वाईट्ट हसू ( भयगूढ कथा )

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 21 November, 2018 - 13:01

आम्ही इथे रहायला आलो तेव्हा सगळं ठीकठाक वाटलं होतं. नाव ठेवायला जागा नव्हती. दोनमजली टुमदार बंगला,समोर छोटासा बगीचा, कंपाउंडच्या चारीबाजूंनी उंचच उंच झाडं अन प्रशस्त लोखंडी गेट. मला आणि मुग्धाला, म्हणजे माझ्या बायकोला पाहताक्षणीच आवडलं होतं हे घर. शिवाय स्वस्तात मिळाल्यामुळे आम्ही दोघंही खुश होतो. घर जरा जुनं होतं पण होतं सुस्थितीत. थोडंफार रिनोव्हेशन केलं अन झालं रहायला रेडी.

या घरातली एकच विचित्र गोष्ट म्हणजे तळमजल्यावरची एकमेव खोली. आम्ही तिला गुहा म्हणायचो. होतीही तशीच- बंदबंद अन गूढ. ही एकमेव खोली अशी होती की जिला खिडकी नव्हती. इथे चोवीस तास अंधार रहायचा अन कसलातरी विचित्र दमटपणा जाणवायचा. बाह्य जगापासनू पुर्णपणे तुटलेली होती जणू. पण आश्चर्य म्हणजे आम्ही आलो तेव्हा बाकी खोल्यांमधे काहीच सामान नव्हतं पण ही खोली मात्र फर्निचरने सुसज्ज होती ! जुन्याकाळचा सागवानी सोफा, आरामखुर्ची, मेज अन भलंमोठं घड्याळ. धूळ नसती तर इथे कुणीतरी राहतंय असंच वाटलं असतं.
गुहेतली अजून एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे भिंतीवर टांगलेलं पोर्ट्रेट. चार बाय सहा नक्कीच असेल. झाडाझडपांमधून दहाबारा मानवी चेहरे बाहेर डोकावताहेत असं वाटत होतं. अंगावरचे आदिवासी पोशाख, चेहऱ्याला फासलेली राख अन लालभडक डोळे. प्रत्येकाच्या हातात काही ना काही हत्यारं होती. अगदी जिवंत वाटावं असं हे चित्र. मुग्धाला आवडलं नाही पण मला जाम आवडलं. भिंतीवरचं घड्याळही बरंच जुनं होतं, म्युझियममध्ये शोभेल असं. वेळ अचूक सांगायचं पण टोल मात्र पडायचे नाही. प्रत्येक तास यायचा अन शांततेत निघून जायचा.

ही खोलीसुद्धा इतर खोल्यांसारखीच आम्ही स्वच्छ ठेवायचो. इच्छा झाली की इथे येऊन बसायचो. हिवाळ्यातल्या बऱ्याच संध्या आम्ही गुहेतच घालवल्या. मनाला भुरळ घालणारा उबदारपणा होता इथे. धो धो कोसळणारा पाऊस अन कडाडणाऱ्या विजांचा आवाजही दुरुन, वेगळ्या विश्वातून आल्यासारखा वाटायचा.
पण एक व्यक्ती अशी होती जिचं मत आमच्यापेक्षा जरा वेगळं होतं- आमचा मुलगा हर्षित. इथे रहायला आलो तेव्हा तान्हुला होता तो.
तो हळूहळू रांगायला लागला, चालायला लागला, बोलू लागला पण गुहेला मात्र नेहमीच टाळत आला. आम्ही दोघं आत असलो तरच तो आत यायचा; तेसुद्धा एकट्याला बाहेर भिती वाटते म्हणून

एकदा असंच रात्रीची जेवणं करून आम्ही गुहेत गप्पा मारत बसलो होतो. हर्षित रिमोटच्या गाडीसोबत खेळत होता. सोबत तोंडाने 'घ्यांग घ्यांग' आवाज काढणं सुरू होतं. मधेच तो एक खेळणं सोडून दुसऱ्यासोबत खेळायचा. गोंधळच गोंधळ. थोड्यावेळाने त्याचा आवाज यायचा बंद झाला. ‘शांतता’ या शब्दाशी वैर असलेला मुलगा शांत कसाकाय झाला म्हणून मी मागे वळालो. पाहतो तर काय, तो भिंतीवरच्या पोर्ट्रेटकडेच टक लावून पाहत होता. पापणीही न लवता… एकटक.
“काय बघतोय रे?” मी विचारलं.
“पप्पा तो बघा न. किती वाईट्ट हसतोय. “ तो चित्रातल्या चेहऱ्याकडे बोट दाखवत म्हणाला. मी त्या बोटाच्या दिशेने पाहिलं. बाकी चेहऱ्यांसारखाच एक चेहरा होता तो. दाट भुवया, बटबटीत डोळे अन चेहऱ्यावरचं पिवळेजर्द दात उघड करणारं हास्य.
“वाईट नाही बेटा.हे बघ,सगळेच छान हसताहेत.”
“नाही. हा एक वाईट्ट हसतोय.” तो चित्रावरची नजर ढळू न देता म्हणाला.
“आपण ही ट्युबलाइट लावलीय ना त्याचा उजेड चमकल्यामुळे तसं होत असेल. तू लक्ष नको देऊ.”
माझं स्पष्टीकरण त्याला पटलं की नाही माहीत नाही पण त्याचं खेळणं परत सुरू झालं.

सकाळपर्यंत मी ही गोष्ट विसरूनही गेलो. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधे प्रचंड काम होतं. पूर्ण काम संपवून घरी यायला रात्र झाली. आल्यावर मी फ्रेश झालो अन जेवण करायला किचनमध्ये आलो.
“हर्षित आज गुहेत गेला होता.” मुग्धा गंभीर चेहरा करत बोलली.
“मग यात काय एवढं?”
“एकटा गेला होता.”
“काय !! ?”
“हो. दुपारी मी किचनमधले कामं आवरलं अन बाहेर आल्यावर हर्षितला आवाज दिला तर त्याने ओ दिला नाही. घरभर शोधलं पण सापडला नाही. शेवटचा पर्याय म्हणून मी गुहेत गेले तर तो एकटाच उभा होता तिथे, तेपण अंधारात!”
“आश्चर्य आहे. आतपर्यंत तर तो कधीच एकटा त्या खोलीत गेला नाही. “
“तेच तर. कालपासनू विचित्र वागतोय तो.”
“लहान मुलांचं कल्पनाविश्व वेगळंच असतं. ते काय विचार करतील सांगता येत नाही.”
“हो ते तर आहेच. पण तुला अजून एक गोष्ट दाखवायचीये.”
“कुठली?”
“जेवणं झाल्यावर सांगते.” ती हळू आवाजात म्हणाली.
मी मागे वळून पाहिलं. हर्षित किचनच्या दिशेने येत होता. चेहऱ्यावर नेहमीचंच निरागस हास्य होतं. स्टोअररूमजवळ येताच तो थांबला. या खोलीला लागूनच खाली उतरणाऱ्या पायऱ्या होत्या. त्याने मान वळवून तिकडे बघितलं अन त्याचा चेहरा गंभीर झाला.
“हर्षित कम हियर.” मी आवाज दिला अन तो तंद्रीतून बाहेर पडला.
“काय बघत होता रे एवढं.”तो किचनमध्ये येताच मी हसून विचारलं.
“मम्मी काय भाजी बनवलीयस गं?”
विषय टाळून तो डायनिंग टेबलसमोर बसलादेखील .

जेवणं झाल्यावर मुग्धाने त्याला कार्टून लावून दिलं अन तो त्यात गुंतलाय हे पाहून मला तळघरात घेऊन गेली.
“इथे कशाला आणलंस ?”
तिने लाईट लावला.
“हे बघ.” ती पोर्ट्रेटखाली फरशीकडे बोट दाखवत म्हणाली.
तिथे खुप साऱ्या माशा, झुरळं, डास अन वेगवेगळ्या प्रकारच्या किड्यांचा खच पडला होता. पंख फाटलेले दोनतीन फुलपाखरं फडफडत होते. असं वाटत होतं की घरातले अन आसपासचे सगळे सुक्ष्मजीव तिथे मरून पडलेत.
“अगं हे काय ! रात्री तर इथे काहीच नव्हतं.”
“मलाही तोच प्रश्न पडलाय.”
“मी बोललो होतो तुला की सगळ्या खिडक्यांना जाळ्या बसवून घेऊ.”
“अरे पण इतके दिवस कुठं असं झालं. किडे बाकी घरात कुठेच नाहीत. शिवाय या खोलीला खिडकीही नाही.”
तिचंही म्हणणं बरोबर होतं.
“हर्षितने तर नाही केलं न काही. तू म्हणाली होतीस की दुपारी तो इकडे आला होता.”
“मी विचारलं त्याला पण तो काहीच बोलला नाही.”
“अच्छा. जास्त फोर्स करूनही फायदा नाही. पुन्हा जर असं झालं तर बघू.”
थोडावेळ निष्फळ चर्चा करून आम्ही हॉलमध्ये आलो. हर्षित कार्टून पाहण्यात गुंग होता. त्याच्यासमोर चर्चा नको म्हणून आम्ही चुप बसलो.
“परत नाही होणार मम्मी असं. तो बाहेर पडलाय.”
एवढं बोलून तो परत कार्टून बघू लागला.

मी या गोष्टीवर बराचवेळ विचार केला पण मनाचं समाधान होईल असं उत्तर मिळालं नाही. आतापर्यंत बऱ्याच गोष्टी चालवून घेतल्या होत्या पण हे जरा जास्तच होतं. विचार करता करता रात्री केव्हातरी मला झोप लागली.

“टाSण SS”
घड्याळाचा टोल पडला अन मी खडबडून जागा झालो. कानांजवळ टोल घणाणावा असा तो आवाज. “च्यायला या जुनाट घड्याळांच्या”
मी मनातल्या मनात शिवी हासडली अन… पुढच्याच क्षणी माझ्या लक्षात आलं की गुहेतल्या जुनाट घड्याळाचे टोल याआधी कधी पडलेच नव्हते ! मग हा टोल कसाकाय वाजला ?! बाजूला मुग्धा शांतपणे झोपलेली होती. तिला तर तो ऐकू आलेला दिसत नव्हता. मला स्वप्न पडलं की काय ?

“टाSण SSS”
दुसरा टोल घणाणला अन मनाचा थरकाप उडाला.. यावेळेचा आवाज जरा जास्तच जोरात होता. मी पलंगावरुन खाली उतरलो अन पायांत चप्पल सरकवली. जे काय असेल ते आता शोधावंच लागणार होतं.
टेबलावरचं घड्याळ तीन वाजल्याचं दाखवत होतं. याचा अर्थ अजून एक टोल पडायला पाहिजे. पण इतका वेळ का लागतोय. हातात टॉर्च घेऊन मी बेडरुमचा दरवाजा उघडला. आवाज नक्कीच गुहेतून आला होता. पावलं तळघराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर पडत होती अन कान वेध घेत होते त्या अनामिक आवाजाचा… तिसऱ्या आघाताचा. पण कुठल्यातरी उर्मीने खेचून आणलेली पावलं आता पुढे जायला धजावत नव्हती. अंधाऱ्या तळघरात उतरतांना थंडगार, अंगावर शहारे आणणारा गारवा जाणवत होता. तो अंधार जिवंत वाटत होता, सळसळत होता. पावलांच्या आवाजाव्यतिरिक्त अजून काहीतरी खसफसत होतं, अगदी हळू आवाजात… कानांनाही न जाणवणाऱ्या. मनाचा एक कोपरा मागे खेचत होता अन एक पुढे. तो अंधार जास्तवेळ सहन करणं शक्य नव्हतं म्हणून मी चाचपडत ट्युबलाइटचं बटन दाबलं. शुभ्र प्रकाशाने खोली काठोकाठ भरली. सगळं शांत शांत होतं. भिंतीवरचं घड्याळ नेहमीप्रमाणे ‘टॉक टॉक’ आवाज करत होतं. मी बराचवेळ त्याकडे टक लावून पाहिलं पण तिसरा टोल पडलाच नाही. घड्याळावरची नजर आपसूकच पोर्ट्रेटवर गेली. त्यातले चेहरे नेहमीप्रमाणेच विचित्र हसत होते. फरशीवर एकही किडा मरून पडलेला नव्हता. स्वतःच्या भित्रेपणाला मी मनातल्या मनात हसलो, ट्युबलाइट बंद केली अन पायऱ्या चढून वर आलो. आतापर्यंत सगळं ठीक होतं पण वरच्या पायरीवर पाय ठेवताच कुणाच्यातरी मुसमुसण्याचा आवाज कानांवर पडला. अगदी हळू आवाजातील ते रडणं होतं. आवाज हर्षितचाच वाटत होता. हा परत भास तर नसेल ? मी डोळे मिटून मन शांत केलं पण आवाज बंद होण्याच्या ऐवजी अधिक स्पष्ट झाला. झरझर जिना चढून मी त्याच्या रूमजवळ पोहोचलो. दरवाजा नुसताच लोटलेला होता, आवाज त्याच्याच खोलीतून येत होता. मी दरवाजा थोडासा ढकलला. आत झिरपलेल्या पुसट उजेडात दिसलं की हर्षित अंगाचं मुटकुळं करून पलंगाच्या कोपऱ्यात बसलेला आहे. मी लाईटचं बटण दाबलं तरीसुद्धा तो अजिबात दचकला नाही ! छताच्या कोपऱ्यावर खिळलेली त्याची नजर हटली नाही.
“हर्षित, बेटा काय झालं ?”
“ते बाहेर पडलं.” तो कापऱ्या आवाजात पुटपुटला. मी त्याच्या नजरेच्या दिशेने छताकडे पाहिलं पण तिथे जाळे- जळमटांशिवाय दुसरं काहीच नव्हतं.
“अरे, काही नाही तिथे.”
“आहे.”
“हे बघ. आपलीच सावली ही अशी मोठी पडते कधीकधी.”
माझ्या बोलण्याला अजून वजन देण्यासाठी मी भिंतीच्या कोपऱ्यात गेलो अन दोन्ही टाचा उंचावून मोकळ्या हवेत हात फिरवले, “कुठे काय आहे? काहीच नाही.”
पण तो माझ्याकडे पाहतंच नव्हता. अजूनही त्याची नजर माझ्या डोक्याच्या भरपूर वर छताच्या कोपऱ्यावर स्थिरावली होती. मी त्याच्या चेहऱ्याकडे बघत तसाच उभा राहलो. त्याचं मुसमुसणं आता थांबलं होतं. माझ्या श्वासांव्यतिरिक्त कसलाच आवाज ऐकू येत नव्हता. जणू तो काळ, तो क्षण, माझी पावलं एकाचजागी खिळली होती.

हर्षितची नजर आता हळूहळू खाली यायला लागली. जणूकाही छताला चिकटलेलं ते अलगद तरंगतंय…अगदी सावकाशपणे, माझ्या खांद्यावर उतरण्यासाठी खाली सरकतंय. माझ्या शरीराला नकळत कंप सुटला, घशात आवंढा दाटला पण मी इथून हटणार नव्हतो. हर्षितच्या मनातील भीती घालवायची असेल तर मला खंबीर राहणं आवश्यक होतं. त्याची नजर खाली, अजनू खाली, अगदी माझ्या खांद्यापर्यंत आली. माझं अंतर्मन नकळत अमानवी पाश जाणवतोय का याचा अदमास घेऊ लागलं.

पण… खांद्यापर्यंत आलेली त्याची नजर अचानक तिथून हटली अन हवेत भिरभिरू लागली. तो पलंगावरची त्याची जागा बदलनू कधी डावीकडे तर कधी उजवीकडे कधी वर तर कधी खाली पाहू लागला. त्याची मान आधी संथपणे अन नंतर वेगाने गर्रगर्र फिरू लागली. मी पलंगाच्या दिशेने धावलो अन तेवढ्यात तो शांत झाला. मी जागेवरच थबकलो. हर्षित आता चोरट्या नजरेने फरशीकडे पाहत होता. त्याचा संपुर्ण चेहरा घामाने डबडबला होता.

“ते…ते….प…पलं…गाखाली गेलंय… पप्पा.” त्याला शब्द उच्चारणंही अवघड झालं होतं.
"अस्सं ? थांब आत्ता पळवतो त्याला.” मी आवाजात शक्य तेवढं अवसान आणत म्हणालो. पलंगाजवळ जाऊन मी गुढग्यांवर बसलो.
“कोण गेलंय पलंगाखाली?” खाली वाकण्याच्या आधी मी त्याला विचारलं.
“तो चित्रा… तला… वा… वाईट्ट हसूवाला.”
“थांब मजाच घेतो त्याची.” मी पलंगाखाली वाकून पाहिलं, पण तिथे कुणीच नव्हतं.
“एS चल पलंगाखालून. आमच्या हर्षितला त्रास देतोस का ?” पळून जा नाहीतर चांगला मार देईन. चल पळ.” मी थोडं नाटक केलं. नंतर पलंगाखालून बाहेर पडून कुणीतरी रूमबाहेर गेलं अशी नजर फिरवली.
“जा पळ, परत येऊ नको. दरवाजाबाहेर जा चल फुट.” मी रूम पार करून गेलो अन दरवाजा लावून घेतला. मी असं काही केलं की हर्षित हसतो अन पुन्हा नॉर्मल होतो हे मला अनुभवावरून माहीत होतं.
“बघ हाकलून लावलं की नाही त्याला. भुर्रकुन पळून गेलं.”
“नाही गेलं.” हर्षित अंग आक्रसून घेत बोलला.
“बरं.जाऊदे. आज मी तुझ्याजवळ झोपतो.” मी पलंगावर जाऊन बसलो. त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला, केसांमधून हात फिरवला.
“एखादी गोष्ट सांगू का ?”
त्याने होकारार्थी मान हलवली. ही मात्रा लागू पडेल असं दिसत होतं.
“पण एक अट आहे?”
“कुठली?”
“त्या चित्रावाल्याचा नाद सोडून द्यायचा.”
“पण तो दिसतो.”
“तो दिसला की त्याच्याकडे बघायचच नाही. मग बघ, तो आपोआप पळून जाईल.”
हर्षित मस्तपैकी हसला.
“गोष्ट करू सुरू ?”
“होSS”
तो नॉर्मल होत चाललाय याचं लक्षण.
“खुप खुप वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगर नावाचं एक गाव होतं. तिथे राहत होता एक राजा अन एक…”
‘खल्ल्ल S…’
पलंग जोरात हलला. हर्षितने घाबरुन मला मिठी मारली.
“घाबरु नको. मीच हलवला पलंग.” मी खोटं बोललो “हे बघ असा हलवला. मी बसल्याजागी पलंग हलवला, तो आधीच्याइतका जोरात हलला नाही.
“एक आटपाट नगर होतं. खुपखुप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे... राजा जातो शिकारीला…”
‘खल्ल्ल्ल SS…’
पलंग आधीपेक्षाही जास्त जोरात हलला. हर्षितच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली.
'धाSड’
पलंगाच्या खालून कुणीतरी ठोकतंय असा आवाज आला. शरीरभर कंपनं पसरली.
‘धाSड SS’
दुसरा दणका बसला अन मी पलंगावरून दोन इंच वर उसळलो. पायाच्या नखापासून ते मेंदूपर्यंत झिणझिण्या पसरल्या.

‘खर्र खर्र खर्र’
पलंगाखाली जे काही होतं त्याने आता ओरखडे ओढायला सुरुवात केली. पलंगाच्या लाकडावर चरे उमटवणारा तो आवाज काळजावरही ओरखडे उमटवू लागला. ती गोष्ट नक्कीच पलंग चिरून वर येण्याचा प्रयत्न करत होती. मी हर्षितकडे बघितलं. तो डोळे मिटून थरथरत बसलेला होता. मी त्याच्या कानात कुजबुजलो, “उडी मार अन मम्मीकडे पळत जा.दोघे तिथेच थांबा मी येतोच थोड्या वेळात.”
त्याने डोळे उघडले पण काहीच प्रतिसाद दिला नाही.

‘खर्र खर्र खर्र खर्र’
अजूनही आवाज येतच होता , करवतीने कापल्यासारखा. हवेचा लवलेशही नसतांना लाकडाचा भुगा हवेवर तरंगत चारीबाजूंनी दाटू लागला होता.
‘खर्रखर्रखर्र खर्रखर्र खर्रखर्रखर्र’
आवाजाचा वेग प्रचंड वाढला. मी हर्षितला उचललं अन पलंगाखाली उतरवलं. “पळ” असं ओरडताच तो तुफान वेगाने दरवाजाबाहेर पळत गेला. त्याचक्षणी पलंगाखालचा आवाज गपकन थांबला. सगळीकडे चिडीचूप शांतता पसरली. मी वाट पाहू लागलो पलंगाला छिद्र पडण्याची, गादी फाडून ते वर येण्याची. पण ना पलंग हलला ना ओरखडे काढण्याचा आवाज आला. आधी जे काही झालं तो भास होता असं ओरडून सांगणारी शांतता... हळूहळू हृदयाची धडधड कमी होऊ लागली, भयाचं धुकं विरळ होत प्रश्नचिन्ह मागे राहिले.

अन अचानक, माझ्या पायथ्याशी असलेलं ब्लँकेट आपोआप वर उचललं गेलं. असं वाटत होतं की ब्लँकेटखाली कुणीतरी आहे अन ते उभं राहण्याचा प्रयत्न करतंय. ब्लँकेट वर, अजून वर उचललं गेलं अन फेकून दिल्यासारखं पलंगापासून दूर भिरकावलं गेलं. माझी मान आपोआप तिकडे वळली. पाठोपाठ चादरसुद्धा तिथे येऊन पडली. पण ब्लँकेटकडे वळवलेली नजर पलंगाकडे वळवण्याची आता हिंमत होत नव्हती. माझ्या पायथ्याशी नक्कीच कुणीतरी येऊन बसलं असेल, मी त्याच्याकडे बघितल्यावर ते मला सोडणार नाही, अजिबात नाही. मान न वळवता तिरप्या नजरेने बघावं का ? नाही… जे काही असेल मला बघायचं नाहीये. हर्षितसारखं पळून जावं का ? पण ते आता सावध झालं असेल तर ?
घशात आवंढा दाटला, गात्रे बधिर झाली. कुणीतरी जणू मला पलंगाशी साखळदंडाने बांधून ठेवलंय असं वाटत होतं. पायथ्याशी बसलेलं ते आता वर सरकेल, माझ्या जवळ, अगदी जवळ येईल. त्याचा स्पर्श जाणवतोय का ? मी डोळे मिटून घेतले, अंग आक्रसून घेतलं, सगळा प्राण कानांमध्ये एकवटला अन वाट पाहू लागलो. कशाची ? माहीत नाही. किती क्षण निघून गेले की मिनीटं कळायला मार्ग नव्हता. स्मशानशांतता होती सगळीकडे. मनाचा हिय्या करून मी मान पायथ्याच्या दिशेने वळवली. अन त्या लख्ख प्रकाशात मला स्पष्टपणे दिसलं की तिथे… कुणीच नव्हतं. मी खोलीभर नजर फिरवली पण कुणीच दिसलं नाही. हे कसंकाय शक्य आहे ? ब्लँकेट अन चादर तर आपोआप लांब जाऊन पडणार नाहीत. नक्कीच त्यांना कुणीतरी फेकलं असेल, पण कुणी ? मी चाचरत चाचरत पलंगाखाली पाय टेकवले. दरवाजा बंद होता. बाहेर पडताना हर्षितनेच तो लोटून घेतला होता का ? पण हा विचार करण्याची ही वेळ नव्हती. एक क्षणही मला या खोलीत थांबायचं नव्हतं. मी मागचापुढचा विचार न करता धावत दरवाजाच्या दिशेने गेलो. हँडल पकडून मागे ओढणार.तेवढ्यात दरवाजा प्रचंड वेगाने उघडला अन दाSणकन माझ्या तोंडावर आदळला. मला भोवळ आली,
सगळं धूसर दिसायला लागलं अन मी तोल जाऊन जमिनीवर कोसळलो. शुद्ध हरवण्यापुर्वी एवढीच जाणीव झाली की माझ्या दोन्ही नाकपुड्यांमधून उष्ण रक्त बाहेर येतंय.
-----------------------

मी डोळे किंचित उघडले. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश डोळ्यांवर सांडला होता. मी तळहाताने डोळे झाकले अन बोटांच्या फटीतून हवा तेवढाच सूर्यप्रकाश आत घेत हळूहळू डोळे उघडले. सकाळ होऊन बराच वेळ झाला होता पण मनाला अगदी प्रसन्न वाटत होतं; रात्रभर शांत झोप झाल्यावर वाटतं तसं. रात्रीचा प्रसंग आठवला अन मी खाडकन उठून बसलो. डोळे चोळून आजुबाजुला पाहलं... मी हर्षितच्याच बेडरूममध्ये फरशीवर बसलेलो होतो. चेहऱ्यावर, कपाळावर, नाकाखाली हात फिरवला, पण सुकलेल्या रक्ताचं नामोनिशान नव्हतं. मी चारीबाजूंनी नजर फरवली. ब्लँकेट अन चादर पलंगाच्या पायथ्याशी घडी करून ठेवलेले होते. दरवाजा लोटलेला होता. नक्कीच कुणीतरी येऊन रूम नीट करून गेलं होतं. मी यावर अधिक विचार न करता बाहेर आलो.
पायऱ्या उतरून खाली आलो. हॉलमधलं घड्याळ दहा वाजल्याचं दाखवत होतं. बापरे ! बराचवेळ झोपलो मी तर. मुग्धा यावेळी किचनमध्ये असेल तिकडे गेलो पण कुणीच नव्हतं. गुहेच्या तोंडाशी येताच तळघरातून वर येणारा उजेड दिसला. मीच रात्री लाईट बंद करायचं विसरलो होतो का, की कुणीतरी आहे आत ? झरझर पायऱ्या उतरून खाली गेलो पण खोलीत कुणीच नव्हतं. घड्याळाचे काटे नेहमीप्रमाणे इमानेइतबारे फिरत होते. यावेळी तो आवाज मला विचित्र नाही वाटला. पोर्ट्रेटमधले ते चेहरे अजूनही हिरव्या झाडांआडून हसत होते. ते हसणंही वेगळं वाटलं नाही. जवळ गेलो तरीही नाही. फरशीकडे नजर वळवली तर तिथे एकही किडा मरून पडलेला नव्हता. वादळी रात्र सरल्यावर प्रसन्न वाटावं तसं वाटत होतं.

बाहेर येऊन घरभर फिरलो. बाथरूमच्या दिशेने शॉवरचा आवाज येत होता. ही मुग्धाच असली पाहिजे. चला ही तर आहे पण हर्षित कुठेय ? आज रविवार म्हणजे तो घरीच असणार. आता फक्त माझी बेडरुम शोधायची उरली होती. दार ढकलून आत गेलो अन दिसलं की हर्षित बेडवर झोपलेला होता, त्याच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवलेली होती. रात्रीच्या प्रसंगाचाच हा परिणाम असणार. इतकी विचित्र घटना घडल्यावर तापाने अंग फणफणणारच. डॉक्टरला बोलवायला पाहिजे. मी खोलीबाहेर जायला वळणार तेवढ्यात हर्षितला जाग आली.
“बाळा कसं वाटतंय आता ?”
तो अंगावरची चादर बाजूला करून उठू लागला.
“अरे उठू नको, आराम कर.”
तो थांबला, नजर मात्र माझ्यावरच खिळलेली होती. ती नजर मला विचित्र अन गुढ वाटली… अत्यंत अनोळखी, भितीदायक.
“हर्षित, काय बघतोय?”
माझ्या अंगावर सरसरून काटा आला. हा माझाच आवाज होता; पण मी तर बोललो नव्हतो. माझ्या मुलाने माझ्याच दिशेने बोट दाखवलं. मी मागे वळून पाहिलं अन... दरवाजात मी उभा होतो !! हो मीच… माझेच कपडे, शरीरयष्टी अन चेहराही माझाच. मी माझ्याकडेच बघत होतो.

“आपण ही ट्युबलाईट लावलीय ना, याचा उजेड चमकल्यामुळे तसं दिसतंय.” माझं प्रतिरूप असलेला तो बोलला. नंतर त्याने माझ्याकडे, माझ्या डोळ्यांत रोखून पाहिलं.

तो हसला – वाईट्ट हसू!!

----------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!

थरारक लिहीलेय एक्दम.. भारीच!!

हा माझाच आवाज होता; पण मी तर बोललो नव्हतो. माझ्या मुलाने माझ्याच दिशेने बोट दाखवलं. मी मागे वळून पाहिलं अन... दरवाजात मी उभा होतो !! हो मीच… माझेच कपडे, शरीरयष्टी अन चेहराही माझाच. मी माझ्याकडेच बघत होतो.
“आपण ही ट्युबलाईट लावलीय ना, याचा उजेड चमकल्यामुळे तसं दिसतंय.” माझं प्रतिरूप असलेला तो बोलला. नंतर त्याने माझ्याकडे, माझ्या डोळ्यांत रोखून पाहिलं. >>> ह्या ओळी... पण मला शेवट उलगडून सान्गाल का, नाही समजला..

मला समजलेला
शेवटी त्या जंगली ने बापाला पझेस केलं.
मुलगा वाचला पण आता हा पझेसड खोटा/रिपलिका बाप बनलेला जंगली लवकरच मुलाला इजा पोहचवेल.
मुलाचं लवकर ऐकून ती खोली कायम ची बंद करायला हवी होती.तो आकार त्याला प्रथम जाणावलाय.

शेवटी त्या जंगली ने बापाला पझेस केलं.
मुलगा वाचला पण आता हा पझेसड खोटा/रिपलिका बाप बनलेला जंगली लवकरच मुलाला इजा पोहचवेल.>>> धन्स , हे नव्ह्तं समज्लं

मुलाचं लवकर ऐकून ती खोली कायम ची बंद करायला हवी होती.तो आकार त्याला प्रथम जाणावलाय.>> हे समजलं होतं

झपाटलं असेल तर एकच व्यक्ती हवी ना? शेवटी दोन व्यक्ती आहेत. आत्मा बाहेर आलाय का? पण झपाटलेल्या व्यक्तीचा आत्मा बाहेर नाही येत.

@बोकलत
झपाटलं असेल तर एकच व्यक्ती हवी ना? शेवटी दोन व्यक्ती आहेत. झपाटलेल्या व्यक्तीचा आत्मा बाहेर नाही येत.
>> अगदी बरोबर.

बाप बहुतेक गेला असेल रात्री, आणि त्याच्या मृत शरीरात जंगलीने प्रवेश केला असेल
>> हे असंच आहे. बघा विचार केल्यावर उत्तर सापडलं की नाही.
माझा आत्मा आत तुझा बाहेर, ओम फट स्वाहा!
Biggrin

अरे बापरे... भयानक आहे... चांगली जमलीय
>>मुलाचं लवकर ऐकून ती खोली कायम ची बंद करायला हवी होती.>>++११११

Pages