मु. पो. पदरवाडी

Submitted by योगेश आहिरराव on 5 December, 2018 - 05:38

मु. पो. पदरवाडी

जाना था जपान पहुंच गए चीन समज गये ना !
111_0.jpg
असंच काहीसं आमच्या बाबतीत घडलं. मायबोलीकर मित्रांसोबत भीमाशंकर कोथळीगड भागात ट्रेक ठरला. घाटवाटा तज्ञ मनोज भावे यांनी पुढाकार घेतला.
एखाद्या अल्पपरिचित वाटेने भीमाशंकर गाठून येळवली किंवा जमलेच तर पडारवाडीत (वांद्रे) मुक्काम करून दुसऱ्यदिवशी नाखिंड किंवा कौल्याच्या धारेने उतरून कोथळीगड मार्गे खाली असे नियोजन होते. ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी मी, मनोज, नरेश काका आणि सोबत पुण्याहून ट्रेकसाठी आलेले केळकर दाम्पत्य एकत्र भेटून कशेळे पोहचतो तोच पावसाने जोरदार हजेरी लावली. तिथेच आणखी दोघे पुणेकर राजेश जाधव व अनिल पालवे आमच्यात सामील झाले. हलका नाश्ता आणि चहा घेऊन गाडी डुक्करपाड्यात लावली तेव्हा दहा वाजून गेले होते. आजूबाजूचा परिसर संपूर्ण हिरवागार यावेळी निसर्गाचं रूप काय ते वर्णावे ! कोथळीगड परिसरातून दैत्यासुर, रणतोंडी इतर अनेक धबधबे चिल्हार नदीत भर घालत होते. अशातच धुक्याचा पदर हटला घाटमाथ्यावरील नाखिंड पठारावरच्या पवनचक्क्या नजरेत आल्या. त्याच भागातून आमची उद्याची उतराईची वाट होती. रेनकोट, पोंचो, जॅकेट पावसापासून बचाव करण्यासाठी घातले तर खरं, पण सह्याद्रीत भर पावसात त्याचा फारसा उपयोग नाहीच मुळी फक्त आपलं काहीतरी आहे हे एकचं मानसिक समाधान. जामरूंख उजवीकडे ठेवत मधल्या शेताडीच्या रस्त्याने पाचखडक पाड्याच्या वाटेला लागलो सुरुवातीलाच मोठा ओहोळ पार करताना कसरत करावी लागली.
पाऊण तासाच्या चालीनंतर राजपे पाचखडक पाडा रस्त्याला लागलो. काही मिनिटांतच पाचखडक पाड्यात पोहचलो. गेल्या वर्षी आंबेनळी व वाजंत्री घाटाच्या ट्रेक वेळी इथे येणे झाले होते. त्याच वेळी इथून भीमाशंकरच्या पेड्याची वाटेबद्दल ऐकून होतो. आम्ही जाऊन आल्यानंतर आमचे सह्यमित्र तुषार आणि विराग याच वाटेने भीमाशंकर जाऊन आले त्यावेळी जामरूंखच्या वाटाड्याने या वाटेचे नाव ‘पावल्याची वाट’ असे सांगितले.. असो असेही बर्याच वेळा एकाच वाटेला गावकरी वेगवेगळ्या नावाने ओळखतात. पाच खडकपाड्यात वाटेची चौकशी आणि सविस्तर माहिती घेतली. निव्वळ याच वाटेने जाण्यासाठी आम्ही भीमाशंकरच्या शिडी अथवा गणपती घाटाची वाट प्रचलित वाट टाळली. जरी पदरात या सर्व वाटा एकत्र येऊन मिळतात तरी तेवढेच नवीन वाटेने जाण्याचं समाधान. पाचखडक पाड्यातून पुढच्या धनगरपाड्याच्या वाटेला लागलो उजवीकडे आंबेनळी बाजूने येणाऱ्या मोठ्या ओढ्याचा खळखळाट सततच्या पावसाने त्याच्या जोर चांगलाच वाढला होता.
गावातल्या मंडळींनी सांगितल्या प्रमाणे डावीकडची विहीर आणि साकव लक्षात घेऊन, मोजून दहाव्या मिनिटाला तिथे पोहचलो. इथून मुख्य रस्ता सोडून विहिरी मागून मळलेल्या पायवाटेने निघालो. पावसाचा जोर कायम होताच, वाट थोडी चढणीला लागून एका पठारावर आली. जोडीला धुकं त्यामुळे माथा तर सोडाच निम्म्या उंचीच्या पदर सुद्धा नजरेत येईना झाला. फार झाडी नसलेल्या या पठारावरून मळलेली वाट पकडून पुढे सरकत होतो. समोर पदरातून एक दांड सरळसोट उतरलेले, गावकरी म्हणाले सरळ जावा त्याप्रमाणे थेट त्या दांड्याच्या दिशेने निघालो. वाटेत अनेक ढोरवाटा त्याकडे दुर्लक्ष करून चढणीला लागलो. सुरुवातीचा छोटासा झाडीचा टप्पा पार करून मुख्य दांडवरची खडी चढण सुरु झाली. दोन्ही बाजूला दरी आणि हळूहळू निमुळती होत जाणारी वाट एका ठिकाणी अस्पष्ट झाली. अनिरुद्ध आणि झीनत पुढे जाऊन डावीकडे वळाले त्यांची हाक येताच आम्ही मागोमाग गेलो न जाणो त्या बाजूने वळसा घेत वाट वरच्या बाजूला जाईल. थोड अंतर तसेच आडव जात वाट पूर्ण नाहीशी झाली. पुन्हा मागे येऊन विरुध्द दिशेला पाहिलं तर त्यापलीकडे आणखी एका सोंडेवर पाऊलवाट दिसत होती. तिथं पर्यंत जायला एक तर होतो तिथूनच आडवं जायचं किंवा वरच्या भागात जाऊन वाट मिळते का ते पाहायचं हे दोन पर्याय होते.
आम्ही ढोर वाटेने वरच्या टेपाड्यावर जात पाहतो तर पदराचा कातळ अगदी जवळ दिसू लागला. एव्हाना पावसाचा जोर कमी झाला, खाली दूरवर राजपे त्यामागे जामरूंख कडील भाग. तसे पाहिले तर या खालच्या गावातून वाडी वस्त्यातून मंडळी श्रावण किंवा यात्रे निमित्त भीमाशंकर कायम ये जा करत असतात, त्यामुळे वाट जख्ख मळलेली आणि वापरात असणार आम्ही कुठेतरी भरकटून मुख्य वाट सोडलेली हे लक्षात आलं होतं. थोड पुढे जाऊन वर मुख्य वाट मिळेल या आशेने त्या कातळ टप्प्यात आलो. दीड दोनशे फुटांचा या कातळावरून पाणी वेगाने वाहत होते. त्याच्या दोन्ही बाजूने वर जाणारी वाट तिथून नव्हतीच मुळी. आल्या पावली माघारी उतरायला सुरुवात केली, नरेश काकाने जीपीएस चेक केले त्यानुसार आम्ही मुख्य वाट समजून ज्या दांडवर चढत होतो ती त्या दांडाच्या डावीकडील घळीतून होती. आता सर्व झाला प्रकार लक्षात आला, पाऊस धुके व सरळ जायच्या नादात ढोर वाटा आणि रानात जाणाऱ्या वाटेने आम्हाला चांगलेच चकवले. पुन्हा सावकाश उतरत सुरुवातीच्या पठारावर आलो मागे जात बरोबर उजवीकडे एक वाट गेलेली आठवत होती तिथेच येऊन थांबलो घड्याळात पाहिले तर दुपारचे बारा वाजून गेलेले. थोडक्यात हा वाटेचा Y जंक्शन होता. त्याच वाटेने काही अंतर पुढे जातो तोच एका झाडावर भीमाशंकर पाटी लावलेली दिसली. ते पाहून वाटले त्यावेळी निदान चार पावलं पुढे येऊन पाहिलं असते तर एवढा वेळ वाया गेला नसता. असो हा ही एक अनुभव ! घळीतल्या ओढ्याला उजवीकडे ठेऊन वाट वर चढू लागली. व्यवस्थित दगडी रचाई वाट त्यात ठराविक अंतरावर खुणा. ही वाट पाहून आमच्यात बहुतेकांना 'गोप्या घाट' आठवला अगदी तशीच चढाई. मनोज, अनिल, अनिरुद्ध आणि झीनत पुढे निघून गेले मी नरेश काका आणि राजेश सर आम्ही तिघे मागून आरामात त्यात राजेश सरांची त्यांच्याच शब्दात सांगायचे तर बक्कळ फोटूग्राफी सुरू होती. भर पावसात देखील कॅमेरा आणि मोबाईल सांभाळत फोटो काढणं खरच भारी काम. एका टप्प्यात मोकळ्या जागेत पाऊस आणि दम खात बसलो. पुढची शेवटची झाडी भरली चढण पार करून पदरात आलो तेव्हा धुक्यात गुरफटलेला पदरगड एका बाजूने शिवलिंग सारखा दिसत होता. पुढे गेलेलं मंडळ आमची वाट पाहत होते, एकमेकांकडे पाहून घड्याळात बघितले पुढचं सांगायची गरज नाही!
पदरगडाला वळसा घेत हिरव्यागार मैदानातून चालू लागलो थोड्या अंतरावर पुरातन कातळकोरीव टाके पदरगड आणि या वाटेवरची मुख्य खूण आणखी साधारण वीस एक मिनिटे चालीनंतर खांडस गणपती घाटाची वाट डावीकडून येऊन मिळाली. आता पदरगडाला उजवीकडे ठेऊन मोकळं वनातून चाल थोडक्यात खांडस मार्गे भीमाशंकर गणपती घाटाचा प्रचलित मार्ग तसेच खांडसहून आणखी दोन वाटेने इथवर येता येते शिडी घाट व घोघोळ / घोघरा ची वाट या दोन्ही वाटा आधी झाल्या होत्या. या तिन्ही वाटा याच पदरात एकत्र येतात पुढे मात्र एकच वाट डावीकडे दरी उजवीकडे कडा वर नागफणी. अरुंद पण पद्धतशीर टप्या टप्प्यात अलगद वर घेऊन जाते. पदरगडच्या वाटेवरची विहीर त्यापुढे जाऊन एके ठिकाणी ताक घेत समोरच्या पदराच्या कड्यातील शिडी घाटाच्या वाटेचे फोटो काढले.
666.jpg
इथून पुढे मात्र पिकनिक छाप मंडळींची गर्दी जाणवली. पदरगड मुख्य धारेला काटकोनात जोडलेला आहे. बरोबर तिथून डावीकडे वळून दाट जंगलातली मोहमय चाल अनेक धबधबे उंच गर्द झाडी राक्षसी वेली सोबतीला शीळ घालणारी विविध पाखरं क्वचित शेखरूची चाहूल हे सारं अनुभवत आपसूकच वेग मंदावला. काय करणार भीमाशंकरच्या रानाची ही खासियत कितीही वेळा या तरी समाधान होत नाही. मुख्य वाट नाक्याच्या अलीकडे झापावर चहासाठी थांबलो. घड्याळात पाहिलं तर तीन वाजून गेले ले, पुढच्या प्लान बद्दल तर काय बोलावे ! आतापर्यंत झालेली वाटचाल पाहून तसेच पुढचा अंतर आणि वेळेचा अंदाज घेत मनोज भाई ने मुक्काम पदरवाडीत करू पुढे न जाता सकाळी ईथूनच परत फिरू असे जाहीर केले. आश्च् र्य म्हणजे लागलीच त्या निर्णयाला सर्वांचाच होकार मिळाला तसेही मित्रांसोबत निसर्गात बाहेर पडलोय हे महत्वाचं अशा वेळी सर्वांना सांभाळून घेत पुढे जाणं ठरल्याप्रमाणे नाही झालं तर बिघडलं कुठे ! असो आता पर्यंत थोडे धाकधुकीत असणारे आम्ही क्षणात रिलॅक्स झोन मध्ये आलो. आता आमच्याकडे भरपूर वेळ होता तसेही इतक्या वेळा भीमाशंकर येऊन कधीही पदरवाडीत मुक्काम हा विचार ही केला नव्हता एव्हाना अनायासे सारे जुळून आले होते.
888.jpg
पदरातली ही निसर्गावर अवलंबून असणारी ही गावं वाण सामान आणयला एकतर घाट चढून वर जा नाहीतर खाली कोकणात उतरा, जिथे सोयीचा बाजार असेल त्याप्रमाणे. आठ दहा राबत्या घरांच्या या पदरवाडीत कोकरे, काठे, लोहकरे, आसवले ही काही मोजकी कुटुंब राहतात. जी काही थोडीफार होइल ती पावसाळी शेती बाकी भीमाशंकर किंवा आसपासच्या गावात जाऊन कामं करणं. लहान मुलांची शाळा दूर कोणत्या तरी गावात थोडक्यात आश्रमशाळा. पदरवाडीतील मुलं एकतर खाली कोकणात किंवा भीमाशंकर पुढील निगडाळे गावात कुठेतरी. सह्याद्रीतील बहुतेक छोट्या वाडी वस्त्यांची हीच समान अवस्था आहे. निसर्गाच्या बाबतीत जरा कुठे कमी नाही पण एकंदरीत रोजचं जगणं अत्यंत कष्टमय. काठे यांच्या घरी मुक्काम टाकला. नरेश काकांना आंघोळीची हुक्की आली जवळच्याच छोट्या ओढ्यात अंघोळ करून आधी घामाने मग पावसाने भिजलेल्या शरीराला तरतरी आली. चहा नंतर अनिरुध्दने आणलेले सूप जोडीला फक्त आणि फक्त ट्रेकची चर्चा. त्यात मनोज सोबत असेल तर घाटवाटा आणि रायगड बद्दल बोलायचं झालं तर रात्र कमी पडेल. रात्रीच्या जेवणात वांग बटाट्याची भाजी चपाती आणि वरण भात. 888.jpg
दुसऱ्या दिवशीची सकाळ फारच उत्साहवर्धक कालच्या तुलनेत आज जणू पाऊस नाहीच, समोरच नागफणी त्यावर अधून मधून धडाका देणारे ढगांचे पुंजके. याच सह्याद्रीच्या मुख्य भिंतीतून खाली पदरात दाखल झालेले अनेक शुभ्र जलप्रपात सारी जमीन भात खाचरं अवघे सारे काही तृप्त न्हाऊन निघालेले. जिकडे तिकडे हिरव्या रंगाच्या विविध छटा. इतर आवराआवरी नाश्ता करून काठे कुटुंबीयांचा निरोप घेतला. परतीच्या वाटेवर आम्हाला शिडी घाट, घोघोळ आणि गणपती घाटाचा प्रचलित मार्ग नको होता, याला कारण आमचे अनेक वेळा या वाटेने येणे झालेले होते तसेच मुख्य म्हणजे या वाटेने खांडस गावात उतरून पुन्हा गाडी किंवा टमटम पकडून कशेळे तिथून आंबिवली मग पुढे डुक्करपाडा जिथे आमची गाडी ठेवली होती (तसेही आधीच्या नियोजन नुसार आम्ही कोथळीगडाच्या बाजूने तिथेच उतरणार होतो) आम्ही तुंगीतून उतराई करण्याचा निर्णय घेतला, पूर्वी काही वर्षांपूर्वी तुंगी ते भीमाशंकर ट्रेक मी केला होता. तुंगीतून जामरूंख बाजूला एक वाट आहे हे माहीत होतेच तसेच आमच्या पैकी झीनतने या बाजूने आधी एकदा उतराई केली होती, ही आमच्या साठी जमेची बाजू होती आणि मुख्य म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या बाजूने चढाई उतराई हा तर नेहमी प्रमाणे प्लस पॉईंट ठरला.
पुन्हा पदरातल्या जंगलातील सुरेख पायपीट जोडीला संधी मिळेल तशी धबधब्यात डुबकी. पदरगड मग वाटेतली विहीर पुन्हा ताक वाला अश्या प्रकारे तासाभरात कालच्या राजपे पाचखडक कढून आलेल्या वाटेच्या जंक्शनवर आलो. अर्थातच तिथे न वळता सरळ गणपती घाटाची वाट धरली. आधी म्हणालो त्याप्रमाणे जसा पदरगड मुख्य रांगेला साधारण काटकोनात जोडलेला आहे त्याच प्रमाणे तीच पदरातली सम पातळीवरची एक रांग पश्चिमेकडे गेलेली दिसते त्याच रांगेवर एक टोक आभाळात घुसलेले दिसते तेच हे तुंगी. याच तुंगी मुळे या खोऱ्याचे दोन भाग पडलें एक नांदगाव खांडस आणि दुसरा जामरूंख असे म्हणता येऊ शकते. तुंगीवर किल्ला असल्याच्या कोणत्याही खुणा नाहीत पण तिथली पूर्वापार असलेली वस्ती यावरून त्याचे स्थान नक्कीच इथल्या आजू बाजूच्या घाट वाटांवर टेहळणी करीता उपयुक्त असणार यात शंकाच नाही. तसाही हा तुंगी सिद्धगड भीमाशंकर वांद्रे पेठ ते पार दूर ढाक पठारावरून सुध्दा लक्ष वेधून घेतो. वाटेतल्या झापावर पुढच्या वाटेची खात्री करून घेतली काही अंतर पुढे जातो तोच दोन शाळकरी मुलं भराभर मागून येऊन पुढे निघून गेली विचारलं तर समजलें कोंढवळ गावातली शिकण्यासाठी डोंगर पाड्याच्या आश्रम शाळेत ! कुठे कोंढवळ कुठे डोंगरापाडा ! आठवड्यात का होईना पण त्यासाठी भीमाशंकर गाठून अर्धा डोंगर उतरून तुंगी गावातून डोंगर पाड्यात जाणे कितीही पायपीट! खरचं निःशब्द झालो.
मळलेली वाट डावीकडच्या बाजूने बाहेर आली आता उलगडला तो पलीकडच्या खोऱ्यातील नजारा, आंबेनळी माथ्याच्या कमळजाई पासून खेतोबा वाजंत्री ते अंधारी पेठ पर्यंतचा सह्यमुलुख पावसाने उघडीप दिल्याने पाहता आला.
1111.jpg
याच दक्षिण भागातल्या राजपे जामरूंख बाजूला आम्हाला उतरायचे होते. त्यासाठी डावीकडे खास लक्ष ठेऊन जात होतो. काही ढोर वाटा होत्या पण त्यातील अचूक मुख्य वाट ओळखणे सोपे नव्हतेच मुळी. अगदीच नाही तर तुंगी गावात कुणाला तरी विचारणे किंवा प्रचलित मार्गाने डोंगर पाड्यात जाणे हा झाला शेवटचा पर्याय. हाताशी असलेला वेळ आणि पावसाची विश्रांती ही जमेची बाजु त्यामुळे आमचे आम्ही शोध घेत पुढे निघालो. फार चढ उतार नसलेली जंगलातली समपातळीत असणारी वाट पुढे मोकळं वनात आली. त्या हिरव्या गार मैदानात सोबतचा सुका खाऊ खात मोठा ब्रेक घेतला.
वेळ पाहत निघालो आता पाठी पदरगड बराच मागे पडलेला समोर नागफणी ते उत्तरेला दूरवर सिद्धगड ही सहज नजरेत आला. ब्रेक घेतल्यापासून जवळपास अर्ध्या तासाहून अधिक चालीनंतर तुंगीच्या पठारावरील पाहिलं घर नजरेत आले मुख्य गाव अंदाजे आणखी अर्ध्या तासावर. अनिरुध्द झीनत आणि मनोज वाटेची माहिती देणारं कुणी आहे का हे पाहायला गेले. आम्ही नरेश काकाच्या मोबाईल मध्ये जीपीएस वर पाहिलं तेव्हा मागे एका घळीतून उतरता येऊ शकेल असा अंदाज आला कारण तुंगी गावाच्या अगदी मागच्या म्हणजेच दक्षिण बाजूने उतरायचे झाले तर त्या भागात सरळसोट कडा आहे निमुळती धार, सोंड किंवा घळ असा कुठलाही प्रकार नाहीच. त्यामुळे वाट असणार तर याच जवळच्या घळीतून. अगदी तसेच झाले त्या झोपडीतून संतोष आसवले आमच्या सोबत आले, पुन्हा पंधरा मिनिटे आल्या पावली मागे जात वाट बरोब्बर घळीत उतरली घळीच्या उजव्या बाजूने तिरक्या रेषेत वळणं घेत खाली उतरत होती. खाली धनगर पाडा, राजपे, टेंबरे दूरवर जामरूंख. ही वाट पाहून नरेश काकाला 'दाभिळ टोक' ट्रेक आठवला. संतोष यांनी वाट आणि राजपे व जामरूंख मधील वाटेतील खुणा जसे अमुक झाड तमुक झाड इकडे वळा मग सरळ जा असं बरंच समजावून सांगितले.
101.jpg
ते परतत असताना आम्ही त्यांना थोडी मदत करू पाहत होतो खरं तर हा संवेदनशील विषय तर ते स्पष्ट म्हणाले, 'अरर असं कुठे असतं का !' सुरुवातच एका शेवाळलेल्या कातळावरून सावधपणे पार करून पुढे वाट एकदम आरामशीर रचाई केलेली एखादी वापरातील वाट असते अगदी तशीच. झटपट उतरत असताना खालच्या टप्प्यातील राजपेकडची बारीक पायवाट ध्यानातच आली नाही त्यात अनिरुध्द झीनत आणि मनोज पुढे निघून गेले. मग फार इकडे तिकडे न करता सरळ मळलेल्या टेंभरे गावाच्या वाटेने आम्ही सर्व जण निघालो. पूर्ण सपाटीवर आल्यावर एक मोठा ओढा कडेने वाहत होता सर्वानुमते आंघोळीचा ठराव पास झाला.
पुढे वाटेत गावातील मंडळी शेतीकामात व्यस्त चांगलाच झालेल्या पावसानं इथला बळीराजा सुखावलेला.
201.jpg
गावाच्या वेशीवर आलो तेव्हा रिमझिम पाउस सुरु झाला. दुकानदार काकांच्या घराच्या वरंड्यात बैठक मांडली. टेंभरे गावापासून आंबिवली जामरूंख रस्ता कमीत कमी तीन एक किलोमीटर अशात या दुपारच्या आड वेळी जाण्यासाठी दुसरे कुठलेही साधन मिळणं कठीण. अनिरुद्धने काकांशी बोलून त्यांची बाइक घेतली, सोबत मी आणि राजेश जेमतेम पंधरा वीस मिनिटांच्या प्रवासाला बाइकवर पावसाने जोरदार झोडपलं सोबतीला गार वारा. डुक्करपाड्यात जाऊन माझी गाडी आणि राजेशची बाइक घेऊन टेंभरेत परतलो. दुकानदार काकांना बाइक घेतली त्याबद्दल पेट्रोलचे पैसे विचारले तर काकांनी सरळ नकार दिला, त्यांचे आभार मानून निघालो. वाटेत चिल्हार नदीला भरपूर पाणी त्याच काठावर आहे ती चिल्हार उर्फ आंबिवलीची लेणी.
कशेळेत थोडी पोटपूजा करून चौघे पुणेकरांनी निरोप घेतला आम्ही तिघांनी बोराडपाडा बदलापूर मार्गे कल्याण गाठले तेव्हाही पावसाची सोबत होतीच.
जे होते ते चांगल्यासाठीच याचा पुरेपूर प्रत्यय घेत एक चांगला वेगळ्या वाटेचा निवांत ट्रेक खात्यात जमा झाला.

योगेश चंद्रकांत आहिरे
अधिक फोटो साठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2018/08/padarwadi.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच
हिरवाई डोळे निववतेय अगदी!

मस्तच
हिरवाई डोळे निववतेय अगदी!>>>>> +१२३४५ आणी धबाधब्यांनी चार चांद लावलेत .

वाट चढताना सहसा चुकायला होत नाही पण खाली उतरताना पठारावरून खाली जाणारी वाट शोधण्यात बराच वेळ जातो.
जिपीएसमध्ये सॅटलाइट व्ह्यु करून पाउलवाट दिसते का?
टेभरे आंबेगाव लेणी वाटेने दोनदा आलो आहे. ( एका पांढऱ्या झाडावर नाव लिहिण्याचा वात्रटपणाही केला आहे॥ दुसऱ्यावेळी ते झाड शोधले तर नावं ठसठशीत झालेली.)
भिमाशंकरचे धबधबे काही खास वाटत नाहीत जेवढे माळशेजचे असतात. ओढे आहेत. राजमाचीला चौदा पंधरा आहेत. लेण्यावरचा धबधबा छान आहे.
रूट ट्रेस मॅप कुणाचा वापरल्यास वाट चुकणार नाही. प्रथम वाट शोधत जात गम्मत कायम ठेवायची, चुकलं तरच तो मॅप काढायचा असं करून पाहायला हवं.

शिडी आणि गणेश घाट सोडून दुसऱ्या वाटांनी भीमाशंकर करायची खूप इच्छा आहे.
गेल्या दहा वर्षात दरवर्षी भीमाशंकर ला जाऊन सुद्धा एकदाही पदरगड करता आला नाही याची खंत वाटते.
लेख वाचून पदरगड चा प्लॅन फिक्स झाला आहे. मस्त वर्णन

धन्यवाद रश्मीजी आणि SRD

जिपीएसमध्ये सॅटलाइट व्ह्यु करून पाउलवाट दिसते का? >> आधी कुणी रूट मार्क करून ट्रक दिला असेल तर समजते. पण ठोस अशी वाट ना ही दिसत मात्र टेरेनचा अचूक व्हिव्यू मिळतो.
प्रथम वाट शोधत जात गम्मत कायम ठेवायची, चुकलं तरच तो मॅप काढायचा असं करून पाहायला हवं. >>> हीच तर गम्मत आहे.

>>पदरगड चा प्लॅन फिक्स झाला आहे>>
म्हणजे त्या वाडीत राहाणे/ का वर ते दोर लावून चढतात टोकावर नेढं आहे तिथे जायचं?

म्हणजे त्या वाडीत राहाणे/ का वर ते दोर लावून चढतात टोकावर नेढं आहे तिथे जायचं? >> सकाळी आरामात शिडी घाट मार्गे भीमाशंकर करून सायंकाळी पदरवाडीत वस्तीला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पदरगडावर रोप शिवाय जितकं वर जात येईल तितकं करण्याचा विचार आहे. काय वाटतं ?

धन्यवाद सुमित.
दुसऱ्या दिवशी सकाळी पदरगडावर रोप शिवाय जितकं वर जात येईल तितकं करण्याचा विचार आहे. काय वाटतं ? >>> पुरेशी तयारी असू द्या. ट्रेक साठी शुभेच्छा.