मैत्रीचे परागकण.

Submitted by Charudutt Ramti... on 15 November, 2018 - 13:02

खरं तर माझा योगायोगांवर फारसा विश्वास नाही. का? ते नक्की माहिती नाही. पण लहानपणापासूनच आईने शिकवण्याचा प्रयत्न केलेली ‘श्रद्धा’ आणी बाबांनी सांगितलेले ‘सावरकर’ आणि ‘दाभोळकर’ ह्या दोहोंच्या मधेच कुठेतरी लटकत राहणारा अर्धवट दृष्टिकोन ह्या द्विधा मन:स्थितीस कदाचित कारणीभूत असेल. पण योगायोगांवर कितीही अविश्वास दाखवावा असं म्हंटलं ( गणित आणि विज्ञानात योगायोगाला मॅथमॅटिकल प्रोबॅबिलिटी असं म्हणतात, हे माहिती असून सुद्धा ) अरुण आणि माझी भेट हा निव्वळ एक योगायोगच आहे. दुसरं तिसरं काहिही नाही.

माझे बाबा त्यांच्या सरकारी नोकरीत, त्यामुळं त्यांच्या वरचेवर बदल्या होत. खान्देशातील शिरपूर, धुळे, करत करत, मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यात असलेल्या उदगीर नावाच्या तालुक्याच्या ठिकाणाहून, इकडे मिरजेत बदली झाल्यामुळे, माझे आई बाबा त्यांच्या दोन मुलांना घेऊन त्यांचे पाठीवरचे बिऱ्हाड वसवण्यासाठी मिरजेत आले. साल एकोणीसशे शह्यांशी. सरकारी नियमाप्रमाणे बाबांची बदली होईल त्या गावात, माझी पात्रता नसतानाही, गावातल्या उत्कृष्ट शाळेत प्रवेश मिळायचा. त्याचा मला काहीच उपयोग करून घेता आला नाही हा भाग वेगळा. पण त्याच शासकीय नियमानुसार मला मिरजेच्या किल्यातल्या ‘आदर्श’ला प्रवेश मिळाला. डायरेक्ट चौथीला. शाळेचं रोस्टर फुल्ल असूनसुद्धा! तुकडी वाटवे बाईंची. सध्या अमेरिकेत स्थायिक झालेला निखिल कुलकर्णी, किंवा अलीकडे इंग्लंड मध्ये वास्तव्यास असणारी उमा अभ्यंकर, अथवा पुढे जाऊन डॉक्टर झालेली सुलक्षणा घाटगे वगेरे, वय वर्षे एवघे आठ नऊ असूनही, पंचवीस पावसाळे गाठीशी असल्यासारखे बोलणारे आणि वागणारे आणि खरोखरच विलक्षण अशी कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेली, अशी ही सगळ्या बुद्धिजीवी बालगोपाळांची मांदियाळीच वर्गात होती. मी बिचारा मराठवाड्यातल्या एका आजन्म तहानलेल्या अश्या लहानश्या गावातून मिरजेसारख्या ‘मोठा इतिहास आणि तितकीच मोठी संस्कृती’ लाभलेल्या छोट्याश्याच का असेना पण ‘शहरात’ स्थलांतरित झालो होतो. त्यामुळे पहिल्या पहिल्यांदी मी अगदी बेंचवर बसताना सुद्धा अगदी अंग चोरून बसायचो. वय वर्षे नऊ! तोपर्यंतच्या नऊ वर्षांच्या प्रदीर्घश्या आणि अनुभव संपन्न आयुष्यातील तब्बल तीन वर्ष उपेक्षित अश्या मराठवाड्यात काढली असल्यामुळे, जात्याच एकंदर व्यक्तिमत्वात हा भौगोलिक न्यूनगंड असणं ह्यात फारसं काही अवास्तविक आणि चुकीचं नसावं. पुढे पुढे मी पक्का मिरजकर आणि नंतर त्याहूनही पक्का पुणेकर कसा झालो ते सांगणं ह्या लेखाच्या आऊट ऑफ सिलॅबस आहे. त्यामुळे त्या विषयी नंतर कधीतरी सांगेन. पण वर म्हंटल तो योगायोग असा की, मला पूर्णपणे नवख्या असलेल्या ह्या शहरात आणि तितक्याच नवख्या अश्या आदर्श प्राथमिक मराठी शाळेत, ‘कु. अरुण श्रीकृष्ण कोल्हापुरे’ नावाचा आणखी एक विध्यार्थी डायरेक्ट चौथीला ऍडमिशन घेत मिरजेत नुकताच तळ ठोकायला आला होता. पण त्याची चौथीची तुकडी मात्र वेगळी होती. पटवर्धन बाई किंवा वेलणकर बाईंची. आणि तो मिरजेत आला होता त्याच्या नऊ वर्षांच्या आयुष्यापैकी, नऊ च्या नऊ वर्षे मुंबईतल्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे घालवून. थोडक्यात जे मिरज मला शहर होतं तेच मिरज त्याला जवळपास खेडं होतं.

अरुण आणि माझी पहिली भेट कधी झाली ते मला आता नक्की आठवत नाही. त्या भेटीतला आदर्श शाळेव्यतिरिक्त आणखी एक दुवा होता. कोल्हापुरेंचा विजय कॉलनीत 'सावली' नावाचा टुमदार बंगला आहे. मिरज स्टेशन ते गुरुवार पेठ ह्या वाटेवर नीटस आणि आखीव रेखीव पणे जांभ्यासारख्याच पण कभिन्न अश्या काळ्या कातळात बांधलेला आणि येता जाता कुणाचेही सहज लक्ष वेधून घेणारा असा हा बंगला. आमच्या ‘शासकीय दूध योजना मिरज’ च्या स्टाफ क्वार्टर पासून अगदी हाकेच्या अंतरावर नाही पण तरीसुद्धा बऱ्यापैकी जवळ होता. त्यामुळे शाळेत जाता येता अरुणची तिथेच कुठंतरी प्रथम गाठ पडलेली असावी. आता नक्की आठवत नाही. आणखी एक योगायोग होता ह्या व्यतिरिक्त. आमच्याच डेअरी स्टाफ क्वार्टर मध्ये राहायला असणारी सायली काळे. तिचे आईवडील पूर्वी मिरजेत राहत असत, ते विजय कॉलनी मधील हुक्केरी ह्यांच्या बंगल्यातील दोन खोल्यांमध्ये भाड्यानं राहायला होते. तो बंगला अरुणच्या 'सावली'ला अगदी लागून होता. थोडक्यात असे वेगवेगळे योग जुळून आले होते. अरुण आणि माझ्या भेटीचे. पहिली मला आठवणारी ठसठशीत भेट अरुण बरोबरची म्हणजे मी, राहुल भोकरे आणि सुधीर माने ( सुधीर माने राहायला 'परत' डेअरी क्वार्टर्स ) आम्ही सगळे अरुणच्या घरी त्याच्या मुंजीसाठी गेलो होतो, ती भेट. त्या मुंजीत मी अरुण ला एक पळी आणि फुलपात्र सप्रेम भेट दिले होते हेही मला चांगले आठवते. त्याला ‘संध्या’ करण्यासाठी उपयोगी पडावी म्हणून. राहुल ने बहुदा त्यावेळी अप्रूप असलेला डब्बल डेक्कर आणि दोन्ही बाजूनी कड्या लावून घट्ट बसवता येईल असा छान पैकी स्टेनलेस स्टील चा शाळेत न्यायचा जेवणाचा डबा भेट दिला होता, असं काहीतरी आठवतंय. नक्की नाही. सगळ्या अंधुक अश्या आठवणी स्मृतीपटलावर तरंगत आहेत. संथ गतीने वाहणाऱ्या पाण्यावर, नदीकाठावरच्या झाडाची पाने गळून ती तरंगावीत, तश्याच मनातल्या डोहात तरंगणाऱ्या ह्या आठवणी.

सन एकोणीसशे शहांशी, अरुणची मुंज ते झाली ते वर्ष. आणि साल विसशे अठरा, म्हणजे यंदा, अरुणच्या मुलाची मुंज झाली ते, अशी गेले बत्तीस वर्षे अरुण आणि माझा एखाद्या स्फटिका सारखा पारदर्शी असा एक प्रदीर्घ स्नेह आहे. गेल्या बत्तीस वर्षात असं एकही वर्ष गेलं नाही की आम्ही दोघे एकमेकांना किमान एकदा तरी भेटलेलो नाही. त्याला कारण ही तसंच आहे. आमच्या दोघात भिनलेला साम्यवाद! (साम्यवाद म्हणजे माओ, स्टालिन, वगैरे अर्थानं नव्हे) आमच्या दोघांची साम्यवादाची व्याख्या खूप साधी आणि सोप्पी आहे. ‘आमचा साम्यवाद’ म्हणजे आमच्या दोघांमधील ‘समान विचारांचा धागा’. म्हणजे हा धागा इतका समान होता की मला लागलेल्या कित्येक चांगल्या आवडी निवडीचं मूळ हे अरुणच्या घरात माझं जाणं येणं असल्यामुळं आहे. उदाहरणार्थ, मला शास्त्रीय संगीताची जी काही थोडी फार गोडी लागली ते केवळ अरुणच्या घरी ऐकलेल्या कुमार गंधर्वांच्या कॅस्सेटस मुळं. कळंत तर अजून काही नाहीच इतके वर्षं चांगलं चुंगलं ऐकूनही, त्या शास्त्रीय संगीतातलं. पण ह्या संगीतात तासंतास मन रमण्यासारखं प्रचंड ताकदीचं काहीतरी आहे हे मला प्रथम अरुण, किंवा त्याचे बाबा ह्यांच्या मुळंच उमगलं. किंवा पु. लं. च्या ही अनेक कॅस्सेट्स मी प्रथम ऐकल्या त्याही अरुण कडेच. मी आयुष्यात पहिला ऍटलास पाहिला तोही अरुणच्या घरी. त्या आधी ऍटलास नावाचं काहीतरी असतं हेही मला माहिती नव्हतं. तीच गत एनसायक्लोपेडिया ब्रिटानिका ची. तो ही पहिल्यांदा अरुण च्या घरीच पहिला. मी नंतर इंजिनीरिंग ला पुढे वापरला तो सायंटिफिक कॅल्क्युलेटर मी शाळेत असताना पहिल्यांदी पहिला तोही अरुणच्याच घरी. किंवा सेट स्क्वेअर्स आणि त्यातले ते दोन गोंडस फ़्रेंच कर्व्हस सुद्धा तिथेच प्रथम पहिले, अरुण कडे. अरुणचे बाबा हे त्यावेळच्या आणि अजूनही अगदी नामांकित असलेल्या अश्या वालचंद कॉलेज चे इंजिनीअर. त्यामुळं मला अरुणचं घर म्हणजे एखादी प्रयोगशाळाच वाटायची. इतक्या नवनवीन गोष्टी मला तिथं पहायला आणि हाताळायला मिळत.

अरुणच्या घरी जसा महाराष्ट्र टाइम्स यायचा तसा तो आमच्या घरी सुद्धा यायचा. पण मी बरेच वर्षं म. टा. चं पाहिलं पान, बालोद्यान आणि शब्दकोडं ह्या पलीकडे कधी गेलोच नव्हतो. पण अरुण कडे गेलो की तिथं तो स्वतः, त्याचे बाबा, चुलत भावंडं, काका वगैरे सगळे लोक, म.टा. मधील 'गोविंद तळवलकर' 'कुमार केतकर' किंवा 'प्रकाश अकोलकर' वगैरे लेखकांचे संपादकीय वाचून त्यावर चर्चा करत बसलेले असायचे. थोडक्यात जगण्याची क्षितिजं रुंदावत गेली, ती फक्त ह्या कोल्हापुरे कुटुंबियांच्या संपर्कात आल्यामुळं. हळू हळू मग माझा तो मराठवाड्यातून आल्याचा कॉम्प्लेक्स कमी होत गेला आणि मग मीही पुढे पुढे ही मुंबईकर कोल्हापुरे मंडळी काय बोलतायत हे निदान समजावं तरी म्हणून, म. टा. तले संपादकीय लेख वाचू लागलो. काही कळो न कळो.

काळ सरत गेला तसतसे आम्ही दोघेही मोठे होत गेलो. विषय बदलले. विषयातली खोली बदलली. पण अजूनही मला अरुणच अवांतर वाचन पाहून थक्क व्हायला होतं. अगदी रफाएल च्या डील च्या डिटेलिंग पासून ते पंडिता प्रभा अत्रेंच्या आणि भीमसेन जोशींच्या गाण्यांच्या मैफिलींमध्ये घडलेल्या किश्श्यांच्या आणि अश्याच इतर असंख्य विषयांबद्दल गप्पा जर कुणाशी माराव्यात असं मला मनापासून वाटत असेल तर ते फक्त आणि फक्त अरुणशीच. आम्ही दोघे अजूनही एकमेकांच्या घरी गेलो की जणू चौथीतच असल्यासारखे, कोणतेही उपचार न पाळता खाली चटई किंवा सतरंजीवरच फतकल मारून बसतो. जेवायला अरुणच्या बायकोने केलेले गरम गरम डोसे किंवा माझ्या बायकोने केलेला तितकाच गरमागरम वाफाळलेला बिशी बाळी अन्ना. तोंडी लावायला मग मागच्या भेटीपासून ते आजच्या भेटीपर्यंत राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात नवीन चर्चास्पद, विवादास्पद आणि उल्लेखनीय असे काय काय घडले त्याचे अनेक संदर्भ. मग त्यावर कुणी कोणत्या वर्तमान पत्रात काय भाष्य केलंय ते. पाहता पाहता रात्री साडे आठ पाऊणे नऊ ला सुरु झालेली ही आमच्या दोघांतच भरलेली ही परिषद रात्री बारा साडे बारा ला कोणताही निर्णयास्पद न येताच संपुष्टात येते. मग आम्ही दोघे रात्री बारा च्या पुढे "जरा पान पाहिजे रे अरण्या" असं म्हणत अंधारात धडपडत धडपडत जिन्यानं खाली उतरतो. परंतु एव्हाना पानाच्या सर्व टपऱ्या जवळ जवळ बंद झालेल्या असतात. मग आम्ही मघासचे राहिलेले अर्धवट विषय परत उकरून काढतो आणि तशीच एक मध्यरात्रीची रपेट मारून येतो. मधेच कधीतरी मग रस्त्यावरची बेवारस अशी दोन तीन कुत्री मागं लागतात. मग मात्र “चल, जाऊन झोपूया!” असं करत परत फिरतो.

ही आमची दोघांची खोड फार जुनी आहे. पूर्वी दोघांना एकमेकांच्या घरी सोडायच्या निमित्ताने आम्ही दोन तीन चकरा सहज मारत असू एकमेकांच्या घरा पर्यंत, मिरजेत. दीड ते दोन तास सहज संपून जात ह्या अविरत गप्पांच्या ओघात. पण आमच्या त्यावेळच्या चोवीस तासाच्या प्रचंड मोठ्या दिवसात अश्या दीड दोन तासांना, नुकत्याच सत्तर बहात्तर टक्के पडून दहावी पास झाल्याबद्दल मिळालेल्या आणि अजिबात जोर नसलेल्या आमच्या मनगटावर बांधलेल्या त्या एच. एम. टी. घड्याळात तर काही किंमतच नव्हती. त्यावेळी आमच्या आयुष्यात रोज फक्त दोन पाच मिनिटं, रेडिओ वर बातम्या सांगतात त्या वेळेपेक्षा मागं मागं पडत जाणारी स्प्रिंगा आणि किल्यांची घड्याळंच होती, क्वार्ट्झची अचूक कालमापन करणारी घड्याळं त्यावेळी आली होती बाजारात पण आम्हाला तेवढी ऍक्युरेट घड्याळं घालण्या एवढे मार्क्स ही नव्हते आणि तेवढ्या अचूकतेची गरजही नव्हती आम्हाला, त्या आमच्या निवांत अश्या आयुष्यात.

अश्या फालतूच्या मिरजेतल्या गप्पा आणि चकरांच्या व्यतिरिक्त मी आणि अरुण नी एकत्र प्रवास ही खूप केला. म्हणजे अगदी त्याच्या मुंबईच्या घरी सुद्धा कॉलेज मधे असताना मी जाऊन आलो आणि दक्षिण मुंबईतील निम्म्याहून अधिक फोर्ट चा परिसर आम्ही दोघांनी अक्षरश: पायी तुडवत पाहिला. मुंबईतून मला तेंव्हा पुढे लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सेवाग्राम एक्सप्रेस पकडून पुढे धुळ्याला जायचे होते. गाडी सुरुवातीच्याच स्टेशन वर चार तास लेट होती. मला स्टेशन वर सोडायला अरुण आला होता. गाडी लेट आहे असं समजताच आमच्या गप्पांची मैफिल तिथे चांगलीच रंगली. पुढे गाडी दर अर्ध्या तासांनी तास दीड तास लेट होत गेली. आम्ही त्या गाडीच्या लेट असण्याचा त्रागा करण्या ऐवजी ती एक संधीच असल्यासारखे एक एक विषय हातावेगळे केल्यासारखे गप्पा मारत सुटलो. शेवटी बारा साडेबारा वाजता सुटणारी सेवाग्राम, "संध्याकाळी साडेसहा वाजता सुटणार" अशी घोषणा झाल्यावर आनंद व्हायचा सोडून हळहळ वाटली आम्हा दोघांना. नंतर बरेच वर्षांनंतर मग एकदा कराडला आमच्याकडे अरुण रहायला म्हणून आलेला होता. तेंव्हा तो आणि मी मुंबई बेंगलोर हायवे वर चांदण्यात थंडीच्या रात्रीत असेच रात्री अपरात्री दीड दोन वाजेपर्यंत गप्पांचे सूर लागले म्हणून चक्क ट्रक ड्रायव्हर त्यांचे ट्रक पार्क करून झोपतात तिथे हायवे च्या बाजूला बसलो होतो मांडी ठोकून, आमचं गप्पाष्टक मांडत.

माझ्या ह्या जीवश्च कंठश्च मित्राच्या जन्मदात्रीला, म्हणजे अरुणच्या आईला मी प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. कारण अरुणची आई, माझी आणि अरुणची चौथीत भेट होण्याआधीच गेलेली होती. मी अरुणच्या आईला फक्त फोटोत पाहिलं. पण माझ्या पत्रिकेत अरुणच्या बाबांचा मात्र प्रदीर्घ सहवास होता. ते आमच्याशी म्हणजे अरुणच्या मित्रांशी खूप थोडं बोलायचे, पण बोलले की मात्र एक एक शब्द अगदी औदुंबराच्या पानावर टाक आणि दौतेने लिहून ठेवावा असा. पाच वर्षांपूर्वी मिरजेत अरुणचे बाबा गेल्याचं कळलं तेंव्हा मी अरुणला भेटायला मिरजेत गेलो. त्या दिवशी मी आणि अरुण दोघे त्याच्या 'सावली' बंगल्यात जिथं अरुणच्या मुंजीची पानं वाढली होती आणि आम्ही काळ्या शहाबादी फारशींवरती मांडी घालून बसून जेवलो होतो, तिथंच बसून सख्या भावासारखे गळ्यात पडून रडलो, आमच्या दोघांच्या आयुष्यातला एक मोठा हिरवा गार असा कदंब वृक्ष अचानक पणे निष्पर्ण झाल्यासारखी, कोणतीतरी न सांगता येण्यासारखी भावना. तो दिवस अजूनही मनाच्या असंख्य आवरणातील खोल स्तरांखाली आठवणींचे जीवाष्म बनून राहिला आहे.

आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे तारखेने त्याचा वाढदिवस परवा ८ नोव्हेम्बरला झाला. म्हणजे यंदाच्या पाडव्याला. तिथीनं अरुणचा वाढदिवस वसुबारसेचा. गम्मत म्हणजे मी दिवाळीच्या नादात विसरूनच गेलो त्याला शुभेछया द्यायच्या. बरेच दिवस भेट नव्हती झाली म्हणून फोन केला, सहज तेंव्हा बोलता बोलता विषय निघाला की परवाच वाढदिवस होऊन गेला अरुणचा. आपण कसाकाय विसरलो वाढदिवस अरुणचा यंदा अश्या अपराधी भावनेनेच मग फोन वर अरुणला शुभेच्छा दिल्या. आणि गप्पा मारत बसलो फोन वर. कितीवेळ ते माहितीच नाही. फोन गरम होऊन जवळ जवळ बॅटरी संपेस्तोवर. शेवटी बॅटरी संपलीच पण विषय काही संपेनात.

कधी विचार करत बसलो की वाटतं, मी कोणतेतरी पूर्व संचित घेऊन आलो मिरजेत म्हणूनच मला अरुण भेटायचा होता. आमच्या ह्या प्रदीर्घ सहवासाचे हे मैत्र एखाद्या बागेत चित्त हरवून अवखळपणे बागडणाऱ्या फुलपाखरा सारखे निर्व्याज आहे. आमच्याच जुन्या आठवणींचे असंख्य असे परागकण आमच्या ह्या बागेत गप्पांच्या ओघाओघात आमच्या पायाला लागतात. उडता उडता आमच्या पायांना लागलेले ते पराग कण मग दुसऱ्या फुलांवर चिकटतात आणि त्यातून मग आणखी एक नवीन तितकीच अवीट आणि जास्तच मधुर अश्या स्मृतींची अविरत अशी श्रुंखलाच निर्माण होते. असंख्य अश्या संमिश्र स्मृतींचे हे विस्तीर्ण पसरलेले असे रंग बेरंगी फुलांचे वृंदावन! माझ्या भाग्यात असलेल्या ह्या सौमित्राच्या सहवासातील तुषारांमुळे, प्रसन्न अश्या दिवाळीच्या पहाटे नुकत्याच उमललेल्या असंख्य फुलांचा परिमळ चौफेर पसरावा आणि मनातला रेणू अन रेणू प्रफुल्लित व्हावा. अगदी अशीच अनुभूती माझे आणि अरुणचे हे ‘मैत्र’ गेले कित्येक वर्षे आम्हाला देत आले आहे.

चारुदत्त रामतीर्थकर.
१५ नोव्हेंबर १८, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय

मैत्र जीवांचे जुळले हो अस वाटायला लावणारी मित्र मंडळी असणे हे भाग्याचं लक्षण आहे
कित्येक वर्षांनी जरी भेटलो तरी अगदी कालच शेवटची भेट झाली होती याप्रमाणे ज्यांच्याशी बोलता येतं आणि किती बोलू किती नाही असं दोघांनाही होतं ती खरी मैत्री,
या ऋणानुबंधांच्या गाठी असतात, कायम पुरणाऱ्या, अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत

लिहीत रहा.

वाह! अगदी छान लिहिलय. आवडले. अजुन सविस्तर असते तरी वाचायला आवडले असते.
अरुणचे आणि तुमचे अजुनही काही किस्से असतील तर आवडेल वाचायला.

असे सवंगडी आणि मैत्र लाभणे हे गतजन्मीचे पुण्यच !
खूप सुंदर पणे साकारले आहे तुम्ही तुमचे मैत्र !

माझा असाच एक मित्र आहे. १९७८-१९८० अशी दोनच वर्षे बरोबर होतो आम्ही स.प. महाविद्यालयात . त्या वेळी संगीत , कविता , समाज, त्याच्या ग्रामीण भागातल्या वास्तव्यातून त्याचे घडलेले व्यक्तिमत्व आणि जीवनाचे दर्षन अशा विविध विषयांवर तासंतास बोलत बसायचो .. कधी माझ्या घराच्या गच्चीत , कधी चांदण्या रात्री स.प. च्या मैदानात ....
सगळ आठवलं....
गेल्या वीस वर्षात कदाचित आम्ही ८-१० वेळाच भेटलो असू... पण आमच्या एक संवाद आहे .. कायमचा...
या सगळ्या मझ्याच मनो- विश्वाला शब्दात नितांत पकडले आहे तुम्ही जणू...
आणखी काय लिहू !

शब्दात पकडता येत नाहिये , पण खूप छान वाटले वाचून...

सुंदर....

खूप छान वाटले वाचून. आयुष्यात अशी माणसं असणे हे भाग्याचं लक्षण आहे खरंच. सुदैवाने मी पण लकी आहे या बाबतीत Happy . पुलेशु.