चित्रपट परीक्षण - नाळ - स्पॉईलर अलर्ट

Submitted by भागवत on 20 November, 2018 - 10:13

मी नाळ या चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि "जाऊ दे न व" हे गाणं पाहीलं आणि हा चित्रपट आपण बघायचाच असे ठरवले. हा चित्रपट "सुधाकर रेड्डी येक्कांटी" यांनी दिग्दर्शित केला आहे. "सुधाकर" हा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, लेखक आहे. नागराज मंजुळे आणि सुधारक यांचे चित्रपटाचे संवाद कागदावर नाही तर प्रेक्षकांच्या हृदयात कोरले जातात. चित्रपटाला दमदार पार्श्वसंगीत "अद्वैत निमलेकर" यांनी दिले आहे. अ.व. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. चित्रपटात एकच गाणे आहे पण तेच गाणे चित्रपटाचे कथा सार ३.४४ मिनिटात दाखवते. प्रमुख भूमिका "नागराज मंजुळे", "देविका दफ्तरदार" आणि "श्रीनिवास पोकळे" यांची आहे.

खरे तर पूर्ण चित्रपट चैत्या या पात्रा भोवती फिरतो. "श्रीनिवास पोकळे" याने अतिशय सुंदर असा चैत्या साकारला आहे. चैत्या सहज सुंदर अभिनय आणि वावर छान रंगवलेला आहे. चैत्या बागडतो, हसवतो, रडावतो, धमाल करतो आणि अंतर्मुख करायला लावतो. जेव्हा-जेव्हा चैत्या कॅमेरा समोर येतो त्याच वेळेस आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आऊट फोकस होतात. विनोदाची उत्तम पेरणी आणि लहान मुलांचे भाव विश्व सुंदर रित्या उलगडले आहे. चैत्याचे आणि त्यांच्या आईतील नात्याचे पदर अलगद उलगडत जातात. चैत्याचा आई सोबत "आई मला खेळायला जायचंय" हा संवाद तर चित्रपटाचा उत्कृष्ट सीन आहे. त्याचे आणि त्यांच्या आई वऱ्हाडी भाषेतील संवाद कानात गुंजारव करतात. "श्रीनिवास” या वर्षाचे सगळेच अवॉर्ड नक्कीच जिंकणार.

चैत्या आणि त्याची आई यांच्या कथानका सोबत म्हैस आणि तिच्या रेडकूची एक समांतर कथा चालू असते. चैत्याला त्याचा मामा भेटे पर्यंत चैत्याचा एक स्वप्नवत आणि सुंदर प्रवास सुरू असतो. मामाचे शब्द या छोट्या चैत्याच्या जीवनात वावटळ आणतात. जसे की त्याला कटू स्वप्न पडते आणि तो त्या अज्ञात गोष्टीचा पाठपुरावा करून त्यामागे धावतो. त्याला वाटते आपली आई आपल्या वर प्रेम करतच नाही. त्याच्या साठी रडत सुद्धा नाही.

"देविका दफ्तरदार" यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. आईच पात्र मस्त रंगवलयं. आईचे आणि मुलाचे नाते वर्णना पलीकडे असते. मुलाला आईच्या कुशीत अखंड प्रेमाची ऊब मिळते आणि आई आपल्या बछडा काहीही करते. दोघांच्या नात्यातील अंतर वाढले तर नातं तुटण्याची संभावना असते पण जर त्याच नात्यात दुसर्‍याला गृहीत न धरता संधी दिली तर ते नातं बहरते. आई चैत्याला रेडकूची फक्त स्पर्शातून ओळख करून देते. “चैत्या एक दिवस घरी आला नाही’ तर आईची होणारी तगमग स्पष्ट जाणवते.” चैत्या तिला आई न म्हणता सुमी म्हणतो. ते दृश्य उत्तम जमून आलेत. शेवटच्या १५ मिनिटात फक्त डोळ्यांनी काय सुंदर अभिनय केलाय. शेवटची १० मिनिटे कॅमेरा फक्त चैत्या, आई आणि दीप्ती देवी या तीन पात्रा भोवती फिरतो.

"नागराज मंजुळे" यांनी सावकाराची भूमिका उत्तम निभावली आहे. त्यांनी एका सशक्त वडीलांची भूमिका साकारली आहे आणि चित्रपटाचे संवाद सुद्धा लिहिले आहेत. तसे प्रमुख भूमिका सोडल्यास आज्जीच्या पात्राने जान आणली आणि दिली आहे. आज्जी आणि सुनेचे नाते विळा भोपळ्याचे दाखवले आहे. आजी चैत्याचे खूप लाड करते आणि गोष्टी सांगते. चैत्या आज्जी वर रेडकू सोडतो तो दृश्य जमून आले आहे. आज्जीला बैलगाडी मधून नदी पात्रातून प्रवास करतात तो भावनिक क्षण सुद्धा उत्कृष्ट झालाय. त्या अवघड प्रसंगी डोळ्यातून फक्त एक अश्रु निखळतो हे मात्र खटकते. पण पुढचाच क्षण सुंदर झालाय. बच्चन आणि मामा हे पात्र सुद्धा भाव खाऊन जाते. बाकी १५ मिनिटा करिता दीप्ती देवी यांनी दमदार भूमिका केली आहे. शब्द कमी आहेत पण डोळ्याचा पुरे पूर उपयोग करून अभिनय साकारला आहे.

चित्रपटात काही दृश्याची पुनरावृत्ती होते ते थोडे खटकते. मध्यंतरी चित्रपट थोडा वेळ रेंगाळतो पण कंटाळवाणा होत नाही. एकच गाणे असून सुद्धा आणखी गाण्याची गरज वाटत नाही. गाव आणि नदी मुळे चित्रीकरणाला वैशिष्ट्य पूर्णता आली आहे. चित्रपटाची कथा चैत्या आणि त्याची आई यांच्या आजूबाजूला फिरते. चैत्याला अचानक एक दिवस कळते की, तो दत्तक असून त्याची जन्मदाती आई दुसर्‍या गावी राहते. चित्रपटाची पहिली आणि शेवटची पंधरा मिनिटे अतिशय सुंदर रित्या दिग्दर्शित, अभिनय परिपूर्ण, परिणामकारक आणि अर्थपूर्ण आहेत. महाराष्ट्रात चार कोसा नंतर भाषा बदलते. चित्रपटातील नागपूरी वऱ्हाडी भाषा कानात गुंजारव करते आणि भाषा गुळावानी गॉड लागते.

दमदार कथा, नाविन्यपूर्ण गाणे, प्रभावी सुरुवात आणि परिणामकारक शेवट, चांगले पार्श्वसंगीत, विनोदाची उत्कृष्ट पेरणी, सह कलाकाराची उत्तम साथ, मानवी संवेदना, भावनांसंबंधीवर भाष्य, आई आणि मुलांचे भावपूर्ण नातं, उत्कृष्ट अभिनयाने परिपूर्ण चित्रपट पाहायचा असेल तर नाळ एकदा पहाच. प्रेक्षकांची कथे सोबत नाळ जोडणारा चित्रपट एकदा अनिवार्य बघितलाच पाहिजे. मला या चित्रपटाला ५ पैकी कमीत कमी ४ स्टार द्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मुळातच छोटा जीव असणारी कथा सुरेख गुंफलीय.या सिनेमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे चैत्या!त्याचा सहज सुंदर अभिनय चकित करतो.त्याच्याकडून काम झकास करवून घेतले आहे.तसेच इतर पात्रांचा सहज वावर,अतिशय सुरेख फोटोग्राफी ही या सिनेमाची शक्तीस्थळे आहेत.सुमीची शेजारीण मात्र बर्‍यापैकी शुद्ध मराठी बोलते ते खटकतं.

देवकी, हेला, रश्मी.. प्रतिसादा साठी खूप खूप धन्यवाद!!! हेला, नावाची दुरुस्ती केली आहे. विशेष प्रयोजन नसुन लिहिण्यात स्पेलिंग मिस्टेक झाली होती.

मुळातच छोटा जीव असणारी कथा सुरेख गुंफलीय.या सिनेमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे चैत्या!त्याचा सहज सुंदर अभिनय चकित करतो.त्याच्याकडून काम झकास करवून घेतले आहे.तसेच इतर पात्रांचा सहज वावर,अतिशय सुरेख फोटोग्राफी ही या सिनेमाची शक्तीस्थळे आहेत >> +१

मला हा चित्रपट खुप नाही आवडला..
सुमीची शेजारीण मात्र बर्‍यापैकी शुद्ध मराठी बोलते ते खटकतं.>> खरतर एक चैत्या आणि बच्चन सोडला तर बाकी कुणीच वर्‍हाडी बोललेलं दाखवल नाहीये.. खुप शब्द कानाला खटकतात,, चल कि, उठ कि असं वर्‍हाडीत नाही बोलत कुणी.. बाकी चित्रपट छाने पण भाषा बरेच्दा खटकते आणि एका सुराट बोलल्या गेलीये म्हणुन खुप नाही आवडला मला.. बराय..

विनिता.झक्कास, मी माझ्या परीने दुरुस्ती केली आहे. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी धन्यवाद!!!

सिनेमा मस्तं आहे. तुम्ही चांगलं लिहिलं आहे.

मुळातच छोटा जीव असणारी कथा सुरेख गुंफलीय.या सिनेमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे चैत्या!त्याचा सहज सुंदर अभिनय चकित करतो.त्याच्याकडून काम झकास करवून घेतले आहे.तसेच इतर पात्रांचा सहज वावर,अतिशय सुरेख फोटोग्राफी ही या सिनेमाची शक्तीस्थळे आहेत. +१

खरतर एक चैत्या आणि बच्चन सोडला तर बाकी कुणीच वर्‍हाडी बोललेलं दाखवल नाहीये.. खुप शब्द कानाला खटकतात >>
चैत्याचे आई वडील मूळचे वर्‍हाडी नाहीत असे काहीसे दाखवले आहे ना. दोनदा उल्लेख आहे की मूळ घर खूप लांब आहे, बस,आणि मग ट्रेनने जावं लागतं आणि तिथे सगळं हिरवंगार आहे वगैरे.
शेजारणीचे काही उच्चार खटकले.

विनिता.झक्कास, तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी धन्यवाद!!!
अजून काही चुका आहेत >> कृपया इनबॉक्स ला सगळ्या चुका सांगा. मला सगळ्या चुका दुरुस्त करायला आवडतील.

भागवत.. तुमच्या चुका इथेच साण्गतो.. पहिले हे प्रत्येक प्रतिक्रियेखाली येऊन येऊन आभारप्रदर्शन करणे थांबवा. चाराण्याची कोंबडी नी बाराण्याचा मसाला.

इथे इतरांना लिहू द्या आणि काही मौल्यवान असेल तरच तुम्ही लिहा. आभारप्रदर्शन त्यांच्या इनबॉक्सात जाउन करा आणि काही चुकले फिकले तर तिकडेच विचारा.

(लिहायचे स्वातंत्र्य आहे म्हणुन्लिहले.. तुम्हाला कोणी अधिकार दिला वगैरे विचारत बसूनये.)

नमस्कार हेला, पहिली गोष्ट मी तुम्हाला विंनती केली नव्हती. मी दुसऱ्या सदस्याला नम्रता पूर्वक विंनती केली होती. यामध्ये तुम्हाला मध्ये पडायचे गरज नव्हती.
प्रत्येक प्रतिक्रियेखाली मी काय करावे यासाठी तुमचे मत घ्यायला मी बांधील नाही.
किती, कुठे, केव्हा आभारप्रदर्शन करावे यासाठी तुमचे मत घ्यायला मी बांधील नाही.
काय मत माडायचे ते स्वतःच्या पोस्ट वर करा. इथे आम्हाला शांत पणे इतर सदस्यांना विचारण्याचा अधिकार आहे. धन्यवाद!!!

स्वतःच्या पोस्टवर? हे मायबोली संस्थळ आहे महाशय.. तुम्ही फेसबुकावर नाही.
इथे कोणाच्याही धाग्यावर कोणाला लिहायला कोणाच्या विनंतीची गरज नाही.
तुम्ही बांधील आहात हे तर मी म्हटलेच नाही. मला जे म्हणायचे ते 'शांतपणे' सांगून झाले आहे. आपण कोणाच्या अध्येमध्ये पडत नसतोय... शिसारी आणणार्‍या तुपकट शिष्टाचाराची कापडं फाडणं छंद आहे आपला... तो इथे मायबोलीमालकांच्या कॄपेने पूर्ण करतो.

छटाकभराचा धागा, त्यात ढिगभर चुका, त्यावर आभाराचा बोंगाभर भारा आणि गाडाभर नखरा... Rofl

“शिसारी आणणार्‍या तुपकट शिष्टाचाराची कापडं फाडणं छंद आहे आपला.." असे का? मग चालू द्या...
“छटाकभराचा धागा, त्यात ढिगभर चुका, त्यावर आभाराचा बोंगाभर भारा आणि गाडाभर नखरा...” – छान कल्पकता..

दुसर्‍याला लहान दाखवुन स्वतःला मोठं समजतात काही लोक.
तुम्हीच किलोभर परिक्षण करुन आदर्श नमुना सादर करावा, नावं ठेवण्यापेक्षा.

नाळची कथा खूप छोटी आहे, 15 ते 30 मिनिटांची फिल्म बनवली असती तर जास्त चांगली बनली असती.

त्या छोट्या मुलाने कसली कमाल केलीय. चेहऱ्यावर अगदी योग्य भाव, आईचे लक्ष वेधून घेण्यासाठी कृती करायची व ती आता आपल्याकडे बघेल या आशेने तिच्याकडे टक लावून बघायचे हे त्याने असे काही केलेय की सगळे खरेच वाटते. त्या मुलासाठी मी अजून दहावेळा पाहीन. Happy Happy

दीप्ती देवीनेही कमाल केलीय. तिच्या शेवटच्या सेकंदभरच्या दृश्यात जाणीवपूर्वक मुलाकडे दुर्लक्ष करण्याचा ताण जबरदस्त दाखवलाय. हॅट्स ऑफ!!!

अभिनयासाठी नाळ नंबर वन.

पण छटाकभर कथा ताणून 2 तासांची केलीय, त्यामुळे खिळवून ठेवत नाही. सुरवातीला खूप कंटाळा आला. अर्थात पोरगा खूपच गोड असल्याने पैसे वाया गेल्यासारखे वाटत नाही.

चैत्या व बच्चन हे दोघेच फक्त अहिराणीसारख्या भाषेत बोलतात. चैत्याच्या तोंडी ती भाषा अगदी गोड वाटते, ऐकत राहाविशी.

वाळवंटाची दृश्ये खूप सुंदर घेतलीत. एकूणच चित्रीकरण अतिशय सुरेख आहे, मोठ्या पडद्यावर खूप मस्त वाटते बघायला.

आपल्याला न घेताच बस सुटतेय म्हणून कासावीस होणारा चैत्या व त्याला उचलून परत फिरणारा बाबा या दृश्याने डोळ्यात पाणी आणले, दोघांनाही मातृवियोग, पण दोघांचीही परिस्थिती वेगळी.

भागवत, तुम्ही या आधीही परीक्षण लिहिताना सगळी कथा उघड केली होती. आताही तेच केलेत. चित्रपट अजून थेटरात असताना असे कथा पूर्ण उघड करणारे परीक्षण लिहिणे बरोबर नाही, चित्रपट पाहू इच्छिणाऱ्या लोकांचा रसभंग होतो.

साधना, म्हटले तर १०-१५ मिनिटांची कथा आणि म्हटले तर (भावनिक गुंतागुंतीचे आव्हान विचारात घेता) खूप मोठा विषय. नाळ चित्रपटात त्याला ओझरता स्पर्श झाला आहे असे मला वाटले.

स्पॉईलर अलर्ट

म्हैस आणि रेडकू हे रूपक आहे हे मानलं तर ही कथा आईच्या नजरेतून दाखवायला हवी होती असं वाटलं.
चैत्या च्या नजरेतून पाहिलं तर मग म्हैस आणि रेडकू चे रूपक योग्य वाटत नाही.
म्हैस भुस्सा भरलेल्या रेडकू ला स्वीकारते आणि चैत्या त्याच्या सुमीला आई म्हणून स्वीकारतो.
मला वाटतं रूपकात गल्लत आहे.

पण एकंदर सिनेमा खूप निरागस आहे. खूप आवडेश. Happy

आणि

आपल्याला न घेताच बस सुटतेय म्हणून कासावीस होणारा चैत्या व त्याला उचलून परत फिरणारा बाबा या दृश्याने डोळ्यात पाणी आणले, दोघांनाही मातृवियोग, पण दोघांचीही परिस्थिती
>>>> +१

Pages