गृहकृत्यदक्ष

Submitted by मकरंद गोडबोले on 14 November, 2018 - 02:23

मकरंदगोडबोले
गृहकृत्यदक्ष

"कंबरड्यात लाथ घातल्याशिवाय उठायचा नाही तो", आई करवदली.
"तुम्हीच घाला" ही.
म्हणजे आता उठण्याशिवाय पर्याय नव्हता. मी झोप किलकिली करून चहाचा अंदाज घेतला. तर आले घातलेल्या चहाचा छान सुगंध दरवळला. मग मात्र झोपेचे पांघरूण पूर्णपणे त्यागून मी उठलो, आणि कप तोंडाला लावला, तर त्या चहाहून कढत स्वरात ही किंचाळली, "तोंड धुवा अगोदर, का त्याचाही कंटाळा आलाय?" मग आईकडे बघत परत पुटपुटली, "लागायला पाहिजे तेव्हा नाही लागली शिस्त, आता कितिही घसा खरवडला तरी काय होणारै!"
"आम्ही नाही हो असले लाड कधी केले" इती आता आई. "उठता लाथ आणि बसतां बुक्की अशी होती शिस्त आमची"
"दिसतेच आहे" मान वेळावणे हा एक न बोलता मान-हानी करायचा प्रकार बायकांना मस्त जमतो. तशी मानेनी हानी कारक मान वेळावून (याहून जोरात वेळावली असती तर मानेचीच हानी झाली असती) ही म्हणाली. माझ्या तोंडाला फेस आला होता. टूथपेस्टचा. त्यामुळे बोलता येत नव्हते. आणि समजा आले असते तरी मी काय बोललो असतो. मला शिस्त आहे असे म्हणालो असतो तर दोघी एक झाल्या असत्या. आणि मान वेळावणे, स्वर हेलावणे, हात ववाळणे, कोपरापासून …. वगैरे वगैरे पद्धतिने माझी यथेच्च धुलाई झाली असती.
मी नक्की काय केले आहे याचा मी विचार करत बसलो. म्हणजे हे इतके हल्ले सकाळी सकाळी झेलणे त्रासदायक असते हो. मानसिक तणाव येतो फार. म्हणजे चहा मिळाला, पण पोहे मिळणार का? झालेच तर दुपारच्या जेवणाचे काय? असे तणाव वाढवणारे प्रश्न पडायला लागले की त्रास नाही का होणार. मग मी हळूच स्वयंपाकघरात डोकावून बघितले. तर कसलीच तयारी नव्हती. वर ही, "तोंडात ब्रश घेउन जर गेलात ना आत…….?" हे जवळपास 'खबरदार जर टाच मारुनी' होते. त्यामुळे माझ्या अब्रूच्या चिंध्यड्या व्हायच्या आत मी गुमान बाहेर आलो, आणि बेसिनपाशी उभा राहिलो.
समोरच्या आरश्यात मला रविवारचा मुर्तिमंत आळस दिसत होता. खुरड्या दाढीसकट. मी त्याला विचारले, इतक्या सकाळी सकाळी काय झाले आहे? त्याने फारच गमतीशीर प्रश्नार्थक चेहरा केला. त्यालाही नक्की अंदाज नव्हताच. त्याच्याऐवजी त्यानी मला माझ्या इमेल्स दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर दिनचर्या! मी त्याला म्हटले की बाबा आता बास. आज रविवार आहे, नो दिनचर्या, फक्त आळसचर्या. यावर बाबाने मला अत्यंत नम्रपणे, हा शब्द मला माहित नाही असे सांगितले. मग मी आरश्यातल्या बाबाला सुट्टीमोड देउन बंद करून टाकले, आणि त्याचा निखळ आरसा झाल्यावर मी पूर्वीसारखे दात घासायला लागलो.
हल्ली सगळ्या गोष्टी ती गोष्ट असून अजून काहीतरी असतात. म्हणजे हा आरसा, हा नुसता आरसा नाहिये, तर तो वैयक्तिक मदतनीस, वर्तमानपत्र, छायासंवादी, आणि आठवगाठी सुद्धा आहे. किंवा आमचे चहापात्र, त्याच्यावरची चित्रे आणि स्वतःचा रंग, स्पर्शावरून पकडणाऱ्या माणसाच्या मनच्छटा ओळखून त्याप्रमाणे बदलतो. मधूनच आतल्या चहाचे तापमान किती आहे तेही सांगतो. अजून त्याला आत चहा आहे का काॅफी हे समजत नाही. त्यासाठी नवा कप घ्यायला लागेल म्हणतात. या नव्या कपात काहीतरी अतिसूक्ष्म तंत्रज्ञान आहे म्हणे की ज्यामुळे कपातले पदार्थ ओळखता येतात, आणि तो आपल्याला आत काय आहे ते सांगतो म्हणे. हल्ली अशा सगळ्या नव्या निरुपयोगी यंत्रांची रेलचेल झाली आहे. मला सांगा दात घासताना बातम्या कळायची काही गरज आहे का? किंवा ई-संदेश? पण नाही ते त्या आरशात घालायचे आणि विकायचे. मग दर वर्षी त्याचा नवा अवतार काढायचा, की आम्हाला लगेच पाहुणे सनातन ठरवायला लागतात. फक्त नवा अवतार जो घेतो तो पुरोगामी, आणि जुना अवतारावर काम चालवणारे सगळे सनातन किंवा पुरातन. पूर्वी माझे वडील घरातला आरसा दाखवून छाती फूगवून हा त्यांच्या पण्जोबांचा आहे, व तो त्यांनी खुद्द बेल्जियम वरून बोटीत घालून कसा आणला वगैरे अभिमानाने सांगायचे. आता असे मागच्या वर्षी नव्या घेतलेल्या आरशाबद्दल सांगितले तर लोक तुच्छतेने बघतात. जुनी गोष्ट खूप काळ जपून वापरणे हे कालबाह्य झाले असून दरवर्षी आमुलाग्र नव्या गोष्टिंनी घर भरून टाकणे हे सद्ध्या इन आहे म्हणे. तसा माझा चहा प्यायचा कप हा पुरातन झाला आहे. आता नवे जे येतात ते आतले पदार्थ तर सांगताताच, पण ते त्यावर समोरच्या बाजुला हनुमानचालिसा, आणि पिणाऱ्याच्या बाजुला काही वेगळेच दाखवू शकतात. हा कप घ्यायचा मी नक्की केले होते. आईसाठी हो, तिला हनुमानचालिसा आवडतो, तर मी चहा पिताना ती ऐकत जाईल रोज, म्हणुन.
पण या सगळ्यानी, मला अजून, समस्त आजीमाजी गृहस्त्रियांनी माझ्याविरुद्ध एकमुखाने, आणि तेसुद्धा रविवारी बंड करायचे कारण कळत नव्हते. आणि ते कळल्याशिवाय हा रविवार वाया गेला असता म्हणून ते शोधून काढणे महत्वाचे होते. मी बिंबनीसाला(आरश्यातला मदतनीस) विचारले, तर त्यानी मगाशीच मान टाकलेली. त्यामुळे आता जुन्या मार्गांनी शोध लावायची गरज होती.
मी धास्तावलेल्या मनानी टेबलावर येउन बसलो, तर खुर्ची काळीठिक्कर पडली. समोरची हि बसलेली लालभडक होती. आईची पिवळी. म्हणजे वातावरण अजूनही तापलेलेच होते. समोर हिने चहाचा कप आदळला, त्याच्यावर पिवळ्या रंगात तापमान दिसत होते, आणि हिची बोटे लागलेली जागा पांढरी. म्हणजे त्या चहाच्या तपमानापेक्षा जास्त. म्हणजे मोठा घोटाळा.
आरशानी मदत नाही केली, पण मेजानी केली. त्यावर मुद्दाम उघडून ठेवल्यासारखा नव्या यंत्रमानवाची जाहिरात होती. गृहकृत्यदक्ष २४७-पु-१३अ. म्हणजे याच्यासाठी चालले होते तर सगळे रागरंग. कुठल्यातरी शेजारणिने हिला पुरातन ठरवले असणार, आणि आईला सनातन. मग बरोबर आहे. जगाबरोबर रहाण्याच्या शर्यतीत मागे पडल्याच दुःख मोठे असतेच, त्याचे इतके परिणाम होणारच. मी हळूच त्याच्यावर बोहारिण (बायबॅक) पर्याय आहेत का ते बघितले. तर एक चांगली ऑफर होती. वर हप्त्यांची पण सोय होती. मग मी मुकाट खरेदीचे बटण दाबले, आणि स्वयंपाकघराचा रंग एकदम बदलला.
यथावकाश हा किंवा ही गृकृ १३ आमच्याकडे आली/ला. (आता हे टाळण्यासाठी यापुढे लेखकाच्या सोयीप्रमाणे यंत्रमानवाचे लिंग बदलेल) याचे एक वैशिष्ट्य म्हणजे, घरातली सगळी कामे करायला एकच यंत्र लागते. पुर्वी वेगवेगळी लागायची. आता ती निकामी झाली. पुर्विचा गृकृ १२ फक्त स्वयंपाक करायचा, तोही इतर यंत्रांच्या मदतीने. म्हणजे मिक्सर, फूड प्रोसेसर वगैरे. आता हे सगळे याच्यातच होते. तसेच हा धुणी भांडीपण करतो, स्वतः. वाॅशरच्या मदतीने नाही. तर ही पुरातन झालेली यंत्रे देउन हिने बोहारणीकडून आयफोन ४७२७३ एस घेतला. ॲपलच्या धोरणानुसार ते दर फोनमधे काहितरी कमी करतात. मागच्यावेळी त्यांनी कुठलेही हेडफोन नसताना गाणी ऐकू येतिल अशी व्यवस्था केली. त्यासाठी फक्त कानातल्या हाडाला एक ग्रीनटूथ बसवून घ्यावा लागतो. मग सगळी गाणी ऐकू येतात. फोन आणि संदेशसुद्धा सगळे थेट कानात वाजतात. हा आत्ताचा जो आहे, त्याला म्हणे ते ग्रीनटूथ तंत्रज्ञान चालत नाही. तर आता दोन मेंदुंच्यामधे एक चिप घालतात, आणि त्यामुळे डायरेक्ट टेलिपथीसारखे बोललेले कळतेच म्हणे. गाणे तर डोक्यातच जाते. जुने काढणे आणि नवे घालणे हे एकाच शस्त्रक्रियेत करतात. यासाठी आता फोनकंपन्यांनी फिरती इस्पितळे काढलेली आहेत. फोन घेतला रे घेतला की त्यात जाउन शस्त्रक्रिया करून बाहेर यायचे. वर या फोनला स्क्रिनच नाहिये. चित्रे डोक्यातच उमटतात. बटणे डोक्यातूनच दाबायची. पण तरी एक फोन बाहेर लागतो. पुढचा म्हणे डोक्यातच घालणार आहेत. त्याला वेगळी मेमरी लागणार नाही, मेंदूच मेमरी कार्ड म्हणून वापरायचा म्हणे. महत्वाचे म्हणजे यावरून गृकृशी संवाद साधतां येतो.
माझ्याकडे सॅमसंगचा साधा सत्तावीस इंच स्क्रिन असलेला नोट ५०के२३ आहे. त्याची छोटी सहा इंची घडी होते. यांचे तंत्र ॲपलच्या उलटे आहे. यांच्याकडे दर फोनमधे काहितरी वाढते. स्क्रिनसाइज तर वाढतोच, पण त्याच्याबरोबर अजून काहितरी वाढते. माझ्या फोनमधे दुर्बिण आहे. तिचा वापर करून खुप लांबच्या गोष्टी स्पष्ट दिसतात. याचा उपयोग काय विचाराल तर मला माहित नाही. पण प्रत्येकवेळा लोकांना दाखवताना दुर्बिण बघून ते आश्चर्यचकित होतात, हे नक्की. नाहितर या ॲपलच्या फोनमधे काय हे विचारले तर डोके फोडूनच दाखवायला लागेल हो, आमचे निदान तसे तरी नाही. पण या इतक्या मोठ्या फोनवरून आमच्या गृकृशी अजून संवाद साधतां येत नाही. त्यांचे ॲपलशी कांट्रॅक्ट आहे म्हणे. आता या गृकृनिमित्त माझी एकदा डोकेफोड झाली आहे, तर आता खरोखर परत नको, म्हणून मी त्याच्याबरोबर मनातल्या मनात संवाद साधायची ही चालून आलेली संधी सोडली. पण पुढे काय वाढून ठेवलेले आहे हे मला थोडीच ठाउक?
मकरंदगोडबोले
गृहकृत्यदक्ष
दुसऱ्या दिवशी सकाळी शांतपणे उठलो. आजुबाजुला कुठलिच कडकड नव्हती. सगळे जग एकदम शांत असल्यासारखे वाटत होते. निर्णय बरोबर होता बहुतेक. जोरदार आळस दिला. तर शेजारी हिनी कूस बदलली. म्हणजे ही अजून झोपेतच. मी चकितलो. पण चेहऱ्यावर फारच शांतता साचली होती. मग तिला उठवायचे जिवावर आले. वर आमचा गृकृ होताच. मग म्हटले आता सुरुवातच करावी आपणच फर्मास चहा करून, म्हणजे फर्मास चहाची आर्डर देउन.
मग मी स्वयंपाकघरात आलो. तर चित्र जरा विचित्र होते. आमचा गृकृ हा कुठलेतरी अनाकलनीय संगित लावून अद्वातद्वा नाचत होता. त्या नाचात आजुबाजुचे काचसामान फुटुन जमिनीवर पसरले होते. त्या तुकड्यांची पर्वा न करता गृकृ त्या तुकड्यांचा अजून चुरा करत त्याच्यावर बेताल नाचत होता. मी नीट ऐकले तर ते माधुरीचे अगदी हळू वेगात लावलेले ’धकधक करने लगा…’ होते. (वीसशे पन्नास मधे यासारखे कुठले गाणे असेल याचा विचार करणे अशक्य आहे, म्हणुन सद्ध्यातरी हेच) मी अचाट पडलो. चहा चे काही खरे नाही, आधी हे नाचणे कसे थांबवावे ते कळेना. मी त्वरेने आणि खरेतर घाबरून हिला उठवायला गेलो. बऱ्याच प्रयत्नानंतर मला ते शक्य झाले. चेहऱ्यावर नाराजी घेउनच ही उठली. उठल्या उठल्या परत करवदली, “आता तुम्हाला का हो मी हव्ये सकाळी सकाळी? तो आहे ना. त्याच्याकडून घ्या ना करून जे हवेय ते?”
“अग त्याच्यासाठीच तर उठवतोय. त्याचे काय चाळे चालल्येत ते बघ. हा नक्की गृहकृत्यदक्ष आहे का नृत्यकृत्यदक्ष आहे? बघ जरा” मग मात्र ही चटकन उठली. आम्ही दोघे स्वयंपाकघरात गेलो. तर दृश्य साधारणतः असे होते.
फरशीवर फुटलेली काच नाही अशी एकही जागा शिल्लक नव्हती. वर असलेली सगळी काचपात्रे फुटून खाली पडली होती. दोन खुर्च्या मोडून पडल्या होत्या. टेबलाच्या एका पायावर एक मोठी भेग पडली होती. काल काढून ठेवलेले उरलेले अन्न जागोजागी विखरुन पडले होते. लोखंडाची भांडी इतस्ततः उलटीपालटी होउन पडलेली होती. काही सुऱ्या लाकडी कपाटात घुसल्या होत्या. कपाटाच्या काही काचा तुटून पडल्या होत्या. सिंकमधे काचांचा ढिग पडला होता. कचऱ्याचा डबा उलटून पडला होता. त्यातला कचरा इतस्ततः विखरुन पडला होता. आणि…
आणि आमचा गृकृ हा कोपऱ्यात शांत उभा होता. मला सगळ्या खोड्या करुन झाल्यावर एकादा वांड मुलगा जसा शांत होतो, तसा तो शांत दिसत होता. चेहरा तर अगदी निरागस. मगाचा अवखळपणा कुठेतरी लोप पावला होता. हात कमरेवर ठेवले असते तर शेजारी रखुमाई शोभली असती.
“अहो एक दिवस मी थोडी जास्त झोपले, ते सुद्धा हा गृकृ असताना, तर तुम्हाला साधा चहासुद्धा नीट करुन घेता येत नाही? त्याला सांगितला असता चहा करुन द्यायला तर हे सगळे झाले तरी नसते ना! आता हे कोण आवरणार?”
आता मी चकित झालो. मी कितिही पाक-अकुशल असलो तरी धांदरट नक्की नाही. त्यामुळे माझ्यावर हा अचानक आरोप मिथ्या आहे, आणि तो खोडून काढायला हवाय, याची मला क्षणभर जाणिवच झाली नाही. मी तसाच तोंडाचा आ करून असताना, हिने केस बांधून सराईतपणे गृकृला मनातल्या मनात आदेश द्यायला सुरुवात केली, आणि तोही कमालिच्या सराईतपणे गोष्टी आवरू लागला. हा मनातल्या मनात आदेश देण्याचा प्रकार मात्र अत्यंत गमतिशीर होता. एकादा आदेश देताना हिच्या भुवया ताणल्या जात होत्या, तर दुसऱ्या आदेशाला ओठ खेचले जात होते. कधी डोळे ऊर्ध्व होत होते, तर कधी मान विचित्र हलत होती. या सगळ्याला हातवारे चालू होते, आणि तोंडाने अखंड गजर चालू होता. कधीकधी तर घशातून फक्त घरघर ऐकू येत होती, तर कधी कधी वाॅशिंग मशीन चालू असल्यासारखा आवाज येत होता. त्यात गृकृ हा प्रत्येक आदेश मिळाल्यावर, “डावीकडे खाली पडलेला कचरा उचलणे. हो कळले उचलतो” असा प्रतिसाद देत असायचा. त्याच्यात त्याला हिने ऐकदा चुकुन चुऱ्याऐवजी कचरा सांगितले. यावर त्याने, “कचरा दिसत नाही. उचलू शकत नाही. कृपया दुसरे काम सांगा” असे छापिल उत्तर दिले. त्यावर हीला “उगाच वाद घालू नका. काय सांगते ते कळत नाही का? मग करा.” असे मर्त्य नवऱ्याला देउ शकणारे उत्तर देउ शकत नाही हे कळल्यावर जो काय चेहरा झाला त्याला तोड नव्हती. तिला राग गिळून मन शांत करून त्याला “नाही, कचरा नाही चुरा उचल” असे शांतपणे सांगायला लागले. म्हणजे तिने मनातल्या मनात सांगितले असेल. कारण नंतर, “चुरा, हो आदेश कळला, उचलतो” असे गृकृच्या तोंडून बाहेर पडले.
बघता बघता मोठी मोडतोड सोडता बाकी स्वयंपाकघर साफ झाले, आणि हीनी एक विचित्र कटाक्ष माझ्याकडे टाकला. “आता या मोडलेल्या गोष्टीतरी नीट करून घ्या” म्हणाली. मी भानावर आलो. “ज्यानी केलेय त्यालाच सांग” मग करवदून म्हणालो. तर ही जास्तच चिडली. “इथे मी नाही तर तुम्हीच तर आहात? अजून कोण आहे हे करायला. आणि मी तर झोपलेली होते. मग कोणी केले?” रोखठोक. मला एकदम भारतीय पोलिसांच्या तावडीत सापडल्यासारखे वाटायला लागले, आणि खरी भिती वाटली. आता मला जर नीट माझे निरपराधत्व सिद्ध करता आले नाही तर माझी धडगत नव्हती. माझा एकदम शेरलाॅक होम्स झाला, क्षणभरच. पण मग मी तिला घरातल्या सुरक्षा कॅमेऱ्याचे रेकार्डिंग दाखवले, आणि माझे निरपराधत्व सिद्ध झाले. मग आम्ही त्वरेने कंपनीला फोन केला, व त्यांना ते रेकार्डींग पाठवले. ते पाहून आमच्यापेक्षा त्यांचा अधिकारी जास्त बुचकळ्यात पडला. मग त्यानी ही आमचीच कशी चूक आहे हे आम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न केला. पण हिच्या एकंदरित पवित्र्यासमोर त्यांचा काही टिकाव लागला नाही. आणि अगदी त्वरेने म्हणजे दोन दिवसांनी त्यांचा तंत्रज्ञ आमच्याकडे येणार होता. तोपर्यंत असे परत झाले तर गृकृला बंद करुन ठेवा, असा अनाहूत सल्ला पण दिला.
पण गृकृने नंतर असा त्रास दिला नाही. बरेचसे आदेश नीट पाळत होता. यात बरेच गैरसमजही होत होते. म्हणजे मी त्याला सगळी साफसफाई झाल्यावर, “जरा आले घालून फर्मास चहा कर” असा आदेश दिल्यावर हा प्राणी जागचा हललाच नाही. तोंडावर काही भाव पण नाहित. मी हिने माझे आदेश पाळले जाउ नयेत अशी काही गुप्त सोय केली आहे का अशी मला गुप्त शंका पण आली. हो गुप्तच, कारण ही शंका मी उघडपणे घेउच शकत नाही. पण हिचा चेहराही कावराबावरा झाला. त्यामुळे तसे नसावे असे वाटले. तेवढ्यात त्याने, “माझ्या माहितीप्रणालित फर्मास हा शब्द नाही” असा उलट जबाब दिला. मी हताश होउन, “बर फर्मास नाही तर नाही, नुसते आले घालून चहा कर” असे सांगितले आणि बसलो. थोड्यावेळात माझ्यासमोर वाफाळणारा चहा आला. मी आनंदाने पहिला घोट घेतला, तर त्याच्यात दूध नाही, साखर नाही, फक्त चहा गरम पाणी आणि चक्क लाल तिखट होते. जो काय जोरदार ठसका लागलाय त्याला नाव नाही! खोकत खोकत चेहरा लालबुंद झाला. नाकपुड्या फुगल्या. हिने पटकन पाणी दिले म्हणून बरे, नाहितर पल्याडच्या सीमेवर पोचलो नक्कीच होतो. आता हे कसे झाले ते बघायला गेलो, तर हिने कपाळाला हात लावला. मी विचारले काय झाले. तर म्हणाली, “मी काल झोपताना, आले संपले, आणि लाल तिखट आणले होते, म्हणून आल्याच्या जागी तिखट ठेवले होते. आज सकाळी आवरिन म्हणून याला काहिच सांगितले नाही” मी घसा धरुन या माझ्या दैवदुर्विलासाला काय म्हणावे याचा विचार करत बसलो. या फर्मास शब्द माहित नसलेल्या भंगाराची किंमत मी फारच जास्त मोजल्ये. तरी मला शंका आलिच, की मग दूध आणि साखर का नाही. तर एकदम डोक्यात प्रकाश पडला, मगाशी मिच तर त्याला, “नुसते आले घालून चहा कर” असे सांगितले होते. आणि त्या आल्याच्या जागी तिखट ठेवले गेले होते. तेव्हापासून याला काही सांगायची मला भितीच वाटायला लागली आहे.
पण या इतक्या प्रकारानंतर हिचा चेहरा परत कसनुसा झाला. तिनी मला विचारले, “मला सांगा हो पहाटेची स्वप्ने खरी होतात ना?” आता याचा काय संबंध आहे असा मी विचार करत होतो. तर जरा चाचरत म्हणाली, मला पहाटे मी अनिलकपूर बरोबर धकधक करने लगा वर नाचत होते असे स्वप्न पडले होते, ते तर….”
मी खरे सांगतो, हिची काही चूक नाही हे मला आजपर्यंत पटलेले नाहिय. आणि पहाटेची स्वप्ने काहिही करून खरी होतात, याचावर माझी पूर्ण श्रद्धा आहे.
सकाळी मी घाबरतच स्वयंपाकघराचे दार उघडले. आज काय बघायला मिळणार याची मला भिती होतीच. पण काल त्याला झोपण्याआधी विश्रामस्थितीत टाकल्यामुळे आज काही अचरटपणा झालेला नव्हता. त्यामुळे मी आनंदानी त्याला 'कार्यस्थिती'त आणला, आणि फक्कड चहा कर, असे सांगितले. परत गडी जागचा हलायला तयार नाही. मला मागच्या प्रमाणे त्याने, "फक्कड हा शब्द माझ्या शब्दप्रणाली मधे नाही" असा एकसुरी जबाब दिला. पण मी ही ठरवलेच होते आज काही झाले तरी हार मानायची नाही. आज गृकृकडूनच चहा करून घ्यायचा. त्यामुळे मी त्याला फक्कड हा शब्द काढून “चहा कर” अशी साधारण यांत्रिक आज्ञा दिली. तरिही साहेब जागचे हलले नाहीत. मग मला हीनी माझा आवाज आल्यावर काम करायचेच नाही असे काही सेटिंग (हा शब्द मराठी आहे. स्थावर दलालांच्यामुळे हा मराठी शब्दकोषात समाविष्ट करण्यात आला आहे) करून ठेवले आहे असे वाटले. तरी चिकाटीने प्रयत्न केल्याशिवाय मी आज सोडणार नव्हतो. म्हणतातच ना, “प्रयत्ने गृकृचे मन वळविता चहाही मिळे!”
पण आतमध्ये काही चिंतन चालू आहे असे दिसत होते. त्याला दृष्य एलिडी (प्रकाषोत्सर्गी द्विप्रस्थ हे कळले नसते म्हणून) असते तर तो पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीसारखा निळा लाल चमकायला लागला असता असे मला उगाचच आतून राहून राहून वाटत होते. एखादवेळी सायरनसारखे त्याचे रूदनसुद्धा ऐकू आले असते. शेवटी एकदा व्यक्ती बोलती झाली.
“पुणेरी अमृततुल्य, बासुंदी, मसालेदार, मुंबई मसाला, दार्जिलिंग पांढरा, जास्त दुधाचा, कमी दुधाचा, आले घातलेला, गवती, लिंबू शीत चहा………………………… …………………………………………………………………………… का हरीत चहा?”
गडी साधारणतः पाच मिनिटे बोलत होता. त्यातल्या निम्म्याहून अधिक चहाची नावे मी ऐकलीच नव्हती. फक्कड आणि फर्मास हे दोन शब्द माहित नसलेल्या या यंत्राला चहा करता येणार का? अशा मला एक शंका येउन गेली. आणि येत असला तरी त्याला सांगायचा का? अशी दुसरी. या दोन शब्दांचा अर्थ, तो चहा केल्याशिवाय आणि तो पिताना, पिणाऱ्याच्या मुखकमलावर आनंदाचे भाव उमटून त्याच्या तोंडातून आनंदाने आणि स्वयंस्फूर्तीने, “अहाहा, काय फक्कड जमलाय चहा” किंवा “फर्मास झालाय, मस्त” असे सहज बाहेर आले तरच त्याचा अर्थ पिणाऱ्याला आणि करणार्याला कळतो. अमृततुल्यच्या सोनेरी कठड्यामागे कळकट बनियन घालून तितक्याच कळकट पंचाने चहा गाळता गाळता, या दिलदार आणि दर्जेदार दादिने तो सढेर चहाकर्ता ज्या आंतरिक आनंदाने उजळून निघतो, आणि त्या दिलखुलास कौतुकाने भारून जाउन, जास्त जोराने ते कळकट पंचे पिळतो, आणि उरलासुरला फर्मास खालच्या चहापात्रात पिरगाळतो, नव्या उस्ताहासकट. हा नवा उत्साह, आणि हे कौतूक त्या चहात उतरते आणि तो फर्मास बनतो. तो काही नुसत्या पदार्थानी होत नाही. तर त्याला ही भावनिक जोड लागते. ही जोड हा निर्भावलेला यंत्रमानव कशी देणार ही रास्त चिंता मला खात होती. तरी आज याला सोडायचा नाही असे मी ठरवल्यामुळे, आणि केवळ त्याचमुळे पायात चपला अडकवून कोपऱ्यावरच्या अमृततुल्यमधे जायची उर्मी मी टाळली, आणि मनाला शांत करून त्याला पुढची आज्ञा दिली.
“ एक इंच आले घालून, एक चमचा चहा, एक चमचा साखर वापरून मला एक कप चहा करून दे” मग पटकन तो काही म्हणायच्या आत मी उपसूचना दिली, “आले किसून घाल” यावर गृकृचे मस्तक अचानक हलू लागले व ते यांत्रिक पद्धतिने अर्धवर्तुळाकार, खरेतर शेवटचे आचके खाल्ल्यासारखे कधी डाविकडे तर कधी उजवीकडे कचाकच फिरू लागले. मला तो काय करतो ते कळेना. त्याच्या डोळ्यातून बंदुक लक्ष्यावर रोखताना हल्ली कसा लाल किरण निघतो आणि तो लक्ष्यावर केंद्रीत होतो, आणि मग लक्ष्याला आणि शिकाऱ्याला दोघांनाही कुणाची हत्या होणार आहे हे लगेच कळते, तसा एक लाल किरण स्वयंपाकघरातल्या दरवाजांवरुन फिरू लागला. मला आता हा हे सगळे दरवाजे ठो ठो करून उडवणार असे वाटायला लागले. पण नंतर असे वाटले की तो त्याच्या क्षदृष्टिने कुठे काय ठेवलेय ते शोधतोय. कारण तो लाल किरण फिरताना काही मिळाले की बीप असा आवाज करून फिरणारे डोके थांबायचे गर्रकन दुसऱ्या दिशेला वळायचे परत बीप… शेवटी बहुतेक याला सगळे मिळाले असावे, आणि अतिशय वेगात त्याने चहा, साखर, दूध असे डबे काढले. आले फ्रिजमधून बाहेर काढले. त्याच्या एका बोटातून एक मोजपट्टी बाहेर आली. त्याने ते आले एक इंच मोजले. दुसऱ्या बोटातून सुरी बाहेर आली. त्यानी ते कापले. यानंतर त्यानी जे केले ते अनाकलनीय होते. त्याने ते आले, चहा, साखर खाल्ली. दुधाची वाटी तोंडात उपडी केली. आणि नळाखाली तोंड धरून थोडे पाणी प्याला. नंतर मग त्याच्यातून वेगवेगळे आवाज येत राहिले. पाणि उकळल्याचा आवाज आला. नंतर त्यानी कप घेतला, आणि हात खाली करून नळ सोडला. कपभर चहा माझ्यासमोर धरला.
चहा तसा बरा होता. फर्मास वगैरे काही नव्हता. मला तरीही चहाची तक्रार फारशी नव्हती. नळाची जागा बदलायला हवी असे मात्र वाटून गेले.
इतक्यात ही बाहेर आली. आणि, “अय्या झाला का तुमचा चहा?” असा एक समाधानोद्गार निघाला. मग त्याच्याकडे नुसते बघून ती तोंड घासायला निघून गेली. हिला चहा कुठून येणार हे आता कळणार नाही या कल्पनेने मी जरा सुखावलो. आणि मी ही तिथून निघून आवरायला गेलो. आवरून बाहेर आलो, आणि आपसूक स्वयंपाकघराकडे माझी पावले वळली. तर आतले दृश्य विलोभनीय का कायसे होते. हि ऑर्केस्ट्राच्या सूत्रधारासारखा हातात काठी नसताना हात हलवत होती. कुणामधे काहीही भाष्य नव्हते. कुठलाही शब्द बोलला न जाता काम होत होते. हे आमच्या स्वयंपाकघराला न मानवणारे दृष्य मला याची देही दिसले. तो ही वेगात हातवारे आणि पायवारे करत होता. विजेच्या वेगाने काम चालू होते. ही चक्क मला दहा डोकी असलेल्या रावणासारखी वाटली, कारण तितक्या सूचना एकावेळी जात होत्या. आणि तो मला दहा हात असलेल्या दुर्गेसारखा वाटत होता. इतक्या गोष्टी एकावेळी चालू होत्या. स्वयंपाक, भांडी घासणे, कपडे धुणे, भांडी जागेवर ठेवणे इतके सगळे एकाचवेळी चालू होते. या सगळ्या गोष्टी डोक्यात एकाचवेळी चालू असणे आणि त्या करणे या बायकांच्या अजब कसबाला माझा कायमचाच दंडवत आहे. माझ्याकडे बघून ही म्हणाली, “तुम्हाला आवडणारे पिठले भात करत्ये. थोडे थांबा तर डबा मिळेल”
मी घाईघाईने तिला, “नको आज बाहेरच जेवीन. लवकर जायचे आहे” असे म्हणून मी तिथून काढता पाय घेतला. मला पिठल्याची प्रक्रिया बघायची मुळीच इच्छा नव्हती.
मी आता या गृकृला चक्क घाबरायला लागलो होतो. मला तशी बायकोची भिती वाटत नाही पण याची वाटते. विशेषतः त्याची इनपुट, आउटपुट प्रक्रिया समजल्यावर. तसे बघायला गेले तर हा यंत्रमानव, आणि फक्त एक सोय म्हणून केलेली ही रचना. तिच्यात किळस यायचे तसे कारण नाही. पण आमची असोशिएशन्स हे मान्य करत नाहीत.
पण प्रत्येकच ऋणाणू पद्धतित (हा जीवाकडून उचललेला शब्द, इलेक्ट्राॅनिक्स साठी वापरतोय) काही ना काही करी गंमत असते. आमचे घर जवळपास संपूर्णपणे स्वयंचलित आहे. किंवा ऋणाणू चलित आहे असे म्हणूया. त्यामुळे कळ दाबणे किंवा पटलस्पर्श करणे किंवा यापलिकडील संवादसाधने वापरावी लागतात. खूप पूर्वी आम्ही एक टाळी वाजवली की चालू होतो, आणि टाळी वाजवली का बंद होतो अशी एक कळ आणली होती. ही खूपच जुनी गोष्ट आहे. माझ्या वडलांनी ही कळ आणली होती. मी खूपच खूष झालो होतो. मी जिकडे तिकडे हिचा वापर केला. मला ते ऐतिहासिक सिनेमात, टाळी वाजवून, “कोण आहे रे तिकडे", असे विचारणे, आणि गुप्त माणूस पुढे येउन त्यानी आज्ञा पूर्ण करणे, किंवा सुंदर जादुगारीण नुसती टाळी वाजवून जेवण मांडते, किंवा आपोआप भांडी घासली जातात हे खूपच आवडायचे. त्यामुळे मी त्या कळीचा मनमुराद वापर केला. वडिलही मुलगा स्वतःहून पुढाकार घेउन काहीतरी करतोय म्हणून आनंदात होते. मी सगळे करून झाल्यावर त्यांना आनंदाने म्हणालो, "घ्या ट्रायल" आणि त्यांनी टाळी वाजवून ट्रायल घेतली.
दिवा लागला. एक नाही सगळे घरातले दिवे लागले. शीतताळ (थंड ठेवणारे फडताळ म्हणून) बंद पडला. सूक्ष्मतरंग (मायक्रोवेव्ह, हे सू्ज्ञांना सांगायलाच नकोच) सुरु झाला. काही पंखे चालू झाले, जे चालू होते ते बंद झाले. खिडक्यांवरच्या पडद्यांची मोहक हालचाल झाली. धुलाईयंत्र अचानक बंद पडले. बाहेर बहुदा तबेल्याचे (?) दार उघडले असावे. मला तर फ्लशचा पण आवाज आल्याचे अंधुक आठवते आहे. कुठेतरी गजर झाला. सुरक्षाप्रणाली जोरात कळवळली. आजोबा घाबरून ओरडले. बाबा पळत आत गेले तर त्यांच्या स्वयंचलित शेजेची जवळपास घडी झाली होती. फरशा धुवायचे यंत्र जोमाने सुरू झाले आणि गरागरा फिरायला लागले. ते पायात येउन आजी पडली. तो कचरा वाटून निर्वात मोलकरीण (व्हॅक्यून क्लिनर ला निर्वात स्वच्छतागृह म्हटले असते तर चालले असते का? म्हणून मोलकरीण) तिला पिशवीत ओढून घ्यायचा प्रयत्न करू लागली. काही नळ घाबरून रडू लागले. बाहेर गवतावरचा स्वयंचलित पाणमाळी चालू झाला. गवतकापू सुरू होउन रस्ता ओलांडून समोरच्यांचा गवतावर न्हावीगिरी करू लागला. मिक्सर सुरू झाला. त्याचे झाकण उडून आईला लागले. फोनने अग्निशामक दलाला फोन केला. वीजतवा (हॉटप्लेट) सुरू झाली, आणि त्यामुळे त्यावर ठेवलेली अंडी भाजली गेली. एकंदरित असा साग्रसंगीत यंत्रमेळावा सुरु झाला. जिन्याखालच्या कपाटाने मला गिळंकृत केले.
हो खरेच. बाबा म्हणतात की मी घाबरून त्याच्याच जाउन बसलो म्हणून. अजून सगळ्यांच्या हसण्याचा विषय आहे तो. पण मी स्वतःहून गेलो नव्हतो. ती ही त्या टाळिचीच कृपा होती. माझा यानंतर तंत्रज्ञानाशी फारच विसंवाद झाला होता बराच काळ. तो हल्ली जरा मिटायला लागला, तर हा गृकृ घरी आला.
माझा आवाज हा फार विशेष आहे. तो सर्व उपकरणांवर वेगवेगळा वाजतो. फोनवर वेगळा, माईकवर वेगळा. प्रत्यक्षात वेगळा. त्यामुळे वाण्यादेशावर चालणाऱ्या आज्ञाधारी यंत्रांशी माझे वेगळे नाते आहे. आधी यांची नावे इतकी अवघड का असतात ते मला कळेना. त्यातून ती सगळी परदेशी नावे अलेक्सा, बिक्सबी. “राम्या चहा दे” या सुंदर साध्या नावाशी त्यांना का शत्रूत्व आहे हे मला अजून कळलेले नाही. असाच एक फोन मला घेऊन देण्यात आला होता. ही पण खूप पुर्विची गोष्ट आहे. इंग्रजी कळणारे फोन तर कधीच आले होते. मराठी कळणारे नंतर. बऱ्याच नंतर. (याच्यामागे मामबो नावाच्या कट्ट्यावरील मनोहर आणी अकोलकर यांचा खूप हात आहे असे कळते) सुरुवातीला या फोनला मी गजर लाव, किती वाजले ते विचार अशा साध्या कामांसाठी वापरला. मग हिचे म्हणणे पडले कि स्वयंपाक करताना तिला असाच फोन हवाय म्हणून. आणि तो तिच्याकडे गेला. पण त्याच्यात माझ्या आवाजाचे काही नमुने शिल्लक होते. कारण ओट्यावर असताना, मिक्सर सुरू झाल्यावर त्याने ऱ्हवीश्वर ब्रह्मे यांना फोन लावला होता. तसा मागेही रात्री कधीतरी दचकून जागा होउन तो असे काही उद्योग करायचा. हिच्या म्हणण्यानुसार हा माझ्या घोरण्याचा परिणाम होता. मला यातले काहीच ठाउक नव्हते. पण हिने मला हे सांगितल्यावर कसा काय जाणे, पण माझे घोरणे सुरू झाले की रात्री हा फोन काहीबाही इंटरनेटवर खरेदी करून टाकायचा. आईशप्पथ सांगतो. त्या खरेद्या मला आवडणाऱ्या गोष्टिंच्याच असायच्या याला मी तरी काय करणार? आवाजी सुरक्षाशब्दांमुळे हे प्रकरण झाले होते बहुतेक. फोनवर आर्थिक देवाणघेवाणिच्या सोप्या आवाज नियंत्रित सोयींमुळे कधीकधी असा त्रास पण होतो. त्या कंपन्यांनी पण या कारणावर गोष्टी परत घ्यायला नकार दिला. घोरण्यामुळे एखादी गोष्ट विकत घेतली जाऊ शकते हे त्यांनी पुर्णपणे अमान्य केले होते. अर्थात माझी अशी कुठली गोष्ट मान्य होते म्हणा. पण त्यामुळे या सगळ्या वस्तू माझ्या गळ्यात पडल्या होत्या.
त्यात हा गृकृ आमच्या घरात नांदत होता. जो माझ्या आज्ञा पूर्णपणे विषद करून सांगितल्याशिवाय पाळत नव्हता, पण हिच्या मात्र नुसत्या इशाऱ्यावर नाचून कामे करत होता. मी एकदा त्या पत्र्याखाली यंत्रमानवाच्या नावाखाली कुणी दुसरेच आहे का हे पण बघायचा प्रयत्न केला. पण पोटाचा पत्रा उघडला तर आत नुसती पोकळी होती. त्यामुळे हे मानवी असण्याची शक्यता कमीच होती.
आता कालचीच गोष्ट घ्या. मनात आले, आणि हिची परवानगी घ्यायला लागणार नाही म्हणून मी त्याला म्हटले, “मस्त खेकडा भजी कर, खुसखुशीत!” मग लगेच याला खुसखुशीत हा शब्द कळणार नाही असे वाटून मी आज्ञा बदलणार, तेवढ्यात त्याची क्षनजर कपाटांवरून फिरायला लागली. याला माझी सवय झाली असावी असे वाटून मी आनंदलो. तर याने काही सेकंदातच मला, “घरात खेकडे नाहीत, कुठून आणू” असे विचारले. ज्या माणसाला, खरपूस, खमंग, फर्मास फक्कड अशा शब्दांचे अर्थच माहित नाहीत, त्याला अन्नपदार्थाची आर्डर कशी द्यायची हे मला कळेना. खेकडा भजी ही कांद्याची असतात, हे सांगायला लागले की त्यातली गंमत गेलिच. आता याला काय सांगणार बोकड काला आणि बिल्लिची भाकरी करायला?
आमच्या घरी गृकृ तसा रुळला होता आता. मी घरात अ-दिक्षित कामे करताना, फडताळे धुंडाळायला लागलो, की हातावर लाडीक यांत्रिक चपराक मारण्याइतका तो निर्ढावला होता. हिच्या मस्तकादेशामुळे याने मारलेल्या या लाडीक यांत्रिक चपराकिने माझे मनगट मोडीत काढले, आणि नंतर मनगटाला तीन महिने ते श्वेतगादीत गुंडाळून ठेवायला लागले हे वेगळे. कुठे पिंकिची आई, आणि कुठे हा! त्या घटनेपासून गृकृचे आणि माझे हाडवैर सुरू झाले, ते आत्तापर्यंत दोनदा मनगट, आणि एकदा कोपर मोडले, माझे, तरी चालूच आहे. अजूनही मी अदिक्षित कामे करत असताना, हिचा मनावर ताबा रहात नाही, आणि ती यांत्रिक चपराक मला तिच्या मनातल्या आवेशाने बसते. परिणामी, गृकृचे आणि माझे हाडवैर, हिचा स्वतःच्या मनावर ताबा येइपर्यंत चालूच रहाणार असे दिसते. त्यामुळे मी आजकाल घरात तो शहेनशाह घालायचा तशी लोखंडी दस्ताने घालून हिंडतो.
खरेतर तो रुळला, का आम्ही त्याला रुळलो हा तात्विक मतभेद अजूनही होताच. पण काही असले तरी सगळे एकमेकांची नीट ओळख ठेवून होते. मी रात्री न चुकता मानवी वरचष्मा (मॅन्यूअल ओव्हरराईड) वापरून तो विश्रामस्थितित आणून ठेवायचो. हो ना कारण नाहीतर हा रात्री काहीही करायचा. हिला पडलेले प्रत्येक स्वप्न हा, मी गाढ झोपलेलो असताना, खरे करायला लागला तर माझा सत्यानाशच व्हायचा.
तरी आता याच्यामुळे मला अंथरुणी, पांघरुणी चहा मिळातो. हा पांघरुणी शब्द, पांघरूण घातलेला चहा, यावरुन आलेला आहे. खूप जुना चित्रपट बघताना, तिच्यात एका ब्रिटिश मानवी गृकृने, त्याच्या मालकाला चहादाणिला (किटलि) एक गलेलठ्ठ पांघरूण घालून चहा दिलेला दिसला. हिला हे फार म्हणजे फारच आवडले. तेव्हापासून हा पांघरुणी चहा आम्हाला अंथरुणात असताना आयताच मिळतो. यासाठी मला हिला न सांगता अनेक उद्योग करायला लागतात ते वेगळे. कारण रात्री विश्रामस्थितीत घातलेला गृकृ, सकाळी आम्ही उठायच्या आधी आपोआप स्वेच्छेने चालू होउन, आम्ही साखरझोपेत असताना, बिनसाखरेचा चहा स्वतः कुणि न सांगता करून आणणे, हे यंत्रमानवाला लाजवेल असे कृत्य, तो कुणी न सांगता कसे करणार? यंत्रमानव आणि मानवी गृकृ, यांच्यात हाच तर मोठा फरक आहे. त्यामुळे मला, त्याला रात्री विश्राम स्थितित घालताना, त्याची सकाळची जागवेळ निश्चित करून ठेवायची, आणि प्रथमजाणकर्म (बूटींग या इंग्रजी शब्दाला वहाणावतरण, पायताणादेश किंवा पादत्राणाज्ञा असे अवजड शब्द सुचल्यामुळे सोयीसाठी वापरलेला हा वेगळा अजड शब्द) हे या पांघरुणी चहा करण्याचे आदेश हे मानवी वरचष्मा वापरून द्यावे लागायचे. तेव्हा तो सकाळी आपोआप जागा होउन आम्हाला हा पांघरुणी चहा, अंथरुणी पेश करत असे. या स्वर्गीय आनंदासाठी, मी, हिच्या पहाटेच्या स्वप्नांचा धोका उचलला होताच.
आज गजाननाच्या निरोपदिनी हा आनंद मिळणार, आणि सुट्टिची सुरुवात चांगली होणार या अपेक्षेत, मला कुणितरी माझा गळा दाबते आहे, हे कळलेच नाही. मी त्या पांघरुणी चहाचे स्वप्न बघत असतानाच मेंदूला प्राणवायू कमी पडतोय हे जाणवून त्याने मला अवेळी जाग आणली. माझ्या छाताडावर कुणी बसून माझे स्वरयंत्र दाबून धरले आहे, असे स्वप्न मला बरेचवेळा पडायचे, आणि मी घाबरून जागा व्हायचो. जागे झाल्यावर मोट्ठा श्वास घेतला की कळायचे, हे स्वप्न आहे. तसेच आज उठलो, तरी श्वास घेताच आला नाही. बघतो तर आमचे यांत्रिक बाळ माझ्या छाताडावर बसून खरेच माझा गळा दाबत होते. मला एकदम परिस्थितीती जाणिव होउन, हिला उठवण्याचे, स्वःहिताचे काम करावे लागणार, नाहीतर आज माझे काही खरे नाही, याची मला जाणीव झाली. तो मला मारायचा प्रयत्न करत नव्हता, फक्त गळा दाबून घाबराघुबरा करायचा, मग पकड सैल व्हायची. सैल झाली तरी ती यांत्रिक होती, त्यामुळे ती मला सोडवता यायची नाहीच. मला अजितशत्रू झाल्यासारखे वाटायला लागले. तो त्याच्या शत्रूंना म्हणे द्रवरूप प्राणवायूत बुडवून ठेवत असे. द्रव जगू देत नाही, आणि प्राणवायू मरू देत नाही म्हणून. तसेच काहिसे मला वाटत होते. माझ्या नरडेरोधित आकांतामुळे हिला यथाबऱ्याचावकाशानी जाग आली. तोपर्यंत मी निम्मा देवलोकी पोचलो होतो. हिला जाग आल्या आल्या हा जणू काही झालेच नाही असे भासवत, माझ्या छाताडावरून घरंगळून खाली पडला, आणि शेजेशेजारी जमिनिवर लोटांगणला. हिला तो आम्हाला साष्टांग नमस्कार करून गणपतीगमनदिनविशेषानंदेच्छा देत आहे असे वाटले, आणि 'कसा ग माझा बाळ तो' हा छोट्यासाठी विशेष राखून ठेवलेला वदनाभिनय तिने साक्षात गृकृसाठी केला. मी अर्थात दोन्ही हातानी माझा गळा धरून ही गोष्ट संमिश्र वेदनांनी बघत होतो. माझ्याकडे नजर जाताच, आणि मी दोन्ही हातानी स्वतःचा गळा धरून बसलोय आणि तो काळानिळा पडलाय, हे बघताच, ही, "अय्या म्हणजे ते स्वप्न नव्हतेच का?" असे आनंदाने चित्कारली. याच्यात आनंद होण्यासारखे काय आहे, हे मला कळले च नाही. तरी मी घोगऱ्या झालेल्या आवाजात हिला, "काय" असे विचारलेच. प्रतिक्षिप्त क्रिया, दुसरे काय? यावर हिने, तिला स्वप्नात देव आणि दानव समुद्रमंथन करत आहेत. त्यात मिळालेले विष हे शंकर होउन मी पीत आहे असे दिसले म्हणे. ती हे विष माझ्या पोटात गेल्यावर मी परत जीवाकडे महिनाभर जाईन या भितीने, माझ्या नरड्यातून हे वीष बाहेर काढायचा प्रयत्न करत होती असे स्वप्न पडले असे हिने सांगितले. म्हणजे हा मला मारायचा प्रयत्न नसून मला वाचवायचा प्रयत्न होता, हे कळूनही मला काही फार आनंद झाला नव्हताच. कारण गळा अजूनही दुखत होताच, आणि काळानिळाही पडला होताच. तो निळा पडलेला बघत, हिने काळजिने, "घेतलेच का तुम्ही विष?" असे विचारलेच. स्वप्नसत्याची लक्ष्मणरेषा इतक्या सहजपणे ओलांडता येणारी 'ही', ही एकच जमात या पृथ्वीतलावर आहे. आणि तिला गृकृसारखे भविष्यातील हुजरे जोवर उपलब्ध आहेत, तोपर्यंत माझ्यासारख्या स्वप्नातल्या शैवांचे काही खरे नाही. त्याऐवजी वैष्णवपंथ परवडला. मासा, कासव, डुक्कर, वामन, नरसिंहादी अवतार हे साक्षात विषप्राशनापेक्षा बरे म्हणायचे. काय जाणो, नाहीतर विष पोटात गेले असे समजून, हिच्या स्वप्नातला नरसिंह…. नकोच तो विचार.
तर, या गणेशविसर्जनदिनी, मी या नावडत्या घटना मनाआड करून, परत आनंदे, वाटली आणि परतलेली, अशा दोन डाळिंना शरण जायचा सुंदर हेतू मनात धरून, सकारात्मक दृष्टिने दिवसाकडे पहायला सुरुवात केली. सुट्टी या दोन डाळिंच्या आणि दहीभाताच्या सत्कारणी घालवावी या स्वप्नात मी गुंगून गेलो. तेवढ्यात मला हिने हे सगळे गृकृ करणार आहे असे सांगितले. आणि माझ्या पायाखालची जमिन, आणि पोटामधले पाणी, दोन्ही हलले. अगदी गदागदा. तशी त्याची जुनी खोड आम्ही जवळपास मोडून काढत आलोय. पूर्वी म्हणजे संपूर्ण पाककला, तो स्वतःच्या शरिरात पूर्ण करून, तयार अन्न तो विविध ठिकाणांमधून बाहेर काढायचा. हे बघायला अतिशय विचीत्र असायचे. पण अन्न तो चविष्ट करायला लागला होता. आता आम्ही त्याला सगळ्या गोष्टी शरिराबाहेर करायला शिकवतोय. म्हणजे आम्हाला मानसिक त्रास कमी. तरी तो अधूनमधून काहीतरी तोंडात टाकतोच. मला, स्वयंपाक करताना, काहीही तोंडात टाकल्यावर महिषासुर मर्दिनीसारखी गरागरा लाटणे फिरवणारी ही, गृकृला मात्र काहीही करत नव्हती. आत्तासुद्धा त्याने काजू बारीक कर म्हटल्यावर ते तोंडात टाकले. आणि हिनी ते पत्र्याचे शरीर न बडवता, शहाण्यासारखा त्याच्या तोंडाजवळ हात नेला, बारिक झालेले काजू हातात घेण्यासाठी. मी असे काजू बारिक केलेले हिला चालत नाहीत. आता त्यानी बारीक केलेले काजू हे काही काळानी, आणि मी बारिक केलेले काजू हे लगेच, माझ्याच तर पोटात जाणार आहेत. तरी ते हिला चालत नाही.
पण आता बऱ्याच गोष्टी तो शरिराबाहेर करायला शिकलाय. त्याची बोटे आकार आणि कार्य बदलू शकत असल्यामुळे त्याला हे जमत होते. पण बहुतेक सगळ्या गोष्टींची सोय स्वतःच्या शरिरात असताना, या गोष्टी बाहेर का करायच्या हे त्याला कळत नसावे. त्यामुळे त्याची ही खोड जात नव्हती. पण हिचे मन या बाबतीत पुर्णपणे मारले गेले होते. काहीवेळा हे बघणे टाळण्यासाठी मी स्वयंपाकघराच्या बाहेरच रहायचो. तरी हे माझे आवडते प्रकार हा कसे करणार? याची मला उत्सुकता होतीच.
मोदकाची उकड, ही मोदक करत असताना चटणी लावून गट्ट्ं करायची घरातल्या नवऱ्यांना लग्नसिद्ध मोकळीक असते. हे माझेच वाक्य मला उलटे पडले. कारण आज ही पोळी गृकृ लाटत होता, आणि माझे काही त्याच्याशी लग्न झालेले नाही. त्यामुळे हाताने छान गोल केलेली ती तांदळाच्या पिठाची उकड, मी उचलायला गेलो, तर मनगटावर परत तो लाडीक अदिक्षितीय फटका पडलाच. लोखंडी दस्ताने होती म्हणून वाचलो. पण मी या घटनेचा त्रिवार निषेध हा केलाच. तरी मला याचे कौतूकही वाटत होते. मी हातानी इतका छान गोल करू शकत नाही. हा अगदी सराईतासारखा ते करत होता. अर्थात हे योग्यच आहे, कारण त्याच्या करण्यामागे, हिच्या डोक्यातली ऋणाणूसंवादीपट्टिका, हिचे अनुभवी हातवारे त्याच्यापर्यंत पोचवत होती, एक शब्द न बोलता. मग इतका मोठा वशिला मिळाल्यावर काम चांगलेच व्हायला हवे.
गेल्या काही दिवसात यानी उच्छाद आणलाय. गणपती आल्यापासून हा वेड्यासारखे करतोय अगदी. पहिल्या दिवशी आनंदानी याला आरती म्हणायला उभे केले. म्हटले एकदा याच्यात सगळ्या आरत्या आवाजी नोंदवून ठेवल्या, की मग आपण नुसती आज्ञा द्यायची, "आरती कर". की झाले, आम्ही प्रसाद खायला मोकळे. पण हे असे होणे आमच्या नशिबी कुठून. पहिली ओळ संपल्या संपल्या, यानी आरतीच्या वर आवाज काढून हिच्या कुठल्या लांबच्या काकाच्या सावत्र मुलाच्या मामे बहिणिच्या मुलाला डेंग्यू झालाय असे सांगितले. याने हे का सांगितले हे आम्हाला कळत नव्हते. काहीतरी विचारल्याशिवाय स्वतःहून काही करणे हे गृकृच्या आदेशप्रणालीत नाही. मग डोक्यात एकदम प्रकाश पडला, हे 'वार्ता विघ्नाची' मुळे झालेले होते. मग मात्र मी पुढे सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची पर्यंत थांबलोच नाही. न जाणो याचा तो काय अर्थ काढायचा. त्यामुळे आरती सुरू झाली, की हा विश्रामस्थितित. तरी मी दुसऱ्या दिवशी, याची श्रवणक्षमता शून्य करून, हातात घंटा देउन, ती तरी वाजीव लेका, असा एक उद्योग करून बघितला. त्याचा परिणाम, माझे कान फाटण्याइतक्या जोरात ती घंटा वाजली जाणे यात झाला. ही घंटा इतक्या जोरात वाजू शकते याचे मला आश्चर्यच वाटले. वर घंटा वाजण्याचा, आणि आरतीचा, एकमेकांशी काही संबंध राहिला नाही ते वेगळे. आम्ही म्हणतोय वेगळ्या तालात, आणि घंटा वाजतेय तिसऱ्याच तालात. त्यामुळे मी अजून नवे प्रयोग न करता, त्याला आरती या प्रकारातून पूर्णपणे बाजूला काढून टाकला. प्रसाद खाउन झाला की मग याला विश्रामस्थितितून बाहेर काढायचा.
सोसायटिचा गणपती जेव्हा विसर्जनाला निघाला. तेव्हा आम्ही सगळे त्याच्याबरोबर जायचे म्हणून निघालो. मी याला विश्रामस्थितीत टाकायला विसरलो. ढोल ताशे ऐकल्यावर हिला खूप नाचायची उर्मी येते, हे ही मी विसरलो. परिणामी गणपती विसर्जन करून घरी आल्यावर, परत एकदा घर आवरणे, आणि मोडलेल्या गोष्टिंची पुनर्खरेदी, अशी एक क्रिया परत करायला लागली. मी मागच्यावेळच्या अनुभवावरून, गृकृमुळे होणाऱ्या घरगुती हानिचा विमा उतरवून ठेवला होता, हे बरे. मी लगेच त्या विमाकंपनिच्या माणसाला फोन केला. त्यानेही लगेच येउन तपासणी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे यावेळी निदानपक्षी खर्चतरी भरून येईल याचे समाधान होते. घरच्या गणपतीच्या विसर्जनानेळी मात्र याला विश्राम करायला लावले पाहिजे, हे ही मनाशी ठरवले.
तरी मी एक अभिनव प्रयोग करून बघितलाच. मुळातच वैज्ञानिकपणा रक्तात मुरल्यामुळे मला हे असे प्रयोग सतत करायला आवडतातच. दुसऱ्या विसर्जनाला मी हिला गच्चित बसवून, गृकृलाच मिरवणुकीत पाठवला. परिणामी हा मख्ख उभा यंत्र्या, ढोल वाजायला लागल्यावर, जो काही नाचत सुटला, ते आजूबाजूचे काही कार्यकर्ते धुळिला मिळाले, दोन ढोलवादकांची मनगटे, लाडीक चपराकीनी जायबंदी झाली, एका ताशावाल्याच्या याने मारलेल्या मिठिने बरगड्या तुटल्या, (ही मिठी का मारली गेली, ही गोष्ट खूपच संशयास्पद आहे असे मला वाटते) आणि गणपती चक्क रस्त्यावरच विसर्जित होणार होता, एवढे सगळे झाल्यावर, हिच्या ओठांचा चंबू झालेला मी बघितला, आणि तेव्हा तो थांबला. मग परत बायकांच्याच अशा परिस्थितितून हलकेच निसटून येण्याच्या सहज प्रवृत्तिमुळेच, हा लोकांना काही कळायच्या आधिच गुपचुप घरी परत आला. मी फक्त जायबंदी झालेले कार्यकर्ते वर्गणी मागायला आलेलेच होते, इतकी खात्री करून घेतली, आणि गृकृच्या पाठीवर शाबासकिची थाप मारली. यावेळी दस्ताने नव्हती, परिणामी मनगट परत श्वेतगादीत टाकायची वेळ आली आहे.
या श्वेतगादिमुळे घरच्या विसर्जनाला मी गणपती घेउन जाउ शकत नाही. त्यामुळे हे काम गृकृलाच करावे लागणार आहे. ही महाभयंकर गोष्ट माझ्या लक्षात आली. याचा तणाव येउन माझा रक्तदाब एकदम अस्मानी पोचला. वर हिने सगळे नीट होईल हे सांगितलेले, मला का पटेना, हे कळत नव्हते ते नव्हतेच. मी घाबरत घाबरतच अनंत चतुर्दशीला उठलो. याच्या निष्प्राण डोळ्यात मला आज व्रात्यपणा पुरेपूर भरलेला दिसत होता. हात मोडल्यामुळे मला याला आवाजी आज्ञा द्याव्या लागत होत्या. वर हिचे डोके फिरू नये म्हणूनही प्रयत्न करावे लागत होते. त्या गजाननाच्या सुंदर मुखाकडे बघून मी शेवटी त्यालाच विनंती केली, की बाबा आजचा हा तुमचा प्रवास नीट मार्गी लागूदे, म्हणजे निभावले.
आरती करताना त्याने तबक इतक्या जोरात फिरवले, की निरांजन छतावर आपटले, आणि जळणारा कापूर छताला चिकटून बसला. शिडी लावून तो एका हाताने तिथून काढताना, मी तोंडाने आरती म्हणत राहिलो. तेवढेच मन शांत ठेवायला काहीतरी. आज चिडायचे नाही असे मी मनाशी ठरवून टाकले होते. नाहितरी चुका माझ्याच होत्या तबक हळू फिरव हे मीच सांगायला हवे ना! पुढच्या सगळ्या आज्ञा मनाशी आधी संवाद करून दिल्या, त्यामुळे पुढची पूजा निर्धोक झाली.
बाप्पाला घेउन जाताना, पाट त्याच्या हातात देताना मी असाच धास्तावलो होते. पण याची पकड मजबूत. वर त्याच्यात जमिनिला समांतर ठेवणयासाठी काही प्रणाली आहे म्हणे. त्यामुळे पाट हलत नव्हता. आमची ही आगळी वेगळी मिरवणूक सुरू झाली, आणि गृकृने मोठ्याने तोंडातून ढोल ताशे वाजवायला सुरुवात केला. आजपर्यंत ऐकलेले सगळे याने मनात नोंदवून ठेवले होते. ते आज तो त्वेषात वाजवत होता. मलाही एकदम खूप आनंद झाला. नाहितरी घरच्या गणपतीच्या विसर्जनाला, इतके ढोलताशे कुठून येणार. या त्याच्या कृतीमुळे आमची मुक्याची विसर्जनप्रक्रिया, एकदम आवाजी मिरवणुकीत रुपांतरीत झाली, आणि गजाननाला योग्य निरोप दिल्याचे समाधान मला मिळाले.
घरी परतल्यावर मी याला परत विश्रामात टाकला. गृकृ यंत्रमानवच होता ना नक्की? कारण माझ्या डोळ्याच्या कोपऱ्यात, बाप्पा गेल्यामुळे एखादा अश्रू होताच. पण मला भास झाला, की गृकृच्यापण डोळ्यात, अगदी कोपऱ्यातच, पण दिसला मला.
खरोखरच होता, का नुसता मलाच दिसला, हे अजून नीट माहीत नाही.

Group content visibility: 
Use group defaults

वा...वा....मजा आली.यापूर्वी धुंद रवीं यांचा लुंगीवरचा लेख वाचताना अशीच हसले होते.त्याची आठवण आली.

फार मस्त लिहिलंय
पुढच्या वेळी जरा परिच्छेद पाडताना 1 लाईन सोडा.
अजून मजा येईल.या कथेवर एखादा 1 तासाचा मस्त एपिसोड बनू शकतो.
मला 'आयफोन च्या दर नव्या व्हर्जन मध्ये ते काहीतरी कमी करतात' हा पंच जबरदस्त आवडला आहे.

छान Happy