माझा बाप आणि माझ्या बापाचा मुलगा

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

माझा बाप आणि माझ्या बापाचा मुलगा

ह्याच शीर्षकावर मी काही वर्षापूर्वी लेख लिहिला होता. बाबा गेल्या नंतर माझ्या अपराधी ( हो अपराधी) मनाने विमनस्क अवस्थेतून तो लेख उतरला होता. तेंव्हा काही जणानी तो लेख मनाला टोचतो आहे , इतके नकारात्मक नका लिहू पासून ते ह्या विषयावर काहीतरी सकारात्मक लिहून काढ़ म्हणून सांगितले होते.

तसे बापावर सकारात्मक लिहीणयासारखे बरेच काही असताना शब्द शब्द आसूड ओढण्याची गरज मला का पडावी. कदाचित ती त्यावेळची तीच गरज असावी.

बाप मला आठवतो तो माझ्या साठी जुन्या सोन्या चित्रपटांची तिकीट काढणारा. त्याच्या बरोबर मी कित्येक सुंदर इंग्रजी चित्रपट पाहीलेले आहेत. बीयूटीफुल पीपल, गन्स ऑफ नवेरेंन ( हयात ग्रेगरी पेक ह्या नटाची देवानंद सही सही नक्कल करतो हेही सांगून झालेल असायचे ) सुपरमैन भाग 1 ते 4, सर्वायवल, मेंन इन द मंकी शैडो , क्लिंट ईस्टवुड , ग्रेगरी पैक, एंथनी हॉपकिंस, एंथनी क्वीन इत्यादी नट मला तेंव्हा माहीत होते. मुख्य म्हणजे पहीली ते दूसरीच वय असताना बाप मला आपल्या बरोबरीच समजतो आणि आपल्या बरोबरीने चित्रपट पाहायला नेतो है फीलींग सॉलिड वाटायच. माझ्या बरोबरीच्या मुलाना थीएटरच दर्शन झाल नसताना मी मात्र बापाबरोबर इरोस, लिबर्टी , स्टर्लिंग , मेट्रो अश्या जुन्या जाणत्या चित्रपट गृहांची वारी करून आलेला असायचो. माझ्या साठी तो दिवस म्हणजे सण असायचा ( आई ताट घेऊन ओवाळायची नाही इतकाच काय तो फरक), दुपारी आम्ही निघायचो. शनिवार असल्या मुळे गाडीला फारशी गर्दी नसे. बांद्रा स्टेशन ला उतरूंन व्ही टी स्टेशन ला जाणारी हार्बर गाड़ी पकडायची. चित्रपटगृह असेल तर मात्र चर्चगेट मेन लाइन. तिकडन चालत चालत निघायच , वाटेत विठ्ठल भेलपूरी वाल्या कडून ठरलेली भेळ किंवा शेवपूरी असा थाट असायचा. घरी यायला रात्र व्हायची. पण बापाचा आणि बापाच्या मुलाचा दिवस छान साजरा झालेला असायचा. चित्रपटाची आवड निर्माण झाली ती तेंव्हाच

बापाने मला न सांगता गुपचुप एक लायब्ररी सुरु केली होती. आणि अचानक एक दिवशी माझ्या समोर फास्टर फेणे ची सहा पुस्तक ठेवली , मला काय तो हर्ष वायू व्हायचा बाकी होता. भारा भागवतांवर प्रेम जडल ते तेंव्हाच. वाचनाची आवड निर्माण झाली. तेंव्हा पासून खुप खुप वाचत गेलो . भुताळी जहाज, फास्टर फेणे , रॉबिन हूड, मग थोड़ मोठ झाल्यावर नाझी भस्मासूराचा उदयास्त ( साधारण 600 पाने ) सनी डेज ( 400 ते 500 पाने) तुबांडचे खोत ( दोन्ही भाग मिळून सोळाशे पाने) समग्र पु ल, चि वि, व पु, दळवी, मंत्री , पाटील, भेंडे, गाडगीळ इत्यादी इत्यादी. बापाच्या मुलाला खुप वाचायला आवडायचे ते तेंव्हा पासून. आणि वाचता वाचता कधी लिहीता झालो ते कळले सुद्धा नाही

कधी बाप हळूच नाटकाची तिकीट काढून आणायचा. मी, पूर्वा आई आणि तो स्वत:, खुप खुप बालनाट्ये पाहीली तेंव्हा. नाटक संपल्यावर बाप आणि बापाचा मुलगा सह कुटुंब जीवन नाहीतर रामकृष्ण मध्ये जेवायला जात असू. खाण्याची आणि स्वत जेवण बनवून इतराना ख़िलवण्याची सवय झाली ती तेंव्हाच. त्या सवईचा मला बाहेरगावी एकट राहाताना खूप उपयोग झाला.

आणि बालपणाच्या नुकत्याच कळू लागणाऱ्या वयातल्या ( वय 6 ते 7 वर्ष) आठवणी इतक्या बारकाईंन, डीटेलवार आणि लख्ख आठवणयाच्या शार्प म्हणावे अश्या मेमरीच्या देणगीचा मूळ स्त्रोत हा माझा बापाच.

मला आजतागायत आयुष्यात अनेक ओळखी मिळाल्या पण माझ्या बापाचा मुलगा ही जी माझी ओळख आहे ती मला आयुष्यभर पूरणार आहे कारण त्या ओळखीतच माझ पूर्ण विश्व सामावलेल आहे. बस इतकेच

केदार अनंत साखरदांडे

विषय: 
प्रकार: