हरवलेले गाव

Submitted by रमेश भिडे on 16 November, 2018 - 09:24

पूर्वी कोकण गरीब होतं. गावे भोळी-भाबडी , साधी होती. माणसे गरीब होती. प्रेम आपुलकी होती.शेती करून पोट भरत होतो. भात, नाचणी, वरी, कुळीथ , उडीद, हरिक ही पीक पिकवून बाराही महिन्याचे दिवस उजाळलेले असायचे.
नाना -तऱ्हेच्या भाज्यांना तर कमतरता नव्हती. परसवात आठ दिवसाने टोपलीभर भाजी तयार होत होती.शेतीला जोडव्यवसाय म्हणून डझनभर गुरे -ढोरे होती. घरात घागरभर दूध दुभत होत आणि कोणाकडे नसेल तर मागील दाराने शेजाऱ्याकडून चहा पुरते आणून पाहुण्यांचे आदरातिथ्य होत होत. डोलगाभर कोंबड्याही होत्या. घरात सात आठ माणसे असूनही तीन वेळच कसबस पोटभर अन्न मिळत होत.
पेज,जाडा तांबडा भात,हरकाचा भात , नाचण्याची भाकरी, कुळथाची पिटी आणि कधी ना कधी सुकी भाजलेली तारली किंवा बांगडा खाऊन मन तृप्त होत होत. त्याला अमृताची चव येत होती आणि रात्री निजताना डोक्यावर पळीभर खोबरेल तेल घसघसून घासायला मिळाले की आम्ही ऐहिक जगातल्या सुखाच्या राशीवर लोळत होतो. आमचे ते दिवस मंतरलेले होते. पैसा गाठीला नसला तरी ते वैभव आणि खरी श्रीमंती होती.
दरम्यानच्या काळात आम्ही परंपरे प्रमाणे मुंबईत आलो आणि मुंबईतल्या जीवनशैलीचे गावाला बरे वाईट परिणाम दिसू लागले. गेल्या काही वर्षात हळू हळू कोकणात जीवनशैली बदलू लागली आणि आमचे भोळे भाबडे गाव हरवून बसलो. गावात शहरी जीवनशैलीच अनुकरण होऊ लागल. आता तसेच झाल्याचे दिसून येते.दिवस बदलत आहेत. गावात सरकारच्या आशीर्वादाने पिवळ्या आणि केसरी रेशनकार्डावर तीन रुपयात तांदूळ आणि दोन रुपयात किलोभर गहू मिळू लागले आणि नाचणी , वरीची भाकरी मागे पडत चपाती दिसू लागली. हरिक, वरी ही कॅल्शियम युक्त धान्ये जवळ जवळ संपून गेली. आता तर आम्ही जमिनीच संपवायला निघालोय. परप्रांतियांच्या घशात घालून.
चहापुरते दूध , सारवायला शेण हवे म्हणून गुरे ठेवून कुठेतरी भात शेती दिसतेय. पण ती करताना आधुनिक यंत्राने करू लागलो. कोल्हापूरवरून येणारे वारणा आणि गोकुळ दूध व घाटावरच्या भाजीवर कोकण जगू लागले.
लग्न समारंभ मुंबईसारखे होऊ लागले. पण पत्रावळीवर असलेल भाताचे मूद,गोडी डाळ, काळ्यावाटण्याची उसळ, खीर, वडे हे आपले पारंपरिक सात्विक जेवण मागे पडले. पुऱ्या, कुर्मा भाजी, छोल्याचे जेवण मुंबईसारखे जेवू लागलो. असे नाना तऱ्हेचे बदल दिसू लागले.
पूर्वीच्या नळ्या, कौलारू, लाकडी अशा गार गार आणि हवेशीर घरांऐवजी स्लबची आणि लोखंडाची झ्याकबाज घरे जागो जागी दिसू लागली. ती फक्त सणासुदी पुरती उघडू लागली.
गावची खुशाली पत्रव्यवहार हे मोबाईल फोन, व्हाट्सअप आणि मनिऑर्डर या बँक ट्रान्सफर द्वारे होऊ लागले.
सर्वसाधारण सध्या मुंबईची जीवन शैली तीच कोकणची जीवन शैली बनू लागली.आम्ही गाव सोडून मुंबईला आलो.याचे दुःख अजिबात नाही त्यामुळे प्रगती झाली .याचे समाधान जरूर आहे.पण माझे भोळेभाबडे गाव आता कायमचे हरविले याचे शल्य माझ्या मनात कायम राहणारे आहे.
---------------------❣
(आधारित)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं आहे. दिवसें दिवस कोकणातली घरे रिकामी होत आहेत. मस्त नळ्यांची किंवा कौलारू घर, माडा पोफळींच आगर, शेती , आंबे - फणस हे सगळं सगळं माणसांअभावी ओस पडलयं Sad
इथे भेटणारी तिकडची काही लोकं हेच सांगतात, की, त्यांची केवढी तरी मोठठी घर, जागा, सगळं रिकामं पडलयं पण तिकडे कोणी जातही नाही. Sad
ते जुनं कोकण किती दिवस टिकणार देव जाणे.