काळजास त्याच्या जाणवते

Submitted by निशिकांत on 21 November, 2018 - 00:11

दु:ख कधी का फुटपट्टीने कुणी मोजते?
ज्याला सलते, काळजास त्याच्या जाणवते

जगात आलो, गेलो, सारे आप्त विसरले
बरे जाहले, हिशोब झाला, कोण अडकते?

तू ये अथवा नकोस येऊ, मनात माझ्या
तुझ्या आठवानेही नुसत्या प्रीत बहरते

आई म्हणजे विचित्र आहे असे रसायन!
असून वृध्दाश्रमी मुलांचे कौतुक करते

अंधाराने विजय मिळवला उजेडावरी
सूर्य हरवणे, कलीयुगाचे लक्षण असते

भूतदया करण्याचे आता भूत उतरले
कानपिळी तो बळी असावा हे जाणवते

रंग उडाल्या भिंतीसम ही कुडी जाहली
उर्जित होता काळ कधी धूसर आठवते

आपण अपुला परीघ असतो ठरवायाचा
नदी, न ओलांडता किनारे, मस्त वाहते

सूर्याला "निशिकांत" पाहिजे जरा सावली
दुर्मिळ असते कधी कधी जे मनी नांदते

निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण अपुला परीघ असतो ठरवायाचा
नदी, न ओलांडता किनारे, मस्त वाहते

सूर्याला "निशिकांत" पाहिजे जरा सावली
दुर्मिळ असते कधी कधी जे मनी नांदते

वाह! खुप सुरेख कविता. प्रत्येक ओळ आवडली.