अवघे धरू सुपंथ...

Submitted by झुलेलाल on 26 November, 2018 - 00:28

काल मला माझ्या मित्राचा हा मेसेज आला. कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या मुलांची मनोवस्था काय असेल याची कल्पना करणे शक्य नाही, पण तिच्या काळजीने पालकांची अवस्था काय होते, याची मात्र या मेसेजवरून कल्पना येऊ शकते. एका विचित्र आजाराने या मित्राची मुलगी गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहे. तिच्यावर उपचार करून तिला लवकरात लवकर या आजारातून बाहेर करण्यासाठी कितीही कष्ट घेण्याची या मित्राची तयारी आहे. जगाच्या पाठीवर कुठेही या आजारावरील उपचार करण्यासाठी तिला घेऊन जाण्याचीही त्याची तयारी आहे, असे त्याने मला सांगितले, आणि मला मायबोलीची आठवण झाली. जगाच्या पाठीवर सर्वत्र उमटलेल्या या मराठी पाऊलखुणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, तर तिच्यावरील उपचाराची वाट सापडू शकेल, अशी आशा मनात उमटली...
त्यासाठीच त्या मित्राचा मेसेज जसाच्या तसा इथे देत आहे. कुणीतरी, कुठेतरी या क्षेत्रातील थेट किंवा अप्रत्यक्ष माहीतगार या माध्यमातून काही मदत करू शकला, तर जगभरात पसरलेले हे समाजमाध्यमाचे जाळे विधायक कार्यासाठी हात देणारे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट होईल.
आपणापैकी कुणास याविषयीच्या उपचाराची वा तज्ज्ञांची, किंवा रुग्णालयाची माहिती असेल, तर जरूर कळवा... ती माहिती या रुग्णास नक्कीच उपयोगी ठरू शकेल, व अवघे धरू सुपंथ हा विचारही सार्थ होईल...
‘माझी मुलगी मानसिक विकाराने गेले पावणे दोन वर्षे आजारी आहे. OCD with paranoid psychosis असे डॉक्टरांनी तिच्या रोगाचे विश्लेषण केले आहे. दररोज २० टॅब्लेट सुरु होत्या. गेल्या महिन्याभरापासून दररोज सात टॅबलेट सुरु आहेत… आठवडाभर खूप छान मूडमध्ये असते आणि नंतर गेले काही दिवस एकदम ड्रीप्रेशनमध्ये येते. अॅग्रेसिव्ह होते... ‘मरायचे आहे’ असे सांगते. रडत राहते. चाकू घेऊन हातावर मारून घेते. पण काही वेळानंतर स्वत: सांगते, ‘बाबा मी तुझ्यासाठी जगणार. मला किती त्रास होतोय तुला माहिती नाही!’…
डॉक्टरना हे सांगितल्यानंतर ते म्हणतात, ‘ती स्ट्रेस घेऊ शकत नाही. त्यावेळी तिचा ओसीडी वाढतोय!’…
कौन्सिलिंगचाही फायदा होत नाही. पुन्हा तेच घडतेय.
परीक्षा असू दे अथवा नाही... तिचा ओसीडी कमी होतच नाही. शॉक ट्रीटमेंट (ईसीटी ११ वेळा), आरटीएमएस (२४वेळा) हे उपचारही करुन झाले आहेत.
इंटरनेटवरील माहितीनुसार, ओसीडी बरा होत नाही असे नमूद आहे. परंतु तो नियंत्रणात राहून चांगलं दैनंदिन आयुष्य जगता येऊ शकतं असाही उल्लेख आहे. पण मानसीबाबत ते झालेलं नाही. उपचार चुकत तर नाही ना? तिचे निदान नीट झाले आहे का?...’
... माझ्या या मित्राला मदत हवी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

झुलेलाल, नमस्कार.
धाग्याच्या शीर्षकावरून दिलेल्या समस्येचा अंदाज येत नाहीये.
मदत हवी आहे / कोणाशी तरी बोलायचे आहे या कॅटेगरीत पण धागा ठेवावा लागेल बहुतेक.

IPH ठाणे ही संस्था आणि डॉ मनोज भाटवडेकर, अंधेरी हे दोन मानसोपचार तज्ज्ञ माहीत आहेत. पण प्रत्यक्ष अनुभव नाही.

मी काही प्रोफेशनल नाही. माझ्या थोडक्या माहीती नुसार:
सर्वसाधारणपणे OCD पेक्षा Paranoid Psychosis (Delusional Disorder ) ट्रीट करणे कठीण असावे. (अपवाद असू शकतात, एक माईल्ड दुसरा सिव्हीअर असू शकतो.) Paranoid Psychosis मध्ये रुग्णाने औषध नाकारणे / घेण्याचे नाटक करून न घेणे (गोळी हातातच ठेऊन तोंडात घातल्या सारखे करून पाणी पिणे /गोळी जीभे खाली ठेऊन पाणी पिणे, नंतर ती सिंक मध्ये फेकून देणे) असे प्रकारही जास्त होतात.
या औषधांचे साईड इफेक्ट्सही बरेच सिव्हीअर असतात. त्यामुळे काही आयाही मायेपोटी मुलांना औषध चुकवायचे असल्यास त्यांना मदत करू शकतात - हो घेतले औषध त्याने/तीने असे सांगून. त्यामुळे औषध नियमित घेतल्या जात नाही व त्याचे योग्य परिणाम होत नाही.
तेव्हा असे होत नाहीये ना याची १००% खात्री करायला हवी, खास करून लहान मुलांच्या बाबतीत गोळी गिळलीय याची खात्री करायला हवी, रोज ३६५ दिवस. मूले हुशार असतात, जो पर्यंत कुणी बघतेय तो पर्यंत घेणार आणि विश्वास बसला घेत आहेत म्हणून बघण्यात हलगर्जीपणा केला की परत गोळी टाकून देणे सुरू करतात. तेव्हा रोज न चुकता जातीने लक्ष घालून औषध द्यायला हवे. डॉक्टर सुद्धा हे सांगतात, पण सुरवातीला नीट लक्ष देऊन हळूहळू दुर्लक्ष होते लोकांचे, रोग्याला जरा बरे वाटले की.

औषध खरेच नियमितपणे घेत आहे हे निश्चित असेल तर सेकंड ओपिनियन घ्या, तूमच्या शहरात नावाजलेल्या, खात्री असलेल्या डॉक्टर करून.

बाकी याबाबतीत इथे कुणी प्रोफेशनल असतील व तुम्हाला चांगल्या सूचना, सल्ला देतील अशा शुभेच्छा.

आणि वर कारवी यांनी सांगितल्या प्रमाणे धाग्याचे शिर्षक बदला, व योग्य समूहात हलवा.

उपाय सांगू शकत नाही पण खरंच कठीण आहे मुलांचं आणि पालकांचं. लवकर उपाय सापडून बरं होण्याकरता शुभेच्छा.