प्रश्न

Submitted by Tejakar on 5 December, 2018 - 08:41

              सहज एका  प्रश्नाने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं,पण प्रश्न विचारण्याची त्याची काय हिम्मत होईना.
              कारण, माझ्याही चेहर्‍यावर अगोदरच प्रश्नचिन्ह खेळत होते, काहीतरी शोधत लटकेच हसत होते. माझ्याकडून त्याला त्याच्या प्रश्नाच्या उत्तराची प्रचंड अपेक्षा होती, पण त्याला काय माहीत, की मी अगोदरचे उत्तरे शोधण्यात गुंतून गेलो होतो म्हणुन. माझ्या मनात असंख्य प्रश्न लहरी सारखे तरंगत होते, काहींचे स्वरुप अवाढव्य होते, सागरात उफाळून येणार्‍या लाटांसारखे, तर काहींचे त्याच सागराच्या पृष्ठभागावर उठणाऱ्या लहानश्या बुडबुड्यांसारखे. पण हा बिचारा प्रश्न तसाच प्रतिक्षेत थांबला होता, ताटकळत कितीतरी वेळचा.
            असेच काहीसे प्रश्न अन तशीच त्यांची अर्धवट उत्तरे माझ्या विचारांच्या लाटांवर स्वार होऊन मनाच्या किनार्‍यावर जोरात आपटत होते, अन त्यांच्या आपटण्याने बसणारी हादरे माझ्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत होती. जणू आयुष्य हे असेच प्रश्न अन उत्तरे यामध्ये व्यापून गेलेली अवकाशासारखी अवाढव्य पोकळी असते, अन त्या पोकळीत वास्तव्यास असणारे चांदण्यांसारखे सदैव लुकलुकत राहणारे मनातील असंख्य विचार,काही अस्पष्ट तर काही तेजस्वी.
              त्यामुळे त्या प्रश्नानेहि शेवटी विचारायचे टाळलेच, अन तो निघाला त्याच सागरात स्वतःला समर्पित करण्यासाठी, एखाद्या छोट्याशा ओढ्यासारखा.
             त्याने माझ्यासाठी केवढा त्याग केला होता.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults