा अथीनाची वेस मला आनंदाने घरात घेईल हे माहीत असण्यातलं समाधानच केवढं अगडबंब आहे!

मला अचानक कडकडून आठवण यायचा रोग आहे. ती माणसांची, पदार्थांची, पुस्तकांची, कवितांची आणि जागांची, कसलीही असू शकते. इथे असताना त्यात फार रमून दिवस रंजिस करण्याऐवजी आठवलेल्या कविता समुद्रावर म्हणून टाकल्या. आठवण आली त्याला हाक मारली. जमतील ते पदार्थ पुढ्यात असलेल्या गोष्टी वापरून केले. आता घरचे वेध लागल्यावर मात्र धरण फुटणार की कायसं वाटायला लागलंय. सुरेख मिसळ खायची आहे. बाबांच्या हातच्या घडीच्या पोळ्या, आईची आमटी, कधीकधी जिचा वीट यायचा ती हिंग-हळदीची फोडणी वगैरे हवी झाल्ये. आयुषमानचे दोन पिच्चर चुकलेत. काशिनाथ घाणेकरही भेटले नाहीयेत अजून. रक्षाबंधनापासून तुळशीच्या लग्नापर्यंत घरापासून लांब राहून झालंय. आता त्या बॅगेला तिचा हक्काचा माळा दाखवायला हवाय.

निरोपाच्या वेळी गावातल्या आणि दोन्ही घरातल्या खूप जणांनी ग्रीसमध्ये राहायचा आग्रह केला, तेव्हा सगळे जण ग्रीक नवरा करायला सांगतायत असं बघून आमची आरियाद्नी घाबरली बरं का. मला म्हणाली, “बघ हो, ग्रीक मुलांना कधी भारतीय मुलींबरोबर पाहिलं नाहीये मी. तुझ्यासारखी सुंदर मुलं हवीत म्हणून तुझ्याशी लग्न करतील ते, पण त्यांचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे का तपासून घे”. वयवर्ष सात. इतकी गडाबडा लोळून हसल्ये मी! एकतर हिला कुठून आली ही अक्कल? आणि दुसरं म्हणजे सौंदर्यासाठी ग्रीक मुलांनी माझ्याशी लग्न करणं हे जरा सचिनने बॅटिंग शिकण्यासाठी पार्थिव पटेलशी मैत्री करण्यासारखं नाहीये का? तरीही मी आरियाद्नीचं ऐकून ग्रीक नवरा न शोधता घरी चालल्ये आणि मी सिक्याला परत जाईन ती कुणा मुलासाठी नाही, तिच्यासाठीच जाईन, म्हणून ती निश्चिंत झाल्ये असं फोनवर म्हणत होती.

एखाद्या नव्या जागेची ओढ का वाटते हे सांगता येत नाही तसंच कितीही रुळले, रमले, भाषा बोलले आणि माणसं जोडली तरी पुन्हा घरी का यावंसं वाटतं तेही समजत नाही. काल पुन्हा एकदा ‘पोलीतिकी कुज़ीना’ नावाचा ग्रीक पिच्चर बघत होते. त्यातल्या बोटीवर कप्तान असलेल्या मामाला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलंय. “प्रवासी दोन प्रकारचे असतात. जे नकाशा बघून वाट ठरवतात ते निघून जातात, आणि जे आरसा बघून वाट ठरवतात ते नेहमी घरी परत येतात.”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच आवडली ही मलिका. दोन वर्षापूर्वी १० दिवस राहून आले ग्रीसमध्ये. आणि मला वाटायच आपण सगळं काही पाहिलं. पण खरं ग्रीस तुमच्यामुळे अनुभवलं आणि स्थानिक लोकांना भेटले. किती समृध्द अनुभव घेऊन परतता आहात.

फोटो बघून आणि वाचून दाफ्नी आणि निकोसबरोबर ग्रीस हिंडायला नक्की आवडेल आणि त्यांच्या दाफ्नी क्लबमध्ये रहायलापण.

फार फार सुंदर झाली सगळी लेखमाला!>>>>> अगदी अगदी.भल्या पहाटे तुझा लेख वाचला.आनंद झाला आणि वाईटही वाटले.वाईट एवढ्याचसाठी की आता ही मालिका संपली!

फारच सुंदर झाली ही संपुर्ण लेखमाला, खूप आनंददायी होत्या ह्या वाचनवेळा.
धन्यवाद अर्निका!
आणि प्रेरणा, ललिता आणि श्वेता ह्या तिघींचेही विशेष आभार !

@ अर्निका,

मालिका वाचतांना तुमच्या सोबत नवनवीन अनुभव घेत होतो. ग्रीस, तुमचे तेथील मित्रमंडळ, लेखातील भाषा (विशेषतः 'म्हणत्ये-सांगत्ये' फार क्यूट वाटले वाचायला) तुमचा एकूणच वर्ल्ड व्ह्यू .. सगळे फार आवडले.

नकाशा आणि आरसा दोन्ही एकत्र बघून थोडे जग फिरावे म्हणतो आता.

पु ले शु,

अनिंद्य

अमेझिंग! मस्त लिहीलं आहेस गं, अर्निका. आवर्जून तुझी सगळी लेखमाला वाचत राहिले. तुझ्याकडून बरंच काही कळत नकळत शिकत राहिले. थँक्स मनापासून.

अनंत धन्यवाद मायबोलीवरून सोबत करणा-या, प्रोत्साहन आणि कौतुकाच्या पावत्या देणा-या सगळ्यांचे. ग्रीस नक्की बघून या. गेलात तर आमच्या निवांत गावाला, सिक्या कोरिन्थीयासला जाऊन या. Happy

फार सुरेख झाली हे सगळे मालिका. खूप मजा आली वाचायला आणि तुझं राहून राहून कौतुक वाटत राहिलं.
मळलेली वाट सोडून असे सोल सर्चिंग अनुभव घेता यायला खरच हिंमत लागते.
तुझ्या पोतडीत असे जगावेगळे अनुभव जमा होत राहोत आणि तुला ते असे आमच्यबरोबर शेयर करत राहावेसे वाटोत ही मनःपूर्वक शुभेच्छा.

उंबरठ्यावर भक्ती ह्या कोणत्या कवितेच्या ओळी आहेत का? कोणत्या? प्लीज शेअर.

फारच सुंदर. जग धुंडाळताना आत्मशोधही त्याच लयीत चालू राहिला तुमचा. तुमच्याकडून असेच अनेक प्रवास घडू देत आणि आम्हांला लेखनातून अनुभवायला मिळू देत.

Thanks हीरा आणि शूम्पी!
'घर असावे घरासारखे' कवितेतले शेवटच्या कडव्याचे आहेत शब्द.
"या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेउनी शक्ती
आकांक्षेचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती"

मळलेली वाट सोडून असे सोल सर्चिंग अनुभव घेता यायला खरच हिंमत लागते. >> याला मम म्हणते.
सगळी मालिकाच मस्त झाली फार. मजा आली वाचायला.

वाह, अप्रतिम झाली सर्व मालिका.

“प्रवासी दोन प्रकारचे असतात. जे नकाशा बघून वाट ठरवतात ते निघून जातात, आणि जे आरसा बघून वाट ठरवतात ते नेहमी घरी परत येतात.” >>> मस्त.

मस्त अनुभव आहेत अर्निका तुमचे.
असं सगळं वाचून आपण स्वतः किती चाकोरितलं आयुष्य जगतो याची नव्याने जाणीव होते.
पुढचा देश कोणता?

Pages